व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या भविष्यवाणीच्या वचनावर विश्‍वास ठेवा!

देवाच्या भविष्यवाणीच्या वचनावर विश्‍वास ठेवा!

देवाच्या भविष्यवाणीच्या वचनावर विश्‍वास ठेवा!

“अधिक निश्‍चित असे संदेष्ट्याचे वचन [भविष्यवाणीचे वचन] आम्हाजवळ आहे.”२ पेत्र १:१९.

१, २. सर्वात पहिली भविष्यवाणी कोणती होती व त्यामुळे कोणता प्रश्‍न उभा राहतो?

यहोवा देवानेच सर्वात पहिली भविष्यवाणी केली होती. आदाम आणि हव्वेने पाप केल्यावर देवाने सापाला म्हटले: “तू व स्त्री, तुझी संतति व तिची संतति यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडिशील.” (उत्पत्ति ३:१-७, १४, १५) या भविष्यवाणीची समज कित्येक शतकांनंतर स्पष्ट झाली.

या पहिल्या भविष्यवाणीत पापी मानवजातीसाठी आशेचा एक किरण होता. कित्येक वर्षांनंतर बायबलमध्ये दियाबल सैतानाची “जुनाट साप” अशी ओळख करून देण्यात आली. (प्रकटीकरण १२:९) पण त्या पहिल्या भविष्यवाणीतील देवाचे संतान कोणाला सूचित करणार होते?

ते संतान कोण होते?

३. हाबेलाने या पहिल्या भविष्यवाणीवर विश्‍वास कसा दाखवला?

आदामाचा धार्मिक मुलगा, हाबेल त्याच्यापेक्षा फार वेगळा होता. त्याने पहिल्या भविष्यवाणीवर विश्‍वास ठेवला व यामुळेच त्याने देवाला प्राण्यांचे अर्पण केले. पापाची क्षमा मिळण्यासाठी रक्‍त सांडणे आवश्‍यक असल्याचे त्याने ओळखले होते. म्हणूनच देवाने त्याचे बलिदान स्वीकारले. (उत्पत्ति ४:२-४) तरीपण पहिल्या भविष्यवाणीतील संतानाची ओळख, अद्यापही एक रहस्यच होते.

४. देवाने आब्राहामला कोणते अभिवचन दिले व त्यात अभिवचन दिलेल्या संतानाविषयी काय समजते?

हाबेलच्या मृत्यूनंतर सुमारे २,००० वर्षांनी, यहोवाने अब्राहामाला ही भविष्यवाणी सांगितली: “यास्तव मी तुला आशीर्वादित करीन व वृद्धिच वृद्धि करुन तुझी संतति आकाशातील ताऱ्‍यांइतकी . . . होईल . . . पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील.” (उत्पत्ति २२:१७, १८) अशारितीने पहिल्या भविष्यवाणीच्या पूर्णतेत अब्राहाम देखील गोवला गेला. या शब्दांवरून, सैतानाची कृत्ये नष्ट करणारे संतान अब्राहामाच्या वंशातून येणार असल्याचे समजले. (१ योहान ३:८) अब्राहाम “देवाच्या अभिवचनाकडे पाहून . . . विश्‍वासामुळे डळमळला नाही.” तसेच प्राचीन काळातील अनेक विश्‍वासू साक्षीदार देखील “अभिवचनानुसार फलप्राप्ती झाली नाही” म्हणून डळमळले नाहीत. (रोमकर ४:२०, २१; इब्री लोकांस ११:३९) उलट त्यांनी देवाच्या भविष्यवाणीवर विश्‍वास ठेवला.

५. अभिवचन दिलेले संतान कोण होते व असे का म्हटले जाऊ शकते?

देवाने भविष्यवाणी केलेल्या संतानाविषयी प्रेषित पौलाने लिहिले: “अब्राहामाला व त्याच्या संतानाला ती अभिवचने सांगितली होती. संतानांना असे पुष्कळ जणांसंबधाने तो म्हणत नाही; तर ‘तुझ्या संतानाला’ असे एकाविषयी तो म्हणत आहे, आणि तो एक ख्रिस्त आहे.” (गलतीकर ३:१६) याचा अर्थ, अब्राहामाच्या एकाच संतानाद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होणार होती. हे संतान इश्‍माएल या अब्राहामाच्या मुलाच्या वंशाद्वारे किंवा अब्राहामाला कटूराकडून झालेल्या मुलांच्या वंशाद्वारे येणार नव्हते. तर अब्राहामाचा मुलगा इसहाक व नातू याकोब याच्या घराण्यातून येणार होते. (उत्पत्ति २१:१२; २५:२३, ३१-३४; २७:१८-२९, ३७; २८:१४) याकोबाने सांगितले की संतान अर्थात शिलो, त्याचा पुत्र यहुदा याच्या वंशातून येईल व सर्व ‘राष्ट्रांतील’ लोक त्याच्या अधीन होतील. परंतु नंतर, यहोवाने सांगितले की हे संतान दावीदाच्या वंशातून येईल. (उत्पत्ति ४९:१०, तळटीप; २ शमुवेल ७:१२-१६) यामुळेच पहिल्या शतकातील यहुदी ते संतान अथवा मशिहा दावीदाच्या वंशातून येणार असल्याची वाट पाहत होते. (योहान ७:४१, ४२) देवाने त्याच शतकात संतानाविषयी केलेल्या भविष्यवाणीचे रहस्य उलगडले तेव्हा ते संतान म्हणजे येशू ख्रिस्त असल्याचे समजले.

मशिहाची ओळख!

६. (अ) आपण सत्तर सप्तकांची भविष्यवाणी कशी समजावी? (ब) येशूने “पातकांचा अंत” कधी व कसा केला?

दानीएल भविष्यवक्‍त्‌याने मशिहाविषयी एक महत्त्वपूर्ण भविष्यवाणी लिहून ठेवली. त्याने मेदी दारयावेश राजाच्या पहिल्या वर्षी, यरुशलेमाचा ७० वर्षे ओसाडीचा काळ लवकरच संपण्याच्या बेतात असल्याचे ओळखले. (यिर्मया २९:१०; दानीएल ९:१-४) दानीएल एकदा प्रार्थना करीत असताना, गॅब्रिएल देवदूत तेथे आला व त्याने ‘पातकांचा अंत करण्यासाठी ठरवलेल्या सत्तर सप्तकांचा’ उलगडा केला. सत्तराव्या सप्तकाच्या मध्यंतरीच्या काळात मशिहाचा वध होणार होता. पहिल्या अर्तहशश्‍त राजाने ‘यरुशलेमाचे पुनर्वसन करण्याची’ सा.यु.पू. ४५५ मध्ये आज्ञा दिली तेव्हा “सत्तर सप्तकांच्या वर्षांची” सुरवात झाली होती. (दानीएल ९:२०-२७; मॉफट; नहेम्या २:१-८) भविष्यवाणीनुसार मशिहा ६९ सप्तकांनंतर येणार होता. हा ४८३ वर्षांचा कालावधी सा.यु.पू. ४५५ पासून ते सा.यु. २९ पर्यंत चालला. याच वर्षी येशूचा बाप्तिस्मा झाला आणि देवाने त्याचा मशिहा किंवा ख्रिस्त म्हणून अभिषेक केला. (लूक ३:२१, २२) सा.यु. ३३ मध्ये येशूने आपल्या जीवनाची खंडणी देण्याद्वारे “पातकांचा अंत” केला. (मार्क १०:४५) हे जाणल्यामुळे देवाच्या भविष्यवाणीच्या वचनावरील आपला विश्‍वास आणखीन मजबूत होत नाही का? *

७. येशूने मशिही भविष्यवाण्या कशाप्रकारे पूर्ण केल्या ते शास्त्रवचनांचा उपयोग करून सांगा.

भविष्यवाणीच्या वचनावरील विश्‍वासामुळे आपल्याला मशिहा ओळखता येतो. हिब्रू शास्रवचनांमधील मशिहाविषयी असणाऱ्‍या सर्व भविष्यवाण्या ग्रीक शास्रवचनांतील लेखकांनी थेटपणे येशूला लागू केल्या. उदाहरणार्थ, येशूचा एका कुमारीच्या पोटी बेथलेहेममध्ये होणारा जन्म. (यशया ७:१४; मीखा ५:२; मत्तय १:१८-२३; लूक २:४-११) त्याला इजिप्तमधून बोलावण्यात येणे व त्याच्या जन्मानंतर लहान मुलांना ठार मारण्यात येणे. (यिर्मया ३१:१५; होशेय ११:१; मत्तय २:१३-१८) येशूने लोकांचे आजार आपल्यावर घेणे. (यशया ५३:४; मत्तय ८:१६, १७) भविष्यवाणी केल्याप्रमाणे गाढवीच्या शिंगरावर बसून त्याचे यरुशलेमात येणे. (जखऱ्‍या ९:९; योहान १२:१२-१५) त्याला वधस्तंभावर खिळल्यावर, सैनिकांनी त्याच्या वस्त्राचे आपसात वाटप करणे व त्याच्या झग्यावर चिठ्ठ्या टाकणे ही स्तोत्रकर्त्याने लिहिलेली भविष्यवाणी पूर्ण झाली. (स्तोत्र २२:१८; योहान १९:२३, २४) मरतेवेळी त्याची हाडे न मोडणे व त्याला भाल्याने भोसकले जाणे. (स्तोत्र ३४:२०; जखऱ्‍या १२:१०; योहान १९:३३-३७) बायबल लेखकांनी ईश्‍वरी प्रेरणेने मशिहाविषयी केलेल्या भविष्यवाण्यांची ही काही उदाहरणे आहेत. या सर्व भविष्यवाण्या येशू पृथ्वीवर असताना पूर्ण झाल्या. *

मशिही राजाचे स्वागत!

८. पुराणपुरुष कोण होता व दानीएल ७:९-१४ मध्ये नमूद करण्यात आलेल्या भविष्यवाणीची पूर्णता कशी झाली?

बेलशस्सर बाबेलवर राज्य करू लागला त्याच वर्षी यहोवाने दानीएलाला स्वप्नात विशेष दृष्टान्त दाखवले. दानीएलाने पहिल्यांदा चार विक्राळ श्‍वापदांना स्वप्नात पाहिले. देवदूताने त्यांची ओळख “चार राजे” अशी करून दिली. एकापाठोपाठ येणाऱ्‍या विश्‍वसाम्राज्यांना हे राजे चित्रित करत होते. (दानीएल ७:१-८, १७) त्यानंतर दानीएल ‘पुराणपुरुषाला’ अर्थात यहोवाला वैभवी राजासनावर बसलेला पाहतो. तो पुराणपुरुष श्‍वापदांना कडक शिक्षा सुनावतो. त्यांच्याकडून राज्य काढून घेण्यात येते व चवथ्या श्‍वापदाला ठार मारण्यात येते. सर्व लोक, सर्व राष्ट्रे व भाषा बोलणारे लोक यांच्यावर निरंतर राज्य करण्याचा अधिकार ‘मनुष्याच्या पुत्राला’ देण्यात येतो. (दानीएल ७:९-१४) सन १९१४ मध्ये मनुष्याचा पुत्र अर्थात येशू ख्रिस्त स्वर्गात राजा झाला तेव्हा ही भविष्यवाणी पूर्ण झाली.—मत्तय १६:१३.

९, १०. (अ) स्वप्नातील मूर्तीच्या विविध भागांचा अर्थ काय? (ब) दानीएल २:४४ ची पूर्णता होण्याविषयीचे स्पष्टीकरण तुम्ही कसे द्याल?

देव “राजांस स्थानापन्‍न अथवा स्थानभ्रष्ट करितो” याची दानीएलाला कल्पना होती. (दानीएल २:२१) यहोवा “रहस्ये प्रगट करणारा” देव असल्यामुळे, भव्य मूर्तीविषयी नबुखदनेस्सर या बाबेलच्या राजाला पडलेल्या स्वप्नाचा उलगडा करण्यासाठी यहोवाच आपल्याला मदत करील असा विश्‍वास दानीएलाला होता. मूर्तीच्या विविध अंगानी बॅबिलोन, मेदो-पर्शिया, ग्रीस आणि रोम यांसारख्या विश्‍वसाम्राज्यांचा उदय आणि पतन सूचित केले. देवाने आपल्या दिवसांत तसेच भविष्यात होणाऱ्‍या जागतिक घटनांविषयी लिहून ठेवण्यासाठी दानीएलाचा वापर केला.—दानीएल २:२४-३०.

१० दानीएलाच्या पुस्तकातील एका भविष्यवाणीत सांगण्यात आले आहे: “त्या राजांच्या अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसऱ्‍याच्या हाती कधी जाणार नाही; तर ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.” (दानीएल २:४४) हे राज्य सन १९१४ मध्ये “परराष्ट्रीयांची सद्दी” संपली तेव्हा देवाने ख्रिस्ताच्या नेतृत्त्वाखाली स्वर्गात स्थापन केले. (लूक २१:२४; प्रकटीकरण १२:१-५) नबुखदनेस्सराला स्वप्नात दिसलेला ‘पर्वत’ सबंध विश्‍वावरील यहोवाच्या सत्तेला सूचित करतो. या ‘पर्वतापासून पाषाणाचा’ म्हणजे, मशिही राज्याचा उदय झाला. हर्मगिदोनात हा पाषाण त्या मूर्तीला जाऊन धडकेल व तिचे भुशाप्रमाणे चूर्ण करील. त्यानंतर मशिही राज्य मोठ्या पर्वताप्रमाणे ‘सर्व पृथ्वीवर’ सदासर्वकाळ टिकेल.—दानीएल २:३५, ४५; प्रकटीकरण १६:१४, १६. *

११. येशूचे रूपांतर कोणत्या गोष्टीची पूर्वझलक होते व पेत्रावर या दृष्टान्ताचा कसा प्रभाव पडला?

११ येशू पृथ्वीवर असताना आपल्या राज्य शासनाचा विचार करून त्याने शिष्यांना म्हटले होते: “येथे उभे असलेल्यांमध्ये काही असे आहेत की ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.” (मत्तय १६:२८) असे बोलल्यानंतर सहा दिवसांनी येशूने पेत्र, याकोब आणि योहानाला एका उंच डोंगरावर नेले तेव्हा तेथे त्याचे रूपांतर झाले. त्यावेळी एका पांढऱ्‍याशुभ्र मेघाने प्रेषितांवर छाया केली आणि देवाने शिष्यांना म्हटले: “हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्‍याविषयी मी संतुष्ट आहे; ह्‍याचे तुम्ही ऐका.” (मत्तय १७:१-९; मार्क ९:१-९) ख्रिस्त राज्याधिकारात येण्याचा केवढा हा मोठा पुरावा! म्हणूनच पेत्राने या आश्‍चर्यकारक दृष्टान्ताविषयी म्हटले: “अधिक निश्‍चित असे संदेष्ट्याचे वचन [भविष्यवाणीचे वचन] आम्हांजवळ आहे.”—२ पेत्र १:१६-१९. *

१२. देवाच्या भविष्यवाणीच्या वचनावर विश्‍वास प्रदर्शित करण्याची खासकरून हीच वेळ का आहे?

१२ ‘संदेष्ट्याच्या वचनात’ केवळ हिब्रू शास्रवचनांतील मशिहासंबंधीत असलेल्या भविष्यवाण्यांचाच नव्हे तर आपण “पराक्रमाने व मोठ्या वैभवाने” येऊ असे जे येशूने म्हटले त्याचा देखील समावेश होतो. (मत्तय २४:३०) रूपांतरामुळे ख्रिस्ताचे मोठ्या वैभवाने राज्याधिकारात येणे याविषयी भविष्यवाणीच्या वचनात दिलेल्या माहितीची अधिक खातरी झाली. तो मोठ्या गौरवाने प्रकट होईल याचा हाच अर्थ होतो, की लवकरच तो अविश्‍वासू लोकांचा नाश करील व विश्‍वास ठेवणाऱ्‍या लोकांना आशीर्वाद देईल. (२ थेस्सलनीकाकर १:६-१०) बायबल भविष्यवाणीची होत असलेली पूर्णता आपण ‘शेवटल्या दिवसात’ असल्याचे दाखवते. (२ तीमथ्य ३:१-५, १६, १७; मत्तय २४:३-१४) याच अंतसमयात ‘मोठे संकट’ सुरू होईल तेव्हा येशू ख्रिस्त, ज्याचे नाव मीखाएल देखील आहे, तो या दुष्ट व्यवस्थीकरणावर यहोवाच्या वतीने न्यायदंड बजावेल व त्याचा अंत करील. (मत्तय २४:२१; दानीएल १२:१) देवाच्या भविष्यवाणीच्या वचनावर विश्‍वास प्रदर्शित करण्याची हीच योग्य वेळ आहे.

देवाच्या भविष्यवाणीच्या वचनावर शेवटपर्यंत विश्‍वास ठेवा

१३. देवावर नेहमी प्रेम करत राहण्यासाठी व त्याच्या वचनावरील आपला विश्‍वास टिकवून ठेवण्यासाठी कोणती गोष्ट आपली मदत करू शकते?

१३ आपण सत्यात नवीन असताना पहिल्यांदाच देवाच्या भविष्यवाणीच्या वचनाच्या पूर्णतेविषयी शिकलो तेव्हा आपल्याला किती आनंद झाला होता! पण आता आपला विश्‍वास कमजोर झाला आहे का वा आपण थंडावलो आहोत का? इफिसमधील ख्रिश्‍चनांसारखे आपण कधीही होऊ नये; त्यांनी ‘आपली पहिली प्रीती सोडून दिली होती.’ (प्रकटीकरण २:१-४) आपण कित्येक वर्षांपासून यहोवाची सेवा करत असलो, तरी पुढे देखील पहिल्यांदा आपण देवाचे राज्य आणि त्याचे नीतिमत्त्व मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्यामुळे स्वर्गामध्ये आपले धन जमा होईल. असे केले नाही तर आपलेही प्रेम थंड होऊ शकते. (मत्तय ६:१९-२१, ३१-३३) आपण काळजीपूर्वक बायबलचा अभ्यास करत राहिले पाहिजे, ख्रिस्ती सभांमध्ये व राज्य प्रचारकार्यात आवेशाने सहभाग घेत राहिले पाहिजे. असे केल्यामुळे यहोवा देव, त्याचा पुत्र आणि बायबलवरील आपले प्रेम कायम राखण्यास आपल्याला मदत होईल. (स्तोत्र ११९:१०५; मार्क १३:१०; इब्री लोकांस १०:२४, २५) या सर्व गोष्टींमुळे देवाच्या वचनावरील आपला विश्‍वास भक्कम राहील.—स्तोत्र १०६:१२.

१४. यहोवाच्या भविष्यवाणीच्या वचनावर विश्‍वास ठेवल्यामुळे अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना काय प्रतिफळ मिळाले?

१४ देवाच्या भविष्यवाण्या प्राचीनकाळात पूर्ण झाल्या त्याचप्रमाणे राहिलेल्या काही भविष्यवाण्या देखील लवकरच पूर्ण होतील असा आपण विश्‍वास बाळगला पाहिजे. उदाहरणार्थ, ख्रिस्ताची राज्य वैभवातील उपस्थिती आता वास्तविकता बनली आहे. शिवाय “जो विजय मिळवितो त्याला, देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे, त्यावरचे फळ मी खावयास देईन” या वचनाची देखील पूर्णता झाली. (प्रकटीकरण २:७, १०; १ थेस्सलनीकाकर ४:१४–१७) मरेपर्यंत विश्‍वासू राहिलेल्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना येशूने पुन्हा जिवंत केले. अशाप्रकारे त्यांना स्वर्गात ‘जीवनाच्या झाडाचे फळ खाण्याची’ सुसंधी मिळाली. याचा अर्थ, “सनातन, अविनाशी, अदृश्‍य राजा, असा एकच देव” असलेल्या यहोवाने येशू ख्रिस्ताच्याद्वारे त्यांना अमरत्व व अविनाशीपण बहाल केले. (१ तीमथ्य १:१७; १ करिंथकर १५:५०-५४; २ तीमथ्य १:१०) देवावर नेहमी प्रेम करत राहिल्यामुळे व त्याच्या भविष्यवाणीच्या वचनावर अटळ विश्‍वास ठेवल्यामुळे मिळालेला हा केवढा मोठा बहुमान!

१५. ‘नव्या पृथ्वीचा’ पाया कोणत्या लोकांवर रचण्यात आला व त्यांचे सोबती कोण आहेत?

१५ मरेपर्यंत विश्‍वासू राहिलेल्या अभिषिक्‍त लोकांना ‘देवाच्या स्वर्गीय बागेत’ पुन्हा जिवंत केल्यानंतर लगेचच आध्यात्मिक इस्राएलाच्या शेषांनी मोठ्या बाबेलपासून अर्थात खोट्या धर्माच्या जगव्याप्त साम्राज्यापासून स्वतःला वेगळे केले. (प्रकटीकरण १४:८; गलतीकर ६:१६) त्यांच्यावरच ‘नव्या पृथ्वीचा’ पाया रचण्यात आला. (प्रकटीकरण २१:१) याबरोबरच एका ‘राष्ट्राचा’ जन्म झाला व त्याची संपूर्ण पृथ्वीवर आध्यात्मिक भरभराट होत गेली. (यशया ६६:८) या “शेवटल्या दिवसात” आध्यात्मिक इस्राएलाचे मेंढरासमान लाखो सोबती आता एकत्र येत आहेत.—यशया २:२-४; जखऱ्‍या ८:२३; योहान १०:१६; प्रकटीकरण ७:९.

देवाच्या भविष्यवाणीत आपले भवितव्य

१६. अभिषिक्‍त जणांना एकनिष्ठेने सहकार्य करणाऱ्‍यांसाठी कोणते भविष्य असेल?

१६ अभिषिक्‍तांना एकनिष्ठेने मदत करणाऱ्‍यांना कोणती आशा आहे? त्यांचाही देवाच्या भविष्यवाणीच्या वचनावर विश्‍वास आहे व सुख-शांती असलेल्या नवीन जगात जगण्याची त्यांची देखील इच्छा आहे. (लूक २३:३९-४३) तेथे ते ‘जीवनाच्या नदीतून’ पाणी पितील आणि नदीकाठच्या ‘झाडाच्या पानांमुळे’ त्यांना आरोग्य लाभेल. (प्रकटीकरण २२:१, २) अशा परिस्थितीत तुम्हालाही राहायचे असेल तर यहोवावरील तुमचे प्रेम कधीही कमी होऊ देऊ नका व त्याच्या भविष्यवाणीच्या वचनावर नेहमी विश्‍वास ठेवा. तुम्हालाही नवीन जगात जीवनाचा आनंद अनंतकाळ लुटायला मिळावा हीच आमची सदिच्छा.

१७. नवीन जगात कोणते आशीर्वाद मिळतील?

१७ येणाऱ्‍या नवीन जगातील जीवन नेमके कसे असेल याचे सविस्तर वर्णन करणे आपल्याला तरी आता शक्य नाही. परंतु देवाच्या भविष्यवाणीच्या वचनात आज्ञाधारक मानवजातीला मिळणाऱ्‍या आशीर्वादांबद्दलची पुष्कळशी समज आपल्याला मिळते. तेव्हा केवळ देवाचे राज्य असेल; त्याच्याच इच्छेप्रमाणे सर्वकाही होईल. त्यावेळी कोणी कोणाला त्रास देणार नाही, ‘प्राणी देखील कोणाला उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत.’ (यशया ११:९; मत्तय ६:९, १०) लीन जन पृथ्वीचे वतन पावतील व ते “उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.” (स्तोत्र ३७:११) तेव्हा पाण्याची मुबलकता असल्यामुळे दुष्काळ पडणार नाही, तर डोंगरांच्या शिखरांवर देखील पिके डोलतील. (स्तोत्र ७२:१६) कोणाच्या डोळ्यांत अश्रू येणार नाहीत. आजारपण आणि मृत्यूचा मागमूस देखील उरणार नाही. (यशया ३३:२४; प्रकटीकरण २१:४) डॉक्टर, औषधे, इस्पितळे किंवा मानसिक उपचार केंद्रांची आवश्‍यकता नसेल, मृत्यू कायमचा काढून टाकल्यामुळे कोणीही शोक करणार नाही. अशा वेळी परिस्थिती कशी असेल याची कल्पना तुम्ही करू शकता का? खरोखरच किती उज्ज्वल भविष्य!

१८. (अ) दानीएलाला कोणती हमी देण्यात आली? (ब) दानीएलाच्या ‘वतनात’ कोणत्या गोष्टी समाविष्ट असतील?

१८ मेलेले लोक पुन्हा जिवंत होतील. नीतिमान ईयोबाला हीच आशा होती. (ईयोब १४:१४, १५) दानीएलाला देखील हीच आशा होती त्यामुळेच यहोवाच्या देवदूताने त्याला सांत्वनदायक आश्‍वासन दिले: “तथापि अंतापर्यंत तू जाऊन स्वस्थ राहा; म्हणजे तुला आराम मिळेल आणि तू युगाच्या समाप्तीस आपले वतन प्राप्त करून घेण्यास उठशील.” (दानीएल १२:१३) दानीएलाने मरेपर्यंत देवाची विश्‍वासूपणे सेवा केली. आता तो गाढ झोपेत आहे पण ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राजवटीत ‘नीतिमान पुन्हा जिवंत होतील’ तेव्हा त्याला देखील मेलेल्यांतून पुन्हा ‘उठविले’ जाईल. (लूक १४:१४) दानीएलाला देवाच्या राज्यात कोणते “वतन” मिळेल? यहेज्केलच्या भविष्यवाणीत सूचित केल्याप्रमाणे, नवीन जगात यहोवा सर्व लोकांना समान जागा किंवा वतन देईल; त्यामध्ये कोणताही पक्षपात केला जाणार नाही. (यहेज्केल ४७:१३–४८:३५) दानीएलालाही नवीन जगात जागा मिळेल एवढेच नव्हे तर यहोवाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी त्याला बऱ्‍याच जबाबदाऱ्‍या देखील देण्यात येतील.

१९. नवीन जगात जगण्याकरता आपण आणखी काय केले पाहिजे?

१९ आता तुमच्या वाट्याला येणाऱ्‍या वतनाविषयी किंवा जागेविषयी काय? देवाच्या वचनावर, बायबलवर तुमचा विश्‍वास असल्यास त्या नवीन जगाची तुम्हालाही नक्कीच ओढ लागलेली असेल. कल्पना करा की तुम्ही तेथे आहात, मिळालेल्या विपुल आशीर्वादांमुळे तुम्ही आनंदी आहात, तुम्ही पृथ्वीला सुंदर बनविण्याच्या कामात गुंतले आहात तसेच, मृत लोक पुन्हा जिवंत होतात तेव्हा त्यांचे आनंदाने स्वागत करीत आहात. शेवटी, मानवाने अशा सुंदर जगात जगावे हाच तर देवाचा उद्देश होता. पहिल्या मानवी जोडप्याने अशाच सुंदर वातावरणात राहावे म्हणून देवाने त्यांना निर्माण केले होते. (उत्पत्ति २:७-९) ही सुंदर पृथ्वीच तर मानवाचे वास्तविक घर आहे. तर मग, कोट्यवधी लोकांसोबत नव्या जगात जगण्यासाठी तुम्ही तुमचे जीवन देवाच्या उद्देशांनुसार जगाल का? यहोवा देवावर तुमचे मनापासून प्रेम असल्यास आणि त्याच्या भविष्यवाणीच्या वचनावर तुमचा पूर्ण विश्‍वास असल्यास देवाच्या नवीन जगात तुम्ही सदासर्वकाळ आनंदाने जगू शकता.

[तळटीपा]

^ परि. 6 दानीएलाच्या भविष्यवाणीकडे लक्ष द्या या हिंदी पुस्तकातील ११ वा अध्याय पाहा व वॉचटावर सोसायटीने प्रकाशित केलेले इन्साइट ऑन द स्क्रिपचर्स या पुस्तकातील “सेवंटी वीक्स” या शीर्षकाखालील माहिती देखील पाहा.

^ परि. 7 सर्व शास्रवचने ईश्‍वरप्रेरित व लाभदायक आहेत या वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रकाशित केलेल्या इंग्रजी पुस्तकाची पृष्ठे ३४३-४ पाहा.

^ परि. 10 दानीएलाच्या भविष्यवाणीकडे लक्ष द्या! या पुस्तकातील ४ ते ६ अध्याय पाहा.

^ परि. 11 “देवाच्या भविष्यसूचक वचनाकडे लक्ष द्या” हा टेहळणी बुरूज एप्रिल १, २००० मधील लेख पाहा.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• पहिली भविष्यवाणी कोणती होती व अभिवचन दिलेले संतान कोण होते?

• येशूमुळे कोणत्या मशिही भविष्यवाण्यांची पूर्णता झाली?

दानीएल २:४४, ४५ ची पूर्णता कशी होईल?

• देवाच्या भविष्यवाणीच्या वचनामुळे आज्ञाधारक मानवजातीला कोणत्या भविष्याची आशा मिळते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१८ पानांवरील चित्र]

येणाऱ्‍या नवीन जगात जगण्याची तुम्हाला ओढ लागली आहे का?