व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मानवजातीला साह्‍यकर्त्याची गरज

मानवजातीला साह्‍यकर्त्याची गरज

मानवजातीला साह्‍यकर्त्याची गरज

‘मी पूर्वी छळ करणारा आणि जुलमी होतो,’ असे एका मनुष्याने म्हटले; तो आधी गर्विष्ठ आणि हिंसक वृत्तीचा होता, शिवाय निंदकही होता. येशू ख्रिस्ताच्या नीतिमान अनुयायांचा त्याने अत्यंत क्रूरपणे छळ केला होता; त्यांच्यावर पुष्कळदा हल्ले केले होते. “तरी . . . माझ्यावर दया झाली,” असे तो कृतज्ञेच्या स्वरात म्हणतो. पण आश्‍चर्य म्हणजे, एकेकाळी ख्रिश्‍चनांचा भयंकर छळ करणारा हा माणूस स्वतः एक विश्‍वासू ख्रिस्ती बनला. तो मनुष्य प्रेषित पौल होता.—१ तीमथ्य १:१२-१६; प्रेषितांची कृत्ये ९:१-१९.

प्रत्येक व्यक्‍ती काही पौलासारखी नसेल. किंबहुना, आपल्यातील कोणीही पूर्णपणे देवाच्या दर्जांनुरूप नाही. “कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत.” (रोमकर ३:२३) शिवाय, कधी कधी आपण आपल्या पापांचा विचार करून इतके निराश होऊन जातो व असा विचार करतो की, आपण इतके वाईट आहोत, की देवाची दया मिळवण्यास लायक देखील नाही. आपली पापमय प्रवृत्ती लक्षात घेऊन पौलाने असे म्हटले: “किती मी कष्टी माणूस! मला ह्‍या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील?” स्वतःच्या प्रश्‍नाला स्वतःच उत्तर देत त्याने लिहिले: “आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्‍याच्या द्वारे मी देवाचे आभार मानतो.”—रोमकर ७:२४, २५.

परंतु, धर्मी निर्माणकर्त्याचे पापी लोकांशी संबंध? ते कसे? (स्तोत्र ५:४) पौलाने काय म्हटले होते ते लक्षात घ्या; तो म्हणाला: “आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्‍याच्या द्वारे मी देवाचे आभार मानतो.” (तिरपे वळण आमचे.) देवाची ज्यावर दया झाली अशा आणखी एका व्यक्‍तीने म्हटले: “जर कोणी पाप केले, तर नीतिसंपन्‍न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी [साह्‍यकर्ता] आहे, आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्‍चित आहे; केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याहि पापांबद्दल आहे.”—१ योहान २:१, २.

येशू ख्रिस्ताला, “पित्याजवळ आपला कैवारी [साह्‍यकर्ता]” असे का म्हटले आहे? आणि येशू पापांबद्दल “प्रायश्‍चित” कसा आहे?

साह्‍यकर्त्याची आवश्‍यकता

येशू या पृथ्वीवर “पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला.” (मत्तय २०:२८) खंडणी म्हणजे, एखादी वस्तू पुन्हा खरेदी करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्‍तीची किंवा वस्तूची सुटका करण्यासाठी दिली जाणारी किंमत. ‘खंडणी’ असे भाषांतर केलेल्या इब्री शब्दाच्या क्रियापदातून पापांची क्षमा करणे किंवा पापांचे प्रायश्‍चित करणे हा अर्थ ध्वनित होतो. (स्तोत्र ७८:३८) मत्तय २०:२८ येथे आढळणारा ग्रीक शब्द, विशेषकरून युद्धातील कैद्यांच्या खंडणीसाठी किंवा गुलामांच्या सुटकेसाठी दिलेल्या किंमतीकरता वापरण्यात आला होता. एका वस्तूच्या बदल्यात तितक्याच मोलाची दुसरी वस्तू देणे हाच न्याय होता.

पहिल्या मानवाने देवाविरुद्ध बंड केल्यामुळे मानवजात गुलामगिरीत सापडली. उत्पत्तीच्या तिसऱ्‍या अध्यायात दाखवल्याप्रमाणे, त्या परिपूर्ण पुरुषाने अर्थात आदामाने यहोवा देवाची आज्ञा मोडण्याचे ठरवले. असे केल्याने, त्याने स्वतःला आणि अद्याप न जन्मलेल्या आपल्या संततीला देखील पाप आणि मृत्यूच्या गुलामगिरीत विकून टाकले. आदामाने स्वतःच्या चुकीमुळे स्वतःला मिळणारे परिपूर्ण मानवी जीवनाचे बक्षीस तर हातचे घालवलेच पण त्याच्या संततीला मिळणारे बक्षीस देखील तो गमावून बसला.—रोमकर ५:१२, १८, १९; ७:१४.

प्राचीन इस्राएलमध्ये, लोकांच्या पापांचे प्रायश्‍चित करण्यासाठी किंवा त्यांचे पाप क्षमा करण्यासाठी देवाने पशूंच्या अर्पणांची व्यवस्था केली होती. (लेवीय १:४; ४:२०, ३५) हे जणू काही, एका पापी व्यक्‍तीच्या जीवनाऐवजी पशूचे अर्पण देण्यासारखे होते. (लेवीय १७:११) त्यामुळे, “प्रायश्‍चिताचा दिवस” याला “खंडणींचा दिवस” असेही म्हटले जाऊ शकत होते.—लेवीय २३:२६-२८.

परंतु, “बैलांचे व बकऱ्‍यांचे रक्‍त [पूर्णपणे] पापे दूर करण्यास असमर्थ आहे,” कारण पशू मानवांपेक्षा कनिष्ठ आहेत. (इब्री लोकांस १०:१-४) हमेशा हमेशासाठी पापांचे प्रायश्‍चित करणारे किंवा पापे काढून टाकणारे अर्पण हे आदामाने गमावलेल्या गोष्टीच्या तोलामोलाचे असावे लागणार होते. एका परिपूर्ण माणसाने (आदामाने) गमावलेल्या गोष्टीची भरपाई करण्यासाठी आणखी एक परिपूर्ण माणूस (येशू ख्रिस्त) ही न्यायाची मागणी होती. आदामाने आपल्या संततीला ज्या गुलामगिरीत पाठवले होते त्यातून केवळ एक परिपूर्ण मानवी जीवनच खंडणीची किंमत देऊन तिची सुटका करू शकत होते. “जिवाबद्दल जीव” दिल्यानेच खरा न्याय मिळणार होता.—निर्गम २१:२३-२५.

आदामाने जेव्हा पाप केले आणि त्याला मृत्युदंड देण्यात आला तेव्हा अद्याप जन्म न झालेली त्याच्या संततीला देखील मृत्युदंड देण्सासारखे हे होते व त्याची संतती देखील त्याच्यासोबतच मरण पावली. यामुळे “शेवटला आदाम” अर्थात परिपूर्ण मनुष्य येशू याने कुटुंब होऊ दिले नाही. (१ करिंथकर १५:४५) येशू परिपूर्ण मानवी जीवनाचे बलिदान केले तेव्हा त्याला मुले नव्हती. म्हणूनच, त्याच्यासोबतच त्याची जन्म न झालेली मुले मरण पावली असे म्हणता येईल. परंतु, येशूने आदामाच्या पापी, मृत्यूच्या तावडीत असलेल्या कुटुंबाला स्वतःचे कुटुंब समजले व स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे त्यांना जीवनाचा अधिकार दिला. आपल्या परिपूर्ण मानवी जीवनाचे बलिदान देऊन येशूने आदामाद्वारे निर्माण झालेली मानवजात आपले कौटुंबिक सदस्य बनण्यासाठी पुन्हा एकदा विकत घेतली आणि अशाप्रकारे तो “सनातन पिता” झाला.—यशया ९:६, ७.

येशूच्या खंडणी बलिदानामुळे आज्ञाधारक मानवजातीपुढे देवाची कृपा आणि सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यास मार्ग मोकळा झाला. यास्तव, प्रेषित पौलाने लिहिले: “पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभु येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.” (रोमकर ६:२३) खंडणीसंबंधी यहोवाने दाखवलेले प्रेम आणि कनवाळुपणा यांची कदर केल्याशिवाय आपल्याला राहावत नाही. कारण ही खंडणी पुरवण्यासाठी त्याला स्वतःला आणि त्याच्या अतिप्रिय पुत्राला फार मोठी किंमत द्यावी लागली. (योहान ३:१६) पुनरुत्थान झाल्यावर येशूला स्वर्गीय जीवन मिळाले आणि त्याने स्वर्गातील आपल्या देवाला आपल्या खंडणी बलिदानाचे मोल सादर केले तेव्हा ‘पित्याजवळ कैवारी’ असल्याचे त्याने स्वतःला निश्‍चितच सिद्ध केले. * (इब्री लोकांस ९:११, १२, २४; १ पेत्र ३:१८) परंतु, सध्या येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये आपला कैवारी (साह्‍यकर्ता) असल्याचे कशाप्रकारे सिद्ध करत आहे?

[तळटीपा]

^ परि. 12 वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान पुस्तकातील ४ आणि ७ हे अध्याय पाहा.

[४ पानांवरील चित्र]

आदामाच्या संततीच्या खंडणीसाठी येशूचे परिपूर्ण मानवी जीवन देण्यात आले