व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

येशूच्या मस्तकावर महागडे तेल ओतण्याविषयी करण्यात आलेल्या तक्रारीची माहिती तीन शुभवर्तमान अहवाल आपल्याला देतात. पण ही तक्रार येशूच्या इतर प्रेषितांनीही केली होती की फक्‍त यहुदानेच?

या घटनेचा वृत्तान्त आपल्याला मत्तय, मार्क आणि योहान या पुस्तकांत वाचायला मिळतो. हे अहवाल वाचल्यावर असे वाटते, की यहुदाने तक्रार करण्यास सुरवात केली आणि नंतर इतर प्रेषितांनीही त्याला साथ दिली. मत्तय, मार्क आणि योहान यांनी दिलेली माहिती बरोबर आहे; परंतु सर्वांचा तपशील एकसारखा नाही. या तिन्ही अहवालांची तुलना केल्यावर आपल्यासमोर संपूर्ण चित्र स्पष्टपणे उभे राहते. शुभवर्तमान पुस्तकांमधील इतर घटनांचे पूर्ण चित्र आपल्याला पाहायचे आहे तर आपण असेच करू शकतो. यावरून, आपल्याला शुभवर्तमानाच्या चारही पुस्तकांची किती आवश्‍यकता आहे हे स्पष्टपणे समजते.

मत्तय २६:६-१३ या वचनांवरून आपल्याला, ही घटना बेथानी येथील कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी घडल्याची माहिती मिळते पण ज्या स्त्रीने येशूच्या मस्तकावर तेल ओतले त्या स्त्रीचे नाव त्यात दिलेले नाही. मत्तय म्हणतो: ‘हे पाहून शिष्य रागावले’ आणि हे तेल विकून मिळालेले पैसे गोरगरिबांना देता आले असते अशी तक्रार करू लागले.

मार्कच्या अहवालात जरा सविस्तर माहिती आहे. तो म्हणतो, की त्या स्त्रीने ज्या कुपीत तेल आणले ती कुपी तिने फोडली. त्या कुपीत ‘जटामांसीचे’ सुवासिक तेल होते. हे तेल त्या काळात भारतातून आणून विकले जात असावे. तक्रार करणाऱ्‍यांविषयी मार्क म्हणतो: ‘कित्येक जण आपसात चडफडले,’ व ‘ते तिच्याविषयी कुरकूर करू लागले.’ (मार्क १४:३-९) तर हे दोन्ही अहवाल दाखवून देतात, की तक्रार करणारा यहुदा एकटाच नव्हता तर इतर प्रेषितांनीही तक्रार केली. पण या तक्रारीची सुरवात कशी झाली?

प्रत्यक्ष साक्षीदार असलेला योहान याबद्दलची माहिती देतो. ती स्त्री मार्थाची आणि लाजरची बहीण मरीया होती असे तो म्हणतो. त्याने हेही सांगितले, की मरीयेने ‘येशूच्या चरणास तेल लावले आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले.’ याआधीच्या वृत्तांतात येशूच्या डोक्यावर तेल ओतल्याचे सांगण्यात आले असल्यामुळे योहानाने दिलेल्या माहितीत तफावत आहे असा समज आपण करून घेऊ नये. योहानाचा वृत्तांत आधीच्या वृत्तांताशी पूर्णपणे सुसंगत असून त्यावरून आपल्याला कळते, की मरीयेने येशूच्या मस्तकावर आणि पायांवरही ‘जटामांसीचे’ तेल ओतले. योहान येशूचा जिवलग मित्र असल्यामुळे येशूविरुद्ध कोणी काही बोलायची हिंमत केलीच तर त्याने त्याला कच्चे खाल्ले असते. या घटनेविषयी तो लिहितो: “त्याच्या शिष्यांतील एक जण यहूदा इस्कर्योत जो त्याला धरून देणार होता, तो म्हणाला, हे सुगंधी तेल तीनशे रूपयांस विकून ते गरिबांस का दिले नाहीत?”—योहान १२:२-८.

योहानाने लिहिलेल्या शब्दांवरून आपल्याला समजते, की यहुदा येशूच्या “शिष्यांतील एक” असूनही त्याला दगा देणार होता व हे योहानाला माहीत असल्यामुळे त्याला त्याचा फार राग आला होता. ‘यहुदा त्याला धरून देणार होता,’ असे म्हणण्याद्वारे योहान सांगू इच्छित होता, की येशूचा विश्‍वासघात करण्याचा विचार यहुदाच्या मनात खूप दिवसांपासून रेंगाळत होता. याविषयी, ग्रीक भाषेचे विद्वान डॉ. सी. मथनी असे म्हणतात, की योहान १२:४ येथे योहानाने ज्या व्याकरणाचा उपयोग केला आहे त्यावरून, येशूचा विश्‍वासघात करण्याची कल्पना यहुदाच्या मनात अचानकच आली नव्हती तर अनेक दिवसांपासून तो मनात कट रचत होता. योहान पुढे आपल्याला हेही सांगतो, की यहुदाला “गरिबांची काळजी होती म्हणून तो हे म्हणाला असे नाही; तर तो चोर असून त्याच्याजवळ [पैशांची] डबी होती, व तिच्यात जे टाकण्यात येई ते तो चोरून घेई, म्हणून तो असे म्हणाला.”

या सर्व गोष्टींवरून आपल्याला कळते, की तक्रारीची सुरवात खरेतर यहुदाने केली होती कारण तो लालची बनला होता. ते तेल विकून मिळणारे पैसे, पैशांच्या पेटीत टाकल्यावर तो हडप करू शकत होता. यहुदाने गोरगरिबांचा उल्लेख केला तेव्हा इतर प्रेषितांनाही कदाचित त्याचे म्हणणे पटले असावे व म्हणूनच त्यांनीही त्याला साथ दिली. परंतु, एक गोष्ट मात्र खरी, की तक्रारीची सुरवात यहुदानेच केली व त्याने इतरांनाही भडकवले.