व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

इजीअन समुद्रात माणसांची मासेमारी करणे

इजीअन समुद्रात माणसांची मासेमारी करणे

इजीअन समुद्रात माणसांची मासेमारी करणे

इजीअन समुद्र. भूमध्य समुद्राच्या पूर्वेला असलेला हा समुद्र अनेक लहानमोठ्या बेटांनी वेढलेला आहे. याच्या पश्‍चिमेस व उत्तरेस ग्रीस, दक्षिणेस क्रीट तर पूर्वेस तुर्कस्थान आहे. अनेक महान संस्कृतींचे हे उगमस्थान आहे. इजीअन समुद्राच्या वेगवेगळ्या आकाराच्या बेटांवर ठिकठिकाणी छोटछोटी श्‍वेत घरे विखुरलेली व उन्हामध्ये चमकत असल्याची दिसतात. अनेक कवींनी आपल्या कवितांमधून या रम्य ठिकाणांचे नेत्रसुखद दर्शन घडवले आहे.

ही बेटे प्रवाशांचे आकर्षण ठरल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी लोक जगाच्या कानाकोपऱ्‍यांतून येतात. ही बेटे जशी सुंदर आहेत तशी इथली लोकंही चांगली आहेत. ते मनमिळाऊ आहेत. लोकांचा पाहुणचार करायला त्यांना खूप आवडतं. पण ते आपल्याच मर्जीप्रमाणे चालणारे लोक आहेत. ही आहेत या बेटांची वैशिष्ट्ये!

येथे राहणाऱ्‍या अनेक लोकांचे पोट मासेमारीवर चालते. इजीअन समुद्रात त्यांना मासेमारीसाठी जावे लागते. परंतु या मासेमारी व्यतिरिक्‍त येथे आणखी एक प्रकारची ‘मासेमारी,’ अर्थात ‘माणसे धरण्याचे’ काम चालले आहे. म्हणजेच, लोकांना देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करून त्यांना ख्रिस्ताचे शिष्य बनवण्याचे काम चालले आहे.—मत्तय ४:१८, १९; लूक ५:१०.

सुमारे १९ शतकांआधी, काही ख्रिस्ती सुवार्तिक इजीअन समुद्राच्या बेटांवर आले होते. उदाहरणार्थ, सा.यु. ५६च्या जवळपास, प्रेषित पौलाने आपल्या तिसऱ्‍या मिशनरी दौऱ्‍यावरून परतत असताना, लेसवोस, खिया, सामा (सामोस) कोसा, व रुदास (रोड्‌स) या इजीअन समुद्राच्या काही बेटांना धावती भेट दिली. पौल एक आवेशी प्रचारक असल्यामुळे त्याने नक्कीच येथील लोकांना प्रचार केला असावा. (प्रेषितांची कृत्ये २०:१४, १५, २४; २१:१, २) रोममधील तुरुंगात दोन वर्ष घालवल्यानंतर पौल कदाचित क्रीट बेटावर आला व तेथे प्रचार करू लागला. पहिल्या शतकाच्या अंताला, प्रेषित योहानाला “देवाचे वचन व येशूविषयीची साक्ष ह्‍यांखातर” पात्म बेटावरील तुरुंगात टाकण्यात आले. (प्रकटीकरण १:९) परंतु आज या बेटांवर प्रचार करणाऱ्‍यांचे कसे चालले आहे?

प्रतिफलदायी प्रचार मोहिमा

ही लहानमोठी बेटे एकमेकांपासून बरीच दूर आहेत आणि त्यांच्यापर्यंत पोहंचणे इतके सोपे नाही. काही बेटांवर फार क्वचित जहाजे किंवा विमाने जातात, त्यांचा ठराविक वेळ नसतो. विशेषतः हिवाळ्यात तर मेलटेमया म्हणजे उत्तरेकडून जोराचे वारे वाहत असल्यामुळे नौकानयन अशक्य असते. आणि काही बेटांवरील गावे लांबलांब आहेत, तेथील रस्ते देखील कच्चे व धूळीने माखलेले असल्यामुळे प्रवास करायचा म्हटले की जिवावरच येते. शिवाय, काही गावांपर्यंत जायचे म्हटले तर लहान बोटीशिवाय पर्याय नसतो. अशा परिस्थितीत प्रचार करणे म्हणजे महाकठीण. त्यासाठी पुष्कळ कष्ट घ्यावे लागतात, त्याग करावे लागतात.

इकॉरियॉ बेटाचीच गोष्ट घ्या. तेथील मंडळीत इनमीन ११ प्रचारक. त्यामुळे त्यांना त्यांच्या आणि जवळपासच्या बेटांवर जाऊन सुवार्तेचा प्रचार करणे जमत नाही. त्यामुळे इकॉरियॉ, फुर्नी, पॅटमस आणि लिपसोस बेटांवर प्रचार करायला जवळच्याच सामोस बेटाहून बंधुभगिनी येतात. अलीकडेच अशाप्रकारच्या प्रचार कार्याची योजना करण्यात आली होती तेव्हा साक्षीदारांनी बायबलच्या वेगवेगळ्या विषयांवर ६५० नियतकालिके, ९९ माहितीपत्रके आणि २५ पुस्तके लोकांना वाचायला दिली. त्यांना असेही लोक भेटले ज्यांना यहोवाबद्दलची काडीमात्र माहिती नव्हती. त्यांनी त्यांना आणखी काही दिवस राहून बायबलची ज्यादा माहिती द्यावी अशी विनंतीही केली. एका स्त्रीने एका साक्षीदार बहिणीला असेही म्हटले: “आता तुम्ही तर चालला. माझे आणखी प्रश्‍न आहेत. कोण देईल त्यांची उत्तरं?” आपल्या बहिणीने तिला वचन दिलं की ती तिच्याबरोबर फोनवर नक्की चर्चा करेल. आणि अशाप्रकारे बहिणीने तिच्याबरोबर फोनवर बायबलचा अभ्यास सुरू केला.

इकॉरियॉत एकदा प्रवासी पर्यवेक्षक आले होते तेव्हा, त्यांनी शनिवार-रविवार या अवघ्या दोन दिवसांत संपूर्ण बेटावर प्रचार करायची योजना केली. त्यासाठी त्यांनी सामोसमधील मंडळीच्या ३० बंधुभगिनींची मदत घेतली. या बंधुभगिनींना दोन रात्री हॉटेलमध्ये राहावे लागणार होते व भाड्याने गाड्या घ्याव्या लागणार होत्या. हे सर्व ते स्वखर्चाने करायला तयार होते. पण, गुरूवारी आणि शुक्रवारी इतक्या जोराचा पाऊस सुरू झाला की थांबायचं नावच घेत नव्हता. शनिवार आणि रविवारी पाऊस थांबण्याचं काही चिन्हच दिसत नव्हते. पण बांधवांनी याला अडखळण न समजता उपदेशक ११:४ वचन लक्षात ठेवले. त्या वचनात म्हटले आहे: “जो वारा पाहत राहतो तो पेरणी करणार नाही; जो मेघांचा रंग पाहत बसतो तो कापणी करणार नाही.” शेवटी पाऊस जरासा उघडला तेव्हा बांधवांनी बेटावरील सर्वांना सुवार्ता ऐकवली. आणि मग आनंदाने सर्व बंधुभगिनी आपापल्या घरी गेले.

आन्द्रोस बेटावर राहणारे १६ प्रचारक संपूर्ण बेटावर प्रचार करायचा नेटाने प्रयत्न करीत आहेत. दोन बांधव एका दूर गावी गेले. त्या गावातील प्रत्येक व्यक्‍तीला साक्ष द्यायचीच असा पक्का विचार त्यांनी केला. सर्व ठिकाणी ते लोकांशी बोलू लागले. लोकांच्या घरी जाऊन, रस्त्यांवर, मळ्यांमध्ये एवढेच नव्हे तर पोलिस स्टेशनमध्येही जाऊन त्यांनी त्यांना वाचायला साहित्ये दिली. आपण सर्वांना सुवार्ता ऐकवल्याचे समाधान झाल्यावरच ते घरी निघाले. वाटेत त्यांनी पाहिले की एक ग्रीक ऑर्थडॉक्स पाळक त्यांच्या दिशेने येत होता. आपण या पाळकाला सुवार्ता सांगितली नाही असे या बांधवांना वाटल्यामुळे त्यांनी त्याला राज्य सुवार्ता हस्तपत्रिका दिली. पाळकाने अगदी आनंदाने ती स्वीकारली. आता तर गावातील प्रत्येक व्यक्‍तीला आपण सुवार्ता ऐकवल्याची या दोघा बांधवांना अगदी पक्की खात्री झाली!

क्रीट बेटाच्या कुशीत वसलेले गावदोस (कौदा) नावाचे एक लहानसे बेट आहे. येथे फक्‍त ३८ लोक राहतात. असे म्हटले जाते की हे बेट युरोपच्या दक्षिणेकडचे सर्वात शेवटले टोक आहे. (प्रेषितांची कृत्ये २७:१६) येथे एका प्रवासी पर्यवेक्षकांनी आपल्या पत्नीसह व आणखी एका जोडप्यासह तीन दिवस प्रचार केला. पैसे वाचवण्याकरता त्यांनी एक तंबू बनवला व त्यातच ते रात्रीचे झोपायचे. त्यांनी गावदोसच्या सर्व लोकांना सुवार्ता ऐकवली. लोकांनी पूर्वी यहोवाच्या साक्षीदारांबद्दल काही ऐकले नसल्यामुळे ते बंधुभगिनींचे ऐकण्यास चांगलेच उत्सुक होते. तेथील पाळकाने आणि इतर लोकांनी १९ पुस्तके व १३ माहितीपत्रके घेतली. मग आपले बंधुभगिनी एका लहानशा बोटीने परतीच्या प्रवासाला निघाले. प्रवासादरम्यान जोरदार वारा सुटला आणि मोठमोठ्या लाटाही येऊ लागल्या. आपल्या बंधुभगिनींच्या जीवाला धोका होता. परंतु कसेबसे ते यातून सुरक्षितरीत्या पार पडले. ते म्हणतात: “यहोवानं आम्हाला सुरक्षित आणल्याबद्दल व युरोपच्या दक्षिणेकडील टोकापर्यंत त्याच्या नावाचे गौरव करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही त्याचे मनःपूर्वक आभार मानतो.”

पॅटमस बेटावर प्रेषित योहानाने प्रकटीकरण हे बायबलचे शेवटले पुस्तक लिहिले. परंतु अगदी अलीकडेपर्यंत येथे एकही यहोवाचा साक्षीदार नव्हता. सामोसमधील बांधवांनी अगदी काळजीपूर्वकपणे, पॅटमस बेटावर प्रचार करण्याची एक योजना केली. या बेटावर ग्रीक ऑर्थडॉक्स चर्चची घट्ट पकड आहे. यामुळे सामोसच्या बांधवांना वाटत होते की येथील लोक कदाचित त्यांना चांगलाच विरोध करतील. तरीपण त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रचार करायची मोहीम आखली. प्रचार करत असताना दोघा बहिणींना एका स्त्रीने घरात बोलवले. आत गेल्यावर त्या स्त्रीचा पती त्या बहिणींना, “तुम्हाला आमच्या घरी कुणी पाठवलं?” असे सारखे विचारत होता. बहिणींनी त्याला सांगितले की त्या सर्वांच्या घरोघरी जात असल्यामुळे त्यांच्याही घरी आल्या होत्या. तिच्या पतीने पुन्हा एकदा विचारले: “तुम्हाला आमच्या शेजाऱ्‍यांनी तर पाठवले नाही ना?” पती असे सारखं सारखं का विचारत आहे याचं कारण त्या स्त्रीने बहिणींना सांगितले. ती त्यांना म्हणाली, की ती झायरेमध्ये होती तेव्हा यहोवाच्या साक्षीदारांना ओळखायची. ती पुढे म्हणाली “आणि, आज नेहमीप्रमाणे यहोवाला प्रार्थना करताना म्हणाले, की ‘यहोवा, कृपया या बेटावर कोणा साक्षीदाराला पाठव.’ माझी प्रार्थना ऐकून माझ्या नवऱ्‍याला खूप हसू आलं. परंतु तुम्ही माझ्या दारात आलात तेव्हा आम्हा दोघांनाही आश्‍चर्य वाटलं. म्हणून ते तुम्हाला सारखं सारखं विचारत होते की तुम्हाला आमच्या घरी कुणी पाठवलं.” या स्त्रीबरोबर लगेचच बायबलचा अभ्यास चालू करण्यात आला आणि जवळजवळ दहा महीने फोनद्वारे ती अभ्यास करीत राहिली. आपल्या बहिणीला आणि त्या स्त्रीलाही फोनवरून अभ्यास केल्याने खूप खर्च आला खरा, पण त्यांना त्याची पर्वा नव्हती. आता त्या स्त्रीने बाप्तिस्मा घेतला आहे व १,९०० वर्षांपूर्वी प्रेषित योहानाला जेथे एकांतवासाची शिक्षा देण्यात आली होती त्या पॅटमस बेटावर आज ती एकटीच साक्षीदार आहे.

धक्क्यांवर ‘मासेमारी’ करणे

उन्हाळ्यात, इजीअन बेटांवर जहाजांनी अनेक पर्यटक फिरायला येतात. त्यामुळे यहोवाच्या साक्षीदारांना अनेक राष्ट्रांच्या व भाषेच्या लोकांना प्रचार करण्याची अपूर्व संधी मिळते. तेथील मंडळ्या वेगवेगळ्या भाषांमध्ये बायबल साहित्य ठेवत असल्यामुळे प्रचारक पर्यटकांना हजारो नियतकालिके वाचायला देतात. काही जहाजे एकाच धक्क्यावर दर आठवडी येत असल्यामुळे बांधव जहाजांवर काम करणाऱ्‍यांना पुन्हा भेटू शकतात व कधीकधी तर त्यांच्याबरोबर बायबल अभ्यासही चालवू शकतात.

रोड्‌स बेटावर पूर्ण वेळची प्रचारक असलेल्या एका भगिनीने १९९६ सालच्या उन्हाळ्यात जमायकाच्या एका तरुणाला साक्ष दिली. तो एका समुद्रपर्यटक जहाजावर काम करत होता जे दर शुक्रवारी त्या धक्क्यावर यायचे. पुढील शुक्रवारी भगिनीने त्याला, त्या बेटावर होणाऱ्‍या प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले. अधिवेशनात पायनियर भगिनीने त्याला इंग्रजी बायबलमधून कार्यक्रमात सादर केली जाणारी बायबल सत्ये समजण्यास मदत केली. अधिवेशनात साक्षीदारांचे प्रेम व जिव्हाळा पाहून तो खूप प्रभावित झाला. पुढील शुक्रवारी त्याने दोन पायनियरांना आपल्या जहाजावर बोलावले. पायनियरांनी जातेवेळी आपल्यासोबत इंग्रजी व स्पॅनिश भाषेत साहित्ये नेली. त्यांची बॅग रिकामी व्हायला एक तासही लागला नाही! या तरुणाने उन्हाळा संपेपर्यंत दर शुक्रवारी अभ्यास केला. पुढील उन्हाळ्यात तो पुन्हा आला तेव्हा त्याने पुन्हा आपला अभ्यास सुरू केला. पण आता तो दुसऱ्‍या नोकरीच्या शोधात होता जेणेकरून त्याला अधिक आध्यात्मिक प्रगती करता येऊ शकेल. काही दिवसांनी तो पुन्हा गेला. आणि १९९८ च्या सुरवातीला या तरुणाने बाप्तिस्मा घेतला हे ऐकून रोड्‌सच्या सर्व बांधवांना किती आनंद झाला!

दुसऱ्‍या ठिकाणाहून आलेल्या माशांना पकडणे

टारली आणि स्वोर्डफिश दुसऱ्‍या ठिकाणाहून इजीअन समुद्रात विपुल प्रमाणात येतात आणि येथे मच्छिमारांच्या जाळ्यांत अडकतात. त्याचप्रकारे, राज्य सुवार्तिकांना, पूर्व युरोपातील देशांतून ग्रीस येथे राहायला आलेले अनेक आस्थेवाईक लोक भेटतात.

रेझीने दहा वर्षांची असताना अल्बेनियात टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांमध्ये यहोवा आणि त्याच्या उद्देशांविषयी वाचले होते. तीन वर्षांनंतर ती तिच्या कुटुंबासमवेत रोड्‌स येथे राहायला आली. एकदा रेझीने या नवीन ठिकाणी साक्षीदारांना भेटण्याविषयी यहोवाला प्रार्थना केली. दुसऱ्‍याच दिवशी तिच्या बाबांनी घरी येताना टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिके आणली. रेझीला काय आनंद झाला! ज्या बहिणीने रेझीच्या बाबांना ती मासिके दिली होती तिच्याशी तिने संपर्क साधला व लगेचच सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकातून अभ्यासाला सुरवात केली. कधीकधी तर ती एकाच दिवशी तीनदा अभ्यास करायला मागायची! दोन महिन्यांनंतर ती बाप्तिस्मारहित प्रचारक झाली आणि १९९८ च्या मार्च महिन्यात वयाच्या १४ व्या वर्षी तिने बाप्तिस्मा घेतला. तिच्या बाप्तिस्म्याच्या दिवशीच तिने सहायक पायनियरींग सुरू केले आणि सहा महिन्यांत ती नियमित पायनियर किंवा पूर्णवेळचे सेवक बनली!

कोस बेटावरील एक बांधव रशियाहून आलेल्या काही लोकांबरोबर अभ्यास करीत होता. बायबल अभ्यास करू इच्छिणारे तुमचे आणखी कोणी मित्र वगैरे आहेत का असे त्याने त्यांना विचारले तेव्हा त्यांनी त्याला एका अर्मेनियन जोडप्याकडे नेले. लिओनीदास आणि त्याची पत्नी ओफिलिया. हे जोडपे ३० किलोमीटर दूर असलेल्या एका गावात राहत होते. आपले बांधव त्यांच्याकडे गेले. आणि काय आश्‍चर्य! या जोडप्याने एक मोठी पिशवी आणली. त्यात वॉच टावर संस्थेने छापलेली अर्मेनियन व रशियन भाषेतील बायबल साहित्ये होती! ते म्हणाले, की ते यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास करीत होते व काही काळातच बाप्तिस्मारहित प्रचारक होणार होते. परंतु राजकीय व आर्थिक समस्यांमुळे त्यांना त्यांचा देश सोडावा लागला. कोस येथे आल्याबरोबर त्यांनी तेथेच राहणाऱ्‍या लिओनीदासच्या आईबरोबर आणि धाकट्या बहिणीबरोबर बायबलचा अभ्यास सुरू केला होता. अशाप्रकारे साक्षीदारांना आता अचानक तीन अभ्यास (ओफिलियाबरोबर, लिओनीदासबरोबर आणि लिओनीदासची आई व बहिणीबरोबर) घ्यायचे होते. अभ्यास घेणाऱ्‍या बांधवांना मोटारसायकलवर जाऊनयेऊन ६० किलोमीटरचा प्रवास आठवड्यातून तीनदा करावा लागणार होता. अभ्यास सुरू होऊन काही महिन्यांनंतर लिओनीदासचा त्याच्या पत्नीसह बाप्तिस्मा झाला. स्थानिक बांधवांनी दाखवलेल्या आत्म-त्यागाचे त्यांना किती उत्तम फळ मिळालं!

यहोवा कार्यावर आशीर्वाद देतो

इजीअन बेटांवरील २,००० पेक्षा अधिक असलेल्या सक्रिय राज्य घोषकांच्या अथक प्रयत्नांवर यहोवाचा आशीर्वाद आहे हे अगदी स्पष्ट दिसते. आता तेथे यहोवाच्या साक्षीदारांच्या ४४ मंडळ्या आणि २५ गट आहेत. यांपैकी १७ गट विदेशी भाषा बोलणाऱ्‍या लोकांचे आहेत, कारण “सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे” अशी यहोवाची इच्छा आहे. (१ तीमथ्य २:४) शिवाय, १३ खास पायनियर तिथल्या दूरवरच्या क्षेत्रांतील होता होईल तितक्या लोकांना भेटण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहेत.

अनेक शतकांपासून इजीअन समुद्राची बेटे सांस्कृतिक विकासाची व व्यापाराची केंद्रे राहिली आहेत. अलीकडच्या दशकांत ही बेटे प्रवाशांचे आकर्षण ठरली आहेत. परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे, “माणसे धरणारे” या नात्याने राज्य उद्‌घोषकांना या बेटांवर अनेक प्रांजळ मनाचे लोक आढळले आहेत जे यहोवाची स्तुती करू इच्छितात. हे सर्व लोक, “ते परमेश्‍वराचे गौरव करोत, द्वीपद्वीपांतरी त्याचा गुणानुवाद करोत,” ही भविष्यवाणी मोठ्या आवेशाने पूर्ण करत आहेत.—यशया ४२:१२.

[२२ पानांवरील नकाशा]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

इजीअन समुद्र

ग्रीस

लेसवोस

खिया

सामोस

इकॉरियॉ

फुर्नी

पॅटमस

कोसा

रोड्‌स

क्रीट

तुर्कू

[२३ पानांवरील चित्र]

लेसवोस बेट

[२४ पानांवरील चित्र]

पॅटमस बेट

[२४ पानांवरील चित्र]

क्रीट बेट