साधीसुधी जीवनशैली ठेवून यहोवाची सेवा केली
जीवन कथा
साधीसुधी जीवनशैली ठेवून यहोवाची सेवा केली
क्लेर गर्बर मॉयर यांच्याद्वारे कथित
मी ९२ वर्षांची आहे आणि मला धड चालता येत नाही तरीपण, पुष्कळशा गोष्टी माझ्या मनात जशाच्या तशा, स्पष्ट आणि ताज्या आहेत. यहोवानं मला बालपणापासूनच त्याची सेवा करायचा सुहक्क दिल्याबद्दल मी त्याची शतशः आभारी आहे! हा सुहक्क जपून ठेवण्याकरता आमच्या साध्यासुध्या राहणीमानानं बराच हातभार लावला.
अमेरिकेतील ओहायोच्या अलायन्स येथे, १९०७ साली ऑगस्ट १८ रोजी माझा जन्म झाला. मी पाच भावंडांमध्ये सर्वात थोरली होते. मी आठ वर्षांची होते तेव्हा, बायबल विद्यार्थ्यांचा एक पूर्ण वेळेचा सेवक सायकलवरून आमच्या डेअरी फार्मवर आला; यहोवाच्या साक्षीदारांना तेव्हा बायबल विद्यार्थी असं संबोधलं जायचं. लॉरा गर्बर म्हणजे माझी आई दारात उभी होती; तो साक्षीदार माझ्या आईला भेटला आणि दुष्टाईला परवानगी का देण्यात आली होती हा प्रश्न त्यानं तिला विचारला. आश्चर्य म्हणजे, आईला नेहमी हाच प्रश्न पडायचा.
गोदामात काम करत असलेल्या माझ्या बाबांना विचारल्यावर तिनं स्टडीझ इन द स्क्रिप्चर्स हा सहा खंडांचा संच मागवला. तिनं त्याचं पान-न्-पान वाचून काढलं. ती शिकत असलेल्या बायबल सत्याने ती खूप प्रभावित झाली. द न्यू क्रिएशन या सहाव्या खंडाचा अभ्यास केल्यावर, पाण्यात बुडून ख्रिस्ती बाप्तिस्मा घेणं जरूरीचं आहे हे तिनं स्पष्टपणे जाणून घेतलं. परंतु बायबल विद्यार्थ्यांना कुठं शोधायचं हे माहीत नसल्यामुळे, तिनं आमच्या मळ्यातील एका लहानशा ओढ्यात बाबांना तिला बाप्तिस्मा देण्यास सांगितलं; १९१६ सालच्या मार्च महिन्याची ही गोष्ट, इतका गारठा होता तरीसुद्धा ती ओढ्यात उतरली.
एकदा आईनं पेपरमध्ये, अलायन्स येथे डॉटर्स ऑफ वेटेरन्स हॉलमध्ये होणाऱ्या एका भाषणाची जाहिरात वाचली. “द डिव्हाईन प्लॅन ऑफ द एजेस,” (युगांसाठी ईश्वरी योजना) हा भाषणाचा विषय होता. स्टडीझ इन द स्क्रिप्चर्सच्या पहिल्या खंडाचेही तेच शीर्षक असल्यामुळे आईनं त्या भाषणाला जायचं लगेच ठरवलं. आमच्या बग्गीला घोडे जुंपण्यात आले आणि आम्ही सहकुटुंब भाषण ऐकायला गेलो; ही आमची पहिलीच
सभा होती. तेव्हापासून आम्ही रविवारी आणि बुधवारी बांधवांच्या घरी होणाऱ्या सभांना उपस्थित राहू लागलो. त्यानंतर काही काळातच, ख्रिस्ती मंडळीच्या एका प्रतिनिधीनं आईला पुन्हा एकदा बाप्तिस्मा दिला. नेहमी मळ्याच्या कामात दंग असलेल्या बाबांनीसुद्धा बायबल सत्यात रस घ्यायला सुरवात केली आणि काही वर्षांनंतर त्यांनीही बाप्तिस्मा घेतला.पुढाकार घेणाऱ्यांना भेटणे
जून १०, १९१७ रोजी, वॉच टावर संस्थेचे तेव्हाचे अध्यक्ष, जे. एफ. रदरफोर्ड यांनी, “राष्ट्रे आपापसांत का लढतात?” या विषयावर भाषण द्यायला अलायन्सला भेट दिली. मी तेव्हा नऊ वर्षांची होते. आईबाबा व माझे दोन धाकटे भाऊ, विली आणि चार्ल्स यांच्याबरोबर मीही ते भाषण ऐकायला गेले. शंभराच्या वर लोक उपस्थित होते. ब्रदर रदरफोर्डनी जेथे भाषण दिलं त्या कोलंबिया थिएटरच्या बाहेर, भाषणानंतर उपस्थित असलेल्यांपैकी पुष्कळ जण फोटो काढायला ऐटित उभे होते. त्याच्या पुढील आठवडी त्याच ठिकाणी ब्रदर ए. एच. मॅकमिलन यांनी “देवाचे येणारे राज्य” या विषयावर भाषण दिलं. या बांधवांची भेट आमच्या छोट्याशा गावाला जणू एक आशीर्वादच ठरली!
अविस्मरणीय अधिवेशनं
अलायन्सपासून काही अंतरावर असलेल्या ओहायो येथील ॲटवॉटर शहरात १९१८ साली झालेलं अधिवेशन हे माझं पहिलं अधिवेशन होतं. तेव्हा शाखेचे प्रतिनिधी म्हणून जे ब्रदर आले होते त्यांना आईनं माझ्या बाप्तिस्म्याविषयी विचारलं, कारण मी बाप्तिस्मा घेण्याइतपत मोठी झाले होते असे आईला वाटत होतं. देवाची इच्छा करण्याकरता मी माझं समर्पण केलं होतं याची मला पूर्ण खात्री होती. मग जवळच असलेल्या सफरचंदाच्या मळ्याजवळून वाहत जाणाऱ्या ओढ्यात त्या दिवशी मला बाप्तिस्मा घेण्याची परवानगी मिळाली. बाप्तिस्मा घेणाऱ्यांसाठी बांधवांनी उभारलेल्या एका तंबूत मी कपडे बदलले आणि एक जुना व खूप जड असा नाईटगाऊन घालून बाप्तिस्मा घेतला.
आईबाबा आणि मी, १९१९ सालच्या सप्टेंबर महिन्यात सॅनडस्की, ओहायोच्या लेक एरीला ट्रेननं गेलो. तेथून पुढं नावेत बसून आम्ही सीडर पॉईंटला गेलो; तिथं जायला जास्त वेळ लागला नाही. तिथले ते अधिवेशन मी कधीही विसरणार नाही. नावेतून उतरल्यावर धक्क्यावर एक लहानशी टपरी होती जिथं खायच्या सर्व वस्तू मिळायच्या. मी एक हॅमबर्गर घेतलं; त्या दिवसांत हॅमबर्गर म्हणजे, सर्वात महाग! वाह! काय चव होती त्याची! आठ दिवसांच्या त्या अधिवेशनाच्या उपस्थितीचा उच्चांक ७००० इतका होता. तेव्हा अधिवेशनात साऊण्ड सिस्टम नसल्यामुळे मला लक्ष देऊन सर्व कार्यक्रम ऐकावा लागला.
याच अधिवेशनात, टेहळणी बुरूज मासिकासोबतच्या गोल्डन एजचं (आता ज्याला सावध राहा! म्हटले जाते) अनावरण करण्यात आलं. या अधिवेशनाला हजर राहण्याकरता मला माझ्या शाळेच्या पहिल्या आठवडी दांडी मारावी लागली. पण त्यामुळे माझा काही तोटा झाला नाही, उलट फायदाच झाला. सीडर पॉईंटला लोक नेहमी सुटी घालवायला येत असत; तेथील एका रेस्टॉरंटमध्ये अधिवेशनाला आलेल्या प्रतिनिधींसाठी भोजन तयार करण्याकरता स्वयंपाकी होते. पण काही कारणास्तव, स्वयंपाक्यांनी व वेटर म्हणून काम करणाऱ्या स्त्रियांनी संप केला. मग काय, स्वयंपाक येणाऱ्या ख्रिस्ती बांधवांनी पटापट सर्व प्रतिनिधींसाठी भोजन तयार केलं. त्यानंतर कित्येक दशकांपर्यंत संमेलनांमध्ये व अधिवेशनांमध्ये यहोवाचे साक्षीदारच भोजन तयार करायचे.
एकोणीशे बावीस सालच्या सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा नऊ दिवसांच्या अधिवेशनाकरता आम्ही सीडर पॉईंटला गेलो. या अधिवेशनाच्या उपस्थितीचा उच्चांक १८,००० होता. याच अधिवेशनात ब्रदर रदरफोर्ड यांनी “राजा आणि त्याचे राज्य यांची घोषणा करा, घोषणा करा, घोषणा करा,” असं उत्तेजन दिलं होतं. पण मी तर केव्हाच ट्रॅक्ट्स आणि गोल्डन एज मासिकांचं वितरण करून सेवेत भाग घ्यायला सुरवात केली होती.
सेवेबद्दल कृतज्ञता
एकोणीशे अठरा साली, मी द फॉल ऑफ बॅबिलॉन या ट्रॅक्टचं जवळपासच्या मळ्यांमध्ये जाऊन वितरण करण्यात भाग घेतला. थंडीचे दिवस असल्यामुळे आमचे पाय गरम ठेवण्याकरता आम्ही घरातूनच शेगडीवर गरम केलेला एक खास दगड बग्गीत ठेवत असू. बग्गीला वरून छत होतं आणि बाजूला पडदे पण आत हिटर नव्हता. म्हणून मग आम्ही चांगलेच जाडजूड कोट व टोपी घालायचो. काय मजा यायची तेव्हा!
एकोणीशे वीस साली, द फिनिश्ड मिस्ट्रीची एक खास आवृत्ती “ZG” या नावानं मासिकाच्या रूपात प्रकाशित करण्यात आली. * हे प्रकाशन घेऊन मी आईबाबांसह अलायन्सला गेले. त्या दिवसांत सर्वजण घरोघरी प्रचार करायला एकएकटेच जायचे. एकदा, एका वरांड्यात खूप लोक बसले होते. इतक्या लोकांना पाहून मी आपली घाबरत घाबरत वरांड्यात पाऊल ठेवलं. माझी साक्ष देऊन झाल्यावर एक स्त्री म्हणाली: “अरे वा, काय छान भाषण दिलं हिनं!” आणि असं म्हणून तिनं माझ्याकडचं प्रकाशन घेतलं. त्या दिवशी मी १३ “ZG” दिली. घरोघरच्या कार्यात इतकी लांबसडक आणि औपचारिक साक्ष देण्याची माझी ही पहिलीच वेळ होती.
मी नववीत असताना आईला न्यूमोनिया झाला. ती महिन्यापेक्षा जास्त दिवस बिछान्यातच होती. माझी धाकटी बहीण हेझल तेव्हा बाळ होती. त्यामुळे मग मळ्यात काम करण्यासाठी व भावंडांची काळजी घेण्यासाठी मला शाळा सोडावी लागली. पण बायबल सत्याबद्दल आमच्या कुटुंबानं केव्हाही हलगर्जीपणा दाखवला नाही; आम्ही मंडळीच्या सर्व सभांना नियमानं उपस्थित राहत होतो.
एकोणीशे अठावीस सालच्या ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारकदिनी उपस्थित असलेल्या सर्वांना “ते नऊ जण कोठे आहेत?” हे ट्रॅक्ट देण्यात आलं. त्यामध्ये बायबलमधील लूक १७:११-१९ या वचनांतील अहवालाची चर्चा करण्यात आली होती. तो अहवाल होता चमत्कारिकरीत्या बरे केलेल्या त्या दहा कुष्ठरोग्यांचा ज्यांच्यापैकी केवळ एक जण येशूचे कृतज्ञतापूर्वकतेने आभार मानतो. या अहवालाचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. मी स्वतःला विचारलं: ‘मी कितपत कृतज्ञ आहे?’
आतापर्यंत घरात सर्व काही व्यवस्थित चाललं होतं, मीही चांगली ठणठणीत होते आणि माझ्यावर कसली जबाबदारीही नव्हती म्हणून मी पायनियर सेवेत उतरण्याचा निर्णय घेतला; हीच पूर्ण वेळेची सेवा आहे. आईबाबांनीही मला साथ दिली. माझी पायनियर सोबती ॲग्नेस अलेटा आणि मला नेमणूक मिळाली आणि १९२८ सालच्या ऑगस्ट २८ रोजी रात्री ९ वाजता आम्ही ट्रेनमध्ये बसलो. आमच्याजवळ प्रत्येकी एक सूटकेस आणि बायबल साहित्य घेण्याकरता एक बॅग होती बस्स इतकंच. स्टेशनवर आईबाबा, माझ्या बहिणी सर्व रडत होते, आम्ही पण रडत होतो. मला वाटलं मी त्यांना पुन्हा कधीच पाहणार नाही, कारण हर्मगिदोन फार जवळ आलं आहे असं आम्हा सर्वांना वाटायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी, आम्ही दोघी केनटक्की मधील ब्रुक्सवील शहरात पोहंचलो; या ठिकाणी आम्हाला नेमणूक मिळाली होती.
आम्ही लॉजमध्ये एक लहानशी खोली भाड्यानं घेतली. खाण्यासाठी स्पगेटीचे कॅन विकत आणले आणि आम्ही सॅण्डवीचसुद्धा करून खात होतो. आम्ही दोघी दररोज वेगवेगळ्या दिशेनं जायचो, म्हणजे ॲग्नेस एकीकडे तर मी दुसरीकडे. पाच पुस्तकांचा एक संच १.९८ डॉलरला आम्ही घरमालकाला सादर करत असू. हळूहळू आम्ही संपूर्ण शहरात प्रचार केला; बायबलमध्ये आस्था असलेल्या अनेक लोकांना आम्ही भेटलो.
सुमारे तीन महिन्यांत आम्ही ब्रुक्सवील आणि ऑगस्टा शहरातील जवळजवळ प्रत्येकाला साक्ष दिली होती. म्हणून आम्ही मेझवील, पॅरिस आणि रिचमण्ड शहरांमध्ये कार्य करू लागलो. पुढील तीन वर्षांत केनटक्कीच्या ज्या शहरांमध्ये मंडळ्या नव्हत्या अशा बहुतेक शहरांत आम्ही साक्ष दिली. बहुतेकवेळा ओहायोतील आमचे मित्र व कौटुंबिक सदस्य आमच्याकडे यायचे आणि कधीकधी एका आठवड्यासाठी किंवा त्याहून जास्त वेळ राहून आमच्याबरोबर सेवा करायचे.
स्मृतीत राहिलेली इतर अधिवेशनं
ओहायोतील कोलंबस येथे १९३१ सालच्या जुलै २४-३० तारखांना झालेलं अधिवेशन मी खरंच विसरलेली नाही. आपल्याला यहोवाचे साक्षीदार या बायबल आधारित नावानं इथून पुढं ओळखलं जाईल हे याच अधिवेशनात घोषित करण्यात आलं होतं. (यशया ४३:१२) पूर्वी जेव्हा लोक आम्हाला विचारायचे की तुम्ही कोणत्या धर्माचे आहात, तेव्हा आम्ही त्यांना म्हणायचो आम्ही: “आंतरराष्ट्रीय बायबल विद्यार्थी” आहोत. पण खरं तर या नावानं आम्ही काही वेगळे वाटायचो नाही कारण इतरही बायबल विद्यार्थी होते ज्यांचा कोणत्या न् कोणत्या धार्मिक गटांशी संबंध होता.
अग्नेसचं लग्न झाल्यावर मी एकटीच पडले. पण, ज्याला पायनियर सोबती हवा त्यानं अमुक ठिकाणी भेटावं अशी घोषणा झाली तेव्हा मला खूप आनंद झाला. तेथे मी बर्था, एलसी गर्टी आणि बेसी एन्समिंगर यांना भेटले. त्यांच्याकडे दोन कार होत्या व त्यांच्याबरोबर काम करायला त्या चौथ्या पायनियर बहिणीच्या शोधात होत्या. यापूर्वी मी त्यांना कधी भेटले नव्हते, तरी आम्ही मिळून अधिवेशनाला गेलो.
उन्हाळ्यात आम्ही संपूर्ण पेन्सिल्व्हेनियात कार्य केलं. मग हिवाळा जवळ आल्यावर आम्ही उत्तर कॅरोलिना, व्हर्जिनिया आणि मेरीलँड या दक्षिणेकडील उष्ण राज्यांत नेमणूक मागून घेतली. वसंत ऋतूत आम्ही पुन्हा उत्तरेकडे जायचो. पूर्वी सर्व पायनियर असेच करायचे. अशाचप्रकारे कार्य करणारे जॉन बूथ आणि रुडॉल्फ अबबूल यांनी १९३४ साली, राल्फ मोयर आणि त्याचा धाकटा भाऊ विलर्ड यांना आपल्यासोबत केनटक्कीच्या हॅजर्ड येथे नेलं.
तशी मी राल्फला अनेकदा भेटले होते. पण १९३५ साली मे ३० ते जून ३ पर्यंत वॉशिंग्टन, डि.सी. येथे झालेल्या एका मोठ्या अधिवेशनात आमची जास्त ओळख झाली. “मोठा प्रकटीकरण ७:९-१४) तोपर्यंत तरी आमचा विश्वास होता, की मोठ्या समूहाचे लोक स्वर्गात जाणारे परंतु १,४४,००० च्या गटातल्या लोकांपेक्षा कमी विश्वासू होते. (प्रकटीकरण १४:१-३) म्हणून मला मोठ्या लोकसमुदायापैकी एक व्हायचं नव्हतं!
समूह” किंवा “मोठा लोकसमुदाय” या विषयावर जेव्हा भाषण सादर केलं जात होतं तेव्हा राल्फ आणि मी बाल्कनीत सोबतच बसलो होतो. (पण बंधू रदरफोर्ड यांनी जेव्हा, मोठ्या समुदायाचे लोक म्हणजे हर्मगिदोनातून वाचून पृथ्वीवर राहणारे लोक आहेत असं सांगितलं तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं. त्यानंतर त्यांनी, मोठ्या लोकसमुदायाचे असलेल्या सर्वांना उभं राहायला सांगितलं. मी उभी राहिले नाही, पण राल्फ उभा राहिला. पण मग त्यानंतर माझ्या मनातील शंका दूर झाली व १९३५ सालानंतर ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारक विधीतली भाकर आणि द्राक्षारस मी नंतर कधीच घेतली नाही. परंतु, आईनं तिच्या मृत्यूपर्यंत त्यांचं सेवन केलं. १९५७ च्या नोव्हेंबर महिन्यात तिचा मृत्यू झाला.
जीवनसाथी
राल्फ आणि माझा पत्रव्यवहार चालू राहिला. मी न्यूयॉर्कच्या लेक प्लसीड येथे तर तो पेन्सिल्व्हेनियात सेवा करत होता. १९३६ मध्ये त्यानं एक लहानसं ट्रेलर बनवलं व ते आपल्या कारच्या मागं जोडलं. पेन्सिल्व्हेनियाच्या पॉट्सटाऊन पासून न्यूजर्सीच्या नीवॉर्कपर्यंत त्यानं ते आणलं कारण तेथे ऑक्टोबर १६-१८ रोजी अधिवेशन होतं. एकदा कार्यक्रम संपल्यावर संध्याकाळी आम्ही पुष्कळ पायनियर्स त्याचा नवीन ट्रेलर पाहायला गेलो. ट्रेलरच्या आत त्यानं बनवलेल्या सिंकशेजारी आम्ही दोघं उभं होतो, तेव्हा त्यानं मला विचारलं: “तुला माझं ट्रेलर आवडलं?”
मी होकारार्थी मान हलवली तेव्हा: “तू राहशील का यात?” असं त्यानं विचारलं.
मी “हो” म्हणाले. त्यानं अलगदपणे मला एक चुंबन दिलं जे आजवर माझ्या लक्षात आहे. काही दिवसांनंतर आम्हाला विवाह करण्याचा परवाना मिळाला. ऑक्टोबर १९ रोजी म्हणजे अधिवेशन संपल्यावर आम्ही ब्रुकलिनला गेलो आणि वॉच टावर संस्थेचे छपाई कारखाने पाहिले. मग आम्ही स्वतःसाठी क्षेत्र विचारलं. त्या वेळी ग्रान्ट सूटर क्षेत्राचं काम पाहायचे. त्यांनी विचारलं की, अमुक क्षेत्रात कोण जाऊन साक्ष देईल. राल्फ म्हणाला: “आमचं लग्न झालं तर आम्हीच जाऊ.”
“तुम्ही जर संध्याकाळी पाचपर्यंत आलात, तर मग आपण व्यवस्था करू,” असं ब्रदर सूटर म्हणाले. म्हणून मग त्या संध्याकाळी आम्ही ब्रुकलिन हाईट्स येथील एका साक्षीदाराच्या घरात विवाहबद्ध झालो. आमच्या काही मित्रमैत्रिणींबरोबर आम्ही एका स्थानिक रेस्टॉरंटमध्ये भोजन केलं आणि मग न्यूजर्सीच्या नीवॉर्क येथे असलेल्या राल्फच्या ट्रेलरपर्यंत सार्वजनिक वाहतुकीनं गेलो.
त्यानंतर काही काळातच आम्ही आमच्या पहिल्या पायनियर नेमणुकीकरता व्हर्जिनियाच्या हिथ्सवीलला गेलो. आम्ही नॉर्थ्मबरलँड काऊन्टी येथे कार्य केलं आणि मग पेन्सिल्व्हेनियाच्या फुल्टन आणि फ्रँकलिन या गावांत गेलो. १९३९ मध्ये राल्फला झोनच्या कामासाठी आमंत्रण मिळालं; या कामात आम्हाला आळीपाळीनं अनेक मंडळ्यांना भेटी द्यायच्या होत्या. आम्ही टेनीसीच्या राज्यातील मंडळ्यांना भेटी दिल्या. त्या नंतरच्या वर्षी आमचा मुलगा ॲलन याचा जन्म झाला व १९४१ मध्ये आमचं झोन कार्य थांबलं. मग आम्हाला व्हर्जिनियाच्या मरियोन शहरात खास पायनियर म्हणून नेमण्यात आलं. आणि
त्या काळात खास पायनियरांना महिन्याला २०० तास भरायचे होते.तडजोडी
एकोणीशे त्रेचाळीसमध्ये मला खास पायनियरींग सोडून द्यायची गरज भासली. एका लहानशा ट्रेलरमध्ये राहून बाळाची काळजी घ्यायची, स्वयंपाक बनवायचा, धुणीभांडी करून सर्वकाही स्वच्छ ठेवायचं आणि दर महिन्याला सेवेमध्ये ६० तास भरायचे इतकं सोपं नव्हतं. राल्फनं मात्र खास पायनियरींग सोडलं नाही.
एकोणीशे पंचेचाळीसमध्ये आम्ही, नऊ वर्षांपर्यंत ज्यात राहिलो होतो तो ट्रेलर विकला आणि आईबाबा जेथे राहत होते त्या मळ्यात म्हणजे अलायन्स, ओहायो येथे राहायला गेलो. इथेच, समोरच्या व्हरांड्यात आमच्या मुलीचा अर्थात रिबेकाचा जन्म झाला. राल्फनं तेथेच एक अर्धवेळेची नोकरी घेतली व नियमित पायनियर म्हणून सेवा करू लागला. मी मळ्यात काम करायचे आणि त्याला त्याचं पायनियरींग चालू ठेवण्याकरता माझ्यानं होता होईल ती मदत द्यायचे. माझ्या कुटुंबानं आम्हाला घर आणि जागा फुकट देऊ केली पण राल्फनं ती नाकारली. कारण त्याला राज्य आस्थेला अधिक वेळ द्यायचा होता.
एकोणीशे पन्नास साली आम्ही पुन्हा पेन्सिल्व्हेनियाच्या पॉट्सटाऊनला राहायला गेलो आणि महिन्याला २५ डॉलर भाड्यावर एक घर घेतले. पुढील ३० वर्षांपर्यंत फक्त ७५ डॉलर इतकेच भाडे वाढले. आपलं राहणीमान साधं ठेवण्यामध्ये यहोवा आम्हाला मदत करत होता असेच आम्हाला वाटलं. (मत्तय ६:३१-३३) राल्फ आठवड्यातून तीन दिवस न्हाव्याचं काम करायचा. दर आठवडी आम्ही आमच्या दोन मुलांबरोबर बायबलचा अभ्यास करायचो, मंडळीच्या सभांना उपस्थित राहायचो आणि सहकुटुंब राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करायचो. राल्फ स्थानिक मंडळीत अध्यक्षीय पर्यवेक्षक म्हणून कार्य करायचा. आमची जीवनशैली साधी ठेवल्यामुळे आम्ही यहोवाच्या सेवेत जास्त भाग घेऊ शकलो.
माझ्या प्रिय सोबत्याचा मृत्यू
मे १७, १९८१ रोजी आम्ही राज्य सभागृहात जाहीर भाषण ऐकत बसलो होतो. अचानक राल्फला अस्वस्थ वाटू लागलं, तो मागे गेला आणि मला अटेन्डंटच्या हाती एका कागदावर असं लिहून पाठवलं की तो घरी चाललाय. राल्फ यापूर्वी असं कधी वागला नव्हता म्हणून मग मी मंडळीतल्या एकाला मला लगेच घरी सोडवायला सांगितलं. राल्फला पक्षघाताचा जोरदार झटका आला होता आणि तासाभरातच तो मरण पावला. त्या सकाळी टेहळणी बुरूज मासिकाच्या अभ्यासाच्या शेवटी मंडळीत घोषित करण्यात आले की राल्फचा मृत्यू झाला आहे.
त्या महिन्यात राल्फनं सेवेत ५० पेक्षा अधिक तास भरले होते. ४६ पेक्षा अधिक वर्षांपर्यंत तो पूर्ण वेळेच्या सेवेत होता. त्यानं शंभराच्या वर लोकांबरोबर बायबलचा अभ्यास केला होता जे कालांतराने यहोवाचे बाप्तिस्माप्राप्त साक्षीदार झाले होते. इतक्या वर्षांत आम्हाला जितके त्याग करावे लागले त्याच्या बदल्यात आम्हाला कितीतरी आध्यात्मिक आशीर्वादसुद्धा लाभले होते.
माझ्या विशेषाधिकारांबद्दल कृतज्ञ
गेल्या १८ वर्षांपासून मी एकटीच राहते, सभांना उपस्थित राहते आणि मला जमेल तसे इतरांना प्रचार करते व देवाच्या वचनाचा अभ्यास करते. सध्या मी सेवानिवृत्त लोकांसाठी असलेल्या निवासस्थानात राहत आहे. माझ्याकडे जास्त सामानसुमान नाही. टीव्ही देखील नको असा मी विचार केलाय. परंतु माझं जीवन मात्र आध्यात्मिकरीतीने समृद्ध आहे. आईबाबा आणि माझे दोन भाऊ त्यांच्या मृत्यूपर्यंत विश्वासू राहिले आणि माझ्या दोन बहिणी सत्यात आजपर्यंत विश्वासू आहेत.
माझा मुलगा ॲलन ख्रिस्ती मंडळीत वडील या नात्याने कार्य करतो हे पाहून मला आनंद वाटतो. गेल्या अनेक वर्षांपासून त्यानं राज्य सभागृहे आणि संमेलन गृहे यांतील साऊण्ड सिस्टम लावण्याचं काम केलं व उन्हाळ्याच्या दिवसांत होणाऱ्या संमेलनातही तो ती कामे करतो. त्याची पत्नी देखील देवाची एकनिष्ठ सेविका आहे आणि त्यांचे दोन मुलगे आज वडील या नात्याने कार्य करीत आहेत. माझी मुलगी, रिबेका केरस हिनं पूर्ण वेळेच्या सेवेत ३५ पेक्षा अधिक वर्षं खर्च केली आणि ब्रुकलिन येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयातसुद्धा चार वर्ष सेवा केली. तिनं आणि तिच्या पतीनं अमेरिकेच्या विविध भागात २५ पेक्षा अधिक वर्षं प्रवासी कार्यात खर्च केली आहेत.
राज्य हे लपवून ठेवलेल्या एका ठेवीसारखं आहे जे शोधल्यावर सापडू शकतं असं येशू म्हणाला होता. (मत्तय १३:४४) माझ्या कुटुंबाला बऱ्याच वर्षांपूर्वी सत्याची ओळख करून दिल्याबद्दल मी खरोखरच यहोवाची ऋणी आहे. ८० पेक्षा अधिक वर्षांकरता यहोवा देवाची समर्पित सेवा करायला मिळाल्याबद्दल मला किती धन्य वाटतं! मला कसलाही पस्तावा नाही. मला पुन्हा एकदा जीवन जगण्याची संधी दिली तर मी हेच जीवन निवडेन कारण ‘यहोवाचे वात्सल्य [प्रेमळ-दया] जीवनाहून उत्तम आहे.’—स्तोत्र ६३:३.
[तळटीपा]
^ परि. 17 द फिनिश्ड मिस्ट्री (समाप्त झालेले गूढ) हा स्टडीझ ईन द स्क्रिप्चर्समधला सातवा खंड होता. पहिले सहा खंड चार्ल्स टेझ रस्सल यांनी लिहिले होते. आणि हा सातवा खंड रस्सल यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित करण्यात आला.
[२३ पानांवरील चित्र]
आम्ही १९१७ साली ओहायोच्या अलायन्स येथे ब्रदर रदरफोर्ड यांचं भाषण ऐकलं
[२३ पानांवरील चित्र]
राल्फनं तयार केलेल्या ट्रेलरपुढं उभं असताना
[२४ पानांवरील चित्र]
आज माझ्या दोन मुलांसह