व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एका आईचा सुज्ञ सल्ला

एका आईचा सुज्ञ सल्ला

एका आईचा सुज्ञ सल्ला

“माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नको.”—नीतिसूत्रे १:८.

पालक अर्थात आई व वडील हे दोघेही आपल्या मुलांना उत्तम प्रोत्साहन, आधार आणि सल्ला देतात. नीतिसूत्रे या बायबलमधील पुस्तकात लमुएल नावाच्या एका तरुण राजाचा वृत्तान्त आहे; त्याला त्याच्या आईने काही ‘भारदस्त वचने शिकवली.’ ही वचने नीतिसूत्राच्या ३१ व्या अध्यायात नमूद केली आहेत. या आईच्या सुज्ञ सल्ल्याचा फायदा आपल्यालाही होऊ शकतो.—नीतिसूत्रे ३१:१, पं.र.भा.

राजाला साजेसा सल्ला

लमुएलाच्या आईने सुरवातीला अनेक प्रश्‍न विचारले आहेत आणि त्या प्रश्‍नांनी आपलीही उत्सुकता वाढते; ते प्रश्‍न आहेत: “माझ्या मुला, मी काय सांगू? माझ्या पोटच्या मुला, मी काय सांगू? माझ्या नवसाच्या मुला, मी काय सांगू?” तिने तीनदा केलेल्या एकाच प्रश्‍नावरून आपल्या मुलाने आपल्या वचनांकडे लक्ष द्यावे याची तिला केवढी काळजी आहे हे स्पष्ट होते. (नीतिसूत्रे ३१:२) आपल्या मुलाच्या आध्यात्मिक हिताविषयी तिने दाखवलेली चिंता आजच्या ख्रिस्ती पालकांसाठी एक उत्तम उदाहरण आहे.

चैनबाजी आणि बाहेरख्यालीपणा अर्थात नेहमीच्या भाषेत म्हणतात त्याप्रमाणे बाई आणि बाटली यापेक्षा एका आईला आपल्या मुलाविषयी आणखी कोणती चिंता असू शकते? लमुएलाची आई सरळ मुद्याचे बोलली; ती म्हणाली: “तू आपले बल स्त्रियांना देऊ नको.” स्वैराचारी वर्तनामुळे “राजांचा नाश” होतो असे ती म्हणते.—नीतिसूत्रे ३१:३, पं.र.भा.

दारूबाजीकडेही कानाडोळा केलेला नाही. ती इशारा देते की, “हे लमुएला, द्राक्षारस पिणे राजांस शोभत नाही, राजांस ते नाही शोभत.” दारूच्या नशेत सतत धुंद असलेला राजा योग्य आणि विचारपूर्वक न्याय कसा देणार? तसेच, तो “धर्मशास्त्र विसरून पीडलेल्यांचा न्याय विपरीत” करणार नाही हे कशावरून?—नीतिसूत्रे ३१:४-७.

उलट, अशा दुर्व्यसनांपासून अलिप्त राहणारा राजा ‘धर्माने न्याय करील आणि गरीब व कंगाल यांस न्याय मिळवून देईल.’—नीतिसूत्रे ३१:८, ९.

आजकालचे ख्रिस्ती तरुण ‘राजे’ नसले, तरी लमुएलाच्या आईने दिलेला सुज्ञ सल्ला त्यांच्याकरताही अगदी समयोचित आहे. आजकालच्या तरुणांमध्ये दारूबाजी, तंबाखूचा वापर आणि लैंगिक अनैतिकता सर्रास आढळून येते. त्यामुळे, ख्रिस्ती तरुणांच्या पालकांनी त्यांना “भारदस्त वचने” ऐकवली तर त्यांनी ती लक्षपूर्वक ऐकावीत हे अत्यंत जरूरीचे आहे.

सद्‌गुणी स्त्री

लग्नाचे वय झालेल्या आपल्या मुलाविषयी कोणत्याही आईला काळजी असणारच. लमुएलच्या आईने पुढे आदर्श पत्नीच्या गुणांविषयी सांगितले. या महत्त्वाच्या विषयावर कोणा स्त्रीच्या दृष्टिकोनातून विचार केल्याने एखाद्या तरुणाला निश्‍चितच पुष्कळ फायदा होऊ शकतो.

दहाव्या वचनात, ‘सद्‌गुणी स्त्रीची’ तुलना दुर्मिळ आणि मोलवान मोत्यांशी केली आहे; बायबल समयात असे मोती मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागत होती. त्याचप्रमाणे, सद्‌गुणी स्त्री शोधायलाही मेहनत करावी लागते. लग्नासाठी उगाच घाई करण्याऐवजी एका तरुणाने पुरेसा वेळ देऊन योग्य निवड करावी. असे केल्यास, त्याला सापडलेला मोलवान खजिना त्याला अधिकच प्रिय वाटेल.

सद्‌गुणी स्त्रीविषयी लमुएलला सांगण्यात येते: “तिच्या पतीचे मन तिजवर भरवसा ठेविते.” (वचन ११) दुसऱ्‍या शब्दांत, पतीने प्रत्येक मामल्यात आपल्या पत्नीने आपल्याकडून संमती घ्यावी असा अट्टाहास धरू नये. अर्थात, मोठी खरेदी किंवा मुलांच्या संगोपनासारखे महत्त्वाचे निर्णय घेताना नवरा-बायकोने नेहमी एकमेकांशी सल्लामसलत केली पाहिजे. या बाबतीत नवरा-बायकोत दळणवळण असल्यास त्यांच्यात जवळीक निर्माण होते.

सद्‌गुणी स्त्री कधीच रिकामी बसत नाही. १३ ते २७ वचनांमध्ये काही सूचना दिल्या आहेत. आपल्या कुटुंबाचे हित पाहणाऱ्‍या कोणत्याही वयोगटातल्या पत्नींसाठी त्या उपयुक्‍त ठरू शकतात. उदाहरणार्थ, कपड्यांचा आणि घरातल्या सजावटीचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे, सद्‌गुणी स्त्री स्वतःच्याच हातांनी काही करून किंवा काटकसरीपणा दाखवून आपल्या कुटुंबातल्या लोकांना कशाचीही कमी पडू देत नाही आणि घर नीटनेटके दिसेल याची काळजी घेते. (वचने १३, १९, २१, २२) रोजच्या जेवणखाण्याचा जास्त खर्च होऊ नये म्हणून जमेल तितका भाजीपाला घरच्या घरीच उगवते आणि खरेदीच्या बाबतीतही ती चोखंदळ असते.—वचने १४, १६.

या सगळ्यावरून हे स्पष्ट होते की, सद्‌गुणी स्त्री “आळशी बसून अन्‍न खात नाही.” ती मेहनती आहे आणि आपले घर नीट चालवते. (वचन २७) ती “बलरूप पट्ट्याने आपली कंबर बांधिते” म्हणजेच अवघड कामे करायलाही तयार असते. (वचन १७) आपल्या कामाला ती भल्या पहाटेच सुरवात करते आणि रात्री उशिरापर्यंत परिश्रम करत राहते. जणू तिचा दिवा कधी मालवतच नाही.—वचने १५, १८.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सद्‌गुणी स्त्री आध्यात्मिक वृत्तीची आहे. ती देवाला भिऊन वागते आणि त्याच्याबद्दल तिच्या मनात गाढ आदर आणि श्रद्धा आहे. (वचन ३०) आपल्या मुलांनीही असेच वागावे म्हणून त्यांना शिक्षण देण्यात ती आपल्या पतीला सहकार्य करते. २६ व्या वचनात म्हटले आहे: “सुज्ञतेचे बोल” बोलून ती आपल्या मुलांना शिकवते आणि “तिच्या जिव्हेच्या ठायी दयेचे शिक्षण असते.”

सद्‌गुणी पती

सद्‌गुणी स्त्री मिळवण्याकरता लमुएलला सद्‌गुणी पतीच्या जबाबदाऱ्‍या पूर्ण कराव्या लागतील. अशा अनेक जबाबदाऱ्‍यांविषयी लमुएलची आई त्याला आठवण करून देते.

अशा सद्‌गुणी पतीबद्दल ‘देशाच्या वडील मंडळीचे’ चांगले मत असेल. (नीतिसूत्रे ३१:२३) याचाच अर्थ, तो कर्तबगार, इमानदार, विश्‍वासू आणि देवाला भिऊन वागणारा असायला हवा. (निर्गम १८:२१; अनुवाद १६:१८-२०) असा पती “वेशीत . . . ओळखिता येतो”; येथेच शहरातले व्यवहार पार पाडण्यासाठी वडीलजन जमत असत. देवाला भिऊन वागणारी व्यक्‍ती अशी ‘ओळख’ असणे म्हणजे तो समजूतदार आणि ‘देशातल्या’ (म्हणजेच, कदाचित प्रांतातल्या किंवा एखाद्या भागातल्या) वडील जनांना सहकार्य देणारा असायला हवा.

आपल्या भावी पत्नीबद्दल कदर आहे हे दाखवणे महत्त्वाचे आहे याची आठवण लमुएलाची आई त्याला करून देते; ती निश्‍चितच स्वतःच्या अनुभवातून त्याला हे सांगत असावी. एखाद्या पतीला आपल्या पत्नीशिवाय इतर कोणतीही व्यक्‍ती प्रिय असू शकत नाही. म्हणून, “बहुत स्त्रियांनी सद्‌गुण दाखविले आहेत, पण तू त्या सर्वांहून वरचढ आहेस” असे तो म्हणतो तेव्हा तिच्याबद्दल त्याला केवढी प्रीती असेल याची कल्पना करा.—नीतिसूत्रे ३१:२९.

लमुएलाने आपल्या आईच्या सुज्ञ सल्ल्याबद्दल कदर व्यक्‍त केली हे स्पष्टच आहे. उदाहरणार्थ, पहिल्या वचनात त्याने आपल्या आईची वचने स्वतःचीच वचने असल्याचे म्हटले आहे. अशाप्रकारे, तिची ‘शिकवण’ त्याने पाळली आणि तिने दिलेल्या सल्ल्याचा त्याला फायदा झाला. या ‘भारदस्त वचनातील’ तत्त्वे आपल्या जीवनात लागू करून आपणही त्यातून लाभ मिळवू या.

[३१ पानांवरील चित्रे]

सद्‌गुणी स्त्री “आळशी बसून अन्‍न खात नाही”