यहोवा विलंब लावणार नाही
यहोवा विलंब लावणार नाही
“त्यास विलंब लागला तरी त्याची वाट पाहा; तो येईलच, त्याला, विलंब लागावयाचा नाही.”—हबक्कूक २:३.
१. यहोवाच्या लोकांनी कोणता निर्धार केला आणि त्यामुळे त्यांना काय करण्याची प्रेरणा मिळाली?
“मी आपल्या पहाऱ्यावर उभा राहीन.” असा देवाचा संदेष्टा हबक्कूक याने संकल्प केला होता. (हबक्कूक २:१) २० व्या शतकातील यहोवाच्या लोकांनी देखील अशाच निर्धाराने कार्य केले. १९२२ साली सप्टेंबर महिन्यात संपन्न झालेल्या एका उल्लेखनीय अधिवेशनात असे आवाहन करण्यात आले होते: “हाच तो महान दिवस आहे. पाहा, राजा सिंहासनाधिष्ट झाला आहे! तुम्ही त्याच्या राज्याचे प्रचारक आहात. तेव्हा राजाची आणि त्याच्या राज्याची घोषणा करा, घोषणा करा, घोषणा करा.” यहोवाच्या लोकांनी या आवाहनाला मोठ्या हिरीरीने प्रतिसाद दिला.
२. पहिल्या महायुद्धानंतर अभिषिक्त ख्रिश्चनांना पुन्हा एकदा कार्य करण्याकरता उत्साहित करण्यात आले तेव्हा ते कोणती घोषणा करू शकत होते?
२ पहिल्या महायुद्धानंतर यहोवाने विश्वासू अभिषिक्तांच्या अक्रियाशील झालेल्या शेषजनांना पुन्हा एकदा कार्य सुरू करण्याकरता उत्साहित केले. तेव्हा हबक्कूकप्रमाणे त्यांच्यापैकीही प्रत्येकाला असे ठामपणे म्हणता आले: ‘मी किल्ल्यावर पहारा करीन. तो मजबरोबर काय बोलेल ते मी पाहीन.’ “पहारा” या अर्थाच्या हिब्रू शब्दांचा बऱ्याच भविष्यवाण्यांमध्ये वारंवार उल्लेख आढळतो.
“त्याला विलंब लागावयाचा नाही”
३. आपण सतत जागृत का राहिले पाहिजे?
३ देवाच्या इशारेवजा संदेशाची घोषणा करत असताना, यहोवाच्या साक्षीदारांनी येशूच्या अतिशय महत्त्वपूर्ण भविष्यवाणीच्या शेवटल्या शब्दांकडे सतत लक्ष देऊन सावध राहिले पाहिजे: “जागृत राहा; कारण घरधनी केव्हा येईल, संध्याकाळी, मध्यरात्रीस कोंबडा आरवण्याच्या वेळी किंवा सकाळी हे तुम्हाला माहीत नाही; नाहीतर अकस्मात येऊन तो तुम्हाला झोपा काढीत असलेले पाहील. जे मी तुम्हाला सांगतो तेच सर्वांना सांगतो, जागृत राहा.” (मार्क १३:३५-३७) हबक्कूकप्रमाणे, आणि येशूच्या शब्दांच्या अनुरूप आपणही सतत जागृत राहिले पाहिजे!
४. आज आपली परिस्थिती सा.यु.पू. ६२८ च्या सुमारास हबक्कूकच्या स्थितीशी कशी जुळते?
४ हबक्कूकने सा.यु.पू. ६२८ च्या सुमारास आपले पुस्तक लिहून पूर्ण केले असावे; एव्हाना तर बॅबिलोन एक जागतिक महाशक्ती म्हणून नावारूपासही आलेले नव्हते. धर्मत्यागी जेरुसलेम शहरावर यहोवाचा न्यायदंड येईल असे कितीतरी वर्षांपासून सांगितले जात होते. पण, हा न्यायदंड केव्हा बजावण्यात येईल याविषयी अद्याप काहीही स्पष्ट चिन्ह दिसत नव्हते. केवळ २१ वर्षांत ही भविष्यवाणी पूर्ण होईल आणि यहोवा बॅबिलोन राष्ट्राकडून ती भविष्यवाणी पूर्ण करील यावर कोणी विश्वास ठेवला असता का? त्याचप्रकारे, आज आपल्यालाही या व्यवस्थीकरणाच्या अंताकरता नियुक्त केलेल्या “दिवसाविषयी व त्या घटकेविषयी” माहीत नाही; पण येशूने आपल्याला आधीच ताकीद दिली आहे: “सिद्ध असा, कारण तुम्हास कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.”—मत्तय २४:३६, ४४.
५. हबक्कूक २:२, ३ वचनांत दिलेले देवाचे शब्द इतका दिलासा देणारे का आहेत?
५ यहोवाने हबक्कूकवर एक रोमांचक कार्य सोपवले: “हा दृष्टांत लिहून काढ, पाट्यांवर ठळक लिही; म्हणजे कोणीहि तो वाचून धावत सुटावे [म्हणजे तो “सहज वाचता येईल,” सुबोध भाषांतर]. कारण हा दृष्टांत नेमिलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटास जाण्यास आपणच नेट करीत आहे, तो फसवावयाचा नाही; त्यास विलंब लागला तरी त्याची वाट पाहा; तो येईलच, त्याला, विलंब लागावयाचा हबक्कूक २:२, ३) आज सबंध पृथ्वीवर दुष्टता आणि हिंसाचार कळसाला पोचला आहे आणि यावरून हेच सूचित होते, की आपण ‘परमेश्वराच्या महान व भयंकर दिवसाच्या’ अगदी निकट आलो आहोत. (योएल २:३१) म्हणूनच “त्याला विलंब लागावयाचा नाही,” हे स्वतः यहोवाने दिलेले आश्वासन अतिशय दिलासा देणारे आहे!
नाही.” (६. देवाचा न्यायदंड बजावण्याचा दिवस येईल तेव्हा बचाव होण्यासाठी काय केले पाहिजे?
६ देवाच्या न्यायदंड बजावण्याच्या दिवशी बचाव व्हावा म्हणून आपण काय केले पाहिजे? धार्मिक आणि अधार्मिक यांच्यातला फरक दाखवून यहोवा या प्रश्नाचे उत्तर देतो: “पाहा, तो गर्वाने फुगला आहे, त्याचा आत्मा त्याच्या ठायी सरळ नाही; धार्मिक तर आपल्या विश्वासाने वाचेल.” (हबक्कूक २:४) गर्वाने फुगलेल्या आधुनिक काळातल्या स्वार्थी शासकांनी आणि लोकांनी आजपर्यंत कोट्यवधी निर्दोष लोकांचे रक्त सांडले आहे; दोन जागतिक महायुद्धे आणि असंख्य जातीय संहार याची ठळक उदाहरणे आहेत. पण, देवाचे शांतिप्रिय अभिषिक्त सेवक देवाला विश्वासू राहिले आहेत. “सत्याचे पालन करणारे धार्मिक राष्ट्र” त्यांनाच सूचित करते. हे राष्ट्र अर्थात अभिषिक्त जन आणि त्यांच्या सोबत कार्य करणारे, म्हणजेच “दुसरी मेंढरे” पुढील शब्दांचे पालन करतात: “परमेश्वरावर सर्व काळ भाव ठेवा, कारण प्रभु परमेश्वर हा सनातन आश्रयदुर्ग आहे.”—यशया २६:२-४; योहान १०:१६.
७. हबक्कूक २:४ हे वचन उद्धृत करून पौलाने जो सल्ला दिला त्यानुसार आपण काय केले पाहिजे?
७ हिब्रू ख्रिश्चनांना लिहिलेल्या पत्रात प्रेषित पौलाने यहोवाच्या लोकांना संबोधून हबक्कूक २:४ उद्धृत केले: “तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचनानुसार फलप्राप्ति करून घ्यावी, म्हणून तुम्हाला सहनशक्तीचे अगत्य आहे. कारण ‘अगदी थोडा वेळ राहिला आहे; जो येणार आहे, तो येईल, उशीर करणार नाही; माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल; तो जर माघार घेईल, तर त्याच्याविषयी माझ्या जिवाला संतोष वाटणार नाही.’” (इब्री लोकांस १०:३६-३८) आपला हा काळ सुस्ती करण्याचा किंवा सैतानाच्या भौतिक, चंगळवादी जगाच्या मोहांना बळी पडण्याचा नाही. “अगदी थोडा वेळ राहिला आहे.” तेव्हा, या उरलेल्या वेळात आपण काय केले पाहिजे? पौलाप्रमाणे, आपणही यहोवाच्या पवित्र राष्ट्रासोबत “पुढील गोष्टींकडे लक्ष लावून” सार्वकालिक जीवनाचे ‘बक्षीस मिळवण्यासाठी’ प्रयत्न केले पाहिजेत. (फिलिप्पैकर ३:१३, १४) आणि येशूच्या पावलावर पाऊल ठेवून, ‘जो आनंद आपल्यापुढे आहे त्याकरिता’ सर्व प्रकारचे दुःख “सहन” करण्यास तयार असले पाहिजे.—इब्री लोकांस १२:२.
८. हबक्कूक २:५ या वचनात उल्लेख केलेला “मनुष्य” कोणाला चित्रीत करतो आणि तो कोणत्या अर्थाने यशस्वी होणार नाही?
८ हबक्कूक २:५ या वचनात एका ‘मनुष्याबद्दल’ सांगितले आहे जो यहोवाच्या सेवकांपेक्षा अगदी वेगळा आहे. “त्याने अधोलोकाप्रमाणे आपली लालसा वाढविली आहे,” तरीसुद्धा त्याला त्याचे ध्येय गाठता येणार नाही. हा “अतृप्त” मनुष्य कोण आहे? हा मनुष्य कोणा एका व्यक्तीला सूचित करत नाही, तर राजकीय शक्तींना चित्रित करतो. या राजकीय शक्ती हबक्कूकच्या काळातल्या बॅबिलोन राष्ट्राप्रमाणे सत्तेसाठी वखवखलेल्या आहेत. उदाहरणार्थ, फॅसिस्ट, नात्सी, समाजवादी आणि काही तथाकथित लोकतंत्रवादी शक्ती आपल्या राज्याच्या सीमा वाढवण्यासाठी युद्धे करतात आणि असंख्य निर्दोष लोकांना अधोलोकाची अर्थात कबरेची वाट दाखवतात. सैतानाच्या जगाचा असलेला हा विश्वासघाती सामुदायिक “मनुष्य” अहंकाराच्या द्राक्षारसाने मस्त झाला आहे, पण ‘सर्व राष्ट्रांस आपणाजवळ जमा करण्यात, आणि सर्व लोकांस आपल्यानजीक एकत्र करण्यात’ तो यशस्वी होणार नाही. केवळ यहोवाच सर्व मानवांना एकत्र आणू शकतो आणि मशीहाच्या राज्यात तो हेच करील.—मत्तय ६:९, १०.
पाच भयंकर धिक्कारात्मक न्यायदंड
९, १०. (अ) हबक्कूककडून यहोवा काय घोषित करतो? (ब) बेईमानीने कमवलेल्या धनाच्या संदर्भात आज कशी परिस्थिती आढळते?
९ संदेष्टा हबक्कूक याच्याकडून यहोवा आता सलग पाच धिक्कारात्मक न्यायदंड घोषित करतो. देवाच्या विश्वासू उपासकांच्या वस्तीसाठी या पृथ्वीवर तयारी करण्यासाठी हे न्यायदंड बजावले जातील. हे सात्त्विक जन एक ‘म्हण उच्चारतील,’ (पं.र.भा.) खरे तर यहोवा त्यांना हे उद्गार काढायला लावेल. हबक्कूक २:६ येथे आपण असे वाचतो: “आपला माल नव्हे त्याने जो आपली वृद्धि करितो व गहाणांचा बोजा आपणावर लावून घेतो, त्याला धिक्कार असो; असे कोठवर?”
१० यात विशेषतः बेईमानीने कमवलेल्या धनाविषयी सांगितले आहे. जगात आज श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालले आहेत आणि गरीब लोक दारिद्र्यात बुडतच चालले आहेत. अंमली पदार्थांचा विक्रय करणारे, ठकबाजी करणारे अमाप संपत्ती गोळा करत आहेत, तर दुसरीकडे सर्वसामान्य लोकांना खायला अन्न मिळत नाही. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी अंदाजे एक चतुर्थ्यांश लोक दारिद्र्यरेषेखाली जगतात. काही देशांतले राहणीमान विश्वास बसणार नाही इतके निकृष्ट आहे. तेव्हा न्याय आणि धार्मिकता यांसाठी तळमळणारे लोक साहजिकच विचारतात की हे अन्यायाचे राज्य “कोठवर” चालणार? पण, अंत अगदी जवळ आला आहे! आपण विश्वास बाळगू शकतो, “त्याला विलंब लागावयाचा नाही.”
११. मनुष्यांचे रक्त सांडण्याविषयी हबक्कूक काय म्हणतो आणि पृथ्वीवर भयंकर रक्तपात होत आहे असे आपण का म्हणू शकतो?
११ हबक्कूक दुष्ट लोकांना उद्देशून म्हणतो: “तू पुष्कळ राष्ट्रांस लुटिले म्हणून सर्व अवशिष्ट लोक तुला लुटतील; माणसांचा रक्तपात आणि भूमीवर, शहरावर व त्यांतील सर्व रहिवाश्यांवर केलेला जुलूम, यामुळे असे होईल.” (हबक्कूक २:८) आज पृथ्वीवर किती भयंकर रक्तपात चालला आहे! येशूने अगदी स्पष्ट सांगितले होते: “तरवार धरणारे सर्व जण तरवारीने नाश पावतील.” (मत्तय २६:५२) पण, या २० व्या शतकातच अनेक देशांनी आणि जातीय समूहांनी दहा कोटींपेक्षाही जास्त लोकांचे रक्त सांडले आहे. या रक्तपातात ज्या कोणाचा हात आहे त्या सर्वांचा धिक्कार असो!
दुसरा धिक्कारयुक्त न्यायदंड
१२. हबक्कूकने लिहिलेला दुसरा धिक्कारात्मक न्यायदंड कोणावर येतो आणि अन्यायाने कमवलेल्या धनाचा शेवटी काहीच उपयोग होणार नाही याची आपण का खातरी बाळगू शकतो?
१२ दुसरा धिक्काराचा न्यायदंड हबक्कूक २:९-११ या वचनांत वाचायला मिळतो. “विपत्तीच्या हातांतून आपला बचाव व्हावा म्हणून आपले घरटे उंच ठिकाणी करावे, ह्या हेतूने जो आपल्या घराण्यासाठी अन्यायाने नफा मिळवितो” त्याच्याविरुद्ध हा न्यायदंड येतो! अन्यायाने मिळवलेल्या नफ्याचा शेवटी काहीच उपयोग होणार नाही. स्तोत्रकर्ताही हेच स्पष्टपणे सांगतो: “कोणी मनुष्य धनवान झाला, त्याच्या घरचा डामडौल वाढला तरी तू घाबरू नको; कारण तो मृत्यु पावेल तेव्हा बरोबर काहीच घेऊन जाणार नाही; त्याचा थाटमाट त्याच्यामागून खाली उतरणार नाही.” (स्तोत्र ४९:१६, १७) आणि म्हणूनच पौल असा सुज्ञ सल्ला देतो: “प्रस्तुत युगातल्या धनवानांस निक्षून सांग की, तुम्ही अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो जिवंत देव आपणांस उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेवावी.”—१ तीमथ्य ६:१७.
१३. आपण देवाचा इशाऱ्याचा संदेश का घोषित करत राहिले पाहिजे?
१३ देवाच्या न्यायदंडांचे संदेश घोषित करणे आज किती महत्त्वाचे आहे! येशूच्या काळात जेव्हा “प्रभूच्या नावाने येणारा राजा” धन्यवादित असो असे घोषित करणाऱ्या लोकांच्या जमावांना काही परुश्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा येशूने त्यांना म्हटले: “मी तुम्हांस सांगतो, हे लूक १९:३८-४०) आजही, जर देवाच्या लोकांनी या जगाच्या दुष्टाईचा पर्दाफाश करण्याचे थांबवले तर “भिंतीचा दगड ओरडेल.” (हबक्कूक २:११) तेव्हा आपण निर्भयपणे देवाच्या इशाऱ्याचा संदेश घोषित करत राहण्याचा निर्धार करू या!
गप्प राहिले तर धोंडे ओरडतील.” (तिसरा धिक्कारात्मक न्यायसंदेश आणि रक्तपाताचा विषय
१४. जगातले धर्म कोणत्या रक्तपाताबद्दल दोषी आहेत?
१४ हबक्कूकने घोषित केलेला तिसरा धिक्कारात्मक न्यायसंदेश रक्तपाताविषयी आहे. हबक्कूक २:१२ यात म्हटले आहे: “जो रक्ताने नगर बांधितो, अधर्माने शहर स्थापितो त्याला धिक्कार असो!” या व्यवस्थीकरणात अधर्म आणि रक्तपात एकमेकांशी जुळलेले आहेत. विशेष म्हणजे, जगातल्या वेगवेगळ्या धर्मांनी इतिहासात अतिशय भयंकर रक्तपात घडवून आणला आहे. याची बरीच उदाहरणे देता येतील. क्रूसेड्स किंवा धर्मयुद्धे, ज्यांत तथाकथित ख्रिश्चनांनी आणि मुस्लिमांनी एकमेकांचे रक्त सांडले; स्पेन आणि लॅटिन अमेरिका येथील कॅथलिक इंक्विझिशन; प्रोटेस्टंट आणि कॅथलिक यांमध्ये तीस वर्षे चाललेले युरोपातले युद्ध; आणि या सर्वांपेक्षा भयंकर म्हणजे ख्रिस्ती धर्मजगताच्या राज्यांतूनच सुरू झालेली दोन जागतिक महायुद्धे.
१५. (अ) चर्चच्या पाठिंब्याने किंवा संमतीने आजही अनेक देश काय करत आहेत? (ब) संयुक्त राष्ट्रसंघ या जगाच्या शस्त्रीकरणाला बांध घालू शकतो का?
१५ दुसऱ्या जागतिक महायुद्धातील सर्वात घृणास्पद आठवण म्हणजे नात्सी हॉलोकॉस्ट (यहुदी लोकांची सामूहिक हत्या), ज्यात सबंध युरोपातल्या लाखो यहुद्यांना आणि त्यांच्यासारख्या इतर असंख्य निर्दोष लोकांना जीव गमवावा लागला. अगदी अलीकडे फ्रान्सच्या रोमन कॅथलिक पाळकवर्गाने कबूल केले, की दुसऱ्या महायुद्धात लाखो निर्दोष लोकांना नात्सी मृत्यू शिबिरांत पाठवले जात होते तेव्हा ते याला विरोध करू शकले असते. पण आजही कितीतरी देशांत भयंकर रक्तपात होतच आहेत आणि तो देखील चर्चच्या पाठिंब्याने किंवा संमतीने. अलीकडेच, रशियन ऑर्थोडॉक्स चर्चबद्दल टाईम पत्रिकेत (आंतरराष्ट्रीय आवृत्तीत) असे म्हटले होते: “पुनर्स्थापित चर्च एका अशा क्षेत्रात आपल्या प्रभावाचा वापर करत आहे ज्याविषयी पूर्वी कल्पना करणेही दुरापास्त होते, अर्थात रशियाची युद्ध यंत्रणा. . . . जेट लढाऊ विमानांवर आणि सैनिकांच्या बराकींवर प्रार्थना करून आशीर्वाद मागणे अगदी सर्वसामान्य झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात तर चर्चने कहरच केला; मॉस्कोतील डानिलॉफ्स्की मठात (रशियन चर्चचे मुख्य केंद्र) रशियन ऑर्थोडॉक्स चर्चने रशियाची आण्विक हत्यारे चक्क देवाला अर्पण केली.” या विघातक हत्यारांमुळे जगाचे जे पुन्हा एकदा आण्विक शस्त्रीकरण चालले आहे त्याला संयुक्त राष्ट्रसंघ बांध घालू शकेल का? निश्चितच नाही! इंग्लंडमधील लंडनच्या द गार्डियन या वृत्तपत्रानुसार एका नोबेल शांती पुरस्काराच्या विजेत्याने असे म्हटले: “संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीचे पाच स्थायी सदस्यच शस्त्र पुरवठा करणारे प्रमुख व्यापारी आहेत, ही गोष्ट अतिशय अस्वस्थ करणारी आहे.”
१६. युद्धपिपासू देशांना यहोवा काय शिक्षा देईल?
१६ युद्धपिपासू राष्ट्रांवर यहोवा न्यायदंड बजावेल का? हबक्कूक २:१३ यात म्हटले आहे: “पाहा, लोकांच्या श्रमाची फलप्राप्ति अग्निला भक्ष्य होते, राष्ट्रे व्यर्थ शिणतात, हे सेनाधीश परमेश्वर याजकडून नव्हे काय?” “सेनाधीश परमेश्वर?” होय, यहोवा आपल्या स्वर्गीय दूतांच्या सैन्याचा सेनाधीश आहे आणि या सैन्याकडून तो सर्व युद्धप्रिय लोकांना आणि देशांना कायमचे नष्ट करील!
१७. हिंसाचारी राष्ट्रांवर न्यायदंड बजावल्यानंतर ही पृथ्वी यहोवाच्या ज्ञानाने कितपत भरली जाईल?
१७ या हिंसाचारी राष्ट्रांवर यहोवाचा न्यायदंड आल्यानंतर पुढे काय होईल? हबक्कूक २:१४ यात या प्रश्नाचे उत्तर मिळते: “कारण जल समुद्राला व्यापून टाकिते तशी पृथ्वी परमेश्वराच्या प्रतापाच्या ज्ञानाने भरेल.” किती अद्भुत काळ असेल तो! हर्मगिदोनात, यहोवाच सर्वसत्ताधारी प्रभू आहे हे सत्य कायमचे शाबीत होईल. (प्रकटीकरण १६:१६) यहोवा आपल्याला आश्वासन देतो की तो ‘त्याचे पादासन’ अर्थात ही पृथ्वी ‘शोभायमान करील.’ (यशया ६०:१३) सर्व मनुष्यांना देवाच्या मार्गांनुसार जीवन जगण्यास शिकवले जाईल आणि अशारितीने समुद्रात जसे जल भरले आहे त्याचप्रकारे यहोवाच्या महान उद्देशांच्या ज्ञानाने पृथ्वी भरून जाईल.
चवथा आणि पाचवा धिक्कारात्मक न्यायदंड
१८. हबक्कूकने घोषित केलेला चवथा धिक्कारात्मक न्यायदंड कोणता आहे आणि आजच्या जगाच्या नैतिक स्थितीशी याचा काय संबंध आहे?
१८ चवथ्या धिक्कारात्मक न्यायदंडाचे हबक्कूक २:१५ यात पुढील शब्दांत वर्णन केले आहे: “जो आपल्या शेजाऱ्यास मद्य पाजितो त्याला धिक्कार असो! तू त्यांची नग्नता पाहावी म्हणून आपला संतप्त क्रोध त्यात मिसळून त्याला मस्त करितोस.” हे शब्द या आधुनिक जगात माजलेल्या स्वैराचाराला सूचित करतात. आज अनैतिकता अगदीच शिगेला पोहंचली आहे; काही उदारमतवादी धार्मिक गटांकडून तिला पाठिंबाही दिला जातो. एड्स आणि लैंगिक संभोगामुळे फैलावणाऱ्या इतर रोगांचे सबंध जगात थैमान माजले आहे. ‘परमेश्वराच्या प्रतापाचा’ महिमा वर्णण्याऐवजी ही स्वार्थी पिढी अनैतिकतेत अधिकाधिक बुडत चालली आहे आणि तसतशी ती देवाच्या न्यायदंड बजावण्याच्या दिवसाच्याही जवळ जात आहे. ‘सन्मानाने नव्हे तर अप्रतिष्ठेने तृप्त झालेल्या’ या भ्रष्ट जगाला लवकरच यहोवा आपल्या क्रोधाच्या प्याल्याचा घोट पाजेल, हीच देवाची इच्छा आहे. ‘त्याच्या वैभवाची अप्रतिष्ठा होईल.’—हबक्कूक २:१६.
१९. हबक्कूकने घोषित केलेल्या पाचव्या धिक्कारात्मक न्यायदंडाच्या सुरवातीला ज्याविषयी सांगितले आहे, त्याचा कशाशी संबंध आहे आणि आजच्या जगात हे शब्द इतके अर्थपूर्ण का आहेत?
१९ पाचव्या धिक्कारात्मक न्यायदंडाच्या सुरवातीला मूर्तिपूजेविरुद्ध कडक शब्दांत ताकीद दिली आहे. यहोवा हबक्कूकला या जोरदार शब्दांत घोषणा करायला सांगतो: “जो काष्ठास म्हणतो, जागे हो, मुक्या पाषाणास म्हणतो, ऊठ, त्याला धिक्कार असो! त्याला काही शिकविता येईल काय? पाहा, ती मूर्ति सोन्यारुप्याने मढविली आहे, पण आत पाहावे तो जिवाचा पत्ता नाही.” (हबक्कूक २:१९) आजही, ख्रिस्ती धर्मजगताचे आणि इतर धर्माचे लोक क्रूस, मरिया आणि इतर मनुष्यरूपी आणि पशूरूपी मूर्तींची उपासना करतात. पण यहोवा आपला न्यायदंड बजावण्यास येईल तेव्हा यांपैकी कोणत्याही मूर्ती जाग्या होऊन आपल्या उपासकांना बचावू शकणार नाहीत. अनंतकाळचा तेजोमय यहोवा देव, आणि त्याच्या वैभवी सृष्टीपुढे या सोन्यारुप्याने मढलेल्या मूर्तींना काहीच महत्त्व उरत नाही. यास्तव, देवाच्या अद्वितीय नावाला आपण सर्वदा महिमा देत राहू!
२०. आज आपल्याला कोणत्या मंदिराच्या व्यवस्थेत आनंदाने सेवा करण्याचा बहुमान मिळाला आहे?
२० होय, आपला देव यहोवा हाच केवळ सर्व महिमा आणि स्तुतीस योग्य आहे. तेव्हा त्याच्याबद्दल मनापासून आदर बाळगून त्याने मूर्तिपूजेविरुद्ध दिलेल्या इशाऱ्याकडे आपण नेहमी लक्ष देऊ या. पण ऐका! यहोवा अद्याप बोलत आहे: “परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे; सर्व धरित्री त्याजपुढे स्तब्ध राहो.” (हबक्कूक २:२०) हबक्कूक संदेष्टा याठिकाणी निश्चितच जेरूसलेमच्या मंदिराच्या संदर्भात बोलत होता. पण, आज आपल्याला त्या मंदिरापेक्षाही भव्यदिव्य अशा आध्यात्मिक मंदिराच्या व्यवस्थेत यहोवाची उपासना करण्याचा बहुमान मिळाला आहे; या आध्यात्मिक मंदिरात आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा महायाजकपदी अभिषेक करण्यात आला आहे. पृथ्वीवर, म्हणजेच आध्यात्मिक मंदिराच्या अंगणात आपण एकत्र भेटतो, सेवा करतो आणि प्रार्थना करतो आणि याद्वारे यहोवा देवाच्या गौरवशाली नावाला महिमा आणतो. आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याची मनःपूर्वक उपासना करण्यास आपल्याला अत्यंत आनंद वाटतो!
तुम्हाला आठवते का?
• “त्याला विलंब लागावयाचा नाही” या यहोवाच्या शब्दांबद्दल तुमचा काय दृष्टिकोन आहे?
• हबक्कूकने घोषित केलेल्या न्यायदंडांचा आजच्या काळात काय अर्थ होतो?
• आपण यहोवाचा न्यायदंड येण्याचा इशारा का देत राहिले पाहिजे?
• कोणत्या मंदिराच्या अंगणात देवाची सेवा करण्याचा बहुमान आपल्याला मिळाला आहे?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१५ पानांवरील चित्रे]
हबक्कूकप्रमाणे, देवाच्या सध्याच्या सेवकांनाही खातरी आहे की यहोवा विलंब लावणार नाही
[१८ पानांवरील चित्रे]
यहोवाच्या आध्यात्मिक मंदिराच्या अंगणात त्याची सेवा करण्याचा बहुमान मिळाल्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात का?
[१६ पानांवरील चित्राचे श्रेय]
U.S. Army photo