व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

लोक तुमच्याविषयी काय म्हणतात?

लोक तुमच्याविषयी काय म्हणतात?

लोक तुमच्याविषयी काय म्हणतात?

‘लोक काय म्हणतात याची मला मुळीच पर्वा नाही!’ कधी रागाच्या भरात तर कधी वैतागून आपण हे काहीसे धाडसी विधान करून जातो. पण हे अवसान त्या क्षणापुरतेच असते. तो क्षण गेल्यावर मात्र आपण अस्वस्थ होतो. का? कारण वास्तविक पाहिल्यास, लोक आपल्याविषयी काय म्हणतात याची प्रत्येकाला काळजी असतेच.

यात गैर असे काहीच नाही. इतरांच्या भावनांची प्रत्येकाने कदर केलीच पाहिजे. आणि ख्रिस्ती असल्यामुळे व यहोवा देवाचे नियुक्‍त सेवक असल्यामुळे आपण तर खासकरून केली पाहिजे; कारण पौलाने म्हटल्याप्रमाणे आपण “जगाला . . . जाहीर प्रदर्शनासारखे झालो आहो.” तेव्हा, आपल्याकडे पाहणारे आपल्याविषयी काय विचार करतात याची काही प्रमाणात तरी चिंता करणे योग्यच आहे. (१ करिंथकर ४:९, इजी टू रीड व्हर्शन) २ करिंथकर ६:३, ४ या वचनांत प्रेषित पौल आपल्याला हा उपयुक्‍त सल्ला देतो: “आम्ही करीत असलेल्या सेवेत काही दोष दिसून येऊ नये म्हणून आम्ही कोणत्याहि प्रकारे अडखळण्यास कारण होत नाही; तर सर्व गोष्टीत देवाचे सेवक म्हणून आम्ही आपली लायकी पटवून देतो.”

आपली लायकी पटवून देण्याचा काय अर्थ होतो? इतरांपुढे स्वतःचा आणि स्वतःच्या चांगल्या गुणांचा उदोउदो करणे असा याचा अर्थ होतो का? नाही. १ पेत्र २:१२ यात म्हटले आहे: “परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्‍यासाठी की, . . . त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून . . . देवाचे गौरव करावे.” त्याअर्थी खरे ख्रिस्ती काही न बोलताही, आपल्या वर्तणुकीतून आपली लायकी पटवून देऊ शकतात! अर्थात, यामुळे आपले नाही तर देवाचे गौरव होते. पण आपल्यालाही फायदा होतोच. कशाप्रकारे, हे आता आपण खासकरून तीन गोष्टींच्या बाबतीत पाहू या.

लग्नाची गोष्ट येते तेव्हा

उदाहरणार्थ, लग्नाचीच गोष्ट घ्या. वैवाहिक सुख यहोवा देवाकडून मिळणारा एक आशीर्वाद आहे. “स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक वंशास . . . पित्यावरून नाव देण्यात येते,” असे बायबल म्हणते. (इफिसकर ३:१५) तुम्हालाही लग्न करावे, संसार करावा असे कदाचित वाटत असेल. पण लोकांचे तुमच्याविषयी काय मत आहे? एक ख्रिस्ती तरुण वा तरुणी या नात्याने तुम्ही अविवाहित असतानाच चांगले नाव कमवले आहे का?

काही देशांत विवाहेच्छूक तरुण तरुणींच्या घरच्यांना ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची वाटते. उदाहरणार्थ, घाना या देशातल्या रिवाजाप्रमाणे, विवाह करू इच्छिणारा मुलगा व मुलगी प्रथम आपल्या आईवडिलांजवळ आपली इच्छा व्यक्‍त करतात. आईवडील ही बाब आपल्या घरच्यांच्या कानावर घालतात. मग मुलाचे जवळचे नातलग ओळखीच्या लोकांकडून मुलीचे चालचलन कसे आहे याविषयी माहिती काढतात. मुलगी सुशील व चारित्र्यवान आहे याची खात्री पटल्यावरच ते मुलीला मागणी घालतात. पण मुलीकडचे देखील लगेच होकार देत नाहीत, ते आधी मुलाच्या चालचलणुकीविषयी चारचौघांकडून चौकशी करून माहिती काढतात आणि खात्री पटल्यावरच पुढचे पाऊल उचलतात. म्हणूनच घानियन भाषेत या अर्थाची एक म्हण आहे, की “चौकशी केल्याशिवाय लग्नाच्या फंदात कधी पडू नये.”

पाश्‍चात्य देशांविषयी काय? कारण तेथे तर मुले व मुली आपल्या पसंतीने लग्न करतात. खरे आहे, पण तेथे देखील प्रौढ ख्रिस्ती स्त्रीपुरुषांनी आपण जिच्याशी विवाह करू इच्छितो त्या व्यक्‍तीला चांगल्याप्रकारे ओळखत असलेल्या लोकांचे प्रामाणिक मत विचारणे शहाणपणाचे ठरेल. कदाचित त्या व्यक्‍तीचे आईवडील किंवा प्रौढ स्नेही तिच्याविषयी माहिती देऊ शकतील. कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य या पुस्तकात सांगितल्यानुसार एखादी तरुणी आपल्या भावी सोबत्याविषयी खालील प्रश्‍न विचारू शकते: “‘या पुरुषाचा नावलौकिक कसा आहे? त्याचे मित्र कोण आहेत? तो आत्मसंयम दाखवतो का? वयस्करांशी तो कसा वागतो? तो कशा प्रकारच्या कुटुंबातील आहे? तो त्यांच्यासोबत कसा व्यवहार राखतो? पैशाबद्दल त्याची मनोवृत्ती काय आहे? तो मद्यार्कांचा दुरुपयोग करतो का? तो तापट स्वभावाचा व हिंसक देखील आहे का? मंडळीच्या कोणत्या जबाबदाऱ्‍या त्याच्याकडे आहेत आणि तो त्या कशा हाताळतो? मी त्याला गाढ आदर देऊ शकते का?’”—लेवीय १९:३२; नीतिसूत्रे २२:२९; ३१:२३; इफिसकर ५:३-५, ३३; १ तीमथ्य ५:८; ६:१०; तीत २:६, ७.” *

त्याचप्रमाणे, ख्रिस्ती पुरुष देखील ज्या मुलीशी लग्न करू इच्छितो तिच्याविषयी काही गोष्टी जाणून घेऊ शकतो. बायबलमध्ये बवाज नावाच्या एका मनुष्याबद्दल सांगितले आहे; त्याने रूथ नावाच्या एका तरुणीशी लग्न करण्याआधी तिच्याबद्दल अशाचप्रकारे इतरांकडून चौकशी केली होती. “मज परक्या स्त्रीवर आपण कृपादृष्टि करून माझा समाचार घेतला याचे काय कारण बरे?” असे रूथने त्याला विचारले तेव्हा तो म्हणाला: “[तुझ्याविषयी] सविस्तर हकीकत मला समजली आहे.” (रूथ २:१०-१२) अर्थात, बवाजने स्वतः रूथचे निरीक्षण केलेच असेल; तिचा विश्‍वासूपणा, कष्टाळूपणा त्याने स्वतः पाहिलाच असेल; पण इतर लोकांकडूनही बवाजला रूथविषयी प्रशंसेचेच उद्‌गार ऐकायला मिळाले.

त्याचप्रकारे, लग्नाचा प्रश्‍न येतो तेव्हा लोक तुमच्याविषयी काय मत व्यक्‍त करतील हे तुमच्या वागणुकीवर अवलंबून आहे. मग या दृष्टिकोनातून, तुम्ही लोकांच्या नजरेत चांगले नाव कमवण्याचा प्रयत्न करत आहात का?

कामाच्या ठिकाणी

तुमचे कामाचे किंवा नोकरीचे ठिकाण, हे आणखी एक असे क्षेत्र आहे जेथे तुमच्या चांगल्या वागणुकीमुळे तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात. आजकाल नोकऱ्‍या सहजासहजी मिळत नाहीत. बऱ्‍याचजणांना वेगवेगळ्या कारणांमुळे नोकरीवरून कमी केले जाते; काहीजणांना त्यांच्या अरेरावी वृत्तीमुळे, काहींना सवयीने कामावर उशीरा येत असल्यामुळे तर काहींना त्यांच्या बेइमानपणामुळे नोकरीवरून काढले जाते. कधीकधी तर कंपनीच्या खर्चात कपात करण्याकरता जुन्या कर्मचाऱ्‍यांना देखील नोकरीवरून काढले जाते. नवी नोकरी शोधताना सहसा पूर्वीच्या मालकाकडे तुमच्या कामाबद्दल, स्वभावाबद्दल आणि अनुभवाबद्दल विचारपूस केली जाते. यहोवाच्या साक्षीदारांपैकी बऱ्‍याचजणांनी आपल्या उत्तम गुणांमुळे मालकांच्या नजरेत चांगले नाव मिळवले आहे; कामाच्या ठिकाणी ते सर्वांशी आदराने वागतात व मिळूनमिसळून राहतात, त्यांचा पेहराव साधाच पण शालीन असतो आणि खासकरून ख्रिस्ती गुणांचे पालन करायला ते सदैव प्रयत्नशील असतात.

यांपैकी एक गुण म्हणजे प्रामाणिकपणा. सहसा मालकांना हाच गुण सर्वात महत्त्वाचा वाटतो. ख्रिस्ती या नात्याने आपण नेहमी प्रामाणिक राहू इच्छितो; पौलाने म्हटल्याप्रमाणे, “सर्व बाबतीत चांगले [“प्रामाणिकपणे,” NW] वागण्याची आमची इच्छा” आहे. (इब्री लोकांस १३:१८) उदाहरणार्थ, घाना देशातल्या एका मायनिंग कंपनीत लहानमोठ्या चोऱ्‍या होत असल्याचे लक्षात आले. कंपनीच्या एका विभागात सुपरव्हायजर म्हणून काम करणाऱ्‍या एका साक्षीदाराला सोडून, सर्वांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. का? कारण कंपनीच्या अधिकाऱ्‍यांना त्या साक्षीदाराबद्दल खात्री होती, त्यांनी वर्षानुवर्षे त्याला प्रामाणिकपणे काम करताना पाहिले होते. शिवाय तो मेहनती असून आपल्या अधिकाऱ्‍यांशी नेहमी आदराने वागतो हेही सर्वांना माहीत होते. साहजिकच, त्याला आपली नोकरी गमवावी लागली नाही, आणि याला कारण होते त्याचे प्रामाणिक वर्तन!

व्यवसायाच्या क्षेत्रात आपली योग्यता पटवून देण्यासाठी ख्रिस्ती या नात्याने आणखी काय करता येण्यासारखे आहे? जे काही काम दिले जाते, त्यात निपुण होण्याचा प्रयत्न करा. (नीतिसूत्रे २२:२९) मेहनतीने आणि पूर्ण मन लावून काम करा. (नीतिसूत्रे १०:४; १३:४) वरिष्ठ अधिकाऱ्‍याशी नेहमी आदरपूर्वक वागा. (इफिसकर ६:५) मालकांना आपल्या कर्मचाऱ्‍यांकडून सहसा ज्या गुणांची अपेक्षा असते आणि ज्या गुणांना ते खास महत्त्व देतात, ते म्हणजे वक्‍तशीरपणा, प्रामाणिकपणा, कार्यक्षमता आणि मेहनतीपणा. तेव्हा हे गुण संपादन करण्याचा खास प्रयत्न करा; हल्ली नोकऱ्‍यांचा दुष्काळ आहे, पण वरती दिलेल्या सूचनांचे पालन केल्यास तुम्हाला काम मिळवायला निश्‍चितच मदत होईल.

मंडळीतल्या जबाबदाऱ्‍यांच्या संदर्भात

यशयाने एक भविष्यवाणी केली होती: “आपल्या डेऱ्‍याची जागा वाढीव, आपल्या राहुट्याच्या कनाथी पसरू दे.” (यशया ५४:२) ही भविष्यवाणी आज पूर्ण होत आहे, म्हणजेच यहोवाची जगव्याप्त मंडळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे आज खासकरून, ख्रिस्ती मंडळीत पुढाकार घेऊ शकतील अशा प्रौढ ख्रिस्ती पुरुषांची खूप गरज आहे.

ख्रिस्ती पुरूषांनो, मंडळीत जबाबदारीच्या पदावर काम करण्यासाठी आपण योग्य आहोत हे तुमच्या वागण्याबोलण्यातून तुम्ही कशाप्रकारे दाखवू शकता? तीमथ्याचे उदाहरण लक्षात घ्या. तो वयाने तसा लहानच होता, पण लूक त्याच्याबद्दल असे सांगतो, की “त्याला लुस्त्रातले व इकुन्यातले बंधु नावाजीत होते.” लहान वयातही, आपल्या चांगल्या वर्तणुकीने तीमथ्याने या दोन्ही शहरातल्या बांधवांची मने जिंकली होती. म्हणूनच पौलाने तीमथ्याला आपल्या सेवाकार्यात सोबती म्हणून निवडले.—प्रेषितांची कृत्ये १६:१-४.

आज जर कोणा ख्रिस्ती पुरुषाला “अध्यक्षाचे [“देखरेख्याचे,” NW] काम” करण्याची इच्छा असेल, तर त्याने काय करावे? हे काम करण्याकरता आपली पात्रता योग्य मार्गाने किंवा देवाला स्वीकार्य अशा मार्गाने तो कशी पटवून देऊ शकतो? आपली नियुक्‍ती व्हावी म्हणून उतावीळ होऊन या ना त्या मार्गाने खटपट करणे योग्य ठरणार नाही; त्याऐवजी, जे आध्यात्मिक गुण अशा जबाबदार पदी काम करणाऱ्‍याच्या व्यक्‍तिमत्त्वात असणे आवश्‍यक आहेत ते गुण विकसित करण्याचा त्याने प्रयत्न केला पाहिजे. (१ तीमथ्य ३:१-१०, १२, १३; तीत १:५-९) प्रचाराच्या व शिष्य बनवण्याच्या कार्यात जास्तीतजास्त भाग घेण्याद्वारे आपण “चांगल्या कामाची आकांक्षा धरितो” हे तो दाखवू शकतो. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) तसेच, त्याने आपल्या आध्यात्मिक बंधू भगिनींविषयी काळजी व्यक्‍त करावी व त्यांच्या सुखदुःखांबद्दल आस्था बाळगावी, अशाने तो मंडळीची जबाबदारी हाताळण्यास योग्य आहे हे दाखवून देऊ शकतो. शिवाय, “पवित्र जनांच्या गरजा भागवा, आतिथ्य करण्यात तत्पर असा,” या पौलाने दिलेल्या सल्ल्याचे देखील तो पालन करतो. (रोमकर १२:१३) हे सर्व करणारा ख्रिस्ती पुरुष अगदी खऱ्‍या अर्थाने ‘देवाचा सेवक म्हणून आपली लायकी पटवून देतो.’

सर्व प्रसंगी

पण चांगले नाव मिळवण्यासाठी किंवा आपली योग्यता पटवून देण्यासाठी आपण “माणसांना खूष करणाऱ्‍या लोकांसारखे” होऊ नये. (इफिसकर ६:६) कारण शेवटी सर्वात महत्त्वाचे काय, तर देवाच्या, अर्थात निर्माणकर्त्या यहोवाच्या नजरेत चांगले नाव मिळवणे. आणि हे आपण त्याच्या सर्व नियमांचे व सिद्धान्तांचे पालन करण्याद्वारे करू शकतो. तुम्ही आध्यात्मिक प्रगती करता आणि यहोवा देवासोबतचा आपला संबंध दृढ करण्याचा प्रयत्न करता तेव्हा आपोआपच सर्वांना तुमची प्रगती दिसून येईल; तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सदस्यांशी, तुमच्या सहकाऱ्‍यांशी आणि ख्रिस्ती बांधवांशी कसे वागता हे ते पाहतील. तुमच्या वागण्याबोलण्यात चंचलपणा नसून स्थैर्य आहे, तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता, दिलेल्या जबाबदाऱ्‍या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडता तसेच तुमच्याठायी नम्रता आहे हे देखील त्यांना दिसून येईल. या सर्व उत्तम गुणांमुळे लोक तुमच्यावर प्रेम करू लागतील, तुमचा आदर करू लागतील; पण, सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही लोकांच्या नजरेत चांगले नाव मिळवण्याचा प्रयत्न करत आहात हे पाहून, यहोवा देवाला तुमचा अभिमान वाटेल!

[तळटीपा]

^ परि. 8 वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित.

[१९ पानांवरील चित्र]

आपल्या मुलाला वा मुलीला ज्या व्यक्‍तीशी लग्न करण्याची इच्छा आहे त्या व्यक्‍तीच्या चालचलणुकीबद्दल अनेक विचारशील आईवडील चारचौघांकडून विचारपूस करतात

[२० पानांवरील चित्र]

इतरांशी विचारशीलपणे वागणारा बांधव, ख्रिस्ती सेवेच्या जबाबदाऱ्‍या हाती घेण्यास आपण योग्य आहोत हे दाखवून देतो