व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘विश्‍वासाने एका घरचे झालेल्यांबद्दल’ प्रेम

‘विश्‍वासाने एका घरचे झालेल्यांबद्दल’ प्रेम

‘विश्‍वासाने एका घरचे झालेल्यांबद्दल’ प्रेम

खऱ्‍या ख्रिश्‍चनांमध्ये जणू रक्‍ताचे नाते असते. किंबहुना, सा.यु. पहिल्या शतकापासून ते एकमेकांना “बंधू” आणि “बहीण” असे संबोधत आले आहेत. (मार्क ३:३१-३५; फिलेमोन १, २) आणि हे काही पोकळ, भावनाशून्य शब्द नाहीत; देवाच्या उपासकांना एकमेकांविषयी खरोखरच कसे वाटते हे दर्शवणारे ते शब्द आहेत. (पडताळा १ योहान ४:७, ८.) येशूने म्हटले होते: “तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.”—योहान १३:३५.

चिलीमध्ये कित्येक दिवसांच्या दुष्काळानंतर १९९७ च्या जुलै महिन्यात वादळी पाऊस पडून पूर आला तेव्हा या प्रेमाचा प्रत्यय आला. अचानक अन्‍न, वस्त्र आणि इतर साधनसामग्रींची नितान्त गरज निर्माण झाली. विपत्तीचा घाला पडतो तेव्हा यहोवाचे साक्षीदार, पौलाने गलतीकरांना दिलेल्या सल्ल्याचे पालन करतात: “तर मग जसा आपणाला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्‍वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे.”—गलतीकर ६:१०.

म्हणूनच चिलीमध्ये पूर आला तेव्हा साह्‍य करण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांनी तातडीने एकत्र येऊन योजना आखल्या. अन्‍न, वस्त्र आणि अशी इतर साधनसामग्री गोळा करण्यात आली; ती वेगवेगळी करून सुव्यवस्थित बांधून विपत्तीग्रस्त परिसरांत पाठवण्यात आली. लहान मुलांनी तर आपली खेळणीसुद्धा दान केली! साह्‍य सामग्रीने भरलेले राज्य सभागृह पाहून एक बहीण अतिशय चकित झाली. ती म्हणते: “मी तर पाहतच राहिले; रडू की हसू, काहीच कळेना. आम्हाला याचीच तर गरज होती.”

मग अचानक, ज्या ठिकाणी आधी पूर आला होता त्याच परिसरातील एका भागास भूकंपाचा धक्का बसला. अनेक घरे जमीनदोस्त झाली. या भूकंपग्रस्तांची मदत करण्यासाठी अधिक साहाय्य समित्या नेमण्यात आल्या. सहसा यहोवाच्या साक्षीदारांच्या सभागृहांचे बांधकाम पाहणाऱ्‍या प्रादेशिक बांधकाम समित्या देखील साहाय्य करण्यासाठी पुढे आल्या. परिणामस्वरूप, बेघर झालेल्या लोकांना खुद्द आपल्या बांधवांनी बांधलेली सुबक घरे देण्यात आली. ही घरे साधीशीच असली तरी लौकिक साहाय्य संस्थांनी कर्जावर बांधून दिलेल्या आणि धड फरशी, खिडक्या नसलेल्या, रंगवगैरे न दिलेल्या घरांमध्ये मात्र ही घरे अगदी उठून दिसत होती.

मदत करण्यासाठी काही बांधव तर दूर दूरचा प्रवास करून आले होते. नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी प्रादेशिक बांधकाम समितीचे एक अध्यक्ष खुद्द व्हिलचेअरला जखडलेले असतानासुद्धा सलग दोन दिवस दुर्घटना स्थळाची पाहणी करत होते. एका अंध बांधवाने, योग्य मापाचे वासे कापून घेण्यासाठी सुताराकडे ते वाहून नेण्याचे मेहनती काम केले, तर एका मुक्या बांधवाने हे वासे गोळा करून काम चाललेल्या ठिकाणी पोहंचवले.

बांधवांनी केलेले हे साहाय्य कार्य पाहून लोक थक्क झाले. एका गावात आपल्या एका बहिणीच्या घराची डागडुजी चालली होती तिथेच पोलिसाची गाडी पार्क केलेली होती. काय चालले आहे हे जाणून घेण्यास पोलिस अतिशय उत्सुक होते. शेवटी, त्यातल्या एका पोलिसाने बांधवाला विचारलेच: “इतक्या आनंदानं काम करणारे हे लोक आहेत तरी कोण? किती पैसा मिळतो त्यांना या कामासाठी?” बांधवाने खुलासा करून सांगितले, की ते सर्व स्वंयसेवक आहेत. एका अधिकाऱ्‍याने म्हटले, की तो दर महिना चर्चला दशांस देतो पण भूकंप झाल्यापासून तो मेला कि जिवंत आहे हे पाहण्यासाठी एकदाही त्याच्या चर्चचा पाळक आला नाही! याच्या दुसऱ्‍या दिवशी बहिणीला एका पोलिस अधिकाऱ्‍याचा फोन आला. त्याने देखील या काम करणाऱ्‍या बांधवांना पाहिले होते. त्याने म्हटले, की काम करणाऱ्‍या त्या लोकांचा उत्साह पाहून तो इतका प्रभावित झाला होता, की त्यालाही त्यांच्यात सामील व्हावेसे वाटले.

खरेच, चिलीमधील मदतकार्य, त्या स्वयंसेवकांसाठी एक अत्यानंदाचा अनुभव, तर पाहणाऱ्‍यांसाठी एक सर्वोत्तम साक्ष होती.