व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“लहान” त्याचे “सहस्र” झाले आहेत

“लहान” त्याचे “सहस्र” झाले आहेत

“लहान” त्याचे “सहस्र” झाले आहेत

“जो सर्वात लहान त्याचे सहस्र होतील, जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र होईल.”—यशया ६०:२२.

१, २. (अ) आज अंधकार पृथ्वीला का झाकीत आहे? (ब) यहोवाचे तेज त्याच्या लोकांना कशाप्रकारे उत्तरोत्तर प्रकाशमान करत आहे?

“अंधकार पृथ्वीला झाकीत आहे, निबिड काळोख राष्ट्रांस झाकीत आहे; पण तुजवर परमेश्‍वर उदय पावत आहे, त्याचे तेज तुजवर दिसत आहे.” (यशया ६०:२) हे शब्द १९१९ पासून पृथ्वीवरील परिस्थितीचे अतिशय चांगल्याप्रकारे वर्णन करतात. तथाकथित ख्रिस्ती धर्माने “जगाचा प्रकाश,” अर्थात, येशू ख्रिस्त राजा बनल्याचे व त्याच्या उपस्थितीचे चिन्ह ओळखले नाही. (योहान ८:१२; मत्तय २४:३) ‘सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींचा’ शासक सैतान हा “अतिशय संतप्त” असल्यामुळे २० वे शतक मानव इतिहासातील सर्वात दुःखदायक आणि विध्वंसकारी शतक ठरले आहे. (प्रकटीकरण १२:१२; इफिसकर ६:१२) आध्यात्मिकदृष्ट्या अधिकांश लोक अंधकारात आहेत.

तरीसुद्धा, आज देखील प्रकाश चमकत आहे. यहोवाचे “तेज” त्याच्या सेवकांवर, म्हणजेच त्याच्या स्वर्गीय स्त्रीचे पृथ्वीवर प्रतिनिधीत्व करणाऱ्‍या अभिषिक्‍त शेष जनांवर चमकत आहे. (यशया ६०:१) खासकरून १९१९ साली बॅबिलोनच्या बंदिवासातून मुक्‍तता झाल्यानंतर त्यांनी देवाचे तेज प्रकट केले आणि ‘आपला प्रकाश लोकांसमोर पडू दिला.’ (मत्तय ५:१६) १९१९ पासून १९३१ पर्यंत त्यांनी बॅबिलोनी विचारसरणीच्या सर्व बंधनांतून स्वतःला मुक्‍त केले आणि यामुळे राज्याचा प्रकाश अधिकाधिक तेजोमय होत गेला. त्यांची संख्या लाखोंच्या घरात गेली आहे. निश्‍चितच, यहोवाने आपले अभिवचन पूर्ण केले आहे: “इस्राएलाचे अवशेष मी निश्‍चये जमा करीन; मी त्यांस बस्राच्या मेंढरांप्रमाणे एकत्र करीन, लोकसमुदाय मोठा असल्यामुळे कुरणांमधल्या कळपाप्रमाणे ते गजबजतील.” (मीखा २:१२) १९३१ साली त्यांनी यहोवाचे साक्षीदार हे नाव स्वीकारले तेव्हा यहोवाचे तेज त्याच्या लोकांवर प्रकाशत आहे हे अधिकच स्पष्ट झाले.—यशया ४३:१०, १२.

३. यहोवाचा प्रकाश केवळ अभिषिक्‍तांवरच चमकणार नाही हे कसे स्पष्ट झाले?

यहोवाचे तेज केवळ ‘लहान कळपाच्या’ शेष जनांवरच प्रकाशणार होते का? (लूक १२:३२) नाही. टेहळणी बुरूजच्या सप्टेंबर १, १९३१ च्या अंकात आणखी एका गटाबद्दल उल्लेख करण्यात आला. त्यात यहेज्केल ९:१-११ च्या स्पष्टीकरणात असे सांगण्यात आले की कारकुनाची दऊत घेतलेला माणूस अभिषिक्‍त शेष वर्गाला सूचित करतो. तो “मनुष्य” कोणाच्या कपाळावर चिन्ह करतो? परादीस पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याची आशा असलेल्या ‘दुसऱ्‍या मेंढरांच्या.’ (योहान १०:१६; स्तोत्र ३७:२९) १९३५ साली हे स्पष्ट करण्यात आले की प्रेषित योहानाने पाहिलेल्या दृष्टान्तातील ‘सर्व राष्ट्रांतून’ आलेला ‘मोठा लोकसमुदाय’ म्हणजेच ही “दुसरी मेंढरे” आहेत. (प्रकटीकरण ७:९-१४) १९३५ पासून आतापर्यंत मोठ्या लोकसमुदायाला एकत्रित करण्यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात आले.

४. यशया ६०:३ येथे “राजे” आणि “राष्ट्रे” कोणाच्या संदर्भात म्हटले आहे?

या एकत्र करण्याच्या कार्याबद्दल यशयाच्या भविष्यवाणीत अप्रत्यक्ष उल्लेख आढळतो: “राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील.” (यशया ६०:३) येथे “राजे” कोणाच्या संदर्भात म्हटले आहे? हे १,४४,००० यांच्यापैकी शेष जन आहेत जे येशू ख्रिस्तासोबत स्वर्गाच्या राज्यात राज्य करतील; त्यांनी साक्षकार्यात पुढाकार घेतला आहे. (रोमकर ८:१७; प्रकटीकरण १२:१७; १४:१) आज या अभिषिक्‍त शेषांपैकी केवळ काही हजार उरले आहेत आणि त्यांच्या तुलनेत ‘राष्ट्रांतून’ आलेले लोक कितीतरी अधिक आहेत; यांना पृथ्वीवरच राहण्याची आशा आहे आणि ते यहोवाकडून शिक्षण घेण्यासाठी स्वतःही येतात आणि इतरांनाही असेच करण्याचे प्रोत्साहन देतात.—यशया २:३.

यहोवाचे आवेशी सेवक

५. (अ) यहोवाच्या लोकांचा आवेश कमी झालेला नाही हे कशावरून दिसून येते? (ब) कोणत्या देशांमध्ये १९९९ वर्षादरम्यान उल्लेखनीय वाढ झाली? (पृष्ठ १७-२० वर दिलेला तक्‍ता पाहा)

आधुनिक काळातील यहोवाच्या साक्षीदारांनी सबंध २० व्या शतकात अत्यंत उल्लेखनीय आवेशाने कार्य केले आहे! त्यांच्यावर प्रचंड दबाव आला पण नव्या सहस्रकाच्या उंबरठ्यावर येऊनही त्यांचा आवेश जराही कमी झाला नाही. ख्रिस्ताची आज्ञा आजही त्यांच्या नजरेत अत्यंत महत्त्वाची आहे: “सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा.” (मत्तय २८:१९, २०) २० व्या शतकातील शेवटल्या सेवा वर्षात सुवार्तेच्या सक्रिय प्रचारकांची संख्या ५९,१२,४९२ इतकी होती; हा एक अभूतपूर्व उच्चांक होता. या प्रचारकांनी इतर लोकांशी देवाबद्दल आणि त्याच्या उद्देशांबद्दल बोलण्यात एकूण १,१४,४५,६६,८४९ तास खर्च केले; ही देखील एक उल्लेखनीय संख्या होती. शिवाय त्यांनी सुवार्तेबद्दल आवड दाखवणाऱ्‍यांसोबत ४२,००,४७,७९६ पुनर्भेटी केल्या आणि ४४,३३,८८४ मोफत बायबल अभ्यास चालवले. त्यांच्या आवेशी सेवेचा हा अहवाल खरोखर अद्‌भुत आहे!

६. पायनियरांकरता कोणती खास तरतूद करण्यात आली आणि याला कसा प्रतिसाद मिळाला?

मागच्या जानेवारी महिन्यात नियमन मंडळाने पायनियरांच्या आवश्‍यक तासांमध्ये काही फेरबदल केले. यामुळे बऱ्‍याच जणांना सामान्य (रेग्युलर) किंवा सहायक पायनियर सेवा सुरू करण्याचे प्रोत्साहन मिळाले. उदाहरणार्थ, १९९९ सालच्या पहिल्या चार महिन्यात नेदरलँड्‌सच्या शाखा दप्तरात सामान्य पायनियर सेवेकरता आलेले एकूण अर्ज, आदल्या वर्षी तेवढ्याच अवधीत आलेल्या अर्जांच्या चौपट होते. घानाच्या शाखा दप्तराकडून हे वृत्त मिळाले: “पायनियरांच्या तासांत फेरबदल झाल्यापासून आमच्याकडे सामान्य पायनियरांच्या संख्येत सतत वाढ झाली आहे.” १९९९ च्या सेवा वर्षात जगभरातील पायनियरांची संख्या ७,३८,३४३ इतकी झाली होती. हे “चांगल्या कामात तत्पर [आवेशी]” असण्याचेच चिन्ह नाही का?—तीत २:१४.

७. यहोवाने आपल्या आवेशी कार्याला कशाप्रकारे आशीर्वादित केले आहे?

या आवेशपूर्ण कार्यावर यहोवाचा आशीर्वाद होता का? निश्‍चितच. यशयाकडून तो असे म्हणतो: “आपले डोळे वर करून चोहोकडे पाहा; ते सर्व एकत्र होत आहेत, तुजकडे येत आहेत; तुझे पुत्र दुरून येत आहेत, तुझ्या कन्यांना कडेवर बसवून आणीत आहेत.” (यशया ६०:४) ज्या अभिषिक्‍त ‘पुत्रांना’ व ‘कन्यांना’ एकत्र करण्यात आले, ते अद्यापही आवेशाने देवाची सेवा करीत आहेत. आणि आता या अभिषिक्‍त ‘पुत्र व कन्यांच्या’ सोबत कार्य करण्याकरता २३४ देशांत आणि द्वीपांत येशूच्या दुसऱ्‍या मेंढरांना एकत्र केले जात आहे.

“प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज”

८. यहोवाचे साक्षीदार कोणकोणती ‘चांगली कामे’ करतात?

ख्रिश्‍चनांवर राज्याचा प्रचार करण्याची आणि सुवार्तेबद्दल आवड व्यक्‍त करणाऱ्‍यांना शिष्य बनवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पण ते केवळ याच नव्हे, तर “प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज” आहेत. (तिरपे वळण आमचे.) (२ तीमथ्य ३:१७) म्हणूनच ते आपल्या कुटुंबांची प्रेमळपणे काळजी वाहतात, आपल्या घरी येणाऱ्‍यांचे आतिथ्य करतात आणि आजारी लोकांना जाऊन भेटतात, त्यांना मदत करतात. (१ तीमथ्य ५:८; इब्री लोकांस १३:१६) शिवाय राज्य सभागृहांच्या बांधकामात बरेचजण स्वेच्छेने हातभार लावतात—यामार्गाने साक्ष देखील दिली जाते. टोगो नावाच्या एका देशात एका राज्य सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर तिथल्या एका कॅरिस्मॅटिक चर्चच्या वरिष्ठांनी आश्‍चर्य व्यक्‍त केले की ज्या कामासाठी चर्चला बाहेरच्या लोकांना पैसे द्यावे लागतात, तेच काम, अर्थात इमारतींचे बांधकाम, यहोवाचे साक्षीदार स्वतःहून कसे करू शकतात! टोगोच्या शाखा दफ्तराकडून मिळालेल्या वृत्तानुसार, उत्तम दर्जाच्या राज्य सभागृहांचे बांधकाम पाहून स्थानिक लोकांवर इतका चांगला प्रभाव पडला आहे की काही लोक तर ज्या परिसरांत राज्य सभागृह उभारले जाणार आहे, त्याच परिसरात घर भाड्याने किंवा विकत घेण्याचा प्रयत्न करतात.

९. विपत्तीच्या काळात यहोवाच्या साक्षीदारांची कशी प्रतिक्रिया होती?

काहीवेळा, एका वेगळ्या प्रकारचे चांगले काम करण्याची वेळ येते. मागच्या सेवा वर्षात बऱ्‍याच देशांत नैसर्गिक आपत्ती आल्या. कित्येकदा, अशा संकटग्रस्त परिसरात साहाय्य करण्यासाठी यहोवाचे साक्षीदार सर्वात आधी पोचले. उदाहरणार्थ, मिच वादळामुळे हॉन्डुरास देशात भयंकर नुकसान झाले. लगेच तिथल्या शाखा दप्तराने साहाय्य पुरवण्यासाठी आपतकालीन समित्या नेमल्या. हॉन्डुरास आणि इतर देशांच्या साक्षीदारांनी कपडे, खाद्यपदार्थ, औषधे, आणि इतर नित्योपयोगी वस्तू दान केल्या. या भागांतील प्रादेशिक बांधकाम समित्यांनी पडलेली बरीच घरे बांधून दिली. लवकरच या विपत्तीला बळी पडलेल्या आपल्या बांधवांना पुन्हा एकदा सामान्य जीवन सुरू करण्यासाठी साहाय्य करण्यात आले. इक्वाडोर येथे मोठा पूर आल्यामुळे काही बांधवांची घरे उद्ध्‌वस्त झाली; साक्षीदार लगेच आपल्या बांधवांच्या मदतीला धावून आले. एका सरकारी अधिकाऱ्‍याने जेव्हा साक्षीदारांना सुनियोजित पद्धतीने कार्य करताना पाहिले तेव्हा ते म्हणाले: “या लोकांना माझ्या हाताखाली काम करायला दिले, तर मी सर्वात अशक्यप्राय काम देखील करून दाखवेन! जगातल्या सर्व भागांत तुमच्यासारखे लोक असले पाहिजेत.” ही सर्व चांगली कामे यहोवा देवाच्या नावाला गौरव आणतात आणि “सुभक्‍ति तर सर्व बाबतीत उपयोगी आहे,” हे देखील सिद्ध करतात.—१ तीमथ्य ४:८.

ते ‘मेघांप्रमाणे धावत येतात’

१०. अभिषिक्‍तांची संख्या रोडावत चालली आहे, तरीसुद्धा, यहोवाचे नाव अभूतपूर्वरित्या जगभर गाजवले जात आहे, असे का?

१० यहोवा आता असे विचारतो: “जे मेघाप्रमाणे धावत आहेत, कबुतरे आपल्या घरकुंड्याकडे उडून जातात तसे जे उडत आहेत ते कोण? खरेच, द्वीपे माझी वाट पाहत आहेत; तार्शीशची गलबते तुझ्या पुत्रास . . . दुरून घेऊन प्रथम येत आहेत. . . . परदेशचे लोक तुझे कोट बांधीत आहेत, त्यांचे राजे तुझी सेवा करीत आहेत.” (यशया ६०:८-१०) यहोवाच्या ‘तेजाला’ सर्वात आधी प्रतिसाद दिला तो त्याच्या ‘पुत्रांनी’ अर्थात अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी. त्यानंतर “परदेशचे लोक” म्हणजेच मोठा लोकसमुदाय आला. मोठ्या लोकसमुदायातील लोक आपल्या अभिषिक्‍त बांधवांची विश्‍वासूपणे सेवा करत आहेत आणि त्यांच्या नेतृत्त्वाधीन प्रचार कार्य करत आहेत. अभिषिक्‍तांची संख्या दिवसेंदिवस रोडावत चालली आहे, तरीसुद्धा यहोवाचे नाव अभूतपूर्वरित्या जगाच्या कानाकोपऱ्‍यात गाजवले जात आहे.

११. (अ) काय सतत सुरू आहे आणि याचा १९९९ साली काय परिणाम झाला? (ब) कोणत्या देशांत १९९९ साली बाप्तिस्म्यांची संख्या उल्लेखनीय होती? (पृष्ठ १७-२० वरील तक्‍ता पाहा.)

११ याच्या परिणामस्वरूप, लाखो लोक “कबुतरे आपल्या घरकुंड्याकडे उडून जातात” त्याप्रमाणे ख्रिस्ती मंडळीत येत आहेत. दर वर्षी लाखोंची भर पडत आहे आणि आणखी बरेच येतील अशी आशा केली जाते. यशया म्हणतो: “तुझ्या वेशी सतत उघड्या राहतील, त्या अहोरात्र बंद म्हणून राहणार नाहीत.” (यशया ६०:११) मागच्या वर्षी ३,२३,४३९ जणांनी यहोवाला आपले जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेतला, आणि अद्यापही यहोवाने वेशी बंद केलेल्या नाहीत. “सर्व राष्ट्रांतील निवडक वस्तु,” अर्थात मोठ्या लोकसमुदायाचे सदस्य आजही या वेशींतून मोठ्या संख्येने प्रवेश करत आहेत. (हाग्गय २:७) अंधकारास सोडून येऊ इच्छिणाऱ्‍या कोणालाही प्रवेश नाकारला जात नाही. (योहान १२:४६) पण, आत प्रवेश केलेल्यांनी कधीही प्रकाशाचे महत्त्व विसरू नये!

विरोधाला निर्भयपणे तोंड देणे

१२. ज्यांना अंधकार प्रिय आहे त्यांनी प्रकाश नाहीसा करण्याचा कशाप्रकारे प्रयत्न केला?

१२ ज्यांना अंधकार प्रिय आहे, अशांना यहोवाचा प्रकाश नकोसा वाटतो. (योहान ३:१९) काही तर हा प्रकाश विझवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत. अर्थात, हे अपेक्षित आहे. “जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करितो” त्या येशू ख्रिस्ताची देखील थट्टा करण्यात आली, त्याचा विरोध करण्यात आला आणि शेवटी त्याच्या स्वतःच्या देशाच्या लोकांनी त्याचा घात केला. (योहान १:९) सबंध २० व्या शतकात यहोवाच्या प्रकाशात विश्‍वासूपणे चालण्याचा प्रयत्न करत असताना यहोवाच्या साक्षीदारांचाही उपहास करण्यात आला, त्यांना तुरुंगवास सहन करावा लागला, त्यांच्या कार्यावर बंदी आणली गेली आणि काहींना तर जिवेही मारण्यात आले. अलीकडच्या वर्षांत विरोधकांनी प्रसार माध्यमांतून देवाचा प्रकाश प्रतिबिंबित करणाऱ्‍यांविरुद्ध खोटा प्रचार केला. काहींनी लोकांना असे पटवून देण्याचा प्रयत्न केला, की यहोवाच्या साक्षीदारांपासून समाजाला धोका आहे आणि म्हणून त्यांच्यावर प्रतिबंध किंवा बंदी आणली जावी. या विरोधकांच्या प्रयत्नांना यश आले आहे का?

१३. प्रसार माध्यमांच्या साहाय्याने आपल्या कामासंबंधी खरी माहिती लोकांपुढे आणल्यामुळे काय परिणाम घडून आला?

१३ नाही. योग्य प्रसंगी यहोवाच्या साक्षीदारांनी देखील वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी प्रसार माध्यमांचा उपयोग केला. यामुळे, यहोवाच्या नावाला कितीतरी वृत्तपत्रांत आणि मासिकांत तसेच रेडिओ व टीव्हीवर देखील प्रसिद्धी मिळाली. याचा प्रचार कार्यावर अतिशय चांगला परिणाम झाला. उदाहरणार्थ, डेन्मार्कमध्ये राष्ट्रीय टीव्ही प्रसारणावर एका कार्यक्रमात “डेनिश लोकांचा धर्मावरून विश्‍वास का उडत चालला आहे?” हा विषय हाताळला गेला. या कार्यक्रमात काही लोकांसोबत यहोवाच्या साक्षीदारांचीही मुलाखत घेण्यात आली. कार्यक्रम पाहिल्यानंतर एका स्त्रीने नंतर असा अभिप्राय मांडला: “देवाचा आत्मा कोणावर आहे हे अगदी स्पष्ट जाणवले.” या स्त्रीसोबत अभ्यास सुरू करण्यात आला.

१४. काय मानावे लागल्यामुळे विरोधकांची लवकरच निराशा होईल?

१४ यहोवाच्या साक्षीदारांना ठाऊक आहे, की जगात अनेक लोक त्यांचा विरोध करतील. (योहान १७:१४) तरीसुद्धा यशयाच्या भविष्यवाणीतून त्यांना दिलासा मिळतो: “तुला पीडा करणाऱ्‍याची मुले तुजकडे नमत येतील, तुला तुच्छ मानणारे सर्व तुझ्या चरणी लोटांगण घालितील; तुला परमेश्‍वराचे नगर इस्राएलाच्या पवित्र प्रभूचे सीयोन म्हणतील.” (यशया ६०:१४) या विरोधकांची शेवटी निराशा होईल कारण लवकरच त्यांना हे मानावे लागेल की त्यांनी खुद्द देवाच्या विरोधात कार्य केले आहे. देवाच्या विरोधात कोणी जिंकू शकेल का?

१५. यहोवाचे साक्षीदार कशाप्रकारे ‘राष्ट्रांचे दूध शोषून घेतात’ आणि हे त्यांच्या शिकवण्याच्या आणि प्रचाराच्या कार्यातून कसे दिसून येते?

१५ यहोवा पुढे असे अभिवचन देतो: “तुला सर्वकाळचे भूषण . . . अशी मी करीन. तू राष्ट्रांचे दूध शोषून घेशील, राजाचे स्तन तू चोखिशील, आणि मी परमेश्‍वर तुला तारणकर्ता, उद्धारकर्ता याकोबाचा समर्थ प्रभु आहे हे तू जाणिशील.” (यशया ६०:१५, १६) होय, यहोवाच त्याच्या लोकांचा तारणकर्ता आहे. जर त्यांनी त्याच्यावर भरवसा ठेवला तर ते ‘सर्वकाळ’ टिकून राहतील. ते ‘राष्ट्रांचे दूध शोषून घेतील,’ याचा अर्थ असा की खऱ्‍या उपासनेच्या प्रसाराकरता काही उपलब्ध साधनांचा उपयोग केला जाईल. उदाहरणार्थ, संगणक आणि संदेशवहन तंत्रांच्या साहाय्याने टेहळणी बुरूजचे १२१ भाषांतून आणि सावध राहाचे! ६२ भाषांतून एकाच वेळी प्रकाशन करणे शक्य झाले आहे. खास नवनवीन भाषांत नवे जग भाषांतर तयार करण्यासाठी एका विशिष्ट कॉम्प्युटर सॉफ्टवेअर प्रोग्रामची रचना करण्यात आली आहे. आपल्या भाषेत बायबल मिळाल्यावर बांधवांना अतिशय आनंद होतो. १९९९ साली ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचे क्रोएशियन भाषेत भाषांतर तयार करण्यात आले तेव्हा हजारो लोक आनंदाने अक्षरशः रडले. एक वयस्क बंधू तर म्हणाले: “या बायबलची मी किती वर्षांपासून वाट पाहात होतो. आता मी सुखाने मरू शकतो!” नवे जग भाषांतर या बायबलच्या सबंध किंवा काही भागाच्या भाषांतराच्या १०० दशलक्ष प्रती ३४ भाषांतून वितरित करण्यात आल्या आहेत.

उच्च नैतिक दर्जे

१६, १७. (अ) यहोवाच्या उच्च दर्जाच्या नीतिनियमांनुसार चालणे कठीण असले तरीसुद्धा असे करणे का महत्त्वाचे आहे? (ब) तरुण लोक या जगाच्या नीतिभ्रष्टतेपासून अलिप्त राहू शकतात हे कोणत्या अनुभवावरून दिसून येते?

१६ येशूने म्हटले: “जो कोणी वाईट कृत्ये करितो तो प्रकाशाचा द्वेष करितो.” (योहान ३:२०) पण जे प्रकाशात राहतात त्यांना यहोवाचे उच्च नीतिनियम प्रिय आहेत. यशयाद्वारे यहोवा म्हणतो: “तुझे सर्व लोक धार्मिक होतील.” (यशया ६०:२१अ) अर्थात, या जगात लैंगिक अनैतिकता, अप्रामाणिपणा, लोभ आणि गर्विष्ठपणा अगदी सर्वसामान्य झाल्यामुळे धार्मिक नीतिनियमांप्रमाणे चालणे तितके सोपे नाही. उदाहरणार्थ, काही देशांत आर्थिकदृष्ट्या बरीच प्रगती झाली आहे आणि त्यामुळे पैशाच्या मागे लागण्याची प्रवृत्ती सहज येऊ शकते. पण पौल ताकीद देतो: “जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशांत आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडविणाऱ्‍या अशा मुर्खपणाच्या व बाधक वासनात सापडतात.” (१ तीमथ्य ६:९) पण जेव्हा एखादी व्यक्‍ती पैसा कमवण्याचा ध्यास घेऊन ख्रिस्ती सभा, पवित्र सेवा, नैतिक तत्त्वे आणि कौटुंबिक जबाबदाऱ्‍या यांसारख्या अधिक महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करते तेव्हा परिणाम अतिशय दुःखद होतात!

१७ धार्मिक नीतिनियमांप्रमाणे चालणे खासकरून तरुणांना जास्त कठीण जाते कारण त्यांचे कितीतरी सोबती ड्रग्स, अनैतिकता यांसारख्या गोष्टींत गुंतलेले असतात. सुरिनाममध्ये, एक १४ वर्षांच्या मुलीशी शारीरिक संबंध ठेवण्याची तिच्याच शाळेतल्या एक देखण्या मुलाने इच्छा व्यक्‍त केली. तिने त्याला नकार दिला आणि त्याला समजावून सांगितले की लग्नाच्या जोडीदाराशिवाय आणखी कोणाशीही शारीरिक संबंध ठेवण्यास बायबल मनाई करते. शाळेतल्या इतर मुलींना कळले तेव्हा त्यांनी तिला वेड्यात काढले; शाळेतल्या प्रत्येक मुलीला तो मुलगा किती हवाहवासा वाटतो हे सांगून तिला आपला इरादा बदलायला लावण्याचा त्या प्रयत्न करू लागल्या. पण ती डळमळली नाही. काही आठवड्यांनतर तो मुलगा एचआयव्ही पॉसिटिव्ह असल्याचे उजेडात आले आणि तो खूप आजारी पडला. जारकर्मापासून दूर राहण्याची यहोवाची आज्ञा आपण पाळली याचा त्या मुलीला आनंद झाला. (प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९) पाप न करण्याच्या संकल्पावर अढळ राहणाऱ्‍या या कोवळ्या मुलामुलींबद्दल यहोवाच्या साक्षीदारांना अभिमान वाटतो. त्यांचा विश्‍वास आणि त्यांच्या आईवडिलांचा विश्‍वास यहोवाच्या नावाला “गौरव” आणतो.—यशया ६०:२१ब.

ही वाढ यहोवाने घडवून आणली आहे

१८. (अ) यहोवाने आपल्या लोकांकरता कोणते अद्‌भुत कार्य केले आहे? (ब) पुढेही वाढ होईल हे कशावरून दिसून येते आणि जे प्रकाशात चालत राहतील अशांना भविष्यात कोणते आशीर्वाद मिळतील?

१८ होय, यहोवाचे तेज त्याच्या लोकांवर चमकत आहे, तो त्यांना आशीर्वाद देत आहे, त्यांचे मार्गदर्शन करत आहे आणि त्यांना बळ देत आहे. २० व्या शतकात त्याच्या लोकांनी यशयाच्या या शब्दांची पूर्णता प्रत्यक्ष अनुभवली आहे: “जो सर्वात लहान त्याचे सहस्र होतील, जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र होईल; मी परमेश्‍वर हे योग्य समयी त्वरित घडवून आणीन.” (यशया ६०:२२) १९१९ साली जे अगदी मूठभर लोक होते, अर्थात जे “सर्वात लहान” होते त्याचे ‘सहस्राहून अधिक’ झाले आहेत. आणि ही वाढ होतच राहणार आहे! मागच्या वर्षी १,४०,८८,७५१ जण येशूच्या मृत्यूच्या स्मारकविधीला उपस्थित होते. यांपैकी बरेचजण सक्रिय साक्षीदार नव्हते. पण या स्मारकविधीला ते उपस्थित राहिले याचा आम्हाला आनंद वाटतो आणि आम्ही त्यांना प्रकाशाकडे वाटचाल करत राहण्याचे प्रोत्साहन देतो. यहोवाचे तेज त्याच्या लोकांवर अद्यापही चमकत आहे. त्याच्या संघटनेची दारे अद्यापही उघडी आहेत. तर मग, आपण सर्वजण यहोवाच्या प्रकाशातच वाटचाल करण्याचा संकल्प करू. असे केल्याने आपल्याला आतासुद्धा अद्‌भुत आशीर्वाद मिळतात आणि भविष्यात जेव्हा सर्व सृष्टी यहोवाचे गौरव करील आणि त्याच्या प्रकाशात आनंदमय आणि तेजोमय होईल!—प्रकटीकरण ५:१३, १४.

तुम्ही सांगू शकता का?

या शेवटल्या दिवसांत कोणी यहोवाचे तेज प्रतिबिंबित केले आहे?

यहोवाच्या लोकांचा आवेश कमी झालेला नाही हे कशावरून दिसून येते?

यहोवाचे साक्षीदार कोणती चांगली कामे करण्यात व्यस्त आहेत?

भयंकर विरोध असूनही आपल्याला कशाची खातरी आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१७-२० पानांवरील तक्‍ता]

यहोवाच्या साक्षीदारांचा  १९९९ चा जगव्याप्त सेवा वर्ष अहवाल

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

[१५ पानांवरील चित्रे]

मोठ्या संख्येने लोक यहोवाच्या संघटनेकडे येत आहेत

[१६ पानांवरील चित्र]

ज्यांना प्रकाशात चालायचे आहे अशांसाठी यहोवाने अद्यापही वेशी उघड्या ठेवल्या आहेत याचा आपल्याला आनंद वाटतो