व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर”

“आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर”

“आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर”

यहोवाने शमुवेल संदेष्ट्याला सांगितले: “मानवासारखे परमेश्‍वराचे पाहणे नसते; मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्‍वर हृदय पाहतो.” (१ शमुवेल १६:७) स्तोत्रकर्त्या दावीदाने देखील लाक्षणिक हृदयाचा उल्लेख केला होता; आपल्या एका स्तोत्रात त्याने गायिले: “तू [यहोवा] माझे हृदय पारखिले आहे, रात्री तू माझी झडती घेतली आहे, तू मला तावूनसुलाखून पाहिले आहे, तरी तुला काही आढळले नाही.”—स्तोत्र १७:३.

होय, यहोवा आपले अंतःकरण पाहतो आणि त्यावरून आपण कशाप्रकारची व्यक्‍ती आहोत हे ठरवतो. (नीतिसूत्रे १७:३) म्हणूनच, प्राचीन इस्राएलच्या राजा शलमोनाने असा सल्ला दिला: “सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यांत जीवनाचा उगम आहे.” (नीतिसूत्रे ४:२३) आपल्या लाक्षणिक हृदयाचे किंवा अंतःकरणाचे रक्षण कसे करता येऊ शकते? या प्रश्‍नाचे उत्तर आपल्याला नीतिसूत्राच्या चवथ्या अध्यायात सापडते.

आपल्या बापाचे शिक्षण ऐका

नीतिसूत्राच्या चवथ्या अध्यायाची सुरवात या शब्दांनी होते: “मुलांनो, बापाचे शिक्षण ऐका, व सुज्ञता समजण्यासाठी त्याकडे लक्ष द्या. कारण मी तुम्हास उत्तम धर्मोपदेश करितो; माझे धर्मशास्त्र सोडू नका.”—नीतिसूत्रे ४:१, २.

युवकांनी आपल्या देव-भिरू पालकांचा उपदेश ऐकावा, विशेषतः पित्याचा उपदेश ऐकावा असे सांगितले गेले आहे. कारण कुटुंबाच्या शारीरिक आणि आध्यात्मिक गरजा भागवण्याची शास्त्रवचनीय जबाबदारी पित्यालाच सोपवलेली आहे. (अनुवाद ६:६, ७; १ तीमथ्य ५:८) वडिलांकडून कोणतेही मार्गदर्शन न मिळणाऱ्‍या युवकांना प्रौढावस्थेत पोहंचणे एक आव्हानच असते. म्हणून लहान मुलांनी आपल्या वडिलांच्या शिक्षणाबद्दल आदर दाखवून ते शिक्षण स्वीकारणे उचित नाही का?

पण, ज्यांना वडीलच नाहीत त्यांना हे मार्गदर्शन कोण देणार? उदाहरणार्थ, ११ वर्षांच्या जेसनचे वडील तो चार वर्षांचा असतानाच वारले. * एकदा ख्रिस्ती मंडळीतल्या एका वडिलांनी जेसनला विचारले: ‘तुला सगळ्यात जास्त कशाचं वाईट वाटतं?’ त्यावर जेसन पटकन म्हणाला: “मला वडील नाहीत त्याचंच सर्वात वाईट वाटतं. काहीवेळा तर मला हे दुःख अनावर होतं.” पण ज्या युवकांना पालकांचे मार्गदर्शन नाही त्यांना निराश व्हायची गरज नाही. ख्रिस्ती मंडळीतले वडील आणि इतर प्रौढ जण जेसनसारख्या तरुणांना पित्यासमान सल्ला देऊ शकतात.—याकोब १:२७.

आपल्याला मिळालेल्या शिक्षणाची आठवण करत शलमोन राजा म्हणतो: “मी आपल्या बापाचा पुत्र होतो. माझ्या आईच्या दृष्टीने मी सुकुमार व एकुलता एक होतो.” (नीतिसूत्रे ४:३) शलमोनाला आपल्या बालपणीच्या सुखद आठवणी होत्या असे आपल्याला यावरून कळते. तो “आपल्या बापाचा पुत्र” होता म्हणजेच तो आपल्या वडिलांचा सल्ला ऐकत असे. आपल्या पित्याबरोबर अर्थात दावीदाबरोबर त्याचे फार जवळचे आणि सलगीचे नाते राहिले असेल. शिवाय, शलमोन “एकुलता एक” होता; यामुळे साहजिकच तो फार लाडका असेल. म्हणून, प्रेमाचे वातावरण असणे, आईवडील आणि मुलांमध्ये कसलाही दुरावा नसणे किती महत्त्वाचे आहे, नाही का?

बुद्धी आणि समजशक्‍ती संपादन करा

आपल्या पित्याने दिलेला प्रेमळ सल्ला आठवून शलमोन म्हणतो: “ते मला शिकवी व म्हणे, माझी वचने तुझ्या चित्ती राहोत; तू माझ्या आज्ञा पाळ व दीर्घायु हो; बुद्धी संपादन कर, समजशक्‍ती संपादन कर; ती विसरू नको, माझ्या तोंडच्या वचनाला पराङ्‌मुख होऊ नको; ती [बुद्धी] सोडू नको म्हणजे ती तुझे संरक्षण करील; तिची आवड धर म्हणजे ती तुझा सांभाळ करील. बुद्धी ही श्रेष्ठ आहे म्हणून ती संपादन कर; आपली सर्व संपत्ति वेचून समजशक्‍ती संपादन कर.”—नीतिसूत्रे ४:४-७, NW.

बुद्धी ही “श्रेष्ठ” का आहे? ज्ञान आणि समजशक्‍ती यांना कार्यात उतरवून उत्तम परिणाम मिळवणे यालाच बुद्धी म्हणतात. बुद्धी प्राप्त करण्यासाठी ज्ञान असणे सर्वात मूलभूत गोष्ट आहे. ज्ञान म्हणजे, परीक्षण आणि अनुभव किंवा वाचन आणि अभ्यास यांच्याद्वारे वस्तुस्थिती माहीत करून घेणे अथवा जाणून घेणे. पण ज्ञानाचा योग्य वापर करण्याची क्षमता आपल्याजवळ नसली तर त्या ज्ञानाचा काहीएक फायदा नाही. यास्तव, बायबलचे आणि ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाकरवी’ उपलब्ध करून दिलेल्या बायबल आधारित प्रकाशनांचे नियमित वाचन करणे एवढेच पुरेसे नाही. पण त्यातून प्राप्त झालेल्या ज्ञानाचा अवलंब करण्याचाही प्रयत्न केला पाहिजे.—मत्तय २४:४५.

समजशक्‍ती प्राप्त करणे देखील अत्यावश्‍यक आहे. आपल्याजवळ समजशक्‍ती नसली तर दोन गोष्टींमधला संबंध आपल्याला कसा कळेल? जो विषय आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत असू त्याचे पूर्णपणे आकलन कसे होईल? अमुक अमुक गोष्ट का होते, कशाला होते हे कसे समजेल? आणि अंतर्दृष्टी, सूक्ष्मदृष्टी कशी प्राप्त होईल? दोन गोष्टींमधला संबंध समजून योग्य निष्कर्ष काढण्यासाठी आपल्याला समजशक्‍ती असणे गरजेचे आहे.—दानीएल ९:२२, २३.

शलमोन आपल्या पित्याच्या शब्दांविषयी पुढे म्हणतो: “तिला [बुद्धीला] उच्च पद दे म्हणजे ती तुझी उन्‍नति करील; तिला कवटाळून राहशील तर ती तुझे गौरव करील; ती तुला शोभिवंत शिरोभूषण देईल; तुला सुंदर मुकुट देईल.” (नीतिसूत्रे ४:८, ९, NW) ईश्‍वरी बुद्धीला कवटाळून राहणाऱ्‍यांना ती संरक्षण आणि गौरव देते. शिवाय, त्यांच्यासाठी भूषण ठरते. म्हणून, आपण बुद्धी संपादन करण्याचा प्रयत्न करू या.

“शिक्षण दृढ धरून ठेव”

आपल्या पित्याने दिलेल्या सल्ल्याविषयी इस्राएलचा राजा पुढे म्हणतो: “माझ्या मुला, माझी वचने ऐकून घे, म्हणजे तुझ्या आयुष्याची मर्यादा वृद्धिंगत होईल. मी तुला ज्ञानाचा मार्ग शिकविला आहे, तुला सरळतेच्या वाटांनी चालविले आहे. तू चालशील तेव्हा तुझी पावले अडखळणार नाहीत; तू धावशील तेव्हा तुला ठेच लागणार नाही. तू शिक्षण दृढ धरून ठेव; सोडू नको; ते जवळ राख; कारण ते तुझे जीवन आहे.”—नीतिसूत्रे ४:१०-१३.

शलमोन हा त्याच्या बापाचा खरा पुत्र होता असे म्हटले आहे. म्हणून त्याच्या वडिलांनी प्रेमाने दिलेल्या शिक्षणाचे महत्त्व त्याला माहीत होते. कारण ते शिक्षण त्याला मार्गदर्शन देत होते, त्याच्या चुका दाखवून देत होते. आपल्याला देखील योग्य प्रकारचे शिक्षण मिळाले नाही तर आपली आध्यात्मिक प्रगती कशी होईल? आपल्या जीवनात सुधार कसा घडेल? आपल्या चुकांमधून आपण काही शिकलो नाही किंवा चुकीच्या धारणा बदलल्या नाहीत तर साहजिकच आपली काहीच आध्यात्मिक प्रगती होणार नाही. पण योग्य प्रकारचे शिक्षण आपल्याला देवाच्या मर्जीनुसार चालायला मदत करील. अशाप्रकारे आपण “सरळतेच्या वाटांनी” चालत राहू.

शिक्षणाच्या आणखी एका प्रकाराने आपल्या “आयुष्याची मर्यादा वृद्धिंगत” होऊ शकते. ते कसे? येशू ख्रिस्ताने म्हटले होते: “जो अगदी थोडक्याविषयी विश्‍वासू तो पुष्कळाविषयीहि विश्‍वासू आहे; आणि जो अगदी थोडक्याविषयी अन्यायी तो पुष्कळाविषयीहि अन्यायी आहे.” (लूक १६:१०) म्हणजेच आपल्याला मोठ्या गोष्टींत विश्‍वासू राहण्याविषयी स्वतःला शिस्त लावली पाहिजे. पण त्यासाठी लहान गोष्टींपासून सुरवात करायला हवी मगच आपल्याला मोठ्या गोष्टींच्या बाबतीत शिस्त लावायला सोपे जाईल. नाही का? उदाहरणार्थ, ‘एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहायचे नाही’ असे आपण ठरवले तर साहजिकच आपल्या हातून काही अनुचित घडणार नाही. (मत्तय ५:२८) अर्थात, हे तत्त्व स्त्री-पुरुष दोघांना लागू होते. अशाप्रकारे, आपल्या मनातली “प्रत्येक कल्पना अंकित” करायला आपण शिकलो तर आपण शब्दात आणि कृतीतही चुकणार नाही.—२ करिंथकर १०:५.

शिक्षण किंवा शिस्त मुळात कोणालाच आवडत नसते; कारण ती बंधनकारक वाटते. (इब्री लोकांस १२:११) पण तिला धरून राहिल्याने आपण प्रगतीपथावर राहू अशी सुज्ञ राजा आपल्याला हमी देतो. ज्याप्रमाणे योग्य शिक्षणामुळे एखादा धावपटू कोठेही न अडखळता किंवा स्वतःला काही अपाय होऊ न देता वेगाने धावू शकतो त्याचप्रमाणे शिक्षणाला धरून राहिल्यानेच जीवनाच्या मार्गावर कोणत्याही अडखळणाविना सारख्याच गतीने चालत राहायला मदत मिळू शकते. अर्थात, मार्ग निवडण्याविषयी आपण दक्ष असावे.

‘दुर्जनांच्या मार्गापासून’ दूर राहा

निकडीच्या स्वरात शलमोन असा इशारा देतो: “दुर्जनांच्या मार्गांत शिरू नको; दुष्टांच्या मार्गाने चालू नको. त्यापासून दूर राहा, त्याजवळून जाऊ नको; त्यावरून मागे फीर आणि आपल्या मार्गाला लाग. कारण दुष्कर्म केल्यावाचून त्यांना झोप येत नाही; कोणाला पाडले नाही, तर त्यांची झोप उडते. कारण ते दुष्टाईने मिळविलेले अन्‍न खातात, बलात्काराने मिळविलेला द्राक्षारस पितात”—नीतिसूत्रे ४:१४-१७.

आपण दुष्ट लोकांपासून दूर राहावे अशी शलमोनाची इच्छा आहे. कारण दुष्ट लोकांना दुष्कर्म केल्यावाचून झोप येत नाही. दुष्कृत्ये त्यांच्यासाठी अन्‍नपाण्यासारखी आहेत. ते लोक मुळातच भ्रष्ट आहेत! मग, अशांसोबत संगती करून आपल्या हृदयाचे रक्षण करणे शक्य आहे का? आजकालच्या मनोरंजनातून दाखवली जाणारी हिंसा पाहणे म्हणजे ‘दुष्टांच्या मार्गाने चालण्यासारखेच आहे.’ हा मूर्खपणा नाही तर काय? टीव्ही किंवा चित्रपटातील सुन्‍न करणारे वाईट दृश्‍य पाहिल्यावर दयाशील राहता येणे शक्य तरी आहे का?

प्रकाशात चाला

शलमोन पुढे मार्गाचेच उदाहरण देऊन म्हणतो: “परंतु धार्मिकांचा मार्ग मध्यान्हापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्‍या उदयप्रकाशासारखा आहे.” (नीतिसूत्रे ४:१८) बायबलचा अभ्यास सुरू करणे आणि त्यातील सल्ला आपल्या जीवनात लागू करणे हे भल्या पहाटे अर्थात अंधार असतानाच प्रवासाला निघण्यासारखे आहे. अंधारात आपल्याला नीटसे दिसत नाही. पण जसजशी पहाट होऊ लागते तसतसे आपल्याला सभोवतालचे दृश्‍य पुसटसे दिसू लागते. शेवटी सूर्य वर येतो आणि सगळे काही स्पष्ट दिसते. त्याचप्रमाणे आपण बायबलचा मेहनतीने अभ्यास करत राहतो तेव्हा आपल्याला सत्य हळूहळू कळू लागते आणि कालांतराने आपल्या मनात काहीच शंका राहत नाही. पण आपल्याला खोट्या शिकवणी टाळायच्या असतील तर आपल्या अंतःकरणाला आध्यात्मिक पोषण मिळणे गरजेचे आहे.

बायबलमधील भविष्यवाण्यांचा अर्थ किंवा त्यांचे महत्त्वसुद्धा आपल्याला एकदम कळत नाही. यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या प्रकाशाने, जागतिक घटनांच्या पूर्तीने किंवा देवाच्या लोकांच्या अनुभवांमुळे या भविष्यवाण्या हळूहळू आपल्याला स्पष्ट होऊ लागतात. म्हणून त्या स्पष्ट होण्याआधीच आपल्याला तर्कवितर्क करत राहायची गरज नाही. तर ‘मध्यान्हापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्‍या उदयप्रकाशासाठी’ आपण थांबून राहिले पाहिजे.

पण जे देवाच्या मार्गदर्शनाचा अव्हेर करतात, जे प्रकाशात चालत नाहीत त्यांचे काय होईल? शलमोन म्हणतो: “दुर्जनांचा मार्ग अंधकारासारखा आहे; त्याला कशाची ठेच लागते हे त्यांस कळत नाही.” (नीतिसूत्रे ४:१९) दुष्ट लोक अंधारात ठेचकाळणाऱ्‍या व्यक्‍तीसारखे आहेत. नेमके कशामुळे आपण ठेचकाळलो हे त्यांना कळत नाही. काहीवेळा आपल्याला असे भासेल की दुष्ट मार्गांनी चालणाऱ्‍यांचीच प्रगती होत आहे; पण त्यांचे हे यश तात्पुरते आहे. त्यांच्याविषयी स्तोत्रकर्त्याने म्हटले: “खचीत तू [यहोवा] त्यांना निसरड्या जागांवर उभे करितोस, त्यांना पाडून त्यांचा नाश करितोस.”—स्तोत्र ७३:१८.

सतत दक्ष असा

इस्राएलचा राजा पुढे म्हणतो: “माझ्या मुला, माझ्या वचनांकडे लक्ष लाव; माझ्या सांगण्याकडे कान दे. ती तुझ्या डोळ्यांपुढून जाऊ देऊ नको; ती आपल्या अंतःकरणांत ठेव. कारण ती ज्यांस लाभतात, त्यांस ती जीवन देतात आणि त्यांच्या सबंध देहाला आरोग्य देतात. सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यांत जीवनाचा उगम आहे.”—नीतिसूत्रे ४:२०-२३.

अंतःकरणाचे रक्षण करण्याविषयी बायबलमध्ये दिलेला सल्ला किती महत्त्वाचा आहे ते शलमोनाच्या स्वतःच्याच उदाहरणावरून दिसून येते. तरुणपणी तो आपल्या बापाचा आज्ञाधारक “पुत्र होता” आणि मोठा होईपर्यंत तो यहोवाला विश्‍वासू राहिला. पण बायबल म्हणते की, “शलमोन म्हातारा झाला तेव्हा त्याच्या [विदेशी] बायकांनी त्याचे मन अन्य देवांकडे वळविले; त्याचा बाप दावीद याचे मन परमेश्‍वराकडे पूर्णपणे असे त्याप्रमाणे त्याचे नसे.” (१ राजे ११:४) हो, सतत दक्ष राहिले नाही तर कितीही चांगली व्यक्‍ती वाईट मार्गी लागू शकते. (यिर्मया १७:९) म्हणून देवाच्या वचनामध्ये दिलेले सल्ले आपण कधीच विसरता कामा नये; आपण ते आपल्या ‘अंतःकरणात ठेवले पाहिजेत.’ नीतिसूत्राच्या चवथ्या अध्यायात दिलेला सल्लासुद्धा आपण आपल्या अंतःकरणात ठेवला पाहिजे.

आपल्या अंतःकरणाची पारख करा

आपल्या अंतःकरणाला आपण खरोखरच जपून ठेवले आहे का? आंतरिक व्यक्‍तित्व कसे आहे हे आपल्याला कसे ठाऊक होईल? “अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार,” असे येशू ख्रिस्त म्हणाला. (मत्तय १२:३४) तो असेही म्हणाला की, “अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्मे, चोऱ्‍या, खोट्या साक्षी, शिव्यागाळी ही निघतात.” (मत्तय १५:१९, २०) होय, आपल्या अंतःकरणात काय आहे ते आपल्या बोलीतून आणि कृतीतून दिसून येते.

म्हणून शलमोन अशी ताकीद देतो: “तू उद्दामपणाचे भाषण करण्याचे सोडून दे, कुटिल वाणीपासून फार दूर राहा. तुझे डोळे नीट पुढे पाहोत. तुझ्या पापण्या तुझ्यापुढे सरळ राहोत. आपल्या पायांची वाट सपाट कर; तुझे सर्व मार्ग निश्‍चित असोत. तू डावीउजवीकडे वळू नको; दुष्कर्मांतून आपले पाऊल काढ.”—नीतिसूत्रे ४:२४-२७.

शलमोनाचा हा इशारा लक्षात घेऊन आपण काय बोलतो आणि कसे वागतो याचे परीक्षण करणे गरजेचे आहे. अंतःकरणाचे रक्षण करायचे असेल आणि देवाचे मन खूष करायचे असेल तर वाईट भाषा आणि कपटीपणा सोडून द्यावा लागेल. (नीतिसूत्रे ३:३२) म्हणूनच, आपली भाषा आणि वर्तन योग्य आहे का याचा आपण प्रार्थनापूर्वक विचार करावा. आणि मग काही दोष आढळला तर यहोवाच्या मदतीने तो सुधारण्याचा प्रयत्न करावा.—स्तोत्र १३९:२३, २४.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘आपले डोळे नीट पुढे पाहोत,’ म्हणजेच आपल्या स्वर्गीय पित्याची जिवाभावाने सेवा करायचे ध्येय आपल्यासमोर असू द्यावे. (कलस्सैकर ३:२३) तुम्ही स्वतः अशा सरळ मार्गाने चालू लागला तर तुमच्या ‘सर्व मार्गांमध्ये’ यहोवा तुम्हाला यश देवो आणि “आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर” हा त्याचा सल्ला मानल्यामुळे तुम्हाला त्याचे समृद्ध आशीर्वाद मिळोत.

[तळटीपा]

^ परि. 7 नाव बदलण्यात आले आहे.

[२२ पानांवरील संक्षिप्त आशय]

मनोरंजनाचे हिंसात्मक प्रकार तुम्ही टाळता का?

[२१ पानांवरील चित्र]

अनुभवी लोकांचा सल्ला ऐकून स्वतःचा फायदा करून घ्या

[२३ पानांवरील चित्र]

शिक्षणाने प्रगती खुंटत नसते

[२४ पानांवरील चित्र]

सातत्याने बायबलचा अभ्यास करत राहा