व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सेनेगलमध्ये ख्रिस्ती आशेविषयी सांगणे

सेनेगलमध्ये ख्रिस्ती आशेविषयी सांगणे

आम्ही विश्‍वास ठेवणाऱ्‍यांपैकी आहोत

सेनेगलमध्ये ख्रिस्ती आशेविषयी सांगणे

प्राचीन काळापासून मासे हे मानवाचे प्रमुख अन्‍न राहिले आहे. हजारो वर्षांपासून त्याने समुद्रांत, ओढ्यानाल्यांत व नद्यांत मासेमारी केली आहे. येशू ख्रिस्ताचे काही प्रेषित देखील गालील समुद्रात मासेमारी करत असत. परंतु येशूने त्यांना एका वेगळ्या प्रकारच्या मासेमारीविषयी सांगितले. ही आध्यात्मिक मासेमारी होती जिचा फायदा केवळ मासे पकडणाऱ्‍यांनाच नव्हे तर माशांना देखील होणार होता.

याबाबतीत येशूने मासेमारी करणाऱ्‍या पेत्राला म्हटले: “येथून पुढे तू माणसे धरणारा होशील.” (लूक ५:१०) या प्रकारची मासेमारी आज २३० पेक्षा अधिक देशांत चालली आहे; त्यात सेनेगल देशाचाही समावेश होतो. (मत्तय २४:१४) येशूच्या काळाप्रमाणे आज देखील हे “माणसे धरणारे” अगदी धैर्याने इतरांना आपल्या ख्रिस्ती आशेविषयी सांगतात.—मत्तय ४:१९.

सेनेगल हे आफ्रिकेच्या पश्‍चिम टोकाला वसले आहे. सेनेगलच्या उत्तरेकडे वाळवंटी प्रदेश असून येथे सहारा वाळवंटाची सीमा आहे; दक्षिणेकडे कासामान्झच्या दमट हवामान असलेल्या जंगलांपर्यंत सेनेगलचा विस्तार आहे. सेनेगलवरून वाळवंटाचे शुष्क वारे आणि अटलांटिकचे थंडगार, आल्हाददायक वारे देखील वाहतात. सेनेगलमध्ये नव्वद लाखापेक्षा अधिक लोकांची वस्ती आहे. तेथील लोक पाहुणचार करण्याच्याबाबतीत नावाजलेले आहेत. फार कमी लोक चर्चला जाणारे आहेत. पुष्कळजण मेंढपाळ आहेत तर इतरजण गुरेढोरे, उंट आणि शेळ्या राखणारे आहेत. भुईमूग, कापूस आणि तांदूळ पिकवणारे शेतकरी देखील तेथे आहेत. आणि हो, अटलांटिक महासागरातून आणि सेनेगलच्या भोवती असलेल्या अनेक नद्यांतून विपुल प्रमाणात मासे धरून आणणारे मच्छीमार देखील आहेत. सेनेगलच्या अर्थव्यवस्थेत मासेमारीचा सिंहाचा वाटा आहे. खरे तर, सिबू जेन अर्थात भात, मासे आणि भाज्या एकत्र करून बनविलेला हा चवदार अन्‍नपदार्थ तर तिथला नावाजलेला अन्‍नपदार्थ आहे.

“माणसे धरणारे”

सेनेगलमध्ये देवाच्या राज्याचे ८६३ आवेशी प्रचारक आहेत. १९५० शीच्या सुरवातीला येथे आध्यात्मिक मासेमारी सुरु झाली. १९६५ मध्ये सेनेगलची राजधानी डाकार येथे वॉच टावर संस्थेची एक शाखा खोलण्यात आली. ‘मासे धरणारे’ मिशनरी अनेक दूरदूरच्या राष्ट्रांतून येथे येऊ लागले. ‘मासे धरण्याचे’ काम सुरू झाले आणि सेनेगलमध्ये ख्रिस्ती आशेविषयीचा प्रचार नियमितपणे पुढे वाढत गेला. कालांतराने, डाकार शहराच्या बाहेर म्हणजे अल्माडायस येथे नवीन शाखा दफ्तर बांधण्यात आले व १९९९ साली जून महिन्यात ते यहोवाला समर्पित करण्यात आले. तो अतिशय आनंदाचा प्रसंग होता.

सत्य स्वीकारण्याचे आव्हान

भिन्‍नभिन्‍न पार्श्‍वभूमीच्या लोकांना नियमितपणे सत्याचा संदेश कळवला जातो व त्यापैकी काहींनी देवाच्या वचनातील आशेच्या संदेशाला चांगला प्रतिसाद दिला आहे. इथल्या पुष्कळ लोकांना बायबलचे अजिबात ज्ञान नाही तरीसुद्धा, यहोवा देवाने प्राचीन काळच्या विश्‍वासू संदेष्ट्यांना दिलेली अभिवचने लवकरच सत्यात उतरणार आहेत, हे माहीत झाल्यावर त्यांना खूप आनंद होतो.

कौटुंबिक परंपरा व रितीरिवाज यांचा प्रश्‍न येतो तेव्हा अनेकदा ख्रिस्ती तत्त्वांना जडून राहण्याकरता तेथील ख्रिश्‍चनांना खंबीर भूमिका घ्यावी लागते. उदाहरणार्थ, सेनेगलमध्ये अनेक बायका करण्याचा रिवाज आहे. एका मनुष्याचेच उदाहरण घ्या ज्याने बायबल अभ्यास करायला सुरवात केली होती. त्याला दोन बायका होत्या. ख्रिस्ती सत्य स्वीकारून केवळ एका पत्नीचा पती होण्याविषयी बायबलच्या नियमाचे पालन करण्याचे धैर्य त्याला होणार होते का? (१ तीमथ्य ३:२) त्याची तरुणपणाची पत्नी अर्थात त्याने पहिल्यांदा ज्या स्त्रीशी विवाह केला होता केवळ तिलाच तो ठेवील का? त्याने तेच केले आणि आज तो डाकार क्षेत्रातील एका मोठ्या मंडळीत एक आवेशी वडील या नात्याने कार्य करीत आहे. त्याच्या पहिल्या पत्नीने आणि त्याच्या १२ मुलांनी सत्य स्वीकारले आहे. या १२ मुलांपैकी २ मुले त्याला त्याच्या पूर्वीच्या दुसऱ्‍या पत्नीकडून झालेली आहेत.

ख्रिस्ती आशा स्वीकारण्यास अडचण ठरणारी दुसरी गोष्ट म्हणजे निरक्षरता. म्हणजे निरक्षर असलेली व्यक्‍ती सत्य स्वीकारू व आचरू शकत नाही का? नाही असे मुळीच नाही. मारीचे उदाहरण घ्या. ती आठ लहानलहान मुलांची कष्टाळू आई आहे. मुले शाळेत जाण्यापूर्वी तसेच ती स्वतः कामाला जाण्याआधी दररोज बायबलचे वाचन करण्याचे महत्त्व तिने लगेच ओळखले. पण तिला तर वाचता येत नव्हते, मग? दर दिवशी सकाळी ती शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे ही पुस्तिका घेऊन तिच्या घरासमोरच्या रस्त्यावर उभी राहायची. लोक ये-जा करायचे तेव्हा ती, तुम्हाला वाचता येतं का असे त्यांना विचारायची. कोणाला वाचता येत असेल तर ती त्या व्यक्‍तिच्या हातात पुस्तिका देऊन, “मला वाचता येत नाही, कृपया मला हा इतका भाग वाचून दाखवाल का?” अशी विनंती करायची. मग ती व्यक्‍ती वाचत असताना ती लक्षपूर्वक ऐकायची. नंतर वाचून दाखवण्याबद्दल आभार मानून ती लगेच घरात यायची आणि मुले शाळेत जाण्याआधी ती त्यांच्याबरोबर वचनाची अगदी उत्साहाने चर्चा करायची.

सर्व प्रकारच्या लोकांकडून प्रतिसाद

सेनेगलमध्ये लोक सहसा रस्त्यांवर मासे, भाजीपाला किंवा बाजारात फळे विकत बसलेले किंवा मग एखाद्या बाओबाबच्या झाडाच्या सावलीत, अत्या नावाचा कसलातरी कडवट चहा निवांत पीत बसलेले दिसतात. जे कोणी भेटतील त्यांना सुवार्ता सांगण्याचा निश्‍चय केलेले दोन बांधव एका अधू भिकाऱ्‍याशी बोलले जो रस्त्यावर भीक मागत उभा होता. त्याला नमस्कार केल्यावर ते त्याला म्हणाले: “पुष्कळ लोक तुम्हाला पैसे देतात पण ते तुमच्याशी बोलायला थांबत नाहीत. आम्ही तुमच्याशी बोलायला व तुमच्या भविष्याविषयी काहीतरी सांगायला आलो आहोत.” भिकारी आधी गोंधळून गेला. बंधू पुढे म्हणाले: “आम्ही तुम्हाला एक प्रश्‍न विचारू इच्छितो. जगात इतकं दुःख का आहे असं तुम्हाला वाटतं?” भिकाऱ्‍याने उत्तर दिलं: “ही देवाची इच्छा आहे म्हणून.”

बांधवांनी नंतर मग त्याला शास्त्रवचनांतून काही वचने दाखवली आणि प्रकटीकरण २१:४ चे स्पष्टीकरण दिले. आशेचा हा संदेश ऐकून आणि कोणीतरी आपल्याबरोबर बोलायला थांबले व बायबलची चर्चा करायला किती उत्सुक आहे हे पाहून त्याला गहिवरून आले. त्याच्या डोळ्यांत पाणी आले. बांधवांकडे पैसे मागण्याऐवजी तोच बांधवांना त्याच्याजवळच्या गाडग्यात साठलेली नाणी घ्यायची त्यांना गळ घालू लागला! इतके की येणारे जाणारे सर्व लोक त्यांच्याकडे पाहू लागले. मग कितीतरी वेळानंतर बांधवांनी कशीतरी त्याची समजूत काढली आणि त्याला ते पैसे स्वतःजवळच ठेवायला लावले. शेवटी तो तयार झाला पण त्यांनी त्याच्याकडे पुन्हा यावे म्हणून त्याने त्यांना सांगितले.

डाकारमधील मोठे विद्यापीठही आध्यात्मिक मासेमारीचे चांगले ठिकाण आहे. झॉन-लुई नावाचा एक मेडिकलचा विद्यार्थी बायबलचा अभ्यास करू लागला. त्याने सत्य लागलीच स्वीकारले आणि यहोवाला आपले जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेतला. त्याला पूर्ण वेळेच्या पायनियर सेवेत देवाची सेवा करायची मनसा होती परंतु त्याबरोबर त्याला मेडिकलचा अभ्यास करायला आवडायचा. तो खास शिक्षणाकरताच त्याच्या देशातून येथे आल्यामुळे, करारानुसार त्याला त्याचा अभ्यास पूर्ण करणे भाग होते. तरीपण त्याचवेळेस त्याने साहाय्यक पायनियर म्हणून सेवा सुरू केली. डॉक्टरची पदवी मिळाल्याच्या काही काळानंतरच आफ्रिकेतील मोठ्या बेथेल कुटुंबात फॅमिली डॉक्टर म्हणून काम करायचे त्याला आमंत्रण आले. डाकार विद्यापीठात आणखी एकाने अभ्यास करून सत्य स्वीकारले आणि तोही आता त्याच्या मायदेशातील बेथेलमध्ये सेवा करत आहे.

सेनेगलमधील आध्यात्मिक मासेमारी खरोखरच फलदायी आहे. तेथे यहोवाच्या साक्षीदारांच्या बायबल साहित्याची खूप प्रशंसा केली जाते शिवाय हे साहित्य आता स्थानिक वुलूफ भाषेतही तयार केले जात आहे. आपल्या मातृभाषेत सुवार्ता ऐकायला मिळत असल्यामुळे पुष्कळ प्राजंळ मनाचे लोक कृतज्ञतापूर्वक ही सुवार्ता ऐकत आहेत. सेनेगलमध्ये “माणसे धरणारे” आवेशी बंधुभगिनी जसजसे आपल्या ख्रिस्ती आशेविषयी विश्‍वासूपणे व धैर्याने साक्ष देत राहतील तसतसे यहोवाच्या आशीर्वादाने आणखी पुष्कळ लाक्षणिक मासे पकडले जातील यात काहीच शंका नाही.

[३१ पानांवरील नकाशा/चित्र]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

सेनेगल

[चित्र]

सेनेगलमध्ये ख्रिस्ती आशेविषयी सांगताना

[चित्राचे श्रेय]

Mountain High Maps® Copyright © १९९७ Digital Wisdom, Inc.