व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

“प्रिय जनहो, सूड उगवू नका, तर क्रोधाला वाट द्या” असे प्रेषित पौल, रोमकर १२:१९ [NW] येथे म्हणतो तेव्हा, तो ख्रिश्‍चनांना क्रोधित न होण्याचा सल्ला देत होता का?

स्पष्टपणे सांगायचे तर, नाही. प्रेषित पौल येथे देवाच्या क्रोधाविषयी बोलत होता. पण ख्रिश्‍चनांनी क्रोध करण्यात काही गैर नाही असा याचा अर्थ होत नाही. बायबल तर स्पष्टपणे क्रोध करण्याविरुद्ध सल्ला देते. काही उदाहरणांचा विचार करा.

“राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर; जळफळू नको, अशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ति होते.” (स्तोत्र ३७:८) “जो कोणी आपल्या भावावर उगाच रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल.” (मत्तय ५:२२) “देहाची कर्मे तर उघड आहेत; ती ही: जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग.” (गलतीकर ५:१९, २०) “सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही . . . तुम्हापासून दूर करण्यात येवोत.” (इफिसकर ४:३१) “प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद असावा.” (याकोब १:१९) शिवाय, नीतिसूत्राचे पुस्तक वारंवार आपल्याला क्रोधिष्ट होण्याविरुद्ध किंवा लहानसहान गोष्टींवर व मानवी चुकांवर संतप्त होण्याविरुद्ध सल्ला देते.—नीतिसूत्रे १२:१६; १४:१७, २९; १५:१; १६:३२; १७:१४; १९:११, १९; २२:२४; २५:२८; २९:२२.

रोमकर १२:१९ च्या आधीची वचने याच सल्ल्याच्या अनुषंगाने आहेत. आपल्या प्रीतीमध्ये ढोंग नसावे, छळ करणाऱ्‍यांनाही आपण आशीर्वाद द्यावा, इतरांबद्दल आपण नेहमी चांगला विचार करावा, वाईटाबद्दल वाईट अशी आपण फेड करू नये, शक्यतो सर्वांबरोबर शांतीने राहावे, असे पौल आपल्याला सांगतो. आणि मग तो पुढे आर्जवतो: “प्रिय जनहो, सूड उगवू नका, तर क्रोधाला वाट द्या; कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन,’ असे यहोवा म्हणतो.”—रोमकर १२:९, १४, १६-१९, NW.

सूडभावनेने वाईट कृत्ये करण्याइतपत आपला राग कधीही वाढू नये. कधीकधी विशिष्ट परिस्थितीविषयी आपल्याला असलेली माहिती ही अपुरी असते आणि आपण अपरिपूर्ण असल्यामुळे उचित न्याय करू शकत नाही. म्हणून आपण सूड घेण्याइतपत आपला राग भडकू दिला तर आपल्या हातून एखादे वाईट कृत्य निश्‍चितच घडू शकते. अशाने तर देवाचा विरोधक सैतान याचा हेतू साध्य होतो. पौलाने एके ठिकाणी असे लिहिले: “तुम्ही रागावा, परंतु पाप करू नका, तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये, आणि सैतानाला वाव देऊ नका.”—इफिसकर ४:२६, २७.

सर्वात उत्तम आणि सुज्ञपणाचा मार्ग म्हणजे, केव्हा आणि कोणावर सूड उगवायचा हे देवाला ठरवू द्या. कारण फक्‍त त्यालाच परिस्थितीचे पूर्ण ज्ञान असते व तो जे पाऊल उचलेल त्यातून त्याचा परिपूर्ण न्याय दिसून येईल. हाच मुद्दा आपल्याला, रोमकर १२:१९ या वचनात पाहायला मिळतो. या वचनात पौलाने ‘सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन,’ या अनुवाद ३२:३५, ४१ वचनाचा उल्लेख केला आहे. (पडताळा इब्री लोकांस १०:३०.) त्यामुळे, “देवाचा” हा शब्द मूळ ग्रीक वचनात नसला तरी अलीकडच्या अनेक भाषांतरकारांनी तो रोमकर १२:१९ मध्ये घातला आहे. त्या वचनाचे भाषांतर अशाप्रकारे झाले आहे: “देवाला सूड घेऊ द्या” (द कन्टेमपररी इंग्लिश व्हर्शन); “देवाच्या कोपाला वाट द्या” (अमेरिकन स्टॅन्डर्ड व्हर्शन); “देवाची इच्छा असल्यास त्यालाच शिक्षा देऊ द्या” (द न्यू टेस्टमेंट इन मॉडर्न इंग्लिश); “ईश्‍वरी सूडाला वाट द्या.”—द न्यू इंग्लिश बायबल.

सत्याचे शत्रू आपली निंदा व छळ करतात तेव्हा देखील आपण मोशेने यहोवा देवाविषयीचे जे वर्णन ऐकले त्यावर भरवसा ठेवू शकतो. त्यात म्हटले होते: “यहोवा, यहोवा, दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध आणि प्रेमदया व सत्य यांत उदंड, हजारोंवर दया करणारा, अन्याय व अपराध व पाप यांची क्षमा करणारा आहे, आणि तो दोष्यांस निर्दोष ठरवणारच नाही.” (तिरपे वळण आमचे.)निर्गम ३४:६, ७, पं.र.भा.