व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबलच्या अक्षरांत गुप्त संदेश आहे का?

बायबलच्या अक्षरांत गुप्त संदेश आहे का?

बायबलच्या अक्षरांत गुप्त संदेश आहे का?

सन १९९५ मध्ये इस्राएलचे पंतप्रधान, इशाक रबीन यांची हत्या झाल्यानंतर सुमारे दोन वर्षांनी, मायकल ड्रोझनिन नावाच्या पत्रकाराने असा दावा केला की, पंतप्रधानांची हत्या होणार हे त्याला आधीच माहीत होते. त्याने सांगितले की, या हत्येविषयी बायबलच्या हिब्रू शास्त्रवचनांच्या अक्षरांमध्ये एक गुप्त संदेश देण्यात आला होता आणि त्याने कम्पुटरच्या साह्‍याने तो गुप्त संदेश प्राप्त केला होता. त्या पत्रकाराने असे म्हटले, की त्याने पंतप्रधानांना एक वर्षापूर्वीच याची पूर्वसूचना देण्याचा प्रयत्न केला होता पण त्याच्या बोलण्याकडे कोणी लक्षच दिले नाही.

आता अशी अनेक पुस्तके आणि लेख छापण्यात आले आहेत ज्यांमध्ये असा दावा करण्यात आला आहे, की या पत्रकाराला मिळालेला गुप्त संदेशच, बायबल देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आले आहे याचा सर्वात मोठा पुरावा आहे. पण मनात एक शंका येते की, बायबलच्या वचनांत खरोखरच अशाप्रकारचे काही गुप्त संदेश आहेत का? बायबल हे खरोखरचं देवाचे वचन आहे असा विश्‍वास ठेवण्याकरता त्यात काही गुप्त संदेश असणे आवश्‍यक आहे का?

ही नवी कल्पना?

बायबलमध्ये गुप्त संदेश आहेत असा दावा करण्याची ही कल्पना काही नवी नाही. कबाला म्हणजे तंत्र-मंत्र करणारे यहुदी पंथाचे लोक कित्येक शतकांपासून असे मानत आले आहेत. कबाला गुरूंचे म्हणणे आहे, की लोक बायबलचे वरवर वाचन करून त्याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करतात, पण खरे तर तसे केल्याने खरा अर्थबोध होत नाही. त्यांचे म्हणणे आहे, की देवाने हिब्रू बायबलच्या प्रत्येक अक्षरात कोणता ना कोणता गुप्त संदेश लपविला आहे. आणि आपण योग्य प्रकारे समजण्याचा प्रयत्न केल्यास आपल्याला त्यातील अनेक गूढ गोष्टींचे आकलन होऊ शकते. त्यांच्या मते, देवाने खूप विचारपूर्वकपणे बायबलमध्ये कोणते हिब्रू अक्षर कोणत्या ठिकाणी असावे हे ठरवून तसे लिहून घेतले आहे.

बायबलच्या अक्षरांवर संशोधन करणारा जेफरी सॅटिनोव्हर याच्या मते, मंत्र-तंत्र करणाऱ्‍या यहुद्यांचा असा विश्‍वास आहे, की सृष्टीचा इतिहास कळवण्याकरता उत्पत्तीच्या पुस्तकात देवाने ज्या अक्षरांचा उपयोग करून घेतला त्यांमध्ये अद्‌भुत जादुई शक्‍ती आहे. तो असे लिहितो: “उत्पत्तीचे पुस्तक म्हणजे सृष्टीचे केवळ वर्णन नाही, तर या पुस्तकातील अक्षरांचा उपयोग करून देवाने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली होती. दुसऱ्‍या शब्दांत सांगायचे झाल्यास सृष्टीच्या या पुस्तकात असा नकाशा देण्यात आला आहे ज्याच्या आधारावर देवाने सृष्टी तयार केली.”

तेराव्या शतकात सारागोसा, स्पेनमध्ये राहणारा एक कबाला रब्बी, बाक्या बेन एशर याने लिहिले, की त्याला उत्पत्तीच्या पुस्तकातून काही रहस्यमय गोष्टी कळाल्या. त्याचे म्हणणे आहे, की त्याने जेव्हा त्या भागात प्रत्येक ४२ व्या अक्षराला जोडून वाचले तेव्हा त्याला गुप्त संदेश मिळाला. गुप्त संदेश शोधण्याकरता बायबलच्या काही अक्षरांना गाळून वाचण्याच्या पद्धतीचा अद्यापही उपयोग केला जातो.

गुप्त संदेश “प्रकट” करण्याकरता कम्प्युटरचा उपयोग

कम्प्युटरचा अविष्कार होण्याआधी बायबलच्या प्रतीचा अशाप्रकारे अभ्यास करणे फार अवघड होते. ऑगस्ट १९९४ मध्ये स्टेटिस्टिकल सायन्स या पत्रिकेत एक लेख छापण्यात आला होता त्यात जेरुसलेमच्या हिब्रू युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर, एलीयाहू रिप्स आणि त्याच्यासोबत काम करणाऱ्‍या लोकांनी आश्‍चर्यकारक माहिती लोकांच्या समोर आणली. त्यांनी म्हटले, की उत्पत्तीच्या हिब्रू शास्त्रवचनांत त्यांना अनेक गुप्त संदेश मिळाले. जेव्हा त्यांनी उत्पत्ती पुस्तकाच्या अक्षरांमध्ये अंतर ठेवून आणि काही अक्षरे सोडून परीक्षण केले तेव्हा त्यांना त्या शास्त्रवचनांमध्ये ३४ प्रसिद्ध रब्बींची नावे मिळाली. शिवाय, त्यांनी या शास्त्रवचनामध्ये असलेल्या रब्बींच्या नावाच्या आसपास संशोधन केले तेव्हा त्यांचा जन्म आणि मृत्यू केव्हा झाला होता याविषयी पुष्कळ माहिती त्यांना मिळाली. * या माहितीत किती सत्य आहे हे शोधण्याकरता त्यांनी वारंवार उत्पत्तीच्या पुस्तकाचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी याविषयी एका पत्रिकेत छापले आणि म्हटले, की असे पूर्ण दाव्यानिशी म्हटले जाऊ शकते, की उत्पत्तीची ही माहिती योगायोगाने सांगण्यात आलेली नाही, तर देवाने हजारो वर्षांपूर्वीच ही माहिती अक्षरात दडवून ठेवली होती.

या पद्धतीचा उपयोग करून सुरवातीला उल्लेख केलेला पत्रकार ड्रोझनिन याने सुद्धा हिब्रू बायबलच्या पहिल्या पाच पुस्तकांतून गुप्त संदेश शोधण्याचा प्रयत्न केला. ड्रोझनिनचे असे म्हणणे आहे, की जेव्हा त्याने बायबलच्या शास्त्रवचनांना प्रत्येक ४,७७२ व्या अक्षराने जोडून वाचले, तेव्हा त्याला इशाक रबीन याचे नाव मिळाले. त्याने कम्प्युटरच्या मदतीने बायबल शास्त्रवचनांना अशा क्रमाने लिहिले, की प्रत्येक ओळीमध्ये ४,७७२ अक्षरे राहतील. मग त्याने ती अक्षरे वरून खाली अशा क्रमाने वाचली तेव्हा त्याला इशाक रबीन हे नाव मिळाले. त्यानंतर त्याने हे नाव आडवे वाचले तेव्हा त्याला अनुवाद ४:४२ वचन वाचायला मिळाले. ड्रोजनिन याने अनुवाद ४:४२ या वचनाचे भाषांतर असे केले: “एक खुनी जो खून करील.”

अनेक लोकांनी ड्रोझनिनच्या या गुप्त संदेशाचे खंडन केले, कारण अनुवाद ४:४२ अशा व्यक्‍तीविषयी सांगते ज्याच्या हातून चुकून खून झाला आहे. खंडन करणाऱ्‍यांचे म्हणणे आहे, की ड्रोझनिन याने हा गुप्त संदेश आपल्या मनाप्रमाणे शोधून काढला आहे आणि त्याच्या संदेशाला कोणताही शास्त्रीय आधार नाही. त्यांनी दावा केला, की अशाप्रकारे कोणत्याही पुस्तकातून गुप्त संदेश मिळवता येईल. पण, ड्रोझनिन याने आपला दावा मागे घेतला नाही उलट त्याने त्याचा विरोध करणाऱ्‍यांना आव्हान दिले: “माझे खंडन करणाऱ्‍यांनी जर पंतप्रधानांच्या हत्येविषयी मॉबी डिक नामक पुस्तकातून गुप्त संदेश शोधला, तर मी त्यांचे म्हणणे कबूल करीन.”

देवाच्या प्रेरणेचा पुरावा?

ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीमधील कम्प्युटर सायन्सचे प्रोफेसर, ब्रेन्डन मॅके याने ड्रोझनिन याचे आव्हान स्वीकारले. मॅके याने कम्प्युटरद्वारे ड्रोझनिनच्या पद्धतीचा उपयोग करून मॉबी डिक याच्या इंग्रजी पुस्तकाचे संशोधन केले. * मग त्याने असा दावा केला, की मॉबी डिक या पुस्तकामध्ये देखील इशाक रबीनच्या हत्येची “भविष्यवाणी” करण्यात आली आहे. त्याने असे म्हटले, की त्या पुस्तकात इंदिरा गांधी, मार्टिन लूथर किंग ज्युनियर, जॉन एफ. केनेडी, अब्राहम लिंकन अशा इतर अनेक लोकांच्या हत्येविषयी देखील “भविष्यवाणी” करण्यात आली आहे.

उत्पत्तीच्या हिब्रू शास्त्रवचनातून काही गुप्त संदेश शोधून काढला आहे असा दावा करणाऱ्‍या रिप्स आणि त्याच्या सोबत्यांचे देखील मॅके आणि त्यांच्या सहकार्यांनी खंडन केले. मॅके आणि त्यांच्या साथीदारांनी म्हटले, की गुप्त संदेश शोधणारे हे लोक खरे तर त्यांना हवा असलेला निष्कर्ष काढण्यासाठी मनाला वाटेल त्या पद्धतीचा उपयोग करतात. वास्तविकता हीच आहे, की देवाने शास्त्रवचनांमध्ये कोणत्याही प्रकारचा गुप्त संदेश लपवून ठेवलेला नाही. या गोष्टीवर विद्वानांमध्ये अजूनही दुमत आहे.

काही लोक दावा करतात, की “मानक” किंवा “मूळ” हिब्रू शास्त्रवचनामध्ये काही संदेश दडवण्यात आले आहेत. पण यामुळे एक प्रश्‍न निर्माण होतो, की मूळ हिब्रू शास्त्रवचन नेमके आहे तरी कोणते? रिप्स आणि त्याचे साथीदार म्हणतात, की त्यांनी “उत्पत्तीच्या अशा शास्त्रवचनांमध्ये संशोधन केले ज्यास सामान्यपणे मानक समजले जाते.” ड्रोझनिनचा दावा आहे: “आज आपल्याकडे जी कोणती जुनी हिब्रू बायबल आहेत, त्या सर्वांतील अक्षरे एकसमान आहेत.” पण हे सत्य आहे का? पहिली गोष्ट ही की आज हिब्रू बायबलचे कोणतेही शास्त्रवचन “मानक” नाही. आणि ज्या हस्तलिपींद्वारे हिब्रू बायबलची नक्कल करण्यात आली होती, त्या हस्तलिपी देखील एकदुसऱ्‍यापासून वेगळ्या होत्या. त्या हस्तलिपींमध्ये लिहिण्यात आलेल्या गोष्टी एक आहेत, पण त्या सर्वांमधील अक्षरे एकसमान नाहीत.

आजचे कित्येक हिब्रू बायबल लेनिनग्राड कोडेक्स नावाच्या हिब्रू हस्तलिपीवर आधारित आहेत. ही हस्तलिपी आजपर्यंतची सर्वात जुनी हस्तलिपी आहे जिची नकल मसोरा नामक यहुदी लेखकांनी सुमारे सा.यु. १००० मध्ये केली होती. पण, रिप्स आणि ड्रोझनिन याने कोरन नामक दुसऱ्‍या हस्तलिपीचे संशोधन केले. हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधील गणिताचे प्रोफेसर आणि ऑर्थोडॉक्स रब्बी, श्‍लॉमी स्टर्नबर्ग म्हणतात, की बायबलच्या लेनिनग्राड हस्तलिपीमध्ये आणि कोरन हस्तलिपीमध्ये तफावत आहे. “केवळ अनुवादाच्या पुस्तकात पाहिल्यास लेनिनग्राड हस्तलिपी आणि ड्रोजनिन याने उपयोग केलेल्या कोरन हस्तलिपीमध्ये ४१ अक्षरांचा फरक आहे.” डेड सी स्क्रोल्स्‌ (हस्तलिपी) यामध्ये लिहिण्यात आलेले बायबलचे काही भाग सुमारे २००० वर्षांपेक्षाही आधी लिहिण्यात आले आहेत. या हस्तलिपीमधील शुद्धलेखन (स्पेलिंग) मसोरा लेखकांच्या हस्तलिपींमधील शुद्धलेखनापेक्षा फार वेगळे आहे. काही हस्तलिपींमध्ये स्वरांना सूचित करण्याकरता अनेक अक्षरे जोडण्यात आली आहेत, कारण त्यावेळी स्वरांना सूचित करण्याकरता विरामचिन्हांचा उपयोग केला जात नसे. काही हस्तलिपींमध्ये इतर हस्तलिप्यांच्या तुलनेत कमी अक्षरे दिसून येतात. उपलब्ध असलेल्या सर्व हस्तलिप्यांची तुलना केल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट दिसून येते, की त्या सर्वांमध्ये एक समान गोष्ट सांगण्यात आली आहे. आणि त्याचवेळी हे देखील स्पष्ट होते, की त्या हस्तलिप्यांमध्ये वर्णरचना आणि अक्षरांची संख्या वेगवेगळी आहे.

कोणत्याही गुप्त संदेशाचा शोध घ्यायचा असेल तर त्यासाठी अशा हस्तलिपीची आवश्‍यकता आहे जिच्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. कारण हस्तलिपीमध्ये एका अक्षराचा जरी बदल झाला तर गुप्त संदेश योग्य पद्धतीने शोधून काढता येणार नाही आणि त्यामुळे जो काही निष्कर्ष काढला जाईल त्याचा चुकीचा अर्थ ठरेल. प्राचीन काळापासून बायबलच्या अनेक प्रती तयार करण्यात आल्या आहेत आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रतींमध्ये वेगवेगळी वर्णरचना आहे. याकारणास्तव, अक्षरांमध्ये गुप्त संदेश असण्याची शक्यताच उरत नाही. देवाला अक्षरांमध्ये किंवा वर्णरचनेमध्ये बदल होण्याची काळजी नाही. पण त्याने एका गोष्टीची पूर्ण काळजी घेतली आहे, की बायबलमध्ये सांगण्यात आलेला अर्थ कधी बदलू नये आणि तो अर्थ गुप्त न ठेवता सर्वांना समजावा.—यशया ४०:८; १ पेत्र १:२४, २५.

गुप्त संदेशाची आपल्याला आवश्‍यकता आहे का?

प्रेषित पौलाने स्पष्टपणे लिहिले: “प्रत्येक परमेश्‍वरप्रेरित शास्त्रलेख सद्‌बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्‍याकरिता उपयोगी आहे. ह्‍यासाठी की, देवाचा भक्‍त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.” (२ तीमथ्य ३:१६, १७) बायबलमध्ये देण्यात आलेले संदेश अगदी स्पष्ट आणि समजण्याजोगे आहेत. त्यामुळे बायबल समजणे आणि त्याचा अवलंब करणे इतके कठीण नाही, पण कित्येक लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. (अनुवाद ३०:११-१४) बायबलमध्ये भविष्यवाण्या गुप्त रूपामध्ये नव्हे, तर उघडपणे सांगण्यात आल्या आहेत. या भविष्यवाण्याच या गोष्टीचा पक्का पुरावा आहेत, की बायबल देवाच्या प्रेरणेने लिहीण्यात आले आहे. * गुप्त संदेशाप्रमाणे बायबलमधील भविष्यवाण्या कोणाच्या मनचे विचार नाहीत किंवा कोणाच्या “स्वतःच्या कल्पना” नाहीत.—२ पेत्र १:१९-२१.

प्रेषित पेत्राने लिहिले, की “चातुर्याने कल्पिलेल्या कथांस अनुसरून आम्ही आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य व आगमन ह्‍यासंबंधाने तुम्हास कळविले नाही.” (२ पेत्र १:१६) बायबलमधील गुप्त संदेश शोधण्याच्या संकल्पनेचा खरे तर तंत्र-मंत्र करणाऱ्‍या यहुदी पंथाशी संबंध आहे. हे लोक ‘चातुर्याने कल्पिलेले’ मार्ग अनुसरून देवाच्या प्रेरणेने स्पष्टपणे लिहिण्यात आलेल्या गोष्टींचा विपर्यास करून शिकवतात आणि लोकांना गोंधळात टाकतात. अशाप्रकारे गूढ अर्थ शोधून काढण्याच्या पद्धतीला हिब्रू शास्त्रवचनात देखील मनाई करण्यात आली आहे.—अनुवाद १३:१-५; १८:९-१३.

लोकांच्या मनच्या शिकवणी आणि कम्प्युटर यांच्या मदतीद्वारे अंदाज बांधून बायबलमधील गुप्त संदेश शोधण्याऐवजी, बायबलमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेल्या गोष्टींद्वारे निर्माणकर्त्याची चांगली ओळख करून घेण्याचा प्रयत्न करणे समंजसपणाचे नाही का? ही किती आनंदाची गोष्ट आहे, की बायबलमध्ये सर्व संदेश आणि मार्गदर्शन स्पष्टपणे देण्यात आले आहे आणि याद्वारे आपण देवाला जाणू शकतो.—मत्तय ७:२४, २५.

[तळटीपा]

^ परि. 9 हिब्रू भाषेत अक्षरांच्या मदतीद्वारे संख्यांविषयी माहिती प्राप्त केली जाऊ शकते. त्यामुळे ही तारीख संख्यांनी नव्हे, तर हिब्रू शास्त्रवचनातील अक्षरांद्वारे निश्‍चित करण्यात आली आहे.

^ परि. 13 हिब्रू लिपीमध्ये स्वर लिहिले जात नाहीत. वाचणारी व्यक्‍ती संदर्भानुसार शब्दांमध्ये स्वर जोडून वाचते. पण, वाचताना संदर्भ लक्षात न ठेवल्यास चुकीचा स्वर जोडला जाण्याची शक्यता असते आणि त्यामुळे चुकीचा अर्थ होऊ शकतो. पण, इंग्रजी भाषेमध्ये अक्षरांमध्ये स्वर लिहिले जातात त्यामुळे या भाषेतील अक्षरांना वगळून वाचणे आणि त्यातून गूढ अर्थ काढणे फार मुश्‍किल होते.

^ परि. 19 बायबल देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आले आहे, याविषयी आणि बायबलच्या भविष्यवाण्यांविषयी अधिक माहितीकरता वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी द्वारे प्रकाशित सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक पाहा.