व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या घराच्या अंगणातील हिरवागार ऑलिव्ह

देवाच्या घराच्या अंगणातील हिरवागार ऑलिव्ह

देवाच्या घराच्या अंगणातील हिरवागार ऑलिव्ह

बायबलमधील शास्ते नावाच्या पुस्तकात एक दृष्टान्त दिला आहे. त्यात म्हटले आहे, की ‘एकदा सर्व झाडे, कोणाला तरी अभिषेक करून आपणावर राजा नेमावयास निघाली.’ कोणाला निवडले त्यांनी? तब्येतीने कणखर व फळांनी लगडलेल्या ऑलिव्ह वृक्षाला!—शास्ते ९:८.

ऑलिव्ह वृक्ष हा मूळचा इस्राएल देशाचा रहिवासी. त्याच्या फळांचा मौसम म्हणजे धन्याची चंगळच! कारण या फळांतून मोठ्या प्रमाणावर निघणारे तेल स्वयंपाकासाठी, दिव्यांसाठी, आरोग्यासाठी व सौंदर्यप्रसाधनांसाठी वापरण्यात येते. हा वृक्ष तुम्ही बुंध्यापासून छाटला तरी, जमिनीखाली खोलवर मुळावलेल्या त्याच्या पसरट मुळांमुळे त्याला लगेच नवीन अंकुर फुटतात. म्हणूनच, असे म्हटले जाते, की हा वृक्ष अमर आहे.

सुमारे ३,५०० वर्षांपूर्वी, संदेष्टा मोशेने, ‘उत्तम व जैतुनांचा [ऑलिव्हचा] देश’ अशा शब्दांत इस्राएल देशाचे वर्णन केले होते. (अनुवाद ८:७, ८, पं.र.भा.) आजही, ऑलिव्ह वृक्षांच्या बागा, उत्तरेकडील हर्मोन पर्वताच्या पायथ्यापासून दक्षिणेकडील बर्शिबाच्या हद्दीपर्यंत आहेत. शेरॉनच्या किनाऱ्‍यावर, समारियाच्या खडकाळ टेकडीच्या उतारांवर आणि गॅललीच्या सुपीक खोऱ्‍यांत या वृक्षराजींचे साम्राज्य आपल्याला पाहायला मिळू शकते.

बायबल लेखकांनी अनेकदा ऑलिव्ह वृक्षाचा उल्लेख केला आहे. देवाची करूणा, पुनरुत्थानाची आशा आणि सुखी कौटुंबिक जीवन यांना चित्रित करण्याकरता त्यांनी या वृक्षाची उपमा दिली आहे. निर्माणकर्त्या यहोवाची महती सांगणाऱ्‍या या वृक्षासंबंधी शास्त्रवचनांतील संदर्भ लक्षात येण्याकरता आधी आपल्याला या वृक्षाची सविस्तर माहिती घ्यावी लागेल.—स्तोत्र १४८:७, ९.

ओबडधोबड ऑलिव्ह वृक्ष

पाहताच क्षणी मनात भरेल अशातला हा ऑलिव्ह वृक्ष नाही. तसेच लेबननमधील आभाळाला भिडणाऱ्‍या सीडर वृक्षासारखी याची शरीरयष्टी देखील उंच नाही. याचं लाकूड म्हणावं तर ते देखील जुनिपरसारखं महाग नाही. आल्मंडच्या सुंदर, मोहक फुलांचं सौंदर्य ऑलिव्हच्या फुलांना नाही. (गीतरत्न १:१७; आमोस २:९) पण ऑलिव्ह वृक्षाच्या एका गोष्टीला मात्र तोड नाही. जमिनीखाली दडलेली त्याची पसरणारी आणि भक्कम मूळे. ही मूळे २० फूट खोल तर त्यापेक्षा कितीतरी फूट लांब पसरतात. म्हणूनच तर, हा वृक्ष इतका फलदायी व टिकाऊ आहे.

ऑलिव्ह वृक्षाच्या या पसरणाऱ्‍या मुळांमुळे तो खडकाळ टेकड्यांच्या उतारांवरही तग धरून राहतो. अशा खोऱ्‍यातली इतर झाडे पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे मरून जातात; पण, ऑलिव्ह मात्र जिवंत राहतो! त्याच्या मुळांमुळे अनेक वर्षांपर्यंत नव्हे अनेक दशकांपर्यंत त्याला फळे येत राहतात. यावर पुष्कळ गाठी असतात. वरवर पाहिल्यास हा वृक्ष पूर्णपणे वाळल्यासारखा दिसतो, त्यामुळे तो सरपणासाठी चांगला आहे असे वाटेल. पण खरे तर तो वाळलेला नसतो. या वृक्षाला फक्‍त आपली मूळे पसरायला ऐसपैस आणि भूसभूशीत जमीन लागते. तण किंवा हानीकारक कीटकांना आश्रय देणारी झाडेझुडपे या वृक्षाच्या जवळपास असली, की त्याची जिवंत राहण्याची शक्यता कमी होते. इतकी खबरदारी घेतल्यास एका ऑलिव्ह वृक्षाकडून दरवर्षी ५७ लिटर ऑलिव्ह ऑईल तुम्हाला नक्की मिळेल.

इस्राएली लोक दिव्यांसाठी ऑलिव्हचे तेल वापरायचे. (लेवीय २४:२) स्वयंपाकातही त्याचा उपयोग व्हायचा. सूर्यापासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी व साबणांतही या तेलाचा ते उपयोग करत असत. या सर्व कारणांमुळे ऑलिव्हचे झाड त्यांच्यात अतिशय लोकप्रिय होते. इस्राएल देशाची प्रमुख पीके म्हणजे ऑलिव्ह, कडधान्य आणि द्राक्षं. त्यामुळे, जर का ऑलिव्ह वृक्षाचा किंवा फळांचा नाश झाला, तर त्याचा इस्राएली कुटुंबाला आर्थिकरित्या जबरदस्त फटका बसायचा.—अनुवाद ७:१३; हबक्कूक ३:१७.

पण असे क्वचितच व्हायचे. इस्राएल लोकांना ऑलिव्ह तेलाचा तुटवडा कधी जाणवला नाही. वचनयुक्‍त देशात ऑलिव्ह वृक्षाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात असल्यामुळे मोशेने त्याला ‘जैतुनाचा देश’ असे संबोधले. १९ व्या शतकातील निसर्गवैज्ञानिक एच. बी. ट्रीसट्रॅम यांनी, ऑलिव्ह वृक्ष “इस्राएल देशाचे वैशिष्ट्य आहे” असे म्हटले. भूमध्य समुद्राच्या जवळपासच्या सर्व देशांत ऑलिव्ह तेल मुबलक असल्यामुळे आणि ते महाग असल्यामुळे दुसऱ्‍या देशांशी देवाणघेवाण करताना पैशाऐवजी हेच तेल चलन म्हणूनही वापरले जायचे. स्वतः येशू ख्रिस्तानेही एका कर्जाविषयी सांगितले, की ज्याचा हिशेब केल्यावर ते कर्ज “चार हजार लिटर जैतून तेल” इतके होते.—लूक १६:५, ६, ईझी टू रीड भाषांतर.

“जैतुनाच्या रोपासारखी”

हा बहुपयोगी ऑलिव्ह ईश्‍वरी आशीर्वादांना चित्रित करतो. हे आशीर्वाद देव आपल्या सेवकाला कसे देतो? याबद्दल स्तोत्रकर्त्याने म्हटले: “तुझ्या माजघरात तुझी स्त्री सफळ द्राक्षवेलीसारखी होईल; तुझ्या मेजासभोवती तुझी मुले जैतुनाच्या [ऑलिव्हच्या] रोपासारखी होतील.” (स्तोत्र १२८:३) ही ‘जैतुनाची रोपे’ काय आहेत? आणि स्तोत्रकर्ता यांची तुलना मुलांशी का करतो?

ऑलिव्ह वृक्ष हा जरा वेगळाच वृक्ष आहे कारण त्याच्या खोडापासून नवनवीन रोपे तयार होत राहतात. * मुख्य खोड जून झाल्यावर त्याला पहिल्यासारखी फळे येत नाहीत. त्यामुळे नवीन आलेल्या रोपांना वाढू दिले जाते. हीच रोपे पुढे, जुन्या खोडाप्रमाणे मजबूत होतात. काही काळानंतर, जुन्या खोडाभोवती वाढलेली ही लहान परंतु बळकट रोपे, मेजाभोवती मुले बसल्यासारखी वाटतात. ही नवीन रोपे मुख्य खोडालाच जोडलेली असतात. पुढे या नवीन खोडांनाही भरपूर ऑलिव्ह लागतात.

पालकांच्या मजबूत आध्यात्मिक मुळांमुळे त्यांचे अंकुर अर्थात त्यांची मुले विश्‍वासात दृढ होऊ शकतात हे ऑलिव्ह वृक्षाच्या या गुणधर्मावरून आपण समजू शकतो. ही रोपे प्रौढ होतात तेव्हा त्यांनाही फळे लागतात. मुले प्रौढ झाल्यावर ते आपल्या पालकांना आधार देतात; आणि, आपल्याबरोबर आपली मुलेही यहोवाची सेवा करत आहेत हे पाहून पालकांना अतिशय आनंद होतो.—नीतिसूत्रे १५:२०.

“वृक्षांची काही तरी आशा असते”

यहोवाची सेवा करणारा कुटुंबातील पिता, ईश्‍वरी मार्गावर चालणाऱ्‍या आपल्या मुलांमुळे आनंदी असतो. पण, “जगाच्या रहाटीप्रमाणे” पिता मरण पावतो तेव्हा मुलांवर दुःखाचा पहाड कोसळतो. (१ राजे २:२) आपल्या कुटुंबावर अशाप्रकारचे संकट कोसळले असेल तर मृत पुन्हा जिवंत होतील ही बायबलमधील आशा आपल्याला सांत्वना देते.—योहान ५:२८, २९; ११:२५.

अनेक मुलांचा बाप असलेल्या ईयोबाला मनुष्याच्या अल्पायुष्याची जाणीव होती. त्याने मनुष्याच्या जीवनाची तुलना एखाद्या फुलाशी केली जे उमलते आणि थोड्या वेळात कोमेजून जाते. (ईयोब १:२; १४:१, २) आपल्या आजारापासून मुक्‍ती मिळावी म्हणून ईयोब मरणाला कवटाळू इच्छित होता; त्याला पूर्ण खात्री होती, की कबर हे एक सुरक्षित ठिकाण आहे व तेथून तो परतही येऊ शकत होता. त्याने विचारले: “मनुष्य मृत झाल्यावर पुनः जिवंत होईल काय?” आणि पुढे तोच पूर्ण आत्मविश्‍वासाने याचे उत्तर देतो: “माझी सुटका होईपर्यंत कष्टमय सेवेचे सगळे दिवस मी वाट पाहत राहीन. तू [यहोवा] मला हाक मारिशील व मी तुला उत्तर देईन; मी जो तुझ्या हातची कृति त्या मजविषयी तुला उत्कंठा लागेल.”—ईयोब १४:१३-१५.

देव आपल्याला कबरेतूनही बाहेर बोलवू शकतो अशी आपल्याला पक्की खात्री आहे हे ईयोबाने कसे दाखवले? त्याने एका वृक्षाचे उदाहरण दिले. त्या वृक्षाच्या वर्णनावरून असे दिसते, की तो ऑलिव्ह वृक्षाविषयी बोलत होता. तो म्हणाला: “वृक्षांची काही तरी आशा असते; तो तोडिला तरी पुनः फुटतो.” (ईयोब १४:७) ऑलिव्ह वृक्षाची छाटणी केली तरी तो मरत नाही. त्याला जर मुळापासून उपटले तरच तो मरतो. त्याची मुळे जमिनीत घट्ट रोवलेली असतील तर त्या वृक्षाला नवनवीन अंकुर फुटतच राहतात.

दीर्घकाळच्या दुष्काळामुळे कोमेजून गेलेला ऑलिव्ह वृक्ष पुन्हा तरतरीत होऊ शकतो. “जमिनीत त्याचे मूळ जून झाले असले, त्याचे खोड मातीत सुकून गेले असले; तरी पाण्याच्या वासाने ते पुनः फुटते, नव्या रोप्याप्रमाणे त्यास फांद्या येतात.” (ईयोब १४:८, ९) ईयोब राहत होता तिथले वातावरण धूळकट व शुष्क होते. त्यामुळे तिथली झाडे वाळल्यासारखी किंवा निर्जीव दिसत असावीत. पण पावसाच्या एका सरीसोबत हीच ‘मेलेली’ झाडे पुन्हा जिवंत होत असत; “नव्या रोप्याप्रमाणे” त्यास फांद्या फुटत असत. या उल्लेखनीय बदलामुळे एका ट्युनिशियन उद्यानवैज्ञानिकाने असे म्हटले: “ऑलिव्ह वृक्षांना अमर जीवन लाभले आहे असे आपण उचितपणे म्हणू शकतो.”

एका शेतकऱ्‍याला जसे, वाळून गेलेला वृक्ष पुन्हा जिवंत होताना पाहायची उत्कंठा लागलेली असते तसेच यहोवा देवालाही आपल्या मृत विश्‍वासू सेवकांना पुन्हा जिवंत करण्याची उत्कंठा लागलेली आहे. तो अब्राहाम, सारा, इसहाक, रिबेका आणि इतर विश्‍वासू सेवकांना पुन्हा जिवंत करील! (मत्तय २२:३१, ३२) अशा लोकांचे स्वागत करून त्यांना पुन्हा एकदा उत्साही व फलदायी झालेले पाहायला आपल्याला आवडणार नाही का?

लाक्षणिक ऑलिव्ह वृक्ष

देवाचा निःपक्षपातीपणा आणि त्याने केलेली पुनरुत्थानाची तरतूद यावरून त्याची दया दिसून येते. लोक कोणत्याही जातीचे व पार्श्‍वभूमीचे असोत, यहोवा देव त्यांच्यावर दया करतो हे दाखवण्याकरता प्रेषित पौलाने ऑलिव्ह वृक्षाचे उदाहरण दिले. अनेक शतकांपर्यंत यहुदी लोकांना देवाचे निवडक लोक, अर्थात “अब्राहामाचे वंशज” असण्याचा गर्व होता.—योहान ८:३३; लूक ३:८.

देवाची मर्जी संपादण्याकरता एखाद्याचा यहुदी राष्ट्रातच जन्म झाला पाहिजे अशी कोणतीही अट नव्हती. परंतु येशूचे सुरवातीचे शिष्य मात्र यहुदीच होते. याचे एक कारण म्हणजे अब्राहामाची वचनयुक्‍त संतती होण्याचा विशेषाधिकार यहोवाने ज्या मानवांना दिला होता त्यांपैकी हे शिष्य पहिले होते. (उत्पत्ति २२:१८; गलतीकर ३:२९) पौलाने या यहुदी शिष्यांची तुलना एका लाक्षणिक ऑलिव्ह वृक्षाच्या फांद्यांशी केली.

बहुतेक मूळच्या यहुदी लोकांनी येशूला नाकारले. याद्वारे त्यांनी स्वतःला, ‘लहान कळप’ किंवा ‘देवाच्या इस्त्राएलचा’ सदस्य होण्यास अपात्र ठरवले. (लूक १२:३२; गलतीकर ६:१६) अशाप्रकारे ते ज्याच्या फाद्या छाटण्यात आल्या त्या लाक्षणिक ऑलिव्ह वृक्षाप्रमाणे झाले. मग त्यांची जागा कोणी भरून काढली? सा.यु. ३६ मध्ये अब्राहामाची संतती होण्याकरता विदेशी लोकांना निवडण्यात आले. जणू यहोवा देवाने चांगल्या ऑलिव्हवर जंगली ऑलिव्हचे कलम केले. अब्राहामाच्या वचनयुक्‍त संततीत आता विदेशी लोक देखील सामील झाले. हे विदेशी ख्रिस्ती “जैतूनाच्या पौष्टीक मुळाचा भागीदार” झाले.—रोमकर ११:१७.

चांगल्या ऑलिव्हवर जंगली ऑलिव्हचे कलम करण्याचा विचार कोणा शेतकऱ्‍याच्या मनातही आला नसता; शिवाय ते ‘सृष्टिक्रमानुसारही’ नव्हते. (रोमकर ११:२४) द लॅन्ड ॲण्ड द बुक नावाच्या एका पुस्तकात, अरबी लोक काय म्हणतात ते सांगितले आहे; “जंगली झाडावर चांगल्या झाडाचे कलम केल्यावर जंगली झाड चांगले होईल, पण चांगल्या झाडावर जंगली झाडाचे कलम केल्यावर चांगले झाड जंगली होईल” असे ते म्हणतात. त्यामुळे, यहोवाने “परराष्ट्रीयांतून आपल्या नावाकरिता काही लोक काढून घ्यावे म्हणून” आपले लक्ष त्यांच्याकडे वळवले तेव्हा यहुदी ख्रिश्‍चनांना खूप आश्‍चर्य वाटले होते. (प्रेषितांची कृत्ये १०:४४-४८; १५:१४) यावरून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते की यहोवा आपले उद्देश पूर्ण करण्याकरता कोणत्याही राष्ट्रावर निर्भर राहत नाही, मग ते यहुदी राष्ट्र असले तरीही. पण, “प्रत्येक राष्ट्रांत जो त्याची भीति बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.”—प्रेषितांची कृत्ये १०:३५.

पौलाने दाखवून दिले, की यहुदी लोकांना अर्थात ‘फांद्यांना’ त्यांच्या अविश्‍वासूपणामुळे मूळ ऑलिव्ह वृक्षापासून जसे छाटण्यात आले होते तसेच, गर्व आणि आज्ञाभंगामुळे एखादी व्यक्‍ती यहोवा परमेश्‍वराच्या कृपापसंतीतून उतरली जाऊ शकते. (रोमकर ११:१९, २०) यावरून एक गोष्ट चांगलीच स्पष्ट होते, की आपल्यातील कोणीही यहोवा देव दाखवत असलेल्या अपात्र कृपेला कमी समजू नये.—२ करिंथकर ६:१.

ऑलिव्ह तेलाचे इतर उपयोग

शास्त्रवचनांमध्ये लाक्षणिक आणि शब्दशः अर्थाने ऑलिव्ह तेल लावण्याबाबतचा उल्लेख आहे. पूर्वीच्या काळी, जखम बरी होण्याकरता तिच्यावर “तेल” लावले जायचे. (यशया १:६) चांगल्या शेजाऱ्‍याच्या दृष्टान्तात येशूने म्हटले की, शोमरोनी मनुष्याने यरिहोच्या वाटेवर पडलेल्या एका माणसाच्या जखमांस ऑलिव्हचे तेल लावले.—लूक १०:३४.

डोक्याला ऑलिव्ह तेलाने मालिश केल्याने तरतरी येते. (स्तोत्र १४१:५) ख्रिस्ती वडील, आध्यात्मिक आजार बरे करताना ‘यहोवाच्या नावाने रोग्याला तेल लावून’ त्याच्यासाठी प्रार्थना करतात. (याकोब ५:१४) आध्यात्मिक रोगी असलेल्या आपल्या बांधवाला दिलेला प्रेमळ शास्त्रवचनीय सल्ला व त्याच्यासाठी केलेली प्रार्थना हे ऑलिव्हच्या तेलाने डोक्याला मालिश करून ताजगी देण्यासारखे आहे. आणि गंमतीची गोष्ट म्हणजे इब्री भाषेतील एका वाक्यप्रचारात तर सत्पुरुषाला ‘शुद्ध ऑलिव्ह तेलाची’ उपमा दिली आहे.

‘देवाच्या घराच्या अंगणातील हिरवागार ऑलिव्ह’

आतापर्यंतच्या चर्चेतून तुम्हाला हे समजले असेल की देवाच्या सेवकांची तुलना ऑलिव्ह वृक्षाशी का केली जाऊ शकते. दावीदाने ‘देवाच्या घरातील जैतुनाचा [ऑलिव्हचा] वृक्ष’ होण्याची इच्छा प्रकट केली. (स्तोत्र ५२:८) इस्राएली लोकांच्या घराच्या आसपास ऑलिव्ह वृक्ष हमखास असायचे. त्याचप्रमाणे दावीदाने नेहमी यहोवाच्या निकट राहून त्याच्या स्तुतीची फळे उत्पन्‍न करण्याची इच्छा बाळगली.—स्तोत्र ५२:९.

यहुदा राज्याचे दोन वंश यहोवाशी विश्‍वासू होते तोपर्यंत ते ‘चांगल्या फळांनी शोभिवंत असलेल्या हिरव्या जैतुन [ऑलिव्ह] झाडाप्रमाणे’ होते. (यिर्मया ११:१५, १६) पण जेव्हा त्यांनी ‘यहोवाच्या वचनांकडे कान देण्यास नाकारले व अन्य देवांच्यामागे लागले’ तेव्हा मात्र सरपणाकरता योग्य असलेल्या एखाद्या सुकलेल्या झाडाप्रमाणे त्यांची दशा झाली. ते यहोवाच्या मर्जीतून पार उतरले.—यिर्मया ११:१०.

देवाच्या घरातील टवटवीत ऑलिव्ह वृक्षाप्रमाणे आपल्याला व्हायचे असेल तर आपण यहोवाच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. एखादा शेतकरी जसा झाडाच्या योग्य वाढीकरता त्याची नियमित “काटछाट” करत असतो त्याचप्रमाणे यहोवा जेव्हा आपल्याला वेळोवेळी सल्ला देतो, अर्थात “काटछाट” करतो तेव्हा आपण तो स्वीकारण्यास तयार असले पाहिजे. (इब्री लोकांस १२:५, ६) शिवाय, एखादा ऑलिव्ह वृक्ष, कोरड पडते तेव्हाही तग धरून राहू शकतो तसेच, परीक्षा व छळ यांदरम्यान टिकून राहण्याकरता आपण आपल्या आध्यात्मिक मुळांना योग्य पोषण दिल्यास ती मजबूत होतील.—मत्तय १३:२१; कलस्सैकर २:६, ७.

अशा टवटवीत, हिरव्यागार ऑलिव्ह वृक्षाप्रमाणेच, आध्यात्मिकरीत्या मजबूत असणाऱ्‍या विश्‍वासू ख्रिश्‍चनाला कदाचित जग ओळखणार नाही पण देव मात्र ओळखील. या व्यवस्थीकरणात त्याचा मृत्यू झाला तरी, येणाऱ्‍या नवीन जगात त्याला पुन्हा जिवंत केले जाईल.—२ करिंथकर ६:९; २ पेत्र ३:१३.

वर्षानुवर्षे फळ देणाऱ्‍या अमर ऑलिव्ह वृक्षावरून आपल्याला देवाच्या या अभिवचनाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही: “वृक्षाच्या आयुष्याप्रमाणे माझ्या लोकांचे आयुष्य होईल व माझे निवडलेले आपल्या हाताच्या श्रमाचे फळ पूर्णपणे भोगितील.” (यशया ६५:२२) भविष्याच्या संदर्भात केलेले हे अभिवचन देवाच्या नवीन जगात पूर्ण होईल.—२ पेत्र ३:१३.

[तळटीप]

^ परि. 13 नवीन रोपे जमिनीतून सर्व पोषण शोषून घेऊन मुख्य व जून खोडाला दुर्बळ बनवणार नाहीत म्हणून दरवर्षी शेतकरी त्यांची काटछाट करतो.

[२५ पानांवरील चित्र]

स्पेनच्या अलिकान्ट प्रांतातील जविए येथील एक ओबडधोबड जुना ऑलिव्ह वृक्ष

[२६ पानांवरील चित्रे]

स्पेन येथील ग्रानाडा प्रांतातील ऑलिव्हच्या बागा

[२६ पानांवरील चित्र]

जेरुसलेमच्या तटाबाहेरील एक जुना ऑलिव्ह वृक्ष

[२६ पानांवरील चित्र]

ऑलिव्ह वृक्षावर कलम करण्याविषयी बायबल म्हणते

[२६ पानांवरील चित्र]

जुन्या ऑलिव्ह वृक्षाभोवती उगवलेली नवीन रोपे