व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपल्याला यहोवाच्या संघटनेची गरज आहे

आपल्याला यहोवाच्या संघटनेची गरज आहे

आपल्याला यहोवाच्या संघटनेची गरज आहे

“माझा देवावर विश्‍वास आहे; पण संघटित धर्माला मी मानत नाही,” असे कोणी म्हणताना तुम्ही कधी ऐकले आहे का? एकेकाळी चर्चमध्ये मोठ्या हिरीरीने भाग घेणाऱ्‍यांना जेव्हा कळले, की त्यांचा धर्म आध्यात्मिक गरजा पुरवण्यात उणा पडत आहे तेव्हा मात्र त्यांची घोर निराशाच झाली आणि संघटित धर्मावरील त्यांचा विश्‍वास उडाला. धार्मिक संघटनांमुळे कित्येक वेळा लोकांच्या पदरी निराशा पडली आहे हे खरे असले, तरी त्यांच्या मनांत देवाची उपासना करण्याची इच्छा अद्यापही जिवंत आहे. त्यामुळे चर्चमध्ये किंवा इतर कोणत्याही धार्मिक ठिकाणी जाऊन देवाची उपासना करण्यापेक्षा मनाला पटेल त्या मार्गाने देवाची उपासना करण्याचे ते पसंत करतात.

या संदर्भात बायबलमध्ये काही मार्गदर्शन आहे का? ख्रिश्‍चनांनी एखाद्या संघटनेशी सहवास ठेवावा असे देवाला वाटते का?

आरंभीच्या ख्रिश्‍चनांना संघटित असल्याचा फायदा झाला

सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टमध्ये यहोवाचा पवित्र आत्मा त्याच्या लोकांवर उतरला; हा पवित्र आत्मा एकमेकांपासून दूर असलेल्या ठराविकच विश्‍वासू जणांवर उतरला नाही, तर स्त्री-पुरुषांचा एक गट येरुशलेमच्या वरच्या खोलीत “एकत्र” जमला होता तेव्हा त्या गटावर देवाचा पवित्र आत्मा उतरला. (प्रेषितांची कृत्ये २:१) आणि अशाप्रकारे ख्रिस्ती मंडळीची स्थापना झाली आणि ह्‍याच मंडळीचे पुढे आंतरराष्ट्रीय संघटनेत रुपांतर झाले. यामुळे आरंभीच्या शिष्यांना खरोखरच खूप आशीर्वाद प्राप्त झाले. त्यांना देवाच्या आशीर्वादाची इतकी आवश्‍यकता का होती? याचे एक कारण म्हणजे, त्यांच्यावर एक महत्त्वाचे काम सोपवण्यात आले होते—या कामाद्वारे कालांतराने “सर्व राष्ट्रांस” देवराज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यात येणार होता. (मत्तय २४:१४) हे प्रचार कार्य यशस्वीरित्या कसे पार पाडावे याविषयी त्या मंडळीतील कमअनुभवी लोकांना त्यांच्या अनुभवी सहविश्‍वासू लोकांकडून पुष्कळ काही शिकायला मिळाले.

त्याचा परिणाम असा झाला, की देवाच्या राज्याचा संदेश येरुशलेमच्या बाहेर देखील पोहंचला. सा.यु. ६२ ते ६४ मध्ये प्रेषित पेत्राने “पंत, गलतिया, कप्पदुकिया, आशिया व बिथुनिया” यांत वसलेल्या ख्रिश्‍चनांना पहिले पत्र लिहिले; ही सर्व ठिकाणे आता आधुनिक तुर्कु येथे आहेत. (१ पेत्र १:१) पॅलेस्टाईन, लेबनॉन, सिरिया, सायप्रस, ग्रीस, इटली या ठिकाणी देखील विश्‍वासू लोकांचे वास्तव्य होते. सुवार्तेचा प्रचार इतक्या दूरपर्यंत झाला होता, की सा.यु. ६०-६१ मध्ये पौलाने कलस्सैकरांना लिहिले, की “आकाशाखालच्या सर्व सृष्टीत” सुवार्तेची घोषणा झाली आहे.—कलस्सैकर १:२३.

संघटनेशी संबंध ठेवल्यामुळे झालेला दुसरा लाभ म्हणजे, ख्रिश्‍चनांना एकमेकांच्या सहवासामुळे उत्तेजन मिळाले. मंडळीत एकत्र आल्यामुळे ख्रिश्‍चनांना प्रेरणादायक भाषणे ऐकायला मिळाली, पवित्र शास्त्रवचनांचा एकत्र अभ्यास करता आला, विश्‍वास मजबूत करणारे अनुभव सांगायला आणि ऐकायला मिळाले तसेच एकत्र मिळून प्रार्थना देखील करता आली. (१ करिंथकर, अध्याय १४) आणि प्रौढ पुरुषांना “देवाच्या कळपाचे पालन” करता आले.—१ पेत्र ५:२.

मंडळीचे सदस्य या नात्याने ख्रिश्‍चनांना एकमेकांची ओळख करून घेण्याची आणि एकमेकांवरील प्रेम प्रदर्शित करण्याची संधी मिळाली. मंडळीसोबत सहवास राखणे त्यांना कंटाळवाणे मुळीच वाटले नाही, त्याउलट एकत्र आल्यामुळे त्यांची उभारणी झाली आणि ते आध्यात्मिकरित्या मजबूत झाले.— प्रेषितांची कृत्ये २:४२; १४:२७; १ करिंथकर १४:२६; कलस्सैकर ४:१५, १६.

संघटित जागतिक मंडळी किंवा संघटना आवश्‍यक असल्याचे आणखी एक कारण होते ते म्हणजे त्यामुळे ख्रिश्‍चनांमधील ऐक्य टिकून ठेवण्यास फार मोठी मदत झाली. आपले “बोलणे सारखे” कसे ठेवावे हे ख्रिश्‍चनांना संघटनेमुळे शिकता आले. (१ करिंथकर १:१०) आरंभीच्या मंडळीच्या सदस्यांचे आचारविचार एक असणे फार महत्त्वाचे होते. कारण त्यांची शैक्षणिक पात्रता वेगवेगळी होती, त्यांची सामाजिक पार्श्‍वभूमी भिन्‍न होती. त्यांच्या भाषा वेगवेगळ्या होत्या आणि त्यांचे व्यक्‍तिमत्व देखील एकसारखे नव्हते. (प्रेषितांची कृत्ये २:१-११) काही वेळा त्यांच्यामध्ये प्रांजळ मतभेद देखील होत. पण, हे मतभेद मंडळीच्या आतच मिटवण्यासाठी ख्रिश्‍चनांना मदत करण्यात आली.—प्रेषितांची कृत्ये १५:१, २; फिलिप्पैकर ४:२, ३.

गंभीर प्रश्‍न स्थानिक वडिलांना हाताळता आले नाहीत तेव्हा पौलासारख्या प्रौढ, अनुभवी प्रवासी पर्यवेक्षकांची मदत घेण्यात आली. धार्मिक शिक्षणाविषयी काही शंकाकुशंका असल्यास येरुशलेममधील केंद्रिय नियमन मंडळाशी संपर्क साधला जायचा. सुरवातीला नियमन मंडळामध्ये येशू ख्रिस्ताचे प्रेषित होते, पण पुढे येरुशलेमच्या मंडळीतील वडील देखील या नियमन मंडळाचे सदस्य बनले. नियमन मंडळाला आणि त्याच्या प्रतिनिधींना सेवाकार्याचे संघटन करण्याचा, सेवेकरता शिष्यांची नेमणूक करण्याचा आणि धार्मिक शिक्षणाच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार देवाकडून प्राप्त झाला आहे यावर प्रत्येक मंडळीचा विश्‍वास होता. नियमन मंडळाद्वारे एखादा वाद सोडवल्यानंतर त्यांच्या अंतिम निर्णयाला मंडळ्या संमती दर्शवत आणि ‘बोध मिळाल्यामुळे आनंदी होत.’—प्रेषितांची कृत्ये १५:१, २, २८, ३०, ३१.

होय, यहोवाने पहिल्या शतकात संघटनेचा उपयोग केला. पण, आता आपल्या काळाबद्दल काय म्हणता येईल?

आजही आपल्याला संघटनेची गरज आहे

पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांप्रमाणे आजही यहोवाचे साक्षीदार देवाच्या राज्याचा प्रचार करण्याच्या कामगिरीकडे गांभीर्याने पाहतात. हे काम पार पाडण्याचा एक मार्ग म्हणजे बायबल आणि बायबलवर आधारित असलेल्या प्रकाशनांचे वाटप करणे आणि त्याकरता एका संघटित पद्धतीची आवश्‍यकता आहे.

ख्रिस्ती प्रकाशने काळजीपूर्वक तयार करावी लागतात, त्यांतील अचूकता तपासावी लागते आणि त्यानंतर ही प्रकाशने वेगवेगळ्या मंडळ्यांना पोहंचवावी लागतात. मग प्रत्येक ख्रिश्‍चनाला हे साहित्य आस्थेवाईक लोकांपर्यंत पोहंचवण्याकरता स्वेच्छेने पुढे यावे लागते. आणि याच मार्गाने कोट्यवधी लोकांपर्यंत देवाच्या राज्याचा संदेश पोहंचवला जात आहे. एकाच क्षेत्रात वारंवार प्रचार होऊ नये किंवा एखादे क्षेत्र पूर्णपणे दुर्लक्षित राहू नये म्हणून देवाच्या राज्याचे प्रचारक त्यांचे प्रचार कार्य सुव्यवस्थित पार पाडण्याचा प्रयत्न करतात. हे सर्व करण्यासाठी एखाद्या संघटनेची नक्कीच गरज आहे.

‘देव पक्षपाती नसल्यामुळे’ बायबलचे आणि बायबल आधारित साहित्याचे ज्ञान विविध लोकांपर्यंत पोहंचवण्याकरता त्यांच्या मातृभाषेत भाषांतर करणे आवश्‍यक आहे. (प्रेषितांची कृत्ये १०:३५) सध्या हे नियतकालिक १३२ भाषांत उपलब्ध आहे आणि यासोबत निघणारे सावध राहा! नियतकालिक ८३ भाषांत प्रकाशित होते. त्याकरता संपूर्ण जगभर अनुवादकांच्या सुसंघटित गटांची आवश्‍यकता आहे.

मंडळीचे सदस्य सभांना आणि संमेलनांना उपस्थित राहतात तेव्हा त्यांना उत्तेजन प्राप्त होते. त्याठिकाणी त्यांना बायबलवर आधारित असलेली प्रेरणादायक भाषणे ऐकायला मिळतात, एकत्र मिळून शास्त्रवचनांचा अभ्यास करता येतो, उभारणीकारक अनुभव ऐकायला आणि सांगायला मिळतात आणि सहविश्‍वासू लोकांसोबत प्रार्थना करायला मिळते. आणि पहिल्या शतकातील बांधवांप्रमाणे प्रेमळ प्रवासी पर्यवेक्षकांच्या उभारणीकारक भेटींचा देखील त्यांना फायदा होतो. आणि अशाप्रकारे ख्रिश्‍चन “एक कळप, एक मेंढपाळ” असे होतात.—योहान १०:१६.

हे खरे आहे, की यहोवाचे साक्षीदार परिपूर्ण नाहीत, आरंभीच्या बांधवांप्रमाणेच त्यांच्याकडूनही चुका होतात. तरी देखील ऐक्य टिकून राहावे म्हणून ते प्रांजळपणे प्रयत्न करतात ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे. आणि त्यांच्या या ऐक्यामुळेच संपूर्ण जगभरात देवाच्या राज्याच्या प्रचाराचे काम पार पाडले जात आहे.—प्रेषितांची कृत्ये १५:३६-४०; इफिसकर ४:१३.

[३१ पानांवरील चित्र]

ख्रिश्‍चन “एक कळप, एक मेंढपाळ” असे होतात