व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“जागृत राहा”

“जागृत राहा”

“जागृत राहा”

“म्हणून जागृत राहा; कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभु येईल हे तुम्हास ठाऊक नाही.”—मत्तय २४:४२.

१. बऱ्‍याच वर्षांपासून यहोवाची सेवा करणाऱ्‍यांना आपल्या या अनेक वर्षांच्या समर्पित सेवेविषयी काय वाटते? एक उदाहरण सांगा.

बऱ्‍याच वर्षांपासून यहोवाची सेवा करणाऱ्‍यांपैकी अनेकांना, तरुणपणीच सत्य शिकायला मिळाले. अतिशय मोलवान मोती सापडल्यावर, तो विकत घेण्यासाठी आपले सर्वकाही विकून टाकणाऱ्‍या येशूच्या दृष्टान्तातल्या व्यापाऱ्‍याप्रमाणे या उत्साही बायबल विद्यार्थ्यांनी आपले सर्वस्व यहोवाला समर्पित केले. (मत्तय १३:४५, ४६; मार्क ८:३४) पण, या पृथ्वीसंबंधी देवाचा उद्देश पूर्ण होण्याकरता अपेक्षेपेक्षा जास्त काळ थांबावे लागल्यामुळे आता त्यांची प्रतिक्रिया काय आहे? त्यांना याबद्दल जराही पस्तावा होत नाही! आपल्या आयुष्याची जवळजवळ ६० वर्षे यहोवाच्या सेवेला समर्पित करणाऱ्‍या ब्रदर ए. एच. मॅकमिलन, यांच्याप्रमाणे त्या सर्वांच्या भावना आहेत. ब्रदर मॅकमिलन म्हणतात: “विश्‍वासात टिकून राहण्याचा माझा संकल्प आता तर अधिकच दृढ झाला आहे. कारण या विश्‍वासाशिवाय माझे आजपर्यंतचे आयुष्य व्यर्थ ठरले असते. आणि भविष्याला देखील धैर्याने तोंड देण्याची शक्‍ती या विश्‍वासामुळेच मला मिळाली आहे.”

२. (अ) येशूने आपल्या अनुयायांना कोणता समयोचित सल्ला दिला? (ब) या लेखात आपण कोणते प्रश्‍न विचारात घेणार आहोत?

तुम्हालाही असेच वाटते का? कदाचित तुम्ही या बांधवांइतके वृद्ध नसाल, तरीसुद्धा येशूच्या शब्दांकडे लक्ष द्या: “म्हणून जागृत राहा; कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभु येईल हे तुम्हास ठाऊक नाही.” (मत्तय २४:४२) या लहानशा विधानातून एक गहन सत्य आपल्याला समजते. या दुष्ट व्यवस्थीकरणावर न्यायदंड बजावण्याकरता आपला प्रभू कोणत्या दिवशी येईल हे आपल्याला ठाऊक नाही आणि हे जाणून घेण्याची गरजही नाही. पण जेव्हाही तो येईल तेव्हा आपल्याला कोणत्याही प्रकारे पस्तावा होणार नाही, अशारीतीने आपण जीवन व्यतीत केले पाहिजे. बायबलमध्ये कोणती उदाहरणे आहेत जी आपल्याला जागृत राहण्यास मदत करतील? जागृत राहणे किती आवश्‍यक आहे हे स्पष्ट करण्यासाठी येशूने कोणते उदाहरण दिले? आणि आज आपण या अधार्मिक जगाच्या शेवटल्या दिवसांत जगत आहोत हे सिद्ध करणारा कोणता पुरावा आपल्याजवळ आहे?

इशारेवजा उदाहरण

३. आज बरेच लोक कोणत्या अर्थाने नोहाच्या काळातील लोकांसारखे आहेत?

आजकालचे लोक बऱ्‍याच गोष्टींत नोहाच्या काळातील लोकांसारखेच आहेत. नोहाच्या काळी पृथ्वीवर भयंकर हिंसाचार माजला होता आणि मनुष्याच्या मनातल्या सर्व कल्पना “केवळ एकसारख्या वाईट” होत्या. (उत्पत्ति ६:५) बहुतेक लोक संसाराच्या उद्योगांतच पूर्णपणे गुरफटले होते. पण यहोवाने मोठा जलप्रलय आणून त्या लोकांचा नाश करण्याआधी त्यांना पश्‍चात्ताप करण्याची संधी दिली. त्याने नोहाला प्रचार करण्याची आज्ञा दिली आणि नोहाने ही आज्ञा पाळली; तो ४० ते ५० किंवा त्यापेक्षाही जास्त वर्षे ‘नीतिमत्त्वाचा उपदेश’ देत राहिला. (२ पेत्र २:५) पण लोकांनी नोहाच्या इशाऱ्‍यांकडे लक्षच दिले नाही. ते जागृत राहिले नाहीत. आणि त्यामुळे शेवटी केवळ नोहा आणि त्याचे कुटुंब यहोवाने आणलेल्या नाशातून बचावले.—मत्तय २४:३७-३९.

४. नोहाचे प्रचार कार्य यशस्वी ठरले असे का म्हणता येईल आणि तुमच्या प्रचार कार्याबद्दलही असेच का म्हणता येईल?

नोहाचे सेवाकार्य सफल झाले का? अगदी बोटांवर मोजण्याइतक्या लोकांनीच त्याचा संदेश ऐकला, पण त्यामुळे त्याची सेवा व्यर्थ ठरली नाही. लोकांनी प्रतिसाद दिला नाही तरीसुद्धा नोहाच्या प्रचार कार्याचा उद्देश सफल झाला. असे का म्हणता येईल? कारण त्यामुळे आपण यहोवाची सेवा करावी किंवा करू नये हे ठरवण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ आणि संधी मिळाली. तुमच्या प्रचाराच्या क्षेत्राविषयी काय म्हणता येईल? तुमच्या क्षेत्रात चांगला प्रतिसाद मिळत नसेल, तरीसुद्धा तुमचे कार्य सफल होत आहे असे म्हणता येईल. का? कारण प्रचार कार्याच्या माध्यमाने तुम्ही देवाचा इशारेवजा संदेश घोषित करत आहात आणि अशारितीने येशूने त्याच्या अनुयायांना दिलेली आज्ञा तुम्ही पाळत आहात.—मत्तय २४:१४; २८:१९, २०.

देवाच्या संदेष्ट्यांकडे दुर्लक्ष

५. (अ) हबक्कूकच्या काळात यहुदात कशी परिस्थिती होती आणि लोकांनी हबक्कूकच्या भविष्यसूचक संदेशाला कसा प्रतिसाद दिला? (ब) यहुदाच्या लोकांनी यहोवाच्या संदेष्ट्यांचा कसा विरोध केला?

जलप्रलयाच्या कित्येक शतकांनंतर, यहुदाच्या राज्यात अंधाधुंदी माजली होती. मूर्तिपूजा, अन्याय, अत्याचार आणि मनुष्यहत्या देखील सर्वसामान्य झाली होती. यहोवाने आपला संदेष्टा हबक्कूक याच्यामार्फत लोकांना ताकीद दिली की जर त्यांनी पश्‍चात्ताप केला नाही तर खास्दी म्हणजेच बॅबिलोनी लोकांकडून त्यांचा नाश केला जाईल. (हबक्कूक १:५-७) पण लोकांनी दुर्लक्ष केले. ‘यशया संदेष्ट्याने असाच इशारा नव्हता का दिला? त्याला तर आता शंभर वर्षे होऊन गेली, अजून कुठे काय झाले!’ असे कदाचित त्यांनी मनातल्या मनात म्हटले असावे. (यशया ३९:६, ७) यहुदा राज्याच्या अधिकाऱ्‍यांनीही यहोवाच्या संदेष्ट्यांच्या संदेशाकडे दुर्लक्ष केले; इतकेच काय तर हा संदेश सांगणाऱ्‍यांवर त्यांनी अनेक अत्याचार देखील केले. एकदा त्यांनी यिर्मया संदेष्ट्याला जिवेच मारले असते, पण अहीकामने मध्ये पडून त्याला वाचवले. उरीया संदेष्ट्याच्या संदेशामुळे तर यहोयाकीम राजा इतका क्रोधित झाला की त्याने त्याला तरवारीने ठार मारले.—यिर्मया २६:२१-२४.

६. यहोवाने हबक्कूकला कसे बळकट केले?

यिर्मयाला ज्याप्रमाणे यहुदाचे राज्य ७० वर्षे ओसाड राहील असा संदेश घोषित करण्यास सांगण्यात आले होते त्याचप्रमाणे हबक्कूकला जो संदेश सांगण्यास नेमण्यात आले होते, तो देखील लोकांना न रुचणारा असा एक धाडसी संदेश होता. (यिर्मया २५:८-११) आणि म्हणूनच हबक्कूक व्याकूळ होऊन यहोवाला म्हणाला: “हे परमेश्‍वरा, मी किती वेळ ओरडू? तू ऐकत नाहीस. जुलूम झाला असे मी तुला ओरडून सांगतो तरी तू सुटका करीत नाहीस.” (हबक्कूक १:२) यहोवाने दयाळूपणे हबक्कूकची विनवणी ऐकली आणि असे म्हणून त्याचा विश्‍वास दृढ केला: “हा दृष्टांत नेमिलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटास जाण्यास आपणच नेट करीत आहे, तो फसवावयाचा नाही; त्यास विलंब लागला तरी त्याची वाट पाहा; तो येईलच, त्याला, विलंब लागावयाचा नाही.” (हबक्कूक २:३) अन्यायाचा आणि जुलमाचा अंत करण्यासाठी यहोवाने एक ‘समय नेमलेला’ होता. तो समय येण्यास विलंब होत आहे असे भासत असले तरीसुद्धा हबक्कूकला सांगण्यात आले की त्याने निराश होऊ नये आणि आपल्या कार्यातही धीमे पडू नये. उलट, त्याला “वाट पाहा” असे सांगण्यात आले; म्हणजे तो दिवस जवळ आला आहे ही गोष्ट त्याला दररोज मनात बाळगायची होती. यहोवाचा दिवस यायला विलंब होणार नव्हता!

७. सा.यु. पहिल्या शतकात यहोवाने पुन्हा एकदा जेरुसलेमचा नाश करण्याचे का ठरवले?

यहोवाने हबक्कूकला असे सांगितल्यानंतर २० वर्षांच्या आत यहुदा राज्याच्या राजधानीचा, अर्थात, जेरुसलेमचा नाश करण्यात आला. नंतर जेरुसलेमची पुनर्बांधणी करण्यात आली आणि ज्या अधर्मामुळे हबक्कूक इतका व्याकूळ झाला होता तो अधर्म देखील दूर करण्यात आला. मग, सा.यु. पहिल्या शतकात जेरुसलेमच्या रहिवाशांच्या अविश्‍वासूपणामुळे पुन्हा एकदा यहोवाने या शहराचा नाश करण्याचे ठरवले. पण नीतिमान लोकांवर दया दाखवून त्याने त्यांच्या बचावाकरता तजवीज केली. यावेळी त्याने सर्वश्रेष्ठ संदेष्टा येशू ख्रिस्त याच्या माध्यमाने नाशाचा संदेश घोषित केला. सा.यु. ३३ मध्ये येशूने आपल्या अनुयायांना सांगितले: “यरुशलेमेस सैन्यांचा वेढा पडत आहे असे पाहाल तेव्हा ती ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे असे समजा. त्या वेळेस जे यहूदीयांत असतील त्यांनी डोंगरात पळून जावे.”—लूक २१:२०, २१.

८. (अ) येशूच्या मृत्यूनंतर जसजसा काळ लोटला तसतसे काही ख्रिश्‍चन काय करू लागले? (ब) जेरुसलेमबाबत येशूने केलेले भाकीत कसे पूर्ण झाले?

यानंतरच्या वर्षांत जेरुसलेममध्ये राहणाऱ्‍या ख्रिश्‍चनांनी येशूची भविष्यवाणी नेमकी केव्हा पूर्ण होईल याविषयी विचार केला असेल. त्यांना कोणकोणते त्याग करावे लागले असतील याचा विचार करा. जागृत राहण्यासाठी, कदाचित त्यांना व्यापारात अधिक यशस्वी होण्याच्या संधी सोडून द्याव्या लागल्या असतील. कालांतराने ते कंटाळून गेले का? आपण उगाच वेळ घालवत आहोत, येशूची भविष्यवाणी आपल्या पिढीला नव्हे, भविष्यातल्या एखाद्या पिढीला लागू होत असावी असा निष्कर्ष त्यांनी काढला का? सा.यु. ६६ साली येशूची भविष्यवाणी पूर्ण व्हायला सुरवात झाली, कारण त्या वर्षी रोमी सैन्याने जेरुसलेमला वेढले. जे जागृत होते, त्यांनी हे चिन्ह लगेच ओळखले; त्यांनी शहरातून पळ काढला आणि अशारितीने जेरुसलेमचा विनाश झाला तेव्हा त्यांचा बचाव झाला.

जागृत राहण्याच्या आवश्‍यकतेवर प्रकाश टाकणारा दृष्टान्त

९, १०. (अ) लग्न करण्यासाठी दूरदेशी गेलेल्या धन्याच्या परतण्याची वाट पाहात असलेल्या दासांचा येशूने सांगितलेला दृष्टान्त थोडक्यात सांगा. (ब) आपल्या धन्याची वाट पाहणे त्या दासांना कठीण का गेले असावे? (क) धीर धरल्यामुळे दासांना कोणते प्रतिफळ मिळणार होते?

जागृत राहण्याच्या आवश्‍यकतेवर जोर देण्यासाठी येशूने आपल्या शिष्यांची तुलना, लग्न करण्यासाठी दूरदेशी गेलेल्या धन्याच्या परतण्याची वाट पाहणाऱ्‍या दासांशी केली. एका विशिष्ट दिवशी रात्रीच्या वेळी आपला धनी येणार हे दासांना माहीत होते—पण रात्रीच्या कोणत्या प्रहरी? पहिल्या? दुसऱ्‍या? की तिसऱ्‍या? हे त्यांना ठाऊक नव्हते. येशूने म्हटले: “तो [धनी] रात्रीच्या दुसऱ्‍या किंवा तिसऱ्‍या प्रहरी येईल तेव्हा ते त्याला असे [जागृत] आढळतील तर ते धन्य आहेत!” (लूक १२:३५-३८) ते दास आपल्या धन्याच्या परतण्याची केवढ्या उत्सुकतेने वाट पाहात असतील याची कल्पना करा. थोडीशीही चाहूल लागली, किंबहुना सावली जरी हलली तरी, ‘आपला धनी तर आला नसेल?’ असे त्यांना वाटले असेल.

१० धनी दुसऱ्‍या प्रहरी, म्हणजे नऊ ते मध्यरात्रीच्या वेळेदरम्यान आला तर? त्या वेळी सर्व दास, ज्यांनी अगदी पहाटेपासून कामाला सुरवात केली होती, तेसुद्धा धन्याच्या स्वागतासाठी सुसज्ज असतील का? की काही झोपी गेलेले असतील? तिसऱ्‍या प्रहरी, म्हणजे मध्यरात्रीपासून पहाटेच्या तीन वाजेपर्यंत धनी आला तर? धन्याला यायला उशीर लागत आहे असे वाटून काही दासांनी आशा सोडली असेल का, किंवा ते कुरकूर करू लागले असतील का? * धनी येतो तेव्हा जे जागे राहून वाट पाहात होते केवळ त्यांनाच धन्य म्हटले जाणार होते. नीतिसूत्रे १३:१२ येथील शब्द त्यांच्याबाबतीत खरे ठरले असते: “आशा लांबणीवर पडली असता अंतःकरण कष्टी होते, पण इष्टप्राप्ति जीवनाचा वृक्ष आहे.”

११. जागृत राहण्यासाठी प्रार्थनेमुळे आपल्याला कशी मदत मिळू शकते?

११ धन्याला येण्यास उशीर होत आहे असे भासत असतानाही जागृत राहण्यासाठी कोणती गोष्ट येशूच्या अनुयायांना मदत करणार होती? अटक होण्याच्या थोड्या वेळाआधी गेथशेमानेच्या बागेत येशूने आपल्या तीन प्रेषितांना सांगितले: “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा.” (मत्तय २६:४१) येशूने आपल्या शिष्यांना हे सांगितले तेव्हा पेत्र तिथे उपस्थित होता; पुढे त्याने देखील आपल्या ख्रिस्ती बांधवांना तोच सल्ला दिला. त्याने लिहिले: “सर्वांचा शेवट जवळ आला आहे; म्हणून मर्यादेने राहा, व प्रार्थना करण्यासाठी सावध असा.” (१ पेत्र ४:७) यावरून हे स्पष्ट होते, की आपल्या ख्रिस्ती जीवनात आपण नित्यनियमाने प्रार्थना केली पाहिजे. जागृत राहायला मदत करण्यासाठी आपण यहोवाला सदोदित विनंती केली पाहिजे.—रोमकर १२:१२; १ थेस्सलनीकाकर ५:१७.

१२. नाश येण्याच्या नेमक्या वेळेविषयी अंदाज बांधणे हे जागृत राहण्यापेक्षा कशाप्रकारे वेगळे आहे?

१२ प्रार्थना करण्याचे उत्तेजन देण्यासोबत पेत्राने काय म्हटले याकडे लक्ष द्या, तो म्हणाला: “सर्वांचा शेवट जवळ आला आहे.” पण किती जवळ आला आहे? नेमका दिवस आणि वेळ जाणून घेण्याचा आपल्याजवळ कोणताही मार्ग नाही. (मत्तय २४:३६) आणि ही नेमकी वेळ जाणून घेण्यासाठी विनाकारण अंदाज बांधण्याचे प्रोत्साहन बायबल देत नाही; अर्थात शेवट येण्याची उत्कंठा बाळगणे वेगळे आहे, आणि बायबलमध्ये असे करण्याचे उत्तेजनही दिले आहे. (पडताळा २ तीमथ्य ४:३, ४; तीत ३:९.) अंताविषयी उत्कंठा बाळगण्याचा एक मार्ग कोणता आहे? अंत जवळ आला आहे हे सिद्ध करणाऱ्‍या पुराव्याकडे लक्ष देण्याद्वारे आपण अंताविषयी उत्कंठा बाळगू शकतो. तेव्हा आता आपण सहा प्रकारचे पुरावे पाहू; हे पुरावे सिद्ध करतात की आपण या अधार्मिक जगाच्या शेवटल्या दिवसांत जगत आहोत.

खात्री पटवणारे सहा पुरावे

१३. आज आपण “शेवटल्या काळात” राहात आहोत याबद्दल तुम्हाला २ तीमथ्य ३ ऱ्‍या अध्यायात सापडणाऱ्‍या पौलाच्या भविष्यवाणीवरून कशी खात्री पटते?

१३ पहिला हा की ‘शेवटल्या काळाविषयी’ प्रेषित पौलाने केलेली भविष्यवाणी पूर्ण होताना आपण स्पष्टपणे पाहू शकतो. पौलाने लिहिले: “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापांस न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्‍वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्‍तीचे केवळ बाह्‍य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील; त्यांच्यापासूनहि दूर राहा. आणि दुष्ट व भोंदू माणसे ही दुसऱ्‍यांस फसवून व स्वतः फसून दुष्टपणात अधिक सरसावतील.” (२ तीमथ्य ३:१-५, १३) आपल्या काळात या भविष्यवाणीची पूर्णता होताना दिसत नाही का? जे मुद्दामहून वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करतात, तेच याला नकार देतील! *

१४. प्रकटीकरण १२:९ यातील दियाबलाच्या संदर्भात सांगितलेली भविष्यावाणी कशाप्रकारे पूर्ण होत आहे आणि लवकरच त्याला काय करण्यात येईल?

१४ दुसरा पुरावा म्हणजे प्रकटीकरण १२:९ येथे सांगितल्याप्रमाणे सैतानाला व त्याच्या दुरात्म्यांना स्वर्गातून बाहेर फेकल्यामुळे झालेले परिणाम आपण प्रत्यक्ष पाहात आहोत. प्रकटीकरण १२:९ येथे असे म्हटले आहे: “तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला म्हणजे सर्व जगाला ठकविणारा, जो ‘दियाबल’ व ‘सैतान’ म्हटलेला आहे तो जुनाट ‘साप’ खाली पृथ्वीवर टाकण्यात आला, व त्याबरोबर त्याच्या दूतांस टाकण्यात आले.” त्यामुळे पृथ्वीवर मोठा अनर्थ ओढवला आहे. खासकरून १९१४ पासून मानवजातीला अनेक अनर्थकारी गोष्टींना तोंड द्यावे लागले आहे. पण प्रकटीकरणातील भविष्यवाणीत असेही सांगितले आहे की जेव्हा दियाबलाला पृथ्वीवर टाकण्यात येईल, तेव्हा “आपला काळ थोडा आहे” हे तो ओळखून असेल. (प्रकटीकरण १२:१२) या काळादरम्यान सैतान, ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त अनुयायांसोबत लढाई करेल. (प्रकटीकरण १२:१७) या लढाईचे परिणाम आपल्या काळात निश्‍चितच दिसून आले आहेत. * पण लवकरच सैतानाला अथांग डोहात बंदिस्त केले जाईल आणि त्यामुळे तो ‘राष्ट्रांस आणखी ठकवू शकणार नाही.’—प्रकटीकरण २०:१-३.

१५. आपण आज शेवटल्या काळात जगत आहोत याची प्रकटीकरण १७:९-११ वाचल्यावर कशी खात्री पटते?

१५ तिसरा पुरावा असा, की आज आपण प्रकटीकरण १७:९-११ येथील भविष्यवाणीत उल्लेख करण्यात आलेल्या आठव्या आणि शेवटल्या ‘राजाच्या’ काळात जगत आहोत. या भविष्यवाणीत प्रेषित योहानाने सात राजांचा उल्लेख केला. हे सात राजे सात जागतिक महाशक्‍तींचे प्रतिनिधीत्व करतात. ईजिप्त, असेरिया, बॅबिलॉन, मेडो-पर्शिया, ग्रीस, रोम, आणि अँग्लो-अमेरिकन दुहेरी महाशक्‍ती, या त्या सात महाशक्‍ती आहेत. योहानाला “आठवा राजा” देखील दिसला; हा आठवा राजा “त्या सातापासून झालेला आहे.” योहानाला दिसलेला आठवा—आणि शेवटचा राजा—आज संयुक्‍त राष्ट्रसंघाचे प्रतिनिधीत्व करतो. योहान असे सांगतो, की हा आठवा राजा “नाशाप्रत जाणार आहे” आणि यानंतर पृथ्वीवर राज्य करणाऱ्‍या कोणत्याही मानवी राजांचा उल्लेख आढळत नाही. *

१६. नबुखद्‌नेस्सरला पडलेल्या मूर्तीच्या स्वप्नाच्या पूर्णतेनुसार घडलेल्या घटना कशाप्रकारे दाखवून देतात की आज आपण शेवटल्या काळात जगत आहोत?

१६ चवथा पुरावा हा आहे की नबुखद्‌नेस्सरला स्वप्नात जी मूर्ती दिसली होती त्या मूर्तीच्या पायांनी प्रतिकात्मकरित्या चित्रित केलेल्या काळात आपण सध्या राहात आहोत. भविष्यवक्‍ता दानीएल याने या भव्य मनुष्यस्वरूप मूर्तीच्या रहस्यमय स्वप्नाचा उलगडा केला. (दानीएल २:३६-४३) चार धातूंपासून बनलेल्या या मूर्तीच्या शरीराचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या जागतिक महाशक्‍तींचे प्रतिनिधीत्व करतात; डोके (बॅबिलोनी साम्राज्य) आणि पाय व पायांची बोटे (आज राज्य करत असलेली सरकारे). त्या मूर्तीने ज्या ज्या महाशक्‍तींकडे संकेत केला त्या सर्व महाशक्‍ती होऊन गेल्या आहेत. आज आपण मूर्तीच्या पायांनी चित्रित केलेल्या काळात जगत आहोत. यानंतर इतर कोणत्याही महाशक्‍तीचा उल्लेख केलेला नाही. *

१७. आपल्या प्रचार कार्यावरून देखील कशाप्रकारे हे सिद्ध होते की आज आपण शेवटल्या काळात जगत आहोत?

१७ पाचवा पुरावा म्हणजे सबंध जगात चाललेले प्रचार कार्य; येशूने सांगितले होते की हे काम पूर्ण होताच या व्यवस्थीकरणाचा अंत होईल. येशूने म्हटले: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:१४) आज ही भविष्यवाणी अभूतपूर्व प्रमाणात पूर्ण होत आहे. अर्थात, आजही बऱ्‍याच भागांत प्रचार झालेला नाही हे खरे आहे; कदाचित यहोवाच्या नियोजित वेळी त्या भागांतही मोठ्या प्रमाणात हे कार्य करण्याचा मार्ग मोकळा होईल. (१ करिंथकर १६:९) पण बायबलमध्ये असे कोठेही सांगितलेले नाही की पृथ्वीवर राहणाऱ्‍या एकूणएक व्यक्‍तीला कोणीतरी व्यक्‍तिगत जाऊन प्रचार केल्यावरच यहोवा अंत आणेल. उलट बायबल आपल्याला असे सांगते, की यहोवाचे समाधान होईपर्यंत हे कार्य करत राहायचे आहे. त्यानंतर अंत येईल.—पडताळा मत्तय १०:२३.

१८. उपलब्ध पुराव्यानुसार, मोठे संकट सुरू होईल तेव्हा अभिषिक्‍तांपैकी काहीजणांच्या बाबतीत काय म्हणता येईल आणि हे आपण कशावरून म्हणू शकतो?

१८ सहावा पुरावा हा आहे की ख्रिस्ताच्या खऱ्‍या अभिषिक्‍त शिष्यांची संख्या कमी होत चालली आहे; अर्थात, मोठे संकट सुरू होईल तेव्हा यांपैकी काही पृथ्वीवरच असतील. शेष वर्गातील अधिकांश जण वयोवृद्ध आहेत आणि जे खरोखर अभिषिक्‍त आहेत त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत गेली आहे. पण मोठ्या संकटाविषयी सांगताना येशूने असे म्हटले होते: “ते दिवस कमी केले नसते तर कोणाहि मनुष्याचा निभाव लागला नसता; परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले जातील.” (मत्तय २४:२१, २२) यावरून हेच दिसून येते की ख्रिस्ताच्या ‘निवडलेल्यांपैकी’ काहीजण अद्याप पृथ्वीवर असतानाच मोठे संकट सुरू होईल. *

पुढे काय घडणार आहे?

१९, २०. आज आपले जागृत राहणे कधी नव्हते इतके महत्त्वाचे का आहे?

१९ भविष्यात आपण कशाची अपेक्षा करू शकतो? अतिशय चित्तथरारक घटना भविष्यात घडणार आहेत. पौलाने ताकीद दिली की “जसा रात्री चोर येतो, तसाच प्रभूचा दिवस येतो.” जगातील मातब्बरांबद्दल तो म्हणतो, की “शांती आहे, निर्भय आहे असे ते म्हणतात तेव्हा . . . त्यांचा अकस्मात नाश होतो.” म्हणूनच पौल आपल्या वाचकांना असे प्रोत्साहन देतो की “आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहावे.” (१ थेस्सलनीकाकर ५:२, ३,) खरोखर, मानवी संस्था शांती व सुरक्षितता आणतील अशी जे लोक अपेक्षा करतात ते वस्तुस्थितीकडे डोळेझाक करत आहेत. ते गाढ झोपेत आहेत!

२० या व्यवस्थीकरणाचा नाश अतिशय अकस्मात येईल. तेव्हा, यहोवाच्या दिवसाची वाट पाहात राहा. देवाने स्वतः हबक्कूकला सांगितले: “त्याला विलंब लागावयाचा नाही.” खरोखर, सतत जागृत राहणे पूर्वी कधी नव्हते इतके आज महत्त्वाचे आहे!

[तळटीपा]

^ परि. 10 धन्याने आपल्या दासांना कोणतीही निश्‍चित वेळ दिली नव्हती. त्यामुळे त्याला येण्यास उशीर लागला असे जरी त्यांना वाटले असेल, तरी त्याबद्दल स्पष्टीकरण द्यायला तो बाध्य नव्हता.

^ परि. 13 वॉचटावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रकाशित केलेल्या सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकातील ११ व्या अध्यायात या भविष्यवाणीचे सविस्तर स्पष्टीकरण सापडेल.

^ परि. 14 याविषयी अधिक माहिती वॉचटावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रकाशित केलेल्या प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे! पुस्तकातील पृष्ठ १८०-६ वर सापडेल.

^ परि. 16 वॉचटावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटी यांनी प्रकाशित केलेल्या दानीएलाच्या भविष्यवाणीकडे लक्ष द्या! या पुस्तकातील ४ था अध्याय पाहा.

^ परि. 18 शेरडे व मेंढरे यांच्या दृष्टान्तात मनुष्याचा पुत्र मोठे संकट सुरू असताना गौरवात येतो आणि न्यायासनावर बसतो. लोकांनी ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त बांधवांना सहकार्य दिले किंवा नाही याच्या आधारावर त्यांचा न्याय केला जातो. ख्रिस्ताच्या बांधवांनी पृथ्वी सोडून बऱ्‍याच काळानंतर हा न्याय करण्यात आला तर मग, त्यांना सहकार्य दिले किंवा नाही या आधारावर लोकांचा न्याय करणे अर्थहीन ठरेल.—मत्तय २५:३१-४६.

तुम्हाला आठवते का?

• बायबलमधली कोणती उदाहरणे आपल्याला जागृत राहायला मदत करू शकतात?

येशूने जागृत राहण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी कोणते उदाहरण दिले?

आपण आज शेवटल्या काळात जगत आहोत हे कोणत्या सहा पुराव्यांवरून दिसून येते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[९ पानांवरील चित्रे]

ए. एच. मॅकमिलन यांनी जवळजवळ साठ वर्षे यहोवाची प्रामाणिकपणे सेवा केली

[१० पानांवरील चित्र]

येशूने आपल्या शिष्यांची तुलना धन्याची वाट पाहणाऱ्‍या दासांशी केली