व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नवे जग—तुम्ही तेथे असाल का?

नवे जग—तुम्ही तेथे असाल का?

नवे जग—तुम्ही तेथे असाल का?

“मनुष्यांनी आमरण सुखाने राहावे व हित साधावे यापरते इष्ट त्यांस काही नाही हे मला कळून आले आहे. तरी प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे व आपला सर्व उद्योग करून सुख मिळवावे हीहि देवाची देणगी आहे.”—उपदेशक ३:१२, १३.

१. आपल्याकरता एक आनंदी भवितव्य राखून ठेवलेले आहे असे आपण का म्हणू शकतो?

अनेकांच्या मनात देवाविषयी चुकीच्या कल्पना आहेत. त्यांना वाटते, की तो फार कठोर आहे, त्याला दुसऱ्‍यांच्या आनंदाची, भावनांची पर्वा नाही. पण वर दिलेल्या वचनातून तो कसा आहे ते कळते. त्याची हीच इच्छा आहे, की लोकांनी आनंदी असावे, जीवनाचा आस्वाद घ्यावा, कारण तो स्वतः ‘धन्यवादित (आनंदी) देव’ आहे. (१ तीमथ्य १:११) त्यामुळेच जीवनाचा पुरेपूर आनंद उपभोगण्याकरता त्याने आपल्या पहिल्या पालकांना सुंदर एदेन बागेत ठेवले. (उत्पत्ति २:७-९) तर मग, तो आपल्यालाही भविष्यामध्ये आनंदी जीवनाचा आस्वाद घ्यायला देईल यात काही आश्‍चर्य आहे का? खरे तर, देवाने आपल्याला अशाच आनंदी भवितव्याचे अभिवचन दिले आहे.

२. तुमचे भविष्य कसे असेल?

मागील लेखात आपण “नवे आकाश व नवी पृथ्वी” याविषयीच्या तीन भविष्यवाणींचा विचार केला होता. (यशया ६५:१७) त्यांपैकी एक भविष्यवाणी प्रकटीकरणाच्या २१ व्या अध्यायात लिहिण्यात आली आहे. या भविष्यवाणीत आपण पाहिले, की देव पृथ्वीचे रूपांतर करून सर्वकाही नवे करील आणि तेव्हा सगळीकडे आनंदीआनंद असेल. कोणाच्याही डोळ्यांत दुःखाचे अश्रू असणार नाहीत. कोणी म्हातारे होणार नाही, आजारी पडणार नाही, कोणावर विपत्ती कोसळणार नाही, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मृत्यू कायमचा नाहीसा केला जाईल. शोक, विलाप, कष्ट असणार नाहीत. अंमळ थांबून याचा जरा विचार करा; आपल्याकरता राखून ठेवलेले भविष्य किती आनंदी असेल, किती उज्ज्वल असेल! पण प्रश्‍न हा येतो, की ही भविष्यवाणी नक्की पूर्ण होईल यावर आपण विश्‍वास कसा ठेवू शकतो? आणि या भविष्यवाणीचा आपल्या जीवनावर काय परिणाम होऊ शकतो?

भरवशाचे कारण

३. आपण भविष्याविषयी बायबलमध्ये देण्यात आलेल्या आश्‍वासनावर पक्का विश्‍वास का ठेवू शकतो?

प्रकटीकरण २१:५ मध्ये लिहिले आहे, देव स्वर्गात आपल्या सिंहासनावर बसलेला आहे आणि तो असे म्हणतो: “पाहा, मी सर्व गोष्टी नवीन करितो.” मनुष्यांनी किंवा त्यांच्या सरकारांनी केलेल्या आश्‍वासनांप्रमाणे हे पोकळ आश्‍वासन नाही. सर्वांचे भविष्य उज्ज्वल असेल, सर्वांना समान अधिकार मिळेल, सर्वांना मानवी हक्क प्राप्त होईल अशाप्रकारची अनेक आश्‍वासने आज सरकारांकडून दिली जातात. पण, अशी आश्‍वासने देवाच्या आश्‍वासनासमोर अगदी फोल ठरतात. देवाचे आश्‍वासन पक्के नि खात्रीदायक आहे; कारण बायबल त्याच्याविषयी म्हणते, की तो “सत्यप्रतिज्ञ” देव आहे. (तीत १:२) हे ऐकून तुम्ही कदाचित म्हणाल, की देवाने नवे जग आणण्याचे जे आश्‍वासन दिले आहे त्यावर आता माझा विश्‍वास आहे. आता मला त्या स्वप्नाच्या दुनियेत राहावेसे वाटते. पण थांबा, भविष्यात घडणाऱ्‍या अनेक गोष्टींविषयी आपल्याला शिकायचे आहे.

४, ५. भविष्यात होणाऱ्‍या गोष्टींवरील आपला विश्‍वास आणखी मजबूत करणाऱ्‍या अशा कोणत्या भविष्यवाणींची आपण मागील लेखात चर्चा केली?

मागील लेखात आपण नवे आकाश आणि नवी पृथ्वी यांविषयी शिकलो होतो हे तुम्हाला आठवते का? यहुदी लोक बॅबिलोनपासून आपल्या मायदेशी परतले आणि पुन्हा जेरूसलेममध्ये मंदिर बांधून त्यांनी देवाच्या खऱ्‍या उपासनेची सुरवात केली, तेव्हा यशया ६५:१७-१९ ची भविष्यवाणी पहिल्यांदा पूर्ण झाली हे आपण पाहिले होते. (एज्रा १:१-३; २:१, २; ३:१२, १३) केवळ इतकीच यशयाच्या भविष्यवाणीची पूर्णता होती का? नाही! ही भविष्यवाणी भविष्यात फार मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या भव्यतेने पुन्हा एकदा पूर्ण होणार आहे. आपण पूर्ण आत्मविश्‍वासाने असे का म्हणू शकतो? कारण २ पेत्र ३:१३ आणि प्रकटीकरण २१:१-५ या वचनांमध्ये ख्रिश्‍चनांना, ‘नव्या आकाशाचे आणि नव्या पृथ्वीचे’ अभिवचन देण्यात आले होते; आणि हे अभिवचन जगव्याप्त प्रमाणावर पूर्ण होईल.

आपण आधी पाहिल्याप्रमाणे बायबलमध्ये ‘नव्या आकाशाच्या आणि नव्या पृथ्वीच्या’ भविष्यवाणीचा उल्लेख चार वेळा करण्यात आला आहे. यांपैकी तीन भविष्यवाणींची आपण आधीच्या लेखात चर्चा केली आहे आणि त्यामुळे भविष्यात होणाऱ्‍या गोष्टींवरील आपला विश्‍वास आणखी मजबूत झाला आहे. आपण हेच शिकलो, की देव दुष्टाईचा आणि समस्यांचा समूळ नाश करील आणि त्यानंतर नवीन जग देवाच्या आशीर्वादाने न्हाऊन निघेल.

६. ‘नव्या आकाशाची आणि नव्या पृथ्वीची’ पुढील भविष्यवाणी काय म्हणते?

आता आपण ‘नव्या आकाशाच्या आणि नव्या पृथ्वीच्या’ पुढील भविष्यवाणीकडे लक्ष देऊ या. ही भविष्यवाणी यशया ६६:२२-२४ या वचनांमध्ये आपल्याला पाहायला मिळते: “मी नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करीन; ती जशी मजसमोर टिकून राहतील तसा तुमचा वंश व तुमचे नाव टिकून राहील असे परमेश्‍वर म्हणतो. असे होईल की, एका चंद्रदर्शनापासून दुसऱ्‍या चंद्रदर्शनापर्यंत; एका शब्बाथापासून दुसऱ्‍या शब्बाथापर्यंत सर्व मनुष्यजाति मजपुढे भजनपूजन करण्यास येईल, असे परमेश्‍वर म्हणतो. ज्या मनुष्यानी मजविरुद्ध बंड केले त्यांची प्रेते ते बाहेर जाऊन पाहतील; कारण त्यांस लागलेली कीड कधी मरावयाची नाही; त्यांस लागलेला अग्नि कधी विझावयाचा नाही; सर्व मानवजातीस त्यांची किळस येईल.”

७. यशया ६६:२२-२४ येथील भविष्यवाणी केव्हा पूर्ण होईल आणि आपण हे कोणत्या आधारावर म्हणू शकतो?

यहुदी आपल्या मायदेशी परतले तेव्हा ही भविष्यवाणी पहिल्यांदा पूर्ण झाली. पण याची मोठ्या प्रमाणावर पुन्हा एकदा पूर्णता होणार आहे. केव्हा? पेत्राच्या दुसऱ्‍या पत्रावरून आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकावरून आपण हे म्हणू शकतो, की ही भविष्यवाणी पुढे भविष्यामध्ये पूर्ण होणार आहे. होय, ही भविष्यवाणी नव्या जगात मोठ्या प्रमाणावर आणि मोठ्या भव्यतेने पूर्ण होईल. त्यावेळी आपले जीवन किती आनंदी असेल याची एक झलक पाहू या.

८, ९. (अ) यहोवाचे लोक कशाप्रकारे “टिकून राहतील?” (ब) नव्या जगात ‘एका चंद्रदर्शनापासून दुसऱ्‍या चंद्रदर्शनापर्यंत आणि एका शब्बाथापासून दुसऱ्‍या शब्बाथापर्यंत’ यहोवाची उपासना करण्याचा काय अर्थ होतो?

प्रकटीकरण २१:४ येथे आश्‍वासन देण्यात आले आहे, की मृत्यू नाहीसा केला जाईल. यशया ६६:२२-२४ मध्ये देखील हेच सांगण्यात आले आहे. कारण २२ व्या वचनात आपल्याला असे वाचावयास मिळते, की नवे आकाश आणि नवी पृथ्वी “टिकून राहील” किंवा सदासर्वकाळ तिचे अस्तित्व राहील. त्याच वचनात आपल्याला हे सांगण्यात आले आहे, की देवाचे लोक देखील “टिकून राहतील,” म्हणजे ते सदासर्वकाळ जिवंत राहतील. प्रेषितांच्या काळापासून आजपर्यंत खऱ्‍या ख्रिश्‍चनांना भयानक जुलूम सहन करावा लागला आहे, त्यांचे अस्तित्व नाहीसे करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, तरी देखील ते ‘टिकून राहिले आहेत,’ कारण यहोवा त्यांच्या पाठीशी आहे. (योहान १६:२; प्रेषितांची कृत्ये ८:१) रोमी सम्राट, नीरो आणि एडॉल्फ हिटलर यांसारख्या बलाढ्य, शक्‍तिशाली शत्रूंना देखील यहोवाच्या एकनिष्ठ सेवकांना मिटवता आले नाही. आजपर्यंत देवाने त्याचे नाव धारण करणाऱ्‍या त्याच्या सेवकांच्या संपूर्ण समाजाचे संरक्षण केले आहे आणि त्यामुळे पूर्ण विश्‍वासानिशी असे म्हटले जाऊ शकते, की देव त्याच्या लोकांना सदासर्वकाळ ‘टिकवून’ ठेवील.

खरे तर, नव्या जगात त्याच्या समाजाचा प्रत्येक सदस्य “टिकून राहील”, कारण तो यहोवाची पवित्र उपासना पूर्ण एकनिष्ठेने करील. आणि तो ही उपासना केव्हातरी, किंवा त्याला वाटेल तेव्हा नव्हे, तर यशया ६६:३३ च्या अनुसार खऱ्‍या देवाची उपासना प्रत्येक आठवड्यात आणि प्रत्येक महिन्यात अर्थात सतत करत राहील. याचे उदाहरण आपल्याला मोशेच्या नियमशास्त्रात देखील पाहायला मिळते, या नियमशास्त्रात प्रत्येक महिन्याच्या चंद्रदर्शनी आणि प्रत्येक आठवड्याच्या शब्बाथ किंवा विश्रामदिनी विशिष्टप्रकारे उपासना करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. (लेवीय २४:५-९; गणना १०:१०; २८:९, १०; २ इतिहास २:४) अशाप्रकारे नव्या जगात देखील यहोवाची पवित्र उपासना सदासर्वकाळ कोणत्याही अडथळ्याविना, कोणत्याही व्यत्ययाविना होत राहील. त्यावेळी आजच्याप्रमाणे कोणी नास्तिक असणार नाही; खोटे धर्म असणार नाहीत, कारण ‘सर्व मनुष्यजाती यहोवापुढे भजनपूजन करण्यास येईल.’

१०. नव्या जगात दुष्ट लोक असणार नाहीत, असे आपण पूर्ण आत्मविश्‍वासाने का म्हणू शकतो?

१० यशया ६६:२४ हे वचन आपल्याला आश्‍वासन देते, की नव्या पृथ्वीमध्ये शांती आणि धार्मिकता कधीही भंग पावणार नाही कारण तेथे दुष्ट असणार नाहीत. “न्यायनिवाड्याचा व भक्‍तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस” येईल, असे २ पेत्र ३:७ येथे सांगितले आहे हे तुम्हाला आठवतच असेल. देवाच्या युद्धात केवळ ‘भक्‍तिहीन लोकांचा’ नाश होईल, निर्दोष आणि निष्पाप लोकांना या युद्धाची झळ पोहंचणार नाही. आजकालच्या लढायांमध्ये बहुतेक वेळा निर्दोष लोकांनाच ठार मारले जाते. पण, यहोवा न्यायप्रिय देव आहे आणि तो आपल्याला अभिवचन देतो, की ‘न्यायनिवाड्याच्या दिवशी’ तो केवळ भक्‍तिहीन लोकांचाच नाश करील.

११. यशयाच्या मते यहोवाचा विरोध करणाऱ्‍यांचे काय होईल?

११ यहोवाच्या ‘न्यायनिवाड्याच्या दिवसातून’ वाचणारे धार्मिक लोक “भक्‍तिहीन” लोकांचा नाश होताना पाहतील, असे देव अभिवचन देतो. यशया ६६:२४ येथे भविष्यवाणी करण्यात आली आहे, की धार्मिक लोक ‘यहोवाविरुद्ध बंड केलेल्या लोकांची प्रेते पाहतील.’ २४ व्या वचनात यशयाने केलेले वर्णन वाचून कदाचित आपल्याला धक्का बसेल. पण, तो काही नवीन गोष्ट सांगत नव्हता कारण त्याच्या काळात वास्तविकतेत असेच होत होते. प्राचीन काळी जेरुसलेमच्या वेशीच्या बाहेर एक फार मोठी दरी होती तीमध्ये केर-कचरा टाकला जायचा. कधी-कधी, काही अपराध्यांना मृत्युदंडाची शिक्षा दिल्यानंतर त्यांची प्रेते या उकिरड्यात फेकली जायची; कारण त्यांची प्रेते आदराने दफन करण्याच्या लायक समजली जात नसत. * तेथे केर-कचऱ्‍याला लावलेल्या आगीमुळे त्यांची प्रेते भस्म व्हायची किंवा त्यांच्या प्रेतांना किडे पडायचे. त्यामुळे या सर्व वर्णनावरून २४ व्या वचनात यशया हे सांगत होता, की यहोवाचा विरोध करणाऱ्‍यांचा कायमचा आणि पूर्णपणे नाश होईल.

त्याने कोणते अभिवचन दिले?

१२. यशयाने नव्या जगातील जीवनाविषयी आणखी काय म्हटले?

१२ प्रकटीकरण २१:४ या वचनात आपण पाहिले, की नव्या जगात कोणकोणत्या गोष्टी नसतील. पण कोणत्या असतील? त्यावेळी जीवन कसे असेल? याविषयी यशयाच्या ६५ व्या अध्यायात सांगण्यात आले आहे, की जेव्हा नव्या जगात नव्या आकाशाची आणि नव्या पृथ्वीची पूर्णपणे स्थापना होईल तेव्हा आपल्या आनंदाला पारावार राहणार नाही. पृथ्वीवर अनंतकाळ जगण्याची आशा असलेले लोक चिरतरुण राहतील, ते कधी म्हातारे होणार नाहीत, त्यांना कधी मरण येणार नाही. यशया ६५:२० येथे आपल्याला अभिवचन देण्यात आले आहे: “यापुढे थोडे दिवस वाचणारे अर्भक तिच्यात जन्मास येणार नाही. जो पुऱ्‍या आयुष्याचा होणार नाही असा म्हातारा तिच्यात असणार नाही; तेथील जो कोणी तरुणपणी मरेल तो शंभर वर्षांचा होऊन मरेल.”

१३. देवाचे लोक सुरक्षित राहतील हे अभिवचन यशया ६५:२० मध्ये कसे देण्यात आले आहे?

१३ ही भविष्यवाणी पहिल्यांदा यहुद्यांच्या काळात पूर्ण झाली. या भविष्यवाणीचा हाच अर्थ होता, की त्यांची मुले मायदेशात सुरक्षित राहतील आणि त्यांना शत्रूंकडून कोणताही धोका नसेल. कोणीही येऊन मुलांना पळवून नेणार नाही आणि कोणालाही त्याच्या भर तारुण्यात मारण्यात येणार नाही पण, बॅबिलोनच्या लष्करांनी नेमके हेच केले होते. (२ इतिहास ३६:१७, २०) त्याचप्रमाणे नव्या जगात लोकांना कोणत्याही प्रकारचा धोका असणार नाही, ते पूर्णपणे सुरक्षित आणि आनंदी असतील. पण, तेथे कोणी मुद्दामहून देवाविरुद्ध बंड केल्यास देव त्याला नव्या जगात जगण्याची संधी देणार नाही. बंड करणारा शंभर वर्षांचा असला तरी त्याला ठार मारण्यात येईल. अनंत काळच्या तुलनेत जणू तो आपल्या “तरुणपणी” मरेल.—१ तीमथ्य १:१९, २०; २ तीमथ्य २:१६-१९.

१४, १५. यशया ६५:२१, २२ अनुसार नव्या जगात आपण कोण-कोणती कामे करू?

१४ देव बंडखोर लोकांचा नाश कसा करील, हे सर्व सांगण्याऐवजी यशया येणाऱ्‍या नवीन जगातील सुंदर आणि आनंदी जीवनाचे वर्णन करतो. यशयाचे वर्णन तुमच्या मनचक्षुंनी पाहण्याचा जरा प्रयत्न करा. तुम्हाला मनात कदाचित तुमचे घर दिसेल, होय तुमचे स्वतःचे घर. यशया ६५:२१ आणि २२ वचन म्हणते: “ते घरे बांधून त्यात राहतील. द्राक्षाचे मळे लावून त्यांचे फळ खातील. ते घरे बांधतील आणि त्यात दुसरे राहतील, ते लावणी करितील आणि फळ दुसरे खातील, असे व्हावयाचे नाही; कारण वृक्षाच्या आयुष्याप्रमाणे माझ्या लोकांचे आयुष्य होईल व माझे निवडलेले आपल्या हाताच्या श्रमाचे फळ पूर्णपणे भोगितील.”

१५ हे ऐकून तुम्ही कदाचित म्हणाल की, ‘मला तर घर बांधता येत नाही, मला बागकाम देखील माहीत नाही.’ घाबरू नका, कारण या भविष्यवाणीचा अर्थ होतो, की तुम्हाला कदाचित तेथे काही कला-कौशल्य शिकण्याची गरज आहे. तुमच्या शेजारच्या कार्यक्षम आणि अनुभवी लोकांकडून तुम्हाला ही कौशल्ये शिकायला आवडणार नाहीत का? त्यावेळी तुमचे घर कसे असेल? घरात हवा खेळती राहावी म्हणून तुम्ही घराला मोठमोठ्या खिडक्या लावणार आहात का? रस्त्यांवर पसरलेला बर्फाचा पांढराशुभ्र गालीचा पाहण्यासाठी, किंवा हिरवीगार झाडे आणि हिरव्या मखमली गवतावरचे दवबिंदू आणि सृष्टीचे विविध रंग पाहण्यासाठी तुम्ही खिडक्यांना तावदाने लावणार का? उन्हाळ्यात संध्याकाळी तुमच्या मित्रांसोबत, शेजाऱ्‍यांसोबत, बायकांमुलांसोबत निवांतपणे बसता यावे म्हणून तुम्ही तुमच्या घराचे छत सपाट ठेवणार आहात का?—अनुवाद २२:८, नहेम्या ८:१६.

१६. नव्या जगात तुम्हाला नेहमी तुमच्या कामातून आनंद, समाधान मिळेल असे तुम्ही का म्हणू शकता?

१६ खरे तर, यशया हे सांगत नाही, की तुमचे घर कसे असेल, आणि कसे नसेल, पण एक गोष्ट तो जरूर सांगतो आणि ती म्हणजे तुमचे एक सुंदर घर असेल. पण आजची परिस्थिती तशी नाही कारण तुम्ही इतके कष्ट करून स्वतःचे घर बनवता पण त्या घरात राहण्याचे समाधान तुम्हाला लाभत नाही. यशया ६५:२१ मध्ये हे देखील सांगण्यात आले आहे, की तुम्ही झाडे लावाल आणि त्याचे फळ खाल. म्हणजे तुमच्या कष्टाचे, तुमच्या श्रमाचे तुम्हाला प्रतिफळ मिळेल. कोठपर्यंत असे चालत राहील? अनंतकाळ. कारण तुमचे आयुष्य “वृक्षांच्या आयुष्याप्रमाणे” होईल. यामध्ये कोणतीही शंका नाही, की तेव्हा ‘सर्वकाही नवीन झालेले असेल!’—स्तोत्र ९२:१२-१४.

१७. आईवडिलांच्या अंतःकरणाला भिडणारे कोणते आश्‍वासन यहोवा देतो?

१७ तुम्हाला मुले असल्यास पुढील शब्द तुमच्या अंतःकरणाला भिडतील: “त्यांचे [आईवडिलांचे] परिश्रम व्यर्थ जाणार नाहीत, संकट तत्काळ गाठील अशा संततीला ते जन्म देणार नाहीत, कारण परमेश्‍वराने आशीर्वाद दिलेली ती संतति आहे, व त्यांची मुले त्याजवळ राहतील. त्यांनी हाक मारण्यापूर्वी मी उत्तर देईन, ते बोलत आहेत तोच मी त्यांचे ऐकेन, असे होईल.” (यशया ६५:२३, २४) आज मुलांसमोर इतक्या समस्या आहेत की त्यामुळे त्यांच्या आईवडिलांच्याच मनात भय आणि दहशत निर्माण होते आणि त्यांच्यावर मानसिक तणाव येतो. ‘संकट तत्काळ गाठील अशा संततीला जन्म’ देण्याचे दुःख किती असते याची तुम्हाला नक्कीच कल्पना आहे. पण आज असेही पालक आहेत, की जे आपल्या काम-धंद्यात, मौज करण्यात इतके गुंतले आहेत, की त्यांना त्यांच्या मुलांचे ऐकायला, त्यांना काय हवे काय नको ते पाहायला देखील उसंत नाही. पण यहोवा तसा नाही. तो आपल्याला आश्‍वासन देतो, की तो आपल्या हाकेला जरूर उत्तर देईल आणि आपण मागण्यापूर्वीच आपल्या गरजा पूर्ण करील.

१८. नव्या जगात तुम्ही प्राण्यांसोबत कसे राहू शकता?

१८ यशया ६५:२५ मध्ये वाचायला मिळणारे वर्णन देखील तुम्हाला नव्या जगात पाहायला मिळेल: “तेव्हा लांडगा व कोकरू एकत्र चरतील, सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल, सर्पाचे खाणे धूळ होईल; माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत. नासधूस करणार नाहीत, असे परमेश्‍वर म्हणतो.” अनेक चित्रकारांनी या वर्णनाचे आपल्या कल्पनेनुसार चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. पण, याची खात्री बाळगा की हे वर्णन केवळ एक कल्पना नाही. ही एक वास्तविकता आहे. त्यावेळी संपूर्ण जगातील लोकांचे एकमेकांशी सलोख्याचे संबंध असतील आणि जंगली पशू आणि मानव यांमध्ये शांती असेल. जरा विचार करा, जेव्हा जंगली पशू मनुष्यांसोबत मिळूनमिसळून राहतील तेव्हा तुम्हाला त्यांच्याविषयी कितीतरी नवीन गोष्टी शिकायला मिळतील. आज कित्येक जीवशास्त्रज्ञांना आणि जंगली पशूंचे वेड असलेल्यांना केवळ एका प्राण्याचे परीक्षण करण्याकरता आपले संपूर्ण आयुष्य वेचावे लागते. पण नव्या जगात तुम्ही कोणत्याही प्राण्याजवळ न घाबरता जाऊ शकता; कारण पक्षी आणि प्राण्यांना देखील तुमचे भय वाटणार नाही. तेव्हा तुम्हाला त्यांच्याविषयी पुष्कळ काही शिकायला मिळेल आणि त्यांच्या खेळकर करामतींचा तुम्हाला मनमुराद आनंद घेता येईल. (ईयोब १२:७-९) होय, त्यावेळी कोणत्याही प्राण्याची किंवा मनुष्याची भिती उरणार नाही कारण यहोवा म्हणतो, की ‘माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर कोणी उपद्रव देणार नाही, नासधूस करणार नाही.’

१९, २०. आपल्या आणि जगाच्या लोकांच्या जीवनात काय फरक आहे?

१९ आपण मागील लेखात पाहिल्याप्रमाणे, साल २००० विषयी लोकांच्या मनात तऱ्‍हेतऱ्‍हेच्या शंका-कुशंका आहेत. पण, अचूक भविष्य सांगणे मनुष्याच्या हाती मुळीच नाही त्यामुळे अनेक लोक कोड्यात पडले आहेत आणि जीवनाचा उद्देश शोधू लागले आहेत. कॅनडातील एका विद्यापीठाचे अध्यक्ष, पीटर एम्बरली यांनी लिहिले, की “प्रौढ वयात अनेक लोक जीवनाच्या आवश्‍यक प्रश्‍नांची उत्तरे शोधू लागले आहेत जसे: मी कोण आहे? माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे? भावी पिढीकरता मी काय करत आहे? निम्मे आयुष्य उलटल्यानंतर हे लोक जीवनाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.”

२० अनेक लोकांना असे का वाटते हे तुम्हाला समजण्यासारखे आहे. भविष्यात काय होणार आहे याची त्यांना कल्पना नाही. त्यामुळे जीवनातील रितेपणा भरून काढण्याकरता ते अनेक गोष्टींचा छंद जोपासतात, मनोरंजनाकडे वळतात, मौजमजा करून जीवनाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतात. पण तुमच्यात आणि त्यांच्यात किती फरक आहे; कारण तुम्ही ‘नव्या आकाशाच्या आणि नव्या पृथ्वीच्या’ चार भविष्यवाणींची चर्चा करून हे जाणले आहे की तुमच्याकरता भविष्यात काय राखून ठेवले आहे, आणि ते भविष्य किती आनंदी आणि उज्ज्वल आहे. त्यावेळी, आपण नव्या जगात आपल्या चोहीकडे नजर फिरवू तेव्हा आपल्या तोंडून हे शब्द बाहेर पडल्याशिवाय राहणार नाहीत: “देवाने खरोखरच सर्वकाही नवे केले आहे!”

२१. यशया ६५:२५ मध्ये काय सांगण्यात आले आहे आणि यशया ११:९ मध्ये कोणते कारण देण्यात आले आहे?

२१ नव्या जगात मिळणाऱ्‍या आशीर्वादांची कल्पना करण्यात चुकीचे असे काहीच नाही. पण यहोवाला असे वाटते की आपण आता त्याची उपासना खरेपणाने करावी आणि त्याच्या आशीर्वादांचा अनुभव घ्यावा. अशाप्रकारे तुम्ही त्या नवीन जगात अनंतकाळचे जीवन प्राप्त करण्यास पात्र ठराल; त्यावेळी यहोवाच्या ‘सगळ्या पवित्र डोंगरावर कोणी उपद्रव देणार नाही, नासधूस करणार नाही.’ (यशया ६५:२५) ‘कोणी उपद्रव देणार नाही, कोणाची नासधूस करणार नाही’? ते कसे? यशयाने ११ व्या अध्यायाच्या ९ व्या वचनात याचे उत्तर दिले आहे: “सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्‍वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.”

२२. बायबलच्या चार भविष्यवाणींचा विचार करून आपण काय करण्याचे ठरवले पाहिजे?

२२ होय, ‘यहोवाचे ज्ञान.’ जेव्हा देव सर्वकाही नवे करील तेव्हा सर्व लोकांना यहोवाचे आणि त्याच्या उद्देशांचे अचूक ज्ञान देण्यात येईल. पण केवळ देवाची सृष्टी किंवा प्राणी पाहूनच आपल्याला हे ज्ञान प्राप्त होणार नाही. तुम्हाला बायबलमधून पुष्कळ काही शिकण्यासारखे आहे. उदाहरणार्थ, आपण आता बायबलच्या केवळ एका विषयावर—‘नवे आकाश आणि नवी पृथ्वी’ यांच्या चार भविष्यवाणींवर—चर्चा केली आणि त्याद्वारे आपल्याला भविष्याविषयी कितीतरी माहिती कळाली. (यशया ६५:१७; ६६:२२; २ पेत्र ३:१३; प्रकटीकरण २१:१) जरा विचार करा, तुम्ही असेच सतत देवाच्या वचनाचे वाचन करीत राहाल तर तुम्हाला किती नवनवीन गोष्टी शिकायला मिळतील. तर मग, तुम्ही दररोज बायबल वाचता का? कदाचित तुम्ही असे करत नसाल. पण निराश होऊ नका. तुमच्या दररोजच्या कामात काही फेरबदल करून तुम्ही दररोज बायबल वाचण्यासाठी काही वेळ काढू शकता, बायबल वाचनाला तुमच्या जीवनाचा एक हिस्सा बनवा. नव्या जगात मिळणाऱ्‍या आशीर्वादांची आस धरल्याने तुम्हाला नक्की आनंद प्राप्त होईल, पण त्याहीपेक्षा जास्त आनंद तुम्हाला आज मिळू शकतो. तो कसा? स्तोत्रकर्त्याप्रमाणे देवाच्या वचनाचे दररोज वाचन केल्याने.—स्तोत्र १:१, २.

[तळटीपा]

^ परि. 11 वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित इन्साइट ऑन द स्क्रिप्चर्स, खंड १, पृष्ठ ९०६ पाहा.

तुम्हाला उत्तर देता येईल का?

यशया ६६:२२-२४ येथील भविष्यवाणी मोठ्या प्रमाणात पूर्ण होईल, असे आपण का म्हणू शकतो?

यशया ६६:२२-२४ आणि ६५:२०-२५ येथील भविष्यवाणींच्या वर्णनातील कोणती गोष्ट तुम्हाला जास्त आवडली?

• तुमचे भविष्य उज्ज्वल आहे असे तुम्ही पूर्ण आत्मविश्‍वासाने का म्हणू शकता?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५ पानांवरील चित्रे]

यशया, पेत्र आणि योहान यांनी “नवे आकाश आणि नवी पृथ्वी” यांविषयी भविष्यवाणी केली