व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मूर्ती लहान, मन महान

मूर्ती लहान, मन महान

मूर्ती लहान, मन महान

तुमची उंची फक्‍त २ फूट ६ इंच (३० इंच) असती आणि तुम्हाला अनोळखी लोकांशी देवाच्या राज्याविषयी बोलायचे असते तर कसे वाटले असते? याविषयी लॉरा आपल्याला सांगू शकते. लॉरा आता ३३ वर्षांची आहे पण तिची उंची मात्र २ फूट ६ इंच एवढीच आहे. ती आपल्या बहिणीसोबत, मारियासोबत एक्वाडोरमध्ये क्वीटो येथे राहते. मारिया २४ वर्षांची आहे आणि तिची उंची २ फूट १० इंच आहे. ख्रिस्ती सेवेत त्यांना कोणकोणते अडथळे येतात ते आपण त्यांच्याच तोंडून ऐकू या.

“आमच्या प्रचाराच्या क्षेत्रात आणि ख्रिस्ती सभांना जायला आम्हाला [अर्धा किलोमीटर] पायी जाऊन मग एक बस पकडावी लागते. त्या बसमधून उतरून पुन्हा [अर्धा किलोमीटर] चालून दुसरी एक बस पकडावी लागते. पण, आमच्या या नेहमीच्या रस्त्यावर पाच भयानक कुत्री आहेत. कुत्र्यांची आम्हाला खूप भीती वाटते, कारण आमच्यासमोर ते घोड्यांसारखेच दिसतात. त्यांना हाकलायला काही वेळा आम्ही एखादी काठी सोबत घेतो आणि बसमध्ये चढण्याआधी ती कुठेतरी लपवून ठेवतो म्हणजे परतताना पुन्हा ती कामी येते.

“बसची पायरी तर आमच्यासाठी खूपच मोठी पायरी आहे. आम्ही मातीच्या ढिगाऱ्‍यावर उभं राहतो; म्हणून बसमध्ये चढायला सोपं जातं. काही ड्रायव्हर मातीच्या ढिगाऱ्‍याजवळ बस थांबवतात, पण काहीजण थांबवत नाहीत. जर ड्रायव्हरनं मातीच्या ढिगाऱ्‍याजवळ बस थांबवली नाही तर आधी [मारिया] चढते आणि मग ती मला चढायला मदत करते. पण, दुसरी बस पकडायला आम्हाला एक हायवे पार करावा लागतो—हायवे पटकन पार करणंसुद्धा आमच्यासाठी फार कठीण आहे. त्यात पुन्हा, मोठी बॅग म्हणजे आणखी एक ओझं. बॅग हलकी ठेवायला आम्ही लहान आकाराचं बायबल घेतो आणि साहित्यसुद्धा कमीच घेतो.

“लहानपणापासूनच आम्ही लोकांमध्ये जास्त मिसळत नव्हतो. आमच्या शेजाऱ्‍यांना ठाऊक आहे की, अनोळखी लोकांसोबत बोलायला आम्हाला फार भीती वाटते. पण, आम्ही त्यांच्या घरी जातो तेव्हा आम्हाला पाहून त्यांना आश्‍चर्य वाटतं आणि ते आमचं ऐकतात. पण अनोळखी ठिकाणी गेल्यावर, आम्ही ठेंगणे आहोत म्हणून लोक आमच्याकडे दुर्लक्ष करतात; पुष्कळदा लोक आमचा संदेश गंभीरतेनं ऐकतच नाहीत. तरीही, यहोवाचं आमच्यावर प्रेम आहे हे ओळखून आम्हाला प्रचाराचं काम करत राहायला आणखी धैर्य मिळतं. नीतिसूत्रे ३:५, ६ या वचनाची नेहमी आठवण केल्यामुळेही आम्हाला धैर्य मिळतं.”

लॉरा आणि मारियाच्या अनुभवावरून हे दिसून येतं की, शारीरिक अडथळे असतानाही यहोवाची सेवा करत राहिल्यानं देवाचा सन्मान होतो. प्रेषित पौलानं अशी प्रार्थना केली की, ‘माझ्या शरीरातला काटा’ दूर कर; हा शरीरातला काटा म्हणजे एखादा शारीरिक त्रास असावा. पण देवाने त्याला म्हटले: “माझी कृपा तुला पुरे आहे; कारण अशक्‍तपणातच [माझी] शक्‍ति पूर्णतेस येते.” होय, आपल्याला देवाची सेवा करता यावी म्हणून शारीरिक अपंगत्व काढून टाकण्याची गरज नाही. देवावर पूर्णतः विसंबून राहिल्यानं आपण आपल्या परिस्थितींचा सर्वतोपरी उपयोग करू शकतो. पौलानंही त्याच्या ‘शरीरातल्या काट्याविषयी’ असाच दृष्टिकोन बाळगल्यामुळं तो म्हणू शकला: “जेव्हा मी अशक्‍त तेव्हाच मी सशक्‍त आहे.” (२ करिंथकर १२:७, ९, १०) काही वर्षांनंतर पौलानं लिहिलं: “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्‍तिमान आहे.”—फिलिप्पैकर ४:१३.

आधुनिक काळात, देवाला समर्पित असलेल्या स्त्रिया, पुरुष आणि मुलांद्वारे देव एक भव्य कार्य साधत आहे. यांतल्या पुष्कळांना कोणत्या न कोणत्या प्रकारचे अपंगत्व आहे. देवाच्या राज्यामध्ये त्या सर्वांना देव बरं करील अशी त्यांना आशा आहे; पण देवानं बरं केल्यावरच त्याच्या सेवेत भाग घ्यायचा अशी त्यांची मनोवृत्ती नाही.

तुमच्यामध्येही अशीच एखादी शारीरिक कमतरता आहे का? तर मग निराश होऊ नका! तुमच्या विश्‍वासामुळे तुम्ही पौल, लॉरा किंवा मारियासारखे बनू शकता. त्यांच्याविषयी प्राचीन काळातल्या स्त्री-पुरुषांसारखेच म्हटले जाऊ शकते की, “ते दुर्बळांचे सबळ झाले.”—इब्री लोकांस ११:३४.

[८ पानांवरील चित्र]

मारिया

लॉरा

[९ पानांवरील चित्र]

मारिया लॉराला बसमध्ये चढवत असताना

[९ पानांवरील चित्रे]

“कुत्र्यांची आम्हाला खूप भीती वाटते कारण आमच्यासमोर ते घोड्यांसारखेच दिसतात”

खाली: लॉरा, मारिया आणि त्यांच्यासोबत बायबलचा अभ्यास केलेले