व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

लहानपणापासून निर्माणकर्त्याचे स्मरण

लहानपणापासून निर्माणकर्त्याचे स्मरण

जीवनकथा

लहानपणापासून निर्माणकर्त्याचे स्मरण

डेव्हिड हिब्शमन यांच्याद्वारे कथित

“माझ्या जीवनाचा हा अंतिम काळ असला तर आतापर्यंत मी यहोवाला विश्‍वासू राहिले असेन हीच माझी आशा आहे. त्याने माझ्या डेव्हिडची काळजी घ्यावी एवढीच त्याच्याजवळ माझी याचना आहे. यहोवा देवा, डेव्हिडसारखा चांगला नवरा दिलास आणि इतकं सुखी जीवन दिलंस म्हणून मी तुझे खूप आभार मानते!”

मार्च १९९२ रोजी माझ्या पत्नीला दफन करून आल्यावर मला तिच्या डायरीत हे शेवटचे शब्द आढळले; तेव्हा माझ्या मनाची काय स्थिती झाली असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. पाच महिन्यांआधीच हेलननं पूर्ण-वेळेच्या सेवाकार्यात ६० वर्षं पूर्ण केले म्हणून आम्ही तो दिवस साजरा केला होता.

मला अजूनही आठवतं की, १९३१ साली अमेरिकेतल्या ओहायो, कोलंबस इथल्या अधिवेशनात आम्ही दोघं शेजारी शेजारी बसलो होतो. हेलन त्यावेळी धड १४ वर्षांचीही नव्हती, पण त्या घटनेचं तिला जितकं महत्त्व वाटत होतं तितकं मलासुद्धा वाटत नव्हतं. थोड्या काळानंतर हेलन आणि तिची विधवा आई या दोघीही पायनियर (यहोवाच्या साक्षीदारांमधल्या पूर्ण-वेळेच्या सुवार्तिकांना पायनियर म्हणतात) बनल्या तेव्हा तर हेलनला सेवाकार्याबद्दल खरंच किती उत्साह होता याचा प्रत्यय आला. त्या दोघींनी आपलं आरामदायी घर विकलं आणि दक्षिण अमेरिकेतल्या ग्रामीण भागांमध्ये त्या प्रचार करण्यास गेल्या.

माझा ख्रिस्ती वारसा

माझे आईबाबा १९१० साली आपल्या दोन लहान मुलांना घेऊन पेन्सिल्व्हेनियाच्या पूर्वेकडून पश्‍चिमेला ग्रोव्ह सिटीत राहायला आले. त्यांनी निम्मे पैसे देऊन एक छोटंसं घर विकत घेतलं आणि तिथल्या रिफॉर्म्ड चर्चचे सदस्य बनले. तिथं राहायला येऊन त्यांना जास्त काळ झाला नव्हता तोच विल्यम इव्हान्स नावाचे एक बायबल विद्यार्थी (त्या काळातले यहोवाचे साक्षीदार) आमच्या घरी आले. ते मूळचे वेल्स इथले होते. त्यांचा स्वभाव फार चांगला होता. आईबाबांनी त्यांचं फार लक्षपूर्वक ऐकून घेतलं. त्या वेळी माझे बाबा फक्‍त २४-२५ वर्षांचे होते आणि आई त्यांच्याहून पाच वर्षांनी लहान होती. बायबलची सत्यं कळाल्यावर त्यांनी वेळ न दवडता लागलीच सत्य स्वीकारलं.

सभेला जाणं सोपं व्हावं म्हणून बाबांनी शॅरोन या शहरात घर घेतलं; आमच्या आधीच्या घरापासून ते ४० किलोमीटर अंतरावर होतं. काही महिन्यांनंतर, १९११ की १९१२ साली आईबाबांचा बाप्तिस्मा झाला. त्यांच्या बाप्तिस्म्याचं भाषण चार्ल्स टेज रस्सल (वॉच टावर संस्थेचे पहिले अध्यक्ष) यांनी दिलं होतं. माझा जन्म डिसेंबर ४, १९१६ रोजी झाला; माझ्या आधी चार भावंडं होती. माझा जन्म झाला तेव्हा कुणीतरी असं म्हटलं: “आणखी एक लाडका भाऊ झाला.” म्हणून माझं नाव डेव्हिड ठेवण्यात आलं (डेव्हिडचा अर्थ होतो “प्रिय”).

मी फक्‍त चार आठवड्यांचा होतो तेव्हा मला एका अधिवेशनाला नेण्यात आलं; ते माझं पहिलं अधिवेशन होतं. त्या काळी, मंडळीच्या सभांना माझे बाबा आणि माझे थोरले भाऊ कित्येक किलोमीटर पायी चालत जायचे; आई मात्र मला आणि माझ्या बहिणीला घेऊन ट्रॅममधून जायची. सभांमध्ये दोन कार्यक्रम असायचे; एक सकाळी आणि एक दुपारी. आमच्या घरी टेहळणी बुरूज आणि द गोल्डन एज (सावध राहा! मासिकाचं आधीचं नाव) मासिकांमधल्या लेखांवरच जास्त चर्चा व्हायची.

उत्कृष्ट उदाहरणांचा लाभ

आमच्या मंडळीत पुष्कळसे पिलग्रिम्स (म्हणजेच एकीकडून दुसरीकडे भाषणं देत प्रवास करणारे बांधव) यायचे. सहसा ते आमच्याबरोबर एकदोन दिवस मुक्काम करायचे. त्यांच्यामधली एक व्यक्‍ती मात्र अजूनही मला आठवते—वॉल्टर जे. थॉर्न. त्यांनी “आपल्या तारुण्याच्या दिवसांत” आपल्या निर्माणकर्त्याचं स्मरण केलं होतं. (उपदेशक १२:१) मी लहान होतो तेव्हा, मानवजातीच्या इतिहासावर आधारित असलेला “फोटो-ड्रामा ऑफ क्रिएशन” हा चार भागांचा चित्रपट दाखवायला बाबांबरोबर जायचो; त्या चित्रपटात आवाजही रेकॉर्ड केलेले होते.

इव्हान्स ब्रदर आणि त्यांची पत्नी मरियम यांना मुलं नव्हती. पण तेच आमचे आजी-आजोबा बनले आणि आध्यात्मिक पालकसुद्धा. विल्यम ब्रदर माझ्या बाबांना नेहमी “बेटा” असंच म्हणायचे; आमच्या कुटुंबामध्ये सुवार्तिक बनण्याचा उत्साह त्यांनीच निर्माण केला. इव्हान्स ब्रदर, स्वान्सियाच्या आसपासच्या क्षेत्रात बायबलचं सत्य पोचवण्याकरता पुष्कळदा वेल्सला गेले. तिथं लोक त्यांना अमेरिकाचा प्रचारक असं म्हणायचे.

इव्हान्स ब्रदरनी १९२८ मध्ये आपली नोकरी सोडली आणि पश्‍चिम व्हर्जिनियाच्या पहाडी क्षेत्रांमध्ये प्रचार करू लागले. माझे दोन थोरले भाऊ—२१ वर्षांचा क्लॅरेन्स आणि १९ वर्षांचा कार्ल—त्यांच्यासोबत जायचे. आम्ही चौघा भावांनी पुष्कळ वर्षं पूर्ण-वेळेचं सेवाकार्य केलं. आम्ही तरुण असताना तर प्रत्येकानं यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रवासी पर्यवेक्षकाचं काम केलं आहे. माझ्या धाकट्या मेरी मावशीनं (सध्या ती ९० हून जास्त वर्षांची आहे) अलीकडेच पत्रात मला असं लिहिलं की, “इव्हान्स ब्रदरना सेवाकार्याबद्दल आवेश होता आणि ते ग्रोव्ह सिटीला आले ते किती बरं झालं, नाही का?” मेरी मावशीनंसुद्धा तारुण्यातच आपल्या निर्माणकर्त्याचं स्मरण केलं होतं.

अधिवेशनांना जाणं

सिडर पॉईंट ओहायोला १९२२ साली झालेल्या महत्त्वपूर्ण अधिवेशनाला फक्‍त बाबा आणि क्लॅरेन्स जाऊ शकले. पण १९२४ मध्ये आम्ही गाडी घेतली होती म्हणून सगळेजण कोलंबस, ओहायोच्या अधिवेशनाला गेलो. त्या आठ दिवसांच्या अधिवेशनामध्ये जेवणाच्या खर्चासाठी आम्हा सर्व भावंडांना स्वतःचे पैसे जमा करायला सांगितलं होतं. माझ्या आईबाबांचं एक होतं की, सगळ्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे. म्हणून आम्ही मुलांनी कोंबड्या आणि ससे पाळले होते आणि मधमाशांचं पोळं ठेवून आम्ही मधही काढायचो. आम्ही मुलं वृत्तपत्र वाटण्याचं कामसुद्धा करायचो.

टोरोंटो, कॅनडा इथं अधिवेशन होतं तेव्हा म्हणजे १९२७ मध्ये आम्हाला पॉल नावाचा आणखीन एक भाऊ झाला होता; तेव्हा तो सहा महिन्यांचा होता. मग पॉलची काळजी घेण्यासाठी मला आणि मेरी मावशीला (ती विवाहित होती) घरी ठेवून बाकीच्या सर्वांना आईबाबा टोरोंटोला घेऊन गेले. घरी राहून पॉलची काळजी घेतल्यामुळं मला दहा डॉलर मिळाले; त्या पैशांमध्ये मी माझ्यासाठी एक नवीन सूट घेतला. सभांना जाताना नेहमी आपला पेहराव नीटनेटका असावा आणि आपल्या कपड्यांची नीट काळजी घ्यावी असं आम्हाला शिकवलं होतं.

कोलंबस, ओहायो इथलं अविस्मरणीय अधिवेशन झालं तेव्हा म्हणजे १९३१ मध्ये क्लॅरेन्स आणि कार्ल यांची लग्नं झालेली होती आणि ते दोघंही आपल्या पत्नींसह पायनियरींग करत होते. त्यांच्या प्रत्येकाचं एक मोबाईल घर (फिरतं घर) होतं; हे मोबाईल घर त्यांनीच तयार केलं होतं. कार्लची पत्नी क्लेअर हुस्टन ही पश्‍चिम व्हर्जिनियाच्या व्हिलिंग इथली होती. म्हणूनच कोलंबसच्या अधिवेशनात मी क्लेअरच्या धाकट्या बहिणीच्या म्हणजेच हेलनच्या शेजारी बसलो होतो.

पूर्ण-वेळेची सेवा

माझी शाळा १९३२ साली पूर्ण झाली; त्या वेळी मी १५ वर्षांचा होतो. त्यानंतर एक वर्षानं मी एक जुनी कार माझ्या भावाला, क्लॅरेन्सला दिली. तो दक्षिण कॅरोलिनात पायनियरींग करत होता. मीसुद्धा पायनियर सेवेसाठी माझं नाव दिलं आणि क्लॅरेन्स आणि त्याच्या बायकोबरोबर काम करू लागलो. हेलन केंटकीमध्ये होपकिन्झव्हिल इथं पायनियरींग करत होती; तेव्हा मी तिला पहिल्यांदा पत्र लिहिलं. त्याचं उत्तर आलं तेव्हा तिनं विचारलं होतं: “तू पायनियर आहेस का?”

मग मी तिला पुन्हा लिहिलं होतं: “होय मी पायनियर आहे आणि शेवटपर्यंत पायनियर राहावं हीच माझी इच्छा आहे.” या घटनेला जवळजवळ ६० वर्षं होऊन गेल्यावरही म्हणजे अगदी शेवटपर्यंत हेलननं ते पत्र तिनं जपून ठेवलं होतं. त्याच पत्रामध्ये मी हेलनला हेसुद्धा सांगितलं होतं की माझ्या प्रचारात मी कशाप्रकारे द किंग्डम, द होप ऑफ द वर्ल्ड ही पुस्तिका पाळकांना आणि न्यायालयीन अधिकाऱ्‍यांना दिली होती.

बाबांनी माझ्यासाठी १९३३ साली एक फिरता तंबू बनवला; हा २.४ मीटर बाय २ मीटरचा ट्रेलर होता; त्याच्या चारही बाजूंना चार बारीक दांडे होते; त्यांच्या भोवती कॅनव्हास गुंडाळून ते झाकलं गेलं होतं. शिवाय, समोर एक खिडकी होती आणि मागच्या बाजूलाही एक खिडकी होती. पायनियरींगच्या पुढील चार वर्षांपर्यंत तेच माझं गरिबाचं घर होतं.

मार्च १९३४ साली, क्लॅरेन्स, कार्ल, त्यांच्या पत्नी, हेलन, तिची आई, क्लॅरेन्सची मेहुणी आणि मी असे आम्ही आठ जण पश्‍चिमेला कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलीझ इथल्या अधिवेशनाला जायला निघालो. काहीजण माझ्या ट्रेलरमधून प्रवास करत होते; त्यात झोपण्याची सोय तर होतीच. मी कारमध्ये झोपलो तर बाकीचे लॉजमध्ये राहिले. रस्त्यात आम्हाला कारनं त्रास दिल्यामुळं आम्ही लॉस एंजेलीझला पोचलो खरं पण अधिवेशनाच्या (तसं अधिवेशन सहा दिवसांचं होतं) दुसऱ्‍या दिवशी. तिथं मार्च २६ रोजी हेलन आणि माझा बाप्तिस्मा झाला; यहोवाला आम्ही समर्पण केल्याचं ते प्रतीक होतं.

अधिवेशनाच्या वेळी, जोसेफ एफ. रदरफोर्ड (वॉच टावर संस्थेचे तेव्हाचे अध्यक्ष) जातीनं प्रत्येक पायनियरला भेटत होते. त्यांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं. ते म्हणाले की, आम्ही बायबलमधील सत्यासाठी लढणारे शूर लढवय्ये होतो. त्या वेळी, पायनियरांनी सेवेतच टिकून राहावं म्हणून त्यांना थोडीफार आर्थिक मदत देण्याची व्यवस्था करण्यात आली.

आयुष्यभरासाठी प्रशिक्षण

लॉस एंजेलीझच्या अधिवेशनाहून परतल्यावर आम्ही सर्वांनी दक्षिण कॅरोलिना, व्हर्जिनिया, पश्‍चिम व्हर्जिनिया आणि केंटकी या संपूर्ण गावांमध्ये राज्याचा संदेश जाऊन सांगितला. पुष्कळ वर्षांनंतर हेलननं त्या काळाविषयी असं लिहिलं: “आम्हाला कोणत्याही मंडळीचा आधार नव्हता, मदतीला कोणी सोबती नव्हते कारण आम्ही परक्या गावातल्या अनोळखी व्यक्‍ती होतो. पण आता मला कळतं की ते एक प्रकारचं प्रशिक्षण होतं. मला पुष्कळ काही शिकायला मिळत होतं.”

त्यात तिनं लिहिलं होतं: “एका मुलीच्या मैत्रिणी जवळपास नसतात, घरापासूनही ती फार दूर असते तेव्हा तिला किती कंटाळा येऊ शकतो. पण मला इतका त्रास झाला नाही. मला कधी कंटाळा आल्याचंसुद्धा आठवत नाही. मी खूप वाचन करायचे. बायबलचं सर्व साहित्य आम्ही वाचून काढायचो आणि त्यांचा अभ्यासही करायला कधी विसरलो नाही. मी नेहमी आईबरोबरच असायचे. तिच्याकडून मी पुष्कळ काही शिकले; आहे तेवढ्याच पैशांत भागवणं, बाजारहाट करणं, कारचे पंक्चर झालेले टायर बदलणं, स्वयंपाक, शिवणकाम आणि प्रचारकामसुद्धा मी तिच्याकडून शिकले. हे जीवन स्वीकारल्याचा मला कधीच पस्तावा झाला नाही आणि मला पुन्हा हेच जीवन जगायला सांगितलं तर मी अगदी आनंदानं जगायला तयार आहे.”

हेलन आणि तिच्या आईनं अगदी आनंदानं त्या लहानशा ट्रेलरमध्ये दिवस काढले—त्यांचं एक छानसं घर होतं तरीसुद्धा. १९३७ साली ओहायोच्या कोलंबसमध्ये झालेल्या अधिवेशनानंतर हेलनच्या आईची प्रकृती एकदमच ढासळली आणि त्यांना दवाखान्यात ठेवावं लागलं. नोव्हेंबर १९३७ साली, पश्‍चिम व्हर्जिनियाच्या फिलिप्पाय इथं आपल्या नेमणुकीत असतानाच त्या मरण पावल्या.

लग्न आणि पुढेही सेवा

जून १०, १९३८ साली, हेलनशी माझा अगदी साध्या सोप्या पद्धतीने विवाह झाला. आमचा विवाह हेलनच्या पश्‍चिम व्हर्जिनियातल्या व्हिलिंगजवळच्या एल्म ग्रोव्ह इथल्या निवासस्थानी झाला; तिचा जन्म त्या घरात झाला होता. आमच्या लग्नामध्ये इव्हान्स ब्रदरनीच भाषण दिलं (माझा जन्म होण्याच्या अनेक वर्षांआधी त्यांनीच माझ्या कुटुंबाला सत्य दिलं होतं). लग्न झाल्यावर पूर्व केंटकीत जाऊन पुन्हा पायनियर सेवा करायचं आम्ही दोघांनी ठरवलं होतं; पण आश्‍चर्य म्हणजे आम्हाला झोन कार्यासाठी आमंत्रण मिळालं. त्यासाठी आम्हाला पश्‍चिम केंटकी आणि टेनेसीमधल्या यहोवाच्या साक्षीदारांना भेटी देऊन त्यांना प्रचारकार्यात मदत करायची होती. त्या वेळी आम्ही भेट दिलेल्या सर्व ठिकाणी एकूण फक्‍त ७५ राज्य उद्‌घोषक होते.

तेव्हा राष्ट्रीयवादाच्या भावनेनं पुष्कळजण बहकले होते; मला वाटलं माझ्या ख्रिस्ती तटस्थतेमुळं मला नक्कीच तुरुंगात टाकलं जाईल. (यशया २:४) परंतु, माझ्या प्रचारकार्यामुळं ड्राफ्ट बोर्डाकडून मला पूर्ण-वेळेची सेवा करत राहायला परवानगी मिळाली.

आम्ही प्रवासी कार्याला सुरवात केली तेव्हा जवळजवळ प्रत्येकजण आमच्या लहानपणच्या गोष्टी आठवून काही न काही सांगायचा. केंटकीच्या होपकिन्झव्हिल इथं एका ख्रिस्ती बहिणीनं हेलनला येऊन मिठी मारली आणि तिला म्हणाली: “मला ओळखलंस?” १९३३ मध्ये, हेलननं तिला तिच्या दुकानात साक्ष दिली होती. ती संडे स्कूलमध्ये शिकवायची; पण हेलननं दिलेलं पुस्तक वाचल्यावर तिनं आपल्या संडे स्कूलमधल्या मुलांची माफी मागितली आणि म्हणाली की आतापर्यंत ती त्यांना जे शिकवत आली होती ते बायबलमधलं नव्हतं. चर्च सोडून दिल्यावर ती आपल्या समाजातल्या लोकांकडे जाऊन बायबलमधील सत्यांविषयी शिकवू लागली. हेलन आणि मी पश्‍चिम केंटकीत तीन वर्षं सेवा केली आणि बहुतेकदा आम्ही त्या बहिणीच्याच घरी राहिलो.

त्या काळात भरवली जाणारी स्थानिक संमेलनं फार लहान असायची आणि ए. एच मॅकमिलन अशाच एका संमेलनाला आले होते. हेलन लहान होती तेव्हा ते एकदा तिच्या घरी राहिले होते म्हणून अधिवेशनाच्या दरम्यानही त्यांनी आमच्याचसोबत, आमच्या पाच मीटर लांबीच्या मोबाईल घरात राहायचं ठरवलं; आमच्याकडे तसा एक जादा पलंग होता. बंधू मॅकमिलन यांनीसुद्धा आपल्या तारुण्यातच निर्माणकर्त्याचं स्मरण केलं होतं कारण त्यांनी १९०० साली म्हणजे ते २३ वर्षांचे होते तेव्हाच आपलं जीवन यहोवाला समर्पित केलं होतं.

नोव्हेंबर १९४१ मध्ये प्रवासी बांधवांचं कार्य तात्पुरतं बंद करण्यात आलं; मग आम्हाला केंटकीच्या हझर्ड इथं पायनियर म्हणून पाठवण्यात आलं. आणि मग आम्ही पुन्हा माझा भाऊ कार्ल आणि त्याची पत्नी क्लेअर यांच्याबरोबर सेवा करू लागलो. इथं असताना हेलनचा भाचा, जोसेफ हुस्टन हासुद्धा आमच्याबरोबर पायनियरींग करू लागला. त्याने जवळजवळ ५० वर्षं पूर्ण-वेळेची सेवा केली; यहोवाच्या साक्षीदारांच्या न्यूयॉर्क ब्रुकलिन इथल्या मुख्यालयात विश्‍वासूपणे सेवा करताना १९९२ मध्ये त्याला अचानक हार्ट अटॅक आला आणि त्याचं निधन झालं.

आम्हाला १९४३ मध्ये कनेक्टिकट, रॉकव्हिल इथं पाठवण्यात आलं. हे ठिकाण आम्हा दोघांना एकदमच नवीन होतं कारण आम्हाला अमेरिकेच्या दक्षिण भागात प्रचार करण्याची सवय होती. रॉकव्हिलमध्ये हेलनला दर आठवडी २० पेक्षा जास्त बायबल अभ्यास होते. शेवटी, राज्य सभागृहासाठी आम्ही एक छानशी खोली भाड्यानं घेतली आणि अशाप्रकारे तिथं एका लहान मंडळीची सुरवात झाली.

रॉकव्हिलमध्ये असताना साऊथ लान्सिंग, न्यूयॉर्क इथं वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या पाचव्या वर्गाचं आम्हाला आमंत्रण मिळालं. मग आम्हाला कळालं की, केंटकीत आमच्याबरोबर पायनियरींग केलेले ऑब्रे आणि बर्था बिव्हन्स हेसुद्धा आमच्याच वर्गात आहेत; तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला कारण त्यांच्याशी आमची चांगली मैत्री होती.

प्रशाला आणि आमची नवीन नेमणूक

आम्ही तसं अजून तरुण होतो पण आमच्या वर्गातले दुसरे तर आमच्याहून तरुण होते. होय, तेसुद्धा त्यांच्या तारुण्यात निर्माणकर्त्याचं स्मरण करत होते. जुलै १९४५ मध्ये आम्ही पदवीधर होणार होतो आणि अगदी तेव्हाच दुसरं महायुद्ध सुरू होणार होतं. आम्हाला आमची मिशनरी नेमणूक मिळाली नव्हती तोपर्यंत आम्ही न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन इथल्या फ्लॅटबुश मंडळीमध्ये होतो. शेवटी ऑक्टोबर २१, १९४६ रोजी आमच्या वर्गातल्या इतर सहा जणांसोबत (बिव्हन्स जोडपंसुद्धा) आम्ही विमानानं आमच्या नवीन घरी गेलो; आम्हाला ग्वाटेमाला इथल्या ग्वाटेमाला सिटीत पाठवलं होतं. त्या वेळी, मध्य अमेरिकेच्या त्या सबंध देशात मोजून ५० साक्षीदारसुद्धा नव्हते.

एप्रिल १९४९ मध्ये आमच्यापैकी काही मिशनऱ्‍यांना क्वेझालटेनांगोला पाठवण्यात आलं; त्या देशामध्ये हे दुसरं मोठं आणि महत्त्वाचं शहर होतं. हे शहर समुद्रसपाटीपासून २,३०० मीटर उंचीवर वसलेलं आहे; तिथली हवा एकदम स्वच्छ आणि शुद्ध आहे. हेलननं आमच्या इथल्या कार्याबद्दल असं लिहिलं होतं: “वेगवेगळ्या नगरांमध्ये आणि गावांमध्ये काम करण्याची आम्हाला चांगली संधी मिळाली. आम्ही पहाटे चारला उठायचो आणि मग बस (या बसेसना खिडक्या नव्हत्या, त्याऐवजी कॅन्व्हासचा पडदा असायचा) धरून दूरवर वसलेल्या एखाद्या नगराला जायचो. तिथं आम्ही आठ तास प्रचार कार्य करायचो आणि मग संध्याकाळ झाल्यावर घरी यायचो.” आज यांपैकी अनेक भागांमध्ये मंडळ्या आहेत; क्वेझालटेनांगोमध्ये तर सहा मंडळ्या आहेत.

त्यानंतर कॅरिबियन किनारपट्टीवरील प्वेर्टो बारिओस (ग्वाटेमालातलं तिसरं मोठं शहर) इथं कार्य करायला मिशनऱ्‍यांची आवश्‍यकता भासली. ग्वाटेमालात आमच्यासोबत पाच वर्षं काम केलेले आमचे जवळचे मित्र, ऑब्रे आणि बर्था बिव्हन्ससुद्धा या नवीन नेमणुकीसाठी जाणाऱ्‍यांपैकी होतं. त्यांच्या जाण्याचं फार दुःख झालं होतं; ते गेल्यावर तर आम्हाला फार चुकल्या चुकल्यासारखं वाटत राहिलं. मग मिशनरी गृहात उरलो फक्‍त हेलन आणि मी. म्हणून आम्ही एका छोट्याशा घरात राहायला गेलो. १९५५ साली आम्ही दोघांनी माझाटेनांगो (अधिक उष्णता असलेले शहर) इथं जाण्याची नवीन नेमणूक स्वीकारली. आम्ही तिथं राहायला जाण्याआधी माझा धाकटा भाऊ, पॉल आणि त्याची बायको डलोरस (ज्यांनी १९५३ साली गिलियडमधून पदवी प्राप्त केली होती) तिथं कार्य करत होते.

ग्वाटेमालात १९५८ सालापर्यंत ७०० साक्षीदार, २० मंडळ्या आणि तीन विभाग बनले होते. हेलन आणि मी पुन्हा एकदा प्रवासी कार्यात गेलो; आम्ही साक्षीदारांच्या लहान गटांना आणि पुष्कळशा मंडळ्यांना (क्वेझालटेनांगोच्या मंडळीलासुद्धा) भेटी दिल्या. मग ऑगस्ट १९५९ मध्ये आम्हाला ग्वाटेमाला सिटीत पुन्हा एकदा बोलवण्यात आलं; तिथं आम्ही शाखा दफ्तरात राहू लागलो. मला शाखा दफ्तराचं काम देण्यात आलं; हेलन मात्र आणखी १६ वर्षं मिशनरी सेवा करत राहिली. कालांतरानं तीसुद्धा शाखा दफ्तरात काम करू लागली.

आणखीन आशीर्वाद

तीन वर्षं शाखेत काम केल्यावर १९६२ साली मला गिलियडच्या ३८ व्या वर्गाचं निमंत्रण मिळालं; या वेळी शाखा दफ्तरातील लोकांसाठी दहा महिन्यांचा एक कोर्स देण्यात आला. मी कोर्ससाठी गेलेलो असताना, हेलननं पत्रात लिहिलं: “कधीतरी वेगळं राहणं चांगलं असतं असं म्हणतात; यातून मला पुष्कळ काही शिकायला मिळालं एवढं खरं. आणि आता तुझी वाट पाहायला मला किती आनंद होतोय म्हणून सांगू. . . . मला जीवनात दोन गोष्टी हव्या आहेत; एकतर यहोवाची सेवा आणि दुसरी तुझी साथ.”

कॅनडा आणि संयुक्‍त संस्थानांतून १९७० च्या उत्तरार्धात पुष्कळ लोक ग्वाटेमालात स्थलांतर करत होते. हे सगळे स्वतःचा मायदेश सोडून राज्य उद्‌घोषकांची जास्त गरज आहे तिथं कार्य करायला आले होते. आलेल्या पुष्कळशा लोकांमध्ये तरुणांची संख्या जास्त होती; ते आपल्या तारुण्यात निर्माणकर्त्याचं स्मरण करत होते. घरी राहून भौतिक सुख उपभोगण्याऐवजी त्यांनी राज्य सभागृहं, एक संमेलन गृह आणि एक शाखा दफ्तर बांधण्याच्या कामात हातभार लावला; शिवाय, प्रचारकार्यसुद्धा केलं.

पुष्कळ वर्षांआधी मला वाटायचं की यहोवाची सेवा करणारा मी सर्वात छोटा आहे. आता मात्र मीच सर्वात मोठा असतो; १९९६ साली न्यूयॉर्कच्या पॅटरसन येथील शाखा प्रशालेत तसंच झालं. मी तरुण होतो तेव्हा मला ज्याप्रमाणे मोठ्यांकडून मदत मिळाली त्याचप्रमाणे आपल्या निर्माणकर्त्याचं स्मरण करू इच्छिणाऱ्‍या अनेक तरुणांना मदत करण्याची सुसंधी मलासुद्धा मिळाली आहे.

ग्वाटेमालातल्या आपल्या लोकांवर यहोवा अजूनही आशीर्वादांचा उदंड वर्षाव करत आहे. ग्वाटेमाला सिटीत १९९९ मध्ये ६० पेक्षा अधिक मंडळ्या होत्या. आणि सबंध ग्वाटेमालात आणखी पुष्कळ मंडळ्या आणि देवाच्या राज्य सुवार्तेचे हजारो प्रचारक आहेत. आम्ही ग्वाटेमालात ५३ वर्षांआधी आलो होतो तेव्हा पन्‍नास प्रचारकही नव्हते; आज मात्र १९,००० हून जास्त प्रचारक तिथं आहेत!

आभार मानण्याजोगं पुष्कळकाही

समस्या नसलेला एकही माणूस नाही, प्रत्येकाच्याच जीवनात समस्या असतात पण आपण “आपला भार परमेश्‍वरावर [यहोवावर]” टाकू शकतो. (स्तोत्र ५५:२२) प्रेमळ साथीदारांच्या साहाय्याद्वारे तो सहसा आपल्याला तग धरून राहायला मदत करतो. उदाहरणार्थ, मला सोडून जाण्याच्या काही वर्षांआधी हेलननं मला एक लहानशी फ्रेम दिली होती; त्यावर इब्री लोकांस ६:१० हे बायबलमधलं वचन कोरलेलं होतं: “तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.”—वेमाऊथ.

त्याच्यासोबत एक चिठ्ठी होती; त्यात लिहिलं होतं: “माझ्या लाडक्या, माझ्या प्रेमाशिवाय मी तुला जास्त काही देऊ शकले नाही . . . हे वचन तुझ्याबाबतीत किती खरं आहे. ते तू तुझ्या टेबलावर ठेव. मी दिलं म्हणून नाही तर तू विश्‍वासूपणे इतकी वर्षं सेवा केलीस म्हणून.” आजही ती फ्रेम ग्वाटेमालातल्या माझ्या दफ्तरातल्या टेबलावर आहे.

मी तरुणपणापासून यहोवाची सेवा केली आहे आणि आता माझं वय झाल्यावरही माझी नेमलेली कामं करायला माझी प्रकृती चांगली सुदृढ आहे म्हणून मी यहोवाचे आभार मानतो. माझ्या नियमित बायबल वाचनात मला पुष्कळदा अशी शास्त्रवचनं आढळतात आणि ती पाहून मला माझ्या प्रिय हेलनची आठवण होते; ती असती तर तिनं नक्कीच ती शास्त्रवचनं अधोरेखित केली असती. स्तोत्र ४८:१८ मधलं वचन पुन्हा एकदा वाचताना मला याची आठवण झाली; ते वचन असं आहे की, “हा देव आमचा सनातन देव आहे; तो सर्वकाळ आमचा मार्गदर्शक होईल.”

लोकांना पुनरुत्थानाच्या दिवसाविषयी—पूर्वीच्या वेगवेगळ्या देशांचे लोक कसं मेलेल्यांतून उठलेल्या आपआपल्या प्रिय जनांचं नवीन जगामध्ये स्वागत करत असतील त्या दिवसाविषयी सांगताना मला फार आनंद होतो. किती अद्‌भुत भवितव्य आहे ते! त्या वेळी, यहोवा हा “दीनांचे सांत्वन करणारा देव” आहे हे आठवल्यावर किती आनंदाश्रू वाहतील!—२ करिंथकर ७:६.

[२५ पानांवरील चित्र]

वरून, डावीककडून उजवीकडे: आई, बाबा, इव्हा आत्या आणि माझे भाऊ कार्ल आणि क्लॅरेन्स, १९१०

[२६ पानांवरील चित्रे]

हेलन सोबत १९४७ व १९९२ मध्ये