व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

इटलीमध्ये सांत्वनेचा संदेश सांगणे

इटलीमध्ये सांत्वनेचा संदेश सांगणे

आम्ही विश्‍वास ठेवणाऱ्‍यां पैकी आहोत

इटलीमध्ये सांत्वनेचा संदेश सांगणे

यहोवा ‘सर्व संकटांत आपले सांत्वन करतो.’ देवाच्या या गुणाचे त्याचे सेवक अनुकरण करतात आणि त्यामुळे त्यांना, ‘कोणत्याही संकटात असलेल्यांचे सांत्वन करता येते.’ (२ करिंथकर १:३, ४; इफिसकर ५:१) संपूर्ण जगभरामध्ये यहोवाच्या साक्षीदारांचे जे प्रचार कार्य चालू आहे त्यामागचा एक प्रमुख हेतू हाच आहे, की लोकांना सांत्वन लाभावे.

एका गरजू स्त्रीला मदत करणे

अलीकडच्या वर्षांमध्ये गरिबी, युद्ध आणि उच्च राहणीमानाची आकांक्षा अशा विविध कारणांमुळे अनेक जण आपला देश सोडून अधिक समृद्ध असलेल्या परकीय देशांमध्ये स्थायिक होत आहेत. पण, दुसऱ्‍या देशात जाऊन तेथे स्थायिक होणे इतके सोपे नाही. मॅनिऑला ही बॉरगॉमॅनेरो येथे आपल्या अल्बेनियाहून आलेल्या इतर काही जणांसोबत राहत होती. इटलीमध्ये बेकायदेशीरपणे राहत असल्यामुळे यहोवाची साक्षीदार असलेल्या वॉन्डासोबत बोलायला मॅनिऑला जरा घाबरत होती. पण वॉन्डाने मॅनिऑलाची भेट घेतलीच; त्या दोघींमध्ये भाषेचा अडसर होता, तरी देखील मॅनिऑला मोठ्या आवडीने बायबल अभ्यासाला बसू लागली. त्यानंतर वॉन्डाने मॅनिऑलाची काही दिवस भेट घेतली, पण एके दिवशी वॉन्डा तिच्या घरी गेली तेव्हा तेथे कोणीच नसल्याचे तिला दिसून आले. घरातील सगळे जण कोठे गेले? मॉनिऑलाच्या प्रियकरावर खुनाचा आरोप असल्यामुळे पोलिस त्याच्या शोधात होते त्यामुळे त्या घरातील सर्वांनी तेथून पळ काढल्याचे वॉन्डाला कळाले.

चार महिन्यानंतर पुन्हा एकदा वॉन्डाची आणि मॉनिऑलाची भेट झाली. वॉन्डा त्या भेटीविषयी सांगते: “तिचा चेहरा अगदी निस्तेज दिसत होता; ती खूपच अशक्‍त झाली होती; तिच्यावर संकट कोसळल्याचं स्पष्ट दिसत होतं.” मॉनिऑलाने नंतर सगळी हकिकत सांगितली, की तिचा प्रियकर तुरुंगात होता आणि त्यामुळे मदतीकरता ती ज्या मित्रांकडे गेली होती त्यांनी तिची घोर निराशा केली. अगदी हताश होऊन तिने देवाकडे मदतीकरता प्रार्थना केली. त्यानंतर तिला वॉन्डाची आठवण झाली कारण तिने तिला बायबलविषयी पुष्कळ काही सांगितले होते. आता पुन्हा एकदा वॉन्डाला पाहून मॉनिऑलास किती आनंद झाला असेल!

मॉनिऑलासोबत पुन्हा एकवार बायबल अभ्यासाची व्यवस्था करण्यात आली आणि ती लवकरच सभांना देखील येऊ लागली. पुढे तिला इटलीमध्ये राहण्याची कायदेशीर परवानगी देखील मिळाली. मॉनिऑलाने एका वर्षानंतर बाप्तिस्मा घेतला आणि यहोवाची साक्षीदार बनली. ईश्‍वरी अभिवचनांमुळे तिला सांत्वन मिळाले आणि आपल्या देशवासियांना देखील बायबलमधील सांत्वनादायक संदेश ऐकायला मिळावा म्हणून ती अल्बेनियाला परत गेली.

निराश्रितांच्या छावण्यांमध्ये प्रचार

मॉनिऑलासारख्या इतर निराश्रितांनाही साक्ष देण्याची इटलीतील बऱ्‍याच मंडळ्यांनी व्यवस्था केली आहे. उदाहरणार्थ, फ्लोरेन्समधील मंडळीने निराश्रितांच्या छावण्यांना नियमितपणे भेट देण्याची व्यवस्था केली. या छावण्यांमधील बहुतेक जण पूर्व युरोप, मासेदोनिया आणि कोसोव्हा येथून आले होते आणि कठीण समस्यांना तोंड देत होते. काहींना अंमली पदार्थांचे किंवा दारूचे व्यसन जडले होते. काही जण छोट्यामोठ्या चोऱ्‍या करून स्वतःचा चरितार्थ चालवत होते.

अशा लोकांना प्रचार करणे काही सोपे काम नव्हते, हे तेथील साक्षीदारांना लवकरच कळून आले. एकदा असे झाले, की पूर्णवेळेचे सेवाकार्य करणाऱ्‍या पॅवोलाची भेट मासेदोनियाची रहिवासी असणाऱ्‍या झॅकलिनासोबत झाली. झॅकलिनासोबत काही वेळा संभाषण झाल्यानंतर तिने आपल्या मैत्रिणीला, सुझानाला बायबलचे परीक्षण करण्याचे उत्तेजन दिले. सुझानाने याविषयी आपल्या इतर नातेवाईकांना सांगितले. आणि काही काळातच त्या कुटुबांतील पाच जण नियमितपणे बायबल अभ्यासाला बसू लागले, ख्रिस्ती सभांना येऊ लागले आणि शिकलेल्या गोष्टींप्रमाणे वागू लागले. त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, पण तरीही यहोवाकडून आणि त्याच्या वचनातून त्यांना सांत्वन प्राप्त झाले.

यहोवाच्या सांत्वनाचा एका ननकडून स्वीकार

फॉर्मिया या शहरातील पूर्णवेळेची सुवार्तिक असलेली ऑसन्टाची भेट एका स्त्रीसोबत झाली; ही स्त्री पायाने अधू असल्यामुळे तिला नीट चालता येत नव्हते. ती एका धार्मिक संस्थेत ननचे काम करत असे; ही संस्था दवाखान्यात किंवा घरी कोणी आजारी असल्यास किंवा अपंग असल्यास त्यांना मदत पुरवत असे.

ऑसन्टाने या ननला असे म्हटले: “तुम्हाला देखील दुखणं आहेच, नाही का? खरे तर आपल्या सर्वांना समस्यांना तोंड द्यावं लागतं.” हे ऐकताच ननच्या डोळ्यांत पाणी आले आणि तिला एक गंभीर शारीरिक समस्या आहे असे तिने सांगितले. यावर ऑसन्टाने असे म्हणून तिला उत्तेजन दिले, की बायबलचा देव तिला सांत्वन देऊ शकतो. ऑसन्टाने दिलेली बायबल आधारित मासिके ननने घेतली.

पाल्मिरा नामक या ननची नंतर भेट घेण्यात आली तेव्हा तिने हे मान्य केले, की ती फार मोठ्या संकटातून जात आहे. नन्सद्वारे चालवण्यात येणाऱ्‍या एका संस्थेमध्ये ती कित्येक वर्षे राहिली होती. पण आरोग्य समस्येमुळे तिला काही काळ त्या संस्थेच्या बाहेर राहावे लागले; पण ती पुन्हा त्या संस्थेत दाखल झाली तेव्हा तिला सरळसरळ नाकारण्यात आले. पण नन या नात्याने घेतलेल्या शपथेमुळे आपण देवाला अद्यापही बाध्य आहोत, असे पाल्मिराला वाटले. ती “उपचाराकरता” चमत्कारिकरित्या बरे करणाऱ्‍यांकडे गेली; पण तेथे तिला आलेल्या अनुभवामुळे तिला आणखीनच मनःस्ताप झाला. पाल्मिरा बायबल अभ्यासाला तयार झाली आणि एक वर्ष सभांना देखील येत होती. पण पुढे ती दुसऱ्‍या ठिकाणी राहायला गेली आणि त्यामुळे तिचा आणि ऑसन्टाचा संपर्क तुटला. पण जवळजवळ दोन वर्षांनी ऑसन्टाची आणि ननची पुन्हा भेट झाली. पाल्मिराला तिच्या कुटुंबाकडून आणि पाळकाकडून खूप विरोध करण्यात आला. पण तरीही तिने बायबल अभ्यासाला पुन्हा सुरवात केली, आध्यात्मिकरित्या प्रगती केली आणि बाप्तिस्मा घेऊन यहोवाची साक्षीदार बनली.

होय, ‘सांत्वन देणाऱ्‍या देवाचा’ संदेश ऐकून अनेक लोकांना उत्तेजन प्राप्त होते. (रोमकर १५:४, ५) त्यामुळे, इटलीतील यहोवाच्या साक्षीदारांनी देवाचा सांत्वनदायक संदेश लोकांना सांगण्याद्वारे त्याचे सतत अनुकरण करण्याचा दृढसंकल्प केला आहे.