व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धोक्याच्या क्षेत्रापासून सुरक्षित अंतर राखा!

धोक्याच्या क्षेत्रापासून सुरक्षित अंतर राखा!

धोक्याच्या क्षेत्रापासून सुरक्षित अंतर राखा!

ज्वालामुखीच्या उद्रेकाची पाहणी करणे, पुराव्यांचा अंदाज बांधणे आणि नंतर इशारा देणे हे ज्वालामुखी तज्ज्ञांचे काम आहे. (फ्युजेन पर्वतातील ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर पोलिस लोकांना धोक्याच्या क्षेत्राबाहेर घालवत होते.) त्याचप्रमाणे, बायबलचे विद्यार्थी, “ह्‍या युगाच्या समाप्तीचे” चिन्ह पाहून लोकांना पुढील धोक्याचा इशारा देतात.—मत्तय २४:३.

जगव्याप्त विपत्तीचा इशारा देणाऱ्‍या बायबलमधील याच अध्यायात त्याआधीच्या घटनांचे वर्णन दिले आहे: “राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील. . . . पुष्कळ खोटे संदेष्टे उठतील व अनेकांस फसवितील; आणि अनीति वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीति थंडावेल. . . . [आणि] सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.”—मत्तय २४:७-१४.

या भविष्यवाणीची हल्लीच्या काळातील पूर्णता जाणून घेण्यासाठी आपल्याला जागतिक घटनांचे अभ्यासक बनण्याची गरज नाही. कारण १९१४ पासून तर आपण त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहोत. या शतकात दोन महायुद्धे झाली आहेत, असंख्य मुलकी युद्धे, स्थानिक संघर्ष आणि जातीय व धार्मिक संघर्ष झाले आहेत. अशा या युध्दांच्या आणि संघर्षांच्या परिणामात मानवांनी अन्‍नटंचाई अनुभवली आहे; शिवाय, नैसर्गिक आपत्तींमुळे हालअपेष्टा सहन केली आहे. भूकंपाने अनेकांना गिळंकृत केले आहे. संशयास्पद पुढारी आणि धर्मवेड्या अनुयायांचे पंथ निर्माण झाले आहेत. “अनीति वाढल्यामुळे” लोकांमधील प्रेमळ वृत्ती नाहीशी झाली आहे आणि शेजारधर्म तर औषधालाही उरलेला नाही.

जागतिक प्रचार कार्य हा युगाच्या समाप्तीच्या चिन्हाचा आणखी एक पैलू निश्‍चितच पूर्ण होत आहे. या पत्रिकेचे मुखपृष्ठ पाहिले तर तुम्हाला “यहोवाच्या राज्याचा प्रकाशक” हे शब्द शीर्षकात दिसतील. टेहळणी बुरूज हे नियतकालिक, सबंध जगभरात “राज्याची ही सुवार्ता” घोषित करणाऱ्‍यांचे मुख्य साधन आहे; त्याचे १३२ भाषांमध्ये प्रकाशन होते आणि त्याच्या २२० कोटींहून अधिक प्रतींचे वितरण होते. विश्‍वाचा निर्माणकर्ता, यहोवा देव याने एक राज्य स्थापले आहे आणि त्याच्याद्वारे तो लवकरच सध्याच्या दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश करून पृथ्वीवर परादीस आणील हा संदेश त्या सुवार्तेत सांगितला जातो. देव लवकरात लवकर कार्यवाही करणार आहे याचे चिन्ह दिसू लागले आहे; त्यामुळे या व्यवस्थीकरणातील लोकांचे जीव धोक्यात असल्याचे स्पष्ट होते.—पडताळा २ तीमथ्य ३:१-५; २ पेत्र ३:३, ४; प्रकटीकरण ६:१-८.

यहोवाचा भयंकर दिवस

यहोवाचा न्यायदंड बजावण्याची वेळ येईल तेव्हा काय होईल? त्याचे वर्णन अशाप्रकारे दिले आहे: “मी आकाशात व पृथ्वीवर रक्‍त, अग्नि व धुराचे लोळ अशी चिन्हे दाखवीन. परमेश्‍वराचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्‍तमय होईल.”—योएल २:३०, ३१.

कोणत्याही ज्वालामुखीच्या उद्रेकापेक्षा किंवा भूकंपापेक्षाही भयानक आणि सर्वविनाशक असलेला तो दिवस लवकरच येणार आहे. सफन्या संदेष्टा म्हणतो: “परमेश्‍वराचा मोठा दिवस समीप आहे; तो येऊन ठेपला आहे; वेगाने येत आहे.  . . त्याच्या ईर्ष्येच्या अग्नीने सर्व देश भस्म होईल, कारण तो देशातील सर्व रहिवाश्‍यांचा अंत करील आणि तोहि एकाएकी करील.” “परमेश्‍वराच्या क्रोधदिवशी त्यांच्या सोन्यारुप्याने त्यांचा बचाव होणार नाही.” तरीही त्या भयंकर दिवसातून बचावण्याचा एक मार्ग मात्र आहे.—सफन्या १:१४-१८.

सफन्या पुढे त्या मार्गाविषयी म्हणतो: “परमेश्‍वराचा क्रोधदिन तुम्हावर येईल त्यापूर्वी ताळ्यावर या. देशांतील सर्व नम्र जनांनो, . . . त्याचा आश्रय करा, धार्मिकता व नम्रता यांचे अवलंबन करा, म्हणजे कदाचित परमेश्‍वराच्या क्रोधदिनी तुम्ही दृष्टीआड व्हाल.” (सफन्या २:२, ३) ‘यहोवाचा आश्रय घेऊन, धार्मिकता व नम्रता यांचे अवलंबन करून’ आपण स्वतःचे संरक्षण करू शकतो. आज कोण यहोवाच्या आश्रयात आहेत?

“यहोवा” हा शब्द ऐकल्या ऐकल्या निश्‍चितच तुम्हाला यहोवाचे साक्षीदार आठवले असतील कारण ते साक्ष देण्याचे काम करतात. ही पत्रिका तुम्हाला त्यांच्याकडूनच मिळाली असेल. ते नीतिप्रिय, प्रामाणिक नागरिक म्हणून ओळखले जातात. ते “नवा मनुष्य” धारण करण्याचा प्रयत्न करत आहेत; त्यासाठी त्यांना नम्रता हा गुण देखील विकसित करावा लागतो. (कलस्सैकर ३:८-१०) यहोवाच्या दृश्‍य संघटनेतून शिक्षण मिळाल्याचा हा परिणाम आहे असे ते कबूल करतात; संपूर्ण जगभरात यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानिक मंडळ्या या संघटनेचे प्रतिनिधीत्व करतात. होय, तुम्हीसुद्धा जगभरातल्या यहोवाच्या साक्षीदारांमधील ‘बंधुवर्गात’ संरक्षण मिळवू शकता.—१ पेत्र ५:९.

आताच संरक्षण मिळवा

यहोवाचा आश्रय घेऊन आपल्याला संरक्षण मिळवायचे असेल, तर आपल्याला त्याचे मित्र व्हावे लागेल. त्यासाठी काय करण्याची गरज आहे? बायबलमध्ये याचे उत्तर सापडते: “जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हांस ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे.” (याकोब ४:४) सध्याचे दुष्ट जग देवाविरुद्ध बंडखोरीचा आत्मा प्रदर्शित करते; त्यामुळे आपल्याला देवाचे मित्र व्हायचे असेल, तर या दुष्ट जगाशी असलेला कोणताही संबंध तोडून टाकायला हवा.

बायबल असा सल्ला देते: “जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीति करू नका. जर कोणी जगावर प्रीति करीत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीति नाही. कारण जगात जे सर्व आहे ते, म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी, ही पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत; आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.” (१ योहान २:१५-१७) अनियंत्रित कामवासना, पैशांचा लोभ आणि अधिकाराचा दुरुपयोग या सारख्या शारीरिक वासना आजकाल पुष्कळ लोकांमध्ये आढळतात. पण यहोवाच्या बाजूचे व्हायचे असेल, तर या वासनांवर मात करावी लागेल.—कलस्सैकर ३:५-८.

ही पत्रिका तुम्ही अनेकदा वाचली असेल आणि यातील बायबल भविष्यवाणींच्या स्पष्टीकरणाशी तुमचे सहमतही असेल. परंतु, कदाचित यहोवाच्या साक्षीदारांसोबत सहवास राखायला तुम्ही मागेपुढे पाहत असाल. परंतु, एखादी आपत्ती येत आहे असे आपल्याला कळाल्यावर फक्‍त इशारा ऐकणे पुरे आहे का? आपण फ्युजेन पर्वताच्या दुर्घटनेमध्ये पाहिले होते त्याप्रमाणे आपल्याला इशाऱ्‍यानुसार हालचाल करण्याची आवश्‍यकता आहे. ज्वालामुखीचे जवळून चित्र घेण्याच्या उद्देशाने तेथे राहिलेल्या जवळजवळ १५ पत्रकारांचा आणि फोटोग्राफर्सचा मृत्यू झाला हे विसरू नका. एक फोटोग्राफर तर कॅमेऱ्‍याच्या बटनावर बोट ठेवल्याच्या स्थितीतच मरण पावला. “मला ज्वालामुखीच्या तोंडाशी मरण यावे,” अशी इच्छा एका ज्वालामुखी तज्ज्ञाने व्यक्‍त केली होती आणि त्याची इच्छा पूर्ण झाली. ते सगळेजण आपापल्या कामाला समर्पित होते. तरीही त्यांना आपला प्राण गमवावा लागला. इशाऱ्‍याकडे दुर्लक्ष करण्याची एवढी मोठी किंमत त्यांना द्यावी लागली.

देव या दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश करणार आहे, हा संदेश अनेकजण ऐकतात आणि काही अंशी त्यांना या इशाऱ्‍याचे महत्त्व देखील कळते. ते म्हणतात, ‘एखाद्या दिवशी येईलही नाश, पण त्याला पुष्कळ अवकाश आहे.’ यहोवाच्या दिवसाला आणखी बराच वेळ आहे असे ते सहज बोलून जातात; कारण सध्याच्या गोष्टी त्यांना जास्त महत्त्वाच्या वाटत असतात आणि त्यांपासून ते आपले लक्ष विचलित करू इच्छित नाहीत.

बारूखची हीच समस्या होती. प्राचीन यिर्मया संदेष्ट्याचा सहायक असल्याकारणाने त्याने धीटपणे इस्राएलांना येरूशलेमवर येणाऱ्‍या संकटाचा इशारा दिला. एकदा मात्र त्याला आपल्या कामाचा कंटाळा आला. त्या वेळी, यहोवाने त्याला सुधारले: “तू आपणासाठी मोठाल्या गोष्टीची वांच्छा करितोस काय? ती करू नको.” बारूखला धनसंपत्ती, मोठेपणा किंवा आर्थिक सुरक्षा यांपैकी कोणत्याच ‘मोठाल्या गोष्टी आपणासाठी मिळवायच्या’ नव्हत्या. त्याला फक्‍त एक काम करायचे होते; त्याला देवाची इच्छा पूर्ण करून लोकांना देवाच्या बाजूने होण्यासाठी मदत करायची होती. याच्या बदल्यात, ‘जेथे जेथे तो जाणार होता तेथे तो जिवानिशी सुटणार’ होता. (यिर्मया ४५:१-५) त्याचप्रमाणे आपणही ‘आपणासाठी मोठाल्या गोष्टी मिळवण्याऐवजी’ यहोवाचा आश्रय घेतला पाहिजे म्हणजे आपले जीवन वाचू शकेल.

बाराहून अधिक पोलिस आणि स्वयंसेवक अग्निशामक दलातले लोक फ्युजेन पर्वतावरील तप्त ज्वालामुखीच्या लपेटात आले, तेव्हा ते सगळे आपले काम पार पाडत होते. ते, लोकांना मदत करत होते, त्यांचे संरक्षण करत होते. या जगामध्ये सुधार घडवून आणायला झटणाऱ्‍या लोकांप्रमाणेच ते इतरांचे कल्याण करत होते. तथापि, त्यांचे हेतू कितीही चांगले असले, तरीही “जे वाकडे आहे ते सरळ होत नाही.” (उपदेशक १:१५) आताचे वाकडे व्यवस्थीकरण सरळ करता येणार नाही. परंतु, ज्या व्यवस्थीकरणाचा देव लवकरच नाश करणार आहे त्याला वाचवायला “जगाचा मित्र” होणे उचित ठरेल का?

निघून गेल्यावर पुन्हा परतू नका

धोक्याच्या व्यवस्थेतून पळून जाणे सोपे आहे; परंतु, ‘बंधुवर्गाच्या’ संरक्षणात टिकून राहणे कठीण आहे. (१ पेत्र २:१७) लक्षात ठेवा की, फ्युजेन पर्वताजवळचे शेतकरी आपले घरदार सोडून पळाले होते पण नंतर ते पुन्हा शेती पाहायला परतले. कदाचित, त्यांना पूर्वीच्या “सामान्य” जीवनाची ओढ लागली असावी. पण परत जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला तो शहाणपणाचा नव्हता. कदाचित धोक्याच्या क्षेत्रात परत जाण्याची ही त्यांची पहिलीच वेळ नसेल. या आधीही ते काही काळासाठी तेथे गेले असतील आणि काहीच झाले नसेल. नंतर ते जरा जास्त वेळ तेथे राहिले असतील आणि तरीही काही झाले नसेल. अशारितीने त्यांना धोक्याच्या क्षेत्रात जाण्याची जणू सवय लागली असेल आणि त्यामुळे तेथे जास्त वेळ राहण्याचे धाडसही वाढत गेले असेल.

‘युगाच्या समाप्तीला’ देखील असेच घडेल असे येशू ख्रिस्ताने सांगितले होते. तो म्हणाला: “तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा तारवात गेला त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते, आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहवून नेईपर्यंत त्यास समजले नाही [“त्यांनी दखल घेतली नाही,” NW]; तसेच मनुष्याच्या पुत्राचेहि येणे होईल.”—मत्तय २४:३, ३८, ३९.

येशू खाणे, पिणे आणि लग्न करण्याविषयी बोलला याकडे लक्ष द्या. या कोणत्याही गोष्टी यहोवाच्या नजरेत चुकीच्या नाहीत. मग कुठे चुकत होते? नोहाच्या काळातल्या लोकांनी “दखल घेतली नाही” कारण ते आपल्या दररोजच्या जीवनातच व्यस्त होते. आणीबाणीच्या समयी दररोजच्या “सामान्य” जीवनासारखे जीवन जगता येत नाही. सध्याच्या नाशवंत जगातून पळ काढल्यावर किंवा त्यापासून स्वतःला दूर केल्यावर काही घेण्यासाठी पुन्हा तेथे जाण्याचा मोह तुम्ही टाळला पाहिजे. (१ करिंथकर ७:३१) कदाचित तुम्ही आध्यात्मिक सुरक्षा क्षेत्राच्या बाहेर जाऊन पुन्हा आत येत असाल आणि तुम्हाला काहीही होत नसेल किंवा तुम्ही कोणाच्या नजरेतही पडत नसाल. परंतु, यामुळे हळूहळू तुमची धिटाई वाढेल; तुम्ही वारंवार जगात जात राहाल आणि आधीपेक्षा जास्त वेळ तेथे राहाल. लवकरच तुमच्या मनोवृत्तीत बदल होईल आणि “आज थोडाच अंत येणार आहे” असे तुम्हीसुद्धा म्हणू लागाल.

पत्रकारांसाठी आणि फोटोग्राफर्ससाठी थांबल्यामुळे ज्वालामुखीच्या स्फोटात जीव गमावलेल्या तीन टॅक्सी ड्रायव्हर्सचासुद्धा विचार करा. आज देखील काहीजण, जगामध्ये परतलेल्या इतरांच्या मागोमाग जाऊन, त्यांच्याशी संगती करत असतील. जगामध्ये परतण्याचे कारण काहीही असू शकते; पण इतकी मोठी जोखीम पत्करून धोक्याच्या क्षेत्रात जाणे मुळीच शहाणपणाचे नाही.

फ्युजेन पर्वतावरील ज्वालामुखीत दगावलेल्या सगळ्यांनी सुरक्षा रेषा पार करून धोक्याच्या क्षेत्रात प्रवेश केला होता. ज्वालामुखीचा स्फोट एक न एक दिवशी होईल हे प्रत्येकाला माहीत होते, पण त्याच दिवशी स्फोट होईल असे कोणाला वाटले नव्हते. युगाच्या समाप्तीचे चिन्ह पाहून अनेकांना असेच वाटते की यहोवाचा दिवस येईल; पण इतक्या लवकर येईल असे त्यांना वाटत नसते. काहींना तर असेही वाटते की, तो “आज” निश्‍चितच येणार नाही. ही मनोवृत्ती जीवघेणी ठरू शकते.

प्रेषित पेत्राने अशीही ताकीद दिली होती की, “चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल.” त्यामुळे आपण सतर्क राहायला पाहिजे आणि “देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत . . . त्याच्या दृष्टीत निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितके प्रयत्न” केले पाहिजेत. (२ पेत्र ३:१०-१४) सध्याच्या दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश झाल्यावर, देवाच्या राज्यामध्ये पृथ्वीचे एका बगीच्यात रूपांतर होणार आहे. म्हणून आपल्या मनाने कोणतीही सबब सांगितली तरी धोक्याच्या क्षेत्रात जाण्याच्या मोहात आपण कधीच पडू नये; कारण ज्या दिवशी आपण सुरक्षा रेषा पार करू तोच कदाचित यहोवाचा दिवस ठरेल.

यहोवाच्या लोकांसोबत आश्रय घ्या आणि त्यांच्यासोबतच राहा.

[७ पानांवरील चित्रे]

यहोवाच्या लोकांसोबत आश्रय घ्या आणि त्यांच्यासोबतच राहा

[४ पानांवरील चित्राचे श्रेय]

Iwasa/Sipa Press