व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विध्वंसक कृत्ये—का घडतात?

विध्वंसक कृत्ये—का घडतात?

विध्वंसक कृत्ये—का घडतात?

“माझे काहीही म्हणणे नाही.” साँऊ पाउलूच्या एका स्वच्छसुंदर परिसरातील अलीकडेच रंगवलेल्या भिंतीवर हे शब्द अगदी मोठ्या अक्षरांत कोणीतरी लिहिलेले होते. सौंदर्य विध्वंसनाचाच एक प्रकार, असे आपल्याला वाटेल. पण, भित्ती चित्र किंवा भिंतींवर लिहिणे हा कलासौंदर्य विध्वंसनाच्या अनेकानेक प्रकारांपैकी केवळ एक प्रकार आहे.

कल्पना करा: गुंड प्रवृत्तीच्या काही इसमांनी तुमच्या नव्याकोऱ्‍या कारची मोडतोड केली आहे; किंवा मग, जनतेच्या फायद्यासाठी असलेल्या सार्वजनिक मालमत्तेची त्यांनी नासधूस केली आहे. पण का? कशासाठी? अलीकडे विध्वंसक कृत्यांची इतकी बेसुमार वाढ का होत आहे याचा कधी तुम्ही विचार केला का? बऱ्‍याच ठिकाणी टेलिफोन-बूथ विरूप करण्यात, त्यांची मोडतोड करण्यात विध्वंसप्रेमींना एक आगळाच आनंद मिळतो; आणि रेल्वे, बसेस यांसारख्या सार्वजनिक परिवहनाविषयी तर विचारायलाच नको. यावरून, विध्वंसप्रेमींना कुणाची आणि कशाचीही पर्वा नाही हेच सिद्ध होते. पण, फोफावत जाणाऱ्‍या या विध्वंसक प्रवृत्तीच्या मुळाशी नेमके काय असावे?

सॉकर खेळात आपल्या संघाचा पराजय झाला म्हणून रिओ दी जेनिरोमधील मारकू * नावाचा युवक इतका हवालदिल झाला, की विजयी संघाच्या चाहत्यांच्या बसवर तो दगडफेक करू लागला. किंवा क्लायूस नावाच्या युवकाचे उदाहरण घ्या. अभ्यासात चांगले गुण मिळाले नाहीत म्हणून तो रागाने एवढा पेटून उठला, की दगडफेक करून त्याने शाळेच्या इमारतींच्या खिडक्यांची मोडतोड केली. पण, त्याच्या वडिलांना नुकसान भरपाई करावी लागली तेव्हा मात्र त्याची सगळी “मजाच” गायब झाली. अर्विन नावाचा एक युवक शाळा शिकता शिकता नोकरी करत होता. त्याला आणि त्याच्या मित्रांना सगळेजण चांगली मुले समजायचे. पण, त्यांचा टाईमपास कोणता, तर शेजारपाजारच्या परिसरातील वस्तूंची मोडतोड करणे, नासधूस करणे. अर्विनच्या पालकांना मात्र या प्रकाराचा गंधही नव्हता. वॉल्टर नावाच्या एका अनाथ मुलाला साँऊ पाउलूच्या रस्त्यांवर दिवस काढण्याशिवाय इलाज नाही. आणि त्याचे सगळ्यात जीवलग दोस्त कोण असतील? विध्वंसक कृत्ये करणाऱ्‍यांची टोळी. या टोळीत सामील होऊन तो कराटेही शिकला. या उदाहरणांवरून समजते, की विध्वंसक कृत्यांमागे एक ना अनेक लोक असून अशी कृत्ये चेतविणाऱ्‍या भावनाही अनेकविध आहेत.

द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिया म्हणतो: “सूड उगवण्यासाठी किंवा आपले राजकीय मत व्यक्‍त करण्यासाठी लोक विध्वंसक कृत्यांचा आधार घेतात. तरुण आणि चक्क वृद्ध लोकही कधीकधी निव्वळ ‘गंमत’ म्हणून हा गुन्हा करत असतात.” पण विध्वंसक कृत्ये ही, केवळ एक पोरखेळ नसून अतिशय घातक, प्रसंगी प्राणघातकही ठरू शकतात. उदाहरणार्थ, काही युवकांनी केवळ “थोडीशी गंमत” म्हणून रस्त्यावर झोपलेल्या एका माणसावर ज्वालाग्राही द्रव ओतून त्याला काडी लावून दिली. ब्राझीलियात राहणारा हा इंडियन गृहस्थ नंतर रुग्णालयात दगावला. एका माहिती सूत्रानुसार, “याची सफाई देताना या युवकांनी म्हटले, की या गोष्टीची कोणी दखल घेईल असं त्यांना मुळीच वाटलं नव्हतं; कारण याआधी कितीतरी भिकाऱ्‍यांना असे रस्त्यांवर जाळण्यात आले होते पण त्याबद्दल काहीएक कारवाई केली गेली नव्हती.” सहेतुक विध्वंसक कृत्यांत एखाद्याचा बळी घेतला जाओ अगर न जाओ, त्याची आर्थिक आणि भावनिक किंमत नक्कीच मोजता येण्यासारखी नाही. तर मग, ही विध्वंसक कृत्ये आटोक्यात कशी येतील?

अंत—कोणाकडून?

पोलिस किंवा शिक्षणसंस्था या विध्वंसक कृत्यांना पायबंद बसवू शकतात का? समस्या ही आहे, की मादक पदार्थांचा अवैध व्यापार किंवा खून यांसारखे अधिक गंभीर स्वरूपी अपराध सोडवण्यातच अधिकारी इतके व्यस्त असतात की ‘ज्यात कुणाचाही बळी घेतला जात नाही’ अशा अपराधांकडे दुर्लक्ष होते. एका पोलिस अधिकाऱ्‍याच्या मते, एखादा युवक पकडला जातो तेव्हा पालक सहसा “त्याच्या मित्रांना, त्याच्या शिक्षकांना किंवा मग त्याला ताब्यात घेतल्याबद्दल पोलिसांना दोष देतात.” प्रबोधनामुळे तसेच कायद्याचा अंमल केल्यामुळे विध्वंसक कृत्यांना काही प्रमाणात खिळ बसेल खरी पण, पालकांची मनोवृत्तीच बदलली नाही तर उपयोग काय? एक बाल गुन्हेगार परीविक्षा अधिकारी म्हणतात: “याचं एक मूळ कारण म्हणजे कंटाळा आणि योग्य संधी. [मुलं] रात्री उशिरापर्यंत घराबाहेरच असतात आणि त्यांना करायला काही उद्योग नसतो. शिवाय, त्यांच्यावर कुणाचीही देखरेख नसते; असती तर इतक्या उशिरापर्यंत ते घराबाहेर राहिलेच नसते.”

बऱ्‍याच ठिकाणी विध्वंसक कृत्ये ही एक गंभीर समस्या असली तरी हे चित्र कसे पालटले जाईल ते विचारात घ्या. सुरवातीला उल्लेख केलेल्या विध्वंसप्रेमी युवकांनी स्वतःत परिवर्तन केले; आणि आज समाजद्रोही कृत्यांकडे त्यांनी कायमची पाठ फिरवली आहे. आधी गुन्हेगार प्रवृत्ती असलेल्या या युवकांना स्वतःमध्ये हा बदल घडवून आणणे कसे शक्य झाले? शिवाय, विध्वंसक कृत्यांचे केवळ काही प्रमाणात नव्हे, तर समूळ उच्चाटन झाल्यास तुम्हाला त्याचे नवल वाटेल का? त्यासाठी, पुढील लेखही वाचण्याचे आमंत्रण आम्ही तुम्हाला देतो.

[तळटीपा]

^ नावे बदललेली आहेत.