व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा माझे आश्रयस्थान आणि बळ

यहोवा माझे आश्रयस्थान आणि बळ

जीवन कथा

यहोवा माझे आश्रयस्थान आणि बळ

मार्सल फिलटो यांच्याद्वारे कथित

“त्याच्याशी लग्न करशील तर तुलाही जावं लागेल जेलमध्ये.” मी जिच्याशी लग्न करणार होतो त्या मुलीला लोक असंच म्हणायचे. पण ते असं का म्हणायचे हे मी तुम्हाला सांगतो.

माझा जन्म १९२७ साली झाला तेव्हा कॅनडातील क्विबेक या प्रांतावर कॅथलिक धर्माचा पगडा होता. आम्ही मॉन्ट्रियल या शहरात राहत होतो. माझ्या जन्मानंतर सुमारे चार वर्षांनी सेसिल ड्युफूर नामक यहोवाच्या साक्षीदारांची पूर्ण-वेळेची एक सेविका आमच्या घरी येऊ लागली. त्यामुळे आमच्या शेजाऱ्‍यांकडून तिला सतत धमक्या मिळायच्या. ती बायबलचा संदेश सांगत फिरते म्हणून तिला पुष्कळदा त्रास दिला जायचा, बऱ्‍याचदा अटकही केली जायची. हे पाहून येशूच्या या शब्दांची सत्यता आम्हाला पटली: “माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करितील.”—मत्तय २४:९.

त्या काळात, फ्रेंच-कॅनडियन कुटुंबाने कॅथलिक धर्म त्यागणे म्हणजे अगदी अशक्य कोटीतली गोष्ट होती. त्यामुळे माझे आईवडिल बाप्तिस्माप्राप्त साक्षीदार बनले नाहीत, परंतु त्यांनी हे मान्य केलं की, कॅथलिक चर्चच्या शिकवणी बायबलच्या एकवाक्यतेत नाहीत. म्हणून त्यांनी आम्हा आठ मुलांना यहोवाच्या साक्षीदारांची प्रकाशने वाचायला उत्तेजन दिलं आणि आमच्यापैकी ज्यांनी बायबलचं सत्य स्वीकारलं त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला.

प्रतिकूल परिस्थितीत दृढ उभे राहणे

शाळेत असताना, १९४२ साली, मी बायबलच्या अभ्यासामध्ये रस घेऊ लागलो. त्या वेळी, यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर कॅनडात बंदी होती कारण ते प्रारंभिक ख्रिश्‍चनांचे अनुकरण करून युद्धांमध्ये भाग घेत नव्हते. (यशया २:४; मत्तय २६:५२) दुसरे महायुद्ध तेव्हा जोरात सुरू होते; या युद्धात माझा मोठा भाऊ रोलंड याने शस्त्रास्त्रे घेण्यास नकार दिला म्हणून त्याला एका श्रम छावणीत पाठवले गेले.

त्याच दरम्यान, बाबांनी मला फ्रेंच भाषेत एक पुस्तक दिलं; त्या पुस्तकात अडॉल्फ हिटलरच्या लष्करी कार्यहालचालींमध्ये भाग न घेतल्यामुळे जर्मन साक्षीदारांचा कसा छळ करण्यात आला याचं वर्णन केलं होतं. * ते वाचून मलाही सचोटी टिकवणाऱ्‍या या धाडसी लोकांप्रमाणेच व्हावंसं वाटलं. मग मी यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना जाऊ लागलो; त्यांच्या सभा एका खासगी घरात भरवल्या जात होत्या. लवकरच मलासुद्धा प्रचार कार्यात सहभाग घ्यायला उत्तेजन देण्यात आलं आणि मी तयार झालो. त्या वेळी, मलासुद्धा अटक करून तुरुंगात टाकलं जाऊ शकतं याची मला पूर्ण जाणीव होती.

देवा मला शक्‍ती दे अशी मनातल्या मनात प्रार्थना केल्यावर मी पहिलाच दरवाजा खटखटला. एका स्त्रीने दरवाजा उघडला आणि ती माझं चांगलं ऐकू लागली; ओळख करून दिल्यावर मी २ तीमथ्य ३:१६ यातले शब्द तिला वाचून दाखवले: “प्रत्येक परमेश्‍वरप्रेरित शास्त्रलेख सद्‌बोध . . . ह्‍याकरिता उपयोगी आहे.”

“बायबलविषयी तुम्हाला आणखी शिकून घ्यायला आवडेल का?” मी विचारलं.

“हो, जरूर,” ती म्हणाली.

मग मी तिला सांगितलं, “पुढच्या वेळी मी माझ्या मित्राला घेऊन येईन. त्याला माझ्यापेक्षा बायबलविषयी जास्त ज्ञान आहे.” पुढच्या आठवडी मी तसंच केलं. त्या पहिल्या अनुभवानंतर माझा आत्मविश्‍वास वाढला. त्या अनुभवावरून मला हे शिकायला मिळालं की आपल्याच शक्‍तीनं आपण हे कार्य करू शकत नाही. प्रेषित पौलानं म्हटलं त्याप्रमाणे आपण यहोवाच्या मदतीनं हे कार्य करतो. होय, हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे की, “सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून . . . नाही.”—२ करिंथकर ४:७.

त्यानंतर, प्रचाराचं काम मी नियमित करू लागलो; त्यासोबत पोलिसांनी अटक करून नेणं आणि तुरुंगवास या गोष्टी देखील मला नेहमीच्या वाटू लागल्या. म्हणूनच माझ्या होणाऱ्‍या पत्नीला लोक असं म्हणायचे की, “त्याच्याशी लग्न करशील तर तुलाही जावं लागेल जेलमध्ये”! पण, हे तुरुंगातले अनुभव तसे फार कठीण नव्हते. तुरुंगात एक रात्र काढल्यावर सहसा एखादा साक्षीदार येऊन जामिनावर आम्हाला सोडवत असे.

महत्त्वाचे निर्णय

एप्रिल १९४३ मध्ये मी यहोवाला माझं समर्पण केलं आणि पाण्यात बाप्तिस्मा घेऊन ते चिन्हांकित केलं. मग, ऑगस्ट १९४४ मध्ये मी एका मोठ्या अधिवेशनाला गेलो; माझं पहिलंच अधिवेशन. हे अधिवेशन कॅनडाच्या सीमेजवळच अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमधील बफेलो इथं भरवलं गेलं होतं. तिथं २५,००० लोक जमले होते; अधिवेशनातला कार्यक्रम ऐकल्यावर मला पायनियर (यहोवाच्या साक्षीदारांच्या पूर्ण-वेळेच्या सेवकांना पायनियर म्हणतात) बनावंसं वाटू लागलं. मे १९४५ मध्ये कॅनडातल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावरील बंदी काढण्यात आली आणि पुढच्या महिन्यापासून मी लागलीच पायनियरींगला सुरवात केली.

मी जास्त सेवाकार्य करू लागलो तशा माझ्या तुरुंगाच्या चकराही वाढल्या. एकदा तुरुंगात माझ्यासोबत माइक मिलर हे पुष्कळ वर्षांपासून यहोवाची विश्‍वासानं सेवा करणारे बांधव होते. आम्ही त्या तुरुंगातील सिमेंटच्या फरशीवर बसून खूप गप्पा मारल्या. ते आध्यात्मिक संभाषण माझ्यासाठी फार उभारणीकारक आणि बळकटी देणारं ठरलं. नंतर माझ्या मनात सहजच विचार आला की, ‘त्या बांधवाशी मी काही गैरसमजांमुळं बोलत नसतो तर?’ त्या तुरुंगातल्या अनुभवावरून मला एक फार चांगला धडा शिकायला मिळाला की, आपल्या बांधवांची आपल्याला गरज आहे आणि म्हणून आपण एकमेकांना माफ केलं पाहिजे आणि एकमेकांशी चांगलं वागलं पाहिजे. नाहीतर, प्रेषित पौलानं लिहिल्याप्रमाणं: “तुम्ही जर एकमेकांस चावता व खाऊन टाकिता तर परस्परांच्या हातून एकमेकांचा संहार होऊ नये म्हणून जपा.”—गलतीकर ५:१५.

मला १९४५ साली सप्टेंबर महिन्यात कॅनडातल्या टोरोंटो इथल्या वॉचटावर संस्थेच्या शाखा दफ्तरात (ज्याला आपण बेथेल म्हणतो) काम करायचं आमंत्रण मिळालं. तिथला आध्यात्मिक कार्यक्रम खरोखरच प्रोत्साहनदायक आणि विश्‍वास मजबूत करणारा असा होता. त्याच्या पुढच्या वर्षी, मला बेथेलच्या शेतमळ्यावर काम करायची नेमणूक मिळाली; शाखा दफ्तरापासून हा शेतमळा उत्तरेकडे जवळजवळ ४० किलोमीटरच्या अंतरावर होता. स्ट्रॉबेरीची फळं गोळा करत असताना माझ्यासोबत ॲन वॉलीनेक नावाची एक तरुणीसुद्धा काम करत होती. ती दिसायला तर सुंदर होतीच पण यहोवाबद्दल तिचं प्रेम आणि त्याच्या कार्याबद्दलचा आवेशसुद्धा वाखाणण्याजोगा होता. आमचं एकमेकांशी प्रेम जमलं आणि जानेवारी १९४७ रोजी आमचा विवाह झाला.

लग्न झाल्यावर अडीच वर्षं आम्ही ओन्टारियोच्या लंडन इथं पायनियरींग केली आणि नंतर केप ब्रेटन द्वीप इथं पायनियरींग केली; केप ब्रेटन द्वीपावर तर आम्ही एक मंडळीसुद्धा स्थापन करू शकलो. मग १९४९ साली आम्हाला वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या १४ व्या वर्गासाठी आमंत्रण मिळालं; तिथं आम्हाला मिशनरी होण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं.

क्विबेकमधील मिशनरी कार्य

गिलियडच्या आधीच्या वर्गातून पदवीधर झालेल्या कॅनेडियन विद्यार्थ्यांना क्विबेकमध्ये प्रचारकार्य सुरू करायला नेमण्यात आलं होतं. १९५० साली आम्हाला तसंच आमच्यासोबत आमच्या १४ व्या वर्गातल्या आणखी २५ जणांना त्या विद्यार्थ्यांसोबत कार्य करायला पाठवण्यात आलं. तिथं मिशनरी कार्य वाढल्यामुळं छळ आणि सामुहिक हल्लेही वाढले; हे सगळं रोमन कॅथलिक चर्चच्या पुढाऱ्‍यांनी चेतवल्यामुळं घडत होतं.

रुइन शहरातल्या पहिल्या मिशनरी नेमणुकीत, तिसऱ्‍याच दिवशी ॲनला पोलिसांनी अटक करून गाडीत टाकलं. तिच्यासाठी हा नवीनच अनुभव होता कारण ती कॅनडातल्या मानिटोबा प्रांताच्या एका लहानशा गावातून आली होती आणि तिथं सहसा पोलिस दिसत नाहीत. साहजिकच, ती घाबरली होती आणि पटकन तिला हे शब्द आठवले, “त्याच्याशी लग्न करशील तर तुलाही जावं लागेल जेलमध्ये.” पण तिला घेऊन जाण्याआधी पोलिसांना मीही सापडलो आणि त्यांनी मलासुद्धा ॲनबरोबर गाडीत घातलं. मला पाहताच ती म्हणाली, “बरं झालं तू पण आलास!” ती घाबरली होती तरीपण शांत होती; ती म्हणाली, “प्रेषितांनी येशूबद्दल प्रचार केला म्हणून त्यांनासुद्धा हेच सहन करावं लागलं होतं, नाही?” (प्रेषितांची कृत्ये ४:१-३; ५:१७, १८) नंतर त्याच दिवशी आम्हाला जामिनावर सोडवण्यात आलं.

ती घटना घडून सुमारे एक वर्ष होऊन गेलं होतं आणि एकदा आम्ही मॉन्ट्रियल इथल्या नवीन नेमणुकीत घरोघरचं प्रचार कार्य करत होतो. तेव्हा रस्त्यावर खूप गोंगाट ऐकू आला म्हणून मी पाहिलं तर संतापलेला एक जमाव दगडफेक करत होता. ॲन आणि तिच्यासोबतच्या बहिणीला वाचवायला मी गेलो तेवढ्यात पोलिस तिथं आले. त्या जमावाला अटक करण्याऐवजी पोलिसांनी ॲन आणि तिच्यासोबत असलेल्या बहिणीलाच अटक केली! तुरुंगात असताना ॲननं त्या नवीन साक्षीदार बहिणीला आठवण करून दिली की, “‘माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करितील’ असे जे येशूने म्हटले होते, त्याचाच आपण प्रत्यक्षात अनुभव घेत आहोत.”—मत्तय १०:२२.

एक अशी वेळ आली, जेव्हा क्विबेकमध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या विरुद्ध १,७०० खटले सुनावणं बाकी होतं. आम्ही राष्ट्रद्रोही साहित्याचं वितरण करत आहोत किंवा लायसन्स नसताना साहित्याचं वितरण करत आहोत या आशयाचे आरोप सहसा आमच्यावर लावले जायचे. परिणामस्वरूप, वॉचटावर संस्थेच्या कायदा विभागानं क्विबेक सरकारविरुद्ध कारवाई केली. कोर्टात अनेक वर्षं ही लढाई लढल्यावर यहोवानं आम्हाला कॅनडाच्या वरिष्ठ न्यायालयात दोन मोठे विजय देऊ केले. डिसेंबर १९५० मध्ये, आमचं साहित्य राष्ट्रद्रोही आहे या आरोपातून आम्हाला मुक्‍त करण्यात आलं आणि नंतर ऑक्टोबर १९५३ मध्ये लायसन्सविना बायबल आधारित साहित्य वितरीत करण्याच्या आमच्या अधिकाराला मान्यता देण्यात आली. अशाप्रकारे, यहोवा खरोखर “आश्रय व . . . सामर्थ्य आहे; तो संकटसमयी साहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो” याचा प्रत्यय आम्हाला आला.—स्तोत्र ४६:१.

मी पायनियरींग सुरू केली तेव्हा म्हणजे १९४५ साली क्विबेकमध्ये ३५६ साक्षीदार होते. आता तिथं २४,००० हून अधिक साक्षीदार आहेत! बायबलमधल्या भविष्यवाणीप्रमाणेच तिथं घडलं आहे: “तुझ्यावर चालविण्याकरिता घडिलेले कोणतेहि हत्यार तुजवर चालणार नाही; तुजवर आरोप ठेवणाऱ्‍या सर्व जिव्हांना तू दोषी ठरविशील.”—यशया ५४:१७.

फ्रान्समधील कार्य

सप्टेंबर १९५९ साली, ॲन आणि मला फ्रान्सच्या पॅरिस इथल्या बेथेलमध्ये काम करायला बोलवण्यात आलं; तिथं मला छपाईच्या कामावर देखरेख करायची नेमणूक देण्यात आली. आम्ही तिथं येण्याआधी म्हणजे जानेवारी १९६० पर्यंत छपाईचं काम बाहेरूनच करून घेतलं जात होतं. त्या वेळी, फ्रान्समध्ये टेहळणी बुरूज पत्रिकेवर बंदी असल्यामुळे आम्ही ते मासिक ६४ पृष्ठांच्या पुस्तिकेच्या रूपात दर महिन्याला छापायचो. त्या पुस्तिकेला यहोवाच्या साक्षीदारांचे खासगी वृत्तपत्र (इंग्रजी) असं नाव देण्यात आलं; त्यात मंडळ्यांमध्ये अभ्यासले जाणारे दर महिन्याचे लेख असायचे. १९६० ते १९६७ च्या दरम्यान फ्रान्समध्ये प्रचार कार्यात सहभाग घेणाऱ्‍यांची संख्या १५,४३९ पासून २६,२५० इतकी झाली.

कालांतरानं, बहुतेक मिशनऱ्‍यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आलं; काहींना आफ्रिकेतल्या फ्रेंच भाषिक देशांमध्ये तर इतरांना परत एकदा क्विबेकमध्ये पाठवण्यात आलं. ॲनची तब्येत बरी नव्हती आणि तिचं ऑपरेशन करावं लागणार होतं म्हणून आम्ही क्विबेकला परतलो. तीन वर्षं ॲनवर वैद्यकीय उपचार केल्यानंतर ती बरी झाली. त्यानंतर मला विभागीय कार्य देण्यात आलं; मंडळ्यांना आध्यात्मिक प्रोत्साहन देण्यासाठी मला दर आठवडी एका नवीन मंडळीला भेट द्यावी लागायची.

आफ्रिकेतले मिशनरी कार्य

काही वर्षांनी म्हणजे १९८१ साली, आम्हाला नवीन नेमणूक मिळाली. आम्ही खूप खुश होतो. आम्हाला झायरे (सध्याचं प्रजासत्ताक काँगो) इथं मिशनरी म्हणून पाठवण्यात आलं. तिथले लोक खूप गरीब होते आणि सगळेजण हालअपेष्टेत दिवस काढत होते. आम्ही गेलो तेव्हा तिथं २५,७५३ साक्षीदार होते; पण आज तीच संख्या १,१३,००० झाली आहे. शिवाय, ४,४६,३६२ लोक १९९९ मध्ये ख्रिस्ताच्या स्मारकविधीला उपस्थित होते!

आम्ही १९८४ साली, नवीन शाखा दफ्तर बांधायला सरकारकडून ५०० एकर जमीन घेतली. डिसेंबर १९८५ मध्ये, किन्सहासा या राजधानी शहरात एक आंतरराष्ट्रीय अधिवेशन भरवण्यात आलं; त्या अधिवेशनाला जगातल्या अनेक देशांहून ३२,००० प्रतिनिधी आले होते. त्यानंतर, पाळकांनी चेतवलेल्या विरोधामुळं झायरेमधल्या आमच्या कामात खंड पडला. मार्च १२, १९८६ रोजी जबाबदार बांधवांना एक पत्र देण्यात आलं; त्यामध्ये झायरेतील यहोवाच्या साक्षीदारांची संघटना बेकायदेशीर आहे असं घोषित केलं होतं. आमच्या सर्व कार्यहालचालींवर बंदी आहे यावर तेव्हाच्या पंतप्रधानांनी (सध्या हयातीत नसलेले मबुटु सेसे सेको) सही केली.

हे सर्व अचानकच घडल्यामुळं आम्हाला बायबलमधला हा सल्ला लागू करावा लागला: “चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून लपतो.” (नीतिसूत्रे २२:३) किन्सहासामध्ये प्रकाशनं छापण्यासाठी देशाबाहेरून कागद, शाई, फिल्म, छपाईच्या प्लेट्‌स आणि रसायनं आणायचे मार्ग आम्ही शोधून काढले. हे साहित्य वाटण्यासाठी आम्ही स्वतःचीच एक वितरण यंत्रणा देखील निर्माण केली. सगळी योजना झाल्यावर आमची ही वितरण व्यवस्था सरकारी पोस्टापेक्षाही उत्तम ठरली!

हजारो साक्षीदारांना अटक करण्यात आली आणि पुष्कळांना अत्यंत क्रूररितीनं छळण्यात आलं. तरीही, काही मोजक्याच व्यक्‍ती सोडल्या तर सगळ्यांनी हा त्रास सहन केला आणि विश्‍वासू राहिले. मलासुद्धा अटक करण्यात आली आणि आपल्या बांधवांचे तुरुंगात काय हाल केले जातात ते मला प्रत्यक्ष पाहायला मिळालं. पुष्कळदा आम्हाला गुप्त पोलिस आणि अधिकाऱ्‍यांकडून संकटे आली तरी यहोवानं नेहमी आमच्यासाठी मार्ग काढला.—२ करिंथकर ४:८.

आम्ही एका व्यापाऱ्‍याच्या कोठारात साहित्यांचे सुमारे ३,००० बॉक्स लपवून ठेवले होते. कालांतरानं, त्याच्या एका कामगारानं गुप्त पोलिसांना याची खबर दिली आणि त्यांनी त्या व्यापाऱ्‍याला अटक केली. त्याला तुरुंगात नेत असताना नेमकी माझी गाडी त्यांच्यासमोर आली. त्या व्यापाऱ्‍यानं मग पोलिसांना सांगून टाकलं की, त्याच्या कोठारात पुस्तकं ठेवायला मीच त्याला सांगितलं होतं. पोलिसांनी मला थांबवलं आणि मला त्याविषयी विचारलं; मी त्या माणसाच्या कोठारात बेकायदेशीर साहित्य ठेवलं होतं असा आरोप त्यांनी माझ्यावर केला.

“तुमच्याकडे एखादं पुस्तक आहे का?” मी विचारलं.

“आहे ना,” ते म्हणाले.

“जरा मला दाखवाल का?” मी म्हणालो.

त्यांनी एक पुस्तक आणलं; मग मी त्यांना आतलं पान काढून दाखवलं. त्यात लिहिलं होतं: “वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे संयुक्‍त संस्थानांत मुद्रित.”

“तुमच्या हातातलं हे पुस्तक अमेरिकेचं आहे, झायरेचं नाही,” असं मी त्यांना म्हणालो. “तुमच्या सरकारनं झायरेमधल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या संस्थेवर बंदी घातली आहे अमेरिकेतल्या वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीवर नाही. म्हणून जरा जपून.”

मला सोडून देण्यात आलं कारण मला अटक करायला त्यांच्याजवळ कोर्टाकडून आदेश मिळालेला नव्हता. त्याच रात्री आम्ही त्या कोठारात दोन ट्रक नेले आणि सगळं साहित्य तिथून हलवलं. दुसऱ्‍या दिवशी अधिकारी तिथं तपास करायला आले तेव्हा तिथं काहीच नव्हतं हे पाहून ते संतापले. मग ते माझा शोध करू लागले कारण तेव्हा त्यांना कोर्टाकडून आदेश मिळाला होता. त्यांनी मला शोधून काढलं, पण त्यांच्याजवळ गाडी नव्हती म्हणून मी स्वतःच गाडी चालवून तुरुंगात गेलो! माझी गाडीसुद्धा ते ताब्यात घेतील म्हणून मी माझ्यासोबत एका साक्षीदाराला घेऊन गेलो म्हणजे तो गाडीसहित पुन्हा घरी येईल.

आठ तास माझी उलट तपासणी केल्यानंतर मला हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण मी त्यांना सरकारकडून मला मिळालेलं एक पत्र दाखवलं; त्यामध्ये झायरेमधील सध्या बंदी घातलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या संस्थेचे सर्व व्यवहार बंद करण्यासाठी मला अनुमती असल्याचं सांगितलं होतं. अशातऱ्‍हेनं मला बेथेलमध्ये कार्य करत राहण्यास अनुमती मिळाली.

झायरेमधील आपल्या कार्यावर बंदी असलेल्या तणावपूर्ण स्थितीत चार वर्षं काम केल्यावर माझ्या पोटात अल्सर झाला आणि तो इतका वाढला की त्यातून रक्‍तस्राव होऊ लागला; माझ्या जिवाला धोका आहे असं मला सांगण्यात आलं. मग मला दक्षिण आफ्रिकेमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलं; त्या शाखेत माझी फार चांगली काळजी घेण्यात आली आणि मी बरा झालो. झायरेमध्ये आठ वर्षं काम केल्यावर आम्ही १९८९ साली दक्षिण आफ्रिकेच्या शाखा दफ्तरात राहायला गेलो; झायरेमध्ये घालवलेली वर्षं खरंच विस्मरणीय होती. आम्हाला तिथं फार छान अनुभव आले. आम्ही १९९८ साली पुन्हा एकदा आमच्या मायदेशी आलो आणि तेव्हापासून कॅनडा बेथेलमध्येच काम करत आहोत.

सेवेची संधी मिळाल्याबद्दल आनंदी

पूर्ण-वेळेच्या सेवेत मी घालवलेल्या ५४ वर्षांचा विचार करतो तेव्हा यहोवाच्या मोलवान सेवेत माझं तरुणपण घालवल्याचा मला फार आनंद होतो. ॲनला अनेक समस्यांचा सामना करावा लागला तरी तिनं कधीच कुरकूर केली नाही; नेहमीच तिनं मला सहकार्य दिलं. आम्हा दोघांना पुष्कळ लोकांना यहोवाची ओळख करून देण्याचा सुहक्क लाभला; त्यातले कित्येक लोक आज पूर्ण-वेळेच्या सेवेत जुंपलेले आहेत. त्यांची मुलं आणि नातवंडंसुद्धा आपल्या महान देवाची अर्थात यहोवाची उपासना करत आहेत हे पाहून केवढा आनंद होतो!

मला अगदी खात्री पटली आहे की, यहोवानं आम्हाला दिलेल्या विशेषाधिकारांची आणि आशीर्वादांची तुलना जगाकडून मिळणाऱ्‍या कोणत्याही गोष्टीशी करता येऊ शकत नाही. आम्ही पुष्कळ संकटांचा सामना केलाय हे खरं आहे पण त्या सर्व संकटांमुळे उलट यहोवावरील आमचा विश्‍वास आणि भरवसा अधिक वाढला आहे. तो खरोखर दृढ गड, आश्रयस्थान आणि संकटकाळी मदतीला येणारा आहे याची आम्हाला प्रचिती मिळाली आहे.

[तळटीपा]

^ परि. 9 क्रॉइट्‌सत्सुग गेगन दॉस क्रिस्टनटुम (ख्रिस्ती धर्माविरुद्ध युद्ध) हे पुस्तक मूळतः जर्मन भाषेत प्रकाशित केलं होतं. त्याचं भाषांतर फ्रेंच आणि पोलिश भाषेत करण्यात आलं होतं पण इंग्रजीत नाही.

[२६ पानांवरील चित्रे]

एकत्र पायनियरींग करताना, १९४७; आज ॲनसोबत

[२९ पानांवरील चित्र]

झायरेमध्ये आम्हाला भेटलेल्या लोकांना बायबलमधील सत्याची ओढ होती