व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमच्या ठायी “ख्रिस्ताचे मन” आहे का?

तुमच्या ठायी “ख्रिस्ताचे मन” आहे का?

तुमच्या ठायी “ख्रिस्ताचे मन” आहे का?

‘धीर, स्थैर्य व उत्तेजन देणारा देव तुम्हाला एकचित्ताने ख्रिस्ताच्या ठायी असलेल्या वृत्तीने वागण्यास साहाय्य करो.’—रोमकर १५:५, सुबोध भाषांतर.

१. ख्रिस्ती धर्मजगताच्या अनेक चित्रांत येशूला कशा प्रकारच्या व्यक्‍तीच्या रूपात दाखवले आहे आणि येशूचे असे रूप रेखाटणे का योग्य ठरणार नाही?

“त्याला कधीच कोणी हसताना पाहिले नाही.” असे येशूच्या संदर्भात एका लिखाणात लिहिलेले आढळते. ११ व्या शतकात प्रकाशात आलेले हे लिखाण एका प्राचीन रोमी अधिकाऱ्‍याने लिहिल्याचा खोटा दावा केला जातो. बऱ्‍याच कलाकारांनी या लिखाणातल्या माहितीच्या आधारावर आपल्या कलाकृती तयार केल्या. * अनेक चित्रांत येशूला अतिशय गंभीर स्वभावाच्या व्यक्‍तीच्या रूपात दाखवले आहे, ज्याला हसणे माहीतच नाही. पण येशूचे असे चित्र रेखाटणे योग्य ठरणार नाही कारण शुभवर्तमानाची पुस्तके त्याची एका प्रेमळ, सहानुभूतिशील आणि संवेदनशील व्यक्‍तीच्या रूपात ओळख करून देतात.

२. आपण “ख्रिस्ताच्या ठायी असलेल्या वृत्तीने” कशाप्रकारे वागू शकतो आणि असे केल्यामुळे आपल्याला काय करणे शक्य होईल?

येशूला खऱ्‍या अर्थाने जाणून घेण्यासाठी, पृथ्वीवर असताना तो कशाप्रकारची व्यक्‍ती होता हे अचूकपणे समजून घेऊन, त्याचे व्यक्‍तिमत्त्व आणि गुण आपण आपल्या मनात आणि अंतःकरणात बिंबवले पाहिजे. यासाठी आता आपण शुभवर्तमानाच्या पुस्तकांतील काही वृत्तान्तांचे परीक्षण करू; ही माहिती घेतल्यामुळे आपल्याला ‘ख्रिस्ताच्या मनाबाबतची,’ अर्थात त्याच्या भावना, संवेदना, विचार आणि युक्‍तिवाद यांबाबतची सूक्ष्मदृष्टी प्राप्त होईल. (१ करिंथकर २:१६) या वृत्तान्तांचे परीक्षण करताना आपल्यालाही “ख्रिस्ताच्या ठायी असलेल्या वृत्तीने” कशाप्रकारे वागता येईल याचा आपण विचार करू. (रोमकर १५:५) असे केल्यामुळे आपल्या जीवनात आणि इतरांसोबतच्या आपल्या व्यवहारांत आपल्याला ख्रिस्ताने घालून दिलेल्या आदर्शाचे अधिक चांगल्याप्रकारे अनुसरण करता येईल.—योहान १३:१५.

इतरांवर दडपण न आणणारे व्यक्‍तिमत्त्व

३, ४. (अ) मार्क १०:१३-१६ येथे दिलेल्या वृत्तान्तातली घटना कोणत्या परिस्थितीत घडली? (ब) येशूजवळ येऊ पाहणाऱ्‍या मुलांना शिष्य अडवू लागले तेव्हा येशूने काय केले?

लोक येशूकडे आकर्षित व्हायचे. वेगवेगळ्या वयोगटांच्या व्यक्‍ती न घाबरता त्याच्याजवळ आपल्या समस्या घेऊन आल्याची कितीतरी उदाहरणे आहेत. मार्क १०:१३-१६ येथे दिलेला वृत्तान्त विचारात घ्या. त्याचे सेवाकार्य संपत आले असताना ही घटना घडली. तो शेवटच्या वेळी जेरूसलेमकडे निघाला होता. लवकरच त्याला आपल्या यातनामय मृत्यूला सामोरे जायचे होते.—मार्क १०:३२-३४.

ते दृश्‍य डोळ्यांपुढे उभे करा. येशूचा आशीर्वाद घेण्यासाठी लोक आपल्या मुलांना, अगदी तान्ह्या बाळांनाही त्याच्याकडे आणू लागतात. * त्या मुलांनी येशूजवळ येऊ नये म्हणून शिष्य त्यांना अडवतात. हे शेवटचे काही आठवडे येशूला कठीण जाणार आहेत आणि त्यात या मुलांचा त्रास येशूला निश्‍चतच नको असेल असे शिष्यांना कदाचित वाटत असेल. पण हा त्यांचा गैरसमज आहे, कारण ते काय करत आहेत हे येशू पाहतो तेव्हा त्याला ते मुळीच आवडत नाही. येशू मुलांना आपल्या जवळ बोलावतो आणि म्हणतो: “बाळकांस माझ्याजवळ येऊ द्या; त्यांना मनाई करू नका.” (मार्क १०:१४) यानंतर तो जे करतो त्यावरून त्याचा कोमल आणि प्रेमळ स्वभाव स्पष्ट दिसून येतो. पुढे अहवालात म्हटले आहे की, ‘तो त्यांना कवटाळून व त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद देतो.’ (मार्क १०:१६) येशू त्या मुलांना प्रेमाने कवटाळतो तेव्हा त्यांना कसल्याही प्रकारची भीती वाटत नाही, ते अगदी आनंदाने त्याच्याजवळ जातात.

५. मार्क १०:१३-१६ यात दिलेल्या घटनेतून ख्रिस्ताच्या व्यक्‍तिमत्त्वाविषयी आपल्याला काय कळते?

या लहानशा घटनेवरून येशूच्या व्यक्‍तिमत्त्वाबद्दल आपल्याला बरेच काही समजते. त्याच्याजवळ यायला लोक घाबरत नव्हते. पृथ्वीवर येण्याआधी स्वर्गात त्याला अतिशय गौरवशाली स्थान होते, पण अपरिपूर्ण मानवांशी व्यवहार करताना त्याने आपला मोठेपणा मिरवून त्यांना तुच्छ लेखले नाही. (योहान १७:५) अगदी लहान मुलांनासुद्धा येशूजवळ जायला भीती वाटत नव्हती हे तुम्हाला विशेष वाटत नाही का? ज्याला हसणेखेळणे माहीतच नाही अशा धीरगंभीर, भावनाशून्य व्यक्‍तीजवळ त्या मुलांना निश्‍चितच जावेसे वाटले नसते! पण लहानमोठे सर्व येशूजवळ न संकोचता यायचे; कारण तो प्रेमळ आहे, आणि त्यांच्याबद्दल त्याला आस्था वाटते हे त्या लोकांना त्याच्या सहवासात जाणवायचे. आपल्याला तो झिडकारणार नाही याची त्यांना खात्री वाटायची.

६. मंडळीतल्या लोकांना आपल्याजवळ यायला, बोलायला भीती वाटू नये म्हणून वडील काय करू शकतात?

या वृत्तान्तावर विचार करताना आपण स्वतःला हे प्रश्‍न विचारू शकतो, ‘मी ख्रिस्ताची मनोवृत्ती अनुसरतो का? माझ्याजवळ येऊन लोक न संकोचता, न घाबरता बोलू शकतात का?’ सध्याचे दिवस अत्यंत कठीण आहेत आणि या कठीण काळात देवाच्या कळपाला दयाळू मेंढपाळांची गरज आहे, ज्यांच्याजवळ जायला, बोलायला त्यांना भीती किंवा संकोच वाटणार नाही, जे ‘वाऱ्‍यापासून आसऱ्‍याप्रमाणे’ असतील. (यशया ३२:१, २; २ तीमथ्य ३:१) वडिलांनो, तुम्हीही आपल्या बांधवांबद्दल निःस्वार्थ, मनःपूर्वक आस्था बाळगण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना मदत करण्याची सदैव तयारी दाखवली तर तुमची ही कळकळ त्यांना अवश्‍य जाणवेल. तुमच्या चेहऱ्‍यावरील हावभावांवरून, तुमच्या आवाजावरून आणि तुमच्या विचारशील वागण्यावरून त्यांना ही कळकळ दिसून येईल. कोणताही दिखावटीपणा नसलेल्या तुमच्या प्रेमळ आणि आस्थापूर्ण वागणुकीमुळे मंडळीत भरवशाचे वातावरण निर्माण होईल आणि बांधवांना, इतकेच नव्हे तर लहान मुलांना देखील तुमच्याजवळ यायला, तुमच्याशी बोलायला कसलाच संकोच किंवा भीती वाटणार नाही. एका वडिलाशी आपण आपल्या समस्येबद्दल मोकळ्या मनाने का बोलू शकलो याबद्दल एक बहीण सांगते: “ते माझ्याशी अतिशय कोमलपणे आणि सहानुभूतिशीलपणे बोलले, म्हणूनच मी त्यांच्याशी बोलू शकले. नाहीतर मी एक शब्दही बोलू शकले नसते. त्यांनी माझी सगळी भीती घालवली.”

विचारशीलपणा

७. (अ) येशूने आपला विचारशीलपणा कशाप्रकारे प्रदर्शित केला? (ब) येशूने एका अंधळ्या माणसाला हळूहळू का बरे केले?

येशू विचारशील होता. तो संवेदनशील होता; इतरांच्या भावनांची त्याला कदर होती. दुःखाने पीडित लोकांना पाहूनच त्याला त्यांचा इतका कळवळा यायचा की त्यांचे दुःख दूर केल्याशिवाय त्याला राहावयाचे नाही. (मत्तय १४:१४) इतरांच्या अडचणींची आणि त्यांच्या गरजांचीही तो जाणीव ठेवायचा. (योहान १६:१२) एकदा लोकांनी एका अंधळ्या माणसाला त्याच्याजवळ आणले आणि त्याला बरे करावे अशी ते येशूला विनंती करू लागले. येशूने त्या माणसाला बरे तर केले, पण हळूहळू. आधी त्या माणसाला अंधूक दिसू लागले; आसपासची माणसे ‘झाडांसारखी दिसत आहेत पण ती चालत आहेत,’ असे तो म्हणाला. मग येशूने त्याला पूर्णपणे बरे केले. येशूने त्याला असे हळूहळू का बरे केले? त्या अंधळ्या माणसाला अंधाराची इतकी सवय असल्यामुळे अचानक लख्ख प्रकाश आणि असंख्य रंगांच्या आणि आकारांच्या वस्तू पाहून त्याला धक्का बसू नये म्हणून कदाचित येशूने असे केले असावे.—मार्क ८:२२-२६.

८, ९. (अ) येशू व त्याचे शिष्य दकापलीस नावाच्या प्रदेशात गेल्यावर लगेचच काय घडले? (ब) येशूने एक बहिऱ्‍या माणसाला कसे बरे केले त्याचे वर्णन करा.

सा.यु. ३२ च्या वल्हांडणानंतर घडलेल्या एका घटनेचेही उदाहरण पाहा. येशू आणि त्याचे शिष्य एवढ्यातच गालील समुद्राच्या पूर्वेकडे असलेल्या दकापलीस नावाच्या प्रदेशात आले होते. लगेचच लोकांचे थवेच्या थवे त्याच्याकडे आले आणि त्यांनी अनेक आजारी आणि अपंग जणांना येशूजवळ बरे व्हायला आणले. येशूने त्या सर्वांना बरे केले. (मत्तय १५:२९, ३०) येथे लक्ष देण्याजोगी गोष्ट अशी, की येशूने या सर्वांपैकी एका माणसाकडे विशेष लक्ष दिले. शुभवर्तमान लेखकांपैकी केवळ मार्कनेच या घटनेविषयी लिहिले आहे.—मार्क ७:३१-३५.

हा माणूस बहिरा होता आणि त्याला धड बोलताही येत नव्हते. यामुळे साहजिकच त्याला लोकांसमोर यायला भीती वाटत असेल, लाज वाटत असेल. येशूने हे ओळखले असावे. म्हणूनच तो या माणसाला अगदी वेगळ्या पद्धतीने बरे करतो. त्याला बाजूला घेऊन येशू त्याला गर्दीपासून दूर नेतो. यानंतर तो इशाऱ्‍यांनी त्या माणसाला सांगण्याचा प्रयत्न करतो की तो आता काय करणार आहे. ‘तो त्याच्या कानात बोटे घालतो व थुंकून त्याच्या जिभेला स्पर्श करतो.’ (मार्क ७:३३) यानंतर येशू वर स्वर्गाकडे पाहून मनातल्या मनात प्रार्थना करून उसासा टाकतो. या त्याच्या कृतींवरून तो त्या माणसाला जणू असे सांगत होता की, ‘मी जे आता तुझ्यासाठी करणार आहे ते देवाच्या शक्‍तीने करणार आहे.’ शेवटी येशू त्याला म्हणतो: “मोकळा हो.” (मार्क ७:३४) तेव्हा त्या माणसाला ऐकू येऊ लागते आणि तो नीट बोलूही शकतो.

१०, ११. आपण मंडळीतल्या बांधवांच्या भावनांची कशाप्रकारे कदर करू शकतो? हेच आपण कुटुंबात कसे करू शकतो?

१० खरेच, येशू लोकांशी किती विचारशीलपणे वागला! त्याला इतरांच्या भावनांची कदर होती आणि म्हणूनच त्यांच्या भावनांना ठेच लागू नये अशारितीनेच तो त्यांच्याशी वागला. आपण ख्रिस्ती आहोत, त्यामुळे याबाबतीत आपण ख्रिस्ताची मनोवृत्ती अनुसरण्याचा सदैव प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्या वागण्यातून ही मनोवृत्ती आपण दाखवली पाहिजे. बायबल आपल्याला आज्ञा देते: “तुम्ही सर्व एकचित्त, समसुखदुःखी, बंधुप्रेम करणारे, कनवाळू नम्र मनाचे व्हा.” (१ पेत्र ३:८) त्याअर्थी, काहीही बोलताना किंवा करताना आपण नेहमी दुसऱ्‍यांच्या भावनांचा विचार केला पाहिजे.

११ मंडळीत इतरांशी आदराने वागून आपण त्यांच्या भावनांची कदर करत असल्याचे दाखवू शकतो; जसे त्यांनी आपल्याशी वागावे अशी आपली इच्छा आहे तसेच आपणही त्यांच्याशी वागले पाहिजे. (मत्तय ७:१२) याचा अर्थ, आपण काय बोलतो आणि कशाप्रकारे बोलतो याबद्दल आपण सावध राहिले पाहिजे. (कलस्सैकर ४:६) “तरवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण” एखाद्याला दुखवू शकते हे कधीही विसरू नका. (नीतिसूत्रे १२:१८) कुटुंबाविषयी काय? ज्या पतीपत्नींचे एकमेकांवर खरे प्रेम असते ते एकमेकांच्या भावनांची कदर करतात. (इफिसकर ५:३३) ते एकमेकांशी कठोर, सतत टीकात्मक आणि खोचक शब्दांत बोलत नाहीत कारण अशाप्रकारे बोलल्यामुळे भावना दुखावल्या जातात आणि या अशा जखमा असतात ज्या सहजासहजी भरत नाहीत. लहान मुलांना देखील भावना असतात; आपल्या मुलांवर प्रेम करणारे आईवडील त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करत नाहीत. मुलांची चूक सुधारण्याची वेळ आलीच तर ते त्यांच्या स्वाभिमानाची कदर करून त्यांना न हिणवता त्यांची चूक त्यांच्या लक्षात आणून देतात. * (कलस्सैकर ३:२१) अशारितीने, इतरांशी विचारशीलपणे वागून आपण हे दाखवतो की आपण ख्रिस्ताची मनोवृत्ती अनुसरत आहोत.

इतरांवर भरवसा ठेवण्याची वृत्ती

१२. येशूने आपल्या शिष्यांबद्दल कशाप्रकारे समतोल आणि वास्तववादी दृष्टिकोन बाळगला?

१२ आपल्या शिष्यांबद्दल येशूचा संतुलित वास्तववादी दृष्टिकोन होता. ते परिपूर्ण नाहीत याची त्याला चांगली कल्पना होती कारण मनुष्याच्या हृदयात काय आहे हे तो जाणू शकत होता. (योहान २:२४, २५) तरीसुद्धा त्याने केवळ त्यांच्या अपरिपूर्णतेकडेच नाही तर त्यांच्या चांगल्या गुणांकडेही लक्ष दिले. त्यांना यहोवाने आकर्षले आहे हे माहीत असल्यामुळे ते मुळात चांगले आहेत हे त्याने ओळखले. (योहान ६:४४) आणि त्यांच्याबद्दल असलेल्या त्याच्या या सकारात्मक भावना त्याच्या व्यवहारातून, वागण्याबोलण्यातून दिसून यायच्या. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याने त्यांच्यावर भरवसा ठेवला.

१३. येशूने आपल्या शिष्यांवर कशाप्रकारे भरवसा व्यक्‍त केला?

१३ हा भरवसा त्याने कशाप्रकारे व्यक्‍त केला? स्वर्गात जाताना त्याने आपल्या अभिषिक्‍त शिष्यांवर एक मोठी जबाबदारी सोपवली. आपल्या राज्याशी संबंधित असलेल्या कार्याचा या सबंध पृथ्वीवर विस्तार करण्याची व त्याची देखरेख करण्याची जबाबदारी त्याने त्यांच्यावर सोपवली. (मत्तय २५:१४, १५; लूक १२:४२-४४) त्याच्या सेवेदरम्यान त्याने कधीकधी अप्रत्यक्षपणे, छोट्या छोट्या गोष्टींतूनही आपल्या शिष्यांवर भरवसा व्यक्‍त केला. एकदा त्याने चमत्कारिकरित्या हजारो लोकांना अन्‍न पुरवले तेव्हा लोकांमध्ये ते वाटण्याची जबाबदारी त्याने आपल्या शिष्यांना दिली.—मत्तय १४:१५-२१; १५:३२-३७.

१४. मार्क ४:३५-४१ येथे दिलेल्या वृत्तान्ताचा सारांश सांगा.

१४ मार्क ४:३५-४१ येथे दिलेल्या अहवालावरही विचार करा. येशू आणि त्याचे शिष्य एका मचव्यात बसून गालील समुद्रातून पूर्वेकडे जायला निघाले होते. किनाऱ्‍यापासून थोड्या अंतरावर गेल्यानंतर येशू मचव्याच्या मागच्या बाजूला जाऊन बसला व तेथे त्याला गाढ झोप लागली. तेवढ्यात, “मोठे वादळ झाले.” गालील समुद्रात अशी वादळे नेहमीची होती. समुद्राची पातळी कमी असल्यामुळे (समुद्रसपाटीपेक्षा २०० मीटर खाली) आसपासच्या प्रदेशांपेक्षा येथे हवा उष्ण असते आणि त्यामुळे वातावरण सहसा अचानक बदलते. शिवाय, उत्तरेकडे असलेल्या हर्मोन पर्वतावरून यार्देनच्या खोऱ्‍यात अतिशय जोरदार वारे वाहतात. अगदी शांत वातावरण कधीकधी क्षणार्धात वादळाचे रूप घेते. जरा विचार करा: येशूला या वादळांबद्दल साहजिकच माहीत होते कारण त्याचे बालपण गालीलात गेले होते. तरीही शिष्यांच्या कौशल्यावर (त्यांच्यापैकी काही मासे धरणारे होते) भरवसा ठेवून तो निवांत झोपला होता.—मत्तय ४:१८, १९.

१५. आपल्या शिष्यांवर भरवसा दाखवण्याच्या येशूच्या वृत्तीचे आपण कसे अनुकरण करू शकतो?

१५ शिष्यांवर भरवसा ठेवण्याच्या येशूच्या या वृत्तीचे आपण अनुकरण करू शकतो का? काहींना इतरांना जबाबदाऱ्‍या सोपवणे अतिशय जड जाते. जणू, लगाम आपल्याच हातात असावा असे त्यांना वाटते. कदाचित त्यांना असे वाटत असावे की ‘मी केलं तरच हे काम चांगल्याप्रकारे पूर्ण होईल!’ पण सगळी कामे एकच जण करत राहिला तर दुसरे काही करण्यासाठी त्याच्याजवळ शक्‍तीच उरणार नाही आणि कदाचित तो आपल्या कुटुंबालाही पुरेसा वेळ देऊ शकणार नाही. शिवाय, इतरांना त्यांच्या कुवतीनुसार कामे आणि जबाबदाऱ्‍या न सोपवल्यास आपण त्यांना आवश्‍यक अनुभवापासून आणि प्रशिक्षणापासून वंचित ठेवत असतो. म्हणूनच आपण इतरांवर भरवसा ठेवून त्यांच्यावर जबाबदाऱ्‍या सोपवायला शिकले पाहिजे; असे करणे शहाणपणाचे आहे. ‘याबाबतीत मी ख्रिस्ताच्या मनोवृत्तीचे अनुसरण करतो का? मी आनंदाने इतरांना जबाबदाऱ्‍या हाताळण्याची संधी देतो का, ते अगदी मन लावून दिलेली जबाबदारी पार पाडतील असा मी त्यांच्याविषयी भरवसा बाळगतो का?’ असे आपण स्वतःला विचारले पाहिजे.

येशूने शिष्यांवर असलेला भरवसा व्यक्‍त केला

१६, १७. आपले शिष्य लवकरच आपल्याला एकटे सोडून जातील हे माहीत असूनही, पृथ्वीवरील आपल्या जीवनाच्या शेवटल्या रात्री येशूने प्रेषितांना कोणते आश्‍वासन दिले?

१६ आपल्याला शिष्यांवर भरवसा आहे हे येशूने आणखी एका मार्गाने दाखवले. त्याने त्यांच्यासमोर या भावना व्यक्‍त केल्या. पृथ्वीवर त्याच्या शेवटच्या रात्री तो आपल्या शिष्यांशी अतिशय उभारणीकारक शब्दांत बोलला. त्या घटनेकडे बारकाईने पाहू या.

१७ त्या संध्याकाळी बरेच काही घडले होते. येशूने शिष्यांचे पाय धुऊन त्यांच्यासाठी नम्रतेचा आदर्श घालून दिला. त्यानंतर त्याने सांजभोजनाच्या विधीची सुरवात केली जो नंतर त्याच्या मृत्यूचा स्मारक म्हणून साजरा केला जाणार होता. यानंतर प्रेषितांमध्ये त्यांच्यापैकी सर्वात श्रेष्ठ कोण यावरून पुन्हा एकदा मोठा वाद झाला. पण, येशूने सहनशीलता दाखवली. आणि त्यांना दटावण्याऐवजी त्याने त्यांना समजावून सांगितले. पुढे काय होणार याविषयी त्याने त्यांना सांगितले: “तुम्ही सर्व ह्‍याच रात्री माझ्याविषयी अडखळाल; कारण असा शास्त्रलेख आहे की, मी मेंढपाळाला मारीन आणि कळपातल्या मेंढरांची दाणादाण होईल.” (मत्तय २६:३१; जखऱ्‍या १३:७) आपले सर्वात जवळचे साथीदारच आपल्याला सोडून जातील आणि ते देखील आपल्याला त्यांची सर्वात जास्त गरज असताना, हे येशूला माहीत होते. तरीसुद्धा त्याने त्यांची निंदा केली नाही. उलट त्याने त्यांना सांगितले: “परंतु मी उठविला गेल्यानंतर तुमच्या आधी गालीलात जाईन.” (मत्तय २६:३२) होय, त्याने त्यांना हमी दिली की तुम्ही मला सोडून जाल पण म्हणून मी तुम्हाला सोडून देणार नाही. त्याच्यावर येणार असलेली कठीण परीक्षा सरून गेल्यानंतर तो पुन्हा त्यांना भेटणार होता.

१८. गालीलात येशूने आपल्या शिष्यांवर कोणती महत्त्वाची जबाबदारी सोपवली आणि प्रेषितांनी ही जबाबदारी कशाप्रकारे पार पाडली?

१८ येशूने दिलेला शब्द पाळला. पुनरुत्थान झाल्यानंतर तो गालीलात आपल्या ११ प्रेषितांपुढे प्रकट झाला; या प्रसंगी प्रेषितांसोबत आणखीही बरेच जण तेथे एकत्रित झाले होते. (मत्तय २८:१६, १७; १ करिंथकर १५:६) तेथे येशूने त्यांच्यावर एक अतिशय महत्त्वाची जबाबदारी सोपवली: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.” (मत्तय २८:१९, २०) प्रेषितांनी या आज्ञेचे अगदी विश्‍वासूपणे पालन केले हे आपल्याला प्रेषितांची कृत्ये या पुस्तकावरून अगदी स्पष्टपणे दिसून येते. त्यांनी पहिल्या शतकात सुवार्तेच्या प्रचाराच्या कार्याचे विश्‍वासूपणे नेतृत्त्व केले.—प्रेषितांची कृत्ये २:४१, ४२; ४:३३; ५:२७-३२.

१९. पुनरुत्थानानंतर येशूने जे केले त्यावरून आपल्याला ख्रिस्ताच्या मनोवृत्तीबद्दल काय शिकायला मिळते?

१९ या अहवालातून बऱ्‍याच गोष्टी आपल्याला समजल्या, पण खासकरून ख्रिस्ताच्या मनोवृत्तीबद्दल आपल्याला काय शिकायला मिळाले? आपल्या शिष्यांच्या व्यक्‍तिमत्त्वाची सगळ्यात नकारात्मक बाजू देखील येशूने पाहिली होती, पण तरीसुद्धा ‘त्याने शेवटपर्यंत त्यांच्यावर प्रेम केले.’ (योहान १३:१) त्यांच्या चुकांची पूर्ण कल्पना असतानाही, त्याने त्यांच्यावर भरवसा व्यक्‍त केला. आणि हा आत्मविश्‍वास पोकळ निघाला नाही. त्यांच्यावर विश्‍वास आणि भरवसा व्यक्‍त केल्यामुळे साहजिकच त्यांना उत्तेजन मिळाले आणि त्यामुळे येशूने आज्ञापिलेले कार्य पूर्ण करण्याचा त्यांनी अधिकच दृढ निर्धार केला.

२०, २१. आपल्या बांधवांबद्दल आपण सकारात्मक दृष्टिकोन कसा दाखवू शकतो?

२० या बाबतीत आपण कशाप्रकारे येशूच्या मनोवृत्तीचे अनुकरण करू शकतो? आपल्या बांधवांबद्दल निराशावादी दृष्टिकोन बाळगू नका. तुमचे त्यांच्याबद्दल जितके वाईट मत असेल तितकेच ते तुमच्या बोलण्यातून आणि कृतींतून दिसून येण्याची शक्यता आहे. (लूक ६:४५) पण बायबल म्हणते त्याप्रमाणे, प्रेम “सर्व काही खरे मानण्यास [भरवसा ठेवण्यास] सिद्ध असते.” (१ करिंथकर १३:७) प्रेम हे नकारात्मक नव्हे तर सदैव सकारात्मक असते. प्रेम इतरांना वरती आणण्याचा प्रयत्न करते, खाली खेचण्याचा नव्हे. धाक दाखवून काम करून घेणाऱ्‍यापेक्षा प्रेम आणि उत्तेजन देणाऱ्‍याला लोक सहसा सहकार्य द्यायला तयार होतात. जेव्हा आपण इतरांवर भरवसा व्यक्‍त करतो तेव्हा आपण त्यांना उन्‍नती करायची प्रेरणा देतो, त्यांचे धैर्य वाढवतो. (१ थेस्सलनीकाकर ५:११) ख्रिस्ताप्रमाणे आपणही आपल्या बांधवांबद्दल सकारात्मक दृष्टिकोन बाळगल्यास, आपण त्यांच्याशी अशाप्रकारे वागण्याचा प्रयत्न करू ज्यामुळे त्यांना उत्तेजन मिळेल आणि त्यांचे चांगले गुण अधिकच विकसित होतील.

२१ ख्रिस्ताची मनोवृत्ती आत्मसात करून व्यवहारात ती प्रदर्शित करणे म्हणजे केवळ येशूने केलेल्या काही गोष्टी आपणही करणे असे नाही. या आधीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे खऱ्‍या अर्थाने येशूचे अनुसरण करायचे असल्यास आधी आपण त्याच्या दृष्टिकोनातून विचार करायला शिकले पाहिजे. शुभवर्तमानाची पुस्तके येशूच्या व्यक्‍तिमत्त्वाच्या आणखी एका खास पैलूवर प्रकाश टाकतात आणि तो म्हणजे त्याला नेमण्यात आलेल्या कार्याबाबतचा त्याचा दृष्टिकोन आणि त्याच्या भावना. पुढच्या लेखात हाच विषय हाताळलेला आहे.

[तळटीपा]

^ परि. 1 सदर लिखाणाच्या बनावटी लेखकाने येशू कसा दिसत होता, अर्थात, त्याच्या केसांचा, दाढीचा व डोळ्यांचा रंग कसा होता याचेही वर्णन केले आहे. बायबलचे एक अनुवादक एड्‌गर जे. गुडस्पीड यांनी याबाबतीत असे स्पष्टीकरण दिले की, “चित्रकारांच्या मार्गदर्शन पुस्तकांत येशूच्या रंगरूपाचे जे वर्णन केले होते त्याला प्रसिद्धी देण्याच्या उद्देशाने” हे बनावटी लिखाण केले गेले.

^ परि. 4 या मुलांपैकी काही लहान तर काही मोठी होती, असे भासते. मूळ भाषेत या ठिकाणी वापरलेला ‘बाळके’ हा शब्द याईराच्या १२ वर्षांच्या मुलीच्या संदर्भातही वापरलेला आढळतो. (मार्क ५:३९, ४२; १०:१३) पण याच घटनेच्या लूकने दिलेल्या अहवालात अगदी तान्ह्या बाळांनाही सूचित करण्यासाठी वापरला जाणारा शब्द आहे.—लूक १:४१; २:१२; १८:१५.

^ परि. 11 टेहळणीबुरूजच्या एप्रिल १, १९९८ अंकात “तुम्ही त्यांना प्रतिष्ठा देता का?” हा लेख पाहा.

तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकता का?

• येशूजवळ येणाऱ्‍या मुलांना जेव्हा शिष्य अडवू लागले तेव्हा येशूने काय केले?

• येशूने कशाप्रकारे इतरांच्या भावनांबद्दल कदर दाखवली?

• शिष्यांवर भरवसा व्यक्‍त करण्याच्या येशूच्या वृत्तीचे आपण कसे अनुकरण करू शकतो?

• येशूने आपल्या शिष्यांबद्दल जो आत्मविश्‍वास बाळगला त्यातून आपण काय शिकू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१६ पानांवरील चित्र]

मुलांना येशूची भीती वाटत नव्हती

[१७ पानांवरील चित्र]

येशू लोकांशी सहानुभूतीने वागायचा

[१८ पानांवरील चित्र]

ज्यांच्याशी न संकोचता बोलता येते असे वडील मंडळीला मिळालेला आशीर्वाद असतात