व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या भविष्यवाणीच्या वचनाकडे आज लक्ष द्या!

देवाच्या भविष्यवाणीच्या वचनाकडे आज लक्ष द्या!

देवाच्या भविष्यवाणीच्या वचनाकडे आज लक्ष द्या!

“हे मानवपुत्रा, हा दृष्टांत समजून घे; कारण हा शेवटच्या काळाविषयीचा आहे.”दानीएल ८:१७.

१. आपल्या दिवसाविषयी सर्व लोकांना काय समजले पाहिजे अशी यहोवाची इच्छा आहे?

भविष्यात होणाऱ्‍या घटनांविषयीचे ज्ञान यहोवा आपल्या पुरतेच ठेवत नाही. तो रहस्य प्रकट करणारा देव आहे. आज आपण ‘शेवटल्या काळाच्या’ अंतिम टप्प्यात जगत आहोत हे सर्वांना कळावे अशी त्याची इच्छा आहे. ही महत्त्वपूर्ण माहिती आज पृथ्वीवरील सहाशे कोटी लोकांपर्यंत पोहंचवणे किती जरूरीचे आहे!

२. लोक आपल्या भवितव्याविषयी चिंताग्रस्त का आहेत?

या जगाचा लवकरच अंत होणार याविषयी काडीमात्र शंका नाही. पुढील काही गोष्टींचा जरा विचार करा, मानवाला चंद्रावर पाऊल ठेवता आले पण पृथ्वीवरील बहुतेक ठिकाणी आता त्याला घराबाहेर पडायला भीती वाटते. त्याला जगातील अनेक भौतिक आणि चैनीच्या वस्तूंनी आपले घर मात्र सजवता आले परंतु तुटलेल्या कौटुंबिक नात्यामुळे झालेल्या जखमा तो भरून काढू शकत नाही. तो या कम्प्युटरच्या युगात सर्व काही शिकत तर आहे पण आपसात गोडी-गुलाबीने कसे राहायचे हे अजूनही त्याला शिकवता आले नाही. मनुष्याच्या पदरी पडलेल्या या निराशेमुळे आपल्याला आश्‍चर्य वाटायला नको कारण असे होईल हे बायबलमध्ये आधीच सांगण्यात आले होते. बायबलमधील या पुराव्यांमुळे याची पूर्ण खात्री पटते, की आपण शेवटल्या काळाच्या अंतिम दिवसात जगत आहोत.

३. “अंतसमय” या शब्दाचा उल्लेख पहिल्यांदा कोणी केला?

‘अंतसमयातील’ हा महत्त्वपूर्ण संदेश सुमारे २,६०० वर्षांआधीच गॅब्रिएल देवदूताने एका भविष्यवक्‍त्‌याला दिला होता. त्या भविष्यवक्‍त्‌याला गॅब्रिएल देवदूताने असे सांगितले: ‘हे मानवपुत्रा, हा दृष्टांत समजून घे; कारण हा अंतसमयाविषयीचा आहे.’—दानीएल ८:१७.

हाच आहे ‘अंतसमय!’

४. बायबलमध्ये आणखी कशाप्रकारे अंतसमयाचा उल्लेख करण्यात आला आहे?

दानीएलाच्या पुस्तकात ‘शेवटचा काळ’ व ‘नेमलेला अंतसमय’ या शब्दांचा उल्लेख सहा वेळा करण्यात आला आहे. (दानीएल ८:१७, १९; ११:३५, ४०; १२:४, ९) याच ‘शेवटच्या काळाविषयी’ प्रेषित पौलानेही सांगितले होते. (२ तीमथ्य ३:१-५) याच काळात आपण राजा या नात्याने स्वर्गात “उपस्थित” होणार असल्याचे येशूने म्हटले होते.—मत्तय २४:३७-३९, NW.

५, ६. अंतसमयात बायबलचा अभ्यास कोणी केला व याचा काय परिणाम झाला?

दानीएल १२:४ म्हणते: “हे दानीएला, तू अंतसमयापर्यंत ही वचने गुप्त ठेव व हे पुस्तक मुद्रित करून ठेव; पुष्कळ लोक धुंडाळीत फिरतील व ज्ञानवृद्धि होईल.” दानीएलाच्या पुस्तकातील पुष्कळशा गोष्टींचा अर्थ गुप्त ठेवण्यात आला होता. कित्येक शतकांपर्यंत या गोष्टी लोकांकरता गूढच होत्या. आज मात्र या पुस्तकातील गूढ गोष्टींचा उलगडा झाला आहे.

आजच्या या ‘अंतसमयात’ अनेक विश्‍वासू ख्रिश्‍चनांनी देवाच्या वचनाचा, बायबलचा सखोल अभ्यास केला आहे. त्याचा परिणाम काय झाला? यहोवाच्या आशीर्वादामुळे त्यांना अनेक गूढ गोष्टींचा अर्थ समजला. जसे की, यहोवाच्या अभिषिक्‍त साक्षीदारांना येशू ख्रिस्त सन १९१४ मध्ये स्वर्गात राजा झाल्याची समज प्राप्त झाली. दुसरे पेत्र १:१९-२१ मधील प्रेषिताच्या शब्दांनुसार, हे अभिषिक्‍त लोक आणि त्यांचे विश्‍वासू सोबती ‘भविष्यवाणीच्या वचनाकडे लक्ष देत आहेत’ आणि हाच ‘अंतसमय’ असल्याची त्यांना पूर्ण खातरी झाली आहे.

७. दानीएलच्या पुस्तकात कोणत्या काही खास गोष्टींविषयी सांगण्यात आले आहे?

दानीएलाच्या पुस्तकात अनेक महत्त्वपूर्ण घटनांची माहिती देण्यात आली आहे. या पुस्तकात सांगितले आहे की, एका राजाला स्वप्न पडले, त्याच्या राज्यातील पंडितांना त्या स्वप्नाचा अर्थ सांगता न आल्यामुळे राजा त्यांना ठार मारण्याची धमकी देतो. पण यहोवाचा भविष्यवक्‍ता राजाला त्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगतो. तीन तरुणांनी एका भव्य मूर्तीला दंडवत न केल्यामुळे त्यांना आगीच्या भट्टीत फेकण्यात येते, पण त्यांना काहीच होत नाही. राजवाड्यात मौज-मस्ती करणाऱ्‍या शेकडो लोकांसमक्ष एक हात राजवाड्याच्या भिंतीवर रहस्यमय शब्द लिहिताना दिसतो. दुष्ट लोक एका वृद्ध मनुष्याला सिंहाच्या गुहेत फेकून देतात पण सिंह त्याच्या जवळ फिरकत देखील नाहीत. एका दृष्टान्तात चार पशू दिसतात आणि या पशूंचा लाक्षणिक अर्थ समजण्यासाठी केलेल्या भविष्यवाण्या या शेवटल्या काळाला लागू होतात.

८, ९. या अंतसमयात आपल्याला दानीएलाच्या पुस्तकाचा कसा लाभ होतो?

दानीएलाचे पुस्तक दोन धाग्यांनी बनलेल्या एका दोरीप्रमाणे आहे. एक धागा आहे इतिहास तर दुसरा भविष्यवाणी. या दोन्ही गोष्टींमुळे आपला विश्‍वास मजबूत व्हायला मदत होते. यात दिलेला इतिहास दाखवतो की, यहोवा त्याच्या विश्‍वासू व एकनिष्ठ लोकांना कधीही विसरत नाही. दानीएलाच्या पुस्तकातील भविष्यवाण्यांमुळे आपली खात्री पटते, की यहोवा केवळ शेकडोच नव्हे तर हजारो वर्षे आधीच भविष्य सांगू शकतो.

दानीएलाच्या पुस्तकातील अनेक भविष्यवाण्यांमध्ये देवाच्या राज्याविषयी सांगण्यात आले आहे. या भविष्यवाण्या पूर्ण होत असल्याचे आपण पाहतो तेव्हा आपला विश्‍वास मजबूत होतो. आपली खातरी पटते, की आपण खरोखरच अंतसमयात जगत आहोत. काही टीकाकारांनी दानीएलच्या पुस्तकावर असा आरोप केला, की त्यातील भविष्यवाण्या, घटना घडल्यावर लिहिण्यात आल्या आहेत. टीकाकारांनी केलेला हा आरोप खरा असल्यास दानीएलाने अंतसमयाविषयी केलेल्या भविष्यवाण्यांवर आपल्याला खरोखरच विश्‍वास ठेवता येईल का? टीकाकारांच्या मते दानीएल पुस्तकात दिलेली बरीच ऐतिहासिक माहिती खोटी आहे. त्यांच्या म्हणण्यात किती तथ्य आहे याचे आपण परीक्षण करू या.

खटला!

१०. दानीएलाच्या पुस्तकावर कोणते दोषारोप लावण्यात आले?

१० कल्पना करा की तुम्ही न्यायालयात आहात, तिथे एका मनुष्यावर खटला चालू आहे. सरकारी वकील पूर्ण दाव्यानिशी सांगतात की आरोपीने लबाडी केली आहे पण तो मनुष्य हा आरोप खोटा असल्याचे सांगतो. असेच काहीसे दानीएलाच्या पुस्तकाच्या बाबतीत घडले आहे. हे पुस्तक लिहिणारा दानीएल सा.यु.पू. सातव्या ते सहाव्या शतकांदरम्यान होऊन गेलेला यहुदी भविष्यवक्‍ता होता. या काळात त्याने दानीएलचे पुस्तक लिहिले. पण टीकाकारांनी या पुस्तकाच्या वास्तविकतेवरच घाला घातला आहे. म्हणून या पुस्तकातील माहिती, ऐतिहासिक लिखाणाच्या तुलनेत खरी आहे की नाही ते आपण पाहू या.

११, १२. बेलशस्सर काल्पनिक व्यक्‍ती आहे या आरोपाचे काय झाले?

११ एका हरवलेल्या राजाचीच गोष्ट पाहा. सा.यु.पू. ५३९ मध्ये बाबेलवर कब्जा करण्यात आला तेव्हा बेलशस्सर बाबेलचा राजा होता असे दानीएलाच्या ५ व्या अध्यायात सांगण्यात आले आहे. पण बेलशस्सराचे नाव बायबलशिवाय इतरत्र कोठेही आढळत नसल्यामुळे दानीएलाच्या पुस्तकातील ही माहिती बिनबुडाची आहे असे टीकाकारांचे म्हणणे होते. इतिहासकारांच्या मतानुसार नबोनिडस हा बाबेलचा शेवटचा राजा होता.

१२ परंतु सन १८५४ मध्ये, इराकमध्ये उर या प्राचीन बाबेलोनी शहराच्या अवशेषांत मातीच्या काही नळकांड्या सापडल्या. एका नळकांडीवर राजा नबोनिडसने आपल्या मुलासाठी केलेली प्रार्थना लिहिलेली आढळली; “माझा थोरला मुलगा, बेलशस्सर” असे त्या नळकांडीवर लिहिण्यात आले होते. शेवटी टीकाकारांना देखील कबुल करावे लागले की दानीएलाच्या पुस्तकातील बेलशस्सरचाच हा उल्लेख होता. १८५४ सालापर्यंत बेलशस्सरचा उल्लेख कोणत्याही ऐतिहासिक पुराव्यात आढळलेला नव्हता हे कबूल आहे, पण म्हणून हा राजा मुळात अस्तित्वातच नव्हता असे म्हणणे योग्य नव्हते. दानीएलाचे पुस्तक भरवश्‍यालायक असल्याचे आणखी भरपूर पुरावे आहेत. अशा पुराव्यावरून हेच दिसून येते, की दानीएलाचे पुस्तक देवाच्या वचनाचा एक भाग आहे व या ‘शेवटल्या काळात’ आपण त्याकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे.

१३, १४. नबुखदनेस्सर कोण होता, तो खासकरून कोणत्या खोट्या दैवताचा भक्‍त होता?

१३ एका पाठोपाठ येणाऱ्‍या जागतिक सत्तांविषयी व त्यांच्या राजाच्या कामगिरीविषयी दानीएलाच्या पुस्तकात भविष्यवाण्या करण्यात आल्या आहेत. नबुखदनेस्सरच्या साम्राज्याविषयी, त्याच्या कामगिरीविषयी देखील दानीएलाच्या पुस्तकात भविष्यवाणी करण्यात आली होती. नबुखदनेस्सर या बाबेलच्या राजकुमाराने व त्याच्या सैन्याने कर्कमीश येथे इजिप्तच्या फारो-नकोच्या सैन्याची दाणादाण उडवली. पण आपल्या वडिलांची खबर मिळताच तो बाकीची कारवाई आपल्या सेनापतींच्या हाती सोपवून बाबेलला निघून गेला. त्याचे वडील, नबोपोलास्सराचा मृत्यू झाल्याचे कळल्यावर, नबुखदनेस्सर सा.यु.पू. ६२४ मध्ये राजासनावर बसला. त्याने ४३ वर्षे राज्य केले व त्या दरम्यान त्याने एक मोठे साम्राज्य उभे केले. तेव्हा अश्‍शूराचा प्रांत देखील त्याने काबीज केला. त्याने आपल्या राज्याच्या सीमा सीरिया व पॅलेस्टाईन पासून ते इजिप्तपर्यंत वाढवल्या.

१४ नबुखदनेस्सर राजा मार्डुक या बाबेलच्या प्रमुख देवतेचा भक्‍त होता. मार्डुकनेच आपल्याला प्रत्येक लढाईत विजयी केल्याचे तो मानत असे. यामुळे त्याने बाबेलमध्ये मार्डुक व इतर देवी-देवतांची अनेक सुशोभित मंदिरे बनवली. दानीएलाच्या तिसऱ्‍या अध्यायात सांगितल्याप्रमाणे, दूरा मैदानात या बाबेलोनी राजाने उभी केलेली सोन्याची मूर्ती कदाचित मार्डुक दैवताचीच असावी. (दानीएल ३:१, २) नबुखदनेस्सर लढाईची तयारी करण्याआधी तसेच लढाई जिंकण्यास आवश्‍यक पावले उचलण्याआधी शकून पाहत असे.

१५, १६. नबुखदनेस्सराने बाबेलसाठी काय काय केले होते आणि बढाई मारल्याचा त्याच्यावर काय परिणाम झाला?

१५ नबुखदनेस्सराने बाबेलभोवती मोठ-मोठे दुहेरी तट बांधून आपल्या वडिलांचे राहिलेले काम पूर्ण केले. या दुहेरी व मजबूत तटांमुळे बाबेलवर कब्जा करणे महाकठीण होते. नबुखदनेस्सराने झुलत्या बागा तयार केल्या, ज्यांना प्राचीन काळातील सात आश्‍चर्यांपैकी एक मानले जाते. या बागा त्याने आपल्या मादी देशातील राणीचे मन रमवण्यासाठी तयार केल्या होत्या. नबुखदनेस्सराने बाबेलभोवती मजबूत तटबंदी उभारली. खोट्या भक्‍तीच्या या ठिकाणाबद्दल त्याला किती गर्व होता!

१६ ‘हे थोर बाबेल नगर माझ्याच पराक्रमाने मी बांधिले आहे ना!’ असे एकदा नबुखदनेस्सराने बढाई मारत म्हटले. “हे शब्द राजाच्या मुखातून निघतात न निघतात तोच” तो वेडा झाला. दानीएलाने भाकीत केल्याप्रमाणे, नबुखदनेस्सराला पुढील सात वर्षे राज्य करता आले नाही; तो गवत खावू लागला. त्यानंतर पुन्हा त्याला त्याचे राज्य दिले गेले. (दानीएल ४:३०-३६) या घटनेतून कोणती भविष्यवाणी केली होती, तुम्हाला माहीत आहे का? या भविष्यवाणीची मोठी पूर्णता आपल्या दिवसात, या ‘अंतसमयात’ कशी होत आहे, हे तुम्हाला सांगता येईल का?

भविष्यवाणीवर बारकाईने लक्ष देणे

१७. विश्‍वसम्राट झाल्यानंतरच्या दुसऱ्‍याच वर्षी देवाने नबुखदनेस्सरला स्वप्नात दाखवलेल्या भविष्यवाणीचे वर्णन तुम्ही कसे कराल?

१७ आता दानीएलाच्या पुस्तकातील काही भविष्यवाण्यांवर आपण बारकाईने लक्ष देऊ या. विश्‍वसम्राट झाल्यानंतरच्या दुसऱ्‍या वर्षी (सा.यु.पू. ६०६/६०५) देवाने नबुखदनेस्सराला स्वप्नात दाखवलेल्या गोष्टीमुळे तो अतिशय भयभीत झाला. दानीएलाच्या दुसऱ्‍या अध्यायात सांगितले आहे, की राजाला स्वप्नात एक भव्य मूर्ती दिसते, तिचे डोके सोन्याचे, छाती व हात चांदीचे, पोट व मांड्या पितळेच्या, पाय लोखंडाचे व पावले लोखंड व मातीच्या मिश्रणाची आहेत. मूर्तीच्या या वेगवेगळ्या अंगाचा अर्थ काय होता?

१८. स्वप्नातील मूर्तीचे सोन्याचे डोके कशाला सूचित करते?

१८ देवाच्या भविष्यवक्‍तयाने नबुखदनेस्सराला सांगितले: “महाराज, आपण राजाधिराज असून . . . सुवर्णाचे शीर आपणच आहा.” (दानीएल २:३७, ३८) बाबेल साम्राज्यावर राज्य करणाऱ्‍या राजवंशापैकी नबुखदनेस्सर प्रमुख असल्यामुळे त्याला सोन्याचे डोके असे संबोधले आहे. त्या मूर्तीची छाती व हात रुप्याचे होते आणि ते बाबेलवर विजय मिळवलेल्या मेदो-पर्शियन साम्राज्याला सूचित करतात. पितळेचे पोट आणि मांड्याद्वारे ग्रीक साम्राज्य सूचित होते. या विश्‍वसाम्राज्याची सुरवात कशी झाली?

१९, २०. थोर सिकंदर कोण होता व ग्रीसला विश्‍वसाम्राज्य बनविण्यात त्याने कोणती भूमिका बजावली?

१९ सा.यु.पू. चवथ्या शतकात दानीएलाची भविष्यवाणी पूर्ण करण्यात एका तरुणाने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचा जन्म सा.यु.पू. ३५६ मध्ये झाला आणि पुढे जग त्याला थोर सिकंदर म्हणू लागले. सा.यु.पू. ३३६ मध्ये फिलिप या आपल्या वडिलांच्या हत्येनंतर वयाच्या २० व्या वर्षी सिकंदर मकिदुनियाच्या गादीवर बसला.

२० सा.यु.पु. ३३४ मधील मे महिन्याच्या सुरवातीला सिकंदर जग जिंकायला निघाला. त्याच्याजवळील पायदळ सैनिकांची संख्या ३०,००० होती व घोडदळांमध्ये ५,००० सैनिक होते. आशिया मायनरच्या (आता तुर्की) नैऋत्य किनाऱ्‍यावर ग्रेनिकस नदीजवळ सिकंदरने आपली पहिली लढाई जिंकली. सा.यु.पू. ३२६ पर्यंत, लागोपाठ विजय मिळवणाऱ्‍या सिकंदरने पर्शियनांवर विजय मिळवला आणि पूर्वेला असलेल्या सिंधू नदीपर्यंत (जी आज पाकिस्तानात आहे) आपल्या राज्याचा विस्तार वाढवला. परंतु बाबेलमध्ये असताना ‘अंतिम लढाईत’ त्याला हार मानावी लागली. सा.यु.पू. ३२३ च्या जून १३ ला केवळ ३२ वर्ष व ८ महिन्यांच्या सिकंदरला सर्वात बलाढ्य शत्रूपुढे अर्थात मृत्यूपुढे हार मानावी लागली. (१ करिंथकर १५:५५) सिकंदराला लागोपाठ मिळालेल्या विजयामुळे दानीएलाच्या भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे ग्रीस एक विश्‍वसाम्राज्य बनले होते.

२१. रोमी साम्राज्य लोखंडासारखे कसे होते आणि स्वप्नातील मूर्तीच्या लोखंडाने बनलेल्या पायाने इतर कोणत्या विश्‍वसाम्राज्याला चित्रित केले?

२१ त्या भव्य मूर्तीचे लोखंडाचे पाय कशाला चित्रित करतात? ग्रीस साम्राज्याला जमीनदोस्त करणाऱ्‍या लोखंडासारख्या मजबूत रोमी साम्राज्याला. या साम्राज्याने देवाच्या राज्याची देखील भीड राखली नाही; शिवाय देवाच्या राज्याचा प्रचार करणाऱ्‍या येशूला देखील त्याने सा.यु. ३३ मध्ये वधस्तंभावर खिळून मारले. खऱ्‍या ख्रिस्ती धर्माचा समूळ नाश करण्यासाठी रोमने येशूच्या शिष्यांचा छळ केला. पण नबुखदनेस्सराच्या स्वप्नातील मूर्ती केवळ रोम साम्राज्यालाच नव्हे तर रोममधून उदयास येणाऱ्‍या अँग्लो अमेरिकन साम्राज्याला देखील चित्रित करते.

२२. स्वप्नातील मूर्ती आपण अंतसमयाच्या अगदी शेवटल्या दिवसात जगत आहोत हे समजण्यास आपली मदत कशी करते?

२२ दानीएलाच्या पुस्तकाचा बारकाईने अभ्यास केल्यास आपल्याला हे दिसून येते, की आपण अंतसमयाच्या खूपच जवळ आलो आहोत. कारण आपण त्या स्वप्नातील मूर्तीच्या लोखंडाने व मातीने बनलेल्या पावलांच्या अंतिम टप्प्यात जगत आहोत. सध्याची काही सरकारे लोखंडासारखी किंवा अधिकार गाजवणारी आहेत तर काही मातीसारखी आहेत. “मानवाची संतती” कमकुवत मातीतून बनलेली असली, तरी राज्य करणाऱ्‍या लोखंडासारख्या कणखर सरकारांना सामान्य लोकांच्या काही गोष्टी ऐकाव्याच लागतात. (दानीएल २:४३, NW; ईयोब १०:९) अर्थातच जसे लोखंड आणि माती एकजीव होत नाही तसेच राज्य कारभार आणि सामान्य लोक यांचे एकमत होत नाही. पण देवाचे राज्य लवकरच राजकीयदृष्ट्या तुकडे झालेल्या या जगाचा अंत करील.—दानीएल २:४४.

२३. बेलशस्सर राजाच्या पहिल्या वर्षी दानीएलाला पडलेले स्वप्न व त्याने पाहिलेल्या दृष्टान्तांचे वर्णन तुम्ही कसे कराल?

२३ दानीएलाच्या ७ व्या अध्यायातील लक्षवेधक भविष्यवाणी आपण अंतसमयात जगत असल्याचे सांगते. हा अध्याय बाबेलचा राजा बेलशस्सर याच्या राज्याच्या पहिल्या वर्षात घडलेल्या घटनेविषयी सांगतो. आता दानीएल ७० रीत असताना एकदा “पलंगावर पडला असता त्याला स्वप्न पडले व त्याच्या डोक्यात दृष्टांत घोळू लागले”. पाहिलेल्या या दृष्टान्तामुळे तो अतिशय घाबरला. त्याने म्हटले, “मी दृष्टान्तात . . . पाहिले तो चाऱ्‍ही दिशांचे वारे महासागरावर सुटले; आणि भिन्‍नभिन्‍न अशी चार मोठाली श्‍वापदे समुद्रातून बाहेर निघाली.” (दानीएल ७:१-८, १५) पाहिल्यावर धडकीच भरेल अशी श्‍वापदे! पहिले श्‍वापद पंख असलेल्या सिंहासारखे तर दुसरे अस्वलासारखे. त्यानंतर आणखी एक श्‍वापद चित्त्यासारखे दिसले, त्याच्या पाठीवर पक्ष्याचे चार पंख होते व त्याला चार डोकी देखील होती. चवथे श्‍वापद अत्यंत शक्‍तिशाली होते, “त्याला मोठाले लोखंडी दात” व दहा शिंगे होती. दहा शिंगांमध्ये आणखी “एक लहानसे” शिंग निघाले. “त्या शिंगाला मनुष्याच्या डोळ्यांसारखे डोळे होते व मोठमोठ्या गोष्टी बोलणारे तोंड होते.” किती अक्राळविक्राळ प्राणी!

२४. दानीएल ७:९-१४ नुसार, दानीएलाला स्वर्गात काय दिसते व हा दृष्टान्त कोणत्या गोष्टीला सूचित करतो?

२४ दानीएलाला आता स्वर्गातील दृश्‍य दिसते. (दानीएल ७:९-१४) त्याला “एक पुराणपुरुष” अर्थात यहोवा देव न्याय करण्यासाठी आपल्या वैभवी सिंहासनावर बसलेला दिसतो. “हजारो लोक त्याची सेवा करीत होते; लाखो लोक त्याच्यासमोर उभे होते.” तो पुराणपुरुष श्‍वापदांना कडक शिक्षा सुनावतो. त्यांच्याकडून राज्य काढून घेण्यात येते व चवथ्या श्‍वापदाला ठार मारण्यात येते. त्यानंतर सर्व लोक, सर्व राष्ट्रे व भाषा बोलणारे लोक यांच्यावर राज्य करण्याचा अधिकार ‘मनुष्याच्या पुत्राला’ देण्यात येतो. या घटना अंतसमयात होणार होत्या; तेव्हाच म्हणजे १९१४ या वर्षी मनुष्याचा पुत्र अर्थात येशू ख्रिस्त राजा होणार होता.

२५, २६. दानीएलाच्या पुस्तकाचे वाचन करताना आपल्या मनात कोणते प्रश्‍न येतील व त्यांची उत्तरे आपल्याला कोठे सापडतील?

२५ दानीएलाचे पुस्तक वाचणाऱ्‍यांच्या मनात पुष्कळ प्रश्‍न नक्कीच येतील. उदाहरणार्थ, दानीएलाच्या ७ व्या अध्यायातील चार श्‍वापदांचा काय अर्थ होतो? दानीएल ९:२४-२७ मधील ‘सत्तर सप्तकांविषयी’ काय? दानीएलाच्या ११ व्या अध्यायाविषयी आणि ‘उत्तरेचा राजा व दक्षिणेचा राजा’ यांच्यातील संघर्षाविषयी काय? अंतसमयात हे राजे काय करतील?

२६ यहोवाने पृथ्वीवरील आपल्या अभिषिक्‍त सेवकांना याबद्दल समज दिली आहे. या अभिषिक्‍त सेवकांना दानीएल ७:१८ मध्ये “परात्पर देवाचे . . . पवित्र जन” असे म्हटले आहे. याशिवाय “विश्‍वासू व बुद्धिमान” दासाने दानीएल भविष्यवक्‍त्‌याच्या ईश्‍वरप्रेरित गोष्टींची समज प्राप्त होण्यास आपल्या सर्वांची बरीच मदत केली आहे. (मत्तय २४:४५) ही माहिती दानीएलाच्या भविष्यवाणीकडे लक्ष द्या! या अलीकडेच प्रकाशित झालेल्या प्रकाशनात उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ३२० पानी पुस्तकात सुंदर चित्रे आहेत. या पुस्तकात दानीएलाने लिहिलेल्या भविष्यवाण्यांवर आणि त्याने लिहिलेल्या इतर गोष्टींवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. या सर्व माहितीमुळे देवाच्या भविष्यवाण्यांवरील आपला विश्‍वास आणखीन मजबूत होतो.

आपल्या दिवसाकरता खास अर्थ

२७, २८. (अ) दानीएलाच्या पुस्तकातील भविष्यवाण्यांच्या पूर्णतेविषयी कोणती गोष्ट सत्य आहे? (ब) आपण कोणत्या काळात जगत आहोत आणि आपण काय केले पाहिजे?

२७ आता या खास मुद्याकडे लक्ष द्या: काही गोष्टी वगळल्या तर दानीएलाच्या पुस्तकातील सर्व भविष्यवाण्यांची पूर्णता झालेली आहे. उदाहरणार्थ, दानीएलाच्या दुसऱ्‍या अध्यायात सांगितलेल्या स्वप्नातील मूर्तीचे पाय आजच्या जागतिक परिस्थितीला सूचित करतात. दानीएलाच्या चवथ्या अध्यायात वर्णन करण्यात आलेल्या झाडाच्या बुंध्याच्या पट्ट्या सन १९१४ मध्ये मशिही राजा येशू ख्रिस्त स्वर्गात राजासनारूढ झाला तेव्हा खुल्या करण्यात आल्या. त्यावेळी, दानीएलाच्या सातव्या अध्यायात करण्यात आलेल्या भविष्यवाणीप्रमाणे पुराणपुरुषाने मनुष्याच्या पुत्राला राज्य दिले.—दानीएल ७:१३, १४; मत्तय १६:२७–१७:९.

२८ दानीएलाच्या आठव्या अध्यायातील २,३०० दिवस व बाराव्या अध्यायातील १,२९० व १,३३५ दिवस काळाच्या पडद्याआड गेले आहेत. दानीएलाच्या ११ व्या अध्यायात सांगितलेला “उत्तरेचा राजा” व ‘दक्षिणेचा राजा’ यांच्यामधील संघर्ष आता अंतिम घटकेला येऊन पोहंचला आहे. या सर्वांवरून कळते, की आपण अंतसमयाच्या अगदी शेवटल्या दिवसात जगत आहोत. काळाच्या ओघातील आपली भूमिका ओळखून आपण कोणता दृढ निश्‍चय केला पाहिजे? मनात कुठलाही संशय न बाळगता आपण यहोवाच्या भविष्यवाणीच्या वचनाकडे लक्ष दिले पाहिजे.

तुम्ही काय उत्तर द्याल?

• आपल्या दिवसाविषयी सर्व लोकांना काय माहीत असावे असे देवाला वाटते?

• दानीएलाच्या पुस्तकामुळे आपला विश्‍वास कसा मजबूत होतो?

• नबुखदनेस्सराच्या स्वप्नातील मूर्तीची वैशिष्ट्ये कोणती व ती कशाला सूचित करतात?

• दानीएलाच्या पुस्तकातील भविष्यवाण्यांच्या पूर्णतेविषयी कोणती गोष्ट उल्लेखनीय आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]