तुम्हाला आठवते का?
तुम्हाला आठवते का?
तुम्हाला टेहळणी बुरूजचे अलीकडचे लेख आवडले का? मग, पुढील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देता येतात का, ते पाहा:
• कोणत्या कारणामुळे कोरियामध्ये नाताळ सण इतक्या सहजासहजी लोकप्रिय झाला?
कोरियातील आणि इतर काही देशांतील लोक फार काळापासून स्वयंपाकघराच्या दैवतावर विश्वास करायचे. हा दैवत डिसेंबर महिन्यात धुराड्यातून येतो आणि खूप बक्षिसे देऊन जातो असा लोकांचा विश्वास होता. शिवाय, दुसऱ्या महायुद्धानंतर, अमेरिकन सैनिक बक्षिसे वाटायचे व स्थानिक चर्चला आर्थिक हातभार लावायचे.—१२/१५, पृष्ठे ४, ५.
• यशया २१:८ च्या पूर्णतेनुसार, आज आपल्या काळात देवाने कोणत्या ‘पहारेकऱ्याला’ नेमले आहे?
आत्म्याने अभिषिक्त असलेले ख्रिश्चन ‘पहारेकऱ्याचे’ काम करत आहेत. त्यांनी जागतिक घटनांचा वेध घेऊन बायबलमधील त्यांच्या भविष्यसूचक अर्थाचा खुलासा केला आहे. त्यांनी बायबल विद्यार्थ्यांना अशास्त्रवचनीय सिद्धान्त व प्रथा ओळखून त्या टाळण्यासही मदत केली आहे.—१/१, पृष्ठे ८, ९.
• “पोलिश बांधव” कोण होते?
तो पोलंडमध्ये १६ व्या आणि १७ व्या शतकातील एक लहानसा धार्मिक गट होता. हा गट बायबलचे काटेकोरपणे पालन करायचा. त्यामुळे या गटाच्या लोकांनी त्रैक्य, बाळांचा बाप्तिस्मा आणि नरकाग्नी यांसारख्या चर्च शिकवणी नाकारल्या. कालांतराने या गटाच्या लोकांचा खूप छळ झाला आणि त्यांना दुसऱ्या देशांत पळून जाणे भाग पडले.—१/१, पृष्ठे २१-३.
• भविष्य सांगणारे लोक किंवा ज्योतिषी यांच्यापेक्षा बायबलच्या भविष्यवाण्यांवर आपण जास्त भरवसा का ठेवू शकतो?
स्वतःला संदेष्टे म्हणवून घेणारे लोक यहोवाकडे आणि बायबलकडे लक्ष देत नाहीत. मात्र, बायबलच आपल्याला अमुक घटना देवाच्या उद्देशांनुरूप कशा आहेत ते समजण्यास मदत करू शकते. आणि याचा कायमस्वरूपी फायदा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला होऊ शकतो.—१/१५, पृष्ठे ३.
• आपण ‘शेवटल्या काळात’ जगत आहोत याचे कोणते खात्रीदायक पुरावे आहेत?
सैतानाची स्वर्गातून हाकलपट्टी झाल्याचा परिणाम आपण प्रत्यक्ष पाहात आहोत. (प्रकटीकरण १२:९) आपण प्रकटीकरण १७:९-११ येथील भविष्यवाणीत उल्लेख करण्यात आलेल्या आठव्या आणि शेवटल्या ‘राजाच्या’ काळात जगत आहोत. ख्रिस्ताच्या खऱ्या अभिषिक्त शिष्यांची संख्या कमी होत चालली आहे; पण असे दिसून येते की, मोठे संकट सुरू होईल तेव्हा यांपैकी काही पृथ्वीवरच असतील.—१/१५, पृष्ठे १२, १३.
• हबक्कूकचे पुस्तक केव्हा लिहिण्यात आले व त्यातील वचनांचा अर्थ समजून घेण्यास आपण उत्सुक का असावे?
बायबलमधील हे पुस्तक सा.यु.पू. ६२८ मध्ये लिहिण्यात आले. त्यात प्राचीन यहुदा आणि बॅबिलोनविरुद्ध यहोवाच्या न्यायदंडांविषयी सांगितले आहे. सध्याच्या दुष्ट व्यवस्थीकरणावरही येणाऱ्या ईश्वरी न्यायदंडाविषयी आपल्याला त्यात वाचायला मिळते.—२/१, पृष्ठ ८.
• सद्गुणी पत्नींसाठी एका आईचा सुज्ञ सल्ला आपल्याला बायबलमध्ये कोठे सापडतो?
बायबलमधील नीतिसूत्रे पुस्तकाच्या शेवटल्या अध्यायात अर्थात ३१ व्या अध्यायात आपल्याला हा उत्तम सल्ला मिळेल.—२/१, पृष्ठे ३०, ३१.
• यहोवाने आपल्याला “ख्रिस्ताचे मन” कसे आहे ते प्रकट केल्याबद्दल आपण त्याचे आभार का मानू शकतो? (१ करिंथकर २:१६)
शुभवर्तमानांच्या अहवालांतून यहोवाने आपल्याला येशूचे विचार, त्याच्या भावना, त्याची कार्ये आणि त्याने कोणत्या गोष्टींना प्राथमिकता दिली या गोष्टींची ओळख करून दिली. यामुळे आपण होता होईल तितका येशूप्रमाणे होण्याचा प्रयत्न करू शकतो आणि खासकरून जीवन वाचवणाऱ्या प्रचार कार्यावर जास्त भर देऊ शकतो.—२/१५, पृष्ठे २५.
• देव आज प्रार्थना ऐकतो का?
होय. देव प्रत्येक विनंती मान्य करीत नाही असे बायबल म्हणत असले तरीसुद्धा, ज्या लोकांनी सांत्वन मिळण्यासाठी प्रार्थना केल्या आणि वैवाहिक समस्या सोडवण्याकरता मदत मागितली त्या लोकांच्या प्रार्थना देवाने ऐकल्या आहेत हे आधुनिक दिवसांतील अनुभवांवरून दिसून येते.—३/१, पृष्ठे ३-७.
• देवाचे सामर्थ्य मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो?
आपण प्रार्थनेत यहोवाला त्यासाठी विनंती करू शकतो, बायबलमधून आध्यात्मिक शक्ती मिळवू शकतो आणि ख्रिस्ती बांधवांच्या संगतीद्वारे शक्ती मिळवू शकतो.—३/१, पृष्ठे १५, १६.
• आपल्या मुलांना ख्रिस्ती सभांचा पुरेपूर फायदा घेता यावा म्हणून पालक त्यांना मदत कशी करू शकतात?
काही आईवडील आपल्या मुलांना सभांना येण्याआधी काही वेळ झोपायला लावतात; असे केल्यामुळे ते राज्य सभागृहात येतात तेव्हा अगदी ताजेतवाने आणि तल्लख असतात. त्यांना “नोट्स” घेण्याचे प्रोत्साहन दिले जाऊ शकते. “यहोवा,” “येशू” किंवा “देवाचे राज्य” यांसारखे ओळखीचे शब्द कानावर पडतात तेव्हा ही मुले आपल्या वहीत एक विशिष्ट खूण करू शकतात.—३/१५, पृष्ठे १७, १८.
• ईयोबाच्या उदाहरणावरून आपण कोणत्या गोष्टी शिकू शकतो?
ईयोबाने देवासोबतच्या नातेसंबंधाला सर्वात जास्त महत्त्व दिले. सहमानवांबरोबर त्याने योग्य व्यवहार केला. आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहायचा त्याने नेटाने प्रयत्न केला. आपल्या कुटुंबाच्या आध्यात्मिकतेची त्याला काळजी होती आणि परिक्षेत असताना तो शेवटपर्यंत विश्वासू राहिला.—३/१५, पृष्ठे २५-७.
• बायबलच्या अक्षरांमध्ये काही गुप्त संदेश आहेत का?
नाही. बायबलच्या अक्षरांमध्ये गुप्त संदेश आहे असा दावा करणे चुकीचे आहे, कारण कोणत्याही लौकिक पुस्तकांविषयी असा दावा केला जाऊ शकतो. शिवाय, भिन्नभिन्न हिब्रू हस्तलिप्यांमध्ये भिन्नभिन्न शब्द वापरण्यात आले आहेत. यावरून हेच सिद्ध होते, की बायबलच्या अक्षरांमध्ये कोणतेही गुप्त संदेश दडलेले नाहीत.—४/१, पृष्ठे ३०, ३१.