व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रार्थनेचे सामर्थ्य

प्रार्थनेचे सामर्थ्य

प्रार्थनेचे  सामर्थ्य

मावळतीची वेळ आहे. मध्यपूर्वेतल्या नाहोर शहराबाहेर एका विहिरीजवळ अलियेजर नावाचा एक सिरियन माणूस दहा उंटांचा काफिला घेऊन नुकताच पोचला आहे. साहजिकच तो थकलेला आणि तहानलेला असेल, पण तरीही याक्षणी त्याला स्वतःपेक्षा दुसऱ्‍यांची काळजी लागून आहे. एका दूरच्या देशातून तो आपल्या मालकाच्या मुलाचा विवाह निश्‍चित करण्यास आला आहे. मालकाच्या नात्यातल्याच एखाद्या कन्येशी विवाह निश्‍चित करावा असे त्याला सांगण्यात आले आहे. हे कठीण काम कसे करावे, या विचारात तो आहे.

प्रार्थनेत सामर्थ्य आहे, याची अलियेजरला जाणीव आहे. त्यामुळे तो यहोवाला नम्रपणे प्रार्थना करतो. लहान मूल आपल्या वडिलांवर जसा पूर्ण विश्‍वास ठेवते तसाच विश्‍वास देवावर ठेवून तो विनवणी करतो: “हे परमेश्‍वरा, माझा धनी अब्राहाम याच्या देवा, तू आज कृपा करुन माझी कार्यसिद्धि कर; माझा धनी अब्राहाम याजवर दया कर. पाहा, मी या पाण्याच्या विहीरीपाशी उभा आहे, आणि गावातल्या कन्या पाणी भरावयास बाहेर येत आहेत. तर असे घडून येऊ दे की ज्या मुलीस मी म्हणेन, मला पाणी पाजण्यासाठी आपली घागर उतर, आणि ती मला म्हणेल, तू पी आणि तुझ्या उंटासहि मी पाजिते, तीच तुझा सेवक इसहाक याच्यासाठी तू नेमिलेली असो; यावरुन मला कळेल की तू माझ्या धन्यावर दया केली आहे.”—उत्पत्ति २४:१२-१४.

प्रार्थनेच्या सामर्थ्यावर अलियेजरने दाखवलेला विश्‍वास व्यर्थ ठरला नाही. कारण विहिरीवर पाणी भरायला आलेली पहिलीच मुलगी अब्राहामाच्या भावाची नात निघाली! तिचे नाव रिबका. ती अद्याप अविवाहित आहे, सुशील आणि सौंदर्यवती आहे. आणि विशेष म्हणजे, ती अलियेजरला तर पाणी देतेच, पण त्याच्या सर्व उंटांना देखील पाणी पाजण्याची इच्छा व्यक्‍त करते. नंतर, तिच्या कुटुंबियांशी सल्लामसलत केल्यावर, अब्राहामाचा पुत्र इसहाक याची पत्नी होण्यासाठी अलियेजरसोबत दूरदेशी जायला ती आनंदाने तयार होते. अलियेजरच्या प्रार्थनेचे त्याला किती नाट्यमय रितीने उत्तर मिळाले! त्याकाळात देव काहीवेळा विशिष्ट घटनांमध्ये अशाप्रकारे चमत्कारिकपणे हस्तक्षेप करत असे.

अलियेजरच्या प्रार्थनेवरून आपण बरेच काही शिकू शकतो. त्याच्या प्रार्थनेतून त्याचा दृढ विश्‍वास, त्याची नम्रता आणि इतरांच्या गरजांविषयी त्याला असलेली निस्वार्थ काळजी दिसून येते. तसेच, यहोवाने मानवांकरता राखलेल्या उद्देशांनुरूप कार्य करण्याची तयारी त्याने दाखवली. देवाला अब्राहामाविषयी वाटणाऱ्‍या खास आपुलकीबद्दल आणि अब्राहामाकरवी सर्व मानवजातीला भविष्यात असंख्य आशीर्वाद देण्याच्या यहोवाच्या अभिवचनाबद्दल अलियेजरला साहजिकच माहीत होते. (उत्पत्ति १२:३) म्हणूनच अलियेजर “हे परमेश्‍वरा, माझा धनी अब्राहाम याच्या देवा,” असे म्हणून आपल्या प्रार्थनेची सुरवात करतो.

यहोवाने अब्राहामाच्या संततीद्वारे सर्व आज्ञाधारक मानवजातीला आशीर्वाद देण्याचे अभिवचन दिले होते; आणि ती संतती म्हणजे येशू ख्रिस्त. (उत्पत्ति २२:१८) त्याच्याद्वारे देव मानवजातीकरता असलेला आपला उद्देश पूर्ण करणार आहे; आपल्या प्रार्थना देवाने ऐकाव्यात आणि त्यांचे आपल्याला उत्तर मिळावे असे जर आपल्याला वाटत असेल तर आज आपणही यहोवाच्या उद्देशांनुरूप कार्य करण्यास नम्रपणे तयार असले पाहिजे. येशू ख्रिस्ताने म्हटले होते: “तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल.”—योहान १५:७.

ख्रिस्ताचा अनुयायी प्रेषित पौल याला या शब्दांची प्रचिती आली होती. प्रार्थनेत असलेल्या सामर्थ्यावर त्यालाही विश्‍वास होता आणि त्याचा हा विश्‍वास निश्‍चितच व्यर्थ ठरला नाही. त्याने आपल्या ख्रिस्ती बांधवांना प्रोत्साहन दिले की त्यांनी आपल्या सर्व काळज्या आणि विवंचना प्रार्थनेत देवाला कळवाव्यात; त्याने स्वतःचा अनुभव सांगितला: “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्‍तिमान आहे.” (फिलिप्पैकर ४:६, ७, १३) पण, पौलाने प्रार्थनेत केलेल्या सर्वच विनंत्या मान्य झाल्या का? पाहू या.

सर्वच विनंत्या मान्य केल्या जात नाहीत

पौलाने निस्वार्थपणे यहोवाची सेवा केली; पण या सेवेत त्याला एक अडखळण होते. त्याचे वर्णन त्याने ‘शरीरातला काटा’ असे केले. (२ करिंथकर १२:७) त्याच्या सेवेचा विरोध करणाऱ्‍यांमुळे आणि ‘नामधारी बंधूंमुळे’ आलेल्या मानसिक आणि भावनिक क्लेशांबद्दल कदाचित पौल बोलत असावा. (२ करिंथकर ११:२६; गलतीकर २:४) किंवा त्याला डोळ्यांचा जो जुना विकार होता त्यासंदर्भात तो कदाचित बोलत असावा. (गलतीकर ४:१५) दोन्ही शक्यता आहेत. पण एवढे मात्र खरे की या ‘शरीरातल्या काट्यामुळे’ पौल त्रस्त झाला होता. त्याने लिहिले: “हा माझ्यापासून दूर व्हावा म्हणून मी प्रभूला तीनदा विनंती केली.” (२ करिंथकर १२:८, ९) पण पौलाची विनंती ऐकली गेली नाही. देवाने पौलाला सांगितले की त्याला मिळालेले आध्यात्मिक आशीर्वाद, उदाहरणार्थ परीक्षांना तोंड देण्याचे सामर्थ्य, त्याच्याकरता पुरेसे होते. शिवाय देवाने त्याला असेही सांगितले: “माझे सामर्थ्य अशक्‍तपणात पूर्णत्वास येते.”—२ करिंथकर १२:८, ९, ईजी टू रीड व्हर्शन.

अलियेजर आणि पौल यांच्या उदाहरणावरून आपण काय शिकतो? यहोवा देव त्याची नम्रपणे सेवा करू इच्छिणाऱ्‍यांच्या प्रार्थना ऐकतो. पण, तो त्यांची प्रत्येक विनंती मान्य करेल असा याचा अर्थ होत नाही. यहोवा सर्व गोष्टींचा दूरदृष्टीने विचार करतो. आपल्याकरता सर्वात हिताचे काय आहे हे आपल्यापेक्षा त्याला चांगले माहीत आहे. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे तो बायबलमध्ये प्रगट केलेल्या आपल्या उद्देशांनुरूपच नेहमी कार्य करतो.

आध्यात्मिक व्यथा दूर करण्याचा काळ

देव त्याच्या पुत्राच्या पृथ्वीवरील हजार वर्षांच्या राजवटीत मानवजातीच्या सर्व शारीरिक, मानसिक आणि भावनिक व्यथा दूर करेल, असे अभिवचन त्याने दिले आहे. (प्रकटीकरण २०:१-३; २१:३-५) या अभिवचनाची पूर्णता पाहण्याकरता विश्‍वासू ख्रिस्ती अधीरतेने वाट पाहात आहेत; त्यांना पूर्ण विश्‍वास आहे की हे अभिवचन वास्तवात उतरवण्याचे सामर्थ्य यहोवाजवळ आहे. आजच्या या काळात त्यांच्या व्यथावेदना चमत्कारिक रित्या नाहीशा होणार नाहीत याची त्यांना जाणीव आहे, पण ते सर्व प्रकारच्या परीक्षा प्रसंगांत सांत्वनासाठी आणि शक्‍तीसाठी देवाला प्रार्थना करतात. (स्तोत्र ५५:२२) गंभीर आजारपणाला तोंड देताना ते देवाच्या मार्गदर्शनाकरता प्रार्थना करू शकतात; यामुळे त्यांना आपल्या आर्थिक क्षमतेनुसार सर्वात चांगला उपचार मिळवण्याच्या उद्देशाने योग्य निर्णय घेण्यास मदत मिळते.

काही धर्मांत, येशूने व त्याच्या प्रेषितांनी केलेल्या चमत्कारांचा दाखला देऊन आजाऱ्‍यांना बरे होण्याकरता प्रार्थना करण्यास सांगितले जाते. पण, येशूने व त्याच्या प्रेषितांनी केलेले चमत्कार एका खास उद्देशाकरता होते. येशू ख्रिस्तच खरा मशीहा असल्याचा ते पुरावा होते. तसेच, देवाची कृपा आता यहुदी राष्ट्रावर नसून नवनिर्मित ख्रिस्ती मंडळीवर आहे याचा देखील ते पुरावा होते. त्याकाळी, नव्यानेच स्थापित झालेल्या ख्रिस्ती मंडळीचा विश्‍वास मजबूत करण्यासाठी चमत्कारिक दानांची आवश्‍यकता होती. नंतर जेव्हा ही मंडळी पूर्णपणे स्थापित झाली किंवा प्रौढ झाली, तेव्हा ही चमत्कारिक दाने ‘समाप्त झाली.’—१ करिंथकर १३:८, ११.

या अतिशय निर्णायक काळात, यहोवा देव आपल्या लोकांकडून अधिक महत्त्वाचे असे एक कार्य करून घेत आहे; ते म्हणजे आध्यात्मिक व्यथा दूर करण्याचे कार्य. देव लोकांना आव्हान करत आहे: “परमेश्‍वरप्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा; तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा; दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्‍वराकडे वळो म्हणजे तो त्याजवर दया करील; तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील.” आज लोकांनी या आव्हानाला लवकरात लवकर प्रतिसाद देणे आवश्‍यक आहे.—यशया ५५:६, ७.

पश्‍चात्तापी लोकांना आध्यात्मिक रित्या बरे करण्याचे कार्य आज देवाच्या राज्याच्या प्रचारातून साध्य केले जात आहे. (मत्तय २४:१४) आपल्या लोकांना हे जीवनदायी कार्य करण्याचे सामर्थ्य देऊन यहोवा देव सर्व राष्ट्रांतील लाखो लोकांना या दुष्ट जगाचा नाश होण्याआधी आपल्या पापांबद्दल पश्‍चात्ताप करून त्याच्यासोबत समेट करण्याचे आमंत्रण देत आहे. जे कोणी आध्यात्मिकरित्या बरे होण्यासाठी व हे बरे करण्याचे कार्य करण्याकरता मदतीसाठी प्रामाणिकपणे प्रार्थना करतात त्या सर्वांच्या प्रार्थना आज ऐकल्या जात आहेत.

[३ पानांवरील चित्राचे श्रेय]

अलियेजर व रिबका/The Doré Bible Illustrations/Dover Publications