शांतिमय संबंधांना पोषक असणारा गुण—विनयशीलता
शांतिमय संबंधांना पोषक असणारा गुण—विनयशीलता
विनयशीलता. प्रत्येक माणसात हा गुण असता तर जीवन किती आनंदमय झाले असते. कोणीही कोणाकडून अवास्तव अपेक्षा केल्या नसत्या, कुटुंबात वितुष्टे आली नसती, मोठमोठ्या उद्योगांत आज दिसणारी गळेकापू स्पर्धा नसती आणि देशादेशांत आज आहे तशी शत्रूताही नसती. असे जग तुम्हाला हवेहवेसे वाटत नाही का?
आज यहोवा देवाचे खरे सेवक त्याने अभिवचन दिलेल्या नव्या जगातील जीवनासाठी स्वतःला तयार करत आहेत; या नव्या जगात, विनयशीलता हे दुबळेपणाचे लक्षण आहे असे कोणीही मानणार नाही, उलट तो नैतिक मनोबल प्रकट करणारा सद्गुण आहे असे प्रत्येक जण मानेल. (२ पेत्र ३:१३) खरे तर, आज देखील देवाचे सेवक विनयशीलतेचा गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहेत. का? कारण यहोवाची त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे. यहोवाचा संदेष्टा मीखा याने लिहिले: “हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखविले आहे; नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रभावाने [विनयपूर्वक] चालणे यांवाचून परमेश्वर तुजजवळ काय मागतो?”—मीखा ६:८.
विनयशीलता. या शब्दाला कित्येक अर्थछटा आहेत. अहंभाव किंवा गर्व नसलेल्या, स्वतःच्याच गुणांचा किंवा सफलतेचा उदोउदो करण्याची किंवा स्वतःच्या मालकीच्या
वस्तूंबद्दल बढाई मारण्याची प्रवृत्ती न बाळगणाऱ्या व्यक्तीला विनयशील व्यक्ती म्हणता येईल. एका ग्रंथानुसार विनयशील असणे याचा अर्थ “मर्यादेत राहणे” असाही होतो. विनयशील व्यक्ती शिष्टाचाराच्या नियमांचे अर्थात मर्यादांचे पालन करते. कोणतेही कार्य आपण कोणत्या मर्यादेपर्यंत केले पाहिजे आणि कोणत्या मर्यादेपर्यंत आपण करू शकतो याची एका विनयशील व्यक्तीला जाणीव असते. काही गोष्टी आपल्या अधिकारात येत नाहीत याचीही तिला जाणीव असते. साहजिकच, अशी विनयशील व्यक्ती कोणालाही लगेच आवडते. इंग्रज कवी जोसफ ॲडिसन यांनी लिहिल्याप्रमाणे, “निखालस विनयशीलतेइतके सुखकारक दुसरे काहीच नाही.”विनयशीलता हा अपरिपूर्ण मानवांमध्ये स्वाभाविकपणे आढळणारा गुण नाही. तो आपल्या व्यक्तिमत्त्वात विकसित करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. देवाच्या वचनात अशा अनेक घटनांचे वर्णन आढळते, ज्यांतून विनयशीलता अनेक प्रकारे दिसून येते; या उदाहरणांचे परीक्षण केल्यास आपल्याला हा गुण आत्मसात करण्याचे प्रोत्साहन मिळेल.
दोन विनयशील राजे
यहोवाच्या सर्वात निष्ठावान सेवकांपैकी एक होता दावीद. दावीदाचा तरुणपणातच इस्राएलच्या राजाचा उत्तराधिकारी म्हणून अभिषेक करण्यात आला. यामुळे, त्यावेळी राज्य करत असलेला शौल राजा दावीदाला ठार मारण्याचा प्रयत्न करू लागला; त्याने दावीदाला सळो की पळो करून सोडले, जीव वाचवण्यासाठी दावीद रानावनात भटकू लागला.—१ शमुवेल १६:१, ११-१३; १९:९, १० २६:२, ३.
त्या परिस्थितीत, जीव धोक्यात असतानाही दावीदाने आपल्या मर्यादा ओळखून कार्य केले. एकदा रानात शौल राजा झोपलेला असताना दावीदाचा मित्र अबिशाई याने त्याला जिवानिशी मारण्याचा प्रयत्न केला पण दावीदाने त्याला अडवले. तो त्याला म्हणाला: “परमेश्वराच्या अभिषिक्तावर आपला हात टाकावयाचे मजकडून न घडो.” (१ शमुवेल २६:८-११) शौलाला सिंहासनावरून उतरवण्याचे काम आपले नाही हे दावीदाला माहीत होते. त्यामुळे स्वतःची मर्यादा ओलांडून त्याने शौलाविरुद्ध कोणतेही गैरकृत्य केले नाही व अशारितीने त्याने विनयशीलता दाखवली. आज देवाच्या सेवकांनाही याची जाणीव आहे की देवाच्या दृष्टीने, काही गोष्टी करण्याचा त्यांना अधिकार नाही, अगदी जीवनमरणाचा प्रश्न असला तरीसुद्धा.—प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९; २१:२५.
दावीद राजाचा पुत्र शलमोन याने देखील आपल्या तरुणपणात काहीशा वेगळ्या प्रकारे विनयशीलता दाखवली. त्याचा राज्याभिषेक झाला तेव्हा एका मोठ्या राष्ट्राचा कारभार चालवण्याचा आत्मविश्वास त्याच्याजवळ नव्हता. त्याने यहोवाला प्रार्थना केली: “हे माझ्या देवा परमेश्वरा, तू आपल्या सेवकास माझा बाप दावीद याच्या जागी राजा केले आहे, पण मी तर केवळ लहान मूल आहे; चालचलणूक कशी ठेवावी ते मला कळत नाही.” आपल्याजवळ हवी तितकी पात्रता आणि अनुभव नाही याची शलमोनाला जाणीव होती, हेच यावरून स्पष्ट होते. त्याने अनावश्यक अहंभाव किंवा गर्विष्ठपणा दाखवला नाही. उलट शलमोनाने न्याय करण्यासाठी यहोवाकडे बुद्धी मागितली आणि यहोवाने त्याची प्रार्थना ऐकली.—१ राजे ३:४-१२.
मशीहा आणि त्याच्याकरता मार्ग तयार करणारा
शलमोनानंतर १,००० वर्षांपेक्षा अधिक काळ गेल्यानंतर, बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाने मशीहाकरता मार्ग तयार करण्याचे कार्य केले. अभिषिक्ताच्या आधी येऊन कार्य करण्याच्या त्याच्या भूमिकेबद्दल बायबलमध्ये भाकीत करण्यात आले होते. आपल्याला मिळालेल्या या खास बहुमानाविषयी तो बढाई मारू शकत होता. मशीहाशी रक्ताचा संबंध असल्याचाही तो चारचौघांत टेंभा मिरवू शकत होता. पण योहानाने तसे केले नाही, उलट येशूच्या पायतणाचा बंद सोडण्यासही मी योग्य नाही असे त्याने लोकांना सांगितले. नंतर जेव्हा येशू यार्देन नदीत बाप्तिस्मा घेण्यासाठी आला तेव्हा योहान त्याला म्हणाला: “आपल्या हातून मी बाप्तिस्मा घ्यावा, असे असता आपण माझ्याकडे येता हे काय?” या शब्दांवरून स्पष्ट होते, की बढाई मारण्याची प्रवृत्ती योहानात मुळीच नव्हती. तो विनयशील होता.—मत्तय ३:१४; मलाखी ४:५, ६; लूक १:१३-१७; योहान १:२६, २७.
येशूचा बाप्तिस्मा झाल्यानंतर त्याने पूर्णवेळची सेवा हाती घेतली; तो अहोरात्र देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करू लागला. परिपूर्ण असून देखील त्याने म्हटले: “मला स्वतः होऊन काही करिता येत नाही . . . मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावयाला पाहतो.” लोकांनी आपल्या पुढेपुढे करावे असे येशूला कधीच वाटले नाही, उलट, आपल्या प्रत्येक कृतीचे श्रेय त्याने यहोवाला दिले. (योहान ५:३०, ४१-४४) किती अतुलनीय विनयशीलता!
देवाच्या या निष्ठावान सेवकांनी, म्हणजेच दावीद, शलमोन, बाप्तिस्मा देणारा योहान, इतकेच काय तर परिपूर्ण मनुष्य येशू ख्रिस्त याने देखील विनयशीलता दाखवली. त्यांनी कधीही बढाई मारली नाही, गर्विष्ठपणा किंवा अहंभाव दाखवला नाही; ते नेहमी मर्यादेत राहून वागले. त्यांच्या उदाहरणावरून शिकून यहोवाच्या आधुनिक सेवकांनी देखील विनयशीलता दाखवू नये का? निश्चितच. पण याशिवाय, विनयशीलता दाखवण्याची आणखीही काही कारणे आहेत.
मनुष्याच्या इतिहासातील या वादळी काळात विनयशीलतेचा गुण खऱ्या ख्रिश्चनांसाठी अत्यंत मोलाचा आहे. विनयशीलता दाखवणारी व्यक्ती यहोवाशी आणि इतर लोकांशी तर शांतिमय संबंध ठेवू शकतेच, पण तिला स्वतःला देखील मनाची शांती मिळते.
यहोवा देवासोबत शांतीसंबंध
खऱ्या उपासनेकरता यहोवाने घालून दिलेल्या बंधनांत आपण राहिलो तरच आपला त्याच्यासोबत शांतीचा संबंध राहू शकतो. आपले पहिले आईवडील, आदाम आणि हव्वा यांनी देवाच्या बंधनांना जुमानले नाही आणि अशारितीने अविनयशील वर्तणूक करणारे ते पहिले मानव ठरले. ते यहोवा देवाच्या नजरेतून उतरले; तसेच सुखी भविष्य आणि आपले जीवनही ते गमावून बसले. (उत्पत्ति ३:१-५, १६-१९) अविनयशील वर्तणुकीची त्यांना किती मोठी किंमत मोजावी लागली!
आदाम आणि हव्वा यांच्या चुकीतून आपण धडा घेऊ शकतो. खऱ्या उपासनेत आपल्या वर्तणुकीवर काही बंधने आहेत. उदाहरणार्थ, बायबल सांगते की “जारकर्मी, मुर्तिपूजक, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरूषसंभोग घेणारे, चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्तहरण करणारे ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.” (१ करिंथकर ६:९, १०) ही बंधने यहोवाने आपल्याच भल्यासाठी घातली आहेत आणि या बंधनांत राहून वागणेच शहाणपणाचे आहे. (यशया ४८:१७, १८) नीतिसूत्रे ११:२ येथे सांगितल्याप्रमाणे: “नम्र [विनयशील] जनांच्या ठायी ज्ञान असते.”
या बंधनांना झुगारूनही आपण देवाच्या मर्जीत राहू शकतो असे जर कोणती धार्मिक संघटना आपल्याला सांगत असेल तर काय समजावे? साहजिकच ही संघटना आपल्याला चुकीच्या मार्गाने नेत आहे. पण विनयशीलता दाखवल्यामुळे आपण यहोवा देवासोबत निकटचा नातेसंबंध निर्माण करू शकतो.
इतरांसोबत शांतीचे संबंध
विनयशीलता दाखवल्यामुळे आपण इतरांसोबतही शांतीचे संबंध राखू शकतो. उदाहरणार्थ, आईवडील जेव्हा आध्यात्मिक गोष्टींना जीवनात प्राथमिकता देऊन भौतिक गोष्टींविषयी समाधानी वृत्ती बाळगतात तेव्हा ते आपल्या मुलांपुढे चांगला आदर्श ठेवतात; त्यांची मुले देखील त्यांच्यासारखाच दृष्टिकोन विकसित करतील. आपल्याला जे पाहिजे ते नेहमीच मिळाले नाही तरीसुद्धा आपल्या आईवडिलांच्या आदर्शाप्रमाणे त्यांना देखील समाधानी वृत्ती बाळगणे, माफक खर्च करणे सोपे जाईल. साहजिकच, यामुळे कुटुंबातले वातावरण शांतीचे राहील.
ज्यांच्यावर देखरेख करण्याची जबाबदारी असते त्यांनी तर विनयशीलता दाखवण्याबद्दल आणि आपल्या अधिकाराचा गैरवापर न करण्याबद्दल अधिकच दक्ष असले पाहिजे. उदाहरणार्थ, ख्रिस्ती लोकांना आज्ञा देण्यात आली आहे, की “शास्त्रलेखापलीकडे कोणी जाऊ नये.” (१ करिंथकर ४:६) मंडळीतील वडील नेहमी आठवणीत ठेवतात की त्यांनी आपल्या स्वतःच्या आवडी निवडी, स्वतःचे विचार इतरांवर थोपण्याचा कधीही प्रयत्न करता कामा नये. उलट वागण्याच्या बाबतीत, पेहराव, श्रृंगार किंवा करमणूक यासंबंधी कोणताही प्रश्न उपस्थित होतो तेव्हा योग्य मार्गदर्शन करताना ते नेहमी देवाच्या वचनाचा आधार घेतात. (२ तीमथ्य ३:१४-१७) मंडळीतील लोक जेव्हा वडिलांना बायबलच्या मर्यादांचा आदर करताना पाहतात तेव्हा त्यांच्या मनात या वडिलांबद्दल आदर निर्माण होतो, तसेच, मंडळीतही जिव्हाळ्याचे, प्रेमाचे आणि शांतीचे वातावरण राहते.
मनाची शांती
विनयशीलतेने वागणाऱ्यांना मनाची शांती लाभते. विनयशील माणूस महत्त्वाकांक्षेने पछाडलेला नसतो. अर्थात त्याची कोणतीच व्यक्तिगत ध्येये नसतात असा याचा अर्थ नाही. उदाहरणार्थ, तो देवाच्या सेवेत, जबाबदारीच्या पदांवर काम करू इच्छित असेल; पण यहोवाकडून हा आशीर्वाद मिळेपर्यंत तो धीर धरतो आणि जी काही प्रगती तो करतो त्यासाठी यहोवाला श्रेय देतो. मी स्वतःच्या कर्तुत्वावर काहीतरी मिळवले अशा अविर्भावात तो वागत नाही. असा दृष्टिकोन बाळगल्यामुळे विनयशील व्यक्तीचा “शांतिदाता देव” यहोवा यासोबतचा संबंध अधिक दृढ होतो.—फिलिप्पैकर ४:९.
काहीवेळा आपल्याला असे वाटत असेल की आपल्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण जरा विचार करा, अविनयशीलपणे स्वतःकडे लक्ष आकर्षित करण्यापेक्षा विनयशील राहून दुर्लक्ष केले जाणेच अधिक चांगले नाही का? विनयशील व्यक्ती कसेही करून आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करायला उतावीळ नसते. त्यामुळे तिचे मन शांत राहते आणि हे तिच्या भावनिक आणि शारीरिक आरोग्याकरता लाभदायक ठरते.
विनयशीलता विकसित करणे आणि टिकवणे
आदाम आणि हव्वा हे अविनयशील वृत्तीला बळी पडले, आणि त्यांनी आपल्या वंशजांनाही हा अवगुण दिला आहे. आपल्या पहिल्या आईवडिलांनी केलेली चूक टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? विनयशीलतेचा उत्तम गुण आपण कशाप्रकारे विकसित करू शकतो?
सर्वात आधी आपण विश्वाचा निर्माता यहोवा याच्यासमोर आपली भूमिका नीट समजून घेतली पाहिजे. देवाच्या महत्कृत्यांशी आपल्या व्यक्तिगत यशाची खरोखर तुलना होऊ शकते का? यहोवाने आपला विश्वासू सेवक ईयोब याला विचारले: “मी पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कोठे होतास? तुला समजण्याची अक्कल असेल तर सांग.” (ईयोब ३८:४) ईयोब या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही. आपले ज्ञान, सामर्थ्य आणि अनुभव देखील मर्यादितच नाही का? मग या मर्यादा कबूल करणेच आपल्या हिताचे नाही का?
शिवाय बायबल असे म्हणते: “पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे; जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहेत.” “वनातील सर्व पशु, हजारो डोंगरांवरील गुरेढोरे” त्याचीच आहेत. “रूपे माझे आहे, सोने माझे आहे,” असे केवळ यहोवाच म्हणू शकतो. (स्तोत्रसंहिता २४:१; ५०:१०; हग्गय २:८) यहोवाच्या सर्व संपत्तीपुढे आपण काय आपल्या मौल्यवान वस्तू मिरवणार? जगातल्या सर्वात श्रीमंत माणसाने देखील आपल्या संपत्तीविषयी बढाई मारण्याचे खरे तर काहीच कारण नाही! तेव्हा, प्रेषित पौलाने रोममधील ख्रिश्चनांना दिलेल्या सल्ल्याचे पालन करणे शहाणपणाचे आहे: “मला प्राप्त झालेल्या कृपादानावरून मी तुम्हापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की, आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका.”—रोमकर १२:३.
विनयशीलतेचा गुण विकसित करू इच्छिणाऱ्या देवाच्या सेवकांनी आत्म्याच्या फळासाठी—अर्थात, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन यांसारखे गुण विकसित करण्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. (लूक ११:१३; गलतीकर ५:२२, २३) का? कारण हे सर्व गुण आपल्यात असल्यास विनयशील राहणे आपल्याला जास्त सोपे जाईल. उदाहरणार्थ, इतर लोकांबद्दल आपल्या मनात प्रेम असेल तर त्यांच्यासमोर आपल्याच चांगल्या गुणांची बढाई आपण मारणार नाही किंवा त्यांच्याशी गर्विष्ठपणे वागणार नाही. तसेच, इंद्रियदमन किंवा आत्मसंयम असल्यास, कोणतीही अविनयशील कृती करण्याआधी आपण थांबून विचार करू.
आपण अतिशय सावध राहिले पाहिजे! अविनयशील वृत्तीला बळी पडायचे नसेल तर सतत जागृत राहणे आवश्यक आहे. याआधी ज्यांचा उल्लेख करण्यात आला त्यांपैकी दोन राजे देखील प्रत्येकच प्रसंगी विनयशीलतेने वागले नाहीत. राजा दावीद याने अविचारीपणे, यहोवाच्या इच्छेविरुद्ध इस्राएलातील लोकांची मोजदाद केली. राजा शलमोन हा तर इतका अविनयशील झाला की त्याने खोट्या उपासनेत भाग घेतला.—२ शमुवेल २४:१-१०; १ राजे ११:१-१३.
जोपर्यंत हे अधार्मिक जग अस्तित्वात राहील तोपर्यंत आपल्याला विनयशील राहण्याकरता सतत दक्ष राहावे लागेल. पण आपल्या या प्रयत्नांचे आपल्याला चांगले फळ मिळेल. देवाच्या नव्या जगातील मानव समाजात केवळ असे लोक असतील जे विनयशील आहेत. ते विनयशीलतेला दुबळेपणाचे चिन्ह नव्हे तर एक सद्गुण समजतील. विनयशीलतेचा गुण दाखवल्यामुळे जी शांती मिळते ती प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक कुटुंबाला मिळेल. तो खरोखर किती आनंदाचा समय असेल!
[२३ पानांवरील चित्र]
येशूने विनयशीलपणे आपल्या प्रत्येक कृतीचे श्रेय यहोवाला दिले