यहोवाचे मंदिर ‘मोलवान वस्तूंनी’ भरत आहे
यहोवाचे मंदिर ‘मोलवान वस्तूंनी’ भरत आहे
“मी सर्व राष्ट्रांस हालवून सोडीन म्हणजे सर्व राष्ट्रांतील निवडक [“मोलवान,” पं.र.भा.] वस्तु येतील; आणि मी हे मंदिर वैभवाने भरीन.”—हाग्गय २:७.
१. संकट कोसळते तेव्हा आपल्या मनात सर्वात आधी आपल्या प्रिय माणसांचाच विचार का येतो?
तुमचे घर कोणकोणत्या मोलवान वस्तूंनी सजले आहे? महागडे फर्निचर, अत्याधुनिक कॉम्प्युटर, गॅरेजमध्ये दिमाखाने उभी असलेली नवीकोरी कार, यांसारख्या वस्तूंनी तुमचे घर सजले आहे का? तुमच्याजवळ या सर्व वस्तू असल्या तरीसुद्धा, घराला खरी शोभा त्यात असणाऱ्या वस्तूंमुळे नव्हे, तर त्यात राहणाऱ्या लोकांमुळे अर्थात तुमच्या कुटुंबियांमुळे येते असे तुम्हालाही वाटत नाही का? एकदा रात्री, अचानक तुम्हाला धुराच्या वासामुळे जाग येते अशी कल्पना करा. तुमच्या घराला आग लागली आहे. आणि जीव वाचवण्यासाठी तुम्हाला काही क्षणांत हालचाल करायची आहे! सर्वात आधी तुमच्या मनात कशाचा विचार येईल? तुमच्या फर्निचरचा? कॉम्प्युटरचा? कारचा? की तुमच्या प्रिय माणसांचा? यात काही शंकाच नाही, कारण माणसांची किंमत वस्तूंपेक्षा निश्चितच खूप मोठी आहे.
२. यहोवाने काय काय निर्माण केले आहे आणि या सर्व निर्मितीत येशूला सर्वात प्रिय काय होते?
२ आता यहोवा देव आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त यांच्या दृष्टिकोनातून जरा विचार करा. यहोवा हा “आकाश, पृथ्वी, समुद्र ह्यांचा व त्यांच्यात जे काही आहे त्या सर्वांचा उत्पन्नकर्ता” आहे. (प्रेषितांची कृत्ये ४:२४) त्याने आपल्या पुत्राचा “कुशल कारागीर” म्हणून उपयोग करून त्याच्याद्वारे सर्व काही निर्माण केले. (नीतिसूत्रे ८:३०, ३१; योहान १:३; कलस्सैकर १:१५-१७) तेव्हा, त्या दोघांनाही या निर्माण केलेल्या सर्व वस्तू प्रिय आहेत यात शंकाच नाही. (पडताळा उत्पत्ति १:३१.) पण सर्व निर्मितीत त्यांना सगळ्यात प्रिय काय वाटत असेल, वस्तू की माणसे? नीतिसूत्रांच्या पुस्तकात जेथे येशूचे वर्णन बुद्धी या गुणाच्या रूपात केले आहे तेथे तो म्हणतो: “मनुष्यजातीच्या ठायी मी आनंद पावे,” किंवा एका भाषांतरात म्हटल्याप्रमाणे, येशूला ‘मनुष्याचे पुत्र प्रिय होते.’
३. यहोवाने हाग्गय याच्याद्वारे कोणता भविष्यवाद केला?
३ यहोवा मनुष्याला फार मोलवान समजतो यात शंका नाही. सा.यु.पू. ५२० साली त्याने आपला संदेष्टा हाग्गय याच्या माध्यमाने जो भविष्यवाद केला त्यावरून हे दिसून येते. यहोवाने घोषणा केली: “मी सर्व राष्ट्रांस हालवून सोडीन म्हणजे सर्व राष्ट्रांतील निवडक [मोलवान] वस्तु येतील; आणि मी हे मंदिर वैभवाने भरीन. . . . या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल.”—हाग्गय २:७, ९.
४, ५. (अ) “मोलवान वस्तू” हे भौतिक वैभवाच्या संदर्भात म्हटलेले आहे असे म्हणणे का योग्य ठरणार नाही? (ब) तुम्ही ‘मोलवान वस्तूंचे’ कसे वर्णन कराल आणि का?
* बंदिवासातून आपल्या देशी परत आलेल्या यहुद्यांच्या या लहानशा गटाने शलमोनाच्या मंदिरापेक्षाही वैभवशाली मंदिर बांधावे अशी अपेक्षा यहोवाने त्यांच्याकडून करणे निश्चितच रास्त ठरले नसते!
४ यहोवाच्या मंदिराला पहिल्यापेक्षा श्रेष्ठ वैभवाने भरणाऱ्या या “मोलवान वस्तू” कोणत्या होत्या? या अतिमोलवान आणि अलंकारिक शोभेच्या वस्तू होत्या का? सोने, रुपे किंवा जडजवाहिराच्या वस्तू होत्या का? नाही, कारण हे जवळजवळ अशक्यच होते. तुम्हाला आठवत असेल, की सुमारे पाचशे वर्षांआधी ज्या मंदिराचे उद्घाटन झाले होते ते भव्यदिव्य मंदिर अब्जावधी रुपये खर्च करून बांधण्यात आले होते!५ तर मग यहोवाच्या मंदिरात कोणत्या “मोलवान वस्तू” येणार होत्या? साहजिकच, हे लोकांच्या संदर्भात म्हटले असावे. कारण यहोवाचे मन सोन्यारुपाने नव्हे तर त्याच्यावरील प्रीतीने प्रेरित होऊन त्याची सेवा करणाऱ्या लोकांमुळे आनंदित होते. (नीतिसूत्रे २७:११; १ करिंथकर १०:२६) होय, त्याला आवडणाऱ्या पद्धतीने उपासना करणारे सर्व पुरुष, स्त्रिया व लहान मुले त्याच्या नजरेत मोलवान आहेत. (योहान ४:२३, २४) हे लोक म्हणजेच त्या “मोलवान वस्तू” आहेत आणि शलमोनाच्या मंदिराला एकेकाळी सुशोभित करणाऱ्या सर्व जडजवाहिरांपेक्षा ते यहोवाला अधिक प्रिय आहेत.
६. देवाच्या प्राचीन मंदिरामुळे कोणता उद्देश साध्य झाला?
६ बऱ्याच विरोधाला तोंड देऊन शेवटी सा.यु.पू. ५१५ साली मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. येशूने आपल्या जीवनाचे बलिदान दिले तोपर्यंत जेरुसलेममधल्या या मंदिरात अनेक “मोलवान वस्तू,” अर्थात जन्माने यहुदी असणारे आणि काही विदेशी मतानुसारी शुद्ध उपासना करण्यासाठी येत. पण हे मंदिर यापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ असणाऱ्या गोष्टींचे प्रतीक होते; त्याविषयीच आता आपण पाहणार आहोत.
पहिल्या शतकातील पूर्णता
७. (अ) जेरुसलेममधले देवाचे प्राचीन मंदिर भविष्यातल्या कोणत्या गोष्टीचे प्रतीक होते? (ब) प्रायश्चित्ताच्या दिवशी मुख्य याजक काय करायचा याचे वर्णन करा.
७ जेरुसलेमचे मंदिर उपासनेच्या एका श्रेष्ठ तरतुदीकडे संकेत करीत होते. अर्थात देवाच्या आत्मिक मंदिराकडे. सा.यु. २९ साली यहोवाने हे मंदिर स्थापन केले आणि येशूला या मंदिराच्या मुख्य याजकपदी नियुक्त केले. (इब्री लोकांस ५:४-१०; ९:११, १२) इस्राएलच्या मंदिरातील मुख्य याजकाच्या जबाबदाऱ्या आणि येशूने केलेल्या काही गोष्टी यांतील साम्य पाहा. दर वर्षी प्रायश्चित्ताच्या दिवशी मुख्य याजक मंदिरातल्या अंगणात असलेल्या वेदीवर, याजकांच्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी, एक गोऱ्हा अर्पण करत असे. यानंतर तो गोऱ्ह्याचे रक्त घेऊन मंदिरात जायचा आणि अंगण व पवित्रस्थान यांमध्ये असलेल्या दारांतून पवित्रस्थान आणि परमपवित्रस्थान यांमध्ये असलेल्या पडद्याच्या पलीकडे जायचा. परमपवित्रस्थानात प्रवेश केल्यानंतर मुख्य याजक कराराच्या कोशासमोर ते रक्त शिंपडायचा. त्यानंतर याच पद्धतीने इस्राएलाच्या बारा वंशांसाठी (याजक नसलेल्या) तो एक बकरा अर्पण करायचा. (लेवीय १६:५-१५) या विधीचा देवाच्या आत्मिक मंदिराशी काय संबंध आहे?
८. (अ) सा.यु. २९ सालापासून येशूचे कशाप्रकारे अर्पण करण्यात आले? (ब) पृथ्वीवर सेवा करत असताना येशूचा यहोवासोबत कोणता खास नातेसंबंध होता?
८ सा.यु. २९ साली येशूचा बाप्तिस्मा झाला आणि त्याला पवित्र आत्म्याने अभिषिक्त करण्यात आले तेव्हा त्याला देवाची इच्छा पूर्ण करण्याकरता, जणू देवाच्या इच्छेच्या वेदीवर अर्पण करण्यात आले. (लूक ३:२१, २२) ही घटना एक सुरवात होती; या घटनेनंतर येशूने साडेतीन वर्षांच्या आपल्या जीवनात अनेक स्वार्थत्याग केले. (इब्री लोकांस १०:५-१०) येशू, देवाचा आत्म्याने उत्पन्न झालेला पुत्र बनला. त्याच्या स्वर्गीय पित्यासोबत असलेला त्याचा हा अद्वितीय नातेसंबंध इतर मानवांच्या समजण्यापलीकडे होता. अंतरपट असल्यामुळे निवासमंडपाच्या अंगणातून जसे पवित्रस्थानात पाहता येत नव्हते त्याचप्रकारे, त्यांच्याही डोळ्यांवर पडदा होता.—निर्गम ४०:२८.
९. येशू मनुष्यरूपात असताना स्वर्गात का जाऊ शकत नव्हता, आणि हा प्रश्न कशाप्रकारे मिटला?
९ पण देवाच्या आत्म्याने उत्पन्न झालेला पुत्र असूनही मनुष्यरूपात असताना येशू स्वर्गात जाऊ शकत नव्हता. असे का? कारण मांस व रक्त यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू १ करिंथकर १५:४४, ५०) मानवी शरीरामुळे स्वर्गात प्रवेश अशक्य असल्याकारणाने येशूचे मानवी शरीर हे देवाच्या प्राचीन मंदिरातल्या पवित्रस्थान आणि परमपवित्रस्थान यांमधील पडद्याचे उचित प्रतीक होते. (इब्री लोकांस १०:२०) येशूचा मृत्यू झाल्यानंतर मात्र तीन दिवसांनी देवाने त्याचे आत्मिक शरीरात पुनरुत्थान केले. (१ पेत्र ३:१८) आता तो देवाच्या आत्मिक मंदिराच्या परमपवित्रस्थानात म्हणजेच, स्वर्गात प्रवेश करू शकत होता. आणि हेच घडले. पौलाने याबद्दल लिहिले: “खऱ्या गोष्टींचे प्रतिरूप म्हणजे हातांनी केलेले पवित्रस्थान [अर्थात, मंदिरातले परमपवित्रस्थान] ह्यात ख्रिस्त गेला नाही, तर आपल्यासाठी देवासमोर उभे राहण्यास प्रत्यक्ष स्वर्गात गेला.”—इब्री लोकांस ९:२४.
शकत नाही. (१०. स्वर्गात परतल्यानंतर येशूने काय केले?
१० स्वर्गात येशूने यहोवाला आपल्या रक्ताचे खंडणीमूल्य सादर करून जणू प्राचीन काळातल्या याजकाप्रमाणे बलिदानाचे ‘रक्त शिंपडले.’ येशूने आणखीही काही केले. त्याच्या मृत्यूच्या काही काळाआधी त्याने आपल्या अनुयायांना सांगितले होते: “मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो. आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्याजवळ घेईन. ह्यासाठी की, जेथे मी आहे तेथे तुम्हीहि असावे.” (योहान १४:२, ३) अशारितीने परमपवित्रस्थानात, किंवा स्वर्गात प्रवेश मिळवल्यानंतर येशूने इतरांसाठीही स्वर्गात जाण्याचा मार्ग मोकळा केला. (इब्री लोकांस ६:१९, २०) स्वर्गात जाणाऱ्या या लोकांची संख्या १,४४,००० असणार होती आणि ते देवाच्या आत्मिक मंदिराच्या तरतुदीअंतर्गत दुय्यम याजक म्हणून सेवा करतील. (प्रकटीकरण ७:४; १४:१; २०:६) इस्राएलातील मंदिरात ज्याप्रमाणे मुख्य याजक पहिल्यांदा याजकांच्या पापांच्या प्रायश्चित्तासाठी परमपवित्रस्थानात गोऱ्ह्याचे रक्त नेत असे, त्याचप्रमाणे येशूने सांडलेल्या रक्ताचा लाभ पहिल्यांदा या १,४४,००० दुय्यम याजकांना करून देण्यात आला. *
आधुनिक काळातल्या “मोलवान वस्तू”
११. इस्राएलचा मुख्य याजक कोणासाठी बकरा अर्पण करत असे आणि हा कशाचा संकेत होता?
११ सर्व अभिषिक्त जणांना निवडण्याचे कार्य १९३५ सालापर्यंत संपुष्टात आले असे दिसून येते. * पण आपले मंदिर वैभवाने भरण्याचे यहोवाचे काम अद्याप संपुष्टात आले नव्हते. नाही, अद्याप अनेक “मोलवान वस्तू” यात येणार होत्या. तुम्हाला आठवत असेल, इस्राएलात मुख्य याजक दोन प्राण्यांचे बलिदान द्यायचा. याजकांच्या पापांच्या प्रायश्चित्तासाठी गोऱ्हा आणि याजक नसलेल्या इतर गोत्रांच्या प्रायश्चित्ताकरता बकरा. जर याजक हे येशूसोबत स्वर्गीय राज्यात जाणार असलेल्या अभिषिक्तांना चित्रित करतात तर मग याजक नसलेले गोत्र कोणाचे प्रतिनिधित्व करतात? याचे उत्तर येशूच्या योहान १०:१६ येथील शब्दांत सापडते: “ह्या मेंढवाड्यातली नव्हेत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीहि मला आणली पाहिजेत; ती माझी वाणी ऐकतील; मग एक कळप, एक मेंढपाळ असे होईल.” त्याअर्थी, येशूने सांडलेल्या रक्तामुळे दोन प्रकारच्या लोकांना लाभ मिळाला. पहिले म्हणजे, ज्यांना येशूसोबत स्वर्गात राज्य करण्याची आशा आहे आणि दुसरे म्हणजे जे याच पृथ्वीवर परादीसात सार्वकालिक जीवनाचा उपभोग घेण्याची आशा बाळगतात. हाग्गयच्या भविष्यवाणीत “मोलवान वस्तू” असे या दुसऱ्या गटाच्या लोकांबद्दल म्हटलेले आहे.—मीखा ४:१, २; १ योहान २:१, २.
१२. आज देवाच्या मंदिरात असंख्य “मोलवान वस्तू” कशाप्रकारे आणल्या जात आहेत?
१२ या “मोलवान वस्तू” आजही यहोवाच्या मंदिरात येत आहेत. अलीकडच्या वर्षांत, पूर्व युरोपात, आफ्रिकेतील काही भागांत, तसेच इतर काही देशांत यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर घालण्यात आलेले प्रतिबंध काढण्यात आल्यामुळे देवाच्या स्थापित राज्याच्या सुवार्तेचा प्रसार पूर्वी कधीही न केलेल्या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात होत आहे. अधिकाधिक लोक देवाच्या आत्मिक मंदिराच्या व्यवस्थेत सहभागी होत आहेत. आणि येशूच्या आज्ञेनुसार हे लोक आणखी लोकांना शिष्य बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. (मत्तय २८:१९, २०) हे कार्य करताना, त्यांना असंख्य अबालवृद्ध भेटतात जे भविष्यात “मोलवान वस्तू” बनून यहोवाच्या मंदिराला वैभवाने भरू शकतात. हे कार्य कशाप्रकारे घडत आहे याची काही उदाहरणे पाहा.
१३. बोलिव्हिया येथे राहणाऱ्या एका लहानशा मुलीने राज्य संदेशाचा प्रसार करण्यासाठी कशाप्रकारे उत्साह दाखवला?
१३ बोलिव्हियात, एका साक्षीदार कुटुंबातल्या पाच वर्षांच्या मुलीने सर्किट ओव्हरसियरच्या भेटीदरम्यान आठवडाभर शाळेतून सुटी मिळावी अशी आपल्या शिक्षिकेला विनंती केली. का? तर तिला या खास कार्याच्या आठवड्यात दररोज प्रचार कार्यात सहभागी व्हायचे होते. तिच्या आईवडिलांना आश्चर्य वाटले, पण तिचा उत्साह पाहून त्यांनी तिचे कौतुक केले. ही चिमुकली सध्या पाच बायबल अभ्यास घेते आणि यांपैकी काहीजण ख्रिस्ती सभांना देखील येऊ लागले आहेत. तिने आपल्या शिक्षिकेला देखील किंग्डम हॉलमध्ये आणले होते. कदाचित, काही काळानंतर तिच्याकडून बायबल शिकणारे हे लोक “मोलवान वस्तू” असल्याचे शाबित होतील आणि ते देखील यहोवाच्या मंदिरात येऊन त्याच्या वैभवात भर घालतील.
१४. एका व्यक्तीला राज्य संदेशात रस नाही असे भासत असताना देखील, कोरिया येथील एक बहीण निराश झाली नाही तेव्हा त्याचा कोणता चांगला परिणाम झाला?
१४ कोरियात एक बहीण स्टेशनवर ट्रेनची वाट पाहात उभी होती. हेडफोन्सवर संगीत ऐकत असलेल्या एका शाळकरी मुलाशी तिने बोलायला सुरवात केली. तिने त्याला विचारले, “तुझा कोणत्या धर्मावर विश्वास आहे?” त्याने उत्तर दिले, “मी कोणत्याच धर्माला मानत नाही.” त्याचे हे उत्तर ऐकून बहीण निराश झाली नाही. ती त्याला म्हणाली, “कुणाकुणाला कालांतराने धर्मात रस वाटू लागतो आणि ते त्याचा शोध घेऊ लागतात. पण धर्माबद्दल काहीच ज्ञान नसल्यामुळे कधीकधी चुकीची निवड करण्याची शक्यता असते.” हे ऐकून त्या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तो बहिणीचे बोलणे लक्षपूर्वक ऐकू लागला. तिने त्याला तुमची काळजी वाहणारा निर्माणकर्ता अस्तित्वात आहे का? (इंग्रजी) हे पुस्तक दाखवले आणि सांगितले की पुढे कधी त्याला देवाधर्मात आस्था वाटू लागली तर हे पुस्तक त्याला खूपच उपयोगी पडेल. त्याने लगेच तिच्याकडून हे पुस्तक घेतले. पुढच्याच आठवड्यात तो यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करू लागला आणि आता तो सर्व सभांना येतो.
१५. जपान येथे एक शाळकरी मुलगी कशाप्रकारे बायबल अभ्यास सुरू करते आणि तिच्या प्रयत्नांना कशाप्रकारे यश आले आहे?
१५ जपानमध्ये, १२ वर्षांची मेगुमी शाळेलाच आपल्या प्रचाराचे क्षेत्र मानते. तिने कितीतरी बायबल अभ्यास देखील सुरू केले आहेत. मेगुमीला हे कसे जमते? जेवणाच्या सुटीत, ती बायबल वाचते किंवा सभांची तयारी करते तेव्हा बऱ्याचदा तिचे वर्गसोबती तिला याबद्दल विचारतात. काहीजण मेगुमीला विचारतात की शाळेच्या काही विशिष्ट कार्यक्रमांत ती भाग का घेत नाही. मेगुमी त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देते. जेव्हा ती त्यांना सांगते, की देवालाही नाव आहे तेव्हा बऱ्याच जणांना कुतूहल वाटते. मग ती त्यांना बायबल अभ्यास करण्याचे सुचवते. सध्या मेगुमी २० बायबल अभ्यास चालवते—यांपैकी १८ तिचे वर्गसोबतीच आहेत.
१६. काही लोकांनी मिळून एका बांधवाची थट्टा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो बांधव कशाप्रकारे त्यांच्याचपैकी काही जणांसोबत बायबल अभ्यास सुरू करू शकला?
१६ कॅमरूनमध्ये एका साइटवर काम करणाऱ्या आठ जणांनी, जवळच उभे राहून रस्त्यावरून जाणाऱ्यांना बायबलची पुस्तके देत असलेल्या एक बांधवाला हाक मारली. त्याला हैराण करण्याच्या उद्देशाने ते त्रैक्य, नरक, आत्म्याचे अमरत्व इत्यादी विषयांवर उलटसुलट प्रश्न विचारू लागले. आपल्या बांधवाने बायबलमधून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. परिणाम असा झाला, की त्यांपैकी तिघांनी बायबल अभ्यास सुरू केला. डॅनियल नावाच्या एकाने तर सर्व सभांना यायला सुरवात केली आणि त्याच्याजवळ जादूटोण्याशी संबंधित असलेल्या ज्या वस्तू होत्या त्या सर्व त्याने नष्ट केल्या. (प्रकटीकरण २१:८) एका वर्षाच्या आत त्याचा बाप्तिस्मा झाला.
१७. सुरवातीला राज्य संदेश ऐकण्यास इच्छुक नसलेल्या एका माणसाला एल सॅल्व्हाडोर येथे काही भावांनी कशाप्रकारे चातुर्याने प्रचार केला?
१७ एल सॅल्व्हाडोर येथे राहणारा एक माणूस यहोवाचे साक्षीदार येताना दिसले, की लगेच आपल्या भयानक कुत्र्याला दाराजवळ बांधून ठेवायचा. मग साक्षीदार पुढे गेले की तो कुत्र्याला घरात आणायचा. त्यामुळे बांधवांना या माणसाशी बोलण्याची संधीच मिळाली नाही. एकदा त्यांना एक युक्ती सुचली. त्यांना माहीत होते की तो माणूस आतच आहे आणि दारात उभे राहून बोलले तर त्याला ऐकू येईल, त्यामुळे त्यांनी कुत्र्यालाच संदेश सांगण्याचे ठरवले. ते दाराजवळ आले, कुत्र्याला आपली ओळख करून दिली आणि त्याच्याशी बोलण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पृथ्वीवर कशाप्रकारे सुखाचा काळ येणार आहे आणि त्या काळात कोणीही कोणाचा राग करणार नाही—एवढेच काय, तर प्राणी देखील शांतीने राहतील असे त्यांनी कुत्र्याला सांगितले.
मग त्याचा निरोप घेऊन ते जाऊ लागले. तेवढ्यात, त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला कारण तो माणूस घरातून बाहेर आला आणि त्यांना कधीच बोलण्याची संधी न दिल्याबद्दल त्याने चक्क क्षमा मागितली. बांधवांनी दिलेली मासिके देखील त्याने स्वीकारली. त्याच्यासोबत बायबल अभ्यास सुरू करण्यात आला. तो माणूस आज आपला भाऊ आहे—‘मोलवान वस्तूंपैकी’ एक!“भिऊ नका”
१८. बरेच ख्रिस्ती कशाप्रकारच्या अडथळ्यांना तोंड देतात पण यहोवा आपल्या उपासकांना कोणत्या नजरेने पाहतो?
१८ राज्य प्रचाराच्या आणि शिष्य बनवण्याच्या महत्त्वपूर्ण कार्यात तुम्ही सहभाग घेत आहात का? हा खरोखरच एक सन्मान आहे. कारण याच कार्याच्या माध्यमाने यहोवा सर्व “मोलवान वस्तू” आपल्या मंदिरात आणत आहे. (योहान ६:४४) अर्थात, कधीकधी तुम्हाला थकल्यासारखे किंवा निरुत्साही वाटेल. काहींना, आपण यहोवाची सेवा करण्याच्या लायकच नाही असे वाटू लागते; कधीकधी, यहोवाच्या काही विश्वासू सेवकांना देखील अशाप्रकारच्या नकारात्मक भावना सतावू लागतात. पण निराश होऊ नका! यहोवाच्या नजरेत त्याची उपासना करणारा प्रत्येकजण मोलवान आहे आणि तुमचे तारण व्हावे असे त्याला मनापासून वाटते.—२ पेत्र ३:९.
१९. यहोवाने हाग्गय संदेष्ट्याद्वारे कोणते प्रोत्साहन दिले आणि या शब्दांतून आपल्याला कसा दिलासा मिळतो?
१९ होणाऱ्या विरोधामुळे किंवा इतर त्रासदायक परिस्थितींमुळे जेव्हा आपल्याला निरुत्साही वाटू लागते तेव्हा मायदेशी परतणाऱ्या यहुद्यांना यहोवाने काय म्हटले होते याची आठवण केल्यास, आपली हिम्मत वाढेल. हाग्गय २:४-६ येथे आपण असे वाचतो: “हे जरुब्बाबेला, हिम्मत धर, असे परमेश्वर म्हणतो; हे मुख्य याजका, यहोसादाकाच्या पुत्रा यहोशवा, हिम्मत धर; परमेश्वर म्हणतो, देशातल्या सर्व रहिवाशांनो, हिम्मत धरा व कामास लागा; मी तुम्हाबरोबर आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही मिसर देशातून निघाला तेव्हा तुम्हाबरोबर केलेला करार कायम आहे व माझा आत्मा तुमच्या ठायी कायम आहे; तुम्ही भिऊ नका. कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, आणखी एकदा लवकरच मी आकाश व पृथ्वी, समुद्र व कोरडी जमीन, ही हालवून सोडीन.” यहोवा केवळ आपल्याला हिम्मत धरण्याचे उत्तेजनच देत नाही तर स्वतः आपल्याला साहाय्य करण्याचे आश्वासनही देतो. कशाप्रकारे? “मी तुम्हाबरोबर आहे,” असे म्हणून तो आपल्याला दिलासा देतो. आपल्यासमोर कोणत्याही प्रकारचे अडथळे आले तरीसुद्धा यहोवा आपल्याबरोबर आहे याचा आपण विचार करतो तेव्हा आपला विश्वास आपोआपच बळकट होत नाही का?—रोमकर ८:३१.
२०. यहोवाचे मंदिर अभूतपूर्व वैभवाने कशाप्रकारे भरत आहे?
२० यहोवाने शाबीत केले आहे की तो आपल्या लोकांच्या पाठीशी आहे. आपला संदेष्टा हाग्गय याच्याद्वारे त्याने हेच सांगितले: “या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो; मी या स्थळाला शांति देईन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.” (हाग्गय २:९) आणि खरोखरच यहोवाचे आत्मिक मंदिर आज अभूतपूर्व वैभवाने भरले आहे. दर वर्षी, लाखो लोक खऱ्या उपासनेकडे वळत आहेत. या लोकांना आत्मिक अन्न देऊन तृप्त केले जात आहे आणि या संकटग्रस्त जगातही त्यांना अशी अद्भुत शांती लाभली आहे, की केवळ देवाच्या नव्या जगात मिळणार असलेली शांती यापेक्षा श्रेष्ठ असू शकते.—यशया ९:६, ७; लूक १२:४२.
२१. आपण कोणता निर्धार केला पाहिजे?
२१ हर्मगिदोनात यहोवा सर्व राष्ट्रांना हालवून सोडेल, ती वेळ अगदी उंबरठ्यावर आहे. (प्रकटीकरण १६:१४, १६) तेव्हा, उरलेल्या वेळात होईल तितक्या लोकांना त्यांचे जीवन वाचवण्यासाठी मदत करण्याचा आपण निर्धार करू या. हिम्मत धरून यहोवावर पूर्ण भरवसा ठेवू या. आणि कार्य पूर्ण झाले आहे, असे जोपर्यंत यहोवा सांगत नाही तोपर्यंत त्याच्या महान आत्मिक मंदिरात उपासना करत राहण्याचा आणि आणखी “मोलवान वस्तू” त्यात आणण्याचा आपला दृढसंकल्प कायम ठेवू या.
[तळटीपा]
^ परि. 4 शलमोनाच्या मंदिराच्या बांधकामासाठी देणगी म्हणून देण्यात आलेला निधी हा सध्याच्या चलनानुसार जवळजवळ ४० अब्ज डॉलर इतका भरला असता. या निधीतून जे धन बांधकामासाठी उपयोगात आणण्यात आले नाही, ते मंदिराच्या भांडारात ठेवण्यात आले.—१ राजे ७:५१.
^ परि. 10 इस्राएलच्या मुख्य याजकाप्रमाणे येशूला स्वतःच्या पापांसाठी प्रायश्चित्त करण्याची गरज नव्हती. पण त्याच्या सहयाजकांना पापमय मनुष्यजातीतून विकत घेण्यात आले असल्यामुळे त्यांच्याठायी पाप होतेच.—प्रकटीकरण ५:९, १०.
^ परि. 11 टेहळणी बुरूजचा फेब्रुवारी १५, १९९८ अंकातील पृष्ठे १७-२२ पाहा.
तुम्हाला आठवते का?
• यहोवाच्या नजरेत भौतिक वस्तूंपेक्षा अधिक मोलवान काय आहे?
• येशूने सांडलेल्या रक्तामुळे कोणत्या दोन गटांच्या लोकांना लाभ मिळतो?
• यहोवाच्या मंदिराला वैभवाने भरणाऱ्या “मोलवान वस्तू” हे कोणाच्या संदर्भात म्हटले आहे?
• हाग्गयाची भविष्यवाणी आज पूर्ण होत आहे याला काय पुरावा आहे?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१६ पानांवरील रेखाचित्र]
(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)
यहोवाचे प्राचीन मंदिर कशाचे प्रतीक होते हे तुम्हाला माहीत आहे का?
परमपवित्र स्थान
पडदा
पवित्र स्थान
वेदी
देवडी
अंगण
[१७ पानांवरील चित्र]
मुख्य याजक इस्राएलातील याजकांच्या पापांच्या प्रायश्चित्तासाठी एक गोऱ्हा आणि याजक नसलेल्या इतर गोत्रांच्या प्रायश्चित्तासाठी एक बकरा अर्पण करत असे
[१८ पानांवरील चित्र]
जगभरात चाललेल्या राज्य प्रचाराच्या कार्यामुळे लाखो लोक यहोवाच्या मंदिरात येत आहेत