व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विध्वंसक कृत्यांचे निर्मूलन अशक्य नाही

विध्वंसक कृत्यांचे निर्मूलन अशक्य नाही

विध्वंसक कृत्यांचे निर्मूलन अशक्य नाही

“युवकांच्या हातून होणारी विध्वंसक कृत्ये ही नेहमीच मोठ्यांना अनादर दाखवण्याचा आणि त्यांच्या कायदेकानूनांबद्दल बेपर्वाई दाखवण्याचा एक मार्ग समजला गेला आहे,” असा खुलासा लेखक जेन नॉरमन आणि मायरन डब्ल्यू. हॅरिस देतात. यात बदल घडवून आणण्यासाठी काहीएक केले जाऊ शकत नाही असे अनेक युवकांना वाटत असले तरी “३ पैकी एका युवकाच्या मते, पालकांनी आपल्या मुलांना वेळ दिला, आणि किशोरवयीन मुलांना वाटणारा कंटाळा दूर करण्यासाठी काही केले गेले तर अशा विध्वंसक कृत्यांना आपोआपच खिळ बसेल,” असे सदर लेखकांनी सांगितले. युवकांना सतत काही ना काही करण्यात मग्न ठेवल्याने तसेच त्यांच्यावर पालकांची चांगली देखरेख असल्याने विध्वंसक कृत्ये कमी होण्याची शक्यता असली तरी एवढ्याने त्याच्या मूळ कारणांचे उच्चाटन होणे शक्य आहे काय?

मुले एकटी असतात तेव्हा ती सहसा असे उपद्‌व्याप करीत नाहीत, पण तेच मित्रांच्या घोळक्यात असताना किंवा दोघे दोघे मिळून, दुसऱ्‍यांचे आपल्याकडे लक्ष जावे म्हणून नको ती अविचारी कृत्ये करून बसतात. नेमकी हीच गोष्ट नेल्सनच्या बाबतीत घडली. मादक पदार्थांच्या किंवा दारूच्या नशेत तो सहसा विध्वंसक कृत्ये करून आपल्यातल्या रागाला, असंतोषाला वाट करून द्यायचा. कॅथलिक चर्चमध्ये जमीन सुधारणा आणि मजूर हक्क या विषयांवरील प्रवचने ऐकून झ्यूझेच्या मनात आंदोलन करण्याची इच्छा निर्माण झाली आणि आपला रोष व्यक्‍त करण्यासाठी त्याने विध्वंसक कृत्ये घडवून आणली. पण, नेल्सन आणि झ्यूझे या दोघांनाही दंगाधोपा किंवा विध्वंसक कृत्ये यांपेक्षा कितीतरी पटीने उत्तम असा एक मार्ग गवसला.

विध्वंसक कृत्यांच्या मुळाशी असणारी आणखी काही कारणे

काही युवक विध्वंसक कृत्ये का करतात याचे आपण जरा आणखी जवळून परीक्षण करू या. पौगंडावस्थेत आलेली अनेक मुले गोंधळलेली असतात आणि “त्यांच्या मते जग म्हणजे नुसता गोंधळ, वेड्यांचा बाजार असतो.” पण काही लोकांना कदाचित खरे वाटणार नाही तरीसुद्धा, एका अहवालात म्हटल्यानुसार: “युवकांनाही आपल्या जीवनाची, आपण कोणत्या दिशेने चाललो आहोत याची काळजी असतेच. बऱ्‍याच प्रौढांना खरे वाटणार नाही इतकी त्यांना काळजी असते.” तेव्हा, विध्वंसक कृत्ये करणारा एखादा युवक कदाचित कळत नकळत या कृत्यांतून आपल्या मनातली वैफल्यावस्था, गोंधळ आणि असमाधान व्यक्‍त करत असावा. सुरवातीला उल्लेखिलेल्या अभ्यासानुसार, “सर्वेक्षणातील एकाही व्यक्‍तीने, फार काय [एकेकाळच्या] विध्वंसप्रेमींनी देखील विध्वंसक कृत्यांना कौल दिला नाही, की त्याचे समर्थन केले नाही.”

कधीकधी तरुणांना कोणाकडून प्रशंसेचे, प्रोत्साहनाचे दोन शब्द कधीच ऐकायला मिळत नाहीत. शिवाय, आजकाल शैक्षणिक पात्रतेला अतिशय महत्त्व आल्यामुळे, तसेच नोकऱ्‍या मिळवण्यासाठी उच्च प्रतीचे प्रशिक्षण किंवा तांत्रिक कौशल्य असणेही अनिवार्य असल्यामुळे त्यांचा आत्मविश्‍वास खचतो. पुन्हा पालक, शिक्षक किंवा समवयस्क नको तितकी टीका करतात, अवाजवी अपेक्षा करतात; त्या तरुणाच्या किंवा तरुणीच्या गुणांच्या आधारावर नव्हे तर सहसा त्याने जीवनात काय मिळवले यावरच ते भर देतात. तेव्हा, अनेकजण बंड करतात किंवा विध्वंसक कृत्ये करतात ती केवळ स्वतःविषयी असमाधानी असल्यामुळे. अशावेळेस पालकांनी त्यांना प्रेम आणि अवधान दाखवल्यास त्यांचे हे दुःख बरेचसे कमी होणार नाही का?

भिंतींवर लिहून त्या विद्रूप करणे किंवा अशा इतर प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करण्याचेही काही अधिकाऱ्‍यांनी सोडून दिले आहे; पण सर्वसामान्य समाजचिंतक नागरिक अद्यापही असली विध्वंसक कृत्ये रोखण्यासाठी शिक्षकांनी आणि शाळा अधिकाऱ्‍यांनी काहीतरी करावे अशी अपेक्षा करतो. कायदेशीर कारवाई करण्याच्या बाबतीत द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिया म्हणतो: “विध्वंसक कृत्ये करणाऱ्‍याला दंड बसू शकतो किंवा मग कारावासही होऊ शकतो. काही सरकारांच्या कायद्यांनुसार मुलांनी केलेल्या विध्वंसक कृत्यांसाठी त्यांच्या आईवडिलांना जबाबदार धरले जाते. पण, बऱ्‍याचशा विध्वंसक कृत्यांसाठी शिक्षा होतच नाही. या प्रकरणांत कायद्याचा अंमल करणे सोपे नसते; शिवाय, एकेक विध्वंसक कृत्य लक्षात घेतले तर कायदेशीर कारवाई करण्याइतपत नुकसानही झालेले नसते.” एका अहवालानुसार, केवळ ३ टक्के अपराध्यांना पकडण्यात आले होते.

तुम्हीही कदाचित मान्य कराल, की बाल गुन्हेगारीचे मूळ कारण उपटून टाकण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पालकांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार करावेत. पण, जर कौटुंबिक जीवनच ढासळलेले असेल तर समाजही दुबळा होणार. ब्राझीलच्या साँऊ पाउलू विद्यापीठाच्या प्राध्यापिका ॲना लूइसा व्येरेरा डीमाटोस यांच्या मते युवकांच्या समस्यांची काही मूळ कारणे म्हणजे, “पालकांची म्हणावी तितकी देखरेख नसते, घरात कोणतेही नियम नसतात, एकमेकांशी सुसंवाद नसतो, मुलांकडे दुर्लक्ष केले जाते, आईवडिलांना त्यांची पर्वा नसते.”

येशूने भाकीत केले होते, की “अनीति वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीति थंडावेल;” आपल्या काळात येशूचे हे शब्द अगदी तंतोतंत पूर्ण झाले आहेत याचे आपण साक्षीदार आहोत. (मत्तय २४:१२) तसेच २ तीमथ्य ३:१-४ मधील शब्दही आज खरे ठरत आहेत हे कोण मान्य करणार नाही? प्रेषित पौलाने लिहिले: “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापास न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्‍वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी.” आणि वस्तूस्थिती अशी आहे, की अशा प्रवृत्तीच्या लोकांच्या केवळ सहवासामुळेही गुन्हेगार वृत्तीला खतपाणी मिळते. पण, तरी आपण हार मानू नये. सामाजिक स्तरावर या विध्वंसक कृत्यांना आळा घालण्यात यश आले नसले तरीही वैयक्‍तिक स्तरावर, स्वतःच्या जीवनशैलीत बदल करण्यात यशस्वी झालेले लोक आपल्याला नक्कीच आढळतात; हे लोक आता बेशिस्त किंवा अविचारीपणे वागत नाहीत आणि विध्वंसक कृत्यांकडे त्यांनी कायमची पाठ फिरवली आहे.

युवकांसाठी उत्तम मार्गदर्शन

विध्वंसप्रेमींना आणि इतरांनाही आपल्या व्यक्‍तिमत्त्वात बदल करण्यासाठी काय कारणीभूत ठरले? काही शिक्षकांचा, पालकांचा कदाचित विश्‍वास बसणार नाही पण या संदर्भात बायबलमध्ये सर्वोत्तम आणि अद्ययावत मार्गदर्शन दिलेले आहे. त्याचा अवलंब केल्याने, एकेकाळी विध्वंसक कृत्ये करणाऱ्‍यांना देवाच्या या विशिष्ट कायद्याचे पालन करण्याची प्रेरणा मिळाली आहे जो म्हणतो: “दुष्कर्म करण्यास प्रवृत्त होणाऱ्‍या बहुजनसमाजास अनुसरू नको.” (निर्गम २३:२) पूर्वी कधीही न समजलेल्या विश्‍वासांबद्दल, सिद्धान्तांबद्दल देवाच्या वचनात दिलेल्या सत्याकडे अनेकजण आकृष्ट झाले आहेत; आणि त्यातून ते जे काही शिकले त्याचा त्यांच्या जीवनावर उत्तम प्रभाव पडला आहे. साँऊ पाउलूमधील झ्यूझे नावाच्या युवकाचेच उदाहरण घ्या. लहानपणापासून मूर्तीपूजा करण्यास त्याला शिकवले गेले होते. यहोवा हे देवाचे नाव आहे आणि त्याला मूर्तीपूजा स्वीकार्य नाही हे त्याला समजले तेव्हा देवाला खूष करण्यासाठी झ्यूझेने स्वतःत बदल केला.—निर्गम २०:४, ५; स्तोत्र ८३:१८; १ योहान ५:२१; प्रकटीकरण ४:११.

हिंसक टोळ्या आणि संप यांत गुरफटून एका पाठोपाठ एक निराशाजनक अनुभवांना सामोरे जाण्याऐवजी नेल्सनला भवितव्याबद्दल एक शाश्‍वत आशा गवसली आणि त्या आशेमुळेच त्याला विलक्षण दिलासा मिळाला आहे. तो म्हणतो: “वाईटांची संगती धरल्यामुळे तसेच मादक पदार्थांच्या आहारी गेल्यामुळे एकेकाळी माझं कुटुंब मला त्यांच्यापासून दूर करत होतं; आता मात्र कुटुंबामध्ये माझा सगळ्यात जास्त आदर केला जातो. पुष्कळदा माझे वडील, वयाने माझ्याहून मोठे असलेल्या माझ्या भावांना मला सल्ला द्यायला सांगतात. यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करू लागलो तेव्हापासून मी आनंदी आहे आणि माझं जीवनही कसं अर्थभरीत झालं आहे.” मार्को नावाचा एक शहरी युवक, हाणामारीच्या वातावरणाला जणू सरावला होता; पण, देवाचे राज्य पृथ्वीचे रूपांतर एका नयनसुखद बागेत करील हे जाणून त्याला अत्यानंद झाला.—प्रकटीकरण २१:३, ४.

एकेकाळी टोळीचा सदस्य असलेल्या, रस्त्यावर मारामाऱ्‍या करणाऱ्‍या आणि विध्वंसप्रेमी असलेल्या एकाचे उदाहरण लक्षात घ्या. बालपणात अतिशय दुःखद अनुभव सोसलेला अनाथ वॉल्टर, या भ्रष्ट, दुष्ट जगातही देवाला भिऊन चालणारे लोक आहेत हे जाणून प्रभावित झाला. हे लोक, आपल्या जीवनात बायबलचे सिद्धान्त लागू करण्याचा मनःपूर्वक प्रयत्न करतात आणि दया, विचारीपणा आणि प्रेमळपणा दाखवतात. वॉल्टर म्हणतो: “खरंच येशूने जे अभिवचन दिलं ते माझ्या बाबतीत खरं ठरलं आहे; आज, ‘बंधू आणि भगिनी; आई आणि वडील’ यांनी बनलेलं एक अतिशय मोठं कुटुंब मला लाभलं आहे. भविष्यातल्या त्या काळाकडे मी दृष्टी लावून आहे जेव्हा देवाच्या नीतिमान सरकाराधीन सर्व लोक आनंदाने, एकोप्याने नांदतील.”—मार्क १०:२९, ३०; स्तोत्र ३७:१०, ११, २९.

विद्रोहापेक्षा काही उत्तम

इतरांविषयी विचारशीलता आणि प्रेम दाखवणे यासोबतच आधी विध्वंसप्रेमी असलेले हे लोक ‘वाइटाचा द्वेष करण्यास’ शिकले आहेत. (स्तोत्र ९७:१०; मत्तय ७:१२) तुमच्याबाबत काय? सर्वत्र आढळणाऱ्‍या विध्वंसक कृत्यांचा सामना करणारे तुम्ही एकटेच नसलात तरी देवाच्या वचनाचा अभ्यास केल्याने तुमची काळजी वाहणारा प्रेमळ स्वर्गीय पिता यहोवा तुमच्यासाठी एक खरीखुरी व्यक्‍ती बनेल. (१ पेत्र ५:६, ७) वैयक्‍तिक कमतरता किंवा गरिबी असतानाही देव तुम्हाला आध्यात्मिकरित्या उन्‍नती करण्यास मदत करू शकतो. हाच एक विलक्षण अनुभव आहे!

सर्व प्रकारच्या लोकांना बायबलमधील सत्य शिकायला मिळावे अशी यहोवा आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त यांची प्रांजळ इच्छा आहे. देवाचे वचन केवळ विध्वंसक कृत्ये करण्यापासूनच वैयक्‍तिकांना वंचित ठेवू शकत नाही; तर देवाचे सिद्धान्त लागू करण्याकरता आणखीन प्रगती करण्यासही ते त्यांना उत्तेजित करू शकते. परिणामस्वरूप, शुद्धतेसाठी आणि सदाचरणासाठी प्रसिद्ध असलेल्या एका आंतरराष्ट्रीय बंधुत्वाचे अर्थात यहोवाच्या साक्षीदारांच्या विश्‍वव्यापी मंडळीचे ते सदस्य बनतात. इफिसकर ४:२४ च्या सुसंगतेत या प्रामाणिक ख्रिश्‍चनांनी “सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्त्व व पवित्रता ह्‍यांनी युक्‍त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण” केला आहे. लवकरच सबंध जग अशाच प्रकारच्या लोकांनी व्यापून जाईल कारण केवळ याच लोकांचा बचाव होऊन ते सदा सर्वकाळ जिवंत राहतील.—पडताळा लूक २३:४३.

विध्वंसक कृत्ये नसलेले जग शक्य

विध्वंसक कृत्यांचा खरोखर अंत होईल यावर तुमचा विश्‍वास आहे का? हा आमूलाग्र बदल कसा काय शक्य होईल? देवाचे राज्य लवकरच या दुष्ट व्यवस्थीकरणाचा समूळ अंत करील. जाणूनबुजून देवाच्या नीतिनियमांचे उल्लंघन करण्यासाठी पृथ्वीच्या रहिवाशांना जबाबदार धरले जाईल. (पडताळा यशया २४:५, ६.) ‘पातकी पूर्णपणे नष्ट होतील’ तर नीतिप्रिय लोकांचे तारण होईल. ‘यहोवा त्यांना साहाय्य करील आणि त्यांना मुक्‍त करील. दुर्जनांपासून तो त्यांना मुक्‍त करील आणि तारील, कारण त्यांनी त्याचा आश्रय घेतला आहे.’—स्तोत्र ३७:३८-४०.

होय, विध्वंसक कृत्यांचे समूळ उच्चाटन केले जाईल; आणि त्यासोबतच गुन्हेगारी, अत्याचार, दुःख आणि दुष्टाई यांचेही. मग शांती, खरी नीतिमत्ता आणि सुरक्षितता हे नवीन जगाचे चित्र राहील. यशया ३२:१८ मधील शब्द खऱ्‍या अर्थाने पूर्ण होतील; ते वचन म्हणते: “आणि माझे लोक शांत स्थळी, निर्भय वसतिस्थानात व सुखाश्रमात राहतील.” निश्‍चितच, एका विश्‍वव्यापी नयनसुखद बागेत सहमानवांप्रती प्रेम आणि विचारशीलता दाखवणारे लोक एकत्र नांदतील.

इतर लाखो लोकांसोबतच, एके काळी विध्वंसप्रेमी असलेले लोक, यहोवा देवाबरोबरच्या एका घनिष्ट नातेसंबंधाचा अनुभव घेत आहेत. विध्वंसक कृत्यांकडे त्यांनी पूर्णपणे पाठ फिरवली आहे. देवाच्या नवीन जगात तुम्हाला जीवन मिळावे म्हणून तुम्ही देखील त्याच्या वचनाचे मार्गदर्शन स्वीकाराल का? प्राचीन काळातल्या स्तोत्रकर्त्याचे अनुकरण करा ज्याने देवाचे जाहीर वचन नमूद केले: “मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन; मी आपली दृष्टि तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन.”—स्तोत्र ३२:८.

[७ पानांवरील चित्र]

आईवडिलांच्या प्रेमामुळे आणि अवधानामुळे युवकांचे संरक्षण होते