व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवनात बदल घडवणारा विश्‍वास

जीवनात बदल घडवणारा विश्‍वास

जीवनात बदल घडवणारा विश्‍वास

“देवावर विश्‍वास नसला तरीही माणूस सदाचारी असू शकतो.” हे शब्द अज्ञेयवादावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या एका स्त्रीचे आहेत. ती म्हणते की तिचा देवावर विश्‍वास नव्हता, तरीही आपल्या मुलांचे संगोपन तिने उच्च नैतिक स्तरांनुसार केले होते आणि तिच्या मुलांनीही त्यांच्या मुलांचे संगोपन तसेच केले होते.

याचा अर्थ देवावर विश्‍वास ठेवण्याची काही गरज नाही असा होतो का? या स्त्रीचे म्हणणे तर असेच होते. शिवाय, देवावर विश्‍वास न ठेवणारी प्रत्येक व्यक्‍ती वाईट वळणाची असतेच असे नाही हेसुद्धा तितकेच खरे आहे. प्रेषित पौलही ‘परराष्ट्रीयांविषयी’ बोलताना म्हणाला होता की ते, जे ‘नियमशास्त्रात आहे ते स्वभावतः करीत असतात.’ (रोमकर २:१४) प्रत्येक व्यक्‍तीला मग ती अज्ञेयवादावर विश्‍वास ठेवणारी व्यक्‍ती असली तरीही तिला एक स्वतंत्र विवेक असतो. पुष्कळजण आपला विवेक म्हणेल तेच मानत असतात—बरेवाईट ओळखण्याची ही नैसर्गिक बुद्धी ज्या देवाने त्यांना दिली आहे त्याच्यावर त्यांचा विश्‍वास नसला तरीही.

परंतु, देवावरील भक्कम विश्‍वास, म्हणजेच बायबलवर आधारित असलेला विश्‍वास, योग्य ते करण्यासाठी सर्वात शक्‍तिशाली प्रेरणा आहे; विवेकाकडून मिळणाऱ्‍या निराधार मार्गदर्शनापेक्षा असा भक्कम विश्‍वास केव्हाही चांगला. देवाचे वचन अर्थात बायबलवर आधारित असलेला विश्‍वास विवेकाला प्रशिक्षित करतो; चांगले आणि वाईट यातला भेद ओळखण्यास त्याला आणखी तल्लख करतो. (इब्री लोकांस ५:१४) शिवाय, कितीही प्रचंड दबाव आले तरी देखील अशा भक्कम विश्‍वासामुळे आपले उच्च स्तर राखायला लोकांना शक्‍ती मिळते. उदाहरणार्थ, २० व्या शतकादरम्यान पुष्कळ राष्ट्रांवर भ्रष्ट राजकीय सत्तांचे शासन आल्यामुळे तथाकथित सज्जन लोकांकडून भयंकर अत्याचार करवून घेण्यात येत होते. परंतु, देवावर खरा विश्‍वास ठेवणाऱ्‍या लोकांनी कोणत्याही परिस्थितीत आपल्या तत्त्वांशी हातमिळवणी केली नाही—असे करण्यात त्यांच्या जिवाला धोका होता तरीही. बायबल आधारित विश्‍वास लोकांच्या जीवनात बदल घडवू शकतो. आपले अस्तित्व हरवलेल्या व्यक्‍तींना हा विश्‍वास स्वातंत्र्य देऊ शकतो आणि गंभीर चुका टाळायला मदतही. याची काही उदाहरणे पाहा.

विश्‍वास कौटुंबिक जीवनात बदल घडवू शकतो

“आपल्या विश्‍वासाद्वारे तुम्ही अशक्य कोटीतली गोष्ट शक्य करून दाखवली आहे.” एका इंग्लिश न्यायाधीशाने जॉन आणि तानियाच्या मुलांचा ताबा कोणाकडे असावा याविषयी निर्णय देताना वरील उद्‌गार काढले. जॉन आणि तानिया यांचे प्रकरण अधिकाऱ्‍यांच्या लक्षात आले तेव्हा ते लग्न न करताच एकत्र राहत होते आणि त्यांच्यात पुष्कळ समस्या होत्या. जॉनला मादक पदार्थांचे व्यसन होते, शिवाय तो जुगारही खेळायचा. मग आपल्या या सवयी पुरवण्यासाठी तो लुटमार करायचा. आपल्या बायकोची आणि मुलांची काळजी तर तो मुळीच घेत नव्हता. मग अचानक असा कोणता “चमत्कार” घडला?

एकदा, पृथ्वीवर येणाऱ्‍या सुखाच्या काळाविषयी जॉनचा पुतण्या बोलत होता; तेव्हा जॉनला त्याविषयी आणखीन जाणून घ्यावेसे वाटले. म्हणून त्याने आपल्या भावाला आणि वहिनीला याविषयी आणखीन विचारले. त्याचा भाऊ आणि वहिनी यहोवाचे साक्षीदार आहेत आणि त्यांनी जॉनला या संदर्भात बायबलमधून जास्त माहिती दिली. हळूहळू, जॉन आणि तानियाचाही बायबलवर विश्‍वास वाढत गेला आणि त्यांनी आपल्या जीवनात परिवर्तन केले. त्यांनी आपल्या विवाहाची कायदेशीर नोंद केली आणि आपल्या सगळ्या वाईट सवयी सोडून दिल्या. त्यांच्या घराची तपासणी केल्यावर या अधिकाऱ्‍यांना एक नीटनेटके घर, सुखी कुटुंब, मुलांच्या संगोपनासाठी उचित वातावरण हे सर्व दिसले; हीच तपासणी त्यांनी जरा आधी केली असती तर असा बदल घडेल यावर त्यांचा विश्‍वासच बसला नसता. हा “चमत्कार” जॉन आणि तानियाच्या नवीन विश्‍वासामुळे झाला असे न्यायाधीशांनी अगदी उचितपणे म्हटले.

इंग्लंडहून हजारो किलोमीटर दूर, पूर्वेजवळील देशामध्ये एक तरुण विवाहिता, ज्यात लाखो लोक दरवर्षी सामील होतात त्या घटस्फोटाच्या दुःखद आकडेवारीत स्वतःलाही सामील करणार होती. तिला एक मूल होते; पण तिचा पती तिच्यापेक्षा वयाने फार मोठा होता म्हणून तिचे सगळे नातेवाईक तिला घटस्फोट घेण्याचा सल्ला देत होते. शेवटी ती घटस्फोट घेण्याच्या तयारीला लागली देखील. त्याच वेळी ती एका यहोवाच्या साक्षीदार बहिणीबरोबर बायबलचा अभ्यास करत होती. त्या बहिणीला तिच्याबद्दल कळाले तेव्हा तिने त्या तरुण स्त्रीला विवाहाविषयी बायबलचा काय दृष्टिकोन आहे तो समजावून सांगितला. तिने तिला सांगितले की, विवाह म्हणजे देवाकडील एक देणगी आहे; म्हणून त्यास क्षुल्लक लेखता कामा नये. (मत्तय १९:४-६, ९) त्या स्त्रीने विचार केला की, ‘ही बाई तर परकी आहे तरी माझा विवाह मोडू नये म्हणून प्रयत्न करत आहे; आणि दुसरीकडे, माझ्या रक्‍ताचे लोकच माझा विवाह मोडायला निघाले आहेत.’ त्या स्त्रीने नव्याने स्वीकारलेल्या बायबल आधारित विश्‍वासामुळे तिचा घटस्फोट झाला नाही.

गर्भपात ही कौटुंबिक जीवनाच्या संदर्भातली आणखी एक दुःखद आकडेवारी आहे. संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या एका अहवालानुसार दरवर्षी कमीत कमी ४.५ कोटी अर्भकांचा मुद्दामहून गर्भपात करण्यात येतो. यातला प्रत्येक गर्भपात एक दुर्घटनाच आहे. फिलिपाईन्समध्ये गर्भपात करायला निघालेल्या अशाच एका स्त्रीला रोखण्यास बायबलमधील ज्ञानाने मदत केली.

या स्त्रीला एकदा यहोवाचे साक्षीदार भेटले; तिने त्यांच्याकडून देव आपल्याकडून काय अपेक्षितो? * हे बायबल अभ्यासाचे माहितीपत्रक घेतले व ती बायबलचा अभ्यास करू लागली. अभ्यास करण्याचे कारण तिने पुष्कळ महिन्यांनंतर सांगितले. साक्षीदारांनी प्रथम या स्त्रीला भेट दिली होती तेव्हा ती गरोदर होती; आणि तिच्या पतीने आणि तिने गर्भपात करायचे ठरवले होते. परंतु, त्या माहितीपत्रकातील पृष्ठ २४ वरचे अर्भकाचे चित्र त्या स्त्रीच्या अंतःकरणाला स्पर्शून गेले. चित्राच्या बाजूला असे म्हटले होते की, ‘जीवनाचा झरा देवाजवळ आहे.’ ते बायबलमधील स्पष्टीकरण वाचूनच गर्भपात न करण्याचा निर्णय तिने घेतला. (स्तोत्र ३६:९) आता तिला एक गोंडस, देखणे बाळ आहे.

तुच्छ समजल्या जाणाऱ्‍या लोकांना विश्‍वास मदत करतो

इथिओपियामध्ये, फाटक्या-तुटक्या कपड्यांमधील दोन व्यक्‍ती यहोवाच्या साक्षीदारांच्या एका सभेला आल्या होत्या. सभा संपल्यावर एक साक्षीदार त्यांच्याकडे गेला आणि त्याने त्यांच्याशी ओळख करून घेतली. त्यांनी त्या साक्षीदाराकडे काही पैशांची मदत मागितली. साक्षीदाराने मात्र त्यांना पैसे न देता पैशांहून मौल्यवान गोष्ट दिली. त्याने त्यांना देवावर विश्‍वास ठेवायला उत्तेजन दिले; कारण हा विश्‍वास “सोन्यापेक्षा मूल्यवान” आहे. (१ पेत्र १:७) त्यांच्यापैकी एकाने चांगला प्रतिसाद दिला आणि तो बायबलचा अभ्यास करू लागला. यामुळे त्याचे जीवन पार बदलून गेले. त्याचा विश्‍वास दृढ होत गेला तसे त्याने धूम्रपान, दारूबाजी, अनैतिक चालचलन आणि खट (एक मादक पदार्थ) खाणे सोडून दिले. भीक मागण्याऐवजी स्वतःच्या पायावर उभे राहायला तो शिकला. त्याने आपल्या वाईट सवयी सोडून दिल्या आहेत व आता तो एक अर्थपूर्ण जीवन जगत आहे.

इटलीत, ४७ वर्षांच्या एका इसमाला दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती; त्याला न्यायालयीन मानसोपचार इस्पितळात ठेवण्यात आले होते. एका यहोवाच्या साक्षीदाराला अशा तुरुंगांमध्ये जाऊन लोकांना आध्यात्मिक मदत देण्याची परवानगी होती. तो यहोवाचा साक्षीदार या इसमाशी बायबलचा अभ्यास करू लागला. त्या इसमाने फार चांगली प्रगती केली. विश्‍वासामुळे त्याच्या जीवनात इतके परिवर्तन झाले की, आता इतर कैदी आपल्या समस्या घेऊन त्याच्याकडे येतात. त्याच्या बायबल आधारित विश्‍वासामुळे तुरुंगाचे अधिकारी त्याचा आदर करतात, त्याची प्रशंसा करतात आणि त्याच्यावर त्यांचा पूर्ण भरवसा आहे.

अलीकडील वर्षांमध्ये बातमीपत्रांमधून आफ्रिकेतल्या मुलकी युद्धांविषयी पुष्कळ छापले गेले आहे. त्यामध्ये बालसैनिकांविषयी सांगितलेली माहिती सर्वात धक्केदायक आहे. या लहान मुलांना मादक औषधे दिली जातात, त्यांच्यातला हळवेपणा मारला जातो. ज्या गटासाठी ते लढत असतात त्यांनाच निष्ठावान राहावे म्हणून या मुलांकडून स्वतःच्याच नातेवाईकांवर अत्याचार करण्याची अमानुष कृत्ये करवून घेतली जातात. अशा या निर्दयी बनलेल्या तरुणांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याइतके सामर्थ्य बायबल आधारित विश्‍वासात आहे का? दोन मुलांच्या बाबतीत तरी याचे सकारात्मक उत्तर मिळाले आहे.

लायबेरियातील एका कॅथलिक चर्चमध्ये ॲलेक्स ऑल्टर बॉयचे काम करायचा. पण वयाच्या १३ व्या वर्षी तो लष्करात भरती झाला आणि एक कुविख्यात बालसैनिक बनला. युद्ध करण्यात आणखी धीट बनण्यासाठी तो मंत्रतंत्र करू लागला. ॲलेक्सचे पुष्कळ साथीदार ठार मारले गेले; तो मात्र जिवंत राहिला. १९९७ मध्ये यहोवाच्या साक्षीदारांशी त्याची भेट झाली. ते लोक त्याला तुच्छ समजत नाहीत हे त्याने पाहिले. उलट, हिंसेविषयी बायबल काय म्हणते हे त्यांनी त्याला दाखवले. ॲलेक्सने सैन्यातील काम सोडले. ॲलेक्सचा विश्‍वास दृढ होऊ लागला तसा तो बायबलच्या आज्ञेप्रमाणे जगू लागला; ती आज्ञा अशी होती, “त्याने वाइटाकडे पाठ फिरवून बरे ते करावे. त्याने शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे व तिचा मार्ग धरावा.”—१ पेत्र ३:११.

एकदा सॅमसन नावाचा एक मुलगा ॲलेक्सच्या गावात आला; तोसुद्धा आधी लष्करात होता. त्याआधी तो चर्चमध्ये कॉयरबॉय होता; पण १९९३ साली तो लष्करात भरती झाला. त्याला मादक पदार्थांचे व्यसन लागले, तो जादूटोणाही करू लागला, त्याचे चालचालन काही ठीक नव्हते. १९९७ साली त्याला लष्करातून सुटका मिळाली. सॅमसन मोनरोव्हियाला एका खास सुरक्षा दलात भरती व्हायला जात होता. तेव्हा त्याच्या एका मित्राने त्याला यहोवाच्या साक्षीदारांशी अभ्यास करायचा आग्रह केला. अभ्यास केल्यामुळे त्यालाही बायबल आधारित विश्‍वास प्राप्त झाला. यामुळे लष्कर कायमचे सोडून द्यायला त्याला धैर्यही मिळाले. आता ॲलेक्स आणि सॅमसन हे दोघेही शांतिमय जीवन जगत आहेत आणि त्यांनी वाईट चालचालणूक सोडून दिली आहे. बायबल आधारित विश्‍वासाशिवाय या कठोर आणि निर्दयी तरुणांमध्ये परिवर्तन होणे शक्य होते का?

योग्य प्रकारचा विश्‍वास

अशी पुष्कळशी उदाहरणे आहेत पण येथे एकदोनच दिली आहेत. त्या उदाहरणांवरून बायबलवर आधारित विश्‍वासामध्ये केवढे सामर्थ्य आहे याची प्रचिती मिळू शकते. अर्थात, देवावर विश्‍वास असल्याचा दावा करणारी प्रत्येक व्यक्‍ती बायबलच्या उच्च दर्जांनुसार जगतेच असे नाही. खरे तर, काही नास्तिक लोक ख्रिस्ती म्हणवणाऱ्‍या लोकांपेक्षाही चांगले जीवन जगतात. याचाच अर्थ, आपण देवावर विश्‍वास ठेवतो असा फक्‍त दावा केल्याने बायबलवर आपला विश्‍वास आहे हे सिद्ध होत नाही.

प्रेषित पौलाने विश्‍वासाची परिभाषा, “आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्‍या गोष्टीबद्दलची खातरी” अशी केली. (इब्री लोकांस ११:१) यास्तव, विश्‍वास म्हणजे अदृश्‍य गोष्टींवर ठोस पुराव्यासह असणारा दृढ विश्‍वास होय. खासकरून हा दृढ विश्‍वास बाळगायचा असेल तर देव आहे किंवा त्याला आपली काळजी आहे आणि त्याच्या इच्छेप्रमाणे वागणाऱ्‍यांना तो आशीर्वाद देतो याबद्दल किंचितही शंका आपल्या मनात निर्माण व्हायला नको. प्रेषित पौलाने तर असेही म्हटले की, “देवाजवळ जाणाऱ्‍याने असा विश्‍वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्‍यांना तो प्रतिफळ देणारा आहे.”—इब्री लोकांस ११:६.

या अशाच विश्‍वासाने जॉन, तानिया आणि इतरांचे जीवन पार बदलले. या विश्‍वासामुळेच निर्णय घेताना ते देवाच्या वचनावर अर्थात बायबलवर पूर्ण भरवसा ठेवू शकले. शिवाय, सोपा वाटणारा परंतु चुकीचा मार्ग न धरता तात्पुरत्या काळासाठी काही त्याग करायलाही त्यांना मदत मिळाली. प्रत्येक अनुभव जरी वेगळा असला, तरी सर्व अनुभवांची सुरवात पाहिली तर ती एकसारखीच आहे. काही यहोवाचे साक्षीदार या व्यक्‍तींबरोबर बायबलचा अभ्यास करू लागले आणि बायबलमध्ये सांगितल्यानुसार “देवाचे वचन सजीव, सक्रिय” आहे, या सत्याचा ते अनुभव घेऊ लागले. (इब्री लोकांस ४:१२) देवाच्या वचनाच्या शक्‍तीने प्रत्येक व्यक्‍तीचा विश्‍वास दृढ केला आणि त्यामुळे त्या प्रत्येकाच्या जीवनात केवढे चांगले बदल घडून आले आहेत.

यहोवाचे साक्षीदार आज २३० हून अधिक देशांमध्ये आणि द्वीपांमध्ये कार्य करत आहेत. तुम्ही बायबलचा अभ्यास करावा म्हणून ते तुम्हालाही आमंत्रण देत आहेत. का? कारण बायबलवर विश्‍वास ठेवल्याने तुमच्या जीवनातही पुष्कळ सुधार होऊ शकतात याची त्यांना खात्री आहे.

[तळटीपा]

^ परि. 10 वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ इंडियाद्वारे प्रकाशित

[३ पानांवरील चित्रे]

बायबलवर विश्‍वास ठेवल्याने जीवनामध्ये चांगले बदल घडून येतात

[२ पानांवरील चित्राचे श्रेय]

Title card of Biblia nieświeska by Szymon Budny, १५७२