व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नात्सी जुलमाखाली असताना विश्‍वासू व निडर

नात्सी जुलमाखाली असताना विश्‍वासू व निडर

नात्सी जुलमाखाली असताना विश्‍वासू व निडर

जून १७, १९४६ रोजी नेदरलंडच्या राणीने ॲम्स्टरडॅममधील यहोवाच्या साक्षीदारांच्या एका कुटुंबाला शोकसंदेश पाठवला. दुसऱ्‍या महायुद्धाच्या वेळी याकोप वन बेनकोम या त्यांच्या मुलाला नात्सींनी ठार मारले होते. या मुलाने दाखवलेल्या धैर्याची प्रशंसा करण्याकरता तिने हा शोकसंदेश पाठवला होता. काही वर्षांपूर्वी, नेदरलँड्‌सच्या पूर्व भागातील डूटिखम येथील नगर परिषदेने एका मार्गाचे नामकरण, बर्नाड पोलमन मार्ग असे करण्याचे ठरवले. बर्नाड पोलमन देखील यहोवाच्या साक्षीदारांपैकी होता व त्यालाही युद्धादरम्यान ठार मारण्यात आले होते.

पण नात्सींनी नेदरलंडमध्ये दुसऱ्‍या महायुद्धादरम्यान याकोप, बर्नाड आणि इतर यहोवाच्या साक्षीदारांना जिवे मारण्याचे कारण काय होते? आणि कोणत्या गोष्टीमुळे हे साक्षीदार कित्येक वर्षांच्या क्रूर छळांमध्येही विश्‍वासू राहू शकले व देशवासीयांकडून व राणीकडून आदर व प्रशंसा मिळवू शकले? या प्रश्‍नांचे उत्तर मिळण्याकरता आपण काही घटनांचा विचार करू या. सुरवातीला पाहू या की नात्सींच्या शक्‍तिशाली संघटनेसोबत यहोवाच्या साक्षीदारांच्या लहानशा गटाचा मुकाबला कशाप्रकारे सुरू झाला.

बंदी असतानाही सक्रिय

मे १०, १९४० रोजी नात्सी सैन्याने नेदरलँड्‌सवर अचानक हल्ला केला. यहोवाचे साक्षीदार ज्या साहित्यांचे वितरण करत होते त्यात, नात्सींची दुष्ट कार्ये उघडकीस आणली होती; तसेच कोणतीही मानवी संस्था नव्हे तर देवाचे राज्यच शांती आणेल असे या साहित्यात स्पष्ट करण्यात आले होते. यामुळे साहजिकच नात्सींनी साक्षीदारांचे कार्य थांबवण्याचा प्रयत्न सुरू केला. नात्सींनी नेदरलँड्‌सवर हल्ला करून अद्याप तीन आठवडेही झाले नव्हते तोच यहोवाच्या साक्षीदारांवर बंदी आणण्याचा गुप्त हुकूम जारी करण्यात आला. मार्च १०, १९४१ रोजी एका बातमीपत्रकामुळे बंदीची बातमी सर्वांना कळाली. या बातमीपत्रात, “सर्व राज्ये व चर्च संस्थांविरुद्ध” साक्षीदारांनी मोहीम काढली आहे असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. यामुळे साक्षीदारांना हुडकून काढण्याचे काम जोराने सुरू झाले.

एक गोष्ट मात्र आश्‍चर्याची आहे, नात्सींच्या गेस्टापो किंवा गुप्त पोलिसांनी सर्व चर्चेसवर पहारा ठेवला होता परंतु ते फक्‍त एकाच ख्रिस्ती संघटनेचा क्रूररीतीने छळ करीत होते. “फक्‍त एकाच धार्मिक गटाच्या लोकांचा, अर्थात फक्‍त यहोवाच्या साक्षीदारांचा अगदी मरेपर्यंत छळ चालला होता,” असे डच इतिहासकार डॉ. लुई द याँग, हेट कोनींकराईक दर नेदरलाँडन ईन दी ट्‌वेड वेरल्डोरलॉख (दुसऱ्‍या महायुद्धादरम्यानच्या काळातील नेदरलँड्‌सचे राज्य) या आपल्या पुस्तकात म्हणतात.

साक्षीदारांना हुडकून काढून त्यांना अटक करण्यात गेस्टापोंबरोबर डच पोलिसही सामील होते. शिवाय, पूर्वी यहोवाच्या साक्षीदारांमध्ये प्रवासी पर्यवेक्षक म्हणून काम केलेला एक जण छळाला घाबरला व धर्मत्यागी बनला आणि तो नात्सींना साक्षीदारांची माहिती देऊ लागला. १९४१ च्या एप्रिल महिन्यापर्यंत ११३ साक्षीदारांना अटक करण्यात आली. पण यामुळे प्रचार कार्य थांबले का?

जर्मन झिखरहाईट्‌सपोलित्झाय (सुरक्षा पोलिस) यांनी एप्रिल १९४१ मध्ये तयार केलेल्या मेलडुंगन आउस डेन निदरलाँडन (नेदरलंडचे अहवाल) नामक एका अधिकृत गोपनीय दस्तऐवजात या प्रश्‍नाचे उत्तर मिळते. यहोवाच्या साक्षीदारांविषयी तो अहवाल असे म्हणतो: “या निषिद्ध पंथाचे, संपूर्ण देशात अगदी जोरदारपणे कार्य चालले आहे, हा पंथ बेकायदेशीर सभा भरवतो व ‘देवाच्या साक्षीदारांना छळणे एक गुन्हा आहे,’ व ‘छळ करणाऱ्‍यांचा यहोवा सार्वकालिक नाश करील,’ अशा घोषवाक्यांची छापील पत्रके ते सगळीकडे चिकटवत आहेत.” दोन आठवड्यांनंतर याच सूत्राने अशी बातमी दिली की, “बायबल विद्यार्थ्यांच्या कार्यांविरुद्ध सुरक्षा पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत तरीसुद्धा त्यांचे कार्य मात्र वाढतच चालले आहे.” अटक होण्याचा धोका असतानाही साक्षीदारांनी त्यांचे कार्य चालू ठेवले. फक्‍त एका वर्षात, म्हणजे १९४१ या वर्षी त्यांनी ३,५०,००० साहित्यांचे वाटप केले होते!

सुरवातीला फक्‍त मूठभर असलेल्या परंतु नंतर वाढत चाललेल्या साक्षीदारांना त्यांच्या भयानक शत्रूंविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य कोठून मिळाले? प्राचीन काळचा विश्‍वासू संदेष्टा यशया याच्यासारखे साक्षीदारांना देखील मनुष्याचे नव्हे तर देवाचे भय होते. कारण यहोवाने यशयाला दिलेल्या या आश्‍वासनावर त्यांचा दृढ विश्‍वास होता: “तुमचे सांत्वन करणारा मी, केवळ मीच आहे; तू मर्त्य मनुष्याला, तृणवत मानवपुत्राला भितेस अशी तू कोण?”—यशया ५१:१२.

निडरतेने आदर मिळवून दिला

अटक केलेल्या साक्षीदारांची संख्या १९४१ च्या अंतापर्यंत २४१ इतकी वाढली होती. परंतु फक्‍त मोजक्यांनीच मनुष्यांना भिऊन आपला विश्‍वास त्यागला. जर्मन गुप्त पोलिसांमध्ये कुप्रसिद्ध असलेल्या विली लॉगसने असे म्हटल्याचा उल्लेख आहे की, “९० टक्के यहोवाच्या साक्षीदारांनी खूप सहन केले पण बिलकुल तोंड उघडले नाही. तेच इतर धार्मिक गटांच्या बाबतीत पाहिले तर जास्तीत जास्त लोक मुळीच शांत राहू शकले नाहीत.” योहानस जे. बस्कस नामक एक डच पाळक देखील लॉगस यांच्या शब्दांना पुष्टी देतात. या पाळकालाही साक्षीदारांबरोबर तुरुंगात टाकण्यात आले होते. १९५१ मध्ये बस्कस यांनी असे लिहिले:

“तेव्हा मला साक्षीदारांचा देवावरील भरवसा आणि त्यांच्या विश्‍वासाच्या शक्‍तीचा खूप आदर वाटायचा. हिटलर आणि नात्सी हुकूमशाहीचा पाडाव होईल अशा आशयाची पत्रके वाटणारा एक तरुण मुलगा मला अजूनही आठवतो. तो जास्तीतजास्त १९ वर्षांचा असेल. . . . साक्षीदारांचे कार्य यापुढे आपण करणार नाही असे जर त्याने लिहून दिले असते तर सहा महिन्यातच त्याची सुटका झाली असती. परंतु त्याने असे करण्यास अगदी ठामपणे नकार दिला व यामुळे त्याला जर्मनीत अमर्यादित काळासाठी सक्‍त मजुरीची शिक्षा देण्यात आली. आता तो पुन्हा कधीच परत येणार नाही हे आम्हा सगळ्यांना चांगल्याप्रकारे माहीत होते. दुसऱ्‍या दिवशी सकाळी त्याला नेले जात होते तेव्हा आम्ही त्याला भेटायला गेलो. मी त्याला म्हणालो, तुला आम्ही कधीच विसरणार नाही; मी तुझ्यासाठी प्रार्थना करेन. त्याने मला फक्‍त इतकेच उत्तर दिले: ‘माझी काळजी करू नका. देवाचं राज्य नक्की येईल.’ अशा स्थितीत, यहोवाच्या साक्षीदारांच्या शिकवणी आपल्याला पटत नसल्या तरीसुद्धा ते शब्द कधीच विसरता येत नाहीत.”

साक्षीदारांचा इतका क्रूररीतीने विरोध होत होता तरीपण त्यांची संख्या मात्र वाढतच चालली होती. दुसऱ्‍या महायुद्धाच्या आधी फक्‍त ३०० साक्षीदार होते परंतु १९४३ मध्ये त्यांची संख्या १,३७९ पर्यंत गेली होती. पण, त्याच वर्षाच्या अंताला अटक करण्यात आलेल्या ३५० पेक्षा अधिक साक्षीदारांपैकी ५४ साक्षीदार वेगवेगळ्या छळ छावण्यांमध्ये मरण पावले होते. आणि १९४४ पर्यंत नेदरलँड्‌सहून १४१ साक्षीदार होते जे अजूनही छळ छावण्यातच अडकून पडले होते.

नात्सींच्या छळाचे शेवटले वर्ष

जून ६, १९४४ या दिवशी ब्रिटन, कॅनडा व अमेरिका या मित्र राष्ट्रांनी जर्मनीवर हल्ला केला; जर्मनीच्या पराभवाची ही सुरवात होती आणि साक्षीदारांच्या छळाचेही ते शेवटले वर्ष होते. सैनिकीदृष्ट्या, नात्सी आणि त्यांचे साथीदार कोंडित सापडले होते. अशा परिस्थितीत तरी नात्सी निष्पाप ख्रिश्‍चनांचा छळ थांबवतील असा कोणी विचार करील. परंतु तसे झाले नाही. उलट त्या वर्षादरम्यान आणखी ४८ साक्षीदारांना अटक करण्यात आली आणि तुरुंगात असलेल्या आणखी ६८ साक्षीदारांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांच्यापैकी, आधी ज्याचा उल्लेख करण्यात आला आहे तो याकोप वन बेनकोम होता.

अठरा वर्षीय याकोप, १९४१ मध्ये यहोवाचे साक्षीदार म्हणून ज्यांचा बाप्तिस्मा झाला होता त्या ५८० लोकांपैकी एक होता. त्यानंतर काही काळातच त्याने त्याची चांगली नोकरी सोडून दिली कारण, नाहीतर, त्याला युद्धात सामील होऊन ख्रिस्ती तत्त्वांचे उल्लंघन करावे लागले असते. तो दुसरे एक काम करू लागला आणि त्याचबरोबर पूर्ण वेळेची प्रचारसेवा देखील करू लागला. एकदा बायबल साहित्यांची नेआण करताना त्याला पकडण्यात आले व तुरुंगात टाकण्यात आले. १९४४ सालच्या ऑगस्ट महिन्यात, २१ वर्षीय याकोपने रॉटरडम शहरातील तुरुंगातून आपल्या कुटुंबाला एक पत्र लिहिले:

“मी इथं अगदी बरा आहे आणि आनंदी पण आहे. . . . आतापर्यंत चार वेळा माझी चौकशी झाली. पहिल्या दोन वेळा चौकशी जरा कडकच होती. मला चांगलंच मारण्यात आलं, पण प्रभूच्या शक्‍तीमुळे व कृपेमुळे मी आतापर्यंत तरी कसलीही माहिती दिलेली नाहीये. . . . मी इथं आतापर्यंत एकूण सहा भाषणे दिली; १०२ लोक भाषण ऐकायला आले होते. यांच्यातील काहींनी आवड दाखवली आहे आणि तुरुंगातून सुटका मिळताच तेही अभ्यास करतील असं त्यांनी मला वचन दिलं आहे.”

सप्टेंबर १४, १९४४ रोजी याकोपला ॲमर्सफूर्ट नावाच्या एका डच शहरातील छळछावणीत नेण्यात आले. तेथेही तो प्रचार करत राहिला. कसे काय? त्याच्याबरोबर असलेल्या एका कैद्याने सांगितले: “गाड्‌र्स जेव्हा सिगारेट पिऊन टाकायचे तेव्हा कैदी ते तुकडे उचलायचे आणि बायबलच्या पानांमध्ये तो गुंडाळून त्याची सिगारेट करून प्यायचे. मग कधीकधी याकोप काय करायचा, कैद्यांनी त्या पानाचं सिगारेट बनवण्याआधी त्यांच्याकडून तो ती पानं मागून घ्यायचा आणि त्यावरील शब्द वाचून घ्यायचा. आणि वाचलेल्या शब्दांच्या आधारावर दुसऱ्‍यांना प्रचार करायचा. त्यामुळे याकोपला आम्ही सर्वांनी ‘बायबल-मॅन’ असं नाव ठेवलं.”

याकोपला १९४४ सालच्या ऑक्टोबर महिन्यात इतर पुष्कळ कैद्यांबरोबर रणगाडे अडकवण्याच्या उद्देशाने छुपे खड्डे खणण्याचा हुकूम देण्यात आला. हे काम एकप्रकारे युद्धाचेच काम असल्यामुळे याकोपचा विवेक त्याला ते करायला अनुमती देत नव्हता, म्हणून त्याने ते करायला स्पष्ट नकार दिला. संरक्षक त्याला वारंवार धमकी देत राहिले पण तो मात्र घाबरला नाही. ऑक्टोबर १३ तारखेला एका अधिकाऱ्‍याने त्याला एकान्त कोठडीतून खड्डे खणायचे काम जेथे चालले होते तेथे नेले. यावेळी सुद्धा याकोपने नकार दिला. शेवटी याकोपला स्वतःची कबर खोदण्याची आज्ञा देण्यात आली व तेथेच त्याला ठार मारण्यात आले.

साक्षीदारांची शिकार चालूच

याकोप आणि इतर साक्षीदारांची निडरता पाहून नात्सींची तळपायाची आग मस्तकाला पोहंचली. ते इतर साक्षीदारांच्या मागावर निघाले. त्यांचे लक्ष १८ वर्षीय एवर्ट केटलॉरेवर होते. सुरवातीला एवर्ट त्यांच्या नजरेतून निसटून लपून बसला पण शेवटी त्याला अटक झालीच. इतर साक्षीदारांची माहिती देण्याकरता त्याला खूप झोडपण्यात आले. पण त्याने तोंडातून ब्र काढला नाही. मग त्यांनी त्याला जर्मनीतील कामगार छावणीत पाठवले.

त्याच महिन्यात म्हणजे १९४४ सालच्या ऑक्टोबर महिन्यात पोलीस, एवर्टचा मेव्हणा, बर्नाड ल्यूम्स याच्या मागे लागले. तो सापडला तेव्हा तो इतर दोन साक्षीदारांबरोबर होता, ॲन्टोनी रेमेयर आणि अल्बर्टस बोझ. अल्बर्टस आधीपण १४ महिन्यांकरता छळछावणीत होता. तेथून सुटून आल्यावर तो पुन्हा आवेशाने प्रचार कार्य करू लागला होता. या तिघांना आधी नात्सींनी निर्दयीपणे झोडपले आणि नंतर मग गोळ्या झाडून ठार मारले. युद्धाच्या नंतरच त्यांचे शव सापडले आणि मग त्यांना पुन्हा एकदा त्यांना पुरण्यात आले. युद्धानंतर, अनेक स्थानिक बातमीपत्रकांनी या शिक्षेची बातमी छापली. एका बातमीपत्राने अशी बातमी दिली की, या तिघा साक्षीदारांनी, देवाच्या नियमांच्या विरुद्ध असलेल्या नात्सींचे कोणतेही काम करायला नकार दिला होता. ते बातमीपत्र पुढे असेही म्हणाले की “यासाठी त्यांना आपल्या प्राणाची किंमत मोजावी लागली.”

दरम्यानच्या काळात, नोव्हेंबर १०, १९४४ रोजी आधी ज्याचा उल्लेख करण्यात आला होता त्या बर्नाड पोलमनलाही अटक करण्यात आली व एका लष्करी प्रकल्पावर काम करायला पाठवण्यात आले. कामगारांपैकी फक्‍त तोच एकटा यहोवाचा साक्षीदार होता व फक्‍त त्यानेच हे काम करण्यास नकार दिला होता. संरक्षकांनी त्याचं मन वळवायला वेगवेगळ्या क्लृप्त्यांचा उपयोग केला. त्याला जेवण दिले जात नसे. दांडक्याने, फावड्याने आणि रायफलीच्या दांड्यानेही त्याला मारण्यात आले. एवढेच नव्हे तर त्याला गुडघ्याइतक्या थंड पाण्यातून चालवून नंतर एका दमट तळघरात टाकण्यात आले. तशाच ओल्या कपड्यांमध्ये त्याला रात्रभर ठेवले होते. पण बर्नाडने हार मानली नाही.

त्याच वेळेस, यहोवाच्या साक्षीदार नसलेल्या बर्नाडच्या दोन बहिणींना त्याला भेटायला परवानगी देण्यात आली. त्यांनीसुद्धा त्याला खूप सांगण्याचा प्रयत्न केला पण तो काही डगमगला नाही. आम्ही तुझ्यासाठी काही करू शकतो का, असे त्यांनी बर्नाडला विचारले असता तुम्ही घरी जाऊन बायबलचा अभ्यास करा असे तो म्हणाला. त्याचा छळ करणाऱ्‍यांनी मग त्याच्या पत्नीला भेटण्याची परवानगी दिली. ती तेव्हा गरोदर होती. आता ही तरी त्याला पटवेल असे त्यांना वाटले. परंतु तिच्या येण्यामुळे आणि प्रोत्साहनामुळे यहोवाला विश्‍वासू राहण्याचा बर्नाडचा निश्‍चय आणखीच पक्का झाला. नोव्हेंबर १७, १९४४ रोजी बर्नाडचा छळ करणाऱ्‍या पाच जणांनी इतर कामगारांच्या देखत त्याच्यावर गोळ्या झाडल्या. बर्नाड गतप्राण झाला होता तरीसुद्धा त्याच्यावर गोळ्या झाडण्यात येत होत्या. तिथला एक अधिकारी इतका संतापला होता, की त्याने आपली बंदूक काढली आणि बर्नाडच्या दोन्ही डोळ्यांत गोळ्या झाडल्या.

ज्या साक्षीदारांना या शिक्षेविषयी माहीत झाले त्यांना या निर्दयी वागणुकीचा धक्का बसला खरा परंतु ते विश्‍वासू व निडर राहिले आणि त्यांनी आपले ख्रिस्ती कार्य चालू ठेवले. बर्नाडला ज्या भागात ठार मारण्यात आले तेथेच जवळपास असलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या एका लहानशा मंडळीने या शिक्षेनंतर असा अहवाल दिला: “या महिन्यात, पावसाळी व वादळी हवामान होते आणि सैतानानं आमच्या मार्गात अनेक अडथळे आणले होते तरीसुद्धा आम्ही आमचं कार्य वाढवू शकलो. आमचे क्षेत्र सेवेचे तास ४२९ हून ७६५ इतके वाढले. . . . प्रचार करताना एक बांधव एका मनुष्याला चांगली साक्ष देऊ शकला. या मनुष्याने बांधवाला विचारले की, ज्याला ठार मारण्यात आले होते तोसुद्धा याच विश्‍वासाचा होता का? त्याला होय असे उत्तर मिळाले तेव्हा तो म्हणाला: ‘काय त्याचा विश्‍वास होता, मी तर त्याला महात्माच म्हणेन!’”

यहोवा आठवण करील

मे १९४५ मध्ये नात्सींचा पराभव झाला आणि नेदरलँड्‌समधून त्यांना हाकलण्यात आले. युद्धादरम्यान यहोवाच्या साक्षीदारांचा सतत छळ होत होता तरीदेखील त्यांची संख्या अडीचशे तीनशेपासून २,००० पर्यंत वाढली. या साक्षीदारांबद्दल बोलताना इतिहासकार डॉ. दी याँग कबूल करतात: “त्यांच्यातील बहुतेकांनी धमक्या आणि छळ होत होता तरी देखील आपला विश्‍वास नाकारला नाही.”

म्हणूनच तर काही लौकिक अधिकाऱ्‍यांनी, नात्सींच्या राजवटीत धैर्यशील भूमिका घेतलेल्या यहोवाच्या साक्षीदारांची आठवण केली आहे. याहूनही महत्त्वाचे म्हणजे, युद्धाच्या काळातील या साक्षीदारांनी कमावलेले अत्युत्तम नाव यहोवा देव आणि येशू कधीच विसरणार नाहीत. (इब्री लोकांस ६:१०) येशू ख्रिस्ताच्या येणाऱ्‍या हजार वर्षांच्या राजवटीत देवाच्या सेवेकरता आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या या विश्‍वासू व निडर साक्षीदारांना स्मृती कबरेतून उठवले जाईल व परादीस पृथ्वीवर अनंतकाळचे जीवन बहाल केले जाईल.—योहान ५:२८, २९.

[२४ पानांवरील चित्र]

याकोप वन बेनकोम

[२६ पानांवरील चित्र]

यहोवाच्या साक्षीदारांवर बंदी घातलेल्या हुकमाची बातमी

[२७ पानांवरील चित्रे]

उजवीकडे: बर्नाड ल्यूम्स; खाली: अल्बर्टस बोझ (डावीकडे) व ॲन्टोनी रेमियर; खाली: हिमस्टीड येथील संस्थेचे कार्यालय