व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाचे अभिवचन—“पाहा, मी सर्व गोष्टी नवीन करितो”

देवाचे अभिवचन—“पाहा, मी सर्व गोष्टी नवीन करितो”

देवाचे अभिवचन—“पाहा, मी सर्व गोष्टी नवीन करितो”

“राजासनावर बसलेला म्हणाला: पाहा, मी सर्व गोष्टी नवीन करितो. तो म्हणाला, . . . ही वचने विश्‍वसनीय व सत्य आहेत.”प्रकटीकरण २१:५.

१, २. लोक भविष्याविषयी अंदाज बांधायला किंवा भविष्य सांगणाऱ्‍यांवर लगेच विश्‍वास ठेवायला तयार का होत नाहीत?

‘उद्याचा काय भरवसा? उद्या काय होईल काही सांगता येत नाही.’ बहुतेक वेळा लोकांच्या तोंडून तुम्ही हे शब्द ऐकले असतील किंवा तुम्ही स्वतः देखील कधी असे म्हटले असेल. पण, भविष्य सांगणे मनुष्याच्या हाती नाही. त्यामुळे उद्याचा अंदाज बांधण्याच्या फंदात लोक सहसा पडत नाहीत आणि खात्रीने भविष्य सांगणाऱ्‍या लोकांवर विश्‍वास ठेवायला ते लगेच तयार होत नाहीत. होय, येणाऱ्‍या महिन्यांत किंवा वर्षांत काय होईल हे कोणीही अचूकपणे सांगू शकत नाही.

फोर्ब्स एएसएपी नावाच्या एका प्रसिद्ध मासिकाने “समय” या विषयावर एक खास अंक प्रकाशित केला. यामध्ये नामांकित टीव्ही समाचार-संपादक, रॉबर्ट क्रिंगली यांनी लिहिले: “समयासमोर तर सर्वांनाच लाजीरवाणे व्हावे लागते. पण भविष्य सांगणाऱ्‍यांना मात्र समयासमोर तोंडघशी पडावे लागते. भविष्याविषयी अंदाज बांधणे हा असा खेळ आहे ज्यामध्ये जवळजवळ प्रत्येक वेळी मनुष्याचीच हार होते. . . . तरीसुद्धा भविष्य सांगणाऱ्‍यांनी भविष्य सांगण्याचा नाद सोडला नाही.”

३, ४. (अ) काही लोकांना साल २००० विषयी काय वाटते? (ब) पण बहुतेक लोक भविष्याविषयी कोणती वास्तविकता मान्य करतात?

साल २००० मुळे लोक भविष्याच्या विषयात रस घेऊ लागले आहेत. जानेवारी १९९९ मध्ये मॅकलिन्स नावाच्या एका मासिकात असे म्हटले होते: “सन २००० हे इतर कोणत्याही वर्षांप्रमाणेच एक सर्वसाधारण वर्ष आहे. . . . पण कॅनडामधील बहुतेक लोकांना असे वाटते, की या वर्षी नवनवीन बदल होतील, सर्वकाही कसे आपोआप सुधारेल.” कॅनडातील यॉर्क युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक क्रिस डुड्‌नी यांनी म्हटले होते: “साल २००० मध्ये प्रवेश केल्याने अतिशय भयानक आणि क्रूर शतकापासून आपली एकदाची सुटका होईल.”

पण, बहुतेक लोकांना असे वाटत नाही हे कॅनडामध्ये केलेल्या एका सर्व्हेवरून दिसून येते. कारण केवळ २२ टक्के लोक असे “मानतात, की साल २००० नंतर जगामध्ये नवीन आणि क्रांतीकारी बदल घडून येतील आणि त्यानंतर मग सर्वकाही नवीन होईल.” खरे तर, या सर्व्हेतील निम्म्या अधिक लोकांनी असे म्हटले, की पुढील ५० वर्षांमध्ये “आणखी एक विश्‍वयुद्ध” होण्याची शक्यता आहे. यावरून हे स्पष्ट होते, की साल २००० मध्ये आपल्या सर्व समस्या सुटतील आणि सर्वकाही आपोआप नवीन होईल असे बहुतेकांना वाटत नाही. ब्रिटनच्या रॉयल सोसायटीचे भूतपूर्व अध्यक्ष, वैज्ञानिक मायकल आटियाह यांनी लिहिले: “टेक्नॉलॉजीमध्ये अतिशय वेगाने बदल होत आहेत . . . आणि त्यामुळे एकविसाव्या शतकात संपूर्ण जगासमोर अतिशय मोठमोठ्या आणि गंभीर समस्या उभ्या ठाकतील. पण, आपल्याला अद्याप हटवता आला नाही असा समस्यांचा एक मोठा डोंगर आजही आपल्यासमोर आहे. उदाहरणार्थ, वाढती लोकसंख्या, निसर्गाचा विध्वंस, प्रदूषण, विलक्षण वेगाने वाढणारी गरिबी. या सर्व समस्या सोडवण्यासाठी आपल्याला लवकरात लवकर पावले उचलली पाहिजेत.”

५. आपल्याला भविष्याविषयी अचूक माहिती कुठे मिळू शकते?

तुम्हाला कदाचित असे वाटेल, ‘उद्या काय होईल हे मनुष्याला सांगता येत नाही, मग कशाला भविष्याविषयी वार्ता करायची?’ पण उद्या काय होईल याकडे ‘दुर्लक्ष’ करून खरोखरच चालेल का? नाही, मुळीच नाही! हे मान्य आहे, की उद्या काय होईल हे मानवाला अचूकपणे सांगता येत नाही, पण भविष्यात होणाऱ्‍या गोष्टींविषयी सांगणे कोणालाच शक्य नाही असा त्याचा अर्थ होत नाही. तर मग, भविष्याबद्दल आपल्याला अचूकपणे कोण सांगू शकेल? आणि आपले भविष्य उज्ज्वल असेल असा विश्‍वास आपण का केला पाहिजे? या प्रश्‍नांची उत्तरे आपल्याला चार खास भविष्यवाण्यांमध्ये मिळतात. असंख्य लोक सहज वाचू शकतील अशा एका पुस्तकात त्या भविष्यवाण्या लिहिल्या आहेत; पण कित्येकजण त्या पुस्तकाकडे बारकाईने लक्ष देत नाहीत केवळ वाचायचे म्हणून वाचतात; काहींच्या मनात तर या पुस्तकाविषयी बरेच गैरसमज आहेत. ते पुस्तक म्हणजे बायबल. बायबलविषयी तुमचे वैयक्‍तिक मत कोणतेही असो किंवा बायबलचे तुम्हाला कितीही ज्ञान असो; त्यातील चार भविष्यवाणींवर विशेष लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे; किंबहुना, त्यांवरच तुमचे जीवन अवलंबून आहे. या चार महत्त्वपूर्ण भविष्यवाण्यांमध्ये एका उज्ज्वल भविष्याचे अभिवचन देण्यात आले आहे. त्यांवरून तुमचे आणि तुमच्या प्रियजनांचे भविष्य कसे असेल हे देखील अचूकपणे सांगता येण्यासारखे आहे.

६, ७. यशयाची भविष्यवाणी केव्हा लिहिण्यात आली, ती पूर्ण होण्याआधी काय घडले आणि ही भविष्यवाणी कशी पूर्ण झाली?

यशयाच्या ६५ अध्यायाच्या १७-१९ वचनांत आपल्याला पहिली भविष्यवाणी वाचायला मिळते. ती भविष्यवाणी वाचण्याआधी ती केव्हा लिहिण्यात आली, भविष्यवाणी पूर्ण होण्याआधी काय घडले आणि तिची कशी पूर्णता झाली याकडे लक्ष द्या. यशया या देवाच्या संदेष्ट्याने यहूदा राष्ट्राचा विनाश झाला त्याच्या शंभरपेक्षा अधिक वर्षांपूर्वीच ही भविष्यवाणी लिहिली होती. बॅबिलोनच्या सैन्यांनी यहूदाच्या राजधानीचा, जेरुसलेमचा पूर्णपणे नाश केला आणि यहूद्यांना गुलाम बनवून नेले तेव्हा हा विनाश आला होता. त्या लोकांनी यहोवाला सोडून दिले होते, ते भ्रष्ट झाले होते त्यामुळे यहोवाने त्यांच्यावर हा नाश येऊ दिला. हे सर्व झाल्यानंतर यशया ६५:१७-१९ मधील भविष्यवाणी पूर्ण झाली.—२ इतिहास ३६:१५-२१.

पण, ही भविष्यवाणी कशी पूर्ण झाली ते पाहू या. यशयाने हे आधीच भाकीत केले होते, की पारसाचा राजा, कोरेश बॅबिलोनला ताब्यात घेईल. आणि आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे या राजाचा जन्म होण्याआधीच यशयाने त्याचे नावही सांगितले होते. (यशया ४५:१) भविष्यवाणीनुसार कोरेशने बॅबिलोनला आपल्या ताब्यात घेतले आणि यहुदी लोकांची बंदिवासातून सुटका केली; त्यामुळे सा.यु.पू ५३७ मध्ये त्यांना आपल्या मायदेशी परत जाता आले. यहुदी आपल्या मायदेशी परतले आणि यशया ६५:१७-१९ मधील भविष्यवाणी पूर्ण झाली. या भविष्यवाणीमध्ये, यहुदी लोकांना मायदेशी स्थायिक झाल्यानंतर जो आनंद अनुभवण्यास मिळणार होता त्यावर विशेष जोर देण्यात आला.

८. यहुद्यांच्या भविष्याविषयी यशयाने काय म्हटले आणि आता आपण कोणत्या शब्दांवर खास लक्ष देणार आहोत?

आता आपण यशया ६५:१७-१९ येथील भविष्यवाणी वाचू या: “पाहा, मी नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करितो; पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत; परंतु जे मी उत्पन्‍न करितो त्याने तुम्ही सदा आनंदी व्हा व उल्लास पावा; पाहा, मी यरुशलेम उल्लासमय, तिचे लोक आनंदमय करितो. मी यरुशलेमेविषयी उल्लास पावेन, माझ्या लोकांविषयी आनंद पावेन, तिच्यात शोकाचा व आकांताचा शब्द पुनः ऐकू येणार नाही.” या भविष्यवाणीमध्ये यशया अतिशय हर्षित, आनंदी आणि उल्हासित परिस्थितीचे वर्णन करतो याची नोंद घ्या. यहुद्यांनी बॅबिलोनच्या बंदिवासात असताना अशा आनंदाचा, हर्षाचा कधीच अनुभव घेतला नव्हता असे म्हणण्यात काहीही वावगे नाही. पण आता आपण हे पाहू या, की “नवे आकाश आणि नवी पृथ्वी” याचा काय अर्थ होतो. हे शब्द संपूर्ण बायबलमध्ये केवळ चार वेळा आढळतात आणि या भविष्यवाणीमध्ये ते पहिल्यांदाच वाचायला मिळतात. आपले भविष्य या चार भविष्यवाण्यांवर विसंबून असल्यामुळे त्यांचा आपल्या जीवनाशी अगदी जवळचा संबंध आहे.

९. यशया ६५:१७-१९ मधील भविष्यवाणी पहिल्यांदा केव्हा पूर्ण झाली?

आपण आधी पाहिल्याप्रमाणे यहुदी लोक बॅबिलोनच्या बंदिवासातून मुक्‍त होऊन आपल्या मायदेशी परतले, तेथे एका नव्या समाजाचा पाया घालण्यात आला आणि जेरुसलेमच्या मंदिरात खऱ्‍या उपासनेची स्थापना झाली तेव्हा यशया ६५:१७-१९ येथील भविष्यवाणी पहिल्यांदा पूर्ण झाली. (एज्रा १:१-४; ३:१-४) पण, या भविष्यवाणीतील “नवे आकाश” याचा काय अर्थ आहे? येथे एखाद्या नव्या ग्रहाविषयी सांगण्यात आले आहे का? नाही, कारण यहुदी लोक आपल्या मायदेशी परतले आणि तो देश इतर कोणत्या ग्रहावर नव्हे तर याच पृथ्वीवर होता. तर मग, ही “नवी पृथ्वी” काय आहे? नॉस्ट्रेडेमसने किंवा इतर कोणा व्यक्‍तीने केलेल्या भविष्यवाण्यांचा अर्थबोध होण्याकरता अंदाज बांधावे लागतात, तसे काहीही करण्याची आपल्याला गरज नाही. यशयाच्या भविष्यवाणीमध्ये सांगण्यात आलेली “नवी पृथ्वी” म्हणजे नक्की काय हे बायबलमधूनच आपण समजू शकतो.

१०. यशयाने उल्लेख केलेल्या ‘नव्या पृथ्वीचा’ काय अर्थ होतो?

१० परंतु, बायबलमध्ये “पृथ्वी” हा शब्द नेहमीच आपल्या पृथ्वी ग्रहासंबंधी वापरलेला नाही. उदाहरणार्थ, आपण जर हिब्रू भाषेतील स्तोत्रसंहिता ९६:१ हे वचन वाचले तर तेथे असे वाचायला मिळते: “यहोवाकरता एक नवीन गीत गा, हे संपूर्ण पृथ्वी यहोवाकरता गा!” आता हे आपल्याला कोणी सांगायला नको की आपला हा ग्रह म्हणजे भूमी आणि समुद्र खरोखरचे गाऊ शकत नाहीत. पण, या पृथ्वीवरील लोक मात्र गाऊ शकतात. त्यामुळे स्तोत्रसंहिता ९६:१ येथील पृथ्वीचा अर्थ पृथ्वी ग्रह नव्हे तर पृथ्वीवरील लोक असा होतो. * त्यामुळे, यशयाने उल्लेख केलेली “नवी पृथ्वी” म्हणजे यहूदा देशात पुनर्वसन झालेला देवाच्या लोकांचा नवा समाज. पण यशया ६५:१७ मध्ये ‘नव्या आकाशाविषयीही’ सांगण्यात आले आहे. मग हे “नवे आकाश” काय आहे?

११. भविष्यवाणीतील “आकाश” या शब्दाचा अर्थ काय होतो?

११ विद्वान मैक्लिन्टॉक आणि स्ट्राँग यांचा बायबल-कोश सायक्लोपीडिया ऑफ बिब्लिकल, थियॉलॉजिकल, ॲण्ड एक्लसियास्टिकल लिट्रेचर म्हणतो: “जेव्हाकेव्हा एखाद्या भविष्यवाणीमध्ये आकाशाचा उल्लेख होतो . . . तेव्हा त्याचा अर्थ राज्य करणारी सरकारे असा होता . . . ही सरकारे प्रजेवर अर्थात सामान्य लोकांवर अधिकार गाजवतात, त्यांच्यावर राज्य करतात; आकाश हे पृथ्वीच्या वर असते, जणू ते पृथ्वीवर राज्य करत आहे. अगदी त्याचप्रमाणे ही सरकारे देखील लोकांवर राज्य करतात.” त्यानंतर हा बायबल-कोश “आकाश व पृथ्वी” या पदाविषयी असे म्हणतो, की ‘भविष्यवाणीमध्ये या वाक्यांशाचा अर्थ राज्य करणाऱ्‍यांशी आणि प्रजेशी आहे. आकाश म्हणजे राज्य करणारी शासन-व्यवस्था आणि पृथ्वी म्हणजे सामान्य नागरिक, प्रजा अर्थात असे लोक ज्यांवर वरिष्ठांचे राज्य असते.’

१२. आपल्या मायदेशी परतलेल्या यहुद्यांकरता “नवे आकाश व नवी पृथ्वी” काय होती?

१२ बॅबिलोनमधून परतल्यानंतर यहुद्यांकरता सर्वकाही नवे झाले. एक “नवे आकाश” म्हणजे नवीन शासन-व्यवस्था तयार झाली. या शासन-व्यवस्थेत दावीद राजाचा वंशज, जरुब्बाबेल अधिपती होता आणि यहोशवा महायाजक होता. (हाग्गय १:१, १२; २:२१; जखऱ्‍या ६:११) या ‘नव्या आकाशाच्या’ खाली “नवी पृथ्वी” होती, म्हणजे देवाच्या लोकांचा एक नवीन समाज, जो जेरुशलेमेच्या आणि तेथील मंदिरात यहोवाच्या उपासनेच्या पुनर्स्थापनेसाठी बॅबिलोनमधून यहूदा देशात परतला होता. अशाप्रकारे ‘नव्या आकाशाची आणि नव्या पृथ्वीची’ भविष्यवाणी त्या यहुद्यांच्या काळात पूर्ण झाली.

१३, १४. (अ) “नवे आकाश व नवी पृथ्वी’ यांच्या कोणत्या दुसऱ्‍या भविष्यवाणीकडे आपल्याला लक्ष दिले पाहिजे? (ब) ही भविष्यवाणी आज आपल्याकरता इतकी महत्त्वाची का आहे?

१३ आपण येथे केवळ इतिहासाचा विचार करत नाही किंवा केवळ बायबलचे ज्ञान डोक्यात भरत नाही. लक्षात घ्या, या चर्चेवर आपले भविष्य अवलंबून आहे! त्यामुळे आपण “नवे आकाश व नवी पृथ्वी” याबद्दल असलेल्या पुढच्या भविष्यवाणीकडे लक्ष देऊ या. ही भविष्यवाणी २ पेत्र ३:१३ येथे वाचायला मिळते.

१४ यहुदी आपल्या मायदेशी परतल्यानंतर सुमारे ५०० वर्षांनी पेत्राने हे पत्र लिहिले. तो “प्रभू” येशूचा निवडलेला प्रेषित होता आणि येशूच्या शिष्यांना पत्र लिहीत होता. (२ पेत्र ३:२) चवथ्या वचनामध्ये पेत्र येशूच्या ‘येण्याच्या [“उपस्थितीच्या”, NW] वचनाविषयी’ बोलतो. ही गोष्ट आज आपल्याकरता फार महत्त्वाची आहे कारण पुराव्यांवरून हे दिसून येते, की पहिल्या महायुद्धापासून येशू उपस्थित आहे. याचा अर्थ तो स्वर्गामध्ये देवाच्या राज्याचा राजा या नात्याने सिंहासनावर बसलेला आहे. (प्रकटीकरण ६:१-८; ११:१५, १८) येशू आता राजा आहे ही वास्तविकता लक्षात ठेवून आपण २ पेत्र ३:१३ येथील भविष्यवाणीकडे लक्ष देऊ या.

१५. दुसरे पेत्र ३:१३ येथे सांगण्यात आलेले “नवे आकाश” काय आहे?

१५ दुसरे पेत्र ३:१३ मध्ये असे लिहिले आहे: “ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करिते असे नवे आकाश व नवी पृथ्वी ह्‍यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहो.” आता या ठिकाणी म्हटलेले “नवे आकाश” काय आहे? तुम्हाला माहीतच आहे, की येशू स्वर्गामध्ये देवाच्या राज्याचा प्रमुख शासक आहे. (लूक १:३२, ३३) पण बायबलच्या इतर वचनांतून हे कळून येते, की तो स्वर्गातून एकटा राज्य करत नाही. येशूने प्रेषितांना हे अभिवचन दिले होते, की त्यांच्याकरता आणि त्यांच्याप्रमाणे इतर शिष्यांकरता स्वर्गामध्ये जागा तयार करण्यात येईल. या लोकांविषयी प्रेषित पौलाने इब्री लोकांच्या पुस्तकात म्हटले की त्यांना ‘स्वर्गीय पाचारण’ करण्यात आले आहे. आणि येशूने म्हटले, की ते सर्व त्याच्यासोबत स्वर्गामध्ये सिंहासनांवर बसतील. (इब्री लोकांस ३:१; मत्तय १९:२८; लूक २२:२८-३०; योहान १४:२, ३) सांगण्याचे तात्पर्य हेच, की येशूसोबत त्याचे शिष्य स्वर्गातून राज्य करतील. हीच शासन-व्यवस्था २ पेत्र ३:१३ येथे सांगण्यात आलेले “नवे आकाश” आहे. तर मग, तेथे उल्लेख करण्यात आलेली “नवी पृथ्वी” काय आहे?

१६. आज ‘नव्या पृथ्वीची’ पायाभरणी कशी होत आहे?

१६ यशयाच्या भविष्यवाणीप्रमाणे २ पेत्र ३:१३ येथील ‘नव्या पृथ्वीचा’ उल्लेख कोणत्याही नव्या ग्रहासंबंधी नव्हे तर लोकांसंबंधी आहे. यावरून हे स्पष्ट होते की, ‘नव्या पृथ्वीचा’ अर्थ लोकांचा असा एक नवा समाज ज्यावर ‘नव्या आकाशाचे’ अधिपत्य असेल. आज या नव्या समाजाची अर्थात ‘नव्या पृथ्वीची’ पायाभरणी होत आहे. जगभरातील लाखो लोक या नव्या समाजाचे सदस्य बनत आहेत आणि मोठ्या आनंदाने ‘नव्या आकाशाच्या’ राज्याच्या अधीन होत आहेत. हे राज्य आपल्या प्रजेच्या भल्याकरता आतापासूनच काम करत आहे. त्या राज्याच्या नियमांनुसार चालण्याकरता त्यांना बायबलचे शिक्षण देण्यात येत आहे. (यशाय ५४:१३) या नव्या समाजाची मुळे संपूर्ण जगभर पसरत आहेत आणि यामध्ये प्रत्येक जातीचे, प्रत्येक देशाचे आणि प्रत्येक भाषेचे लोक येत आहेत. हे सर्व लोक त्यांचा राजा, येशू ख्रिस्त याच्या अधीन राहून एकजुटीने काम करत आहेत. या नव्या समाजाचा एक सदस्य बनण्याची तुमची इच्छा आहे का?—मीखा ४:१-४.

१७, १८. दुसरे पेत्र ३:१३ येथील भविष्यवाणी आपल्याला कोणत्या भविष्याची आशा देते?

१७ पण येथेच सर्व संपत नाही कारण यानंतरही पुष्कळ काही होणार आहे. तुम्ही २ पेत्र ३:१३ याच्या आधीच्या वचनांवर लक्ष दिल्यास, तेथे भविष्यामध्ये होणाऱ्‍या मोठमोठ्या बदलांविषयी सांगण्यात आले आहे. ५ आणि ६ वचनांत पेत्र नोहाच्या दिवसातील जलप्रलयाचे उदाहरण देतो, ज्यामध्ये संपूर्ण दुष्ट लोकांचा नाश झाला होता. त्यानंतर सातव्या वचनामध्ये सांगण्यात आले आहे, की ‘आताच्या आकाशाचा व पृथ्वीचा’ म्हणजेच सध्याच्या सर्व सरकारांचा आणि त्यांच्या प्रजेचा नाश होईल. केव्हा? “न्यायनिवाड्याचा व भक्‍तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस” येईल तेव्हा. (तिरपे वळण आमचे.) ‘लोक’ या शब्दावरून पुन्हा एकदा स्पष्ट होते, की ‘आकाश व पृथ्वी’ म्हणजे खरोखरचे आकाश आणि खरोखरचा पृथ्वी ग्रह नव्हे तर राज्यकर्ते आणि ज्यांच्यावर ते राज्य करतात अशी सर्वसामान्य जनता.

१८ पेत्र पुढे असे म्हणतो, की हा नाश यहोवाच्या दिवशी येईल. त्यावेळी जुन्या व्यवस्थीकरणाचा नायनाट केला जाईल आणि त्याच्या जागी “नवे आकाश व नवी पृथ्वी” येईल. याकडे लक्ष द्या, १३ व्या वचनात म्हटले आहे की यामध्ये “नीतिमत्त्व वास” करील. म्हणजेच, लवकरच मोठमोठे बदल होतील म्हणजे दुष्टता नाहीशी केली जाईल, सर्वकाही नवे केले जाईल आणि मनुष्याचे जीवन जगण्यालायक होईल असा याचा अर्थ होत नाही का? या गोष्टी तुम्हाला स्पष्ट दिसत असल्यास भविष्याविषयी तुम्ही अशी समज प्राप्त केली आहे जी आज बहुतेक लोकांकडे नाही.

१९. प्रकटीकरणाच्या १९ आणि २० अध्यायांमध्ये काय सांगण्यात आले आहे?

१९ आतापर्यंत आपण यशया ६५:१७-१९ आणि २ पेत्र ३:१३ येथील ‘नव्या आकाशाविषयी व नव्या पृथ्वीविषयी’ पाहिले. आता आपण प्रकटीकरण २१:१ या वचनावर लक्ष देऊ या; जेथे पुन्हा एकदा याचा उल्लेख करण्यात आला आहे. प्रकटीकरणातील ही भविष्यवाणी समजून घेण्याआधी आपल्याला त्या आधीच्या दोन अध्यायांवर लक्ष दिले पाहिजे. १९ व्या अध्यायामध्ये लाक्षणिक भाषेत एका युद्धाचे वर्णन करण्यात आले आहे. हे युद्ध दोन देशांमधले नाही. यात एका बाजूला “देवाचा शब्द” अर्थात येशू ख्रिस्त आहे. (योहान १:१, १४) तो स्वर्गात आहे आणि त्याच्यासोबत एक मोठे सैन्य आहे. युद्धात विरोधी पक्षात कोण आहे? त्या अध्यायामध्ये दुसऱ्‍या बाजूला ‘राजे,’ ‘सरदार’ आणि ‘लहान मोठ्या’ पदावर असलेले लोक आहेत. हे युद्ध यहोवाच्या येणाऱ्‍या दिवशी होईल आणि त्यावेळी संपूर्ण दुष्टाईचा नाश करण्यात येईल. (२ थेस्सलनीकाकर १:६-१०) याच्या पुढील अध्यायात, म्हणजे २० व्या अध्यायाच्या सुरवातीला सांगण्यात आले आहे, की ‘जुनाट साप म्हणजे दियाबल सैतान’ याला अथांग डोहात टाकण्यात येईल. या सर्व गोष्टींना लक्षात ठेवून आपण अध्याय २१ मध्ये दिलेल्या भविष्यवाणीचा विचार करू या.

२०. प्रकटीकरण २१:१ अनुसार काय होईल?

२० प्रेषित योहान २१ व्या अध्यायाची सुरवात या शब्दांनी करतो: “मी नवे आकाश व नवी पृथ्वी ही पाहिली; पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रहि राहिला नाही.” आधी चर्चा केल्याप्रमाणेच या ठिकाणी देखील खरोखरचे आकाश, पृथ्वी आणि समुद्र नाहीसे होणार नाहीत. पण १९ आणि २० अध्यायांनुसार जगाचे दुष्ट लोक, त्यांच्यावर राज्य करणारी सरकारे आणि त्यांच्यावर शासन करणारा सैतान नाहीसा होईल. आणि त्यांच्या जागी एक नवीन व्यवस्था अर्थात एक नवीन जग येईल असे अभिवचन या भविष्यवाणीमध्ये देण्यात आले आहे.

२१, २२. योहान आपल्याला कोणत्या आशीर्वादांचे आश्‍वासन देतो आणि कोणते अश्रू पुसले जातील?

२१ या अभिवचनाविषयी आपल्याला पुढे आश्‍वासन देण्यात आले आहे. वचन ३ मध्ये म्हटले आहे, की देव लोकांसोबत राहील, त्यांना आशीर्वादित करील आणि मनुष्ये देवाच्या इच्छेनुसार चालतील. (यहेज्केल ४३:७) पुढील ४ आणि ५ वचनांत योहान म्हणतो: “तो [यहोवा] त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला: ‘पाहा, मी सर्व गोष्टी नवीन करितो.’ तो म्हणाला, ‘लिही; कारण ही वचने विश्‍वसनीय व सत्य आहेत.’” या भविष्यवाणीमुळे आपले मन आनंदाने उल्लसित होत नाही का?

२२ जरा विचार करा. ‘देव लोकांच्या डोळ्यांतील सर्व अश्रू पुसून टाकील.’ स्पष्टच आहे, की देव आपले आनंदाश्रू पुसणार नाही किंवा आपल्या डोळ्यांतील ओलावा पुसून टाकणार नाही कारण हा ओलावा आपल्या डोळ्यांकरता फार आवश्‍यक आहे. पण, निराशा, दुःख, पीडा, वेदना यांमुळे डोळ्यांत तरळणारे पाणी यहोवा पुसून टाकील. आपण हे कोणत्या आधारावर म्हणू शकतो? पुढील वचनात असे म्हटले आहे: “ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत.”—योहान ११:३५.

२३. योहानाच्या भविष्यवाणीनुसार काय होणार नाही?

२३ याचा अर्थ, कोणत्याही प्रकारचा आजार, मग तो कॅन्सर असो, टीबी असो किंवा हार्ट अटॅक असो ते सर्व नाहीसे केले जाईल असा होत नाही का? जरा विचार करा—मृत्यू देखील नाहीसा केला जाईल. आपल्यांपैकी असा कोण आहे ज्याच्या प्रिय व्यक्‍तीचा आजारामुळे, एखाद्या अपघातामुळे किंवा इतर कारणामुळे मृत्यू झाला नाही? मरण राहणार नाही याचा असाही अर्थ होतो, की त्यावेळी जी मुले जन्माला येतील त्यांना म्हातारे होऊन मरावे लागणार नाही; कारण त्यावेळी कोणीही म्हातारे होणार नाही. आणि म्हातारपणामुळे होणारे आजार देखील त्यावेळी नसतील, कुणाला सांधेदुखी होणार नाही, कोणाची नजर कमजोर होणार नाही, कोणाला दमा नसेल ना ही मोतीबिंदू.

२४. “नवे आकाश आणि नवी पृथ्वी” यांमध्ये आपल्याला कोणते लाभ मिळतील आणि पुढील लेखात आपण कशाची चर्चा करणार आहोत?

२४ यात कोणतीही शंका नाही, की मरण नसेल, म्हातारपण नसेल, कोणत्याही प्रकारचा आजार नसेल तेव्हा शोक, विलाप आणि पीडा देखील नसतील. पण देवाच्या नवीन जगात लोकांच्याभोवती गरिबीचा विळखा कायम राहिला, मुलांसोबत लैंगिक दुर्व्यवहार आणि अत्याचार होत राहिला, उच्च-नीच, काळे-गोरे, जात-पात यांवरून दंगे होत राहिले, तर डोळ्यांत पाणी येणार नाही का? देवाच्या नवीन जगात कोणाच्याही डोळ्यांत अश्रू येणार नाहीत कारण ‘नवीन आकाश आणि नवीन पृथ्वीवर’ शोक, विलाप आणि पीडा यांना कारणीभूत ठरणारी प्रत्येक गोष्ट काढून टाकण्यात येईल. संपूर्ण जगाचा चेहरामोहराच बदलला जाईल! आतापर्यंत आपण ‘नवीन आकाशाच्या आणि नवीन पृथ्वीच्या’ केवळ तीन भविष्यवाण्यांची चर्चा केली आहे. आणखी एक भविष्यवाणी बाकी आहे; तिची चर्चा पुढील लेखात करण्यात येईल. त्यासोबतच आपण हे देखील पाहू, की देव केव्हा आणि कसे ‘सर्व काही नवे’ करील आणि भविष्यात आपले जीवन अधिक आनंदमय कसे होईल.

[तळटीपा]

^ परि. 10 मराठी कॉमन लँग्वेज भाषांतरात स्तोत्रसंहिता ९६:१ या वचनाचे योग्यप्रकारे भाषांतर करण्यात आले आहे. यावरून दिसून येते, की यशयामध्ये वर्णन करण्यात आलेल्या ‘नव्या पृथ्वीचा’ संबंध लोकांशी अर्थात आपल्या मायदेशी परतल्यानंतर नव्या समाजाची स्थापना करणाऱ्‍या लोकांशी होतो.

तुम्हाला आठवते का?

• “नवे आकाश व नवी पृथ्वी” यांविषयी बायबलमध्ये कोणत्या तीन ठिकाणी उल्लेख करण्यात आला आहे?

• यहुदी लोक बंदिवासातून परतल्यानंतर ‘नव्या आकाशाची व नव्या पृथ्वीची’ भविष्यवाणी कशी पूर्ण झाली?

• पेत्राने उल्लेख केलेले “नवे आकाश व नवी पृथ्वी” काय आहे?

• प्रकटीकरणाच्या २१ व्या अध्यायातील भविष्यवाणी कशाप्रकारे आपल्याला एका उज्ज्वल भविष्याची आशा देते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१० पानांवरील चित्र]

यहोवाच्या भविष्यवाणीनुसार कोरेशमुळे यहुदी लोक सा.यु.पू. ५३७ मध्ये आपल्या मायदेशी परतले