व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सांत्वनाच्या शोधात . . . सारेच!

सांत्वनाच्या शोधात . . . सारेच!

सांत्वनाच्या शोधात . . . सारेच!

“गांजलेल्याचे अश्रु गळत आहेत, पण त्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही, त्यांजवर जुलम करणाऱ्‍यांच्या ठायी बळ आहे, पण गांजलेल्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही.”उपदेशक ४:१.

तुम्ही देखील सांत्वनाचे दोन शब्द ऐकायला आसूसलेले आहात का? दुःखाचे सावट दूर होऊन जीवनात आशेचा एक तरी किरण यावा असे तुम्हाला वाटते का? कटू अनुभवांमुळे आलेला निरसपणा जाऊन जीवन जरा तरी सुखकर व्हावे अशी उत्कट इच्छा तुम्हाला आहे का?

कधी न कधी सर्वांनाच या अनुभवातून जावे लागते. कारण आज जीवन दुःखाने भरले आहे. कोणीतरी आपले दुःख समजून घ्यावे, सांभाळावे, आपल्यावर प्रेम करावे, आपल्याला दिलासा द्यावा असे कोणाला वाटत नाही? पण या इच्छा सहसा पूर्ण होताना दिसत नाहीत. काहीजण वाढत्या वयाच्या दुखण्यांनी जर्जर झाले आहेत. तर काहींना जीवनात काहीच मनाप्रमाणे घडून न आल्यामुळे घोर निराशेने ग्रासले आहे. काहींना जीवघेणा रोग झाल्यामुळे त्यांच्यावर अक्षरशः आभाळ कोसळले आहे.

अलीकडच्या काळात घडलेल्या घटनांमुळे देखील आज अनेक लोक दुःखाच्या खाईत लोटल गेले आहेत. गेल्या शंभर वर्षांतच दहा कोटी लोक युद्धांत मृत्यूमुखी पडले. * यासर्वांचे कुटुंबीय—आईवडील, भाऊबहिणी, पोरकी झालेली बायकामुले—यांच्या दुःखाची कल्पना करा. १०० कोटींपेक्षा जास्त लोक भयंकर दारिद्र्‌यात दिवस कंठत आहेत. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी निम्म्या लोकांना दवाखान्यांची किंवा आवश्‍यक औषधोपचाराची सोय उपलब्ध नाही. प्रदूषित झालेल्या मोठमोठ्या शहरांच्या रस्त्यांवर लाखो मुले भटकताना दिसतात; आईवडिलांनी टाकून दिलेली ही मुले कोवळ्या वयातच ड्रग्स आणि वेश्‍याव्यवसायाच्या जाळ्यात सापडतात. रेफ्युजी कॅम्प्समध्ये देखील लाखो लोक खितपत पडले आहेत.

पण या संख्या कितीही मोठ्या असल्या तरी एकेका व्यक्‍तीला सहन कराव्या लागलेल्या यातना, दुःख, निव्वळ संख्येतून व्यक्‍त केले जाऊ शकत नाही. स्वेतलानाचे उदाहरण पाहा. रशियात एका अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेली ती एक तरुणी आहे. * ती म्हणते: “आम्ही खूपच कठीण परिस्थितीत दिवस काढत होतो; माझ्या स्वतःच्या आईवडिलांनी मला भीक मागायला, चोरी करायला पाठवलं. आमचं घर, घर राहिलं नव्हतं. घरच्यांनीच माझी अब्रू लुटली. नंतर मी एका हॉटेलात वेट्रेसचं काम करू लागले; माझा पूर्ण पगार आईच घ्यायची; ती मला धमकी द्यायची की ही नोकरी हातातून गेली तर मी आत्महत्या करेन. या सर्व प्रकाराला कंटाळून शेवटी मी वेश्‍याव्यवसायाकडे वळाले. तेव्हा मी फक्‍त १३ वर्षांची होते. मला दिवस गेले आणि मग गर्भपात झाला. १५ वर्षांच्या कोवळ्या वयात ३० वर्षांच्या प्रौढ स्त्रीसारखी मी दिसू लागले.”

लॅटविया येथे राहणारा लायमनिस नावाचा एक तरुण अगदी निराश होऊन आपली व्यथा सांगतो. एकोणतीस वर्षांचा असताना त्याचा अपघात झाला आणि त्यात त्याचे कमरेखालचे शरीर लुळे झाले. त्याला जीवनात कोणतीच आशा उरली नाही; दुःख विसरण्यासाठी तो दारू पिऊ लागला. लुळा तर तो झालाच होता, पण आता पाच वर्षांच्या अवधीत तो पूर्णपणे दारूच्या आहारी गेला होता. त्याला सांत्वनाची अत्यंत गरज होती, पण ते मिळवण्याचा कोणताच मार्ग त्याला दिसत नव्हता.

ॲन्जी नावाच्या एका स्त्रीचेही उदाहरण विचारात घ्या. तिच्या पतीची तीन वेळा ब्रेन सर्जरी करण्यात आली होती. यामुळे त्याचे अर्धे शरीर लुळे पडले. तिसऱ्‍या सर्जरीच्या पाच वर्षानंतर तो एका भंयकर अपघातातून कसाबसा जिवंत बचावला. इमर्जेंसी रूममध्ये ॲन्जी आली तेव्हा तो कोमात गेलेला होता; त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता. काहीतरी भयंकर घडणार अशी ॲन्जीला भीती वाटू लागली. आपले आणि आपल्या कुटुंबाचे आता कसे होणार या विचारानेच ती शहारली. तिला आधाराची आणि सांत्वनाची अत्यंत गरज होती, पण तो कोठून मिळणार?

काही वर्षांपूर्वी पॅट नावाच्या एका स्त्रीला आलेला अनुभव लक्षात घ्या. तो हिवाळ्याचा दिवस तिला इतर दिवसांसारखाच वाटला होता. पण पुढचे तीन दिवस काय काय घडले हे आता तिला अजिबात आठवत नाही. तिच्या पतीने नंतर सांगितले की तिला छातीत खूप कळा आल्या आणि मग तिला हृदयविकाराचा मोठा झटका आला. आधी तर तिचे हृदय खूप जोरजोरात धडधडू लागले आणि मग पूर्णपणे थांबले. तिचा श्‍वासोच्छ्‌वासही थांबला. पण तिचा मेंदू अजूनही काम करत होता. कित्येक दिवस तिला दवाखान्यात राहावे लागले; ती सांगते: “इतक्या वेगवेगळ्या टेस्ट्‌स घेतल्या जायच्या, की नाव काढलं तरी मला भीती वाटायची. झटका आल्यानंतर जसं माझं हृदय जोरात धडधडून अचानक बंद पडलं होतं, त्याप्रमाणेच एका चाचणीसाठी ते माझ्या हृदयाचे ठोके खूप वाढवायचे आणि मग पूर्णपणे थांबवायचे.” या कठीण अनुभवांत तिला सांत्वन कोठून मिळाले?

जो आणि रिबेका यांचा १९ वर्षांचा मुलगा एका अपघातात मरण पावला. ते सांगतात: “एवढं मोठं दुःख याआधी आम्हाला कधीच झेलावं लागलं नव्हतं. इतरांना कठीण प्रसंगांत आम्ही सांत्वन दिलं होतं पण प्रत्यक्ष आमच्यावर हे भयंकर संकट कोसळलं तेव्हा आम्हाला दुःख काय असतं हे कळलं.” आपल्या प्रिय माणसाला कायमचे गमावण्याच्या या ‘भयंकर संकटाला’ तोंड देताना कोणते सांत्वन मिळू शकते?

या सर्वांना आणि यांच्यासारख्या लाखो जणांना खरे सांत्वन आणि समाधान मिळाले आहे. तुम्हालाही सांत्वनाची गरज आहे का? कृपया पुढचा लेखही वाचा.

[तळटीपा]

^ परि. 5 युद्धांत मृत्युमुखी पडलेल्या एकूण सैनिकांची व सामान्य नागरिकांची संख्या माहीत झालेली नाही. १९९८ सालच्या फॅक्ट्‌स अबाउट अमेरिकन वॉर्स या वार्षिक पुस्तकात दुसऱ्‍या महायुद्धाबद्दल असे सांगितले आहे: “दुसऱ्‍या महायुद्धात मृत्युमुखी पडलेल्यांची (सैनिक व नागरिक) एकूण संख्या बऱ्‍याच वृत्तांनुसार ५ कोटी सांगितली जाते; परंतु, सदर विषयाचा अभ्यास करणाऱ्‍यांचे असे मत आहे की ही संख्या वास्तवात फार मोठी, दुप्पटही असू शकते.”

^ परि. 6 नाव बदलले आहे.

[३ पानांवरील चित्राचे श्रेय]

UNITED NATIONS/PHOTO BY J. K. ISAAC

UN PHOTO १४६१५० BY O. MONSEN