वाचकांचे प्रश्न
वाचकांचे प्रश्न
नसबंदी केल्यावर इच्छा असल्यास बीजवाहिन्या पुन्हा जोडण्याची शस्त्रक्रिया करून घेणे आता शक्य असल्यामुळे, ख्रिस्ती व्यक्तीने नसबंदीला संततिनियमनाची एक पद्धत समजावी का?
नसबंदी ही कुटुंब नियोजनाची सर्वात लोकप्रिय पद्धत आहे. नसबंदी करावी अथवा करू नये हे बरेच लोक आपली सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी, तसेच धार्मिक विश्वास यांच्या आधारावर ठरवतात. यहोवाच्या साक्षीदारांच्या बाबतीत पाहू जाता या गोष्टीचा त्यांच्या धार्मिक विश्वासांशी संबंध आहे; ते स्तोत्रकर्त्याप्रमाणेच इच्छा व्यक्त करतात: “हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखीव . . . मला धोपट मार्गाने ने.” (स्तोत्र २७:११) नसबंदीच्या शस्त्रक्रियेत नेमके काय केले जाते?
संतती नियमनाच्या उद्देशाने केल्या जाणाऱ्या पुरुष नसबंदीला व्हेसेक्टमी म्हणतात. या शस्त्रक्रियेत पुरुषाच्या अंडकोषातील दोन बीजवाहिन्यांचा अथवा नलिकांचा लहानसा भाग कापून त्या नलिकांची टोके बांधून टाकतात. हे बऱ्याच वैद्यकीय पद्धतींनी करणे शक्य आहे; उद्देश हाच असतो की, पुरुषबीजे अंडकोषातून बाहेर पडणे अशक्य व्हावे. महिलांच्या नसबंदीला ट्यूबल लिगेशन म्हणतात. या शस्त्रक्रियेत सहसा बीजकोषातील स्त्रीबीजे गर्भाशयात नेणाऱ्या बीजवाहिन्या (फॅलोपियन ट्यूब्स) कापून त्या बांधून टाकतात (किंवा जाळून बंद करतात).
लोकांची वर्षानुवर्षे अशी धारणा होती की या प्रक्रिया कायमस्वरूपी आहेत—म्हणजे नसबंदी केल्यानंतर पुन्हा मूल होणे अशक्य. पण नसबंदी केलेल्या काही लोकांना नंतर पस्तावा होतो किंवा बदललेल्या परिस्थितीमुळे त्यांना नंतर अपत्य हवे असते; हे लोक डॉक्टरकडे जाऊन नसबंदीच्या शस्त्रक्रियेत बंद केलेल्या नलिका पुन्हा जोडण्याची विनंती करतात. अत्याधुनिक उपकरणांचा आणि सूक्ष्मशस्त्रक्रियांचा शोध लागल्यामुळे या नलिका पूर्ववत करण्याचे प्रयत्न आणखीनच यशस्वी झाले आहेत. नसबंदी झालेल्या निवडक रुग्णांवर, बंद केलेल्या बारीक नलिका पुन्हा जोडण्याची शस्त्रक्रिया केली असता ५० ते ७० टक्के यश आल्याचे सहसा वाचायला मिळते. महिलांच्या बाबतीत ६० ते ८० टक्के यश येते असा दावा आहे. या माहितीमुळे काहींना असे वाटते की नसबंदीला आता कायमस्वरूपी समजण्याची गरज नाही; व्हेसेक्टमी आणि ट्यूबल लिगेशन हे संततिनियमनाच्या गोळ्या, निरोध किंवा कॉपर-टी यांच्याच प्रकारात मोडते—म्हणजे नंतर अपत्य हवे असल्यास ते अशक्य नाही. तरीसुद्धा, काही गंभीर वस्तुस्थितींकडे दुर्लक्ष केले जाऊ नये.
पहिली म्हणजे, बीजवाहिन्या जोडण्याची शस्त्रक्रिया कितपत यशस्वी होते, हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, नसबंदी करताना वाहिन्यांना किती नुकसान झाले आहे, वाहिन्यांचा किती भाग काढून टाकण्यात आला किंवा किती भागावर शस्त्रक्रियेचा व्रण आहे, नसबंदी होऊन किती वर्षे झाली आहेत आणि पुरुष नसबंदीच्या बाबतीत, शरीरात पुरुषबीजांना प्रतिकारक अशी प्रतिपिंडे निर्माण झाली आहेत किंवा नाही. शिवाय, सूक्ष्मशस्त्रक्रियेकरता आवश्यक असणाऱ्या सुविधा बऱ्याच भागांत उपलब्ध नसतात, आणि असल्या तरीही त्या अतिशय खर्चीक असतात हे देखील लक्षात घेतले पाहिजे. यामुळे, बीजवाहिन्या पुन्हा जोडण्याची शस्त्रक्रिया करवून घ्यायला अगतिक असणाऱ्यांना, इच्छा असूनही कदाचित ती करता येणार नाही. त्यांची नसबंदी कायमचीच ठरेल. * हे सर्व लक्षात घेता, नसबंदी केल्यावर वाहिन्या पुन्हा जोडण्याच्या शस्त्रक्रियेत आलेल्या यशाची जी टक्केवारी वरती दिलेली आहे, ती केवळ पुस्तकी अनुमानावर आधारित आहे, सर्वसाधारण प्रमाण म्हणून त्यांवर विश्वास ठेवता येत नाही.
या वस्तुस्थितीला दुजोरा देणारे काही पुरावे आहेत. पुरुष नसबंदीनंतर बीजवाहिन्या पुन्हा जोडण्याच्या शस्त्रक्रियेवर संयुक्त संस्थानांत प्रकाशित झालेल्या एका लेखात सांगितल्यानुसार, बीजवाहिन्या जोडण्याच्या शस्त्रक्रियेवर १२,००० डॉलर खर्च केल्यानंतर “केवळ ६३ टक्के पुरुषांच्या जोडीदारांना गर्भ राहतो.” शिवाय “नसबंदी केलेल्यांपैकी फक्त सहा टक्के पुरुषच बीजवाहिन्या पुन्हा जोडण्याची शस्त्रक्रिया करवून घेण्यासाठी येतात.” मध्य युरोपात करण्यात आलेल्या एका जर्मन सर्वेक्षणानुसार पुन्हा बीजवाहिन्या जोडण्याची शस्त्रक्रिया करवून घेण्याचा निर्णय सुमारे ३ टक्के पुरुषांनी घेतला. यांपैकी समजा निम्म्यांच्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या तरीसुद्धा याचा हाच अर्थ होईल की ९८.५ टक्के पुरुषांच्या नसबंदी शस्त्रक्रिया कायमच्याच होत्या. शिवाय, ज्या देशांत सूक्ष्म शस्त्रक्रिया करणारे सर्जन फार कमी आहेत किंवा अजिबातच नाहीत अशा देशांत तर हा दर आणखीनच जास्त असेल.
यास्तव, पुरुष अथवा स्त्री नसबंदी ही संतति नियमनाचीच एक तात्पुरती पद्धत आहे असे समजून या विषयाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे वस्तुस्थिती कळत असून डोळे मिटण्यासारखे होईल. शिवाय, ख्रिस्ती व्यक्तीला तर आणखी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.
उत्पत्ति १:२८) जलप्रलयानंतर पृथ्वीवर केवळ आठच लोक उरले होते, तेव्हा देवाने सुरवातीला दिलेली आज्ञा पुन्हा दिली. (उत्पत्ति ९:१) देवाने इस्राएल राष्ट्राला ती आज्ञा पुन्हा दिली नाही, पण इस्राएली लोकांत मुलेबाळे होणे अतिशय चांगले समजले जायचे.—१ शमुवेल १:१-११; स्तोत्र १२८:३.
सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संतती उत्पन्न करण्याची क्षमता ही आपल्या निर्मात्याने दिलेले एक वरदान आहे. त्याचा मूळ उद्देश असा होता की परिपूर्ण मानवांनी संतती उत्पन्न करून ‘पृथ्वी व्यापून टाकावी व ती सत्तेखाली आणावी.’ (देवाला मनुष्याच्या प्रजननाबद्दल किती महत्त्व वाटते हे इस्राएल राष्ट्राला त्याने जे नियमशास्त्र दिले होते, त्यातून दिसून येते. उदाहरणार्थ, एखादा विवाहित पुरुष निपुत्रिक मरण पावल्यास, त्याचा वंश पुढे चालवण्यासाठी त्याच्या भावाने त्याच्या पत्नीसोबत विवाह करून दिराचे कर्तव्य करावे अशी आज्ञा होती. (अनुवाद २५:५) आणखी समर्पक उदाहरण द्यायचे झाल्यास, दोन पुरुषांची मारामारी चालली असताना एकाच्या बायकोने त्याला मदत करण्यासंबंधी कोणता नियम होता ते पाहा. तिने आपल्या नवऱ्याला सोडवण्यासाठी त्याच्या शत्रूचे जननेंद्रिय पकडले, तर त्या स्त्रीचा हात कापून टाकावा असा नियम होता; येथे लक्ष देण्याजोगी बाब म्हणजे डोळ्याबद्दल डोळा या तत्त्वाच्या आधारावर तिच्या किंवा तिच्या नवऱ्याच्या जननेंद्रियांना काही नुकसान केले जावे अशी आज्ञा देवाने दिली नाही. (अनुवाद २५:११, १२) या नियमामुळे निश्चितच इस्राएली लोकांच्या मनात जननेंद्रियांबद्दल आदर निर्माण झाला असेल; या इंद्रियांचे विनाकारण नुकसान करणे योग्य नाही हे त्यांना कळले असावे. *
ख्रिस्ती लोक इस्राएलास देण्यात आलेले नियमशास्त्र पाळण्यास बांधील नाहीत हे आपल्याला माहीत आहे; तेव्हा अनुवाद २५:११, १२ येथे नमूद असलेला नियम त्यांना लागू होत नाही. येशूने आपल्या शिष्यांना असा काही नियम दिला नाही, किंवा असे सुचवलेही नाही की त्यांनी लग्न केलेच पाहिजे आणि होईल तितक्या मुलांना जन्म दिला पाहिजे; संततिनियमनाची एखादी पद्धत उपयोगात आणण्यापूर्वी बरीच दांपत्ये हा मुद्दा लक्षात घेतात. (मत्तय १९:१०-१२) प्रेषित पौलाने मात्र कामुक झालेल्या ‘तरुण विधवांना लग्न करून मुले प्रसवण्याचे’ प्रोत्साहन दिले होते. (१ तीमथ्य ५:११-१४) ख्रिस्ती व्यक्तीने कायमची नसबंदी करावी अथवा करू नये, म्हणजे मुले प्रसवण्याची आपली प्रजनन शक्ती स्वेच्छेने त्यागावी किंवा त्यागू नये या विषयाचा त्याने उल्लेख केला नाही.
देव मनुष्याच्या प्रजनन शक्तीला अतिशय महत्त्व देतो याचे हे संकेत ख्रिस्ती लोकांनी विचारात घेतले पाहिजेत. कुटुंब नियोजनाच्या उचित पद्धती उपयोगात आणाव्यात अथवा आणू नयेत आणि त्या केव्हा उपयोगात आणाव्यात हे प्रत्येक दांपत्याने स्वतः ठरवावे. अर्थात, भविष्यात गर्भधारणा झाली तर आईला अथवा बाळाला गंभीर अपाय होण्याचा धोका आहे, कदाचित जिवालाही धोका संभवू शकतो असे डॉक्टरांनी खात्रीने सांगितले असल्यास हा निर्णय एक गंभीर निर्णय ठरेल हे कबूल आहे. अशा परिस्थितीत काहींनी नाईलाजास्तव याआधी वर्णन केल्याप्रमाणे नसबंदी करवून घेतली; या उद्देशाने, की गर्भधारणेमुळे (जिला आधीच मुले आहेत अशा) आईच्या जिवाला धोका संभवू नये, तसेच मुलाच्याही जिवाला धोका संभवू नये, कारण ते कदाचित गंभीर प्राणघातक आजार घेऊन जन्माला येऊ शकते.
पण ज्या ख्रिस्ती व्यक्तीसमोर अशी असामान्य आणि स्पष्टपणे धोकेदायक परिस्थिती नाही तिने ‘स्वस्थचित्ताने’ विचार करावा आणि देव मनुष्याच्या प्रजनन क्षमतेला किती महत्त्व देतो हे लक्षात घेऊन त्याच्या अनुषंगानेच आपली विचारसरणी आणि कृत्ये पारखून पाहावी. (१ तीमथ्य ३:२; तीत १:८; २:२, ५-८) बायबलमध्ये आढळणारे संकेत ओळखून त्यानुसार वागण्याची प्रौढता यातून दिसून येईल. तरीसुद्धा, देवाच्या मतांना न जुमानता एखादी ख्रिस्ती व्यक्ती त्यांच्या विरोधात गेल्याचे चारचौघांत उघड झाल्यास काय घडेल? या व्यक्तीचा इतरांपुढे चांगला आदर्श आहे किंवा नाही, ही व्यक्ती बायबलच्या तत्त्वांनुसार निर्णय घेऊ शकते किंवा नाही या विषयी लोकांच्या मनात शंका येणार नाही का? अशा गंभीर विषयाच्या संदर्भात एखाद्याची बदनामी झाल्यास, सेवेच्या खास विशेषाधिकारांकरिता असलेल्या त्याच्या पात्रतेवर याचा निश्चितच प्रभाव पडेल. अर्थात, कोणी अज्ञानात ही शस्त्रक्रिया करवून घेतली असल्यास गोष्ट वेगळी आहे.—१ तीमथ्य ३:७.
[तळटीपा]
^ “[रेतोवाहिनी] पुन्हा जोडण्याच्या कमीतकमी ४० टक्के शस्त्रक्रिया यशस्वी होतात आणि सूक्ष्मशस्त्रक्रियेच्या पद्धतींत आणखी सुधारणा झाल्यावर या शस्त्रक्रिया अधिक यशस्वी होण्याची शक्यता आहे. तथापि, व्हेसेक्टमीच्या शस्त्रक्रियेने केलेली नसबंदी कायमस्वरूपीच समजावी.” (एन्सायक्लोपिडिया ब्रिटॅनिका) “नसबंदी ही कायमस्वरूपी शस्त्रक्रिया आहे असेच समजावे. बीजवाहिन्या जोडण्याची शस्त्रक्रिया करून मिळते असे रुग्णाला कदाचित सांगण्यात आले असेल, पण वस्तुस्थिती अशी आहे की ही प्रक्रिया (रिअनॅस्टोमोसिस) परवडण्यासारखी नसते, शिवाय यशाची खात्री देता येत नाही. ज्या स्त्रिया नसबंदी केल्यानंतर बीजवाहिन्या जोडण्याची शस्त्रक्रिया करवून घेतात, त्यांच्या बाबतीत अपस्थानीय गर्भधारणा होण्याचा धोका वाढतो.”—समकालीन बालरोग/स्त्रीरोग, जून १९९८.
^ या मुद्द्याला समर्पक असा आणखी एक नियम होता; तो असा की ज्या पुरुषाच्या जननेंद्रियाला काही गंभीर इजा झाली असेल त्याला देवाच्या मेळ्यास येण्याची परवानगी नव्हती. (अनुवाद २३:१) अर्थात, शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी) यात सांगितल्यानुसार हा नियम “समलैंगिक संभोगासारख्या अनैतिक उद्देशांसाठी मुद्दामहून केलेल्या खच्चीकरणाच्या संदर्भात होता.” त्यामुळे या नियमात संततिनियमनाच्या उद्देशाने केलेले खच्चीकरण किंवा त्यासम असणारी इतर कोणती प्रक्रिया विचारात घेतलेली नव्हती. सूक्ष्मदृष्टी यात असेही सांगितले आहे, की “यहोवाने असा समय येण्याविषयी आश्वासन दिले होते, जेव्हा तो षंढांना आपले सेवक म्हणून स्वीकारणार होता आणि ते आज्ञाधारक राहिल्यास त्यांचे नाव कन्यापुत्रांहून श्रेष्ठ करणार होता. येशू ख्रिस्ताने नियमशास्त्र रद्द केल्यानंतर विश्वास धरून त्यानुसार कार्य करणाऱ्या कोणालाही, मग त्यांची पूर्वीची स्थिती कशीही असो, त्यांना देवाचे आध्यात्मिक पुत्र होता येत होते. शारीरिक भेदभाव मिटले होते.—यशया ५६:४, ५; योहान १:१२.”