व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशूप्रमाणे तुम्हीही लोकांना मदत करण्यास उत्सुक आहात का?

येशूप्रमाणे तुम्हीही लोकांना मदत करण्यास उत्सुक आहात का?

येशूप्रमाणे तुम्हीही लोकांना मदत करण्यास उत्सुक आहात का?

“त्याने लोकांचा मोठा समुदाय पाहिला; ते तर मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते, म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला; आणि तो त्यांस बऱ्‍याच गोष्टींविषयी शिक्षण देऊ लागला.”—मार्क ६:३४.

१. मानवांमध्ये प्रशंसायोग्य गुण का असतात?

आजपर्यंत असे अनेक महापुरूष होऊन गेले आहेत, ज्यांच्या सात्त्विक गुणांची, सेवाभावी वृत्तीची आपण प्रशंसा करतो. पण मनुष्यांत हे गुण असणे आश्‍चर्याचे नाही. यहोवा देव प्रेम, दया, उदारता आणि अशा इतर मोलवान गुणांचा मालक आहे, त्याच्या कृतीकृतींतून हे गुण झळकतात. मनुष्यांना त्याच्याच प्रतिमेत निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांच्या स्वभावात काही प्रमाणात तरी प्रेम, दया उदारता यांसारखे देवाचे इतर अद्‌भुत गुण पाहायला मिळणे साहजिक आहे; तसेच, चांगल्या वाईटाची स्वाभाविक जाणीवही अधिकांश लोकांना असते. (उत्पत्ति १:२६; रोमकर २:१४, १५) पण हे गुण व्यवहारांत आणण्यास काही लोक अधिक उत्सुक असतात असे दिसते.

२. आपण येशूचे अनुकरण करत आहोत असे समजून काही लोक कोणते चांगले कार्य करतात?

कदाचित तुम्ही अशा काही लोकांना ओळखतही असाल. ते सहसा आजारी लोकांना भेटायला जातात, त्यांची सेवाशुश्रूषा करतात; अपंग लोकांना मदत करतात किंवा गोरगरिबांसाठी दानधर्म करतात. काही जण तर या दीनदुःखितांना मदत करायला इतके उत्सुक असतात की ते आपले सबंध जीवन त्यांच्या सेवेला वाहून टाकतात. कोणी कुष्टरोग्यांच्या संस्थेत, अनाथालयांत, रुग्णालयांत किंवा मरायला टेकलेल्या रुग्णांच्या इस्पितळांत, तर काहीजण फुटपाथवर राहणाऱ्‍यांना किंवा बेघर निर्वासितांना साहाय्य करतात. यांपैकी काहीजण येशूला आपले प्रेरणास्थान समजतात आणि त्याने ख्रिस्ती लोकांपुढे ठेवलेल्या आदर्शाचे आपण अनुकरण करत आहोत असे मानतात. येशूने कशाप्रकारे आजारी लोकांना बरे केले आणि उपाशी लोकांना अन्‍न पुरवले याविषयी आपल्याला शुभवर्तमानांच्या पुस्तकांत वाचायला मिळते. (मार्क १:३४; ८:१-९; लूक ४:४०) येशूच्या प्रेमळ, दयाळू, सहानुभूतिशील कृत्यांतून आपल्याला ‘ख्रिस्ताच्या मनाचे’ दर्शन घडते आणि पर्यायाने यहोवाच्याही मनाचे कारण येशूने आपल्या स्वर्गीय पित्याचेच अनुकरण केले.—१ करिंथकर २:१६.

३. येशूच्या चांगल्या कृत्यांबद्दल समतोल दृष्टिकोन बाळगण्याकरता आपण काय विचारात घेतले पाहिजे?

पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? येशूला लोकांबद्दल असलेल्या प्रेमामुळे आणि दयेमुळे प्रभावित झालेले लोक ख्रिस्ताच्या मनाच्या एका खास आणि महत्त्वाच्या पैलूकडे आज दुर्लक्ष करत आहेत. तो कोणता पैलू आहे हे जाणून घेण्याकरता आपण मार्कच्या ६ व्या अध्यायाचे बारकाईने परीक्षण करू. या अध्यायात आपण असे वाचतो की, लोकसमुदाय आपल्या आजाऱ्‍यांना घेऊन येशूजवळ बरे होण्यासाठी येतात. संदर्भ वाचल्यास आपल्याला हेही कळून येईल की या हजारो लोकांजवळ काहीही खायला नाही हे पाहून येशू त्यांना चमत्कारिकपणे जेवू घालतो. (मार्क ६:३५-४४, ५४-५६) आजारी लोकांना बरे करून आणि उपाशी लोकांना खायला देऊन खरोखर येशूने अतिशय दया दाखवली; पण येशूने केवळ याच मार्गाने लोकांना मदत केली का, की याहीपेक्षा महत्त्वाच्या दुसऱ्‍या कोणत्या मार्गाने येशूने त्यांना मदत केली? तसेच, येशूने ज्याप्रमाणे यहोवाचे अनुकरण केले त्याप्रमाणे प्रेम, दया आणि सहानुभूतीच्या येशूच्या परिपूर्ण आदर्शाचे आपण कशाप्रकारे अनुकरण करू शकतो?

आध्यात्मिक गरजा भागवण्यास उत्सुक

४. मार्क ६:३०-३४ येथे दिलेली घटना कोणत्या परिस्थितीत घडली?

येशू जेव्हा त्याच्या भोवती असलेल्या लोकांना पाहायचा, तेव्हा त्याला खासकरून त्यांच्या आध्यात्मिक दैन्यावस्थेमुळे त्यांची दया यायची. त्याच्या नजरेत भौतिक गरजांपेक्षा आध्यात्मिक गरजा अधिक महत्त्वाच्या होत्या. मार्क ६:३०-३४ यात दिलेल्या वृत्तान्तावर विचार करा. यात दिलेली घटना सा.यु. ३२ सालच्या वल्हांडणाच्या आधी गालील समुद्राच्या तटावर घडली. प्रेषित येशूला भेटायला अतिशय अधीर होते. कारण ते नुकतेच बऱ्‍याच लांबचा प्रचार दौरा करून परतले होते आणि येशूला आपले अनुभव सांगायला ते अतिशय उत्सुक होते. पण त्याआधीच तेथे लोकांची मोठी गर्दी जमा झाली. गर्दी इतकी मोठी होती की येशू आणि त्याचे प्रेषित न काही खाऊ शकत होते न विश्राम करू शकत होते. म्हणूनच येशू प्रेषितांना म्हणाला: “तुम्ही रानात एकांती चला व थोडा विसावा घ्या.” (मार्क ६:३१) कफर्णहूमजवळ एका बोटीत बसून ते गालील समुद्रातून पुढे एका शांत ठिकाणाकडे जाऊ लागले. पण लोक समुद्रकिनाऱ्‍यावरून धावत जाऊन त्यांच्याआधीच तिथे जाऊन पोचले. यावर येशूची प्रतिक्रिया काय होती? लोक त्यांना एकांतात विश्राम करू देत नव्हते म्हणून तो त्यांच्यावर चिडला का? मुळीच नाही!

५. येशूकडे आलेल्या लोकसमुदायाबद्दल येशूच्या कशा भावना होत्या आणि त्याने त्यांच्यासाठी काय केले?

त्या हजारो लोकांना, ज्यांत अनेकजण आजारी होते, आपल्यासाठी थांबलेले पाहून येशूला त्यांचा कळवळा आला. (मत्तय १४:१४; मार्क ६:४४) येशूला खासकरून कशामुळे त्यांची दया आली आणि मग त्याने काय केले याविषयी मार्कने असे लिहिले: “त्याने लोकांचा मोठा समुदाय पाहिला; ते तर मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते, म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला; आणि तो त्यांस बऱ्‍याच गोष्टींविषयी शिक्षण देऊ लागला.” (मार्क ६:३४) येशूने त्या हजारो लोकांकडे केवळ एक गर्दी म्हणून पाहिले नाही. तर त्याला त्यांपैकी प्रत्येक जणाच्या आध्यात्मिक गरजांबद्दल कळकळ होती. ते लोक सैरावैरा जाणाऱ्‍या मेंढरांप्रमाणे होते; त्यांना हिरव्यागार कुरणांत न्यायला किंवा हिंस्र पशूंपासून त्यांचे संरक्षण करायला कोणीही मेंढपाळ नव्हता. शिवाय, येशूला माहीत होते की ज्यांनी या लोकांचे मेंढपाळ म्हणून नेतृत्त्व करायला पाहिजे होते ते कठोर धार्मिक पुढारी उलट या लोकांना तुच्छ लेखायचे आणि त्यांच्या आध्यात्मिक गरजांकडे दुर्लक्ष करायचे. (यहेज्केल ३४:२-४; योहान ७:४७-४९) पण येशूने त्यांच्याशी अतिशय वेगळ्या प्रकारे व्यवहार करायचे ठरवले. त्यांच्याकरता जे सर्वात जास्त हिताचे होते ते त्यांना देण्याचे त्याने ठरवले. तो त्यांना देवाच्या राज्याबद्दल शिकवू लागला.

६, ७. (अ) लोकांच्या गरजा पूर्ण करताना येशूने कशाला प्राधान्य दिले याविषयी शुभवर्तमानाच्या पुस्तकांतून आपल्याला कळून येते? (ब) कशामुळे प्रेरित होऊन येशूने प्रचार केला व शिकवले?

याच घटनेबद्दल लूकनेही लिहिले. लूक एक वैद्य होता आणि लोकांच्या शारीरिक गरजांची त्याला काळजी वाटणे साहजिक होते. पण त्याच्या अहवालात त्याने कोणत्या गोष्टीचा आधी उल्लेख केला आणि त्याअर्थी कशाला त्याने अधिक महत्त्व दिले त्याकडे लक्ष द्या. “लोकसमुदाय [येशूच्यामागून] गेले; तेव्हा त्यांचे स्वागत करून तो त्यांच्याबरोबर देवाच्या राज्याविषयी बोलत होता, आणि ज्यांना बरे होण्याची जरूरी होती त्यांना तो बरे करीत होता.” (तिरपे वळण आमचे.) (लूक ९:११; कलस्सैकर ४:१४) अर्थात प्रत्येक चमत्काराच्या अहवालात आधी शिकवण्याविषयी जरी सांगितलेले नसले तरीसुद्धा लूकच्या या विशिष्ट प्रेरित अहवालात त्याने आधी कशाचा उल्लेख केला? येशूने लोकांना शिकवले याचा.

हीच गोष्ट मार्क ६:३४ येथेही आढळते. या वचनातूनही आपल्याला कळून येते की येशूने कोणत्या मुख्य मार्गाने लोकांबद्दल दया व्यक्‍त केली. त्याने त्यांच्या आध्यात्मिक गरजांची दखल घेतली. याआधी सेवाकार्य करताना, येशूने असे म्हटले होते: “मला इतर गावीहि देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठविले आहे.” (लूक ४:४३) पण याचा अर्थ केवळ कर्तव्य म्हणून, यांत्रिकपणे किंवा करायचे आहे म्हणून येशूने प्रचार कार्य केले असे समजणे चुकीचे ठरेल. उलट येशूला लोकांबद्दल दया वाटायची आणि याच मुख्य कारणामुळे तो त्यांना सुवार्ता सांगण्यास उत्सुक होता. लोकांसाठी, अगदी रोगग्रस्त, भूतांनी पीडित असलेल्या किंवा उपाशी लोकांसाठीही येशू जे सर्वात जास्त हिताचे कार्य करू शकत होता, ते म्हणजे त्यांना देवाच्या राज्याबद्दलचे सत्य सांगणे; त्या सत्याचा स्वीकार करायला त्यांना मदत करणे आणि त्या सत्यावर प्रेम करायला त्यांना शिकवणे. राज्याचे हे सत्यच सर्वात जास्त महत्त्वाचे होते कारण या राज्याच्या माध्यमानेच यहोवाचे सार्वभौमत्त्व सबंध विश्‍वात निर्विवादपणे स्थापित होऊन मानवांना असंख्य सार्वकालिक आशीर्वाद मिळणार आहेत.

८. प्रचाराच्या व शिकवण्याच्या कार्याबद्दल येशूचा काय दृष्टिकोन होता?

राज्याचा प्रचार करणे हेच येशूचे पृथ्वीवर येण्याचे मूळ कारण होते. पृथ्वीवरील आपल्या सेवेच्या समाप्तीस येशूने पिलाताला असे सांगितले: “मी ह्‍यासाठी जन्मलो आहे व ह्‍यासाठी जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो.” (योहान १८:३७) या आधीच्या दोन लेखांत आपण येशूच्या कोमल व्यक्‍तिमत्त्वाचे विविध पैलू पाहिले—त्याला इतरांविषयी कळकळ होती, लोक न संकोचता त्याच्याजवळ यायचे, तो विचारशील होता, इतरांवर भरवसा ठेवण्याची त्याची वृत्ती होती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो प्रेमळ होता. ख्रिस्ताचे मन खऱ्‍या अर्थाने समजून घ्यायचे असेल तर निश्‍चितच त्याच्या व्यक्‍तिमत्त्वाच्या या सर्व पैलूंचा आपण बारकाईने अभ्यास केला पाहिजे. पण, ख्रिस्ताचे मन समजून घेताना त्याने प्रचाराच्या आणि शिकवण्याच्या कार्याला किती महत्त्व दिले हे लक्षात घेणेही तितकेच गरजेचे आहे.

त्याने इतरांनाही प्रचार करण्याचे प्रोत्साहन दिले

९. प्रचाराच्या व शिकवण्याच्या कार्याला कोणी प्राधान्य द्यायचे होते?

प्रेम आणि दया दाखवण्याचा मुख्य मार्ग प्रचार करणे आणि शिकवणे हा केवळ येशूकरताच नव्हता. त्याने आपल्या अनुयायांना त्याच्याच हेतूंचे, त्याने ज्या गोष्टींना प्राधान्य दिले त्यांचे आणि त्याच्या कृत्यांचे अनुकरण करण्याचे उत्तेजन दिले. उदाहरणार्थ १२ प्रेषितांना निवडल्यानंतर त्याने त्यांना काय सांगितले? मार्क ३:१४, १५ (पं.र.भा.) यात सांगितल्याप्रमाणे: “त्याने बारा जणांस नेमले, यासाठी की, त्यांनी आपल्याबरोबर असावे व आपण त्यांना उपदेश करायला पाठवावे, आणि त्यांना . . . भुते काढण्याचा अधिकार असावा.” (तिरपे वळण आमचे.) प्रेषितांनी कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचे होते हे तुमच्या लक्षात आले का?

१०, ११. (अ) प्रेषितांना पाठवताना येशूने त्यांना काय सांगितले? (ब) प्रेषितांना पाठवण्याच्या संदर्भात कोणत्या गोष्टीला प्राधान्य देण्यात आले?

१० कालांतराने येशूने खरोखर १२ प्रेषितांना रोग बरे करण्याचा आणि भुते काढण्याचा अधिकार दिला. (मत्तय १०:१; लूक ९:१) मग त्याने त्यांना “इस्राएलाच्या घराण्यांतील हरवलेल्या मेंढरांकडे” पाठवले. कशासाठी? येशूने त्यांना सांगितले: “जात असताना अशी घोषणा करीत जा की, ‘स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.’ रोग्यांस बरे करा, मेलेल्यांस उठवा, कुष्ठ्यांस शुद्ध करा, भुते काढा.” (मत्तय १०:५-८; लूक ९:२) मग त्यांनी प्रत्यक्षात काय केले? “ते तेथून निघाले, व [१] लोकांनी पश्‍चात्ताप करावा अशी त्यांनी घोषणा केली, [२] पुष्कळ भुते काढली आणि अनेक रोग्यांना तैलाभ्यंग करून बरे केले.”—मार्क ६:१२, १३.

११ पण प्रत्येकच अहवालात चमत्कारांचा उल्लेख करण्याआधी प्रचाराचा किंवा शिकवण्याचा उल्लेख केलेला आढळत नाही. त्यामुळे त्याचे महत्त्व कमी होते का? (लूक १०:१-९) कित्येक अहवालांत रोग बरे करण्याचा उल्लेख करण्याआधी शिकवण्याचा उल्लेख आढळतो याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. सदर अहवालाचाच संदर्भ लक्षात घ्या. बारा प्रेषितांना पाठवण्याआधी येशूला लोकांकडे पाहून त्यांचा कळवळा आला. अहवालात असे म्हटले आहे: “येशू त्यांच्या सभास्थानांत शिकवीत, राज्याच्या सुवार्तेची घोषणा करीत आणि सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करीत नगरांतून व गावांतून फिरत होता. तेव्हा लोकसमुदायांना पाहून त्याचा त्याला कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले व पांगलेले होते. तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, ‘पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत. ह्‍यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.’”—मत्तय ९:३५-३८.

१२. येशू व त्याच्या प्रेषितांनी केलेल्या चमत्कारांमुळे आणखी काय साध्य झाले?

१२ येशूच्या सहवासात राहून प्रेषितांनी काही अंशी ख्रिस्ताचे मन समजून घेतले होते. लोकांसाठी खऱ्‍या अर्थाने प्रेम आणि दया दाखवण्यासाठी देवाच्या राज्याबद्दल प्रचार करणे आणि शिकवणे महत्त्वाचे आहे हे त्यांना समजले होते—जी चांगली कार्ये त्यांना करायची होती त्यांपैकी हे सर्वात महत्त्वाचे होते. या दृष्टिकोनातून पाहिल्यास, रोग बरे करणे यांसारख्या शारीरिक गरजा पूर्ण करणाऱ्‍या सत्कृत्यांमुळे केवळ गरजू लोकांना मदत करण्यापेक्षा अधिक काही साध्य झाले. अर्थात, चमत्कारिकरित्या रोग बरे केल्यामुळे किंवा अन्‍न पुरवल्यामुळे काही लोक आकर्षित झाले असतील. (मत्तय ४:२४, २५; ८:१६; ९:३२, ३३; १४:३५, ३६; योहान ६:२६) पण केवळ शारीरिक स्वरूपाची मदत करण्यापेक्षा, या चमत्कारांमुळे लोक ओळखू शकले की येशू हा देवाचा पुत्र असून मोशेने ज्याच्याविषयी भाकीत केले होते तो “संदेष्टा” आहे.—योहान ६:१४; अनुवाद १८:१५.

१३. अनुवाद १८:१८ येथे दिलेल्या भविष्यवाणीनुसार, येणार असलेला “संदेष्टा” कोणते महत्त्वाचे कार्य करणार होता?

१३ येशूच तो “संदेष्टा” होता हे ओळखणे महत्त्वाचे का होते? हा संदेष्टा कोणते महत्त्वाचे कार्य करेल असे भाकीत करण्यात आले होते? चमत्कार करून रोग्यांना बरे करणारा किंवा उपाशी लोकांना खाऊ घालणारा दयावान म्हणून तो प्रसिद्ध होईल असे त्याच्याविषयी सांगण्यात आले होते का? अनुवाद १८:१८ यात असे भाकीत करण्यात आले होते: “मी त्यांच्यासाठी त्यांच्या भाऊबंदांतून तुझ्यासारखा एक संदेष्टा उभा करीन; त्याच्या मुखात मी आपली वचने घालीन आणि त्यांना ज्या आज्ञा मी दईन त्या सगळ्या तो त्यांना निवेदन करील.” येशूच्या सहवासात राहून त्याच्याप्रमाणे लोकांसाठी प्रेमळ भावना बाळगण्याचे व त्या व्यक्‍त करण्याचे शिकत असतानाच, प्रेषितांना हे कळून आले की त्यांना प्रचार आणि शिकवण्याच्या कार्यातूनही ख्रिस्ताची मनोवृत्ती प्रदर्शित करायची होती. हेच कार्य लोकांसाठी सर्वात जास्त हिताचे होते. कारण यामुळे त्या रोग्यांना आणि गरिबांना सत्तर ऐंशी वर्षांच्या जीवनापुरते किंवा एक दोन वेळच्या जेवणापुरते मर्यादित स्वरूपाचे नव्हे, तर सार्वकालिक आशीर्वाद मिळणार होते.—योहान ६:२६-३०.

आज ख्रिस्ताची मनोवृत्ती अनुसरा

१४. आपण जे प्रचार कार्य करतो त्यासंबंधी ख्रिस्ताची मनोवृत्ती कशाप्रकारे बाळगली पाहिजे?

१४ ख्रिस्ताची मनोवृत्ती ही केवळ पहिल्या शतकात येशूचीच होती किंवा “आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे,” असे प्रेषित पौलाने ज्यांच्याविषयी म्हटले त्या सुरवातीच्या शिष्यांनाच लागू होते असे समजणे योग्य ठरणार नाही. (१ करिंथकर २:१६) आणि आपण हे देखील कबूल करू की सुवार्तेचा प्रचार आणि शिष्य बनवण्याचे कार्य करणे त्यांच्याप्रमाणे आपलेही कर्तव्य आहे. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) तरीसुद्धा हे कार्य आपण कशामुळे प्रेरित होऊन करत आहोत याविषयी आत्मपरीक्षण करणे चांगले आहे. केवळ कर्तव्य पूर्ण करायचे आहे म्हणून हे कार्य करणे योग्य नाही. हे कार्य आपण करतो याचे मुख्य कारण म्हणजे आपले देवावर प्रेम आहे; आणि आपण हे जाणतो की येशूचे अनुकरण करण्याचा अर्थ असा होतो की आपणही लोकांबद्दल वाटणाऱ्‍या सहानुभूतीमुळे प्रेरित होऊन प्रचार केला पाहिजे आणि त्यांना शिकवले पाहिजे.—मत्तय २२:३७-३९.

१५. आपल्या प्रचार सेवेत दया हा गुण कशाप्रकारे सामील आहे?

१५ हे खरे आहे की आपल्या विश्‍वासांशी सहमत नसणाऱ्‍या, आणि खासकरून आपल्या कार्याला थंड प्रतिसाद देणाऱ्‍या किंवा आपला विरोध करणाऱ्‍या लोकांबद्दल नेहमीच आपल्याला सहानुभूती वाटत नाही. पण जर आपल्याला लोकांबद्दल प्रेम आणि सहानुभूतीच वाटली नाही, तर ख्रिस्ती सेवेत सहभाग घेण्यासाठी आपल्याकडे प्रेरणाच उरणार नाही. मग ही सहानुभूती आपण कशाप्रकारे विकसित करू शकतो? येशूने ज्या दृष्टिकोनातून लोकांकडे पाहिले त्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहण्याचा आपण प्रयत्न करू शकतो, अर्थात “मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले व पांगलेले” आहेत असा विचार आपण करू शकतो. (मत्तय ९:३६) आणि प्रत्यक्षातही आज बऱ्‍याच लोकांची अशीच स्थिती नाही का? खोट्या धर्मांच्या मेंढपाळांनी त्यांना टाकून दिले आहे आणि आध्यात्मिकरित्या अंधारात ठेवले आहे. म्हणूनच बायबलमध्ये दिलेल्या अचूक मार्गदर्शनाबद्दल किंवा देवाचे राज्य लवकरच पृथ्वीवर जे आशीर्वाद आणणार आहे त्यांविषयी त्यांना काहीच माहीत नाही. जीवनातल्या समस्यांना—गरिबी, कौटुंबिक वितुष्टे, आजारपण आणि मृत्यू यांसारख्या दुःखांना ते तोंड देत राहतात. भविष्याकरता त्यांच्याजवळ राज्याची आशा नाही. पण आपल्याजवळ नेमके तेच आहे ज्याची त्यांना गरज आहे: स्वर्गात स्थापित झालेल्या देवाच्या राज्याची सुवार्ता, अशी सुवार्ता जी त्यांना जीवन रक्षक ठरू शकते!

१६. इतरांना राज्याची सुवार्ता सांगण्याची आपल्याला उत्सुकता का वाटली पाहिजे?

१६ तुमच्या भोवती असलेल्या लोकांच्या आध्यात्मिक गरजांबद्दल जेव्हा तुम्ही अशाप्रकारे विचार करता तेव्हा देवाच्या प्रेमळ उद्देशांबद्दल कसेही करून त्यांना सांगण्याची उत्सुकता तुमच्या मनात जागृत होत नाही का? होय लोकांबद्दल दया आणि सहानुभूती हीच आपल्या कार्यामागची प्रेरणा आहे. येशूप्रमाणे जेव्हा आपल्यालाही लोकांबद्दल कळकळ वाटेल तेव्हा आपोआपच आपल्या आवाजातून, आपल्या चेहऱ्‍यावरच्या हावभावांवरून आणि आपल्या शिकवण्याच्या पद्धतीवरून हे दिसून येईल. आणि यामुळे ‘सार्वकालिक जीवनाकडे योग्य कल असलेल्या सर्वांना’ आपला संदेश आणखीनच हवाहवासा वाटेल.—प्रेषितांची कृत्ये १३:४८, NW.

१७. (अ) इतरांबद्दल प्रेम आणि दया दाखवण्याचे काही मार्ग कोणते आहेत? (ब) इतरांचे भले करणे किंवा प्रचार कार्य करणे यांपैकी कोणतेही एक करणे का पुरेसे नाही?

१७ अर्थात, प्रेम आणि दया हे गुण आपल्या सर्व व्यवहारांतून दिसून आले पाहिजेत. म्हणजेच, जे कठीण परिस्थितीत आहेत, आजारी किंवा गरीब आहेत अशांना आपण दया दाखवली पाहिजे; त्यांचे दुःख हलके करण्यासाठी आपल्याकडून होईल तितके केले पाहिजे. तसेच प्रिय जनांचा मृत्यू झाल्यामुळे जे दुःखात आहेत अशांना शब्दांतून आणि कृतींतून सांत्वन देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. (लूक ७:११-१५; योहान ११:३३-३५) पण काही सेवाभावी लोकांप्रमाणे प्रेम, दया आणि सहानुभूती व्यक्‍त करणे यावरच आपण थांबू नये. हीच केवळ आपली सेवा, किंवा सत्कृत्ये नाहीत. उलट याच गुणांनी प्रेरित होऊन जेव्हा आपण ख्रिस्ती प्रचार कार्यात व शिकवण्याच्या कार्यात सहभागी होतो तेव्हा आपण लोकांना सार्वकालिक आशीर्वाद मिळवून देतो. यहुदी धर्म पुढाऱ्‍यांविषयी येशूने काय म्हटले होते ते आठवा: “पुदिना, बडीशेप व जिरे ह्‍यांचा दशांश तुम्ही देता, आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व विश्‍वास ह्‍या तुम्ही सोडल्या आहेत; ह्‍या करावयाच्या होत्या, तरी त्या सोडावयाला पाहिजेत असे नाही.” (मत्तय २३:२३) येशूने केवळ एका प्रकारचे कार्य केले नाही—म्हणजे केवळ लोकांच्या शारीरिक गरजा भागवण्यासाठी मदत करणे किंवा त्यांना जीवनदायक आध्यात्मिक सत्यांविषयी शिकवणे. येशूने ही दोन्ही कार्ये केली. तरीसुद्धा, शिकवण्याच्या कार्याला त्याने प्राधान्य दिले कारण याद्वारे तो लोकांना सार्वकालिक आशीर्वाद मिळवून देऊ शकला.—योहान २०:१६.

१८. ख्रिस्ताचे मन समजून घेतल्यावर आपण काय करायला प्रेरित झाले पाहिजे?

१८ आपण यहोवाचे किती आभारी आहोत की त्याने ख्रिस्ताचे मन आपल्यासाठी प्रकट केले! शुभवर्तमानाच्या पुस्तकांतून आपण आजपर्यंत होऊन गेलेल्या सर्वश्रेष्ठ मनुष्याचे विचार, त्याच्या भावना, गुण, त्याचे कार्य आणि त्याला महत्त्वाच्या वाटणाऱ्‍या गोष्टी अधिक चांगल्याप्रकारे जाणून घेऊ शकतो. येशूबद्दल बायबलमध्ये सांगितलेल्या गोष्टी वाचणे, त्यांवर मनन करणे आणि त्या आचरणात आणणे हे आपले कर्तव्य आहे. नेहमी आठवणीत असू द्या, की जर आपल्याला खरोखर ख्रिस्ताप्रमाणे वागायचे असेल तर आधी आपल्याला त्याच्यासारखे विचार करायला, त्याच्यासारख्या भावना व्यक्‍त करायला व त्याने ज्या गोष्टींना महत्त्व दिले त्या गोष्टींना महत्त्व द्यायला शिकावे लागेल. अर्थात अपरिपूर्ण असल्यामुळे आपल्याला हे पूर्णपणे तर साध्य करता येणार नाही, पण शक्य होईल तितका प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. तर मग, चला आपण ख्रिस्ताची मनोवृत्ती विकसित करण्याचा आणि त्याप्रमाणे वागण्याचा निर्धार करूया. हाच जीवनाचा सर्वात उत्तम मार्ग आहे, लोकांशी व्यवहार करण्याचा हाच सर्वोत्तम आदर्श आहे आणि येशूने ज्याचे अगदी हुबेहूब अनुकरण केले त्याच्या अर्थात, आपला प्रेमळ देव यहोवा याच्या जवळ जाण्याचा आणि इतरांनाही असे करण्यास मदत करण्याचा हाच सर्वोत्कृष्ट मार्ग आहे.—२ करिंथकर १:३; इब्री लोकांस १:३.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• गरजू लोकांना पाहून सहसा येशूची काय प्रतिक्रिया असायची या संदर्भात बायबल आपल्याला काय सांगते?

• आपल्या अनुयायांना मार्गदर्शन करताना येशूने कोणत्या गोष्टीवर जोर दिला?

• आपण आपल्या व्यवहारांत कशाप्रकारे ‘ख्रिस्ताची मनोवृत्ती’ प्रदर्शित करू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२३ पानांवरील चित्र]

[२४ पानांवरील चित्र]

लोकांचे भले करण्याचा ख्रिश्‍चनांजवळ असलेला सर्वात उत्कृष्ट मार्ग कोणता आहे?