‘हे देवा, आपला प्रकाश प्रगट कर’
‘हे देवा, आपला प्रकाश प्रगट कर’
“आपला प्रकाश व आपले सत्य प्रगट कर. ती मला मार्ग दाखवोत.”—स्तोत्र ४३:३.
१. यहोवा कशाप्रकारे आपले उद्देश प्रगट करतो?
यहोवा देव अतिशय विचारशीलपणे आपले उद्देश आपल्या सेवकांना कळवतो. अचानक चमकणाऱ्या, डोळ्यांना सहन न होणाऱ्या प्रकाशाप्रमाणे नव्हे, तर क्रमाक्रमाने तो आपल्यापुढे सत्य प्रगट करतो. आपल्या जीवनाची तुलना लांबच्या प्रवासाला निघालेल्या एका वाटसरूशी करता येईल. तो अगदी पहाटे निघतो, तेव्हा त्याला फारसे दिसत नाही. मग जसजसा सूर्य क्षितिजावरून वरती येऊ लागतो तसतसे त्याला थोडे थोडे दिसू लागते, काही गोष्टी त्याला स्पष्ट दिसतात तर बाकीच्या अद्याप अंधुकच दिसत असतात. पण सूर्य हळूहळू चढत जातो तसतसे त्याला दूरचे देखील स्पष्ट दिसू लागते. देव
आपल्याला जो आत्मिक प्रकाश पुरवतो त्याच्याशी याची तुलना करता येईल. तो एकाच वेळी केवळ सगळ्या गोष्टींची समज आपल्याला देत नाही. देवाचा पुत्र, येशू ख्रिस्त याने देखील आध्यात्मिक गोष्टींचे ज्ञान अशाचप्रकारे दिले. यहोवाने आपल्या लोकांना प्राचीन काळात कशाप्रकारे प्रकाश दिला आणि आज तो हा प्रकाश कशाप्रकारे देत आहे यावर आता आपण विचार करू या.२. ख्रिस्तपूर्व काळात यहोवाने कशाप्रकारे सत्यावर प्रकाश टाकला?
२ स्तोत्र अध्याय ४३ चे लेखक कदाचित कोरहचे पुत्र असावेत. लेवीय असल्यामुळे लोकांना देवाच्या नियमशास्त्राचे ज्ञान देण्याचा बहुमान त्यांना मिळाला होता. (मलाखी २:७) अर्थात, त्यांचा महान शिक्षक यहोवा होता आणि तोच सर्व बुद्धीचा उगम आहे याची त्यांना जाणीव होती. (यशया ३०:२०) म्हणूनच, हे स्तोत्र लिहिणाऱ्याने देवाला प्रार्थना केली: “हे देवा, . . . तू आपला प्रकाश व आपले सत्य प्रगट कर. ती मला मार्ग दाखवोत.” (स्तोत्र ४३:१, ३) जोपर्यंत इस्राएली लोक यहोवाला विश्वासू राहिले तोपर्यंत यहोवाने त्यांना आपले मार्ग शिकवले. कित्येक शतकांनंतर यहोवाने अतिशय विलक्षणरित्या, अर्थात, आपल्या पुत्राला या पृथ्वीवर पाठवून आपला प्रकाश व आपले सत्य त्यांच्यासमोर प्रगट केले.
३. येशूच्या शिकवणुकीमुळे यहुदी लोकांवर कशाप्रकारे परीक्षा आली?
३ देवाचा पुत्र येशू, मनुष्य रूपात होता तेव्हा तो या “जगाचा प्रकाश” होता. (योहान ८:१२) त्याने लोकांना “दाखले देऊन पुष्कळ गोष्टी” शिकवल्या. यांपैकी बऱ्याच गोष्टी त्यांच्यासाठी नवीन होत्या. (मार्क ४:२) उदाहरणार्थ, येशूने पंतय पिलाताला म्हटले: “माझे राज्य ह्या जगाचे नाही.” (योहान १८:३६) रोमी व्यक्तीकरता आणि कट्टर यहुद्यांकरता हा विचार नवीन होता कारण त्यांचा असा समज होता की मशीहा रोमी साम्राज्याला पादाक्रांत करून इस्राएल राष्ट्राचे हरवलेले गौरव त्याला परत मिळवून देईल. येशू खरे तर यहोवाचा प्रकाश प्रगट करत होता, पण त्याचे शब्द यहुदी शासकांना भावले नाहीत कारण त्यांना “देवाकडील गौरवापेक्षा मानवाकडील गौरव अधिक प्रिय वाटले.” (योहान १२:४२, ४३) यांपैकी बऱ्याच जणांनी देवाकडून येणारा आत्मिक प्रकाश आणि सत्य स्वीकारण्याऐवजी मानवी परंपरांनाच चिकटून राहणे पसंत केले.—स्तोत्र ४३:३; मत्तय १३:१५.
४. येशूच्या शिष्यांची समज वाढत जाणार होती हे कशावरून म्हणता येईल?
४ तथापि, मोजक्याच का होईना पण काही प्रामाणिक अंतःकरणाच्या स्त्रीपुरुषांनी मोठ्या आनंदाने येशूने शिकवलेल्या सत्याचा स्वीकार केला. त्यांनी हळूहळू देवाचे उद्देश समजून घेतले. त्यांना हे सत्य शिकवणाऱ्या येशू ख्रिस्ताचे जीवन संपत आले तेव्हासुद्धा त्यांना अद्याप बरेच काही शिकायचे होते. येशूने त्यांना सांगितले: “मला अद्याप तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत, परंतु आताच तुमच्याने त्या सोसवणार नाहीत.” (योहान १६:१२) होय, देवाच्या सत्याबद्दल येशूच्या शिष्यांची समज वाढत जाणार होती.
प्रकाश चमकत राहिला
५. पहिल्या शतकात कोणता प्रश्न उपस्थित झाला आणि तो मिटवण्याची जबाबदारी कोणाची होती?
५ येशूचा मृत्यू व पुनरुत्थान झाल्यानंतर, देवाचा प्रकाश अधिकच प्रखरपणे चमकू लागला. पेत्राला दिसलेल्या एका दृष्टान्तात यहोवाने स्पष्ट केले की यापुढे सुंता न झालेले विदेशी देखील ख्रिस्ताचे अनुयायी बनू शकतात. (प्रेषितांची कृत्ये १०:९-१७) हे एक नवीनच प्रकटीकरण होते! पण यावरून आता एक प्रश्न उपस्थित झाला: या विदेश्यांनी ख्रिस्ती बनल्यानंतर सुंता करावी अशी यहोवाची त्यांच्याकडून अपेक्षा होती का? पेत्राच्या दृष्टान्तात या प्रश्नाचे उत्तर स्पष्ट झाले नव्हते आणि त्यामुळे या विषयावर ख्रिस्ती लोकांत मोठा वाद निर्माण झाला. पण मंडळीची एकता ही अतिशय महत्त्वाची होती आणि ती टिकवून ठेवण्यासाठी हा वाद मिटवणे गरजेचे होते. म्हणूनच यरूशलेममध्ये “प्रेषित व वडीलवर्ग ह्या प्रकरणाचा विचार करावयास जमले.”—प्रेषितांची कृत्ये १५:१, २, ६.
६. सुंतेच्या प्रश्नावर विचार करत असताना प्रेषितांनी आणि वडिलांनी कोणत्या पद्धतीचा अवलंब केला?
६ ख्रिस्ती बनलेल्या विदेश्यांच्या संबंधात देवाची काय इच्छा आहे हे या सभेत उपस्थित असणारे प्रेषित आणि वडील कशाप्रकारे ठरवणार होते? यहोवाने ती चर्चा संचालित करण्यासाठी कोणा देवदूताला पाठवले नाही किंवा एखादा अद्भुत दृष्टान्त देखील त्याने दाखवला नाही. पण तरीसुद्धा या प्रेषितांना आणि वडील पुरुषांना देवाने कोणतेच मार्गदर्शन केले नाही असेही म्हणता येणार नाही. विदेशी लोकांसोबत देवाने कशाप्रकारे व्यवहार करायला सुरवात केली होती, कशाप्रकारे सुंता न झालेल्या विदेश्यांवर देखील देवाने आपला पवित्र आत्मा ओतला होता याविषयी काही ख्रिस्ती यहुद्यांची साक्ष त्यावेळी विचारात घेण्यात आली. मार्गदर्शनाकरता शास्त्रवचनांचे देखील परीक्षण करण्यात आले. अशारितीने, शिष्य याकोबाने एका समर्पक शास्त्रवचनाच्या आधारावर हा प्रश्न सोडवण्यासाठी उपाय सुचवला. पुराव्याचा विचार केल्यानंतर देवाची इच्छा काय हे स्पष्ट झाले. यहोवाला संतोषविण्यासाठी प्रेषितांची कृत्ये १५:१२-२९; १६:४.
विदेशी लोकांना सुंता करण्याची गरज नव्हती. प्रेषितांनी व वडीलवर्गाने लगेच हा निर्णय लेखी स्वरूपात सर्व मंडळ्यांना पाठवला, जेणेकरून ख्रिस्ती जनांना त्यातून मार्गदर्शन मिळावे.—७. पहिल्या शतकातील ख्रिश्चनांनी कशाप्रकारे प्रगतीशील वृत्ती दाखवली?
७ वाडवडिलांच्या परंपरांना अविचारीपणे चिकटून राहणाऱ्या यहुदी धर्मगुरूंसारखी यहुदी ख्रिश्चनांची प्रतिक्रिया नव्हती. विदेशी लोकांसंबंधाने देवाच्या उद्देशाची ही नवीन समज प्राप्त झाली तेव्हा त्यांनी मोठ्या आनंदाने हे मार्गदर्शन स्वीकारले; विदेशी लोकांबद्दल असलेला त्यांचा दृष्टिकोन आता त्यांना बदलावा लागणार होता, तरीसुद्धा त्यांनी विरोध केला नाही. नम्रपणे हे मार्गदर्शन स्वीकारल्यामुळे यहोवाने त्यांना आशीर्वादित केले आणि “मंडळ्या विश्वासात स्थिर झाल्या व दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत” गेली.—प्रेषितांची कृत्ये १५:३१; १६:५.
८. (अ) पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर अधिक प्रकाश मिळेल ही अपेक्षा करणे का रास्त होते? (ब) या संदर्भात कोणत्या समर्पक प्रश्नांवर आपण विचार करू?
८ पहिल्या शतकातही आत्मिक प्रकाश सातत्याने चमकत राहिला. पण त्या आरंभीच्या ख्रिश्चनांना यहोवाने आपल्या उद्देशांचा प्रत्येक पैलू स्पष्ट केला नाही. प्रेषित पौलाने पहिल्या शतकातील ख्रिस्ती बांधवांना असे लिहिले: “हल्ली आपल्याला [“धातूच्या,” NW] आरशात अस्पष्ट असे दिसते.” (१ करिंथकर १३:१२) या आरशातून सहसा प्रतिबिंब स्पष्टपणे दिसत नसे. त्याअर्थी पौल असे म्हणत होता, की सुरवातीला त्यांना आत्मिक प्रकाश पूर्णपणे दिसणार नाही. प्रेषितांच्या मृत्यूनंतर हा प्रकाश काही काळ मंदावला पण अलिकडच्या काळात शास्त्रवचनांचे ज्ञान अभूतपूर्वरित्या वृद्धिंगत झाले आहे. (दानीएल १२:४) आज यहोवा कशाप्रकारे आपल्या लोकांना सत्याचा प्रकाश देत आहे? शास्त्रवचनांविषयी आपल्याला तो अधिक समज देतो तेव्हा आपली प्रतिक्रिया कशी असावी?
प्रकाश उत्तरोत्तर वाढत जातो
९. आरंभीच्या बायबल विद्यार्थ्यांनी बायबलचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या खास आणि परिणामकारक पद्धतीचा उपयोग केला?
९ आधुनिक काळात प्रकाशाची पहिली किरणे १९ व्या शतकाच्या शेवटच्या पंचवीस वर्षांदरम्यान दिसू लागली. या सुमारास ख्रिस्ती स्त्री-पुरुषांच्या एका गटाने मोठ्या उत्साहाने शास्त्रवचनांचा सखोल अभ्यास करण्यास सुरवात केली. त्यांनी बायबलचा अभ्यास करण्याची एक सोयीस्कर पद्धत शोधून काढली. एकाने प्रश्न विचारायचा; मग सर्वजण मिळून त्या विषयाला समर्पक असणारी सर्व शास्त्रवचने पडताळून पाहत व त्यांचा अभ्यास करीत. दोन शास्त्रवचनांत विरोधाभास वाटल्यास, हे प्रामाणिक ख्रिस्ती अभ्यासक त्या दोन वचनांचा परस्पर संबंध समजून घेण्याचा प्रयत्न करीत. त्याकाळातल्या धर्मपुढाऱ्यांपेक्षा ते फार वेगळे होते; कारण या बायबल अभ्यासकांनी (त्याकाळी यहोवाच्या साक्षीदारांना या नावाने
ओळखले जात असे) केवळ बायबलचे मार्गदर्शन स्वीकारण्याचा निर्धार केला होता; परंपरांच्या किंवा मनुष्यनिर्मित सिद्धान्तांच्या आधारावर त्यांना चालायचे नव्हते. विशिष्ट विषयावर बायबलमधील सर्व पुराव्यांना विचारात घेतल्यावर ते आपल्या निष्कर्षांची नोंद करून ठेवत. अशाच प्रकारे बऱ्याच मूलभूत बायबल तत्त्वांसंबंधी असलेले त्यांचे गैरसमज दूर झाले.१०. बायबल अभ्यासाला सहायक ठरतील असे कोणते ग्रंथ चार्ल्स टेझ रस्सल यांनी लिहिले?
१० या बायबल अभ्यासकांपैकी एक उल्लेखनीय व्यक्ती म्हणजे चार्ल्स टेझ रस्सल. त्यांनी बायबल अभ्यासाला सहायक ठरतील असे सहा ग्रंथ लिहिले होते; या ग्रंथसंग्रहाचे नाव होते स्टडीज इन द स्क्रिप्चर्स. रस्सल, यहेज्केल व प्रकटीकरण या बायबलच्या दोन पुस्तकांचे स्पष्टीकरण करणारा एक सातवा खंडही लिहिण्याच्या विचारात होते. “मला या कुलपाची चावी सापडेल तेव्हा मी सातवा खंड लिहीन.” असे ते म्हणाले होते. पण त्यांनी पुढे असेही म्हटले होते, की “प्रभूने चावी आणखी कोणाला दिली तर त्याने हा ग्रंथ लिहावा.”
११. देवाचे उद्देश समजण्याशी वेळेचा काय संबंध आहे?
११ सी. टी. रस्सल यांनी केलेल्या या विधानावरून बायबलच्या विशिष्ट भागांच्या स्पष्टीकरणाविषयी एक महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट होतो—योग्य वेळ. रस्सल यांना माहीत होते, की प्रवासाला निघालेला माणूस जसा वेळेआधी सूर्योदय घडवून आणू शकत नाही, त्याचप्रमाणे योग्य वेळ येण्याआधी प्रकटीकरणाच्या पुस्तकाचा उलगडा करण्यास ते असमर्थ होते.
उलगडा झाला—पण देवाच्या नियुक्त वेळी
१२. (अ) बायबलच्या भविष्यवाणीचा अर्थ अगदी स्पष्टपणे केव्हा कळून येतो? (ब)बायबलच्या भविष्यवाणीचा अर्थ आपल्याला देवाच्या नियुक्त वेळीच स्पष्ट होतो हे कोणत्या उदाहरणावरून कळून येते? (तळटीप पाहा.)
१२ ज्याप्रकारे प्रेषितांना मशीहाशी संबंधित असणाऱ्या बऱ्याच भविष्यवाण्यांचा अर्थ येशूचा मृत्यू व पुनरुत्थान झाल्यानंतरच स्पष्ट झाला, त्याचप्रमाणे, आज देखील ख्रिश्चनांना बायबलमधील भविष्यवाण्यांचा अचूक खुलासा त्या भविष्यवाण्या पूर्ण झाल्यावरच होतो. (लूक २४:१५, २७; प्रेषितांची कृत्ये १:१५-२१; ४:२६, २७) प्रकटीकरण हे भविष्य वर्तवणारे पुस्तक आहे आणि त्यामुळे त्यात वर्णन केलेल्या घटना जसजशा घडत जातील तसतसा त्यांचा अर्थ अधिक स्पष्टपणे आपल्याला कळेल. उदाहरणार्थ, सी. टी. रस्सल यांना साहजिकच प्रकटीकरण १७:९-११ येथे उल्लेख करण्यात आलेल्या लाक्षणिक किरमिजी रंगाच्या श्वापदाचा अर्थ कळला नसेल; कारण ते श्वापद ज्या संघटनांचे प्रतिक आहे त्या संघटना अर्थात लीग ऑफ नेशन्स आणि संयुक्त राष्ट्रसंघ रस्सल यांच्या मृत्यूनंतरच अस्तित्वात आल्या. *
१३. बायबलच्या एखाद्या विशिष्ट विषयावर प्रकाश टाकण्यात येतो तेव्हा सहसा काय घडते?
१३ आरंभीच्या ख्रिश्चनांना जेव्हा कळले की सुंता न झालेले विदेशी देखील त्यांचे सह उपासक बनू शकत होते तेव्हा साहजिकच, या विदेशी लोकांनाही सुंता करावी लागेल का असा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे प्रेषित आणि वडीलवर्ग यांनी एकत्र जमून सुंतेच्या विषयाचा अगदी तपशीलवार अभ्यास केला. आजही सहसा असेच घडते. बायबलच्या एखाद्या विषयावर जेव्हा अचानक प्रकाश पडतो तेव्हा देवाचे अभिषिक्त सेवक, ‘विश्वासू व बुद्धिमान दास,’ त्या विषयाशी निगडित असणाऱ्या इतर विषयांचा सखोल अभ्यास करायला प्रवृत्त होतात. या संदर्भात अलीकडचे एक उदाहरण लक्षात घ्या.—मत्तय २४:४५.
१४-१६. आत्मिक मंदिराच्या संबंधाने आपल्या दृष्टिकोनात बदल झाल्यामुळे यहेज्केल ४०-४८ अध्यायांविषयी आपली जी समज आहे तिच्यावर कशाप्रकारे परिणाम झाला?
१४ “द नेशन्स शॅल नो दॅट आय ॲम जेहोवा”—हाउ? नावाच्या १९७१ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात यहेज्केलच्या भविष्यवाणीचे स्पष्टीकरण करण्यात आले होते. या पुस्तकातल्या एका अध्यायात यहेज्केलच्या मंदिराच्या दृष्टान्ताबद्दल संक्षिप्त चर्चा करण्यात आली होती. (यहेज्केल, अध्याय ४०-४८) त्यावेळी, यहेज्केलच्या मंदिराच्या दृष्टान्ताची नव्या जगात कशाप्रकारे पूर्णता होईल यावर या चर्चेचा रोख होता.—२ पेत्र ३:१३.
१५ परंतु, टेहळणी बुरूजच्या डिसेंबर १, १९७२ अंकात प्रकाशित झालेल्या दोन लेखांतील माहितीचा, यहेज्केलच्या दृष्टान्ताचा आपण जो अर्थ घेतो त्यावर परिणाम झाला. प्रेषित पौलाने इब्री लोकांस पत्र यातील १० व्या अध्यायात वर्णन केलेल्या भव्य आत्मिक मंदिराविषयी या दोन लेखांत चर्चा यहेज्केल अध्याय ४०-४८ चे पुन्हा परीक्षण करण्यात आले तेव्हा हे स्पष्ट झाले की ज्याप्रकारे आत्मिक मंदिर आज कार्यरत आहे त्याचप्रमाणे यहेज्केलच्या दृष्टान्तातले मंदिर देखील आज कार्यरत असले पाहिजे. कशाप्रकारे?
करण्यात आली होती. टेहळणीबुरूज यात असे स्पष्टीकरण देण्यात आले, की आत्मिक मंदिराचे पवित्रस्थान आणि आतील अंगण अभिषिक्त जन पृथ्वीवर असतानाच्या त्यांच्या स्थितीला सूचित करते. यानंतर अनेक वर्षांनी जेव्हा१६ यहेज्केलच्या दृष्टान्तात, याजकांच्या वंशांत नसलेल्या इस्राएल लोकांची सेवा करणारे याजक मंदिराच्या अंगणात ये-जा करताना दिसतात. हे याजक अर्थातच ‘राजकीय याजकगणाला’ म्हणजेच यहोवाच्या अभिषिक्त सेवकांना सूचित करतात. (१ पेत्र २:९) तथापि, ते ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्याच्या संपूर्ण काळात मंदिराच्या अंगणात अर्थात पृथ्वीवर सेवा करणार नाहीत. (प्रकटीकरण २०:४) हजार वर्षांचा पूर्ण नाही तरी, अधिकांश काळ ते आत्मिक मंदिराच्या परमपवित्रस्थानात, म्हणजे “प्रत्यक्ष स्वर्गात” देवाची सेवा करतील. (इब्री लोकांस ९:२४) यहेज्केलच्या मंदिरातील अंगणांत याजक ये-जा करताना दिसतात त्याअर्थी या दृष्टान्ताची पूर्णता सध्याच्या काळात, म्हणजे अभिषिक्तांपैकी काहीजण अद्याप पृथ्वीवर असतानाच होत असावी. यानुसार टेहळणीबुरूज मार्च १, १९९९ अंकात या विषयावर सुधारित दृष्टिकोन सादर करण्यात आला. अशाप्रकारे २० व्या शतकाच्या अगदी शेवटापर्यंत देखील यहेज्केलच्या भविष्यवाणीवर आत्मिक प्रकाश पडतच होता.
दृष्टिकोनात बदल करण्यास तयार असा
१७. सत्याचे ज्ञान मिळाल्यापासून तुम्ही स्वतःच्या विचारसरणीत कोणकोणते बदल केले आहेत आणि याचा तुम्हाला कशाप्रकारे लाभ झाला आहे?
१७ सत्याचे ज्ञान घेऊ इच्छिणाऱ्यांनी ‘प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास’ तयार असले पाहिजे. (२ करिंथकर १०:५) हे नेहमीच सोपे जाते असे नाही; खासकरून आधीचे दृष्टिकोन आपल्या मनात पक्के बसलेले असतात तेव्हा ते बदलणे जड जाते. उदाहरणार्थ, देवाविषयीचे सत्य शिकण्याआधी तुम्ही कदाचित आपल्या कुटुंबासोबत मोठ्या आनंदाने काही धार्मिक सण साजरे करत असाल. पण बायबलचा अभ्यास करू लागल्यानंतर तुम्हाला जाणीव झाली असेल की या सणांची सुरवात खरे पाहता खोट्या धर्मापासून झाली आहे. हे शिकल्यानंतर लगेच त्यानुसार वागणे कदाचित सुरवातीला तुम्हाला कठीण गेले असेल. पण शेवटी, धार्मिक भावनांपेक्षा यहोवा देवावर असलेले प्रेम बलवत्तर ठरले आणि तुम्ही देवाला पसंत नसणाऱ्या सणासुदींमध्ये भाग घेण्याचे सोडून दिले. तुमच्या या निर्णयावर यहोवाने आशीर्वाद दिला नाही का?—पडताळा इब्री लोकांस ११:२५.
१८. बायबल सत्यावर प्रकाश टाकण्यात येतो तेव्हा आपण कशी प्रतिक्रिया दाखवावी?
१८ देवाच्या मार्गाने चालल्यामुळे आपला नेहमी फायदाच होतो. (यशया ४८: १७, १८) म्हणूनच, बायबलमधील एखाद्या भागाचा अधिक स्पष्टपणे खुलासा करण्यात येतो तेव्हा आपण प्रकाशाच्या वृद्धीबद्दल आनंद व्यक्त केला पाहिजे! आपल्याला सातत्याने प्रकाश मिळत आहे यावरून खरे तर हेच सिद्ध होते की आपण सत्याच्या मार्गावर आहोत. हा “धार्मिकांचा मार्ग” आहे, जो “मध्यान्हापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदयप्रकाशासारखा आहे.” (नीतिसूत्रे ४:१८) अद्यापही देवाच्या उद्देशाचे काही पैलू आपल्याला ‘अंधूक दिसतात’ हे खरे आहे. पण देवाची नियुक्त वेळ आल्यावर आपल्याला सत्याचा प्रत्येक पैलू अगदी स्पष्टपणे दिसेल; अर्थात, आपण ‘मार्गावर’ शेवटपर्यंत टिकून राहिलो तरच. तोपर्यंत, आपण यहोवाने आपल्यापुढे प्रगट केलेल्या सत्यांबद्दल आनंद मानू आणि अद्याप स्पष्टपणे न समजलेल्या गोष्टींवर तो प्रकाश टाकेपर्यंत प्रतीक्षा करू.
१९. सत्याबद्दलची ओढ आपण कशाप्रकारे दाखवू शकतो?
१९ यहोवाकडून येणारा आत्मिक प्रकाश आपल्याला हवाहवासा वाटतो हे दाखवण्यासाठी आपण काय करू शकतो? हे दाखवण्याचा सर्वात प्रमुख मार्ग म्हणजे देवाचे वचन नियमित—शक्यतो रोज वाचणे. तुम्ही नियमित बायबल वाचता का? टेहळणीबुरूज व सावध राहा! या नियतकालिकांतून देखील
अतिशय हितकारक आध्यात्मिक अन्न मुबलक प्रमाणात पुरवले जाते. शिवाय, आपल्या आध्यात्मिक लाभासाठी कितीतरी पुस्तके, माहितीपत्रके, आणि इतर प्रकाशने तयार करण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त, यहोवाच्या साक्षीदारांचे वार्षिक पुस्तक यात देखील राज्याच्या प्रचाराशी संबंधित अनेक उत्तेजन देणारे अहवाल प्रकाशित केले जातात, ते तुम्ही वाचता का?२०. यहोवाकडून येणारा प्रकाश व सत्य यांचा ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्याशी कसा संबंध आहे?
२० खरोखर, स्तोत्र ४३:३ येथे दिलेल्या प्रार्थनेचे यहोवाने मोठ्या विलक्षणरित्या उत्तर दिले आहे. याच वचनाच्या शेवटी आपण असे वाचतो: ‘तुझा प्रकाश व तुझे सत्य तुझ्या पवित्र डोंगरावर, तुझ्या निवासस्थानी मला पोहंचवोत.’ यहोवाच्या हजारो लाखो उपासकांसोबत त्याची उपासना करण्याची तुम्हालाही उत्कंठा वाटत नाही का? यहोवा आज ज्या प्रमुख मार्गाने आत्मिक प्रकाश देत आहे तो म्हणजे ख्रिस्ती सभांतून मिळणारे आध्यात्मिक गोष्टींचे शिक्षण. ख्रिस्ती सभांचे महत्त्व ओळखून त्यानुसार कार्य करण्यासाठी आपण काय करू शकतो? पुढच्या लेखात कृपया या विषयावर प्रार्थनापूर्वक विचार करा.
[तळटीपा]
^ परि. 12 सी. टी. रस्सल यांच्या मृत्यूनंतर यहेज्केल व प्रकटीकरण या पुस्तकांचे स्पष्टीकरण करण्याकरता एका ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले; या ग्रंथाला स्टडीज इन द स्क्रिप्चर्सचा सातवा खंड मानण्यात आले. रस्सल यांनी या दोन पुस्तकांवर केलेल्या भाष्यांच्या आधारावर या खंडाचा काही भाग तयार करण्यात आला. तरीसुद्धा, या विशिष्ट भविष्यवाण्यांचा अर्थ स्पष्ट करण्याची योग्य वेळ अद्याप आलेली नव्हती आणि त्यामुळे स्टडीज इन द स्क्रिप्चर्सच्या या सातव्या खंडात दिलेली माहिती अस्पष्ट होती. पुढच्या काही वर्षांत, यहोवाच्या अगाध कृपेमुळे आणि विशिष्ट जागतिक घटनांमुळे ख्रिश्चनांना या भविष्यसूचक पुस्तकांचा अर्थ अधिक स्पष्टपणे समजला.
तुम्हाला उत्तर देता येईल का?
• यहोवा आपले उद्देश क्रमाक्रमाने का प्रगट करतो?
• सुंतेविषयी उठलेला वाद प्रेषितांनी आणि जेरूसलेमच्या वडिलांनी कशाप्रकारे मिटवला?
• सुरवातीच्या बायबल विद्यार्थ्यांनी बायबलचा अभ्यास करण्याकरता कोणत्या पद्धतीचा अवलंब केला आणि यात कोणती विशेषता होती?
• देवाच्या नियुक्त वेळी आत्मिक प्रकाश कशाप्रकारे प्रगट करण्यात येतो हे उदाहरण देऊन सांगा.
[अभ्यासाचे प्रश्न]
[१२ पानांवरील चित्र]
प्रकटीकरणाच्या पुस्तकावर देवाच्या नियुक्त वेळी प्रकाश टाकण्यात येईल याची चार्ल्स टेझ रस्सल यांना खात्री होती