व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमचं स्वतःबद्दल काय मत आहे?

तुमचं स्वतःबद्दल काय मत आहे?

तुमचं स्वतःबद्दल काय मत आहे?

एक गर्विष्ठ मनुष्य होता. तो एका मोठ्या सरकारी पदावर होता. लोक त्याची प्रशंसा करीत होते, वाहवाह करीत होते त्यामुळे तो जणू हवेतच उडत होता. पण दुसरा एक अधिकारी मात्र इतरांप्रमाणे त्याची खुशामत करत नसल्यामुळे याला त्याचा खूप राग यायचा. त्याच्याविरुद्ध सूड उगवण्याच्या हेतूने त्या गर्विष्ठ अधिकाऱ्‍याने त्या माणसाच्या सबंध जातीचेच नामोनिशाण मिटवण्याचा कट रचला. गर्विष्ठपणाचे किती हे विकृत रूप!

कट रचणाऱ्‍या या मनुष्याचं नाव होतं, हामान. पर्शियन राजा अहश्‍वेरोश याच्या दरबारात तो एक उच्च अधिकारी होता. त्याला कोणावर इतका राग होता? मर्दखय नावाच्या एका यहुद्यावर. यहुदी जातीला नष्ट करण्याचा हामानाचा द्वेषपूर्ण इरादा निश्‍चितच अतिरेकीपणाचा होता परंतु त्याच्या मनोवृत्तीवरून आपण गर्वाचे धोके आणि त्याचे गंभीर परिणाम पाहू शकतो. त्याच्या उर्मट स्वभावामुळे इतरांवर तर संकट ओढवलेच, परंतु चारचौघात त्याचीसुद्धा बदनामी झाली आणि शेवटी त्याला मृत्युदंड पत्करावा लागला.—एस्तेर ३:१-९; ५:८-१४; ६:४-१०; ७:१-१०.

खऱ्‍या उपासकांनाही गर्वाचा दर्प येऊ शकतो

यहोवा आपल्याकडून हीच अपेक्षा करतो, की ‘आपण त्याच्या समागमे राहून नम्रभावाने चालावे.’ (मीखा ६:८) बायबलमध्ये अशा अनेक लोकांची उदाहरणे आहेत जे स्वतःला इतरांपेक्षा फार श्रेष्ठ समजायचे. यामुळे त्यांच्या वाट्याला निरनिराळ्या समस्या आणि दुःखच आले. यांतील काही उदाहरणांचा विचार केल्याने आपल्याला अशी असमतोल मनोवृत्ती बाळगण्याचा वेडेपणा न करण्यास व जर बाळगलाच तर कोणता धोका उद्‌भवेल हे पाहायला मदत मिळेल.

योना या आपल्या संदेष्ट्यावर यहोवाने निनवेच्या दुष्ट लोकांवर येणाऱ्‍या न्यायदंडांचा इशारा देण्याची कामगिरी सोपवली होती; परंतु योनाच्या मनात गर्वाने घर केले आणि त्याने आपल्यावरील कामगिरी सोडून चक्क पळून जाण्याचा प्रयत्न केला. (योना १:१-३) नंतर, त्याने प्रचार केल्यामुळे निनवेकरांनी पश्‍चात्ताप केला तेव्हा तो खिन्‍न झाला. संदेष्टा म्हणून आपली नाचक्की तर होणार नाही ना याची त्याला इतकी काळजी लागली होती की हजारो निनवेकरांच्या जीवाची त्याला रत्तीभरही पर्वा राहिली नाही. (योना ४:१-३) आपणही स्वतःच्या नावाचा फाजील अभिमान बाळगत राहिलो तर आपल्याला लोकांबद्दल आणि आपल्यावर येणाऱ्‍या प्रसंगांबद्दल निःपक्ष आणि योग्य दृष्टिकोन केव्हाही बाळगता येणार नाही.

यहुदाचा एक राजा उज्जीया याचाही विचार करा. मुळात तो एक चांगला राजा होता पण एकदा तो इतका उतावीळ झाला की फक्‍त याजकांनीच केली पाहिजेत अशी विशिष्ट कामे स्वतः करायचा मगरूरपणा त्याने केला. त्याच्या या अभिमानी आणि उर्मट कृत्याची त्याला मोठी किंमत मोजावी लागली; त्याच्या कपाळावर कोड उठला आणि तो यहोवाच्या नजरेतून उतरला.—२ इतिहास २६:३, १६-२१.

येशूचे शिष्य असंतुलित विचारसरणीच्या पाशात पडता पडता वाचले. त्यांना स्वतःचा मोठेपणा आणि अधिकार यांची फाजील काळजी लागली होती. त्यांच्यासमोर कठीण परीक्षेचा समय आला तेव्हा तर त्यांनी चक्क येशूला सोडून दिले आणि ते पळून गेले. (मत्तय १८:१; २०:२०-२८; २६:५६; मार्क ९:३३, ३४; लूक २२:२४) नम्रतेच्या अभावामुळे व स्वतःला वरचढ समजण्याच्या मनोवृत्तीमुळे, यहोवाचे उद्देश आणि त्याच्या इच्छेसंबंधी असलेली त्यांची भूमिका त्यांनी जवळजवळ नजरेआड केली होती.

अहंकाराचे हानीकारक परिणाम

स्वतःविषयीच्या असंतुलित दृष्टिकोनामुळे आपले स्वतःचे तर नुकसान होतेच शिवाय इतरांबरोबरचे आपले संबंधही खराब होतात. समजा, तुम्ही एका खोलीत बसलात आणि आणखी एक जोडपे हळू आवाजात काही तरी बोलून हसत आहेत. आपण फक्‍त आपलाच विचार करणारे असलो तर आपण असा चुकीचा समज करून घेऊ, की ती दोघं हळू आवाजात बोलताहेत म्हणजे कदाचित आपलीच मजा करत असावेत. ते कदाचित दुसऱ्‍या कोणत्या तरी कारणामुळे हसत असावेत असा विचार करायला आपले मन तयारच होणार नाही. आपल्याशिवाय आणखी कोणाविषयी ते बोलणार, असा विचार आपण करू. त्यामुळे आपल्याला त्यांचा राग येईल आणि पुन्हा या दोघांबरोबर कधी बोलायचं नाही असा आपण विचार करू. स्वतःविषयीच्या अशा या असंतुलित दृष्टिकोनामुळे आपण गैरसमज करून घेतो आणि मित्रमैत्रिणी, कुटुंबातील सदस्य किंवा इतर लोक यांबरोबरचे आपले संबंध आपण स्वतःहूनच खराब करून घेतो.

स्वतःचाच फाजील विचार करणारे लोक घमेंडी होतात; स्वतःच्या कलांचा, कार्यांचा किंवा स्वतःजवळील वस्तूंची सारखी बढाई मारत राहतात. किंवा, ते इतरांना बोलण्याची संधीच देणार नाहीत, नेहमी स्वतःच्याच गोष्टी सांगत राहतील. त्यांच्या या वागण्यावरून त्यांना खरं प्रेम नाही हे दिसून येईल आणि त्यामुळे इतर लोकांना असे अहंकारी लोक हवेहवेसे वाटणार नाहीत. यामुळे, अशा फाजील अभिमानी लोकांना इतर लोक सहसा दूर सारतात.—१ करिंथकर १३:४.

आपण यहोवाचे साक्षीदार असल्यामुळे लोक कदाचित आपली थट्टा करतील व सेवेत आपला विरोध करतील. परंतु हा आपला नव्हे तर आपण ज्याच्या संदेशाचा प्रचार करीत आहोत त्या यहोवाचा विरोध होत असतो, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. अशावेळी आपण स्वतःबद्दलचा फाजील विचार केला तर आपल्याला ते फार महागात पडू शकते. काही वर्षांपूर्वी, एका घरमालकाने एका बांधवाला शिवीगाळ केली तेव्हा हा अपमान पचवू न शकल्यामुळे त्या बांधवानेही त्यांना खरेखोटे सुनावले. (इफिसकर ४:२९) या घटनेनंतर तो बांधव घरोघरच्या कार्यात पुन्हा कधीच गेला नाही. होय, गर्विष्ठ मनोवृत्तीमुळे प्रचार करताना आपल्याला लवकर रागही येईल. असे केव्हाही होऊ नये म्हणून आपण प्रयत्न करू या. ख्रिस्ती सेवेत भाग घेण्याचा जो सुहक्क आपल्याला मिळाला आहे त्याबद्दल योग्य कदर बाळगण्यास यहोवाकडे आपण मदतीसाठी नम्रपणे प्रार्थना करू या.—२ करिंथकर ४:१, ७; १०:४, ५.

आपली फाजील अभिमानी मनोवृत्ती असल्यास आवश्‍यक असलेला सल्ला देखील आपण स्वीकारणार नाही. काही वर्षांपूर्वी एका मध्य अमेरिकन राष्ट्रात, एका किशोरवयीन मुलाने ख्रिस्ती मंडळीतील ईश्‍वरशासित प्रशालेत एक भाषण दिले. प्रशाला पर्यवेक्षकांनी जेव्हा त्याला जरा थेटच सल्ला दिला तेव्हा या युवकाने चिडून आपले बायबल जमिनीवर भिरकावले आणि राज्य सभागृहात पुन्हा कधी यायचे नाही या इराद्याने तो पाय आपटत बाहेर निघून गेला. परंतु काही दिवसांनी आपला अहंकार विसरून तो प्रशाला पर्यवेक्षकांशी जाऊन बोलला व त्यांनी दिलेला सल्ला त्याने स्वीकारला. आणि आज याच युवकाने ख्रिस्ती प्रौढतेप्रत प्रगती केली आहे.

फाजील अभिमान बाळगून स्वतःला फारच महत्त्वाची व्यक्‍ती समजल्यामुळे देवाबरोबरचा आपला संबंध देखील खराब होऊ शकतो. नीतिसूत्रे १६:५ ताकीद देते: “प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्‍वराला वीट येतो.”

स्वतःविषयी संतुलित दृष्टिकोन

आपण कोणीतरी फार मोठे आहोत असे स्वतःला कधी समजू नये, हे तर स्पष्ट झाले आहे. पण याचा अर्थ असा होत नाही, की आपण जे काही बोलतो किंवा करतो त्याकडे आपण लक्ष देऊ नये. पर्यवेक्षकांनी, सेवा सेवकांनी, नव्हे मंडळीतील सर्वांनी गंभीर असावयास हवे असे बायबल म्हणते. (१ तीमथ्य ३:४, ८, ११; तीत २:२) तेव्हा, एखादा ख्रिस्ती मनुष्य स्वतःविषयी विनयशील, संतुलित व गंभीर दृष्टिकोन कसा बाळगू शकतो?

स्वतःविषयी संतुलित दृष्टिकोन बाळगलेल्यांची अनेक उदाहरणे बायबलमध्ये आहेत. नम्रतेचे सर्वात श्रेष्ठ उदाहरण कोणाचे असेल, तर ते आहे येशू ख्रिस्ताचे. आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करता यावी आणि मानवजातीला तारण प्राप्त व्हावे म्हणून त्याने आनंदाने स्वर्गातील त्याचे वैभवी स्थान सोडून पृथ्वीवर सर्वसाधारण मानवाचे रूप धारण केले. लोकांनी त्याला हिणवले, त्याची निंदा केली, त्याला अपमानास्पदरीत्या ठार मारले तरीदेखील त्याने आत्मसंयम आणि उचित स्वाभिमान बाळगला. (मत्तय २०:२८; फिलिप्पैकर २:५-८; १ पेत्र २:२३, २४) येशू हे कसे काय करू शकला? त्याने यहोवावर पूर्ण भरवसा ठेवला आणि त्याचीच इच्छा पूर्ण करण्याचा त्याने ठामनिश्‍चय केला. त्याने देवाच्या वचनाचा परिश्रमपूर्वक अभ्यास केला, सदोदीत प्रार्थना केली आणि सेवेत आवेशाने भाग घेतला. (मत्तय ४:१-१०; २६:३६-४४; लूक ८:१; योहान ४:३४; ८:२८; इब्री लोकांस ५:७) येशूच्या उदाहरणाचे अनुकरण केल्याने आपल्यालाही स्वतःविषयीचा संतुलित दृष्टिकोन विकसित करण्यास व तो तसाच टिकवून ठेवण्यास मदत होईल.—१ पेत्र २:२१.

शौल राजाचा पुत्र योनाथान याचेही छान उदाहरण आपल्यापुढे आहे. आपल्या वडिलांच्या अवज्ञेमुळे राजा होण्याची त्याची संधी हुकली. (१ शमुवेल १५:१०-२९) योनाथान यावर कुढत बसला का? त्याच्या जागी राजा होणाऱ्‍या दावीदाला पाहून त्याचा जळफळाट झाला का? योनाथान दावीदापेक्षा वयाने मोठा आणि कदाचित अनुभवी देखील होता, तरीदेखील त्याने विनम्रपणे यहोवाची व्यवस्था स्वीकारली आणि दावीदाला एकनिष्ठपणे पाठिंबा दिला. (१ शमुवेल २३:१६-१८) देवाची इच्छा आणि त्याच्या इच्छेच्या अधीन होण्याची स्वेच्छा यांबाबतचा एक स्पष्ट दृष्टिकोन आपल्याला “आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक” न मानण्यास मदत करील.—रोमकर १२:३.

विनयशीलता व नम्रता दाखवणे किती महत्त्वाचे आहे ते येशूने शिकवले. त्याने त्यांना लग्नाच्या मेजवानीचा एक दृष्टान्त दिला. तो त्यांस म्हणाला, की मेजवानीसाठी गेल्यावर त्यांनी स्वतःसाठी “मुख्य मुख्य आसने” निवडू नयेत कारण त्यांच्यापेक्षा अधिक योग्यतेचा कोणी आल्यावर त्यांना खालच्या जागेवर जावे लागल्यामुळे त्यांचा अपमान होईल. असे स्पष्ट विवरण दिल्यावर येशू पुढे म्हणाला: “जो कोणी आपणाला उंच करितो तो नमविला जाईल; व जो आपणाला नमवितो तो उंच केला जाईल.” (लूक १४:७-११) येशूच्या सल्ल्याकडे लक्ष दिल्यास व ‘लीनता धारण केल्यास’ आपण सुज्ञ ठरू.—कलस्सैकर ३:१२; १ करिंथकर १:३१.

संतुलित दृष्टिकोनाचे आशीर्वाद

यहोवाच्या सेवकांनी सभ्य आणि नम्र मनोवृत्ती बाळगल्यामुळे देवाच्या सेवेमध्ये त्यांना खरा आनंद मिळतो. कळपाबरोबर ‘दयेने’ व्यवहार करणाऱ्‍या नम्र वडिलांकडे लोक सहजपणे येतात. (प्रेषितांची कृत्ये २०:२८, २९, पं.र.भा.) मंडळीतील सर्वांना त्यांच्याशी बोलताना किंवा त्यांच्याकडून मदत मागताना मनात कसलीही भीती राहत नाही. अशाने मंडळीतील सर्वजण एकमेकांच्या जवळ येतील, त्यांच्यामध्ये प्रेम असेल, त्यांना एकमेकांची काळजी वाटेल आणि ते एकमेकांवर भरवसा ठेवतील.

आपण खूपच गंभीर झालो तर कोणी आपल्याशी मैत्री करणार नाही. विनयशीलता आणि नम्रता आपल्याला, स्पर्धात्मक वृत्ती न दाखवण्यास तसेच आपल्या वागण्याद्वारे किंवा भौतिक मालमत्तेद्वारे स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजण्याची मनोवृत्ती न बाळगण्यास मदत करील. हे ईश्‍वरी गुण आपल्याला इतरांचा विचार करण्यास मदत करतील व अशाप्रकारे आपण गरजू लोकांना सांत्वन व आधार देऊ. (फिलिप्पैकर २:३, ४) लोकांवर आपण प्रेम करतो, त्यांना दया दाखवतो तेव्हा तेही आपल्या जवळ येतात. हाच निःस्वार्थ संबंध दाट मैत्री रचण्याकरता पाया ठरत नाही का? अवास्तव गंभीर न झाल्याचा किती हा मोठा आशीर्वाद!—रोमकर १२:१०.

स्वतःविषयी संतुलित दृष्टिकोन बाळगल्याचा आणखी एक फायदा म्हणजे, आपण कोणाचे मन दुखावलेच असेल तर स्वतःची चूक कबूल करण्यास आपल्याला सोपे जाते. (मत्तय ५:२३, २४) यांमुळे लोकांबरोबर आपले संबंध चांगले राहतात, चुकभूल माफ करून समेट करता येतो व एकमेकांना आदर दाखवता येतो. मंडळीत देखरेख करणारे वडीलजन नम्र आणि सभ्य असल्यास, इतरांचे भले करण्याची त्यांना संधी मिळते. (नीतिसूत्रे ३:२७; मत्तय ११:२९) नम्र व्यक्‍तीला तिच्याविरुद्ध पाप करणाऱ्‍यांना क्षमा करायला देखील सोपे वाटते. (मत्तय ६:१२-१५) अशी व्यक्‍ती छोट्या मोठ्या गोष्टींवर चिडणार नाही व ज्या समस्यांना कोणत्याही प्रकारे सोडवता येत नाही अशा समस्यांना पूर्ण भरवशाने यहोवावर सोडून देईल.—स्तोत्र ३७:५; नीतिसूत्रे ३:५, ६.

स्वतःला निरभिमानी आणि नम्र बनण्याचा सर्वात मोठा आशीर्वाद म्हणजे आपण यहोवाची कृपा आणि स्वीकृती प्राप्त करू. कारण “देव गर्विष्ठांना विरोध करितो, आणि लीनांवर कृपा करितो.” (१ पेत्र ५:५) आपण वास्तविकतेत जसे आहोत त्यापेक्षा जास्त स्वतःला समजण्याचा प्रयत्न करू नये. त्याऐवजी, यहोवाच्या व्यवस्थेत आपली जी भूमिका आहे तिचा आपण नम्रपणे स्वीकार करू या. “देवासमागमे राहून नम्रभावाने” चालणाऱ्‍यांसाठी अद्‌भुत आशीर्वाद राखून ठेवले आहेत.

[२२ पानांवरील चित्र]

योनाथानाने नम्रपणे दावीदाला साथ दिली