व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सुधारणूक स्वीकारलेला आदर्श मनुष्य

सुधारणूक स्वीकारलेला आदर्श मनुष्य

सुधारणूक स्वीकारलेला आदर्श मनुष्य

“झांबियात दर महिन्याला ३० लोक मगरींना बळी पडतात.” असे एका आफ्रिकन वृत्तपत्राने काही वर्षांआधी म्हटले होते. एका प्राणीशास्त्रज्ञाने निरीक्षणासाठी काही मगरी पकडल्या. ते म्हणतात, “एका मगरीला धरायला १२ माणसे लागली.” मगरीची शक्‍तिशाली शेपटी आणि भलामोठा जबडा पाहून भल्याभल्यांची बोबडी वळते!

देवाने आपल्या ईयोब नावाच्या सेवकाला धडा शिकवण्यासाठी ‘लिव्याथान’ असे नाव असलेल्या एका प्राण्याचे उदाहरण दिले. हा प्राणी कदाचित मगर असावा ज्याला “सर्व उन्मत्त पशूंचा राजा” असेही म्हटले आहे. (ईयोब ४१:१, ३४) ही घटना सुमारे ३,५०० वर्षांआधी ऊस या ठिकाणी घडली होती; हे ठिकाण कदाचित उत्तर अरेबियात असावे. या प्राण्याचे वर्णन करताना देवाने ईयोबाला म्हटले: “त्याला चिडविण्याचे धाडस कोणी करणार नाही; तर मग मजसमोर टिकेल असा कोण आहे?” (ईयोब ४१:१०) खरेच, मगरीची आपल्याला भीती वाटते तर मग तिला निर्माण करणाऱ्‍याविरुद्ध बोलण्याची आपल्याला केवढी भीती वाटायला हवी! ईयोबाला हा धडा शिकायला मिळाल्यावर त्याने त्याबद्दल कदर व्यक्‍त केली; त्याने आपली चूक कबूल केली.—ईयोब ४२:१-६.

ईयोबाचे नाव ऐकल्यावर आपल्याला लगेच, संकटातही तग धरून तो कसा विश्‍वासू राहिला याची आठवण होते. (याकोब ५:११) खरे पाहिले तर, ईयोबाच्या विश्‍वासाची अशी कठीण परीक्षा होण्याच्या आधीपासूनच यहोवाला ईयोब फार प्रिय होता. त्या वेळी, “भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिऊन वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही,” असे उद्‌गार देवाने त्याच्याविषयी काढले होते. (ईयोब १:८) हे समजल्यावर आपण ईयोबाविषयी अधिक जाणून घ्यायला प्रेरित झाले पाहिजे. आणि ईयोबाविषयी आणखी शिकून घेतल्यावर आपणही देवाला कसे संतुष्ट करू शकतो हे जाणून घेऊ शकतो.

देवासोबतचा नातेसंबंध सर्वात महत्त्वाचा

ईयोब एक धनाढ्य मनुष्य होता. त्याच्याजवळ भरपूर सोने तर होतेच पण त्याशिवाय ७,००० मेंढ्या, ३,००० उंट, ५०० गाढवी, १,००० बैल आणि असंख्य नोकरचाकरही होते. (ईयोब १:३) पण ईयोबाने धनावर नव्हे तर यहोवावर भरवसा ठेवला. तो म्हणाला: “जर मी सुवर्णावर भरवसा ठेविला असता, तुजवर माझी भिस्त आहे असे सुवर्णास म्हटले असते, जर माझे धन बहुत आहे, माझ्या हातांनी फार कमाई केली आहे, याचा मी आनंद केला असता, . . . तर हाहि न्यायाधीशांपुढे नेण्याजोगा गुन्हा झाला असता; अशाने ऊर्ध्वलोकीच्या देवाशी मी दगा केला असे झाले असते.” (ईयोब ३१:२४-२८) ईयोबाप्रमाणेच आपणही भौतिक वस्तूंना अधिक महत्त्व न देता यहोवा देवासोबतच्या नातेसंबंधाला अधिक महत्त्व दिले पाहिजे.

सहमानवांशी योग्य व्यवहार

आपल्या नोकरचाकरांशी ईयोबाचा कसा व्यवहार होता? स्वतः ईयोब असे म्हणतो: “माझा दास व दासी मजशी वाद करीत असता, मी त्यांचा हक्क तुच्छ लेखिला असता, तर देव माझा न्याय करावयास उठल्यास मी काय केले असते? त्याने झाडा घेतला असता तर मी काय जाब दिला असता?” (ईयोब ३१:१३, १४) यहोवाचा दयाळूपणा ईयोबाला मूल्यवान वाटायचा आणि म्हणून आपल्या दास-दासींच्या बाबतीत तो दयावंत होता. ख्रिस्ती मंडळीत खासकरून देखरेखीच्या पदावर असलेल्यांकरता हे केवढे उत्तम उदाहरण! त्यांनी देखील न्यायी, अपक्षपाती असायला हवे आणि लोकांशी खेळीमेळीने राहायला हवे.

ईयोबाने आपल्या कुटुंबाचा भाग नसलेल्या लोकांबद्दलही चिंता दाखवली. त्यांच्याबद्दल त्याने असे म्हटले: “मी कंगालांचा आशाभंग केला असला, विधवेचे डोळे शिणविले असले, . . . वेशीवर कोणी आपल्या पक्षाचा आहे हे पाहून मी पोरक्यावर आपला हात उचलिला असला; तर माझी खवाटे पाठीतून निखळून पडोत, माझे हात खांद्यांच्या सांध्यांतून मोडून पडोत.” (ईयोब ३१:१६-२२) म्हणून, आपल्या मंडळीत हालअपेष्टेत दिवस कंठणाऱ्‍या लोकांचा आपणसुद्धा विचार करू या.

अनोळख्यांबद्दल निःस्वार्थ प्रेम असल्यामुळे ईयोब त्यांचा पाहुणचार करायचा. म्हणून तो म्हणू शकला: “कोणा परदेशस्थास माझ्या दाराबाहेर बिऱ्‍हाड करून राहण्याची पाळी आली नाही; वाटसरास माझे दार खुले असे.” (ईयोब ३१:३२) आज देवाच्या सेवकांकरता हे केवढे उत्तम उदाहरण आहे. बायबलच्या सत्यात रुची घेणारे नवीन लोक राज्य सभागृहात येतात तेव्हा आपण त्यांचे आनंदाने स्वागत करतो. यामुळे त्यांना आध्यात्मिक प्रगती करायला प्रोत्साहन मिळते. तसेच, प्रवासी पर्यवेक्षक आणि इतर ख्रिश्‍चनांचेही आदरातिथ्य करण्याचे विसरून चालणार नाही!—१ पेत्र ४:९; ३ योहान ५-८.

आपल्या शत्रूंबद्दलही ईयोबाने वाईट चिंतले नाही. त्याचा द्वेष करणाऱ्‍या कोणावर विपत्ती कोसळल्यावर त्याला आनंद होत नव्हता. (ईयोब ३१:२९, ३०) उलट, त्याचे खोटे सांत्वन करायला आलेल्यांसाठी त्याने प्रार्थना केली; त्यावरून हे स्पष्ट होते की अशा लोकांचेही भले करायला तो इच्छित होता.—ईयोब १६:२; ४२:८, ९; पडताळा मत्तय ५:४३-४८.

चांगल्या चालीचा मनुष्य

ईयोब आपल्या वैवाहिक सोबत्याला विश्‍वासू राहिला; त्याने कधीही परस्त्रीबद्दल आपल्या मनात वासना निर्माण होऊ दिली नाही. ईयोब म्हणाला: “मी तर आपल्या डोळ्यांशी करार केला आहे; मी कोणा कुमारीवर नजर कशी जाऊ देऊ? माझे मन कोणा स्त्रीला पाहून लंपट झाले असले, मी आपल्या शेजाऱ्‍याच्या दाराशी टपून बसलो असलो, तर माझी स्त्री दुसऱ्‍याचे दळणकांडण करो; परके तिला ओणवी करोत. कारण हे दुष्कर्म [लैंगिक वासना] आहे; हा न्यायाधीशांनी शिक्षा करण्याजोगा गुन्हा आहे.”—ईयोब ३१:१, ९-११.

ईयोबाने आपले मन अनैतिक वासनांनी कलुषित होऊ दिले नाही. तर त्याने आपले चालचलन योग्य राखले. म्हणूनच, अनैतिक वासनांच्या मोहाचा विरोध करणाऱ्‍या या विश्‍वासू पुरुषावर देव खूष होता.—मत्तय ५:२७-३०.

कुटुंबाच्या आध्यात्मिकतेची काळजी

काही वेळा, ईयोबाचे पुत्र मेजवान्या ठेवत असत; त्यामध्ये त्याची सर्व मुले सामील होत असत. मेजवानी संपल्यावर ईयोबाला आपल्या मुलांविषयी चिंता वाटायची; आपल्या मुलांनी यहोवाविरुद्ध पाप तर केले नाही अशी त्याला काळजी वाटायची. तेव्हा ईयोब शांत बसायचा नाही. बायबलमधील अहवाल आपल्याला त्याविषयी असे सांगतो: “हे भोजनसमारंभ आटोपल्यावर ईयोब त्यांना बोलावून आणून त्यांची शुद्धि करी; तो प्रातःकाळी उठून त्या सर्वांच्या संख्येइतक्या बलीचे हवन करी; कारण तो म्हणे की, न जाणो माझ्या पुत्रांनी पाप केले असेल आणि आपल्या मनाने देवाचा अव्हेर केला असेल.” (ईयोब १:४, ५) यहोवाची भीड राखणे आणि त्याच्या मार्गातच चालत राहणे याबद्दल ईयोबाला वाटणाऱ्‍या काळजीचा त्याच्या कुटुंबावर केवढा प्रभाव पडला असावा!

आज, ख्रिस्ती कुटुंब प्रमुखांनी आपल्या कौटुंबिक सदस्यांना देवाच्या वचनातून अर्थात बायबलमधून शिक्षण देण्याची गरज आहे. (१ तीमथ्य ५:८) त्याचप्रमाणे, कौटुंबिक सदस्यांकरता प्रार्थना करणेसुद्धा उचित आहे.—रोमकर १२:१२.

परीक्षेत विश्‍वासू

ईयोबावर आलेल्या कठीण परीक्षांविषयी बायबलच्या अनेक वाचकांना माहिती आहे. दियाबल सैतानाने तर ठामपणे असे म्हटले होते की, संकटकाळी ईयोब देवाला त्यागेल. यहोवाने हे आव्हान स्वीकारले आणि क्षणभरही विलंब न करता सैतानाने ईयोबावर विपत्ती आणली. त्याची सर्व गुरेढोरे लुटून नेण्यात आली. पण सर्वात दुःखाची गोष्ट म्हणजे त्याची सगळी मुले मरण पावली. त्यानंतर, सैतानाने ईयोबाला मोठमोठाल्या गळवांनी नखशिखांत पीडिले.—ईयोब, अध्याय १, २.

त्याचा काय परिणाम झाला? ईयोबाच्या पत्नीने त्याला देवाला शाप दे असे म्हटले तेव्हा तो म्हणाला: “तू धर्महीन स्त्रियांप्रमाणे बोलतेस; देवापासून सुखच घ्यावे, आणि दु:ख घेऊ नये काय?” बायबल पुढे म्हणते की, “ह्‍या सर्व प्रसंगी ईयोबाने आपल्या वाचेने काही पाप केले नाही.” (ईयोब २:१०) होय, ईयोब विश्‍वासूपणे तग धरून राहिला आणि अशाप्रकारे त्याने दियाबलाला अर्थात सैतानाला खोटे ठरवले. आपणही अशाचप्रकारे परीक्षांत तग धरून राहू आणि आपण यहोवावर निखळ प्रेम करतो म्हणून त्याची सेवा करतो हे शाबीत करून दाखवू.—मत्तय २२:३६-३८.

नम्रपणे सुधारणूक स्वीकारली

अनेक बाबतीत ईयोब उदाहरणशील असला तरी तो काही परिपूर्ण मनुष्य नव्हता. तो स्वतःच म्हणाला: “अमंगळातून काही मंगळ निघते काय? अगदी नाही.” (ईयोब १४:४; रोमकर ५:१२) त्यामुळे ईयोब सात्विक होता असे यहोवाने म्हटले तेव्हा ते एका अर्थाने खरे होते. कारण आपल्या अपरिपूर्ण, पापी मानवी सेवकांकडून देव जे अपेक्षित होता त्यानुरूप ईयोब जगला होता. हे केवढे मोठे प्रोत्साहन!

ईयोबाने परीक्षा तर पार केली पण त्याची एक कमतरता त्यातून स्पष्ट झाली. त्याच्यावर कोसळलेल्या विपत्तीबद्दल ऐकल्यावर तीन लोक त्याला भेटायला आले; ते स्वतःला सांत्वनकर्ते म्हणवत होते. (ईयोब २:११-१३) ईयोबाने गंभीर अपराध केल्यामुळे यहोवा त्याला शिक्षा देत होता असे त्यांनी म्हटले. साहजिकच, या खोट्या आरोपांनी ईयोबाला फार वाईट वाटले आणि त्याने सफाई देण्याचा प्रयत्न केला. पण स्वतःची सफाई देताना मात्र त्याने मर्यादा ओलांडली. एका अर्थी तो असे म्हणत होता की तो देवापेक्षा अधिक धार्मिक होता!—ईयोब ३५:२, ३.

ईयोबावर देवाचे प्रेम असल्याकारणाने त्याची चूक दाखवायला देवाने एका तरुणाचा उपयोग केला. त्या अहवालात म्हटले आहे: “अलीहू याचा राग भडकला; ईयोबाने देवाला निर्दोषी ठरविण्याचे सोडून स्वतःस निर्दोषी ठरवावयास पाहिले, म्हणून त्याजवर त्याचा राग भडकला.” अलीहूच्या मते, “आता ईयोब म्हणतो की ‘मी निर्दोष आहे; देवाने मजवर अन्याय केला आहे.’” (ईयोब ३२:२; ३४:५) परंतु, ईयोबाने केलेल्या पापांमुळे देव त्याला शिक्षा देत आहे असा चुकीचा निष्कर्ष काढून अलीहूने त्या “सांत्वनकर्त्यांना” साथ दिली नाही. त्याएवेजी, अलीहूने ईयोब विश्‍वासू होता असे मानले आणि त्याला असा सल्ला दिला: “हा तुझा वाद [यहोवासमोरच] आहे, तर तू त्याची वाट पाहत राहा.” ईयोबाने मागेपुढे कसलाच विचार न करता अशी सफाई द्यायला नको होती; त्याने यहोवावर भरवसा ठेवायला हवा होता. अलीहूने ईयोबाला असा धीर दिला: “[देव] न्याय व धर्म विपरीत करीत नाही.”—ईयोब ३५:१४; ३७:२३.

ईयोबाला आपली विचारसरणी बदलण्याची गरज होती. यहोवाने त्याला हे दाखवले की, परमेश्‍वराच्या मोठेपणापुढे मानव खूप छोटा आहे. यहोवाने पृथ्वी, समुद्र, ताऱ्‍यांनी सजलेले आकाश, प्राणी आणि निर्मितीच्या इतर अनेक अद्‌भुत गोष्टींकडे ईयोबाचे लक्ष वेधले. शेवटी, देवाने लिव्याथानाचे, अर्थात मगरीचे उदाहरण दिले. ईयोबाने नम्रपणे ही सुधारणूक स्वीकारली आणि याही बाबतीत आपल्यासमोर उदाहरण मांडले.

आपण कदाचित यहोवाच्या सेवेत चांगले करत असू, तरीपण ईयोबाप्रमाणे आपल्याही हातून चुका होतच राहतील. आणि जर एखादी चूक गंभीर स्वरूपाची असेल, तर कोणत्या ना कोणत्या मार्गाने यहोवा आपली सुधारणूक करील. (नीतिसूत्रे ३:११, १२) कदाचित, आपल्या विवेकाला बोचणारे एखादे शास्त्रवचन आपल्याला आठवेल. कदाचित, टेहळणी बुरूज किंवा वॉचटावर संस्थेच्या इतर कोणत्याही प्रकाशनातील वाक्याने आपल्याला आपल्या अपराधाची जाणीव करून देण्यात येईल. नाहीतर कदाचित, ख्रिस्ती मंडळीतील एखादा बंधू किंवा बहीण आपल्याला प्रेमाने दाखवून देतील की आपण अमुक अमुक बायबलच्या तत्त्वाचे पालन केले नाही. अशा वेळी आपली काय प्रतिक्रिया असेल? ईयोबाच्या बाबतीत पाहिले तर त्याने पश्‍चात्तापी वृत्ती प्रदर्शित केली. तो म्हणाला: “म्हणून मी माघार घेऊन धूळराखेत बसून पश्‍चात्ताप करीत आहे.”—ईयोब ४२:६.

यहोवाकडून प्रतिफळ

यहोवाने ईयोबाला प्रतिफळ दिले; त्याने त्याचे आणखी १४० वर्षे आयुष्यमान वाढवले आणि या काळादरम्यान त्याला पुष्कळ काही लाभले. त्याने जे गमावले होते त्याच्या कितीतरी पटीने अधिक त्याला देण्यात आले. ईयोब शेवटी मेला; तरीपण देवाच्या नवीन राज्यात त्याचे पुनरुत्थान होईल याबद्दल काडीमात्र शंका नाही.—ईयोब ४२:१२-१७; यहेज्केल १४:१४; योहान ५:२८, २९; २ पेत्र ३:१३.

आपणही जर देवाला निष्ठावान राहिलो आणि बायबलच्या आधारे देण्यात आलेली प्रत्येक सुधारणूक स्वीकारली तर देवाची कृपापसंती आपल्यावर असेल व तो आपल्याला आशीर्वादही देईल. आपण हाही भरवसा बाळगू शकतो की त्याच्या नवीन रीतीव्यवस्थेत तो आपल्याला जीवन जगण्याची संधी निश्‍चितच देईल. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे आपण देवाचा गौरव करू. आपल्या विश्‍वासूपणाचे प्रतिफळ तर आपल्याला मिळेलच; पण आपण आपला स्वार्थ साधण्यासाठी नव्हे तर मनःस्वी प्रेमामुळे देवाची उपासना करत आहोत हे सिद्ध होईल. नम्रपणे सुधारणूक स्वीकारलेल्या ईयोबाप्रमाणे आपल्यालाही यहोवाचे मन आनंदित करण्याची संधी लाभली आहे हा केवढा मोठा सन्मान!—नीतिसूत्रे २७:११.

[२६ पानांवरील चित्रे]

ईयोबाने अनाथ, विधवा आणि इतरांवरही दया दाखवली

[२८ पानांवरील चित्रे]

नम्रपणे सुधारणूक स्वीकारलेल्या ईयोबाला मोठे प्रतिफळ लाभले