व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आदर दाखवणे—एक ख्रिस्ती गरज

आदर दाखवणे—एक ख्रिस्ती गरज

आदर दाखवणे—एक ख्रिस्ती गरज

बहुमानास पात्र ठरलेल्या व्यक्‍तीकडे विशेष लक्ष देणे किंवा तिची भीड राखणे; तिच्या गुणांना, कामगिरीला, पदाला, स्थानाला किंवा अधिकाराला योग्य मान-सन्मान देणे हे सर्व आदर दाखविण्यात सामील आहे. बायबल ज्या मूळ भाषांमध्ये लिहिले होते त्यांमध्ये आदर या शब्दाशी संलग्न असलेले इतर वाक्यांशही सन्मान दाखवणे किंवा भीड राखणे असाच अर्थ व्यक्‍त करतात. शास्त्रवचनांतून हे स्पष्ट होते की, आदर दाखवणे ही एक ख्रिस्ती जबाबदारी आहे. पण आदर कोणाला दाखवावा?

यहोवाला आदर दाखवणे

निर्माणकर्ता असल्याकारणाने यहोवा देवाच्या सर्व बुद्धिमान प्राण्यांनी त्याला सर्वात जास्त सन्मान आणि आदर दाखवण्याची गरज आहे. (प्रकटीकरण ४:११) यासाठी लोकांनी त्याला विश्‍वासू राहून अधीनता दाखवण्याची गरज आहे; ही अधीनता त्याच्याविषयीचे प्रेम व त्याने केलेल्या गोष्टींबद्दलची कदर याने प्रेरित असावी. (१ योहान ५:३) “मी बाप आहे तर माझा सन्मान कोठे आहे? मी धनी आहे तर माझे भय कोठे आहे”? असे यहोवाने इस्राएल राष्ट्राला विचारले होते. यावरून स्पष्ट होते की, यहोवाला आदरपूर्वक सन्मान दाखवणे म्हणजे त्याला असंतुष्ट करण्याची ईश्‍वरी भीड राखणे.—मलाखी १:६.

महायाजक एलीचे पुत्र हफनी आणि फिनहास यांनी अशाप्रकारचे ईश्‍वरी भय दाखवले नाही. महान धनी यहोवा याची अवज्ञा करून ते उपासनेच्या निवासमंडपात यहोवाला दिलेल्या प्रत्येक अर्पणांमधील सर्वोत्तम वाटा स्वतःकरता काढून घेत होते. निर्माणकर्त्याचा ज्यावर अधिकार आहे ती वस्तू स्वतःकरता काढून घेणारा मनुष्य निश्‍चितच पवित्र गोष्टींचा अनादर करतो. एलीने देखील आपल्या मुलांना कोणतीही कडक शिक्षा दिली नाही व याद्वारे यहोवाऐवजी त्याने आपल्या मुलांना अधिक सन्मान दिला. यहोवाला योग्य तो आदर न दाखवल्यामुळे एलीच्या घराण्यावर अरिष्ट कोसळले.—१ शमुवेल २:१२-१७, २७-२९; ४:११, १८-२१.

विश्‍वासपूर्ण अधीनता आणि भीड यांच्याद्वारे यहोवा देवाला दाखवला जाणारा योग्य आदर खासगी मालमत्तेनेही दाखवला जाऊ शकतो. नीतिसूत्रे ३:९ मध्ये असे म्हटले आहे: “तू आपल्या द्रव्याने . . . परमेश्‍वराचा सन्मान कर.” यहोवाच्या उपासनेला हातभार लावण्यासाठी एखाद्या व्यक्‍तीचा वेळ, शक्‍ती आणि भौतिक वस्तूंचा उपयोग केला जाऊ शकतो.

देवाच्या प्राचीन तसेच आधुनिक प्रतिनिधींचा आदर

यहोवाचे प्रवक्‍ते या नात्याने संदेष्टे आदरास पात्र होते. पण, इस्राएलांनी त्यांना आदर दाखवण्याऐवजी त्यांची टीका केली, त्यांच्यावर शारीरिक अत्याचार केला; एवढेच नव्हे तर त्यांना जीवे मारले. परंतु, यहोवाच्या पुत्राला ठार मारून तर इस्राएलने कहरच केला. येशू म्हणाला होता की, “जो पुत्राचा सन्मान करीत नाही तो, ज्याने मला पाठविले, त्या पित्याचा सन्मान करीत नाही.” (योहान ५:२३) यहोवाचा असा घोर अपमान केल्यामुळे त्याने सा.यु. ७० मध्ये अविश्‍वासू यरूशलेमवर आपला न्यायदंड बजावला.—मार्क १२:१-९.

ख्रिस्ती मंडळीत, शिक्षकाची खास जबाबदारी मिळालेले बांधव सहउपासकांकडून पाठिंबा आणि सन्मान मिळवण्यास पात्र होते. (इब्री लोकांस १३:७, १७) तीमथ्याला लिहीत असताना प्रेषित पौलाने म्हटले की, हे पर्यवेक्षक “दुप्पट सन्मानास” योग्य आहेत. याचा अर्थ, मंडळीसाठी ते मेहनत करत असल्यामुळे स्वेच्छेने त्यांना भौतिक साहाय्य देखील दिले पाहिजे. (१ तीमथ्य ५:१७, १८) खरे तर, सर्वच ख्रिश्‍चन त्यांच्या सहउपासकांकडून सन्मान मिळवण्यास योग्य आहेत. पौलाने पुढे असा सल्ला दिला: “तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्‍याला आदराने आपणापेक्षा थोर माना.” (रोमकर १२:१०) सहउपासकांपेक्षा प्रत्येक ख्रिश्‍चनालाच आपापल्या कमतरता ठाऊक असल्यामुळे त्याने इतरांना स्वतःपेक्षा थोर मानावे, त्यांचा मान राखावा आणि नेहमी त्यांना आदर द्यावा हे उचितच आहे.—फिलिप्पैकर २:१-४.

कौटुंबिक सदस्य एकमेकांचा आदर करतात

पती कुटुंबाचा मस्तक असल्याकारणाने पत्नीने त्याच्याबद्दल योग्य भय किंवा भीड राखावी. (इफिसकर ५:३३) कारण देवाच्या व्यवस्थेत पुरुषाला श्रेष्ठत्व देण्यात आले आहे. पुरुषाची प्रथम निर्मिती करण्यात आली स्त्रीची नाही आणि खरे पाहता पुरुषच “देवाची प्रतिमा व वैभव” आहे. (१ करिंथकर ११:७-९; १ तीमथ्य २:११-१३) आपल्या पतीची भीड राखण्यामध्ये साराने स्वतःचे उल्लेखनीय उदाहरण मांडले. तिला आपल्या पतीचा मनस्वी आदर होता असे म्हणता येईल कारण ती त्याला ‘धनी’ म्हणायची; केवळ इतरांना दाखवण्यासाठी नव्हे तर ‘मनातल्या मनातसुद्धा.’—१ पेत्र ३:१, २, ५, ६; उत्पत्ति १८:१२.

दुसऱ्‍या बाजूला पाहता, पतींना असे आर्जवले आहे: “पतींनो, तसेच तुम्हीहि आपल्या [पत्नींबरोबर], त्या अधिक नाजूक व्यक्‍ति आहेत म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा; तुम्ही उभयता जीवनरूपी कृपादानाचे समाईक वतनदार आहा, म्हणून तुम्ही त्यांना मान द्या.” (१ पेत्र ३:७) त्याअर्थी, आत्म्याने अभिषिक्‍त असलेल्या ख्रिस्ती पतींना हे लक्षात ठेवायचे होते की, त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीही ख्रिस्तासोबत सहवारीस आहेत आणि पुरुषांप्रमाणे त्या शक्‍तिशाली नसल्यामुळे त्यांचा सन्मान करणे आवश्‍यक आहे.—गलतीकर ३:२८.

मुलांच्या बाबतीत पालक हे देवाचे प्रतिनिधी आहेत; मुलांना शिक्षण, शिस्त आणि मार्गदर्शन देणे हा त्यांचा अधिकार आहे. यास्तव, पालकांना सन्मान किंवा आदर दाखवला पाहिजे. (इफिसकर ६:१-३) याचा अर्थ, फक्‍त लहान असतानाच पालकांना अधीनता आणि आदर दाखवला जावा असे नाही तर आवश्‍यक असल्यास पुढे त्यांच्या वृद्धपणीही त्यांची काळजी घेतली पाहिजे. आपल्या वृद्ध आणि गरजवंत पालकांची काळजी न घेणारा माणूस ख्रिस्ती मंडळीत विश्‍वास न ठेवणाऱ्‍या माणसापेक्षा वाईट आहे असे समजले जायचे. (१ तीमथ्य ५:८) प्रेषित पौलाने तीमथ्याला दाखवून दिल्याप्रमाणे, ज्या विधवांची मुले किंवा नातवंडे भौतिक मदत देण्यास समर्थ होती त्यांची मंडळीला काळजी घेण्याची गरज नव्हती.—१ तीमथ्य ५:४.

अधिकारी आणि मंडळीबाहेरील व्यक्‍तींना आदर दाखवणे

मोठ्या सरकारी पदी असलेल्या लोकांनाही सन्मान किंवा आदर देण्याची गरज आहे. स्वार्थी उद्देशाने नव्हे तर देवाची तशी इच्छा असल्यामुळे एक ख्रिस्ती व्यक्‍ती त्यांना आदर दाखवते. ते लोक कदाचित भ्रष्टाचारही करत असतील. (पडताळा प्रेषितांची कृत्ये २४:२४-२७.) पण, ते एका जबाबदार पदी असल्यामुळे त्यांना आदर दाखवण्याची गरज आहे. (रोमकर १३:१, २, ७; १ पेत्र २:१३, १४) तसेच, नोकरांनीही आपल्या मालकांना पूर्ण सन्मानास पात्र समजायचे होते आणि प्रामाणिकपणे दिलेले काम पूर्ण करावयाचे होते. देवाच्या नावाला कलंक लागेल असे कोणतेही कृत्य न करण्याबद्दल त्यांनी सावधगिरी बाळगायची होती.—१ तीमथ्य ६:१.

एखाद्या ख्रिश्‍चनाला त्याच्या आशेविषयी प्रश्‍न विचारण्यात येतात तेव्हा त्याने “सौम्यतेने व भीडस्तपणाने” उत्तरे द्यावीत. हे प्रश्‍न त्याला अपमानकारक पद्धतीने विचारण्यात आले तरी ख्रिश्‍चनाने चिडून, रागावून किंवा संतापून उत्तरे देऊ नयेत तर सौम्यतेने द्यावीत. ख्रिस्तीजन, मनुष्याची भीती बाळगत नसले तरी आपण जणू यहोवा देव आणि प्रभू येशू ख्रिस्तासमोर आहोत असे समजून त्यांनी भीडस्तपणा प्रदर्शित करावा.—१ पेत्र ३:१४, १५.

आदर दाखवल्यामुळे मिळणारे आशीर्वाद

भीडस्तपणाने वागणाऱ्‍या व्यक्‍तींची यहोवा कदर करतो आणि त्यांना आशीर्वाद व प्रतिफळ देऊन त्यांचा सन्मान करतो. तो म्हणतो: “जे माझा आदर करितात त्यांचा मी आदर करीन.” (१ शमुवेल २:३०) राजा दावीदाने यहोवाची विश्‍वासूपणे सेवा केली आणि आपल्या पूर्ण जिवाने आणि शक्‍तीने त्याला सन्मान दिला; एवढेच नव्हे तर खऱ्‍या उपासनेसाठी त्याने आपल्या मौल्यवान वस्तूही देऊ केल्या. यास्तव, यहोवानेही दावीदाच्या विश्‍वासू मार्गाक्रमणाचा आदर केला आणि प्रतिफळ म्हणून त्याच्याशी राज्याचा करार केला.—२ शमुवेल ७:१-१६.

ख्रिस्ती मंडळीत देवाच्या प्रतिनिधींचा आदर करणाऱ्‍यांना त्यांच्या प्रेमळ मेंढपाळकत्वाचा लाभ मिळतो आणि हे पर्यवेक्षक अगदी ‘आनंदाने आपला हिशेब देतील’ अशी त्यांना हमी मिळते. (इब्री लोकांस १३:१७) यहोवाची विश्‍वासाने सेवा केलेल्या गरजवंत विधवांना मंडळीत सन्मान दिला जातो आणि आवश्‍यक असल्यास त्यांची आर्थिक मदतही केली जाते. (१ तीमथ्य ५:३, ९, १०) एकमेकांचा आदर करणाऱ्‍या पती-पत्नींचा विवाह आनंदी आणि फलदायी ठरतो; शिवाय, आदर दाखविणाऱ्‍या मुलांना देवाची आणि मनुष्यांची कृपापसंती प्राप्त होते. (लूक २:५१, ५२) अधिकाऱ्‍यांबद्दल आणि विरोधकांबद्दलही आदर बाळगल्याने एक ख्रिस्ती व्यक्‍ती शुद्ध विवेक राखू शकते आणि यहोवाच्या नावाचा सन्मान करू शकते. त्याचप्रमाणे, जे लोक आपल्या महान निर्माणकर्त्याच्या इच्छेसंबंधी आणि उद्देशांसंबंधी आज्ञाधारकतेने भीडस्तपणा राखतात त्यांच्यासमोर परिपूर्ण परिस्थितींमध्ये यहोवाची अनंतकाळ सेवा करण्याचे भविष्य आहे.