कशाप्रकारे येशू ख्रिस्त आपली मदत करू शकतो
कशाप्रकारे येशू ख्रिस्त आपली मदत करू शकतो
पृथ्वीवर असताना येशू ख्रिस्ताने लोकांची अद्भुतरितीने मदत केली. एका प्रत्यक्ष साक्षीदाराने तर त्याच्या जीवनातील असंख्य घटनांविषयी सांगितल्यावर असे म्हटले: “येशूने केलेली दुसरीहि पुष्कळ कृत्ये आहेत, ती सर्व एकएक लिहिली तर लिहिलेली पुस्तके ह्या जगात मावणार नाहीत, असे मला वाटते.” (योहान २१:२५) पृथ्वीवर असताना येशूने इतके काही केले तर आपल्यासमोर असा प्रश्न उभा राहतो: ‘आता तर तो स्वर्गात आहे मग आपली मदत कशी करू शकतो? आणि येशूच्या कनवाळुपणाचा आपल्याला आता काही फायदा होऊ शकतो का?’
याचे उत्तर मनाला दिलासा देणारे आहे. बायबल म्हणते की, ख्रिस्त, “आपल्यासाठी देवासमोर उभे राहण्यास प्रत्यक्ष स्वर्गात गेला.” (इब्री लोकांस ९:२४) आपल्यासाठी त्याने काय केले? प्रेषित पौल म्हणतो: “बकरे व वासरे ह्यांचे नव्हे, तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच [ख्रिस्त] परमपवित्रस्थानात [“प्रत्यक्ष स्वर्गात”] गेला, आणि त्याने सार्वकालिक मुक्ति मिळविली.”—इब्री लोकांस ९:१२; १ योहान २:२.
खरोखर किती ही आनंदाची गोष्ट! लोकांसाठी अद्भुत कृत्ये करण्याचे थांबवण्याऐवजी स्वर्गात गेल्यामुळे येशूला मानवजातीसाठी आणखी अद्भुत कृत्ये करता आली. कारण देवाने आपल्या अपात्र कृपेमुळे त्याला “स्वर्गामध्ये राजवैभवाच्या सिंहासनाच्या उजवीकडे” बसवून “सेवक” अर्थात प्रमुख याजक म्हणून नियुक्त केले.—इब्री लोकांस ८:१, २.
“सेवक”
अशाप्रकारे, येशू स्वर्गामध्ये राहून सुद्धा मानवजातीसाठी सेवक होणार होता. इस्राएलचा प्रमुख याजक प्राचीन काळातल्या देवाच्या उपासकांसाठी करत असलेले कार्य येशू करणार होता. आणि ते कार्य कोणते होते? पौल म्हणतो: “प्रत्येक प्रमुख याजक दाने व यज्ञ अर्पावयास नेमिलेला असतो, म्हणून ह्याच्याजवळहि [स्वर्गारोहण झालेल्या येशू ख्रिस्ताजवळही] अर्पिण्यास काहीतरी असणे अगत्याचे आहे.”—इब्री लोकांस ८:३.
प्राचीन काळातल्या प्रमुख याजकापेक्षा येशूचे अर्पण कितीतरी पटीने श्रेष्ठ होते. “बकऱ्याचे व बैलाचे रक्त” यांनी प्राचीन इस्राएलचे लोक बहुतांशी आध्यात्मिक शुद्धी प्राप्त करू शकत होते ‘तर ज्याने स्वतःस देवाला अर्पण केले त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सद्सद्विवेकबुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेषकरून शुद्ध करील?’—इब्री लोकांस ९:१३, १४.
येशू एक उल्लेखनीय सेवक देखील आहे कारण त्याला अमरत्व देण्यात आले आहे. प्राचीन इस्राएलमध्ये, “पुष्कळ याजक होऊन गेले; कारण त्यांना निरंतर याजक राहण्यास मृत्यूचा अडथळा होत असे.” पण येशूविषयी काय? पौल लिहितो: “ह्याचे याजकपण अढळ आहे. ह्यामुळे ह्याच्या द्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे; कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे.” (इब्री लोकांस ७:२३-२५; रोमकर ६:९) होय, स्वर्गामध्ये देवाच्या उजवीकडे आपला एक सेवक आहे जो आपल्यासाठी ‘मध्यस्थी करण्यास सर्वदा जिवंत आहे.’ आज आपल्यासाठी याचा काय अर्थ होतो याचा जरा विचार करा!
पृथ्वीवर असताना लोकांच्या झुंडीच्या झुंडी येशूकडे येत असत; काहीवेळा तर त्यांना फार दूर दूरहून यावे लागायचे. (मत्तय ४:२४, २५) परंतु आता येशू स्वर्गामध्ये असल्यामुळे सर्व राष्ट्राचे लोक सहजपणे त्याची मदत घेऊ शकतात. स्वर्गातल्या सर्वात उंच ठिकाणावरून लोकांची सेवा करण्यासाठी हा सेवक सदा सर्वदा हजर आहे.
येशू कशाप्रकारचा प्रमुख याजक आहे?
शुभवर्तमानांच्या अहवालांमधील येशू ख्रिस्ताच्या वर्णनावरून त्याची मदत करण्याची वृत्ती आणि कनवाळुपणा यांचे स्पष्ट दर्शन घडते. तो किती स्वार्थत्यागी होता! कधी कधी असे व्हायचे की, तो आपल्या शिष्यांसोबत आराम करत असायचा तेव्हाच लोक त्याच्याजवळ यायचे. पण त्याने कधीच चिडचिड केली नाही, उलट “त्याला त्यांचा कळवळा” यायचा. तो थकलेला, उपाशी, तान्हेला असतानाही ‘त्यांचे स्वागत करायचा.’ पापी लोक खरा पश्चात्ताप करायची इच्छा दाखवायचे तेव्हा त्यांची मदत करण्यासाठी तो उपाशी राहण्यास तयार होता.—मार्क ६:३१-३४; लूक ९:११-१७; योहान ४:४-६, ३१-३४.
येशूला लोकांचा कळवळा येत असे आणि त्याने त्यांच्या शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिक गरजा पूर्ण करण्यासाठी व्यवहारिक पावलेसुद्धा उचलली. (मत्तय ९:३५-३८; मार्क ६:३५-४४) शिवाय त्याने त्यांना कायमस्वरूपी दिलासा आणि सांत्वन मिळवण्यास शिकवले. (योहान ४:७-३०, ३९-४२) उदाहरणार्थ, येशूने आमंत्रण दिले: “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जिवास विसावा मिळेल.” किती दिलासा देणारे आमंत्रण!—मत्तय ११:२८, २९.
येशूची लोकांवर इतकी गाढ प्रीती होती की त्याने त्यांच्याकरता आपला प्राण दिला. (रोमकर ५:६-८) याविषयी प्रेषित पौलाने म्हटले: “ज्याने [यहोवा देवाने] आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपणा सर्वांकरिता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही? . . . जो मेला इतकेच नाही, तर मेलेल्यातून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीहि करीत आहे तो ख्रिस्त येशू आहे.”—रोमकर ८:३२-३४.
परिस्थिती समजून घेणारा प्रमुख याजक
पृथ्वीवर असताना त्याला भूक, तहान लागत होती. थकवा, चिंता, वेदना जाणवत होत्या; त्याने मृत्यूसुद्धा अनुभवला होता. या सगळ्या ताण-तणावातून तो निभावला होता म्हणूनच त्रासलेल्या मानवजातीसाठी प्रमुख याजक या नात्याने सेवा करण्यास तो योग्य होता. पौलाने लिहिले: “[येशूला] सर्व प्रकारे ‘आपल्या बंधुसारखे’ होणे अगत्याचे होते, ह्यासाठी की, लोकांच्या पापाबद्दल प्रायश्चित्त करण्याकरिता त्याने स्वतः देवासंबंधीच्या गोष्टींविषयी दयाळू व विश्वसनीय प्रमुख याजक व्हावे. कारण ज्याअर्थी त्याने स्वतः परीक्षा होत असता दुःख भोगिले त्याअर्थी ज्यांची परीक्षा होत आहे त्यांना साहाय्य करावयास तो समर्थ आहे.”—इब्री लोकांस २:१७, १८; १३:८.
लोकांना देवाजवळ येण्यास मदत करण्यासाठी तो समर्थ आणि इच्छुक आहे हे त्याने दाखवून दिले. पण याचा अर्थ, त्याला निष्ठुर, कोणाचीही दयामाया न करणाऱ्या आणि सहजासहजी क्षमा न करणाऱ्या देवाला पटवावे लागते असे काही आहे का? मुळीच नाही, कारण बायबल आपल्याला हे आश्वासन देते की, ‘यहोवा उत्तम व क्षमाशील आहे.’ ते असेही म्हणते की, “जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील.” (स्तोत्र ८६:५; १ योहान १:९) खरे तर, येशूच्या प्रेमळ शब्दांमध्ये आणि कृतींमध्ये त्याच्या पित्याचा कनवाळुपणा, दया आणि प्रेम दिसून येते.—योहान ५:१९; ८:२८; १४:९, १०.
पश्चात्ताप करणाऱ्या पापी व्यक्तींना येशू विसावा कसा देतो? जेव्हा ते प्रामाणिकपणे देवाला खूष करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा येशू त्यांची मदत करतो यामुळे त्यांना आनंद व समाधान लाभते. आपल्या सोबतच्या अभिषिक्त ख्रिश्चनांना पौलाने असे म्हटले: “तर मग आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे, म्हणून आपण जो पत्कर केलेला आहे तो दृढ धरून राहू. कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूति वाटत नाही, असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता; तरी निष्पाप राहिला. तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी साहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ.”—‘ऐनवेळी साहाय्य’
काहीवेळा गंभीर आजारपण, दोषी भावनेचे ओझे, अति निरुत्साह आणि खिन्नता अशा समस्या आपल्यासमोर आल्या आणि आपल्याला त्या हाताळता येणार नाहीत असे वाटू लागले तर काय? प्रार्थना करण्याचा विशेषाधिकार आपल्याला आहे; येशूने नेहमीच यहोवावर भरवसा ठेवला व त्याला प्रार्थना केली. उदाहरणार्थ, आपल्यासाठी प्राण देण्याच्या आदल्या रात्री “अत्यंत विव्हळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली, तेव्हा रक्ताचे मोठमोठे थेंब भूमीवर पडावे असा त्याचा घाम पडत होता.” (लूक २२:४४) होय, एखादा कळकळून प्रार्थना करतो तेव्हा त्याला किती बरं वाटतं याची येशूला जाण आहे. “आपल्याला मरणातून तारावयास जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने . . . मोठा आक्रोश करीत व अश्रु गाळीत प्रार्थना व विनवणी केली, आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली.”—इब्री लोकांस ५:७.
एखाद्याची प्रार्थना “ऐकण्यात” येते आणि त्याला शक्ती मिळते तेव्हा मानवांना त्याचे किती महत्त्व वाटते हेसुद्धा येशूला ठाऊक आहे. (लूक २२:४३) त्याने आणखी पुढे असे आश्वासन दिले: “तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हाला माझ्या नावाने देईल. . . . मागा म्हणजे तुम्हास मिळेल, ह्यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा.” (योहान १६:२३, २४) म्हणून आपण आश्वस्त होऊन देवाला ही विनंती करू शकतो की, त्याने त्याच्या पुत्राला त्याचा अधिकार आणि खंडणी बलिदानाचे मूल्य आपल्या प्रीत्यर्थ लागू करण्यास परवानगी द्यावी.—मत्तय २८:१८.
या स्वर्गीय पदावर असताना येशू योग्य वेळी योग्य मदत पुरवील याबद्दल आपण निश्चिंत राहू शकतो. उदाहरणार्थ, आपण काही पाप केले आणि आता आपल्याला त्याचा मनापासून पश्चात्ताप वाटतो तर “नीतिसंपन्न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे” हे जाणून आपण सांत्वन मिळवू शकतो. (१ योहान २:१, २) स्वर्गातला आपला कैवारी (साह्यकर्ता) आणि सांत्वनदाता आपल्या प्रीत्यर्थ विनंती करील ज्यामुळे त्याच्या नावाने आणि शास्त्रवचनांच्या एकमतात केलेल्या आपल्या प्रार्थनांचे उत्तर मिळेल.—योहान १४:१३, १४; १ योहान ५:१४, १५.
ख्रिस्ताच्या मदतीबद्दल कदर
परंतु, देवाला फक्त त्याच्या पुत्राच्या नावाने विनंती करणे पुरेसे नाही. आपल्या खंडणी बलिदानाच्या मूल्याने “खंडणी भरून” ख्रिस्त जणू मानवजातीला ‘विकत घेणारा स्वामी’ बनला. (गलतीकर ३:१३; ४:५; २ पेत्र २:१) ख्रिस्ताने असे आमंत्रण दिले: “जर कोणी माझ्यामागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे.” (लूक ९:२३) ख्रिस्ताचे हे आमंत्रण आणि त्याचे स्वामित्व स्वीकारून आपण त्याने आपल्यासाठी केलेल्या गोष्टींबद्दल कदर व्यक्त करू शकतो. “आत्मत्याग” करणे म्हणजे आता आपला स्वामी कोणी दुसरा आहे असे फक्त बोलून दाखवणे नाही. कारण ख्रिस्त “सर्वांसाठी याकरिता मेला की, जे जगतात त्यांनी पुढे स्वतःकरिता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरिता जगावे.” (२ करिंथकर ५:१४, १५) यास्तव, खंडणीबद्दल कदर बाळगल्यामुळे आपला दृष्टिकोन, आपली ध्येये आणि आपले जीवन यांवर फार मोठा प्रभाव पडेल. ज्याने “स्वतःला आपल्याकरता दिले” त्या येशू ख्रिस्ताचे आपण सदासर्वदासाठी ऋणी आहोत; म्हणून आपण त्याच्याविषयी आणि त्याचा प्रेमळ पिता, यहोवा देव याच्याविषयी अधिक शिकून घ्यायला प्रेरित झाले पाहिजे. आपण आपला विश्वास वाढवण्याचा, देवाने आपल्या फायद्यासाठी दिलेल्या दर्जांनुरूप जगण्याचा आणि “चांगल्या कामात तत्पर” असण्याचा देखील प्रयत्न केला पाहिजे.—तीत २:१३, १४; योहान १७:३.
ख्रिस्ती मंडळीच्या द्वारेच आपल्याला वेळोवेळी आध्यात्मिक अन्न, उत्तेजन आणि मार्गदर्शन मिळते. (मत्तय २४:४५-४७; इब्री लोकांस १०:२१-२५) जसे की, आध्यात्मिकरित्या कोणी कमजोर असेल तर ते “मंडळीच्या वडिलांना [नियुक्त वडिलांना]” बोलवू शकतात. याकोब पुढे अशीही हमी देतो: “विश्वासाची प्रार्थना दुःखणाइतास वाचवील आणि प्रभु त्याला उठवील, आणि त्याने पापे केली असली तर त्याला क्षमा होईल.”—याकोब ५:१३-१५.
दक्षिण आफ्रिकेत, कारावासात असलेल्या एका मनुष्याने
ख्रिस्ती मंडळीतल्या एका वडिलांना प्रशंसेचे पत्र लिहिले; त्यात यहोवाच्या साक्षीदारांचे कौतुक करत त्याने असे म्हटले: “येशू ख्रिस्त लोकांना देवाचं राज्य प्राप्त करण्यासाठी मदत करत होता आणि तेच कार्य यहोवाचे साक्षीदार पार पाडत आहेत.” पुढे त्याने असे लिहिले, “तुमचं पत्र पाहून मला केवढा आनंद झाला हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. माझ्या आध्यात्मिक कल्याणाबद्दल तुम्हाला वाटणारी चिंता पाहून मी हेलावून गेलो आहे. आता मला काही करून पश्चात्ताप करून यहोवा देवाने सांगितलेल्या मार्गावर चालावेसे वाटते. गेल्या २७ वर्षांपासून मी भटकत होतो; फसवाफसवी, बेकायदेशीर व्यवहार, अनैतिक चालीरीती आणि पाखंडी धर्म या सगळ्या पापी कृत्यांत मी गुरफटत गेलो. पण मला यहोवाचे साक्षीदार भेटल्यावर असं वाटलं की शेवटी मी योग्य मार्गाला लागलो! आता फक्त मला या मार्गात टिकून राहायचंय.”नजीकच्या भविष्यात अधिक मदत
जगाची खालावणारी स्थिती याचा स्पष्ट पुरावा आहे की, आपण ‘मोठे संकट’ येण्याआधीच्या कठीण काळात जगत आहोत. सध्या, सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांचा मोठा समुदाय “आपले झगे कोकऱ्याच्या रक्तात धुऊन शुभ्र” करत आहे. (प्रकटीकरण ७:९, १३, १४; २ तीमथ्य ३:१-५) येशूच्या खंडणी बलिदानावर विश्वास ठेवल्याने त्यांना आपल्या पापांची क्षमा आणि देवासोबत घनिष्ट नातेसंबंध ठेवण्यासाठी अर्थात त्याचे मित्र बनण्यासाठी मदत मिळत आहे.—याकोब २:२३.
कोकरा अर्थात येशू ख्रिस्त, “[मोठ्या संकटातून बचावणाऱ्यांचा] मेंढपाळ होईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल; आणि देव त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील.” (प्रकटीकरण ७:१७) त्यानंतर ख्रिस्त प्रमुख याजकाची कामगिरी पूर्णत्वास नेईल. देवाचे मित्र असलेल्या सर्वांना तो ‘पाण्याच्या झऱ्याचा’ पूर्ण फायदा उचलायला मदत करील. येशूने हे कार्य सा.यु. ३३ मध्ये स्वर्गात गेल्यानंतर सुरू केले आणि लोक जोपर्यंत आध्यात्मिक, शारीरिक, मानसिक आणि भावनिक रित्या पूर्ण बरे होत नाहीत तोवर हे कार्य करत राहील.
म्हणून, देवाने आणि ख्रिस्ताने आपल्यासाठी जे काही केले आहे आणि करत आहेत त्याबद्दल आपण नेहमी गाढ कदर बाळगू या. प्रेषित पौलाने प्रोत्साहन दिले: “प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा . . . कशाविषयीहि चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.”—फिलिप्पैकर ४:४, ६, ७.
स्वर्गामध्ये आपला कैवारी (साह्यकर्ता) येशू ख्रिस्त याच्याबद्दल कदर दाखवण्याचा एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे. या वर्षी, बुधवार एप्रिल १९ रोजी सबंध जगभरातले यहोवाचे साक्षीदार ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारक साजरा करतील. (लूक २२:१९) ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाबद्दल कदर वाढण्याची ही संधी असेल. ख्रिस्ताद्वारे तारण मिळवण्यासाठी देवाने केलेल्या अद्भुत व्यवस्थेचा सार्वकालिक लाभ तुम्हाला कसा मिळू शकतो हे ऐकण्यासाठी तुमचे स्वागत आहे. या खास सभेची नेमकी वेळ आणि ठिकाण जाणून घ्यायला तुमच्या परिसरातल्या यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क साधा.
[७ पानांवरील चित्र]
देवाला कळवळून प्रार्थना करताना किती बरं वाटतं याची येशूला जाण आहे
[८ पानांवरील चित्रे]
आपल्याच्याने सोडवता न येणाऱ्या समस्यांना तोंड द्यायला ख्रिस्त आपली मदत करील
[९ पानांवरील चित्र]
प्रेमळ वडिलांद्वारे ख्रिस्त आपली मदत करतो