व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तारण देणाऱ्‍या देवाच्या ठायी उल्लास करा

तारण देणाऱ्‍या देवाच्या ठायी उल्लास करा

तारण देणाऱ्‍या देवाच्या ठायी उल्लास करा

“मी परमेश्‍वराच्या ठायी हर्ष पावेन, मला तारण देणाऱ्‍या देवाविषयी मी उल्लास करीन.”—हबक्कूक ३:१८.

१. सा.यु.पू. ५३९ साली बॅबिलोनचे पतन होण्याआधी दानीएलाला कोणता दृष्टान्त दिसला?

बॅबिलोनचा नाश होण्याच्या, म्हणजेच सा.यु.पू. ५३९ च्या दहा अधिक वर्षांआधी, वृद्ध झालेल्या दानीएल संदेष्ट्याला एक अतिशय थरारक दृष्टान्त दिसला. या दृष्टान्तात, यहोवाचे शत्रू आणि त्याचा नियुक्‍त राजा येशू ख्रिस्त यांच्यामध्ये होणाऱ्‍या शेवटल्या लढाईपर्यंत अनेक जागतिक उलाढाली होण्याविषयी भाकीत केले होते. या दृष्टान्ताचा दानीएलावर काय परिणाम झाला? तो म्हणतो: “तेव्हा मज दानीएलाला मूर्च्छा आली व . . . हा दृष्टांत पाहून मी विस्मित झालो.”—दानीएल ८:२७.

२. दानीएलाला दृष्टान्तात कोणती लढाई होताना दिसली, आणि ती लढाई अगदी जवळ आलेली पाहून तुमची काय प्रतिक्रिया आहे?

आपल्याबद्दल काय? दानीएलाच्या काळानंतर कितीतरी शतके उलटून गेली आहेत! दानीएलाने दृष्टान्तात पाहिलेली लढाई, अर्थात देवाची हर्मगिदोनाची लढाई अगदी जवळ आलेली पाहून आपल्याला कसे वाटते? हबक्कूकच्या भविष्यवाणीत स्पष्ट शब्दांत वर्णन केलेली दुष्टाई सबंध पृथ्वीवर आज कळसाला पोचली आहे आणि त्यामुळे देवाच्या शत्रूंचा नाश आता अटळ आहे हेच यावरून सूचित होते. तेव्हा, आपली काय प्रतिक्रिया आहे? हबक्कूकने त्याच्या भविष्यवाणीच्या पुस्तकातील तिसऱ्‍या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणेच कदाचित आपल्याही भावना असतील.

हबक्कूक देवाकडे दयेची याचना करतो

३. हबक्कूकने कोणाच्या वतीने प्रार्थना केली आणि त्याचे शब्द आज आपल्याकरता इतके का अर्थपूर्ण आहेत?

हबक्कूकच्या ३ ऱ्‍या अध्यायात एक प्रार्थना आहे. पहिल्या वचनात सांगितल्याप्रमाणे, हे एक क्षोभस्तोत्र म्हणजे शोक किंवा दुःख व्यक्‍त करण्यासाठी गायलेले गीत आहेत. संदेष्टा हबक्कूक स्वतःसाठी ही प्रार्थना करत आहे असे हा अध्याय वाचताना वाटते. पण खरे पाहता, हबक्कूकने देवाच्या निवडलेल्या राष्ट्राच्या वतीने ही प्रार्थना केली. आज त्याच्या प्रार्थनेतले शब्द, राज्याच्या प्रचाराचे कार्य पार पाडत असलेल्या देवाच्या लोकांसाठी अतिशय अर्थपूर्ण आहेत. या दृष्टिकोनातून हबक्कूकचा तिसरा अध्याय वाचताना, आपल्याला जवळ आलेल्या भयंकर संकटाची तीव्र जाणीव होते, पण त्यासोबतच आपले मन आनंदाने भरून येते. कारण हबक्कूकची प्रार्थना किंवा क्षोभस्तोत्र आपल्याला आपला तारणकर्ता, यहोवा याच्याठायी उल्लास करण्याची प्रेरणा देते.

४. हबक्कूक का भयभीत झाला आणि यहोवा आपल्या अद्‌भुत सामर्थ्याचा कशाप्रकारे वापर करील याची आपण खात्री बाळगू शकतो?

याआधीच्या दोन लेखांत आपण पाहिल्याप्रमाणे हबक्कूकच्या काळात यहुदा राष्ट्रात अतिशय वाईट परिस्थिती होती. पण देवाने ही परिस्थिती तशीच राहू दिली नाही. इतिहासात पूर्वीही केल्याप्रमाणे, त्याने या परिस्थितीला जबाबदार असणाऱ्‍यांवर न्यायदंड आणण्याचे ठरवले. म्हणूनच हबक्कूकने आक्रोश केला: “हे परमेश्‍वरा, मी तुझी कीर्ती ऐकून भयभीत झालो आहे.” हबक्कूकच्या या शब्दांचा काय अर्थ होतो? ‘परमेश्‍वराची कीर्ती’ म्हणजे देवाच्या महत्कृत्यांविषयी, उदाहरणार्थ तांबड्या समुद्रात, इस्राएलांच्या अरण्यवासात आणि यरीहो येथे देवाने केलेल्या चमत्कारांविषयी लिहून ठेवलेला इतिहास. हबक्कूकला देवाच्या या महत्कृत्यांविषयी माहीत होते आणि त्यांविषयी विचार करून तो भयभीत झाला कारण यहोवा पुन्हा एकदा अद्‌भुत सामर्थ्याचा वापर करून आपल्या शत्रूंना नष्ट करील हे त्याला ठाऊक होते. आज आपणही आपल्या सभोवती, सर्वत्र दुष्टाई माजलेली पाहतो, आणि प्राचीन काळाप्रमाणे आपल्या काळातही देव दुष्टांचा नाश करील हे आपल्याला माहीत आहे. त्या नाशाचा विचार केल्यावर आपल्याला भीती वाटते का? होय, साहजिकच! पण आपण हबक्कूकने केली त्याप्रमाणेच प्रार्थना करतो: “हे परमेश्‍वरा, वर्षाचा क्रम चालू असता आपल्या कामाचे पुनर्जीवन कर. वर्षाचा क्रम चालू असता ते प्रगट कर, क्रोधातही दया स्मर.” (हबक्कूक ३:२) देवाच्या नियुक्‍त वेळी “वर्षाचा क्रम चालू असता,” त्याने आपले चमत्कारिक सामर्थ्य प्रगट करावे आणि तेव्हा त्याच्यावर प्रीती करणाऱ्‍यांवर त्याने दया दाखवावी अशी आपण त्याला प्रार्थना करतो!

यहोवा पराक्रम करण्यास निघाला आहे!

५. कोणत्या अर्थाने “देव तेमानाहून येत आहे” आणि यावरून हर्मगिदोनाच्या संबंधाने काय सूचित होते?

यहोवा आपल्या दयेची याचना ऐकेल तेव्हा काय घडेल? याचे उत्तर आपल्याला हबक्कूक ३:३, ४ येथे मिळते. सर्वप्रथम, हबक्कूक म्हणतो: “देव तेमानाहून येत आहे, पवित्र प्रभु पारानाच्या पर्वतावरून येत आहे.” भविष्यवक्‍ता मोशे याच्या काळात इस्राएली लोक अरण्यातून कनानच्या दिशेने जात असताना वाटेत तेमान आणि पारान ही दोन ठिकाणे होती. एकेक पल्ला गाठत, इस्राएलचे मोठे राष्ट्र वाग्दत्त देशाकडे जात होते तेव्हा जणू यहोवा देव स्वतः पराक्रम करण्यास निघाला आहे असे भासत होते; कोणीही त्याचा मार्ग अडवू शकत नव्हता. मोशेचा मृत्यू होण्याच्या काही काळाआधीच तो म्हणाला: “परमेश्‍वर सीनायहून आला. सेईरावरून आमच्यावर उदय पावला; पारान पर्वतावरून तो प्रगटला; लक्षावधि पवित्रांच्यामधून [देवदूतांच्यामधून] तो आला.” (अनुवाद ३३:२) हर्मगिदोनात जेव्हा यहोवा त्याच्या शत्रूंवर विजय मिळवण्यास निघेल तेव्हा त्याचे अजिंक्य सामर्थ्य अशाच प्रकारे प्रगट होईल.

६. यहोवाच्या तेजाशिवाय ख्रिस्ती आणखी कशाकडे लक्ष देतात?

हबक्कूक पुढे म्हणतो: “त्याचा प्रकाश आकाश व्यापितो. त्याच्या स्तवनांनी पृथ्वी भरली आहे. त्याचे तेज प्रकाशासारखे आहे.” केवढे नेत्रदीपक दृश्‍य असेल ते! म्हणूनच यहोवा देवाला पाहिल्यास मनुष्य जिवंत राहणार नाही असे म्हटले आहे. (निर्गम ३३:२०) सांकेतिक अर्थाने देवाचे विश्‍वासू सेवक जेव्हा त्याच्या तेजस्वीपणाचा विचार करतात तेव्हा त्यांचे अंतःचक्षू दिपतात. (इफिसकर १:१८) पण, यहोवाच्या तेजाशिवाय ख्रिस्ती आणखी कशाकडे लक्ष देतात? हबक्कूक ३:४ च्या शेवटी असे म्हटले आहे, “त्याच्या हातातून किरण निघत आहेत; त्याचा पराक्रम तेथे गुप्त आहे.” होय, यहोवा पराक्रम करण्यास, आपल्या उजव्या हाताने सामर्थ्य आणि बळ प्रगट करण्यास तयार आहे हे आपण पाहू शकतो.

७. देव पराक्रम करण्यास निघाला आहे, यामुळे त्याच्याविरुद्ध बंड करणाऱ्‍यांवर काय परिणाम होईल?

यहोवा पराक्रम करण्यास निघाला आहे आणि त्याच्याविरुद्ध विद्रोह करणाऱ्‍यांना तो लवकरच नष्ट करेल. हबक्कूक ३:५ यात म्हटले आहे: “मरी त्याच्यापुढे चालते, जळते इंगळ त्याच्या पायांजवळ निघतात.” सा.यु.पू. १४७३ साली इस्राएली लोक वाग्दत्त देशाच्या अगदी जवळ आल्यानंतर त्यांच्यापैकी अनेकांनी देवाच्या नियमांना न जुमानता अनैतिकता आणि मूर्तिपूजा यांत भाग घेतला. यामुळे, २०,००० पेक्षा जास्त इस्राएली देवाने पाठवलेल्या मरीने मृत्युमुखी पडले. (गणना २५:१-९) निकट भविष्यात ‘सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी’ यहोवा निघेल तेव्हा त्याच्याविरोधात जाणाऱ्‍यांना त्यांच्या पापांची शिक्षा भोगावी लागेल. काहीतर खरोखर जीवघेण्या साथींमुळे दगावतील.—प्रकटीकरण १६:१४, १६.

८. हबक्कूक ३:६ यानुसार देवाच्या शत्रूंचे काय भवितव्य आहे?

आता भविष्यवक्‍ता हबक्कूक सेनाधीश यहोवाच्या पराक्रमांचे कसे जिवंत वर्णन करतो ते ऐका. हबक्कूक ३:६ येथे असे म्हटले आहे: “तो उभा राहिला म्हणजे पृथ्वी हेलकावे खाते; तो नजर टाकून राष्ट्रांस उधळून लावितो. सर्वकाळचे पर्वत विदीर्ण होतात, युगानुयुगीचे डोंगर ढासळतात, त्याचा हा पूर्वकाळापासून प्रघात आहे.” सुरवातीला यहोवा रणभूमीचे परीक्षण करत असलेल्या सेनापतीसारखा केवळ ‘उभा राहतो.’ एवढ्यातच त्याचे शत्रू भीतीने कापू लागतात. आपण कोणाविरुद्ध लढत आहोत हे पाहिल्यावर त्यांची भीतीने गाळण उडते. येशूनेही अशा काळाविषयी सांगितले होते जेव्हा “पृथ्वीवरील सर्व जातीचे लोक शोक करितील.” (मत्तय २४:३०) पण, यहोवाविरुद्ध कोणीही विजयी होऊ शकत नाही याची त्यांना जाणीव होईपर्यंत खूप उशीर झालेला असेल. मनुष्याच्या वेगवेगळ्या संस्था, ज्या लोकांना ‘सर्वकाळच्या पर्वतांप्रमाणे’ आणि ‘युगानुयुगीच्या डोंगरांप्रमाणे’ अविचल वाटतात त्यासुद्धा कोलमडून पडतील. हे ‘परमेश्‍वराच्या पूर्वकाळापासूनच्या प्रघाताप्रमाणे’ असेल, अर्थात प्राचीन काळी केल्याप्रमाणे देव आपले सामर्थ्य प्रगट करेल.

९, १०. हबक्कूक ३:७-११ या वचनांतून आपल्याला कशाची आठवण होते?

आपल्या शत्रूंवर यहोवाचा “राग पेटला आहे.” त्या भयंकर लढाईत यहोवा कोणत्या शस्त्रांचा उपयोग करेल? भविष्यवक्‍ता हबक्कूक त्यांचे असे वर्णन करतो: “तुझे धनुष्य गवसणीबाहेर निघाले आहे. तू आपल्या शपथपूर्वक वचनाप्रमाणे शिक्षा केली आहे. तू पृथ्वी विदारून नद्या वाहवितोस. पर्वत तुला पाहून विवळतात; जलप्रवाह सपाट्याने चालला आहे, डोह आपला शब्द उच्चारितो, आपले हात वर करितो. तुझे बाण सुटत असता त्यांच्या प्रकाशाने, तुझ्या झळकणाऱ्‍या भाल्याच्या चकाकीने, सूर्य व चंद्र आपल्या स्थानी निश्‍चल झाले आहेत.”—हबक्कूक ३:७-११.

१० यहोशवाच्या काळात यहोवाने आपल्या सामर्थ्याचे अद्‌भुत प्रदर्शन दाखवून सूर्य आणि चंद्र यांना स्थिरावले होते. (यहोशवा १०:१२-१४) हबक्कूकची भविष्यवाणी आपल्याला आठवण करून देते की हर्मगिदोनात यहोवा पुन्हा एकदा तशाचप्रकारे आपले सामर्थ्य प्रकट करेल. सा.यु.पू. १५१३ साली यहोवाने फारोच्या सैन्याला तांबड्या समुद्रात बुडवून महासागरांवरही आपले नियंत्रण असल्याचे प्रगट केले होते. त्यानंतर चाळीस वर्षांनी यहोवाने दुथडी भरून वाहणाऱ्‍या यार्देन नदीचे पाणी आटवले आणि वाग्दत्त देशाकडे जाणारे सर्व इस्राएल लोक तिला पार करून गेले. (यहोशवा ३:१५-१७) संदेशहारिका दबोरा हिच्या काळात इस्राएलचा शत्रू सिसेरा याचे रथ पुरात वाहून गेले. (शास्ते ५:२१) प्राचीन काळाप्रमाणे हर्मगिदोनातही पूर, मुसळधार वृष्टी आणि महासागरे यांची विनाशकारी शक्‍ती यहोवाच्या नियंत्रणात असेल. मेघगर्जना आणि चमकणाऱ्‍या विजा देखील भाल्याप्रमाणे किंवा बाणांप्रमाणे त्याच्या हातात असतील.

११. यहोवा आपले महान सामर्थ्य प्रगट करील तेव्हा काय घडेल?

११ यहोवा आपल्या महासामर्थ्याचा प्रताप दाखवेल तेव्हा खरोखर पृथ्वीवर भीतीदायक परिस्थिती असेल. हबक्कूकच्या शब्दांवरून असे सूचित होते की त्यावेळी रात्रीचा दिवस होईल आणि दिवस सूर्यापेक्षाही प्रकाशमान होईल. हर्मगिदोनाचे वर्णन करणारी ही देवप्रेरित भविष्यवाणी अक्षरार्थ आहे किंवा सांकेतिक आहे हे येणारा काळच सांगेल, पण एक गोष्ट मात्र निश्‍चित आहे—विजय यहोवाचाच होईल आणि एकही शत्रू त्याच्या हातून निसटून जाऊ शकणार नाही.

देवाच्या लोकांचे तारण निश्‍चित!

१२. देव त्याच्या शत्रूंना काय शिक्षा देईल पण कोणाचा बचाव होईल?

१२ यहोवा आपल्या शत्रूंचा कसा नाश करतो याचे संदेष्टा हबक्कूक पुढे वर्णन करतो. हबक्कूक ३:१२ येथे असे सांगितले आहे: “तू संतापून पृथ्वीवर चालतोस, तू आपल्या क्रोधाने राष्ट्रांस तुडवून टाकितोस.” पण यहोवा सर्वांचाच नाश करणार नाही. काही मनुष्यांचा बचाव केला जाईल. हबक्कूक ३:१३ यात म्हटले आहे, “तू आपल्या लोकांच्या सुटकेसाठी निघाला आहेस. आपल्या अभिषिक्‍ताच्या सुटकेसाठी निघाला आहेस.” होय, यहोवा आपल्या विश्‍वासू अभिषिक्‍त सेवकांचे रक्षण करेल. तेव्हा मोठ्या बाबेलचा अर्थात, खोट्या धर्मांच्या जागतिक साम्राज्याचा नाश पूर्ण होईल. आज राष्ट्रांकडून शुद्ध उपासनेचे नामोनिशाण मिटवून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. लवकरच मागोगचा गोग यहोवाच्या सेवकांवर हल्ला करेल. (यहेज्केल ३८:१–३९:१३; प्रकटीकरण १७:१-५, १६-१८) त्यांचा नाश करण्यात सैतानाला यश येईल का? नाही! यहोवा त्यावेळी आपल्या शत्रूंना क्रोधाने पायाखाली तुडवेल. धान्याची कणसे जशी पायाखाली तुडवतात त्याप्रमाणे तो त्यांना तुडवेल. पण, जे आत्म्याने आणि खरेपणाने त्याची उपासना करतात त्यांचा मात्र तो बचाव करेल.—योहान ४:२४.

१३. हबक्कूक ३:१३ यात दिलेल्या भविष्यवाणीची कशाप्रकारे पूर्णता होईल?

१३ दुष्टांच्या संपूर्ण विनाशाचे वर्णन हबक्कूकच्या पुढच्या शब्दांत केले आहे: “तू दुर्जनाचे घर पायापासून मानेपर्यंत उघडे करितोस, त्याच्या शिराचे आपटून तुकडे करितोस.” (हबक्कूक ३:१३) दुर्जनाचे “घर” म्हणजे दियाबल सैतानाच्या प्रभावाखाली अस्तित्वात आलेली जगीक व्यवस्था. तिचे तुकडे तुकडे केले जातील. “त्याच्या शिराचे,” अर्थात देवाचा विरोध करणाऱ्‍या नेत्यांना चिरडून टाकले जाईल. या सबंध व्यवस्थेचा पायाच ढासळेल, आणि शेवटी ती कोलमडून पडेल. तिचे अस्तित्व नाहीसे होईल. दुष्टाईच्या विळख्यातून कायमची सुटका होणे आपल्यासाठी किती आनंददायक असेल!

१४-१६. हबक्कूक ३:१४, १५ या वचनांत यहोवाच्या लोकांबद्दल व त्यांच्या शत्रूंबद्दल काय भाकीत केले आहे?

१४ यहोवाच्या ‘अभिषिक्‍ताचा’ नाश करण्याचा प्रयत्न करणारे हर्मगिदोनात गोंधळून जातील. हबक्कूक ३:१४, १५ यानुसार हबक्कूक देवाला असे म्हणतो: “त्याच्या सरदारांचे शीर तू ज्याच्यात्याच्याच भाल्यांनी विंधितोस; माझा चुराडा करण्यासाठी ते मजवर तुफानासारखे लोटले; गरिबांस गुप्तरूपे गिळावे यातच त्यांस संतोष वाटतो. तू आपले घोडे समुद्रातून, महाजलांच्या राशीवरून चालवितोस.”

१५ “माझा चुराडा करण्यासाठी ते मजवर तुफानासारखे लोटले,” असे म्हणताना भविष्यवक्‍ता हबक्कूक यहोवाच्या अभिषिक्‍त सेवकांच्या वतीने बोलत आहे. दरोडेखोर ज्याप्रमाणे लपून बसतात आणि वाटसरूंवर अचानक हल्ला करतात त्याप्रमाणे सर्व राष्ट्रे यहोवाच्या उपासकांना नष्ट करण्यासाठी त्यांच्यावर जणू तुटून पडतील. देवाच्या आणि त्याच्या लोकांच्या या शत्रूंना मोठा ‘संतोष वाटेल’ कारण आपला विजय होईल याची त्यांना खात्री आहे. विश्‍वासू ख्रिस्ती अगदी दुर्बल आणि ‘गरीब’ आहेत असे भासेल. पण, देवाचा विरोध करणाऱ्‍या शक्‍ती जेव्हा त्याच्या लोकांवर हल्ला करतील तेव्हा यहोवा त्यांच्याच शस्त्रांनी त्यांचा नाश करेल. ते स्वतःच्याच शस्त्रांनी किंवा “भाल्यांनी” आपल्याच योद्धांना मारतील.

१६ पण, निकटच्या भविष्यात आणखी बऱ्‍याच घटना घडणार आहेत. यहोवा आपल्या शत्रूंचा संपूर्ण नाश करण्यासाठी मनुष्यांपेक्षा श्रेष्ठ अशा आत्मिक शक्‍तींचा उपयोग करेल. येशू ख्रिस्ताच्या नेतृत्त्वाखाली त्याच्या स्वर्गीय सैन्याचे ‘घोडे’ एकामागून एक विजय मिळवत, हजारो लाखो दुष्ट मानवांच्या वादळी ‘समुद्रावरून’ आणि “महाजलांच्या राशीवरून” दौडत जातील. (प्रकटीकरण १९:११-२१) दुष्टांना या पृथ्वीवरून कायमचे नष्ट केले जाईल. देवाच्या शक्‍तीचे आणि न्यायाचे ते किती थरारक प्रदर्शन असेल!

यहोवाचा दिवस जवळ येत आहे!

१७. (अ) हबक्कूकचे शब्द पूर्ण होतील याविषयी आपण का खात्री बाळगू शकतो? (ब) यहोवाच्या मोठ्या दिवसाची वाट पाहात असताना आपण हबक्कूकचे कोणत्याप्रकारे अनुकरण करू शकतो?

१७ हबक्कूकचे शब्द लवकरच पूर्ण होतील याची आपण खातरी बाळगू शकतो. विलंब लागणार नाही. भविष्यातल्या घटनांविषयी मिळालेल्या या आगाऊ सूचनेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? हबक्कूक देवाच्या प्रेरणेने लिहीत होता, हे विसरू नका. यहोवा आपले सामर्थ्य जरूर प्रकट करेल. आणि तेव्हा या पृथ्वीवर हाहाकार माजेल. म्हणूनच भविष्यवक्‍ता हबक्कूक याने लिहिले: “मी हे ऐकले तो माझे काळीज थरथरले, त्याच्या आवाजाने माझे ओठ कापले; माझी हाडे सडू लागली; माझे पाय लटपटत आहेत; ज्या दिवशी लोकांवर हल्ला करणारा येईल, त्या संकटाच्या दिवसाची मला वाट पाहिली पाहिजे.” (हबक्कूक ३:१६) माझे काळीज थरथरले असे हबक्कूक का म्हणतो हे समजण्याजोगे आहे. पण त्याचा विश्‍वास डगमगला का? मुळीच नाही! यहोवाच्या महान दिवसाची धीराने वाट पाहायला तो तयार होता. (२ पेत्र ३:११, १२) आपली देखील हीच मनोवृत्ती नाही का? निश्‍चितच! हबक्कूकची भविष्यवाणी अवश्‍य पूर्ण होईल. पण, तोपर्यंत आपण धीराने वाट पाहू.

१८. कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागेल याची जाणीव असूनही हबक्कूकची मनोवृत्ती कशी होती?

१८ कोणत्याही लढाईच्या वेळेस कठीण परिस्थिती येते, फक्‍त हारणाऱ्‍यांवरच नाही तर जिंकणाऱ्‍यांवरही. अन्‍नपाण्याची दाणादाण, मालमत्तेचे नुकसान, निकृष्ट राहणीमान यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. आज आपल्याला यांपैकी कोणत्या समस्येला तोंड द्यावे लागले, तर आपली प्रतिक्रिया काय असेल? हबक्कूकने आपल्यापुढे चांगले उदाहरण ठेवले, तो म्हणाला: “अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्‍न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यांतील कळप नाहीतसे झाले, व गोठ्यांत गुरेढोरे न उरली, तरी मी परमेश्‍वराच्या ठायी हर्ष पावेन, मला तारण देणाऱ्‍या देवाविषयी मी उल्लास करीन.” (हबक्कूक ३:१७, १८) कठीण परिस्थितीला, कदाचित दुष्काळाला तोंड द्यावे लागेल याची हबक्कूकला जाणीव होती. पण, तरीसुद्धा यहोवाच्या ठायी हर्ष करण्याचे त्याने सोडले नाही कारण तो तारण देणारा देव आहे हे त्याला ठाऊक होते.

१९. अनेक ख्रिस्ती बांधवांना कोणत्या कठीण परिस्थितींना तोंड द्यावे लागते, पण आपण यहोवाला आपल्या जीवनात प्राधान्य दिले तर आपण कशाची खातरी बाळगू शकतो?

१९ आज यहोवाची दुष्टांविरुद्धची लढाई सुरू होण्याआधी देखील बऱ्‍याच जणांना अतिशय दुःखदायक परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. येशूने भाकीत केले होते, जेव्हा तो आपल्या राज्याच्या गौरवात येईल तेव्हा युद्धे, दुष्काळ, भूकंप आणि रोगराई यांसारख्या गोष्टी त्याच्या ‘येण्याच्या [‘उपस्थितीच्या,’ NW] चिन्हांत’ सामील असतील. (मत्तय २४:३-१४; लूक २१:१०, ११) बऱ्‍याच देशांत येशूच्या या भाकिताप्रमाणेच घडत आहे आणि त्यामुळे आपले अनेक बांधव अतिशय कठीण परिस्थितींना तोंड देत आहेत. भविष्यात इतर बांधवांनाही अशाच कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागू शकते. अंत येण्याआधी कदाचित ‘अंजिराचे झाड न फुलण्याचा’ अनुभव आपल्यापैकी बऱ्‍याचजणांना येईल. पण हे सर्व का घडत आहे हे माहीत असल्यामुळे आपल्याला धैर्य मिळते. शिवाय, आपण निराधार नाही. येशूने आश्‍वासन दिले: “तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्‍याहि सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.” (मत्तय ६:३३) अर्थात, आपण ऐषारामात राहू याचे हे आश्‍वासन नाही; याचा असा अर्थ होतो, की आपण यहोवाला आपल्या जीवनात प्राधान्य दिले, तर तो आपली अवश्‍य काळजी घेईल.—स्तोत्र ३७:२५.

२०. सध्या समस्यांना तोंड द्यावे लागले तरीसुद्धा आपण काय संकल्प केला पाहिजे?

२० सध्या आपल्याला कोणत्याही कठीण समस्यांना तोंड द्यावे लागले तरी या समस्या शेवटी तात्पुरत्या आहेत याची जाणीव ठेवून, यहोवा आपल्याला सोडवण्यास समर्थ आहे हे आपण कधीही विसरू नये. आफ्रिका, पूर्व युरोप आणि इतर देशांतल्या आपल्या कित्येक बांधवांना अतिशय कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे, पण तरीसुद्धा ते यहोवाच्या ठायी ‘हर्ष करतात.’ त्यांच्याप्रमाणे आपणही करत राहू या. सार्वभौम प्रभू यहोवा आपल्याला “सामर्थ्य” देतो हे आपण कधीच विसरू नये. (हबक्कूक ३:१९) तो कधीही आपल्याला निराश करणार नाही. हर्मगिदोन अवश्‍य येईल आणि त्यानंतर देवाने आश्‍वासन दिलेले नवे जग देखील. (२ पेत्र ३:१३) तेव्हा “जल समुद्राला व्यापून टाकिते तशी पृथ्वी परमेश्‍वराच्या प्रतापाच्या ज्ञानाने भरेल.” (हबक्कूक २:१४) तो अद्‌भुत काळ येईपर्यंत आपण हबक्कूकच्या उत्तम उदाहरणाचे अनुकरण करत राहू. आपण सदैव आपल्या तारण देणाऱ्‍या परमेश्‍वराच्या ठायी ‘हर्ष व उल्लास’ करत राहू.

तुम्हाला आठवते का?

• हबक्कूकच्या प्रार्थनेचे शब्द आपल्याकरता कशाप्रकारे अर्थपूर्ण आहेत?

• यहोवा पराक्रम करण्यास का निघाला?

• हबक्कूकच्या भविष्यवाणीत तारणाविषयी काय सांगितले आहे?

• यहोवाच्या मोठ्या दिवसाची वाट पाहताना आपली मनोवृत्ती कशी असली पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२३ पानांवरील चित्र]

हर्मगिदोनात देव दुष्टांचा नाश करण्याकरता कोणत्या शक्‍तींचा उपयोग करेल हे तुम्हाला माहीत आहे का?