व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दुष्ट आणखी किती काळ राहतील?

दुष्ट आणखी किती काळ राहतील?

दुष्ट आणखी किती काळ राहतील?

“जो आपल्याहून धार्मिक त्यास दुष्ट गिळून टाकितो तेव्हा तू [“यहोवा,” Nw] का उगा राहतोस?”—हबक्कूक १:१३.

१. पृथ्वी यहोवाच्या प्रतापाच्या ज्ञानाने पूर्णपणे केव्हा भरून जाईल?

देव दुष्टांचा कधी नाश करील का? त्यासाठी आपल्याला अजून किती काळ वाट पाहावी लागेल? हे प्रश्‍न सबंध जगातले लोक विचारतात. या प्रश्‍नांची उत्तरे आपल्याला कोठे सापडतील? देवाच्या नियुक्‍त समयाबद्दल त्याने स्वतः प्रेरित केलेल्या भविष्यसूचक वचनांत. त्यांत आपल्याला हे आश्‍वासन मिळते की लवकरच यहोवा सर्व दुष्टांचा नायनाट करील. दुष्टांचा नाश झाल्यावरच, “जल समुद्राला व्यापून टाकिते तशी पृथ्वी परमेश्‍वराच्या प्रतापाच्या ज्ञानाने भरेल.” देवाच्या पवित्र वचनात हबक्कूक २:१४ मध्ये लिहिलेल्या भविष्यवाणीतून आपल्याला हे आश्‍वासन मिळते.

२. हबक्कूकच्या पुस्तकात कोणत्या तीन न्यायदंडांविषयी सांगण्यात आले आहे?

सा.यु.पू. ६२८ च्या सुमारास लिहिलेल्या हबक्कूक या पुस्तकात यहोवा देवाच्या तीन न्यायदंडांविषयी वाचायला मिळते. या तीनपैकी दोन न्यायदंड यापूर्वीच बजावण्यात आले आहेत. पहिला, प्राचीन काळातील यहूदा या स्वैराचारी राष्ट्रावर आलेला यहोवाचा न्यायदंड होता. आणि दुसरा? दुसरा न्यायदंड देवाने बॅबिलोनच्या अत्याचारी राष्ट्रावर आणला होता. देवाचा तिसरा न्यायदंड देखील निश्‍चितच बजावण्यात येईल याची आपण पूर्ण खातरी बाळगू शकतो. किंबहुना, हे फार लवकर घडणार आहे. या शेवटल्या दिवसांत नीतिमान लोकांच्या बचावासाठी देव सर्व दुष्टांचा नाश करील. अतिशय वेगाने जवळ येत असलेल्या ‘सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाच्या लढाईत’ एकूण एक दुष्टजन मारला जाईल.—प्रकटीकरण १६:१४, १६.

३. आपल्या काळातल्या दुष्टांबद्दल आपण कोणती खातरी बाळगू शकतो?

देवाच्या मोठ्या दिवसाची लढाई फार वेगाने जवळ येत आहे. यहूदा आणि बॅबिलोन या राष्ट्रांचा ज्याप्रकारे देवाने नाश केला त्याचप्रकारे आपल्या या काळातल्या दुष्ट लोकांवर देखील देवाचा न्यायदंड येईल याची आपण पूर्ण खातरी बाळगू शकतो. पण, आता आपण कल्पना करू या की आपण हबक्कूकच्या काळात यहूदा राष्ट्रात वास्तव्य करून आहोत. तेथे कशी परिस्थिती आपल्याला दिसते?

अंधाधुंदी

४. हबक्कूकला कोणती बातमी ऐकून धक्का बसतो?

संध्याकाळची वेळ आहे. थंड वारा वाहत आहे. यहोवाचा संदेष्टा हबक्कूक आपल्या घराच्या सपाट छतावर बसला आहे. बाजूला त्याचे तंतूवाद्य आहे. (हबक्कूक १:१; ३:१९, टीप) अचानक त्याला धक्कादायक बातमी ऐकावयास मिळते. यहूदाचा राजा यहोयाकिम याने उरिया संदेष्ट्याला जिवे मारून त्याचे शव साधारण लोकांच्या कबरेत टाकून दिले आहे. (यिर्मया २६:२३) हे खरे आहे, की उरियाने देखील देवावर पूर्ण विश्‍वास ठेवला नव्हता, उलट भयभीत होऊन तो मिसर देशात पळून गेला होता. पण यहोयाकीम राजाने काही यहोवा देवाचा सन्मान व्हावा म्हणून उरियाचा घात केला अशातला भाग नाही, हे हबक्कूकला माहीत आहे. कारण राजा यहोयाकिमला देवाच्या नियमाबद्दल जराही आदर नव्हता; शिवाय यिर्मया संदेष्ट्याचा आणि यहोवाची सेवा करणाऱ्‍या इतरांचाही तो द्वेष करत असे.

५. यहूदा राष्ट्राची आध्यात्मिक स्थिती कशी आहे आणि यावर हबक्कूकची प्रतिक्रिया काय आहे?

जवळपासच्या घरांवर धूप जाळल्यामुळे निघणारा धूर हबक्कूकला दिसतो. पण लोकांनी यहोवाच्या उपासनेकरता जाळलेला हा धूप नाही. ते लोक खोट्या धार्मिक विधी करण्यात गुंतले आहेत; आणि या खोट्या धार्मिक विधींना यहूदाचा दुष्ट राजा यहोयाकिम यानेच बढावा दिला आहे. ही किती शरमेची गोष्ट आहे! हबक्कूकच्या डोळ्यात पाणी येते, तो यहोवाला कळकळीने प्रार्थना करतो: “हे परमेश्‍वरा, मी किती वेळ ओरडू? तू ऐकत नाहीस. जुलूम झाला असे मी तुला ओरडून सांगतो तरी तू सुटका करीत नाहीस. मला अधर्म का पाहावयास लावितोस? विपत्ति मला का दाखवितोस? लुटालूट व जुलूम माझ्यासमोर आहेत; कलह चालला आहे, वाद उपस्थित झाला आहे. अशाने कायद्याचा अंमल ढिला पडतो, न्यायाचे काहीएक चालत नाही; दुष्ट धार्मिकास घेरून सोडितो म्हणून न्याय विपरीत होतो.”—हबक्कूक १:२-४.

६. यहूदा राष्ट्रातील कायदेकानून आणि न्याय यांविषयी काय म्हणता येईल?

हबक्कूकच्या बोलण्यात कोणती अतिशयोक्‍ती नव्हती. लुटालूट आणि जुलूम खरोखरच सर्वत्र माजला आहे. जेथे नजर टाकावी तेथे कलह, वाद आणि तंटा चालला आहे. ‘कायद्याचा अंमल ढिला पडला आहे,’ अर्थात कायद्याला कोणीही जुमानत नाही. आणि न्याय? त्याचे तर “काहीएक चालत नाही!” त्याचा कधीही विजय होत नाही. उलट “दुष्ट धार्मिकास घेरून सोडितो;” म्हणजेच दुष्ट लोक, निर्दोषाचे संरक्षण करण्यासाठी बनवलेल्या कायद्यालाच हुलकावणी देतात. अशारितीने, “न्याय विपरीत होतो.” न्याय देणाऱ्‍या यंत्रणाच भ्रष्ट झाल्या आहेत. किती दुःखद परिस्थिती!

७. हबक्कूक कशाचा संकल्प करतो?

हबक्कूक या सर्व परिस्थितीचा विचार करतो. या दुःखदायक परिस्थितीमुळे निराश होऊन तो देवाची सेवा सोडून देईल का? निश्‍चितच नाही! देवाच्या विश्‍वासू सेवकांना सोसाव्या लागणाऱ्‍या छळाबद्दल विचार केल्यावर देवाचा हा निष्ठावंत सेवक, कोणत्याही परिस्थितीत यहोवाचे संदेश निर्भयपणे घोषित करत राहण्याचा आणखीनच पक्का निर्धार करतो. अगदी मृत्यूला सामोरे जावे लागले तरीसुद्धा, देवाचा संदेश घोषित करत राहण्याचा हबक्कूक संकल्प करतो.

यहोवा एक आश्‍चर्यकारक “कार्य” करतो

८, ९. विश्‍वास बसणार नाही असे कोणते “कार्य” यहोवा करत आहे?

दृष्टान्तात हबक्कूक खोट्या धर्मांत गुंतलेल्या आणि देवाचा अनादर करत असलेल्या लोकांना पाहतो. यहोवा त्या लोकांना उद्देशून म्हणतो: “राष्ट्रांनो, लक्ष देऊन पाहा व आश्‍चर्यचकित व्हा.” देव या दुष्ट लोकांना असे का म्हणतो, असा कदाचित हबक्कूकलाही प्रश्‍न पडला असेल. पण मग, यहोवा त्या लोकांना उद्देशून असे म्हणतो: “तुमच्या काळी मी एक कार्य करितो, तुम्हास सांगितले तरी तुम्ही विश्‍वास धरणार नाही.” (हबक्कूक १:५) पण ज्यावर त्यांचा विश्‍वास बसणार नाही असे हे कोणते “कार्य” आहे?

हबक्कूक लक्ष देऊन यहोवाचे पुढचे शब्द ऐकतो; आपल्याला ते हबक्कूक १:६-११ येथे वाचायला मिळतात. यहोवाचे हे शब्द निश्‍चित पूर्ण होतील; कोणतेही खोटे देवदेवता किंवा निर्जीव मूर्ती यात बाधा आणू शकत नाहीत. यहोवाचा हा संदेश आहे: “पाहा, मी खास्द्यांची उठावणी करितो; ते उग्र व उतावळे राष्ट्र आहे; जी स्थले त्यांची नाहीत त्यांचा ताबा घ्यावा म्हणून ते पृथ्वीवर फिरत असतात. ते दारुण व भयंकर आहेत; त्यांचा न्याय व त्यांचे वैभव त्यांचे स्वतःचेच आहे. त्यांचे घोडे चित्त्यांहून वेगवान आहेत व संध्याकाळी बाहेर पडणाऱ्‍या लांडग्यांपेक्षा क्रूर आहेत; त्यांचे घोडेस्वार दौड करितात [“जमिनीवर खूर आपटतात,” NW], त्यांचे घोडेस्वार दुरून येतात, खाऊन टाकण्यास त्वरा करणाऱ्‍या गरुडासारखे ते धावतात. ते बलात्कार करण्यास सर्व मिळून येतात; त्यांच्या तोंडांचा रोख थेट पुढे असतो; वाळूच्या कणांप्रमाणे ते बंदिवान गोळा करितात. तो तर राजांस कसपट समजतो व अधिपतींस कवडीमोल मानितो; कोणताहि किल्ला असला तरी तो तृणवत्‌ गणतो. मातीचा ढीग रचून किल्ला सर करितो. शेवटी सोसाट्याचा वारा येऊन तो उडून जाईल, स्वपराक्रम हाच ज्याचा देव त्यावर दोष येईल [“आमचे सामर्थ्य आमच्या दैवतापासून आहे असा दावा ते करतात,” सुबोध भाषांतर].”

१०. न्याय करण्याकरता यहोवा कोणाचा उपयोग करणार आहे?

१० या भविष्यवाणीतून सर्वसत्ताधारी देव खरे तर स्पष्ट ताकीद देतो! तो खास्द्यांना, बॅबिलोनच्या निर्दय राष्ट्राला यहूदा राष्ट्राविरुद्ध उभे करणार आहे. हे निर्दय राष्ट्र ‘पृथ्वीवर फिरून’ अनेक वस्त्या लुटेल. तो किती भयंकर विध्वंस असेल! कारण शत्रूंच्या तोंडचे पाणी पळवणारे खास्द्यांचे सैन्य अतिशय “दारुण व भयंकर” आहे. त्यांचे कायदेकानून कठोर आहेत. ‘त्यांचा न्याय त्यांचा स्वतःचाच आहे.’

११. यहूदा राष्ट्रावर बॅबिलोनी सैन्याच्या आक्रमणाचे तुम्ही कसे वर्णन कराल?

११ बॅबिलोनचे घोडे चपळ चित्त्यांपेक्षा वेगवान आहेत. त्यांच्या सैन्यातील घोडेस्वार संध्याकाळी शिकारीसाठी बाहेर पडणाऱ्‍या लांडग्यांपेक्षा क्रूर आहेत. दौड करण्यास अधीर होऊन ते ‘जमिनीवर खूर आपटतात.’ बॅबिलोनपासून थेट यहूदापर्यंत ते वेगाने दौडतात. गरूडांनी आपले आवडते भक्ष्य पाहून त्वरेने त्याकडे झेप घ्यावी त्याप्रमाणे हे खास्दी आता लवकरच आपल्या सावजावर झडप घालणार आहेत. ही सर्वसामान्य चढाई असेल का, एखाद्या छोट्याशा सैन्याने केलेल्या आक्रमणासारखी असेल का? नाही! “ते बलात्कार [हिंसाचार] करण्यास सर्व मिळून येतात.” त्यांचे प्रचंड मोठे सैन्य शत्रूंना सळो की पळो करून सोडते. उत्साहाने व उमेदीने त्यांचे चेहरे तेजस्वी दिसतात; पश्‍चिमेकडे असलेल्या यहूदा व येरूशलेमच्या दिशेने ते पूर्वेकडच्या वाऱ्‍याच्या वेगाने पुढे सरसावत आहेत. असंख्य सैनिकांना कैदी बनवून नेणारे बॅबिलोनी सैनिक जणू “वाळूच्या कणांप्रमाणे बंदिवान गोळा करतात.”

१२. बॅबिलोनी लोकांची कशी मनोवृत्ती आहे आणि या भयंकर शत्रूराष्ट्रावर कशाप्रकारे “दोष येईल?”

१२ खास्दी सैनिक राजामहाराजांचा उपहास करतात, उच्च अधिपतींना ते तुच्छ लेखतात; हे राजे, अधिपती, किंवा कोणीही त्यांची निरंतर आगेकूच अडवू शकत नाहीत. ‘कोणताही किल्ला असला तरी [ते] तृणवत गणतात,’ कारण कितीही कठीण गड असला तरी बॅबिलोनी सैनिक, “मातीचा ढीग रचून” त्यावर हल्ला करून तो सहज सर करतात. यहोवाच्या नियुक्‍त वेळी हे भयंकर शत्रूसैन्य ‘सोसाट्याच्या वाऱ्‍याप्रमाणे’ सरसावेल. ते यहूदा आणि यरूशलेमवर आक्रमण करील आणि अशारितीने देवाच्या लोकांना हानी केल्याबद्दल “त्यावर दोष येईल.” झंझावाती विजय मिळवल्यावर खास्द्यांचा सेनापती छाती काढून म्हणेल: ‘आमचे सामर्थ्य आमच्या दैवतापासून आहे.’ पण, त्याचा हा समज किती चुकीचा आहे याची त्याला कल्पना नाही!

आशा बाळगण्याचे खरे कारण

१३. हबक्कूकच्या मनात आशा आणि विश्‍वास का निर्माण होतो?

१३ यहोवाचा उद्देश आणखीन चांगल्याप्रकारे समजून घेतल्यावर हबक्कूकच्या मनात आशा जागी झाली. पूर्ण विश्‍वासाने तो यहोवाची स्तुती करतो. हबक्कूक १:१२ (मराठी कॉमन लँग्वेज) येथे सांगितल्याप्रमाणे संदेष्टा हबक्कूक म्हणतो: “हे प्रभू, माझ्या देवा, माझ्या पवित्र प्रभू, तू अनादिकालापासून आहेस, नाही का? तू अनंत आहेस.” खरोखर, यहोवा “अनादिकालापासून अनंतकालापर्यंत” अर्थात सदासर्वदासाठी देव आहे.—स्तोत्र ९०:१, २.

१४. यहूदाच्या धर्मत्यागी मेंढपाळांनी काय केले?

१४ देवाने दिलेल्या दृष्टान्तावर विचार केल्यावर आणि त्याचा अर्थ समजल्यावर आनंदातिशयाने संदेष्टा हबक्कूक पुढे म्हणतो: “हे दुर्गा, त्याचे शासन व्हावे म्हणून तू त्यास स्थापिले आहे.” देवाच्या नजरेत यहूदाचे धर्मत्यागी लोक दोषी आहेत; त्यांना यहोवाकडून ताडन, किंवा कडक शासन मिळणार आहे. खरे तर त्यांनी केवळ यहोवालाच आपला दुर्ग, आश्रय आणि तारणकर्ता मानून त्याच्यावरच पूर्ण भिस्त ठेवायची होती. (स्तोत्र ६२:७; ९४:२२; ९५:१) पण, यहूदाचे धर्मत्यागी मेंढपाळ देवाचा आश्रय घेण्याऐवजी त्याच्या शांतिप्रिय उपासकांवर अत्याचार करत राहतात.

१५. “तुझे डोळे इतके पवित्र आहेत की दुष्टता तुझ्याने पाहवत नाही,” असे यहोवाच्या बाबतीत कोणत्या अर्थाने म्हणता येते?

१५ ही परिस्थिती पाहून यहोवाचा संदेष्टा हबक्कूक अतिशय दुःखी होतो आणि म्हणतो: “तुझे डोळे इतके पवित्र आहेत की दुष्टता तुझ्याने पाहवत नाही, अनाचाराकडे दृष्टि लाववत नाही.” (हबक्कूक १:१३) होय, यहोवा ‘इतका पवित्र आहे की दुष्टता त्याच्याने पाहवत नाही,’ अर्थात, तो दुष्टाई कायम चालू देणार नाही.

१६. हबक्कूक १:१३-१७ येथे दिलेल्या वृत्तान्ताचा आपल्या शब्दांत सारांश सांगा.

१६ त्यामुळे हबक्कूकच्या मनात काही प्रश्‍न येतात आणि हे प्रश्‍न आपल्यालाही विचार करायला भाग पाडतात. तो विचारतो: “तू या बेईमानी करणाऱ्‍यांकडे का पाहत राहतोस? जो आपल्याहून धार्मिक त्यास दुष्ट गिळून टाकितो तेव्हा तू का उगा राहतोस? तू मानवांस समुद्रातील माशांप्रमाणे का केले आहे, कोणी शास्ता नसलेल्या जीवजंतूंप्रमाणे त्यांना का केले आहे? तो त्या सर्वांस गळाने उचलितो, त्यांस आपल्या जाळ्यात धरितो, आपला पाग टाकून त्यांस गोळा करितो; यामुळे तो हर्षित व आनंदित होतो; तो आपल्या जाळ्यापुढे यज्ञ करितो, आपल्या पागाला धूप दाखवितो; कारण त्यांपासून त्याला विपुल धन व पुष्टिकारक अन्‍न मिळते. तर मग तो आपले भरलेले जाळे रिकामे करून राष्ट्रांची काहीएक गय न करिता त्यांचा सतत घात करीत राहील काय?”—हबक्कूक १:१३-१७.

१७. (अ) यहूदा आणि जेरुसलेम या त्याच्या राजधानीवर बॅबिलोनी सैन्याने आक्रमण केल्यामुळे कशाप्रकारे यहोवाचा उद्देश पूर्ण होतो? (ब) यहोवा पुढे हबक्कूकला काय सांगणार आहे?

१७ यहूदावर आणि जेरुसलेम या त्याच्या राजधानीवर आक्रमण करताना बॅबिलोनी सैन्य मन मानेल तसा विध्वंस करतील. देव आपल्या माध्यमाने एका अविश्‍वासू राष्ट्रावर न्यायदंड बजावत आहे हे त्यांना कळणार नाही. हे निर्दयी खास्दी लोक यहोवाचे उपासक नाहीत. त्यांच्या नजरेत माणसे ‘माशांप्रमाणे आणि जीवजंतूंप्रमाणे’ आहेत; त्यांना केवळ आपल्या शत्रूवर विजय मिळवून त्यांच्यावर जुलूम करणे माहीत आहे. म्हणून, हबक्कूकलाही ही गोष्ट समजायला कठीण वाटते की शेवटी देव आपला न्यायदंड बजावण्यासाठी दुष्ट बॅबिलोनी लोकांचा उपयोग का करत आहे. पण लवकरच हबक्कूकला त्याच्या प्रश्‍नांचे उत्तर मिळेल. यहोवा लवकरच आपल्या संदेष्ट्याला सत्य प्रगट करील; आणि ते म्हणजे, बॅबिलोनी लोकांना त्यांचा जाचजुलूम, लुटालूट आणि भयंकर रक्‍तपात यासाठी शिक्षा भोगावीच लागेल.—हबक्कूक २:८.

यहोवाचे पुढचे शब्द ऐकायला तयार

१८. हबक्कूक २:१ या वचनाप्रमाणे, हबक्कूकच्या मनोवृत्तीवरून आपण काय शिकू शकतो?

१८ आता यहोवा आणखी काय सांगतो हे ऐकायला हबक्कूक थांबून आहे. तो ठाम निश्‍चयाने म्हणतो: “मी आपल्या पहाऱ्‍यावर उभा राहीन, किल्ल्यावर पहारा करीन; तो मजबरोबर काय बोलेल आणि माझ्या गाऱ्‍हाण्याविषयी त्यास मला काय उत्तर देता येईल ते मी पाहीन.” (हबक्कूक २:१) आपल्या माध्यमाने यहोवा आणखी काय कळवणार आहे हे जाणून घ्यायला संदेष्टा हबक्कूक अतिशय उत्सुक आहे. देव दुष्टाईला खपवून घेत नाही असा विश्‍वास असल्यामुळे, अद्याप दुष्टाई का अस्तित्वात आहे हे त्याला कळत नाही पण तो आपल्या विचारसरणीत बदल करायला तयार आहे. आपल्याबद्दल काय? विशिष्ट दुष्ट कृत्ये का घडतात, ही दुष्ट कृत्ये करणाऱ्‍यांना शिक्षा का दिली जात नाही असा विचार आपल्याही मनात येत असेल; पण, यहोवा देव नीतिप्रिय आहे यावर जर आपण पूर्ण विश्‍वास ठेवला तर समतोल दृष्टिकोन बाळगून त्याच्या न्यायाची वाट पाहणे आपल्याला जास्त सोपे जाईल.—स्तोत्र ४२:५, ११.

१९. हबक्कूकला देवाने सांगितल्याप्रमाणे स्वैराचारी यहुद्यांना काय भोगावे लागले?

१९ हबक्कूकला सांगितल्याप्रमाणे, देवाने बॅबिलोनी सैन्यांना यहूदा राष्ट्रावर स्वारी करू दिली आणि अशाप्रकारे स्वैराचारी यहुदी राष्ट्रावर आपला न्यायदंड बजावला. सा.यु.पू. ६०७ साली बॅबिलोनी सैन्यांनी जेरूसलेमचा नाश केला, शहरातील लहान मोठ्या सगळ्यांची कत्तल केली आणि कित्येकांना बंदिवान करून नेले. (२ इतिहास ३६:१७-२०) बॅबिलोनमध्ये बराच काळ बंदिवासात राहिल्यानंतर विश्‍वासू यहुदी लोकांपैकी शेषजन आपल्या मायदेशी परतले आणि त्यांनी देवाचे मंदिर पुन्हा बांधले. कालांतराने, यहुदी लोकांनी पुन्हा यहोवा देवाला सोडून दिले—विशेष म्हणजे त्यांनी येशूचा मशीहा म्हणून स्वीकार केला नाही.

२०. येशूचा अव्हेर करण्याच्या परिणामांविषयी सांगताना पौलाने हबक्कूक १:५ या वचनाचा कसा उपयोग केला?

२० प्रेषितांची कृत्ये १३:३८-४१ यात सांगितल्यानुसार, येशूचा धिक्कार करण्याचा आणि त्याच्या खंडणी बलिदानाचे मोल न जाणण्याचा काय परिणाम होईल हे प्रेषित पौलाने अंतुखियाच्या यहुद्यांना स्पष्ट करून सांगितले. ग्रीक सेप्ट्युजिन्ट भाषांतरातून हबक्कूक १:५ हे वचन उद्धृत करून पौलाने इशारा दिला: “सावध राहा, नाहीतर संदेष्ट्याच्या ग्रंथात जे सांगितलेले आहे ते तुम्हावर येईल. ‘अहो धिक्कार करणाऱ्‍यांनो, पाहा, आश्‍चर्य करा व नाहीसे व्हा, कारण तुमच्या काळात मी एक कार्य करितो, ते कार्य असे की, त्याविषयी तुम्हाला कोणी सविस्तर सांगितले तरी तुम्ही विश्‍वास ठेवणारच नाही.’” पौलाने ताकीद दिल्यानुसार, सा.यु. ७० साली जेव्हा रोमी सैन्यांनी जेरूसलेम शहराचा आणि मंदिराचा नाश केला तेव्हा हबक्कूक १:५ या वचनाची दुसऱ्‍यांदा पूर्णता झाली.

२१. बॅबिलोनी लोकांच्या हातून जेरुसलेमचा नाश घडवून आणण्याच्या देवाच्या ‘कार्याविषयी’ हबक्कूकच्या काळातील यहुद्यांचा कसा दृष्टिकोन होता?

२१ बॅबिलोनी लोकांकडून जेरूसलेमचा नाश करण्याचे देवाचे “कार्य” हबक्कूकच्या काळातील यहुद्यांच्या दृष्टिकोनातून अगदी अशक्यप्राय होते; कारण जेरुसलेम यहोवाच्या उपासनेचे केंद्रस्थान होते आणि यहोवाच्या अभिषिक्‍त राजाची ही राजधानी होती. (स्तोत्र १३२:११-१८) शिवाय, यापूर्वी जेरुसलेमचा कधीही नाश झाला नव्हता. त्यात असलेल्या मंदिराला यापूर्वी कधीही आग लागली नव्हती. दाविदाची राजधानी यापूर्वी कधीही जमीनदोस्त झाली नव्हती. यहोवा हे सर्व घडू देईल असा विचार स्वप्नातही खरा वाटला नसता. पण, हबक्कूककडून देवाने या सर्व भयंकर घटनांची पुरेशी ताकीद दिली. आणि भाकीत केल्यानुसार या सर्व घटना घडल्या याला इतिहास साक्ष आहे.

आपल्या काळातील देवाचे आश्‍चर्यकारक “कार्य”

२२. आपल्या काळात यहोवा कोणते आश्‍चर्यकारक “कार्य” करणार आहे?

२२ आपल्या काळातही यहोवा एक आश्‍चर्यकारक “कार्य” करणार आहे का? निश्‍चितच. शंकेखोर लोकांना हे अगदीच आश्‍चर्यकारक वाटते, पण तुम्ही याबद्दल पूर्ण खात्री बाळगू शकता. आपल्या काळातले यहोवाचे आश्‍चर्यकारक कार्य म्हणजे ख्रिस्ती धर्मजगताचा नाश. प्राचीन काळातल्या यहुदा राष्ट्राप्रमाणे ख्रिस्ती धर्मजगताचाही दावा आहे की ते देवाचे उपासक आहेत पण खरे पाहता ते पूर्णपणे भ्रष्ट झाले आहेत. लवकरच ख्रिस्ती धर्मजगताच्या धार्मिक यंत्रणेचे तसेच खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याचे, अर्थात, ‘मोठ्या बाबेलचे’ नामोनिशाण मिटवले जाईल; स्वतः यहोवा याची हमी देतो.—प्रकटीकरण १८:१-२४.

२३. देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने हबक्कूकने काय केले?

२३ सा.यु.पू. ६०७ साली जेरूसलेमचा नाश होण्याआधी यहोवा हबक्कूकला आणखी कार्य नेमणार होता. देव आपल्या या संदेष्ट्याला आणखी काय सांगणार होता? हबक्कूकला ज्या गोष्टी सांगण्यात आल्या त्या ऐकल्यावर तो आपले तंतुवाद्य घेऊन प्रार्थनापूर्वक शोकस्तोत्रे गाऊ लागला. पण त्याआधी देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने हबक्कूकने अतिशय भयंकर अनर्थ घडण्याविषयी घोषित केले. देवाच्या नियुक्‍त काळाच्या संदर्भात सांगितलेल्या या भविष्यसूचक वचनांचा गहन अर्थ जाणून घ्यायला निश्‍चितच आपण सर्व उत्सुक आहोत. तेव्हा, आता हबक्कूकच्या भविष्यवाणीच्या पुढच्या भागाकडे आपण लक्ष देऊ या.

तुम्हाला आठवते का?

• हबक्कूकच्या काळात यहूदा राष्ट्रात कशी परिस्थिती होती?

• हबक्कूकच्या काळात यहोवाने विश्‍वास बसणार नाही असे कोणते “कार्य” केले?

• आशा बाळगण्याचे कोणते खरे कारण हबक्कूकजवळ होते?

• आपल्या काळात यहोवा कोणते आश्‍चर्यकारक “कार्य” करणार आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[९ पानांवरील चित्र]

देव दुष्टाईला का राहू देतो असा हबक्कूकला प्रश्‍न पडला होता. तुम्हालाही असेच वाटते का?

[१० पानांवरील चित्र]

बॅबिलोनी लोकांकडून यहूदाच्या राष्ट्रावर विपत्ती येण्याविषयी हबक्कूकने भाकीत केले होते

[१० पानांवरील चित्र]

सा.यु.पू. ६०७ साली नष्ट झालेल्या जेरुसलेम शहराचे पुरातन अवशेष