व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबलचे मोल जाणणारे—सिरिल लूकारियस

बायबलचे मोल जाणणारे—सिरिल लूकारियस

बायबलचे मोल जाणणारे—सिरिल लूकारियस

सन १६३८ सालची गोष्ट. उन्हाळ्याच्या एका दिवशी ऑटोमन साम्राज्याची राजधानी, कॉन्स्टान्टिनोपल (सध्याचे इस्तांबूल) याच्या जवळ असलेल्या मारमरा समुद्रात एक प्रेत पाण्यावर तरंगताना कोळ्यांना दिसले. प्रेत कोणाचे आहे हे कळल्यानंतर त्यांना अक्षरशः धस्स झाले. कॉन्स्टान्टिनोपलचे प्रधान बिशप अर्थात ऑर्थोडॉक्स चर्चचे प्रमुख, सिरिल लूकारियस यांचे ते प्रेत होते. कोणीतरी गळा दाबून त्यांचा खून केला होता आणि मृतदेह पाण्यात फेकून दिला होता. अशाप्रकारे १७ व्या शतकातील एका महान धार्मिक व्यक्‍तीची कोणीतरी अतिशय निर्घृणपणे हत्या करून जलसमाधी दिली होती.

लूकारियस यांचे एक स्वप्न होते. ते म्हणजे बायबलच्या ग्रीक शास्त्रवचनांचे सर्वसामान्य ग्रीक लोकांना समजेल अशा बोलीभाषेत भाषांतर करणे. पण, दुःखाची गोष्ट अशी की त्यांचे हे स्वप्न निव्वळ स्वप्नच राहिले. त्यांचे अपुरे राहिलेले दुसरे एक स्वप्न म्हणजे, आर्थोडॉक्स चर्चमध्ये “बायबलचे सत्य अतिशय साध्यासोप्या पद्धतीने शिकवले जावे.” पण, लूकारियस होते तरी कोण? आणि आपले स्वप्न वास्तविकतेत उतरवताना त्यांना कोणत्या दिव्यांतून जावे लागले?

त्यांनी पाहिलेले धक्कादायक अजाणतेपण

सिरिल लूकारियस यांचा जन्म १५७२ साली व्हेनिसच्या कह्‍यात असलेल्या कॅन्डिया, (आजचे ईराक्लीओ) क्रीट मध्ये झाला. अतिशय बुद्धिमान असल्यामुळे त्यांचे शिक्षण इटलीच्या व्हेनिस आणि पाडुआ शहरांमध्ये झाले आणि शिक्षण झाल्यानंतर त्यांनी देशभर तसेच इतर देशांत बरेचदा प्रवास केला. चर्चच्या लोकांमधील मतभेद, गटबाजी पाहून ते त्वेषाने पेटून उठले आणि युरोपमध्ये चाललेल्या सुधार चळवळीचा त्यांच्यावर प्रभाव पडला. याच कारणामुळे कदाचित त्यांनी जिनीव्हाला भेट दिल्याचे समजते कारण त्यावेळी जिनीव्हामध्ये कैल्विनवादाचे वारे होते.

पोलंडला दिलेल्या भेटीत लूकारियस यांच्या लक्षात आले, की लोकांना बायबलचे काहीएक ज्ञान नसल्यामुळे तिथल्या ऑर्थोडॉक्स चर्चच्या सर्वच लोकांची म्हणजे चक्क पाळकांची आणि सर्वसामान्य लोकांचीही आध्यात्मिक स्थिती अतिशय चिंताजनक होती. तसेच अलैक्झेन्ड्रिया आणि कॉन्स्टान्टिनोपल येथे काही चर्चमध्ये बायबल पठणाकरता वापरले जाणारे प्रवचन-मंच काढून टाकण्यात आले होते हे पाहून त्यांना जबरदस्त धक्का बसला.

सन १६०२ मध्ये लूकारियस, अलैक्झेन्ड्रियाला गेले. तेथे, मीलीटिओस या आपल्या नातेवाईकानंतर मुख्य बिशपचे पद त्यांनी भूषविले. या पदावर आल्यानंतर, चर्चमध्ये सुधारणा करू इच्छिणाऱ्‍या युरोपच्या धर्म-विद्वानांशी ते पत्रव्यवहार करू लागले. अशाच एका पत्रात त्यांनी म्हटले होते, की ऑर्थोडॉक्स चर्चमध्ये बऱ्‍याच चुकीच्या गोष्टी खपवून घेतल्या जातात. तर इतर काही पत्रांत त्यांनी असे म्हटले होते, की चर्चमध्ये अंधविश्‍वासाऐवजी “बायबलचे साध्यासोप्या भाषेत शिक्षण” सुरू झाले पाहिजे आणि चर्चमध्ये होणाऱ्‍या प्रत्येक गोष्टीला बायबलचा आधार असला पाहिजे.

आपल्या मनाप्रमाणे बायबल शिकवणाऱ्‍या पाळकांना लोक येशू आणि प्रेषितांप्रमाणेच दर्जा देत आहेत हे पाहूनही लूकारियस यांना धक्का बसला नसेल तरच नवल. “मनुष्यनिर्मित रुढी-परंपरांना लोक बायबल इतकेच महत्त्व देत आहेत ही कल्पना आता काही केल्या मला सहन होत नाही,” असे त्यांनी म्हटले. (मत्तय १५:६) लूकारियस यांच्या मते मूर्तिपूजा अनर्थकारी असून संतांची उपासना करणे म्हणजे मध्यस्थ असलेल्या येशूचा अपमान करण्यासारखे आहे असेही त्यांनी म्हटले.—१ तीमथ्य २:५.

प्रधान बिशप पदाचे बाजारीकरण

लूकारियस यांच्या या विचारांमुळे आणि रोमन कॅथलिक चर्चविषयी त्यांच्या मनात खदखदणाऱ्‍या द्वेषामुळे जेस्युईटच्या तसेच कॅथलिक लोकांशी युती करू इच्छिणाऱ्‍या ऑर्थोडॉक्स चर्च सदस्यांच्या त्वेषाला, छळाला त्यांना सामोरे जावे लागले. पण, इतका प्रखर विरोध होऊनसुद्धा १६२० मध्ये कॉन्स्टान्टिनोपलचे प्रधान बिशप म्हणून लूकारियस निवडून आले. त्यावेळी ऑर्थोडॉक्स चर्चच्या प्रधान बिशपचे पद ऑटोमन साम्राज्याच्या हातात होते. त्यामुळे पैसे चारून वाटेल त्या व्यक्‍तीला प्रधान बिशपच्या पदावरून काढून दुसऱ्‍याला पदारूढ करता येत होते.

लूकारियस यांचे शत्रू, खासकरून ज्यैस्युईट लोक आणि सर्वेसर्वा असलेली काँग्रीगेशीओ दे प्रॉपागॅन्डा फीदे (धर्म-विश्‍वासाची प्रचार समिती) नामक खतरनाक पोप समितीने त्यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांच्याविरुद्ध कट रचण्यास सुरवात केली. काइरीलॉस लूकारियस या पुस्तकात असे म्हटले आहे: “आपल्या या प्रयत्नांत जैस्युईट लोकांनी हरएक शक्कल लढवून पाहिली. छळ-कपट केले, खोटे आरोप लावले, खुशामत केली आणि लाच (ऑटोमन अधिकाऱ्‍यांचे मन जिंकण्याकरता लाच देण्याचा प्रकार सर्वात प्रभावकारी होता.) देखील दिली.” याचा परिणाम असा झाला, की १६२२ मध्ये लूकारियस यांना देशातून हद्दपार करून रोड्‌झ द्वीपावर पाठवण्यात आले. त्यांच्यानंतर, मग आमास्यामध्ये राहणाऱ्‍या ग्रेगरीने २०,००० चांदीची नाणी देण्याचे वचन देऊन प्रधान बिशपचे पद विकत घेतले. पण, ग्रिगरीला इतकी रक्कम जमा करता न आल्यामुळे एड्रिनोपलच्या एन्थिमसने हे पद विकत घेतले पण काही काळातच त्यालाही राजीनामा द्यावा लागला. पण, आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे प्रधान बिशपचे पद पुन्हा लूकारियस यांनाच मिळाले.

चालून आलेल्या या संधीचा फायदा, बायबलचे एक भाषांतर व त्यावर आधारित हस्तपत्रिका प्रकाशित करून ऑर्थोडॉक्स पाळकांना तसेच सर्वसामान्य लोकांना बायबलचे शिक्षण देण्यासाठी करायचा असा चंग लूकारियस यांनी बांधला. आणि त्यासाठी एका इंग्रज राजदूताला हाताशी धरून त्यांनी कॉन्स्टान्टिनोपलमध्ये एक छपाई यंत्र आणण्याची व्यवस्था केली. पण १६२७ मध्ये छपाई यंत्र कॉन्स्टान्टिनोपलमध्ये आले तेव्हा लूकारियस यांनी राजकीय उद्दिष्टांसाठी हे यंत्र आणले आहे असा आरोप त्यांच्या शत्रूंनी त्यांच्यावर लावला. शेवटी, ते यंत्र नष्ट केल्यावर कुठे त्यांचे समाधान झाले. त्यामुळे जिनीव्हाच्या छपाई यंत्रांचा उपयोग करण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता.

ख्रिस्ती शास्त्रवचनांचे भाषांतर

बायबलविषयी तसेच लोकांना प्रशिक्षित करणाऱ्‍या त्यातील सामर्थ्याविषयी लूकारियस यांच्या मनात खूप आदर होता; त्यामुळे बायबलचा शब्द न्‌ शब्द सर्वसामान्य लोकांना समजेल अशा साध्यासोप्या भाषेत बायबलचे भाषांतर करावे असे त्यांना मनापासून वाटू लागले. त्यांच्या लक्षात आले, की ईश्‍वरप्रेरणेने लिहिलेल्या बायबलच्या मूळ हस्तलिखितांची भाषा चालू काळातल्या सर्वसामान्य माणसाला समजण्याजोगी नव्हती. त्यामुळे लूकारियस यांनी सर्वात पहिल्यांदा ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांना त्यांच्या काळात बोलल्या जाणाऱ्‍या ग्रीक भाषेत अनुवादित करण्याची आज्ञा दिली. मैक्सिमस कॉलीपोलीटस नावाच्या एका विद्वान मठवासीने मार्च १६२९ मध्ये भाषांतर करायला सुरवात केली. पण, ऑर्थोडॉक्स चर्चच्या कित्येक लोकांना हे काम अतिशय धक्कादायक वाटले. बायबलची मूळ भाषा लोकांना कळाली नाही तरी चालेल, पण भाषांतर नको असे त्यांचे मत होते. अशा लोकांचे मन राखण्यासाठी लूकारियस यांनी मूळ भाषेतल्या वचनांशेजारी समासांत भाषांतर केलेली नवीन वचने लिहिली आणि ती समजण्याकरता सोबतच काही टीपा लिहिल्या. ही हस्तलिखित प्रत तयार केल्याच्या काही काळानंतरच कॉलीपोलीटसचा मृत्यू झाला त्यामुळे लूकारियस यांनी स्वतःच त्याचे प्रुफ-रिडिंग केले. हे भाषांतर लुकैरियसच्या मृत्यूनंतर काही काळातच म्हणजे १६३८ साली प्रकाशित झाले.

या कामात लूकारियस यांनी विलक्षण दक्षता बाळगूनसुद्धा त्या भाषांतरामुळे बिशप वर्तुळात कमालीची खळबळ माजली. बायबलच्या या भाषांतराची प्रस्तावना वाचल्यानंतर लूकारियस यांच्या मनात देवाच्या वचनाविषयी किती प्रेम होते हे जाणवल्याशिवाय राहात नाही. प्रस्तावनेत त्यांनी म्हटले, की सर्वसामान्य लोकांच्या भाषेत छापलेला बायबलचा संदेश म्हणजे “स्वर्गातून प्राप्त झालेला मधूर संदेशच.” त्यांनी लोकांना सल्ला दिला, की त्यांनी बायबलमधील “सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात, त्यांच्याशी चांगले परिचित व्हावे.” त्यांनी असेही म्हटले, की बायबलखेरीज “विश्‍वासाविषयी खरे ते जाणून घेण्याचा इतर कोणताही मार्ग नाही . . . देवाकडून प्राप्त झालेल्या पवित्र सुवार्तेद्वारेच तारण शक्य आहे.”—फिलिप्पैकर १:९, १०.

बायबलचा अभ्यास करण्याच्या आणि त्याच्या भाषांतराच्या विरोधात असणाऱ्‍यांचे लूकारियस यांनी अगदी कडक शब्दांत खंडन केले. त्यांनी म्हटले: “कोणाला न समजणाऱ्‍या भाषेत आपण बोलू लागलो तर ते वाऱ्‍यासोबत वार्ता केल्यासारखे होईल.” (पडताळा १ करिंथकर १४:७-९.) प्रस्तावनेच्या शेवटी त्यांनी लिहिले: “देवाचे हे वचन आणि पवित्र सुवार्ता तुम्ही आपल्या मातृभाषेत वाचाल तेव्हा त्यापासून पुरेपूर लाभ उठवण्याचा प्रयत्न करा, . . . चांगल्या मार्गावर चालता यावे म्हणून देव तुमच्याकरता सदोदित मार्ग मोकळा करत राहो.”—नीतिसूत्रे ४:१८.

विश्‍वासाची कबुली

या बायबल भाषांतराची सुरवात केल्यानंतर, लूकारियस यांनी आणखी एक धाडसी पाऊल उचलले. सन १६२९ मध्ये त्यांनी जिनीव्हामध्ये विश्‍वासाची कबुली या नावाचे पुस्तक छापले. या पुस्तकात त्यांनी आपल्या काही विश्‍वासाविषयी लिहिले होते; ऑर्थोडॉक्स चर्च या विश्‍वासांचा स्वीकार करील अशी त्यांची आशा होती. दी ऑर्थोडॉक्स चर्च या पुस्तकानुसार, कबुली या पुस्तकाच्या मते, “आर्थोडॉक्स धर्म तत्त्वाने प्रस्थापित केलेले पाळकपद आणि पाळकवर्गाचे सभासदत्व अक्षरशः अर्थशून्य आहे; तसेच, प्रतिमांची किंवा संतांची उपासना करणे म्हणजे मूर्तीपूजा होय.”

कबुली या पुस्तकात १८ लेख आहेत. याच्या दुसऱ्‍या लेखात असे सांगितले आहे, की बायबल देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आले आहे आणि चर्चच्या कोणत्याही शिकवणींपेक्षा बायबल नेहमी श्रेष्ठ आहे. याच लेखाने पुढे असे म्हटले: “आमचा असा विश्‍वास आहे, की पवित्र शास्त्र देवाकडून प्राप्त झाले आहे . . . आम्ही हे मानतो, की पवित्र शास्त्राला चर्चच्या अधिकाऱ्‍यांपेक्षा जास्त अधिकार आहे. पवित्र आत्म्याद्वारे शिकवण्यात येणे आणि मनुष्याद्वारे शिकवण्यात येणे यांत जमीनास्मानाचा फरक आहे.”—२ तीमथ्य ३:१६.

पुस्तकातल्या आठव्या आणि दहाव्या लेखात सांगण्यात आले आहे, की केवळ येशू ख्रिस्तच मध्यस्थ, महायाजक आणि मंडळीचा प्रमुख आहे. लूकारियस यांनी लिहिले: “आमचा असा विश्‍वास आहे, की येशू ख्रिस्त आपल्या पित्याच्या उजव्या हाती बसला आहे आणि तोच आपली मध्यस्थी करत आहे. एका खऱ्‍या, अधिकृत महायाजकाचा आणि मध्यस्थाचा अधिकार केवळ तोच बजावत आहे.”—मत्तय २३:२०.

बाराव्या लेखात असे घोषित करण्यात आले आहे, एखाद्या वेळी चर्चची दिशाभूल होईल, चर्चच्या दृष्टिकोनातून खोट्या शिकणुकी देखील खऱ्‍या वाटतील; पण, पवित्र आत्म्याचा प्रकाश विश्‍वासू सेवकांच्या श्रमांद्वारे असे होण्यापासून चर्चला वाचवेल. आठराव्या लेखात लूकारियस यांनी दाव्यानिशी असे म्हटले, की परगेटरी हे कोणतेही खरोखरचे ठिकाण नाही; ती लोकांची कल्पना आहे. ते म्हणतात: “हे उघड सत्य आहे, की परगेटरीच्या खोट्या शिकवणीला सत्य मानले जाऊ नये.”

कबुली पुस्तकाच्या अखेरीस परिशिष्टात (अपैंडिक्समध्ये) कित्येक प्रश्‍न आणि त्यांची उत्तरे दिलेली आहेत. त्या ठिकाणी लूकारियस या गोष्टीवर प्रथम जोर देतात, की प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍तीने बायबल वाचलेच पाहिजे आणि त्याने तसे केले नाही तर धोका संभवू शकतो. त्यानंतर त्यांनी म्हटले, की बायबलमध्ये जोडण्यात आलेल्या नकली पुस्तकांपासून तर चार हात दूरच राहावे.—प्रकटीकरण २२:१८, १९.

त्यात विचारलेला चौथा प्रश्‍न असा आहे: “मूर्तींविषयी आपला कोणता दृष्टिकोन असला पाहिजे?” लूकारियस म्हणतात: “याचे उत्तर आपल्याला देवाच्या पवित्र शास्त्रात मिळते. ते स्पष्टपणे सांगते, की ‘तू आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको; वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीहि प्रतिमा करू नको. त्यांच्या पाया पडू नको किंवा त्यांची सेवा करू नको; [निर्गम २०:४, ५]’ आपण सृष्टीची नव्हे तर सृष्टिकर्त्याची आणि स्वर्ग व पृथ्वीच्या निर्माणकर्त्याची उपासना केली पाहिजे आणि केवळ त्याच्याच पाया पडले पाहिजे; पवित्र शास्त्रात . . . [प्रतिमांची] उपासना करण्यास आणि त्यांच्या पाया पडण्यास मनाई करण्यात आली आहे; फक्‍त सृष्टिकर्त्याची उपासना आपण केली पाहिजे; कोणत्याही चित्राची, मूर्तीची किंवा प्राण्याची आपण उपासना करू नये.”—प्रेषितांची कृत्ये १७:२९.

लूकारियसच्या काळात सर्वत्र आध्यात्मिक अंधार पसरला होता आणि चर्चच्या लोकांकडून होणाऱ्‍या चुकांविषयी त्याला स्वतःला देखील नीटसे समजत नव्हते; * तरीसुद्धा त्याने चर्चमध्ये बायबल शिकवण्यात आणि लोकांना बायबलचे ज्ञान देण्यात जे प्रयत्न केलेत त्यांची खरोखरच प्रशंसा केली पाहिजे.

कबुली पुस्तक छापताच लूकारियस यांच्यावर पुन्हा एकदा विरोधाची लाट उसळली. लूकारियस यांचा हाडाचा वैरी असलेला, बिरीयाचा (आजचे अलेप्पो) प्रमुख बिशप, सिरिल कॉन्टेरी याने १६३३ मध्ये लूकारियस यांची प्रमुख बिशपची खुर्ची बळकावण्याचा आटोकाट प्रयत्न केला. हे पद प्राप्त करण्याकरता त्याने ऑटोमन सरकाराशी सौदा करण्याचा प्रयत्न केला आणि यात जेस्यूईट लोकांनी त्याला साथ दिली. पण, त्याला ठरविलेली रक्कम देता न आल्यामुळे त्याचे सर्व प्रयत्न वाया गेले. त्यामुळे प्रमुख बिशपचे पद पुन्हा लूकारियस यांनाच मिळाले. पुढील वर्षी थेस्सलनीकामध्ये राहणाऱ्‍या अथेनेशियसने हे पद प्राप्त करण्याकरता सुमारे ६०,००० चांदीची नाणी दिली. त्यामुळे लूकारियस यांना आपल्या पदावरून दूर व्हावे लागले. पण एकाच महिन्यात त्या पदासाठी त्यांना बोलावण्यात आले. तोपर्यंत सिरिल कॉन्टेरीने प्रमुख बिशपच्या पदासाठी ५०,००० चांदीची नाणी जमा केली होती. यावेळी लूकारियस यांना देशातून काढून त्यांना रोड्‌झ येथे पाठवण्यात आले. पण सहा महिन्यांनंतर त्यांना पुन्हा त्यांच्या पूर्व पदावर आरूढ करण्यात त्यांचे मित्र यशस्वी झाले.

पण १६३८ मध्ये जेस्यूईट सदस्यांनी आणि त्यांच्या ऑर्थोडॉक्स साथीदारांनी लूकारियस यांच्यावर ऑटोमन साम्राज्याच्या विरोधात राजद्रोह केल्याचा आरोप लावला. यावेळी ऑटोमनच्या सुलतानाने लूकारियस यांना मृत्युदंड देण्याची आज्ञा फर्मावली. लूकारियस यांना अटक करण्यात आले आणि जुलै २७, १६३८ या दिवशी त्यांना जणू हद्दपार करण्यासाठी नेले जात आहे असे भासवण्यासाठी एका छोट्या बोटीत बसवण्यात आले. पण बोट समुद्राच्या मध्ये पोहंताच लूकारियस यांना गळा दाबून मारण्यात आले. त्यानंतर त्याचे प्रेत समुद्राच्या किनाऱ्‍यावर पुरण्यात आले, पण नंतर ते पुन्हा काढून समुद्रात फेकण्यात आले. पुढे ते प्रेत कोळ्यांच्या हाती लागले तेव्हा लूकारियस यांच्या मित्रांनी त्यांच्या मृतदेहाचे दफन केले.

आपल्यासाठी धडे

एक विद्वान असे म्हणतो: “या गोष्टीकडे दुर्लक्ष करता कामा नये, की [लूकारियस यांचा] एक विशिष्ट हेतू होता तो म्हणजे पाळकांना आणि सर्वसामान्य लोकांना बायबलच्या ज्ञानाचा प्रकाश देणे; कारण सोळाव्या आणि सतराव्या शतकात लोकांना बायबलचे मुळीच ज्ञान नव्हते असे म्हटले तर अतिशयोक्‍ती होणार नाही.” आपला हेतू साध्य करण्याकरता लूकारियस यांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागले. चक्क पाच वेळा त्यांना प्रमुख बिशपच्या पदावरून पदच्यूत करण्यात आले होते. त्यांच्या मृत्यूच्या चौतीस वर्षांनंतर, जेरुसलेममध्ये एका धर्म-सभेत लूकारियस यांच्या शिकवणींचे खंडन करताना असे म्हटले गेले, की त्यांच्या शिकवणुकी खोट्या आहेत. या धर्म-सभेमध्ये असेही घोषित करण्यात आले, की बायबलचे “प्रत्येक व्यक्‍तीने वाचन करू नये; योग्यप्रकारे संशोधन करून आत्म्याच्या गुढ गोष्टी शोधणाऱ्‍या लोकांनीच म्हणजे फक्‍त पाळकांनीच बायबल वाचावे.”

अशाप्रकारे पुन्हा एकदा पाळकांनी एक होऊन देवाचे वचन बायबल यापासून सर्वसामान्य लोकांना वंचित ठेवण्यासाठी अडचणी आणल्या. त्यांच्या खोट्या शिकवणींच्या विरोधात उठणाऱ्‍या व्यक्‍तीचा आवाज त्यांनी हिंसकपणे दाबून टाकला. होय, पाळक हे वास्तवात, धार्मिक स्वातंत्र्याचे आणि सत्याचे कट्टर विरोधक शाबीत झाले. खेदाची गोष्ट म्हणजे बऱ्‍याच प्रमाणात अशी मनोवृत्ती आजही पाहायला मिळते. लोकांच्या वैचारिक आणि भाषा स्वातंत्र्यावर पाळक घाला घालतात तेव्हा परिणाम किती भीषण होतात या कटू सत्याचे स्मरण होते.

[तळटीपा]

^ परि. 24 कबुली पुस्तकामध्ये त्याने त्रैक्य, नशीब आणि अमर आत्मा या शिकवणींचे खंडण केले नाही—खरे तर या सर्व शिकवणुकींना बायबलमध्ये आधार नाही.

[२९ पानांवरील संक्षिप्त आशय]

लूकारियस यांनी चर्चमध्ये बायबल शिकवण्यास आणि लोकांना बायबलचे ज्ञान देण्यात जे प्रयत्न केलेत त्यासाठी त्यांची खरोखरच प्रशंसा केली पाहिजे

[२८ पानांवरील चौकट/चित्र]

लूकारियस आणि कोडेक्स एलक्सैन्ड्रिनस

सध्या ब्रिटिश संग्रहालयाचा कंठा भूषविणारे एक खास रत्न म्हणजे कोडेक्स एलक्सैन्ड्रिनस. हे सा.यु. पाचव्या शतकातील बायबलचे हस्तलिखित आहे. असे म्हटले जाते, की त्यात ८२० पृष्ठे होती पण आज ७७३ पाने त्यात आहेत.

जेव्हा लूकारियस, अलेक्सैन्ड्रिया, इजिप्तचे प्रमुख बिशप होते तेव्हा असंख्य पुस्तकांचे एक दालनच त्यांनी उभारले होते. आणि कॉन्सटान्टिनोपलचे प्रमुख बिशप पद त्यांनी भूषविले तेव्हा ते आपल्यासोबत कोडेक्स एलक्सैन्ड्रिनसही घेऊन गेले. सन १६२४ मध्ये त्यांनी हे कॉडेक्स, तुर्कीमध्ये आलेल्या एका ब्रिटीश राजदूताच्या हाती जेम्स पहिला, या ब्रिटनच्या राजाला नजराणा म्हणून पाठवून दिले. हे कोडेक्स तीन वर्षांनी जेम्स पहिला याचा उत्तराधिकारी, चार्ल्स पहिला याला देण्यात आले.

सन १७५७ मध्ये राजाचे बादशाही ग्रंथालय, ब्रिटिश राष्ट्राला देण्यात आले. आणि आज हे अत्युत्कृष्ट कोडेक्स नवीन ब्रिटिश संग्रहालयाच्या जॉन रिटब्लाट गॅलरीमध्ये ठेवण्यात आले आहे.

[चित्राचे श्रेय]

Gewerbehalle, Vol. १०

From The Codex Alexandrinus in Reduced Photographic Facsimile, १९०९

[२६ पानांवरील चित्राचे श्रेय]

Bib. Publ. Univ. de Genève