विश्वासाचे प्रतिफळ
राज्य घोषकांचा वृत्तान्त
विश्वासाचे प्रतिफळ
प्रेषित पौलाचा यहोवावर अतिशय दृढ विश्वास होता; त्याने आपल्या सहविश्वासू बांधवांना देखील असाच विश्वास संपादन करण्याचे प्रोत्साहन दिले. त्याने म्हटले: “देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे.” (इब्री लोकांस ११:६) यहोवा आपल्या सेवकांच्या दृढ विश्वासाचे त्यांना कशाप्रकारे प्रतिफळ देतो आणि त्यांच्या प्रामाणिक प्रार्थनांचे कसे उत्तर देतो हे मोझांबिक येथील बंधूभगिनींना आलेल्या खालील अनुभवांवरून दिसून येते.
• नियासा येथे राहणाऱ्या एका विधवा बहिणीला आपल्या सहा मुलांना घेऊन “ईश्वरी जीवनाचा मार्ग” या प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहण्याची खूप इच्छा होती. गावातल्या बाजारात लहानमोठ्या वस्तू विकून ती आपला उदरनिर्वाह चालवायची. अधिवेशनाची तारीख जवळ येऊ लागली होती, पण तिच्याजवळ आपल्या कुटुंबासोबत अधिवेशनाच्या ठिकाणी जाण्यापुरतेच ट्रेनच्या तिकिटाचे पैसे जमले होते. तरीसुद्धा, तिने निश्चय केला की यहोवावरच भरवसा ठेवायचा, तोच काहीतरी मार्ग काढेल. या विश्वासाने ती अधिवेशनाला जाण्याच्या तयारीला लागली.
आपल्या सहा मुलांना घेऊन ती गाडीत बसली. तिकीट तपासायला आलेल्या कंडक्टरने तिचे लेपल कार्ड पाहिले आणि त्याविषयी चौकशी केली. बहिणीने आपण यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी जात असल्याचे त्याला सांगितले. कंडक्टरने विचारले, “अधिवेशन कुठे होणार आहे?” जवळजवळ तीनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या नाम्पुला गावात अधिवेशन होणार असल्याचे तिने सांगितले. तेव्हा त्याने बहिणीकडून तिकिटाचे निम्मेच पैसे घेतले; हे अगदीच अनपेक्षित होते! मग उरलेल्या पैशात त्याने बहिणीला आणि तिच्या परिवाराला परतीचे तिकीट देखील दिले. यहोवावर विश्वास ठेवल्याचा तिला किती आनंद झाला!—स्तोत्र १२१:१, २.
• जवळजवळ २५ वर्षांपासून, अत्यंत धार्मिक प्रवृत्तीची एक स्त्री सतत प्रार्थना करत होती की देवाने तिला खरा भक्तीचा मार्ग दाखवावा. ती ज्या चर्चला जात होती, तेथे धार्मिक विधींमध्ये अनेक परंपरागत रितीरिवाजांचे देखील पालन केले जायचे, पण ही उपासनेची पद्धत देवाला मान्य आहे का याविषयी तिला नेहमीच शंका वाटायची.
ती सांगते: “मला मत्तय ७:७ या वचनातले येशूचे शब्द नेहमी आठवायचे: ‘मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल.’ हे वचन आठवणीत ठेवून मी सतत देवाला प्रार्थना करायचे की त्याने मला सत्य उपासनेचा मार्ग दाखवावा. एकदा, आमच्या चर्चच्या पाळकांनी अशी घोषणा केली की ज्या लोकांची बाजारात दुकाने आहेत त्यांनी काही पैसे व दुकानातल्या वस्तू आणाव्यात. या वस्तू आणणाऱ्या लोकांना आशीर्वाद दिला जाईल असेही ते म्हणाले. हा प्रकार बायबलच्या आधारावर नाही हे मला माहीत होते आणि म्हणून मी काहीही नेले नाही. मी ‘अर्पण’ आणलेले नाही हे पाळकांनी पाहिले तेव्हा त्यांनी सर्वांसमोर माझा अपमान केला. त्या दिवशीच मला खात्री पटली की ही उपासनेची पद्धत निश्चितच देवाला मान्य नाही आणि मी चर्च सोडून दिले. पण, सत्य मार्ग सापडावा म्हणून मी सतत प्रार्थना करतच होते.
“शेवटी मी धैर्य एकवटले आणि यहोवाचे साक्षीदार असणाऱ्या माझ्या एका नातेवाईकाशी संपर्क साधला. त्यांनी मला एक पत्रिका दिली. त्यात मी जे वाचले त्यावरून मला खात्री पटली की देवाने माझ्या प्रार्थनेचे उत्तर दिले आहे. त्यावेळी मी आणि माझे पती लग्न न करताच सोबत राहात होतो. काही काळानंतर त्यांना देखील बायबलच्या तत्त्वांचे महत्त्व पटले आणि लवकरच आम्ही आमच्या लग्नाची कायदेशीर नोंदणी केली. पण नंतर माझे पती खूप आजारी झाले. देवाच्या राज्यात आमची पुन्हा भेट व्हावी म्हणून, मृत्यूपर्यंत ते मला सत्याच्या मार्गात टिकून राहण्याचे प्रोत्साहन देत राहिले.
“यहोवाने माझी प्रार्थना ऐकली आणि त्याची उपासना करण्याचा योग्य मार्ग मला दाखवला म्हणून मी त्याची सदैव ऋणी राहीन. यहोवाने माझी आणखीन एक प्रार्थना ऐकली, कारण आज माझी आठही मुले यहोवाचे समर्पित सेवक आहेत.”