“तुम्हाला बायबलचं पुष्कळ ज्ञान आहे”
राज्य घोषकांचा वृत्तान्त
“तुम्हाला बायबलचं पुष्कळ ज्ञान आहे”
यरुशलेमेतल्या धार्मिक पुढाऱ्यांशी १२ वर्षांचा येशू न घाबरता बोलत होता तेव्हा, “त्याचे बोलणे जे ऐकत होते, ते सर्व त्याच्या बुद्धीवरून व उत्तरावरून थक्क झाले.” (लूक २:४७) त्याचप्रमाणे, आज देखील यहोवाची सेवा करत असलेले तरुण त्यांच्या शिक्षकांना आणि शाळेतील मित्रांना यहोवा देवाविषयी आणि बायबलविषयी सांगण्याचे धैर्य करतात; व बहुतेकदा त्यांनाही अशाच आनंदाची प्रचिती होते.
टिफनी ही १४ वर्षांची मुलगी आहे. तिच्या वर्गात एके दिवशी चर्चा चालली होती. त्या चर्चेत दानीएलच्या भविष्यवाणीचा उल्लेख आला. दानीएल ९:२४-२७ वचनांतील ७० सप्तकांच्या भविष्यवाणीबद्दल सांगत असताना, सरांनी काही वचनांची थोडीफार माहिती दिली आणि त्यांनी लगेच विषय बदलला.
सुरवातीला, हात वर करून काही सांगण्यास टिफनी घाबरत होती. पण ती म्हणते: “सरांनी वचनांची चांगल्याप्रकारे फोड करून सांगितली नाही हे पाहिल्यावर मला राहावलं नाही आणि पटकन् मी हात वर केला.” टिफनीला या विषयावर काही सांगायचं आहे हे पाहून तिच्या सरांना आश्चर्य वाटलं कारण बाकी सर्व विद्यार्थ्यांना तो विषय समजण्यास खूपच कठीण होता.
तिच्या सरांनी तिला भविष्यवाणीबद्दल सांगायची संधी दिली. टिफनी उभी राहिली आणि अशी बोलू लागली जणू तिला या विषयावर बोलायचं आहे हे तिला आधीच माहीत होतं. तिचं बोलणं संपलं तेव्हा सर्वजण अगदी शांत बसले होते. हे पाहून टिफनी घाबरली. पण मग सर्वांनी टाळ्या वाजवून तिची खूप प्रशंसा केली.
“वा छान! टिफनी तू तर कमाल केलीस!” असं तिच्या सरांनी खूपदा तिला बोलून दाखवलं. या वचनांवर आणखी स्पष्टीकरण असल्याची पक्की खात्री आपल्याला होती असे सरांनी कबूल केलं, पण टिफनी त्यांना इतक्या चांगल्याप्रकारे फोड करून सांगेल असा त्यांनी विचारही केला नव्हता. वर्गाच्या शेवटी सरांनी तिला विचारलं, “तुला बायबलविषयी इतकी माहिती कशी?”
तिनं उत्तर दिलं “मी एक यहोवाची साक्षीदार आहे आणि या भविष्यवाणीचा अर्थ मला स्पष्ट समजावा म्हणून माझ्या आईबाबांनी कित्येक वेळा मला ती समजावून सांगितली होती.”
बायबलविषयी तिला किती माहिती आहे हे पाहून तिच्या सर्व वर्गमित्रांनाही खूप आश्चर्य वाटलं. तिची एक मैत्रिण तिला म्हणाली: “तुम्ही यहोवाचे साक्षीदार सर्वांच्या घरोघरी का जाता ते मला आता कळलं. तुम्हाला बायबलचं पुष्कळ ज्ञान आहे, म्हणून.” वर्गातील दुसऱ्या मुलांनी तिला वचन दिलं की ते तिला तिच्या धार्मिक विश्वासांबद्दल पुन्हा कधीही चिडवणार नाहीत.
टिफनीनं तिचा हा अनुभव तिच्या आईबाबांना सांगितला तेव्हा त्यांनी तिला सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे पुस्तक आपल्या सरांना देण्यास सुचवलं. तिनं ते पुस्तक सरांना दिलं आणि दानीएलच्या भविष्यवाणीचं स्पष्टीकरण जिथं दिलं आहे तो भाग त्यांना दाखवला तेव्हा त्यांनी लगेच ते पुस्तक घेतलं व तिचे आभार मानले.
खरंच, ख्रिस्ती युवक यहोवा आणि बायबलविषयी त्यांच्या पालकांनी शिकवलेल्या गोष्टी इतरांना धैर्याने सांगतात तेव्हा ते यहोवाची स्तुती करत असतात व त्याला आदर देत असतात. सोबतच त्यांनाही आशीर्वाद मिळतात.—मत्तय २१:१५, १६