व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

हिंसक लोकांबद्दल तुमचाही दृष्टिकोन देवासारखा आहे का?

हिंसक लोकांबद्दल तुमचाही दृष्टिकोन देवासारखा आहे का?

हिंसक लोकांबद्दल तुमचाही दृष्टिकोन देवासारखा आहे का?

शक्‍तिशाली आणि धाडसी लोकांची पूर्वीपासूनच खूप प्रशंसा केली जाते तसेच त्यांचा आदर देखील केला जातो. प्राचीन ग्रीसच्या दंतकथेत असाच एक शूरवीर होता. रोमी लोक त्याला हेरक्लीझ या नावाने ओळखायचे.

हे रक्लीझ शूरवीर होता. दंतकथेनुसार तो, अर्धदेवता होता म्हणजे त्याचा जन्म झ्यूस नावाचा ग्रीक देव व अल्कमीनी नावाच्या मानवी स्त्रीकडून झाला होता. तो पाळण्यात होता तेव्हापासूनच त्याच्या करामती सुरू झाल्या. एका मत्सरी देवीने त्याला ठार मारण्यासाठी त्याच्या पाळण्यात दोन सर्प पाठवले तेव्हा हेरक्लीझने त्यांचा निःपात केला होता. मोठेपणी देखील त्याने अनेक युद्धे लढली, राक्षसांना पराभूत केले आणि आपल्या मैत्रिणीला वाचवण्यासाठी तो मृत्यूशी देखील झगडला. याशिवाय त्याने अनेक शहरांना उद्ध्‌वस्त केले, स्त्रियांवर बलात्कार केले, एका मुलाला उंच बुरूजावरून खाली भिरकावून दिले आणि आपल्या पत्नीला व मुलांना ठार मारले.

हेरक्लीझ हा खराखुरा नसून दंतकथेतील वीर होता तरीपण ज्या ज्या ठिकाणी ग्रीक संस्कृतीचा प्रभाव होता त्या त्या ठिकाणी त्याचे पोवाडे गायिले जातात. रोमी लोक त्याची पूजा करीत; व्यापारी आणि प्रवासाला निघालेले लोक समृद्धता आणि संकटापासून सुरक्षा मिळावी म्हणून त्याला प्रार्थना करत असत. हजारो वर्षांपासून त्याच्या करामतींचे लोकांना विलक्षण आकर्षण आहे.

दंतकथेची सुरवात

पण हेरक्लीझ आणि इतर पौराणिक वीर खरोखरच अस्तित्वात होते का? एका दृष्टीने, याची शक्यता नाकारता येत नाही. कारण बायबल, मानव इतिहासाच्या सुरवातीच्या काळाविषयी सांगते की तेव्हा “देवता” व “अर्धदेवता” पृथ्वीवर अस्तित्वात होते.

त्या काळाविषयी मोशेने लिहिले: “नंतर भूतलावर मनुष्यांची वाढ होऊ लागली आणि त्यांस कन्या झाल्या तेव्हा मानवकन्या सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले, व त्यातल्या ज्या त्यांना आवडल्या त्या त्यांनी बायका केल्या.”—उत्पत्ति ६:१, २.

हे ‘देवपुत्र’ मानव नव्हते तर देवदूत होते. (पडताळा ईयोब १:६; २:१; ३८:४, ७.) बायबलचा आणखी एक लेखक यहुदा त्यांच्याविषयी म्हणतो की त्यांनी “आपले अधिकारपद न राखता आपले वसतिस्थान सोडले.” (यहूदा ६) दुसऱ्‍या शब्दांत सांगायचे तर, देवाच्या स्वर्गीय संघटनेत त्यांना जे नेमलेले स्थान होते ते त्यांनी सोडले व पृथ्वीवर सुंदर स्त्रियांबरोबर राहणे पसंत केले. हे बंडखोर देवदूत सदोम आणि गमोराच्या लोकांप्रमाणे होते. या लोकांनी “जारकर्म करून अन्यकोटीतील अंगांशी संग केला.”—यहूदा ७.

या अवज्ञाकारक देवदूतांच्या कार्यांबद्दल बायबल आपल्याला सविस्तर तपशील देत नाही. तरीपण, ग्रीसच्या आणि इतरही काही संस्कृतींतील प्राचीन दंतकथांमध्ये, दृश्‍यरीत्या किंवा अदृश्‍यरीत्या अनेक देवीदेवतांचा पृथ्वीवर वावर असल्याचे वर्णन आहे. त्यांनी जेव्हा मानवरुप धारण केले तेव्हा ते अतिशय रूपवान दिसायचे. ते खायचे, प्यायचे व आपापसांत व मानवांशी लैंगिक संबंधही ठेवायचे. ते स्वतःला पवित्र व अमर म्हणवून घ्यायचे पण लबाडी, फसवाफसवी, भांडण-तंटे, भूलवणे, बलात्कार यासारखी वाईट कृत्येही ते करायचे. त्यांच्या या करामतींच्या कथा-कहाण्या बनवून किंवा मिर्चमसाला लावून त्या लोकांना सांगितल्या जातात. परंतु त्यांतील घटना, बायबलमधील उत्पत्ती नामक पुस्तकात जलप्रलयाआधी घडलेल्या घटना यांत विलक्षण साम्य आहे.

प्राचीनकाळचे नामांकित पुरुष

मानवी देह धारण केलेल्या या अवज्ञाकारी देवदूतांनी पृथ्वीवरील स्त्रियांबरोबर लैंगिक संबंध ठेवले आणि या स्त्रियांना मुले झाली. ही मुले सर्वसाधारण मुले नव्हती. ते नेफेलिम होते; अर्धे मानव अर्धे देवदूत. बायबलमधील अहवाल त्यांच्याविषयी म्हणतो: “त्या दिवसांत महाकाय पृथ्वीवर होते, आणि त्यानंतर जेव्हा देवाचे मुलगे मनुष्यांच्या मुलींपाशी आले, आणि त्यांच्यापासून त्यांना मुले झाली तेव्हांहि होते; प्राचीन काळी जे बलवान्‌ नामांकित पुरुष होते ते हेच.”—उत्पत्ति ६:४, पं.र.भा.

“नेफेलिम” या इब्री शब्दाचा अक्षरशः अर्थ, “पाडणारे,” किंवा हिंसक कृत्ये करून इतरांना पाडणारे असा होतो. तेव्हा, “पृथ्वी . . . जाचजुलमांनी भरली होती,” असे जेव्हा बायबल म्हणते त्यात आश्‍चर्य करण्यासारखे काही नाही. (उत्पत्ति ६:११) दंतकथांतील हे अर्धदेवता जसे की हेरक्लीझ आणि बॅबिलोनी वीर गिलगामेश व बायबलमध्ये नेफेलिम यांत बरेच साम्य आहे.

नेफेलिमांना “बलवान्‌” व “नामांकित पुरुष” असे म्हटले आहे हे लक्षात घ्या. त्याच काळात राहणारा नोहा नावाचा मनुष्य त्यांच्यापेक्षा खूप वेगळा होता. तो खूप धार्मिक होता. नेफेलिमांना यहोवाचे नाव उंचावण्यात काहीही स्वारस्य नव्हते. त्यांना फक्‍त स्वतःचे नाव आणि वैभव कमवायचे होते. हिंसा आणि रक्‍तपात करून त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केलं. यामुळे त्यांचा चांगला दरारा होता, लोक त्यांचा आदर करू लागले व त्यांना देव मानू लागले.

नेफेलिम आणि नीतिभ्रष्ट असलेल्या त्यांच्या देवदूत पित्यांनी लोकांमध्ये नाव कमावले असले तरीसुद्धा देवाच्या नजरेतून ते पूर्णपणे उतरले. त्यांची जीवनशैली घृणास्पद होती. परिणामतः देवाने या पतित देवदूतांविरुद्ध कारवाई केली. प्रेषित पेत्राने त्यांच्याविषयी असे लिहिले: “ज्या दूतांनी पाप केले त्यांना देवाने सोडले नाही, तर तार्तारोसांत टाकून न्यायाकरिता राखण्यासाठी निबिड काळोखाच्या बंधनांमध्ये ठेवले; आणि त्याने प्राचीन जगालाहि सोडले नाही, तर आठवा माणूस नोहा जो न्यायीपणाची घोषणा करणारा त्याला सातांसहित रक्षिले, आणि अभक्‍तांच्या जगावर महापूर आणला.”—२ पेत्र २:४, ५, पं.र.भा.

विश्‍वव्यापी जलप्रलयाच्या वेळी, देहधारण केलेल्या देवदूतांनी पुन्हा एकदा देवदूतांचे आत्मिक रूप धारण केले. परंतु देवाने त्यांना अशी शिक्षा दिली की ते पुन्हा मानवी शरीर धारण करू शकले नाहीत. आणि त्यांची संतती अर्थात नेफेलिम जलप्रलयात नष्ट झाली. फक्‍त नोहा आणि त्याचे छोटेसे कुटुंब जलप्रलयातून वाचले.

आजचे शूरवीर

आज तर पृथ्वीवर देवीदेवता किंवा अर्धदेवता नाहीत. पण हिंसा मात्र सर्वत्र आहे. आजच्या शूरवीरांचा, पुस्तकांमध्ये, चित्रपटांमध्ये, टेलिव्हिजनवर आणि संगिताद्वारे उदोउदो केला जातो. एका गालावर चापट खाल्यावर हे शूरवीर दुसरा गाल पुढे करतील का? आणि, आपल्या शत्रूंवर प्रेम करणे, शांती राखणे, क्षमा करणे किंवा अहिंसेचे तत्त्व पाळणे त्यांना कसे जमेल? (मत्तय ५:३९, ४४; रोमकर १२:१७; इफिसकर ४:३२; १ पेत्र ३:११) उलट, ज्यांना तरवारी चालवायला येतात, ज्यांना स्वतःचा सूड स्वतः घेता येतो, ‘ईंट का जवाब पत्थर से’ द्यायला येतो असेच लोक आज शूरवीर बनतात. *

अशा हिंसक लोकांबद्दल नोहाच्या दिवसांत यहोवाचा जो दृष्टिकोन होता तोच आजही आहे. यहोवा हिंसक प्रवृत्तीच्या लोकांना डोक्यावर बसवत नाही किंवा त्यांच्या करामतींचे त्याला जराही कौतुक वाटत नाही. स्तोत्रकर्त्याने गायिले: “यहोवा न्यायीला पारखतो, पण त्याचा जीव दुष्ट व जुलमाची आवड धरणारा यांस द्वेष करतो.”—स्तोत्र ११:५, पं.र.भा.

एक वेगळ्या प्रकारची शक्‍ती

हिंसक लोकांच्या अगदी उलट एक प्रसिद्ध मनुष्य आहे. तो आहे येशू ख्रिस्त. तो शांतीप्रिय आहे. पृथ्वीवर असताना त्याने कोणत्याही प्रकारचा “जुलूम” केला नाही. (यशया ५३:९, पं.र.भा) त्याचे शत्रू त्याला गेथशेमाने बागेत पकडायला आहे तेव्हा त्याच्या अनुयायांजवळ तरवारी होत्या. (लूक २२:३८, ४७-५१) यहुद्यांच्या हाती त्याला सोपवून द्यायच्या ऐवजी ते तरवारी काढून त्याचे संरक्षण करू शकत होते.—योहान १८:३६.

आणि प्रेषित पेत्राने तर तसा प्रयत्नही केला. परंतु येशूने त्याला म्हटले: “तुझी तरवार परत जागच्या जागी घाल, कारण तरवार धरणारे सर्व जण तरवारीने नाश पावतील.” (मत्तय २६:५१, ५२) होय, हिंसेचे फळ हिंसाच आहे; इतिहासाने अनेकदा याची साक्ष दिली आहे. हिंसेचा अवलंब करून स्वतःचा बचाव करण्याची संधी असतानाही येशूने एका वेगळ्या मार्गाने आपला बचाव केला. नंतर तो पेत्राला म्हणाला: “तुला असे वाटते काय की, मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही, आणि आताच्या आता तो मला देवदूतांच्या बारा सैन्यांपेक्षा अधिक पाठवून देणार नाही?”—मत्तय २६:५३.

हिंसेचा अवलंब करण्याऐवजी किंवा देवदूतांचे साहाय्य मागण्याऐवजी येशूने, जे लोक त्याला ठार मारणार होते त्यांच्या हाती स्वतःला सोपवून दिले. याचे एक कारण हे, की पृथ्वीवरील दुष्टाईचा अंत करण्याची आपल्या पित्याची ठरवलेली वेळ अद्याप आलेली नव्हती हे त्याला माहीत होते. कायदा आपल्या हातात घेण्याऐवजी तो यहोवावर विसंबून राहिला.

हे दुबळेपणाचे नव्हे तर आंतरीक शक्‍तीचे चिन्ह आहे. यहोवा उचित समयी व उचित वेळी सर्व काही ठीकठाक करील यावर येशूचा पक्का विश्‍वास होता. त्याच्या या आज्ञाधारक मनोवृत्तीमुळेच त्याला यहोवाच्या अगदी खालोखालचे स्थान मिळाले. प्रेषित पौलाने येशूविषयी असे लिहिले: “त्याने मरण, आणि तेहि वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. ह्‍यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले, आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले; ह्‍यात हेतु हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा, आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभु आहे असे कबूल करावे.”—फिलिप्पैकर २:८-११.

हिंसेचा अंत करण्याविषयी यहोवाचे वचन

खरे ख्रिस्ती येशूच्या उदाहरणानुसार व शिकवणींनुसार आपले जीवन व्यतित करतात. जगातील लोकप्रिय व हिंसक लोकांचे ते कौतुक करत नाहीत किंवा त्यांचे अनुकरण करत नाहीत. देवाच्या नियुक्‍त वेळी, नोहाच्या दिवसांतील वाईट लोकांप्रमाणे आजच्या जगातील हिंसक व वाईट लोकांचाही कायमचा अंत केला जाईल, हे त्यांना माहीत आहे.

यहोवा देव पृथ्वीचा आणि मानवजातीचा निर्माणकर्ता आहे. तोच सार्वभौमही आहे. (प्रकटीकरण ४:११) एखाद्या मानवी न्यायाधीशाला जर न्यायदंड देण्याचा कायदेशीर अधिकार आहे तर देवाला त्याच्यापेक्षाही अधिक अधिकार आहे. त्याच्या धार्मिक तत्त्वांचे तो स्वतः पालन करतो; तसेच, जे लोक त्याच्यावर प्रेम करतात अशा लोकांवर त्याचेही प्रेम असल्यामुळे, सर्व दुष्टाईचा आणि दुष्टांचा अंत केल्याशिवाय तो राहणार नाही.—मत्तय १३:४१, ४२; लूक १७:२६-३०.

दुष्टाईचा अंत झाल्यावर पृथ्वीवर कायमची शांती नांदेल. या शांतीचा पाया न्याय आणि धार्मिकता यावर आधारित असेल. येशू ख्रिस्ताविषयीच्या एका भविष्यवाणीत असे भाकीत केले होते: “आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे; त्याच्या खांद्यावर सत्ता राहील; त्याला अद्‌भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपति म्हणतील. त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार; तो दावीदाच्या सिंहसनावर बसून त्याचे साम्राज्य चालवील आणि तेथून पुढे ते सर्वकाळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्‍वराचा आवेश हे सिद्धीस नेईल.”—यशया ९:६, ७.

तेव्हा “जुलूम करणाऱ्‍याशी स्पर्धा करू नको. त्याची कोणतीहि रीत स्वीकारू नको. कारण परमेश्‍वराला कुटिलाचा वीट आहे. पण सरळांबरोबर त्याचे रहस्य आहे,” या प्राचीन ईश्‍वरप्रेरित सल्ल्याकडे ख्रिस्तीजन कान देतात.—नीतिसूत्रे ३:३१, ३२.

[तळटीपा]

^ परि. 17 पुष्कळ व्हिडिओ गेम्स आणि विज्ञान कथांवर आधारित चित्रपटांमधील हिंसक पात्रांमध्ये असे गुण आणखीनच रंगवून दाखवले जातात.

[२९ पानांवरील संक्षिप्त आशय]

आजकालचे शूरवीर ‘ईट का जवाब पत्थर से’ देत असल्यामुळे त्यांना शक्‍तिमान किंवा बलवान समजले जाते

[२६ पानांवरील चित्राचे श्रेय]

Alinari/Art Resource, NY