प्रयत्नांती . . .
प्रयत्नांती . . .
आजकाल, सातत्याने प्रयत्न करण्याची प्रवृत्ती लोकांमध्ये राहिलेलीच नाही. योग्य स्थान आणि योग्य वेळ यावरच यश अवलंबून असते असे अनेकांना वाटते; त्यांच्या मते सातत्याच्या प्रयत्नाला तितकेसे महत्त्व नाही. अशांना काय बोलणार? प्रसारमाध्यमांच्या जाहिरातींमधून वारंवार हेच भासवले जाते की, कमीत कमी मेहनत करून आणि जरा जास्त पैसा देऊन वाटेल ते प्राप्त करता येते. एका रात्रीत यशस्वी ठरलेल्या लोकांविषयी आणि शाळेतून बाहेर पडल्या पडल्या व्यापारी क्षेत्रात लखपती बनलेल्या मुलांविषयी वृत्तपत्रांमध्ये नेहमीच छापले जाते.
स्तंभलेखक लेनर्ड पिट्स अशा रितीने खेद व्यक्त करतात: “यश अगदी सहजासहजी प्राप्त करता येतं असं अनेकांना वाटतं कारण यश मिळवलेल्या लोकांची खरी कहाणी त्यांना ठाऊक नसते. यश मिळवण्याची युक्ती कळाली किंवा एखाद्याजवळ क्षमता असली किंवा त्याच्यावर देवाची कृपा झाली तर हे कोणालाही जमण्यासारखं आहे असंच भासत असतं.”
सातत्याने प्रयत्न करणे म्हणजे काय?
‘एखादे ध्येय साध्य करताना, एखादी भूमिका निभावताना, एखादे काम पूर्ण करताना अडथळे किंवा अपयश आले तरीही त्यात टिकून राहणे आणि हार न मानणे’ यालाच सातत्याने प्रयत्न करणे म्हणतात. याचा अर्थ, प्रतिकूल परिस्थितीतही नेटाने काम करत राहणे, करारी असणे, निराश न होणे. सातत्याने प्रयत्न करण्याचे महत्त्व बायबलमध्ये दाखवण्यात आले आहे. उदाहरणार्थ, देवाचे वचन असे आर्जवते: ‘पहिल्याने राज्य व नीतिमत्त्व मिळविण्यास झटा,’ “ठोठावत राहा म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल,” ‘प्रार्थनेत टिकून राहा,’ आणि “चांगले ते बळकट धरा.”—मत्तय ६:३३; लूक ११:९, NW; रोमकर १२:१२, पं.र.भा.; १ थेस्सलनीकाकर ५:२१.
नीतिसूत्रे २४:१६ मध्ये (मराठी कॉमन लँग्वेज) म्हटले आहे की, “सज्जन सात वेळा पडला तरी फिरून उठेल.” (तिरपे वळण आमचे.) आपल्या प्रयत्नात अडथळा आला किंवा यश मिळाले नाही तर करारी मनुष्य ‘हार मानण्याऐवजी’ ‘पुन्हा उठतो,’ ‘माघार घेत नाही’ आणि पुन्हा प्रयत्न करतो.
आपल्या प्रगतीमध्ये काही अनिवार्य कारणांमुळे काही अडखळण आले तर त्याला सामोरे जाणे हे सातत्याने प्रयत्न करण्यामध्ये फार महत्त्वाचे आहे.परंतु, पुष्कळजण त्यांच्या वाट्याला येणारे अडथळे आणि अपयश झेलायच्या तयारीत नसतात. सातत्याने प्रयत्न करण्याची इच्छा कधीच राखली नसल्यामुळे ते लागलीच हार मानतात. लेखक मॉर्ली कॉलॉघन म्हणतात, “पुष्कळसे लोक अपयशी ठरल्यावर स्वतःचेच नुकसान करून घेतात. त्यांना स्वतःची कीव वाटू लागते, सगळा दोष ते इतरांवर ढकलतात, राग राग करतात आणि . . . शेवटी हार मानतात.”
ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. पिट्स म्हणतात की, “प्रत्येक परीक्षाप्रसंग झेलण्यामागे एक कारण असते, संकटप्रसंगातूनही काही महत्त्वाचे शिकायला मिळते हे आपण अगदीच विसरून जातो.” ती महत्त्वाची गोष्ट कोणती? ते म्हणतात: “अपयश म्हणजे सगळ्याचा शेवट नव्हे किंवा कायमचा पराजय नव्हे हे शिकायला मिळते. त्यामुळे समज प्राप्त होते. एखाद्याची पुढच्या परीक्षाप्रसंगासाठी तयारी होते.” बायबल असे म्हणते की, “सर्व श्रमांत लाभ आहे.”—नीतिसूत्रे १४:२३.
अर्थात, एकदा अपयशी झाल्यावर पुन्हा प्रयत्न सुरू करणे तितके सोपे नसते. काहीवेळा अशा कठीण आव्हानांना सामोरे जावे लागते की, सर्व प्रयत्न करूनही आपण कधीच त्यांच्यावर मात करू शकणार नाही असे भासते. आपल्या ध्येयांच्या जवळ येण्याऐवजी ती ध्येये आपल्यापासून खूप दूर, दिसेनाशी झाल्यासारखी वाटतात. अशावेळी आपण पार खचून जाऊ शकतो, हे काही आपल्याला जमणार नाही असे वाटू शकते, आपला उत्साह पूर्णतः मालवू शकतो, इतकेच नव्हे तर आपण निराशेच्या खाईत लोटू शकतो. (नीतिसूत्रे २४:१०) तरीही, बायबलमध्ये असे प्रोत्साहन दिले आहे: “चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल.” (तिरपे वळण आमचे.)—गलतीकर ६:९.
सातत्याने प्रयत्न करण्यास कशाने मदत होईल?
एखादे काम सातत्याने करत राहायचे असल्यास पहिली गोष्ट म्हणजे योग्य आणि साध्य करण्याजोगी ध्येये राखणे. प्रेषित पौलाला ही गोष्ट निश्चितच समजली होती. करिंथकरांना तो म्हणाला: ‘मी अनिश्चितपणे धावत नाही. तसेच वाऱ्यावर मुष्टिप्रहार करीत नाही.’ पौलाला ठाऊक होते की, प्रयत्नांचे चीज होण्यासाठी त्याला आपली ध्येये डोळ्यांसमोर स्पष्ट ठेवावी लागतील—धावपटूचे लक्ष जसे अंतिम रेषेवर असते तसेच. “शर्यतीत धावणारे सर्व धावतात पण एकालाच बक्षिस मिळते हे तुम्हाला ठाऊक नाही काय? असे धावा की तुम्हाला ते मिळेल,” असे त्याने आर्जवले. (१ करिंथकर ९:२४, २६) ते कसे शक्य आहे?
नीतिसूत्रे १४:१५ येथे म्हटले आहे: “शहाणा नीट पाहून पाऊल टाकितो.” याच कारणास्तव आपले लक्ष्य काय आहे, आपल्या जीवनात फेरबदल करण्याची काही गरज आहे का, अशाप्रकारे वेळोवेळी आपल्या योजनांचा अंदाज घ्यायला हवा. आपल्याला नेमके काय साध्य करायचे आहे आणि का हे आपल्या मनात स्पष्ट असणे जरूरीचे आहे. आपले अंतिम लक्ष्य आपल्या नजरेसमोर निश्चित असल्यास आपण माघार घेणार नाही. प्रेरित होऊन लिहिलेल्या नीतिसूत्रात म्हटले आहे, “तुझे डोळे नीट पुढे पाहोत” जेणेकरून “तुझे सर्व मार्ग निश्चित” होतील.—नीतिसूत्रे ४:२५, २६.
आपली ध्येये निश्चित केल्यावर ती कशी साध्य करता येतील हे पाहणे पुढचे पाऊल आहे. येशूने प्रश्न केला: “तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरुज बांधावयाची इच्छा असता तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून . . . पाहत नाही?” (लूक १४:२८) या तत्त्वाच्या सुसंगतेत, एका मानसिक आरोग्य तज्ज्ञाने असे म्हटले: “यशस्वी लोकांमध्ये मी एक गोष्ट पाहिली आहे की, कारण आणि परिणाम यांच्यातील संबंधाची त्यांना स्पष्ट समज असते. त्यांना हे कळत असते की, एखादी गोष्ट हवी असल्यास ती प्राप्त करण्यासाठी काहीही करण्याची तयारी असावी लागते.” आपल्याला हवी असलेली गोष्ट प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व पावलांबद्दल स्पष्टपणे समजून घेतल्यामुळे आपली नजर ध्येयावर स्थिर असेल. अशाने, आपल्या मार्गात काही खंड पडला तरी पुन्हा सुरवात करण्यास सोपे जाईल. हीच ऑर्व्हिल आणि विल्बर राईट बंधूंच्या सफलतेची गुरुकिल्ली होती.
यास्तव, आपल्या मार्गात खंड पडल्यामुळे आपण मागे पडतो तेव्हा सकारात्मक विचार करायचा प्रयत्न करा आणि या अनुभवातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळाले असे समजा. परिस्थितीचा नीट विचार करा, नेमके कोठे चुकले ते शोधून काढा आणि नंतर ती चूक सुधारा किंवा त्यावर उपाय शोधा. याविषयी दुसऱ्यांशी बोलल्यानेही मदत होते कारण “प्रत्येक बेत मसलतीने सिद्धीस जातो.” (नीतिसूत्रे २०:१८) आपण प्रयत्न करतो त्या प्रत्येक वेळी आपण अधिक तरबेज आणि कुशल होत असतो. यामुळे सरतेशेवटी सफलता प्राप्त व्हायला हातभार लागतो.
सातत्याने प्रयत्न करण्यामधील तिसरा आवश्यक घटक आहे एकसारखा यत्न. प्रेषित पौलाने असे आर्जवले: “तथापि, आपण जी मजल मारली तिच्याप्रमाणे पुढे चालावे.” (फिलिप्पैकर ३:१६) एका शिक्षकाने म्हटले की, “संतुलन आणि एकसारखा यत्न यांच्यामुळे कालांतराने उत्तम परिणाम हाती लागतात.” कासव आणि सशाची शर्यत या ईसापनीतिच्या कथेत याचे अगदी उत्तमरितीने स्पष्टीकरण करण्यात आले आहे. कासव सशापेक्षा कितीतरी मंद गतीने चालत होते तरी तेच शेवटी जिंकले. का बरे? कारण कासव मध्ये कोठेच थांबले नाही किंवा त्याचे लक्ष इतर ठिकाणी विचलित झाले नाही. आपल्याला जमणार नाही असे समजून त्याने हार मानली नाही; उलट, जमेल त्या गतीने ते चालत राहिले आणि अगदी शेवटच्या रेषेपर्यंत त्याने आपली गती कायम ठेवली. सुव्यवस्थित आणि स्थिर असलेल्या व्यक्तीची प्रगती एकसारखी असल्यामुळे तिचा जोश कायम राहतो आणि म्हणून तिने हार मानण्याची किंवा शर्यतीतून काही कारणास्तव तिला बाहेर टाकले जाण्याची शक्यता कमी असते. होय, “असे धावा” की तुम्हाला आपले लक्ष्य गाठता येईल.
योग्य ध्येयांची निवड
अर्थात, सातत्याने प्रयत्न करण्याचा काही फायदा व्हायचा असेल, तर सार्थक ठरणाऱ्या ध्येयांची निवड करायला हवी. पुष्कळसे लोक अशा गोष्टींमागे लागतात ज्यांमुळे आनंद मिळत नाही. पण बायबल म्हणते की, “जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमांचे निरीक्षण करून ते तसेच करीत राहतो, . . . त्याला आपल्या कार्यांत धन्यता मिळेल.” (याकोब १:२५) होय, बायबलमध्ये दिलेला देवाचा नियम समजून घेण्यासाठी त्याचा अभ्यास करणे हे सार्थक ठरणारे एक ध्येय आहे. ते का? कारण देवाचा नियम त्याच्या परिपूर्ण, नीतिमान दर्जांवर आधारलेला आहे. निर्माणकर्ता या नात्याने आपल्या निर्मितीसाठी काय योग्य आहे याची चांगली जाण त्याच्याशिवाय इतर कोणालाही नाही. म्हणून, देवाच्या सूचनांविषयी जाणून घेण्याचा आणि त्या सूचना जीवनात लागू करण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केल्यास निश्चितच आपल्याला आनंद लाभेल. “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, . . . तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.” असे अभिवचन नीतिसूत्रे ३:५, ६ मध्ये दिले आहे.
शिवाय, देव आणि येशू यांच्याविषयी ज्ञान घेतल्यानेच “सार्वकालिक जीवन” मिळू शकते असे येशू म्हणतो. (योहान १७:३) बायबलमधील भविष्यवाणीनुसार आपण या व्यवस्थीकरणाच्या ‘शेवटल्या काळात’ जगत आहोत हे स्पष्ट आहे. (२ तीमथ्य ३:१-५; मत्तय २४:३-१३) लवकरच, देवाचे राज्य अर्थात त्याचे नीतिमान सरकार पृथ्वीवर राज्य करू लागेल. (दानीएल २:४४; मत्तय ६:१०) या सरकाराद्वारे संपूर्ण आज्ञाधारक मानवजातीसाठी अभूतपूर्व शांती, संपन्नता आणि सौख्यानंदाचा काळ येईल. (स्तोत्र ३७:१०, ११; प्रकटीकरण २१:४) प्रेषितांची कृत्ये १०:३५ मध्ये सांगितले आहे की, “देव पक्षपाती नाही.” होय, सर्व लोक त्याचा लाभ घेऊ शकतात!
बायबल हे बुद्धिमान आणि अर्थपूर्ण गोष्टींनी भरलेले प्राचीन पुस्तक आहे. ते समजून घ्यायला वेळ लागतो, त्यासाठी प्रयत्न करावा लागतो. देवाच्या मदतीने त्याचप्रमाणे त्यामधील ज्ञान प्राप्त करण्याचा सातत्याने प्रयत्न केल्याने आपण त्याची समज मिळवू शकतो. (नीतिसूत्रे २:४, ५; याकोब १:५) हे खरे की, शिकलेल्या गोष्टी आचरणात आणणे फार कठीण आहे. त्यासाठी आपल्या विचारसरणीत किंवा सवयींमध्ये आपल्याला बदल करावे लागतील. बायबलचा अभ्यास करत असल्यामुळे आपल्याला आपल्या हितचिंतक मित्रांकडून किंवा कुटुंबातल्या लोकांकडूनही विरोध होऊ शकतो. म्हणून चिकाटी फार आवश्यक आहे. प्रेषित पौल आपल्याला आठवण करून देतो की, “जे कोणी धीराने सत्कर्मे करीत” राहतील त्यांना देव सार्वकालिक जीवन देईल. (रोमकर २:७) हे ध्येय तुम्हाला साध्य करता यावे म्हणून यहोवाचे साक्षीदार तुमची मदत करतील.
देवाविषयी आणि त्याच्या इच्छेविषयी सातत्याने जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि शिकलेल्या गोष्टी आचरणात आणल्या तर तुम्हाला निश्चित यश मिळेल.—स्तोत्र १:१-३.
[६ पानांवरील चित्र]
देवाविषयी आणि त्याच्या इच्छेविषयी सातत्याने जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला निश्चित यश मिळेल
[४ पानांवरील चित्राचे श्रेय]
Culver Pictures