व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा आपल्या लोकांना मार्ग दाखवतो

यहोवा आपल्या लोकांना मार्ग दाखवतो

यहोवा आपल्या लोकांना मार्ग दाखवतो

“मला धोपट मार्गाने ने.”—स्तोत्र २७:११.

१, २. (अ) आज यहोवा आपल्या लोकांचे कशाप्रकारे मार्गदर्शन करत आहे? (ब) सभांचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी काय करणे आवश्‍यक आहे?

याआधीच्या लेखात आपण पाहिल्याप्रमाणे, यहोवा आध्यात्मिक प्रकाशाचा व सत्याचा उगम आहे. धोपट मार्गाने अर्थात सरळ मार्गाने चालत असताना त्याचे वचन बायबल आपले मार्गदर्शन करते. यहोवा त्याच्या मार्गांविषयी शिक्षण देऊन स्वतः आपले मार्गदर्शन करतो. (स्तोत्र ११९:१०५) प्राचीन काळात स्तोत्रकर्त्याने केल्याप्रमाणे आपणही यहोवाच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करतो आणि आपली देखील हीच प्रार्थना आहे: “हे परमेश्‍वरा, आपला मार्ग मला दाखीव; . . . मला धोपट मार्गाने ने.”—स्तोत्र २७:११.

आज यहोवाचा आपल्याला मार्गदर्शन पुरवण्याचा एक मार्ग म्हणजे ख्रिस्ती सभा. या प्रेमळ तरतुदीचा पुरेपूर लाभ करून घेण्यासाठी आपण (१) सभांना नियमित उपस्थित राहतो का, (२) सभांमध्ये लक्ष देऊन ऐकतो का आणि (३) प्रश्‍न विचारले जातात तेव्हा आपण उत्साहीपणे सहभाग घेतो का? शिवाय, “धोपट मार्गाने” किंवा सरळ मार्गाने चालत राहण्यासाठी जेव्हा आपल्याला काही सल्ला दिला जातो तेव्हा आपण तो कृतज्ञतेने स्वीकारतो का?

तुम्ही सभांना नियमित जाता का?

३. एका पूर्णवेळेच्या सेविकेला कशाप्रकारे सभांना नियमित उपस्थित राहण्याची सवय लागली?

काही राज्य प्रचारक अगदी लहानपणापासून सभांना नियमित उपस्थित राहतात. यहोवाच्या साक्षीदारांपैकी पूर्णवेळचे सेवाकार्य करणाऱ्‍या एका बहिणीने सांगितले, “१९३० च्या सुमारास, जेव्हा मी आणि माझ्या बहिणी लहान होतो, तेव्हा आज आपण सभांना जाणार आहोत का असे आम्हाला कधी आईबाबांना विचारावे लागायचे नाही. सभांना जायचे आहे हे आम्हाला माहीतच असायचे, फक्‍त आजारी असलो तर गोष्ट वेगळी. आमचे कुटुंब एकही सभा चुकवायचे नाही.” देवाचे मंदिर कधीही ‘सोडून न जाणारी’ संदेष्ट्री हन्‍ना हिच्याप्रमाणे ही बहीण दर सभेत नेमाने हजर असते.—लूक २:३६, ३७.

४-६. (अ) काही राज्य प्रचारक सभा का चुकवतात? (ब) सभांना उपस्थित राहणे इतके महत्त्वाचे का आहे?

ख्रिस्ती सभांना नियमित येणाऱ्‍यांपैकी तुम्ही आहात का? की अलीकडे तुम्ही अधूनमधून सभा चुकवू लागला आहात? आपण सभांना अगदी नियमित जातो असे समजणाऱ्‍यांपैकी काहींनी हे तपासून पाहायचे ठरवले. काही आठवड्यांपर्यंत त्यांनी ज्या ज्या सभांना ते गेले त्याची नोंद करून ठेवली. ठराविक अवधीनंतर जेव्हा त्यांनी तपासून पाहिले तेव्हा आपण किती सभा चुकवल्या हे पाहून त्यांना आश्‍चर्याचा धक्का बसला.

कोणी कदाचित म्हणेल, ‘साहजिक आहे. आजकाल जीवन इतकं धकाधकीचं झालं आहे की सभांना नियमित येणं होतच नाही.’ जीवन अतिशय तणावपूर्ण आहे हे खरे आहे. किंबहुना, येणाऱ्‍या दिवसांत तर जीवनातला हा दबाव आणखीनच वाढणार आहे. (२ तीमथ्य ३:१३) मग असे असताना, सभांना नियमित येणे अधिकच महत्त्वाचे नाही का? ठोस आध्यात्मिक आहार व पोषण न मिळाल्यास या जगाच्या दबावांना आपल्याला यशस्वीपणे तोंड देता येणार नाही. उलट, आपल्या बांधवांसोबत नियमित सभांमध्ये एकत्रित न झाल्यामुळे, कदाचित आपण “धार्मिकांचा मार्ग” पूर्णपणे सोडून देण्याच्या मोहाला देखील बळी पडू शकतो! (नीतिसूत्रे ४:१८) दिवसभर काम करून आल्यानंतर कधीकधी सभेला जायला जिवावर येते हे कबूल आहे. पण थकलेलो असताना देखील जेव्हा आपण सभेला जातो, तेव्हा केवळ आपल्यालाच लाभ होत नाही तर सभेला आलेल्या इतर बंधुभगिनींनाही प्रोत्साहन मिळते.

इब्री लोकांस १०:२५ हे वचन लक्षपूर्वक वाचल्यास आपल्याला सभांना नियमित जाण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण सापडते. या वचनात प्रेषित पौल आपल्या ख्रिस्ती बांधवांना ‘तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे दिसेल तसतसे’ एकमेकांसोबत अधिक सातत्याने एकत्र येण्याचा सल्ला देतो. “देवाचा दिवस” जवळ आला आहे हे आपण कधीही विसरता कामा नये. (२ पेत्र ३:११) अंत यायला अजून खूप अवकाश आहे असा विचार करू लागल्यास आपण आपल्याच स्वार्थांना प्राधान्य देऊन सभांना जाणे, यासारख्या इतर आध्यात्मिक कार्यांकडे दुर्लक्ष करण्याची शक्यता आहे. असे घडल्यास, येशूने ताकीद दिल्याप्रमाणे आपल्यावर ‘तो दिवस पाशाप्रमाणे अकस्मात येईल.’—लूक २१:३४.

लक्ष देऊन ऐका

७. मुलांनीही सभांमध्ये लक्षपूर्वक ऐकणे का महत्त्वाचे आहे?

सभांना केवळ उपस्थित असणे पुरेसे नाही. सभांमध्ये जे काही सांगितले जाते, ते पूर्णपणे एकाग्र होऊन ऐकणे महत्त्वाचे आहे. (नीतिसूत्रे ७:२४) हेच आपल्या मुलांबद्दलही खरे आहे. मूल शाळेला जाते तेव्हा टीचर जे काही सांगते, मग तो त्याच्या आवडीचा विषय नसला तरीसुद्धा, जे जे सांगितले जाते ते त्याने लक्षपूर्वक ऐकावे अशी आपण अपेक्षा करतो. टीचरला माहीत असते की मुलाने लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्या ज्ञानाचा निश्‍चितच काहीतरी उपयोग होईल. मग शाळेला जाणाऱ्‍या आपल्या मुलांनी मंडळीच्या सभांमध्ये शिकवल्या जाणाऱ्‍या गोष्टींकडे लक्ष देऊ नये का? सभा सुरू झाल्याबरोबर आपण त्यांना झोपू द्यावे का? बायबलची सत्ये मौल्यवान असली तरीसुद्धा “त्यात समजावयास कठीण अशा काही गोष्टी आहेत,” हे कबूल आहे. (२ पेत्र ३:१६) पण आपल्या मुलांना सभांमध्ये काहीही समजणार नाही असे आपण कधीही समजू नये. देव असे समजत नाही. नियमशास्त्रातील काही गोष्टी मुलांना समजायला कठीण होत्या यात शंका नाही, तरीसुद्धा बायबल काळांत त्याने आपल्या या चिमुकल्या सेवकांना देखील ‘ऐकून शिकण्याची, देवाचे भय धरण्याची आणि नियमशास्त्रातली सर्व वचने काळजीपूर्वक पाळण्याची’ आज्ञा दिली होती. (अनुवाद ३१:१२; पडताळा लेवीय १८:१-३०.) आज यहोवा मुलांकडून हीच अपेक्षा करत नाही का?

८. आपल्या मुलांनी सभांमध्ये एकाग्र होऊन ऐकावे म्हणून काही आईवडील काय करतात?

ख्रिस्ती पालकांना जाणीव आहे की त्यांच्या मुलांचे आध्यात्मिक पोषण काही अंशी सभांमध्ये शिकलेल्या गोष्टींवर अवलंबून आहे. या गोष्टीचे महत्त्व ओळखून काही आईवडील आपल्या मुलांना सभांना येण्याआधी काही वेळ झोपायला लावतात; असे केल्यामुळे ते राज्य सभागृहात येतात तेव्हा अगदी ताजेतवाने आणि तल्लख असतात. काही विचारशील आईवडील मुद्दामहून सभेच्या दिवशी संध्याकाळी मुलांना ठराविक वेळेपर्यंतच टीव्ही पाहू देतात, काही तर सभेच्या दिवशी टीव्ही पाहायचाच नाही असा कडक नियम करतात. (इफिसकर ५:१५, १६) ते मुलांचे लक्ष विचलित होणार नाही याची होईल तितकी काळजी घेतात, आणि मुलांच्या वयानुसार आणि क्षमतेनुसार त्यांना सभांमध्ये सांगितल्या जाणाऱ्‍या गोष्टी लक्षपूर्वक ऐकण्याचे आणि आत्मसात करण्याचे प्रोत्साहन देतात.—नीतिसूत्रे ८:३२.

९. एकाग्रतेने ऐकण्याचे कौशल्य आपण कसे संपादन करू शकतो?

“तुम्ही कसे ऐकता ह्‍याविषयी जपून राहा,” असे येशूने म्हटले तेव्हा तो प्रौढांशी बोलत होता. (लूक ८:१८) पण हे प्रत्यक्षात करणे अतिशय कठीण आहे, खासकरून आजच्या या काळात. वक्‍त्‌यासोबत पूर्णपणे समरस होऊन ऐकणे हे निश्‍चितच सोपे नाही, पण प्रयत्न केल्यास लक्षपूर्वक ऐकण्याचे हे कौशल्य आपण संपादन करू शकतो. बायबलवर आधारित एखादे भाषण ऐकताना त्यातील मुख्य मुद्दे कोणते हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. वक्‍ता पुढे काय बोलेल याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करा. प्रचार कार्यात किंवा दैनंदिन जीवनात तुम्ही कोणत्या मुद्द्‌यांचा उपयोग करू शकाल याविषयी विचार करा. मनातल्यामनात सर्व मुद्द्‌यांची उजळणी करा. आठवणीत ठेवण्यासाठी मुद्दे थोडक्यात लिहून घ्या.

१०, ११. काही आईवडिलांनी आपल्या मुलांना लक्षपूर्वक ऐकण्याची सवय लावण्यासाठी कशी मदत केली आणि या संदर्भात तुम्हाला कोणते उपाय परिणामकारक वाटले?

१० लक्षपूर्वक ऐकण्याचे कौशल्य लहान वयातच शिकून घेणे सर्वात उत्तम. अद्याप शाळेलाही न जाऊ लागलेल्या काही मुलांना त्यांचे आईवडील सभांमध्ये “नोट्‌स” घेण्याचे प्रोत्साहन देतात; या मुलांना अजून लिहिता वाचता देखील येत नाही. फक्‍त “यहोवा,” “येशू” किंवा “देवाचे राज्य” यांसारखे ओळखीचे शब्द कानावर पडतात तेव्हा ही मुले आपल्या वहीत एक विशिष्ट खूण करतात. अशारितीने, मुलांना सभांमध्ये सांगितल्या जाणाऱ्‍या गोष्टी एकाग्र होऊन ऐकण्याची सवय लागते.

११ मोठ्या मुलांना देखील कधीकधी लक्षपूर्वक ऐकण्याची प्रेमळपणे आठवण करून द्यावी लागते. एका अधिवेशनात आपल्या ११ वर्षांच्या मुलाचे भाषणाकडे लक्ष नाही हे पाहून त्याच्या वडिलांनी त्याच्या हातात बायबल दिले आणि वक्‍त्‌यांनी सांगितलेली वचने उघडून वाचायला सांगितले. वडील स्वतः भाषणाच्या नोट्‌स घेत होते, आणि बायबल दिल्यावर त्यांचे आपल्या मुलाकडे लक्ष होते. पण त्यानंतर मुलाने अधिक उत्साहाने भाषणांकडे लक्ष दिले.

सभांमध्ये तुमचा आवाजही ऐकू यावा

१२, १३. मंडळीच्या गायनात सहभाग घेणे इतके महत्त्वाचे का आहे?

१२ राजा दावीद याने स्तोत्रात परमेश्‍वराला म्हटले: ‘हे यहोवा, मी तुझ्या वेदीभोवती फिरेन, मी आपल्या वाणीने तुझी उपकारस्तुती करेन.’ (स्तोत्र २६:६, ७) यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांमध्ये आपल्याला आपल्या वाणीने यहोवावरील विश्‍वास प्रगट करण्याची उत्तम संधी मिळते. विश्‍वास प्रगट करण्याचा एक मार्ग म्हणजे मंडळीसोबत गीत गाणे. हा आपल्या उपासनेचा एक प्रमुख पैलू आहे, पण आपले त्याकडे सहज दुर्लक्ष होऊ शकते.

१३ काही लहान मुले, वाचता येत नसल्यामुळे प्रत्येक आठवडी गायली जाणारी गीते तोंडपाठ करतात. मोठ्यांसोबत आपल्यालाही गाता येते याचा त्यांना खूप आनंद वाटतो. थोडे मोठे झाल्यानंतर मात्र याच मुलांना राज्यगीते गाताना पूर्वीसारखा आनंद वाटत नाही. मोठ्यांपैकीही काहींना सभांमध्ये गायला लाज वाटते. पण प्रचार कार्य ज्याप्रकारे आपल्या उपासनेचा एक पैलू आहे त्याचप्रमाणे गायन हा देखील आपल्या उपासनेचा एक पैलू आहे. (इफिसकर ५:१९) प्रचार कार्यात आपण यहोवाची स्तुती करण्याचा हर तऱ्‍हेने प्रयत्न करतो. मग त्याच्या स्तुतीकरता हृदयपूर्वक गीत गाण्यासाठी आपला आवाज (मग तो सुरेल असो वा नसो) उंचवण्याद्वारे आपण त्याला गौरव आणू नये का?—इब्री लोकांस १३:१५.

१४. मंडळीच्या सभांमध्ये आपण ज्या गोष्टी शिकणार आहोत त्यांची आधीच काळजीपूर्वक तयारी करणे का महत्त्वाचे आहे?

१४ सभांमध्ये श्रोत्यांना प्रश्‍न विचारले जातात, तेव्हा सर्वांना प्रोत्साहन मिळेल अशाप्रकारची उत्तरे देण्याद्वारे देखील आपण परमेश्‍वराची स्तुती करतो. अर्थात, यासाठी चांगली तयारी करणे गरजेचे आहे. देवाच्या वचनाच्या गहन विषयांवर मनन करण्यासाठी वेळ काढणे आवश्‍यक आहे. प्रेषित पौलाला याची जाणीव होती; तो स्वतः शास्त्रवचनांचा व्यासंगी होता. त्याने लिहिले: “अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ति किती अगाध आहे!” (रोमकर ११:३३) कुटुंबप्रमुखांनो, तुमच्या कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याला शास्त्रवचनांतून प्रगट झालेल्या देवाच्या बुद्धीचा शोध घ्यायला मदत करा, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्या कौटुंबिक अभ्यासाचा काही वेळ बाजूला ठेवा आणि या वेळात समजायला कठीण वाटलेले मुद्दे समजावून सांगा तसेच सर्वांना सभांची तयारी करायला मदत करा.

१५. सभांमध्ये उत्तरे देण्याची इच्छा असलेल्यांना कोणत्या सूचना उपयोगी पडू शकतात?

१५ सभांमधील सहभाग वाढवण्याची तुमची इच्छा असल्यास, तुम्ही आधीच एखादे उत्तर तयार करून ठेवू शकता. फार लांबलचक उत्तर देण्याची गरज नाही. बायबलमधले एखादे उचित वचन जरी तुम्ही स्पष्ट आवाजात वाचून दाखवले किंवा दोन चारच शब्दांत पण मनापासून बोललात तर हे देखील प्रशंसनीय आहे. काही प्रचारक अभ्यास घेणाऱ्‍याला विशिष्ट परिच्छेदाचा प्रश्‍न मला विचारा असे आधीच सांगून ठेवतात; आपला विश्‍वास प्रगट करण्याची संधी ते चुकवू इच्छित नाहीत.

भोळे समंजस होतात

१६, १७. एका मंडळीच्या वडिलांनी एका सेवासेवकाला काय सल्ला दिला आणि तो कशामुळे परिणामकारक ठरला?

१६ यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांमध्ये आपल्याला वारंवार देवाचे वचन दररोज वाचण्याची आठवण करून दिली जाते. देवाच्या वचनाचे वाचन करणे अतिशय आनंददायक आहे. असे केल्यामुळे आपल्याला योग्य निर्णय घ्यायला, आपल्या व्यक्‍तिमत्त्वातल्या चुका सुधारायला, मोहांना तोंड द्यायला आणि कधी चुकून वाकडे पाऊल पडल्यास आध्यात्मिक संतुलन पुन्हा मिळवायला मदत होते.—स्तोत्र १९:७.

१७ मंडळीतले अनुभवी वडील खास गरजांनुरूप बायबलवर आधारित सल्ला द्यायला नेहमी तयार असतात. आपण फक्‍त त्यांच्याकडून हा बायबल आधारित सल्ला ‘बाहेर काढायला’ शिकले पाहिजे. (नीतिसूत्रे २०:५) एका मंडळीतल्या एका तरुण, उत्साही सेवा सेवकाने एका वडिलांजवळ मंडळीत आपल्याला आणखी मदत कशी करता येईल यावर काही सल्ला देण्याची विनंती केली. वडील त्या तरुण बांधवाला चांगले ओळखत होते. त्यांनी १ तीमथ्य ३:३ हे वचन उघडले, ज्यात असे म्हटले आहे की नियुक्‍त पुरुषांनी “सौम्य” असले पाहिजे. मग त्यांनी त्या बांधवाला मंडळीतल्या लोकांशी कशाप्रकारे सौम्यपणे व्यवहार करावा याबद्दल काही सूचना दिल्या. हा स्पष्ट सल्ला मिळाल्यानंतर त्या तरुण बांधवाला राग आला का? तो सांगतो, “मला मुळीच राग आला नाही! त्या वडिलांनी बायबलमधून मला सांगितल्यामुळे मला जाणीव झाली की हा सल्ला यहोवाकडून आहे.” त्याने कृतज्ञतेने मिळालेल्या सल्ल्याचे पालन केले आणि आज तो उत्तम प्रगती करत आहे.

१८. (अ) एका तरुण ख्रिस्ती व्यक्‍तीला शालेय जीवनात आलेल्या मोहांना तोंड देण्यासाठी कशाची मदत झाली? (ब) तुमच्यासमोर मोह येतात तेव्हा तुम्हाला बायबलच्या कोणत्या वचनांची आठवण होते?

१८ देवाचे वचन तरुणांना ‘तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळण्यासाठी’ देखील मदत करते. (२ तीमथ्य २:२२) नुकतीच हायस्कूलची परीक्षा उत्तीर्ण झालेली एक तरुण साक्षीदार मुलगी आपल्या सबंध शालेय जीवनात विशिष्ट बायबल वचनांवर मनन करून व त्यांचे पालन करून अनेक मोहांना प्रतिकार करण्यात यशस्वी ठरली. ती सहसा नीतिसूत्रे १३:२० यातील शब्दांवर विचार करत असे: “सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.” हे शब्द आठवणीत ठेवल्यामुळे ती केवळ अशा लोकांशीच मैत्री करायची ज्यांना बायबलच्या तत्त्वांविषयी आदर आहे. ती याचे कारण सांगते: “मी फार चांगली आहे असे नाही. पण मी जर वाईट मुलांमुलींशी मैत्री केली तर साहजिकच मला त्यांना खूष करावेसे वाटेल. आणि यामुळे उगाच नको ते प्रसंग माझ्यावर येतील.” २ तीमथ्य १:८ येथे पौलाने दिलेल्या सल्ल्याची देखील तिला मदत झाली. पौलाने लिहिले: “आपल्या प्रभूविषयीच्या साक्षीची . . . तू लाज धरू नये, तर . . . सुवार्तेसाठी माझ्याबरोबर दुःख सोसावे.” या सल्ल्यानुसार तिने प्रत्येक योग्य संधीचा उपयोग करून निर्भयपणे तिच्या वर्गसोबत्यांना आपल्या बायबल आधारित विश्‍वासांविषयी सांगितले. जेव्हाही तिला वर्गापुढे उभे राहून बोलण्याची संधी मिळे, तेव्हा ती मुद्दामहून असा विषय निवडायची ज्यामुळे तिला देवाच्या राज्याबद्दल साक्ष द्यायला मिळेल.

१९. या जगाच्या दबावांना तोंड द्यायला एक तरुण का असमर्थ ठरला, पण त्याला पुन्हा आध्यात्मिक ताकद कशी मिळाली?

१९ यदाकदाचित आपण ‘धार्मिकांच्या मार्गावरून’ भटकलोच, तर देवाचे वचन आपल्याला पुन्हा सरळ मार्गावर यायला मदत करते. (नीतिसूत्रे ४:१८) आफ्रिकेत राहणाऱ्‍या एका तरुणाला याचा अनुभव आला. यहोवाच्या साक्षीदारांपैकी एकाने त्याला भेट दिली तेव्हा त्याने बायबल अभ्यास करण्याची तयारी दाखवली. बायबलमधून शिकलेल्या गोष्टी त्याला फार आवडत होत्या, पण शाळेत तो वाईट मुलांशी संगत करू लागला. कालांतराने तो अनैतिक गोष्टींमध्ये गुंतला. तो कबूल करतो, “माझा विवेक सतत मला टोचणी करत होता आणि शेवटी मी सभांना जायचे सोडून दिले.” नंतर तो पुन्हा सभांना येऊ लागला. त्याने केलेले एक विधान अतिशय अर्थपूर्ण होते, तो म्हणाला: “मला जाणीव झाली की माझ्या समस्येचे एक मुख्य कारण म्हणजे आध्यात्मिक कुपोषण. मी कधीच वैयक्‍तिक अभ्यास करत नव्हतो. म्हणून माझ्यासमोर मोह यायचे तेव्हा मी त्यांचा प्रतिकार करू शकत नव्हतो. मग मी टेहळणी बुरूज आणि सावध राहा! वाचायला सुरवात केली. हळूहळू मी आध्यात्मिकरित्या सावरलो आणि सर्व वाईट सवयी सोडून दिल्या. ज्यांनी माझ्यात बदल झालेला पाहिला त्यांना यामुळे चांगली साक्ष मिळाली. मी बाप्तिस्मा घेतला आणि आज मी आनंदी आहे.” या तरुणाला त्याच्या शारीरिक वासनांवर विजय मिळवायला सामर्थ्य कोठून मिळाले? नियमित वैयक्‍तिक बायबल अभ्यासामुळेच त्याला आध्यात्मिक ताकद पुन्हा मिळाली.

२०. तरुण सैतानाच्या मोहापाशांना कशाप्रकारे तोंड देऊ शकतात?

२० ख्रिस्ती तरुणांनो, सध्या तुम्ही सैतानाचे मुख्य सावज आहात! त्याच्याकडून येणाऱ्‍या मोहापाशांना यशस्वीपणे तोंड देण्यासाठी तुम्ही नियमितपणे आध्यात्मिक अन्‍न घेतले पाहिजे. स्तोत्रकर्ता, जो स्वतः तरुण होता, त्याने ही गोष्ट समजून घेतली होती. त्याने परमेश्‍वराला त्याचे वचन दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्‍त केली कारण या वचनाच्या साहाय्यानेच ‘तरुण आपला वर्तनक्रम शुद्ध राखू शकतो.’ —स्तोत्र ११९:९.

यहोवा जेथे नेईल तेथे आपण जाऊ

२१, २२. सत्याचा मार्ग खूप कठीण आहे असा निष्कर्ष आपण का काढू नये?

२१ यहोवाने इस्राएल राष्ट्राला इजिप्तमधून बाहेर काढले व त्यांना वचनयुक्‍त देशात नेले. वचनयुक्‍त देशापर्यंत त्यांना नेण्याकरता त्याने निवडलेला मार्ग कदाचित मनुष्याच्या दृष्टीने कष्टदायक वाटला असेल. भूमध्य सागरातून जाणाऱ्‍या सरळ मार्गाने नेण्याऐवजी यहोवाने आपल्या लोकांना वाळवंटातल्या कठीण मार्गाने नेले. पण खरे पाहता हा देवाचा दयाळूपणा होता. कारण सागरातल्या मार्गाने इस्राएली लोकांना पलिश्‍ती लोकांच्या देशातून जावे लागले असते. आणि पलिश्‍ती लोक तर त्यांचे शत्रू होते. दुसरा मार्ग निवडल्यामुळे यहोवाने नुकतेच इजिप्तच्या बंधनातून सुटका झालेल्या या नवख्या राष्ट्राला पलिश्‍ती लोकांच्या तावडीत सापडण्यापासून बचावले.

२२ त्याचप्रकारे आज यहोवा आपल्याला ज्या मार्गाने नेत आहे तो खूपच कठीण आहे असे आपल्याला काहीवेळा वाटत असेल. आठवड्याचे सातही दिवस आपल्याला मंडळीच्या सभा, वैयक्‍तिक अभ्यास, प्रचार कार्य अशा कोणत्या न कोणत्या ख्रिस्ती कार्यात भाग घ्यायचा असतो. तुलना केल्यास इतर मार्ग आपल्याला सोयीचे आणि सोपे वाटत असतील. पण आपण ज्या ध्येयापर्यंत पोचण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहोत तेथपर्यंत पोचण्याचा केवळ एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे देवाचा मार्ग. तेव्हा, यहोवाकडून येणारे जीवनदायक ज्ञान नियमितपणे घेऊन आपण ‘धार्मिकांच्या मार्गात’ कायम टिकून राहण्याचा निर्धार करू या!—स्तोत्र २७:११

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

ख्रिस्ती सभांना नियमित उपस्थित राहणे खास महत्त्वाचे का आहे?

आपल्या मुलांनी सभांमध्ये लक्षपूर्वक ऐकावे म्हणून आईवडील त्यांना कशाप्रकारे मदत करू शकतात?

लक्षपूर्वक ऐकणे म्हणजे काय?

सभांमध्ये उत्तरे देण्यासाठी आपल्याला कशामुळे मदत होईल?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१६, १७ पानांवरील चित्र]

यहोवाचा दिवस किती जवळ आहे याची जाणीव ठेवायला ख्रिस्ती सभा आपल्याला मदत करतात

[१८ पानांवरील चित्रे]

ख्रिस्ती सभांमध्ये आपण अनेक मार्गांनी यहोवाची स्तुती करू शकतो